पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका आहे. पुण्याच्या उत्तर भागात असलेल्या खेड तालुक्याचे मुख्य गाव म्हणजे राजगुरूनगर. क्रांतिकारक राजगुरू यांचा जन्म येथे झाल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ खेडचे नाव बदलून राजगुरूनगर असे ठेवण्यात आले.
राजगुरूनगर हे तालुक्याचे गाव असून ते पुणे-नाशिक या महामार्गावार वसलेले आहे. भिमा नदीच्या उत्तर तीरावर वसलेले राजगुरूनगर आजूबाजूच्या महत्वाच्या गावांशी गाडीमार्गाने उत्तमपैकी जोडले गेले आहे.
शिवकालामध्ये मोगलांची सरहद भिमा नदीपर्यंत भिडलेली होती. भिमा नदीचा उगम सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील भिमाशंकर जवळ होतो. तेथून ती वहात राजगुरूनगर येथे येते. या भिमा नदीच्या खोर्यामध्ये एक दुर्गरत्न विसावलेले आहे. हे दुर्गरत्न म्हणजे किल्ले भंवरगिरी उर्फ भोरगिरी.
भोरगिरी नावानेच परिचित असलेल्या या किल्ल्याच्या पायथ्याला भोरगिरी नावाचे लहानसे गाव आहे. राजगुरूनगर पासून साधारण ५५ कि.मी. अंतरावर भोरगिरी आहे. भोरगिरीला जाण्यासाठी राजगुरूनगर वरून एस.टी. बसेसची सोय आहे.
राजगुरूनगर-भोरगिरी हे साधारण अंतराला दीड एक तास लागतो. या भिमानदीच्या खोर्यात चास-कमानचे धरण आहे. या धरणा जवळूनच भोरगिरीचा मार्ग जातो. या खोर्यात आपण जसे जसे आत जातो तसा तसा निसर्ग बदलत जातो. पावसाळ्यानंतरच्या कालावधीत खळाळणारे ओढे आणि धबधबे म्हणजे नेत्रसुखाला पर्वणीच असते.
भोरगिरी गावात पायउतार झाल्यावर प्रथम परतीच्या बसची चौकशी करून घ्यावी. भोरगिरी किल्ला समुद्र सपाटीपासून ६८६ मी. उंच असला तरी पायथ्यापासून जेमतेम दिडशे मी. उंच आहे. गावातून अर्ध्या तासात आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचतो. डोंगर डावीकडे ठेवून वळसा मारून गडाची वाट जाते. या वाटेने गडावर जाता येते.
गडावर गडपणाचे अवशेष तुरळक आहेत. गडाच्या दक्षिण अंगाला लेणी कोरलेली आहेत. गडाच्या माथ्यावर पाण्याची टाकी आहेत. मात्र येथून खाली असलेल्या कोरीव गुहेकडे उतरण्यास वाट नाही. माथ्यावरून थोडे खाली उतरून आडवे चालत आल्यावर या कोरीव गुहेपाशी पोहोचता येते. गडाचा आकार लहान असल्याने गडफेरीला तासाभराचा अवधी पुरेसा आहे.
आल्यावाटेने उतरून भोरगिरी गावाजवळ असलेले भिमेचे पात्र गाठावे. या काठावर कोटीश्वराचे मंदिर आहे. मंदिर प्राचीन असल्याचे तेथील अवशेषांवरून दिसते. हा परिसर अतिशय रम्य आहे. येथून राजगुरूनगरला परतता येईल. अथवा दोन तास चालत गेल्यास भिमाशंकरचे मंदिरही पहाता येईल. भिमाशंकर वरूनही घोडेगाव मंचर मार्गे पुन्हा राजगुरूनगरला येता येते.
हर्णे बंदर प्राचिन काळापासून प्रसिध्द आहे. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासीक महत्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनार्यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवागड हे होय.
हर्णे बंदर दापोली तालुक्यामधे असून तो रत्नागिरी जिल्ह्यामधे आहे. कोकणामधील महाड, मंडणगड आणि खेड कडून गाडीमार्गाने दापोलीला पोहोचता येते. दापोलीपासून सोळा कि.मी. अंतरावर हर्णे आहे. हर्णेच्या सागरातील सुवर्णदुर्ग किल्ल्याबरोबर किनार्यावरील या तिन्ही किल्ल्यांनाही भेट देता येते.
हर्णेच्या किनार्यावर दक्षिणेकडे टेकडीवजा एक भुशिर घुसलेले आहे. या लहानश्या टेकडीवजा भुशिरावर कनकदुर्गचा किल्ला उभा आहे. कनकदुर्गाच्या पुर्व बाजुला मच्छिमारांच्या असंख्य नौका दिसतात. या नौकांमधे जाण्यासाठी कनकदुर्गाला लागुनच धक्का बांधलेला आहे. या धक्क्यावर जाण्यासाठी पुलासारखा रस्ता केलेला आहे. या रस्त्यावर चालत गेल्यावर कनकदुर्गाच्यावर जाण्यासाठी केलेल्या पायर्यांचा मार्ग आहे. या पायर्यांच्या बाजुलाच भक्कम बांधणीचा बुरुज आहे. काळ्या पाषाणातील हा बुरुज म्हणजे कनकदुर्ग... हा पुर्वी किल्ला होता याचा साक्षीदार आहे. पायर्यांच्या मार्गाने आपण पाचच मिनिटांमधे कनकदुर्गावर पोहोचतो. गडाच्य माथ्यावरच्या इमारती आता नष्ट झाल्याअसून त्याभागात दिपगृह उभे असलेले दिसते. कनकदुर्गावरुन मुरुड दाभोळ तसेच गोपाळगडापर्यंतचा सागरकिनारा दिसतो. पश्चिमेकडे अथांग सागराची मधुन मधुन चमचमनारी किनार आणि सागराची गाज आपल्या मनाला धडकी भरवत रहाते. या पार्श्वभूमीवर दिमाखात उभा असलेला फुलपाखराच्या आकाराचा सुवर्णदुर्ग आपले लक्ष वेधून घेतो. उत्तरेकडै फत्तेदुर्गाची टेकडी मच्छिमारांच्या वस्तीने पुर्णपणे घेरलेली दिसते. कनकदुर्गावरील गडपणाचे अवशेष काळाच्या ओघात नष्ट झाल्यामुळे आपली गडफेरी १५ ते २० मिनिटांमधे आवरते.
