चांगले रस्ते बांधल्यामुळे अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते, उद्योगांचा विकास होऊ शकतो. आजचे अनेक राजकारणी वेळोवेळी परदेशात जातात. तिथून येताना आपल्या नातेवाईकांसाठी अनेक गोष्टी आणणात. मात्र त्यांना महाराष्ट्रासाठी एखादी गोष्ट आणावी, असे का वाटत नाही? परदेशात एकदा रस्ते बांधले की, ते ३० वर्षे टिकतात. असे चांगले रस्ते आपण कधी बांधणार? चांगले रस्ते बांधले तर त्यावर खड्डे कसे पडणार आणि मग खड्डे बुजवण्यासाठी व पुन्हा रस्ते बांधण्यासाठी निविदा कशा काढणार, एवढाच विचार करणारे राजकारणी महाराष्ट्राचे काहीही भले करू शकत नाहीत. ब्रिटनमधील कंपन्यांनी शंभर वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलांसंदर्भात अलीकडेच येथील महापालिकांना पत्र पाठवले आहे. या पत्रात म्हटले आहे की, सदर पुलाची जबाबदारी ही १०० वर्षांपर्यंत आमची होती. आता ही जबाबदारी तुम्ही सांभाळा. अशी बांधीलकी आमच्यात कधी निर्माण होणार? आम्ही आज पूल बांधले की, दुसऱ्या आठवडय़ात त्यावर डांबर टाकण्याचे काम सुरू केले जाते. वर्षभरात पुलाला खड्डे पडून दुरुस्तीच्या नावाखाली बंद केला जातो. या खराब बांधणीमुळे राज्याच्या नियोजनावर मोठा परिणाम होतो आणि विकासाचा पैसा खड्डय़ात जातो. दुर्देैवाने आजच्या राज्यकर्त्यांकडे द्रष्टेपणा नाही. एवढेच नव्हे, तर प्रश्न लोंबकळत ठेवायचे किंवा वाढवत न्यायचे, एवढेच काम ही मंडळी करत आहेत. यातून केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर साऱ्या देशाचा विकास अडकून पडला आहे. चांगले रस्ते न बांधणाऱ्या कंत्राटदारांवर कठोरपणे कारवाई होत नाही, की या कामांवर लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना जेलची हवा खावी लागत नाही, कारण राजकीय नेत्यांचे यामध्ये हितसंबंध गुंतलेले असतात.
स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात ज्यांनी आपल्या बलिदानाची आत्माहुती दिली, अशा स्वतंत्र्यवीरांचे बलिदान भ्रष्टाचाराच्या गटारगंगेत बुडविणाऱ्या राजकारण्यांना धडा शिकविण्याची आता वेळ आली आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रमार्गे शत्रू प्रवेश करू शकतो, असा इशारा दिला होता. तरी आपण आजही झोपलेलो आहोत. त्यामुळेच समुद्रमार्गे येऊन मुंबईवर हल्ला करण्याची हिम्मत पाकिस्तानी अतिरेकी करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाने अफजल गुरूला फाशी देण्याचा निर्णय दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होत नाही. लोकांनी अशा बेजबाबदार नेत्यांना आणि पक्षांना धडा शिकविण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment