"तरी मी तुला होमवर्क कर म्हणून बोल्लो होतो!", करणने कालची संध्याकाळ त्याला आठवून दिली, "उगीच पट्टी खायची हौस तुला!"
"हौस कसली?", सॅवियो कपाळावर आठ्या आणून म्हणाला, "घरी गेलो आणि मॅथ्स होमवर्क सुरू केला मी. आय स्वेअर! पण तोच टि.व्ही.वर विम्बल्डन फायनल सुरू. अरे फेडरर आणि नदाल कोण सोडणार यार?"
"अरे पण होमवर्क इम्पॉर्टण्ट की टेनिस?", करणने फळ्यावरचं लक्ष न ढळू देता सॅवियोला हळूच विचारलं.
"ऑफकोर्स टेनिस!" सॅवियोने स्वाभविक उत्तर दिले, "फेडरर आणि नदालनं कधी मॅथ्स होमवर्क केला होता?"
"पण त्यांच्या शाळेत सोलंकी मिस नव्हती!...", करण त्रासला.
"...मि. रूपवते! स्टॅण्ड अप!", सोलंकी मिसने चश्मा रागात डोळ्यांवरून काढला. वर्गात भीतीचे हुंकार फुटले. सगळे वळून करणच्या बाकाकडे "आता ह्यांची लागली!" अशा मोठ्या डोळ्यांनी पाहू लागले. सोलंकी मिसने डोळ्यावरचा चश्मा काढणे ही वर्गातल्या मुलांसाठी वाईट बातमी असायची.
"इज युवर डिस्कशन विथ मि. रूडॉल्फ मोअर इम्पॉर्टण्ट दॅन माय लेक्चर? ईफ सो? देन प्लीज शेयर इट विथ द क्लास!"
"सॉरी मिस!", करण अडखळत उभा राहिला.
"व्हॉट सॉरी? मि. सॅवियो रूडॉल्फ हॅस ऑलरेडी हॅड हीज पनीशमेण्ट! नाऊ डू यू वॉण्ट टू फॉल फोर इट?"
"नो मॅम! सॉरी मॅम!", करणने मान खाली घातली.
"लूक करण! यू आर अ व्हेरी गुड स्टुडण्ट. डोण्ट वेस्ट युअर टाईम विथ दॅट स्कॉउण्ड्रल नेक्स्ट टू यू! लूक ऍट अदर स्टुडण्ट्स! लूक ऍट मिस. प्रधान! बी सिंसीयर लाईक हर!"
सोलंकी मिसच्या ह्या टिप्पणीवर पूजा अन सॅवियोचे चेहेरे दोन विरूद्ध भाव दर्शवू लागले. पुढच्या बाकावर बसलेल्या पूजाने आनंदाने पण मिश्किलीत करणकडे वळून पाहिलं. करण थोडा ओशाळला.
"धिस इज अ लास्ट वॉर्निंग! यू मे सिट डाऊन!" सोलंकी मिसने चश्मा डोळ्यावर पुन्हा चढवला. सगळ्यांना हायसं वाटलं. तसा करण सोलंकी मिसचा आवडता स्टुडण्ट होता त्यामुळे भिती नव्हती.
"डीड यू हियर दॅट?", सॅवियो अस्पषट्सा कुजबूजला...."ती मला स्कॉउण्ड्रल म्हणाली!!!"...
अर्थातच होपलेस आणि यूजलेस ह्या सॅवियोच्या नेहेमीच्या विशेषणांत आज एक नवी भर पडली होती.
करणने गणिताच्या पुस्तकात डोकं घातलं. सॅवियोच्या ऍन्टि सोलंकी केमेण्ट्सकडे पूर्ण दुर्लक्ष करत तो अभ्यासात गुंतला. अर्थातच त्याला पुन्हा ओरडा खायचा नव्हता. करण आपल्याला प्रतिसाद देत नाहीये म्हणून इथे सॅवियो रागात सोलंकी मिसचं कार्टून त्याच्या वहीच्या मागल्या पानावर काढू लागला.
