१८९४ साली प्रथम लोकमान्य टिळकांनी विंचूरकर वाड्यात स्वत: गणपती बसविला व सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली.
गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी तत्कालीन समाजाबाबतचे लोकमान्य टिळकांचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे होते -
१. हिंदु लोक धर्माबद्दल उदासीन आहेत.
२. हिंदु समाज विस्कळीत आहे.
३. पाश्चात्त्यांच्या श्रेष्ठत्वाने भारतीय जनता दिपून गेली आहे.
४. भारतीय जनतेमध्ये असलेले अभिजात सामर्थ्य परिस्थितीमुळे सुप्त आहे.
उद्देश
२. हिंदूंमधील सुप्त सामर्थ्याची जाणीव त्यांना करून देणे.
३. समाजातील दुजाभाव नष्ट करणे.
४. समाजात लोकांच्या अधिकारांचा व कर्तव्याचा प्रसार करणे.
५. चांगल्या धार्मिक कल्पनांचे पुनरुज्जीवन करणे.
६. आधुनिक युगात आवश्यक अशा चळवळी करणे.
७. जनतेतील अंगभूत व परंपरेने निर्माण होणार्या शक्तींना कार्यान्वित करणे.
टिळकांच्या वेळच्या गणेशोत्सवातील कार्यक्रम
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला त्या वेळी श्री गणेशाची पूजाअर्चा करण्याबरोबरच भजन, कीर्तन, पोवाडे, शास्त्रीय गायन यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येत असे. यामुळे भारतीय संस्कृतीच्या विविध अंगोपांगांचा परिचय युवा पिढीला होत असे.
समाजप्रबोधन व लोकशिक्षण यांसाठी तत्कालीन समस्यांवर विद्वानांची व्याख्याने ठेवण्यात येत असत, तसेच या समस्यांवर विविध मान्यवरांचे परिसंवादही घडवून आणण्यात येत असत.
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या गणेशोत्सवाचे फलित म्हणजे तत्कालीन समाज धर्म व राष्ट्र यांबद्दल जागृत होऊ लागला. या उत्सवातून स्फूर्ति घेऊन कित्येकांनी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली.