चैत्रातली एक झुंजूमुंजू
रविकिरणांनी नाहणारी हिरवाई
किलबिलते पक्षी
गुणगुणती हवा
नदीत उतरते प्यासे मेघ
अन हे आरसपानी सौंदर्य
डोळ्यांनी पिणारी मी
नदीकिनारी..
सवयीने
नजर स्थिरावली
इवलीशी हिरवी-पोपटी पानं ल्यालेल्या गुलमोहरावर
अन
अचानक कळलं त्याचं गुपित
एका फांदीवर लपलेलं
लालभडक तांबडी रंगातून उलगडणारं
काय आहे ते ?
पक्षी ?
नाही..
ही तर..
ही तर..आगीची नक्षी..
गुलमोहर......गुलमोहर फुलतोय.......
माझ्या ओठांवर फुललेलं स्मित
तनमनात भिनत गेलं
अन उठवत फिरलं
शेकडो लहरी
बैचैनीच्या..
पडली ठिणगी
त्या लाल तांबड्या फुलांची
माझ्या रोमारोमांत
आता ही आग शमणार नाही
पेटवत जाईल सारं रान
नाही वाचणार मीही
सारे दिन,सार्या राती
उठतील ठिणग्याच ठिणग्या
पानापानांवर
झाडाच्या अन वहीच्याही..
हा जन्म गुलमोहराचा
जन्म..
माझ्यातल्या आगीचा..
- स्वप्ना
No comments:
Post a Comment