तास संपता संपता सॅवियोचं ते व्यंगचित्रही संपलं. मधली सुट्टी झाली अन सगळे वर्गाबाहेर पडले. आजूबाजूच्या काही मंडळींना ते कार्टून दाखवून सॅवियोने करमणूक करून घेतली अन स्वतःचा राग शमवला.
"करण.... सॅवियो! सॅवियोऒ!!!" दानिश शाह मागून दोघांना हाक मारत होता.
"च्यायला!", सॅवियोने तोंड लपवलं, "सावकार आला वाटते!.. यार करण! ५० रूपये आहेत काय?"
"कशाला", करणने विचारलं.
"अरे गेल्या वीकमध्ये मी हॉकी प्रॅक्टीसच्या वेळी नी-बॅंण्ड आणायला विसरलो. तेव्हा पीटीच्या सरांनी सगळा सेट आणल्याशिवाय आत येऊ दिलं नाही. मग दानिशकडून पन्नास रूपये उसने घेऊन मी ते नी-बॅण्ड्स बाजूच्या स्टेशनरी दुकानातून विकत घेतले. त्याला मी आज परत देतो सांगितलेलं! पण ..."
"..विम्बल्डनच्या जोशात विसरलास!"
"होय! आणि मग आता नाहीयेत म्हटल्यावर तो रडायला लागेल आणि तुला माहितिये ना! दानिश इज सच अ ड्रामा क्वीन!", सॅवियो मुळूमुळू उत्तरला.
"म्हणजे?"
"अरे! गेल्या खेपेस हेतनला थोड्यावेळ्यासाठी त्याने त्याचं स्वीस घड्याळ दिलं. ते हेतनच्या हातात बॅटरी संपून बंद पडलं. तरी पूर्ण शहानिशा न करता हा हेतनच्या नावाने रडू लागला. शेवटी हेतनकडूनच घड्याळजीकडे उघडून नवी बॅटरी टाकून घेतली त्यानं!"
"आणि एवढं असूनही तुला आयत्या वेळेला पैसे उसने घ्यायला हाच मिळाला?", करणने विचारले.
"काय करणार? माझं तुला ठाऊकच आहे! माझ्या डिक्श्नरीत लक हा शब्द बॅडच्या सोबत येतो!"
करण उपहासाने हसला आणि त्याने पन्नास रूपये काढून दिले,"हे घे! माझे लॅब कोटचे आहेत! माझा जुना फाटलाय म्हणून नवा घ्यायला मी आईकडून घेतलेले. आज सायन्स प्रॅक्टीकल नाहिये तेव्हा तुला उपयोगी पडतील!"
पन्नास रूपये सॅवियोने घेतले नसतील तोवर दानिश शाहाने सॅवियोला गाठलेच.
"माझे पैसे?"
"हे घे!"
"नोट जुनी दिसतेय!"
"मग नवीन नोटेसाठी उद्या ये!"
"नको असूदे. ही चालवीन."
नोट मिळाल्यावरही दानिश शाह दोन सेकंद काहीतरी ऎकण्याच्या अपेक्षेने त्यांच्या समोर उभा राहिला होता.
"थॅंक यू दानिश. खूप दानशूर आहेस!", सॅवियो खोटी कॄतार्थता चेहेऱ्यावर आणत म्हणाला.
दानिश खूष झाला अन नोटेतून सूर्याकडे बघत, नोट तपासत निघून गेला.
"पाहिलंस! एकदम सावकार!"
"जाऊ दे रे."
"जाऊ दे काय? एवढा श्रीमंत असूनही एवढा कद्रु? अरे त्याच्या वडीलांचा इस्तांबूलला मसाल्याचा मोठा बिझिनेस आहे आणि त्याची आई फिल्मफेयर मॅगझिनची असिस्टण्ट एडिटर आहे. एवढं असूनही..."
"काय!", करण एकदम चमकला?
"मग काय एवढा श्रीमंत आहे तो..."
"...अरे ते नाही! त्याची आई फिल्मफेयरची हेड आहे?"
"नाही असिस्टण्ट एडिटर!"
"तेच ते!..." करण पुढचं काहीही न बोलता मागे पळाला.
सॅवियो काहीच न कळल्याच्या आवेशात तिथेच उभा होता. दोन मिनिटात करण खूश होऊन परतला.
