स्टेला आपल्या विचारांच्या विश्वातून जेव्हा भानावर आली तेव्हा तिला जाणवले की ती समोर जाकोबच्या शेजारच्या सिटवर कारमध्ये बसलेली आहे आणि जाकोब कार चालवित आहे. पुन्हा तिचं लक्ष त्याच्या मनगटावर बांधलेल्या चमकणाऱ्या खड्याकडे गेलं. तिला त्या खड्याच्या एवढ्या मोठ्या आकाराचं आणि त्याच्या तेजस्वीपणाचं आश्चर्य वाटत होतं.
'' तुला हा कुठे मिळाला?"'' शेवटी तिने न राहवून त्या खड्याबद्दल विचारलेच.
जाकोबने ड्रायव्हींग करता करता एकदा तिच्याकडे आणि एकदा त्या त्याच्या मनगटावर बांधलेल्या खड्याकडे दृष्टीक्षेप टाकला.
'' तुला खड्यांची आवड आणि पारख दिसते'' तो म्हणाला आणि पुन्हा पुढे रस्त्यावर बघत ड्रायव्हींग करु लागला.
'' गिब्सन... मला गिब्सनने दिला हा'' जाकोब पुढे म्हणाला.
स्टेलाने एकदा त्याच्याकडे पहाले आणि पुन्हा त्या खड्याकडे पाहत आपल्या भूतकाळात डूबून गेली .......
गिब्सनची कार रस्त्यावर भरधाव वेगाने धावत होती. कार चालविता चालविता गिब्सनने चहोवार एक नजर टाकली. आजुबाजुला सगळी हिरवीगार शेतं आणि कुरणं होती. तेवढ्यात त्याची कार एका उंचच उंच झाडे झुडपे आणि गवत वाढलेल्या शेताजवळून जायला लागली. त्या शेतात वाढलेल्या झाडांच्या आणि झुडपाच्या अगदी मध्यभागी एक जुना प्राचीन वाडा होता. गिब्सनने आपली कार रस्त्याच्या कडेला घेवून थांबवली. तो वाडा आणि आजुबाजुचा परीसर पाहून जणू तो मंत्रमुग्ध झाला होता. तो त्याच्या गाडीतून उतरला आणि हळू हळू त्या शेताकडे चालू लागला, जणू एखादी अज्ञात शक्ती त्याला त्या वाड्याकडे ओढत असावी.
त्या शेतातील वाढलेली झाडे झुडपं ओलांडून तो त्या वाड्याजवळ जायला निघाला. तेवढ्यात त्याचं लक्ष वाड्याच्या भिंतीला लागून असलेल्या एका काळ्या दगडात खणलेल्या आणि काळ्या खडकाने वेढलेल्या विहिरीकडे गेलं.
हिच तर ती विहिर नसावी?...
त्याची उत्सुकता चाळवली गेली होती. उत्सुकतेपोटी तो त्या विहिरीकडे जावू लागला.
विहिरीच्या काठावर उभा राहून आता तो आत डोकावू लागला. त्याने बाजुचा खडकाच्या ढिगाऱ्यातील एक दगड उचलला आणि विहिरीत टाकला. काहीच आवाज नाही. ना विहिरीचं बुड दिसत होतं ना पाणी, नुसतं अवकाशासारखं अमर्याद काळं काळं दिसत होतं.
क्रमश:...
No comments:
Post a Comment