Monday, May 11, 2009

** स्क्रीनसेव्हर **

तसं सकाळीही तू पेटलेलाच असतो

आता आग म्हणजे आगच ना !

पण कोवळी उन्हं जाणती होतात

अन तू धगधगायला लागतो..



जाणून असते मी

म्हणून

त्या रस्त्याने दुपारची निघतही नाही..



खिडकीतूनच डोकावते

तुला पाहते

एकटक

पाहता पाहता डोळ्यांत पाणी जमा होते

ऊर धपापते

पण नजर तुझ्यावरुन हटत नाही

तुझी हिरवी मंद सळसळ

लाल नारिंगी तळमळ

माझ्यावर गारुड करतात



खळकन पापणीआड लपलेला थेंब गालावरुन ओघळतो

मी भानावर येते

खिडकी लावते

हं , आता लक्ष विचलित होणार नाही..



तितक्यात,



इकडे कम्प्युटरवर गुलमोहराचा स्क्रीनसेव्हर चालू होतो....



- स्वप्ना

No comments:

Post a Comment