Saturday, February 21, 2009

| माझे माऊली !

भरल्या जखमेवरची खपली
काढावीस असेच तू
जिवघेणे बोललीस अन्
मनाचा कोपरा ढासळला !

गच्च भरले घर
पाखराने एक एक पंख
गाळावे तसे
विलग झाले,
तू सारवलेली भुई माती लिंपल्या भिंती
सगळच कसं दुरावलं
आता तू माझ्यावर सगळा
भार टाकून
सतीच्या व्रुन्दावनापाशी
जाऊन बसू नकोस !


परंपरांचे ओझे अन्
संस्काराचे जोखड वागवत
तू काळ्याचे पांढरे केलेस,
कुंकू हरविले तरी तू
अबीर कपाळी लावून
विठ्ठलाला आळवत राहिलीस
माझे माऊली ! माझे माऊली !

तुला एकच सांगतो
मला माझ्या वाटे चालू दे !
वांझोट्या वारशाचे ओझे
माझ्या शिरी देऊ नकोस
माझे माऊली !
अश्या वंशाला वाढविण्यापेक्षा
तू पंढरीची वाट चाल
मी पडक्या वाड्याच्या प्रवेशद्वाराची
पायरी होऊन इथेच राहीन !

विजयकुमार.......................19 / 01 / 2009

No comments:

Post a Comment