रोजचंच रुटीन,
सारी तीच कामं,
तेच ऑफ़िस,
तीच सारीजणं...तरिसुद्धा,
आज दिवस एकटा वाटतोय...
एकटं असलं ना की,
विचारांना तेवढंच फ़ावतं..
न बोलावताही,
येतात आगांतुकासारखे
आणी
घर करून बसतात,
मनात...विचारांच्या ह्या चक्रात असतांनाच
केला त्याला फोन..
"कसा आहेस?आज कुठला शर्ट घातलाय?"मी म्हणाले..
"अगं वेडी का खुळी तू..
सोबतच राहतो ना दिवस-रात्र,मग असं का विचारतेय??"आश्चर्याने तो बोलला..
मी म्हणाले,
"बरं,मग तू सांग मला तुझा आवडीचा तो पिंक ड्रेस मी कधी घातला होता?
"जरा थबकला,बोलताना एक मोठा श्वास,
"नाहि गं आठवत,
बहुतेक कामाच्या नादात विसरलो असेन मी.."
अश्या रोजच्याच कितीतरी साध्या गोष्टी सुद्धा,
एकमेकांच्या एकमेकांना माहित नसतात...
मी बोलले,"विसरलास की वेळच मिळाला नाही बघायला??काल तर मी तो घातलेला...
नवरा-बायको आहोतपण,
कितीसा वेळ देऊ शकतोय आता आपण.."
लग्नाआधी सोबत नव्ह्तो म्हणून,
सहवास कमी वाटायचा...
लग्नानंतर,
कौटुंबिक जवाबदाऱ्या आणि भविष्याची चिंता..अश्यात,
सोबत असून सुद्धा,
रोज बघितल्याचं देखील आठवत नाही...
पुढे मुलांमधेच इतके गुंतुन जाणार
कि एकमेकात गुंतायचं भान सुद्धा नाही उरणार...
म्हातारपणी,
सगळी आपल्याच दुखण्यांची ग्लानी..
स्वप्न बघायची तरी कधी,[?]
एकमेकांच्या सहवासाची..
दूर दूर पायी फ़िरतांना,
हाथ हातात घेऊन,
खूप खूप गप्पा मारण्याची..
ह्म्म..
आता तर अश्या स्वप्नांची ही
स्वप्नेच बघते मी...
--अवंती..
No comments:
Post a Comment