"कुठे गेला होतास!", सॅवियोने आठ्या पाडल्या.
"दानिश शाह रॉक्स!"
"व्हॉट्ट! आर यू ओके?"
"यप्प!"
"काय झालं? काय सांगशील का?
"दानिश शहाला नव्या फिल्मफेयरची कॉपी आणायला सांगितलीय!"
"पण अजून नवा महिना यायचाय!"
"त्याधीच आणायचीय!"
"का?"
"अरे दोन आठवड्यांनी मेनकाचा बर्थडे! न्व्या फिलफेयरमध्ये कव्हर आणि फ्रण्ट पेज तिचंच असणार आहे ह्या वेळी."
"मग पुढच्या महिन्यापर्यंत थांबला असतास ना?"
"अंहं! अजिबात नाही. अरे मेनकफॅन्सच्यांत चुरस असते. मेनकाचे फिल्मी मॅगझिनवरचे कव्हर पेजेस मिळवण्याची. मला जर तिच्या बर्थडेच्या वेळी मेनकाचं पुढल्या महिन्यात छापून येणारं कव्हर पेज स्कॅन करून माझ्या साईटवर टाकता आलं तर किती भाव मिळेल मला मेनका फॅनग्रुपमध्ये!"
"अंहं! अजिबात नाही. अरे मेनकफॅन्सच्यांत चुरस असते. मेनकाचे फिल्मी मॅगझिनवरचे कव्हर पेजेस मिळवण्याची. मला जर तिच्या बर्थडेच्या वेळी मेनकाचं पुढल्या महिन्यात छापून येणारं कव्हर पेज स्कॅन करून माझ्या साईटवर टाकता आलं तर किती भाव मिळेल मला मेनका फॅनग्रुपमध्ये!"
करण हसला पण तोच ‘क्रेझीकरन’ वरून त्याला आठवली कालची रात्र. कुण्या एका माथेफिरूने मेनकाच्या चारित्र्यावर विनाकारण उडवलेले शिंतोडे! करण पुन्हा अस्वस्थ झाला.
"हे करण! काय विचार करतोयस?", सॅवियो करणच्या चेहेऱ्यासमोर हात हलवित म्हणाला.
"काही नाही! जस्ट एक्सायटेड!", करण चेहेऱ्यावरचे भाव लपवत म्हणाला.
"अरे पण दानिश शाह मानला कसा? पक्का सावकार तो! काय गहाण ठेवलंस त्याच्याकडे? अं?", सॅवियोने भुवया उंचावल्या.
करण हळूच मागे मानेवर हात चोळू लागला,"मॅगझीन आणल्यावर पुढच्या तीन दिवसांचा मॅथ्सचा फ्री होमवर्क!", करण बोलता बोलता अडखळला. सॅवियोच्या भुवयांची स्थिती बदलणार होती.
"व्हॉट्ट! दॅट्स सो अनफेअर!", सॅवियो चिडला, "मी तुझा मित्र असून तू माझा कधी होमवर्क केला नाहीस!", सॅवियोने रागात भुवया आकुंचल्या
"तुझी आई फिल्मफेयरची एडिटर आहे का?"
"असिस्टण्ट एडिटर!"
"हो तेच ते! नाहिये ना. मग मी का तुझा होमवर्क करू?"
"करण दॅट इज रियली मीन!", सॅवियो ओरडला.
"व्हॉट मीन! आणि पेपरात माझ्या पुढे बसून मागे वळून वळून माझ्या सम्सची कॉपी करतोस त्याचं काय?", करणनेही मग आवाज चढवला.
भांडण चव्हाट्यावर येणार तोच मागूनच प्रिन्सिपल सिस्टर निलिमा गेल्या, ते दोन मिनिटं दोघे गप्प बसले. प्रिन्सिपलच्या ऑफिससमोरचचा बाक हा ‘प्रॉक्सी होमवर्क’ आणि ‘एक्झाम कॉपी’ विषयी बोलायचा कट्टा कदापी नव्हता. हे त्या चाणाक्षांनी जाणलं अन ते साळसूदपणे पुढच्या लेक्चरला चालते बनले.
Contd..
No comments:
Post a Comment