कनकदुर्गाकडून परत फिरल्यावर डावीकडील टेकडी म्हणजे फत्तेदुर्ग असल्याची मनाची समजूत घालून पुढे निघावे लागते. मच्छिमारांच्या वस्तीने व्यापलेल्या फत्तेदुर्गावरचे अवशेष केव्हाच लुप्त झालेले आहे.
फत्तेदुर्गापासून फर्लांगभर गाडीरस्त्याने चालत आल्यावर समोर दिसतो तो तटबंदीने युक्त असलेला गोवागड. भक्कम तटबंदी आणि भक्कम दरवाजा असलेल्या या किल्ल्याचे नाव जरी गोवागड असले तरी गोव्याशी याचा काही संबंध नाही. रस्त्याच्या कडेलाच याचा दरवाजा दिसतो पण याचा मुख्यदरवाजा मात्र उत्तरेकडे तोंड करुन आहे. हे भव्य प्रवेशव्दार पहाण्यासाठी तटबंदीला वळून समोरुन आपल्याला जावे लागते. सागराच्या बाजुला थोडेसे उतरुन डावीकडे वळाल्यावर आतल्या बाजुला हे प्रवेशव्दार आहे. हे प्रवेशव्दार दगडाने चिणून बंद करण्यात आले आहे. प्रवेशव्दाराजवळ हनुमानाची मुर्ती आहे. तसेच येथे शरभ व महाराष्ट्रामधे किल्यांवर अभावानेच दिसणारे गंडभेरुडाचे शिल्प आहे. हे प्रवेशव्दार पाहून पुन्हा रस्त्यावर येवून नव्याने केलेल्या कमानीवजा दारातून गडामधे प्रवेश करावा लागतो. सध्या कोणा हॉटेल व्यवसायीकाने गडाचा ताबा घेतला आहे. त्याने दारावर चौकीही उभारली आहे. तेथील रखवालदाराची परवानगी घेवून किल्ल्यामधे जाता येते. गोवागड दक्षिणकडील भाग थोडय़ा चढाचा आहे. याचाच उपयोग करुन त्याला तटबंदी घालून बालेकिल्ला केलेला आहे. पश्चिमेकडील तटबंदी काहीशी ढासळलेली आहे. पश्चिमबाजुला सुवर्णदुर्गाचे दृष्य उत्तम दिसते. गडामधे पाण्याची विहीर आहे. तिचा वापर नसल्यामुळे पाणी वापरण्यायोग्य राहीले नाही. किल्ल्यात इंग्रजकालीन दोन इमारती पडलेल्या अवस्थमधे आहेत. त्यामधील एकात पुर्वी कलेक्टर राहात असे. गडामधे महत्त्वाचे असे बांधकाम फारसे शिल्लक नसल्यामुळे गड पहाण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो.
जर आपण संध्याकाळच्या वेळेस येथे असू तर कनकदुर्गच्या किनार्यावरील मासळी बाजार अवश्य पहाण्याजोगा आहे. अर्थात खवय्यासाठीतर ही सुवर्णसंधीच होय.
पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यामध्ये दौलतमंगळ नावाचा लहानसा किल्ला आहे. पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध शिवमंदिरामधील शिल्पकलेने नटलेले भुलेश्वरचे प्रख्यात शिवमंदिर हे दौलतमंगळ किल्ल्यामधे आहे.
अनेक भाविकांची नित्यनियमाने भुलेश्वर मंदिराला भेट असते. प्रामुख्याने श्रावण महिन्यात तसेच महाशिवरात्रीला भाविकांचा प्रचंड ओघ भुलेश्वरला असतो.

भुलेश्वर मंदिर हे किल्ल्यामधे आहे याची अनेकांना कल्पनाही नाही. शिवपूर्वकालातील इतिहासामधे फलटणचा फतेहमंगळ, शिरवळचा सुभानमंगळ आणि भुलेश्वरचा दौलतमंगळ यांचे उल्लेख आहेत.
पुणे शहराच्या दक्षिणेकडे भुलेश्वर रांग म्हणून ओळखली जाणारी सह्याद्रीची उपरांग आहे. ही रांग पूर्व पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेत इतिहासप्रसिद्ध सिंहगड असून दिवे घाटाजवळ सोनोरी ऊर्फ मल्हारगड हा किल्ला आहे. याच रांगेत यवत जवळ दौलतमंगळचा किल्ला आहे. दौलतमंगळ किल्ल्याला जाण्यासाठी पुण्यातून दोन मार्ग सोयीचे आहेत. पुणे-दिवे घाटातून सासवड-आंबळे-माळशिरस मार्गे भुलेश्वर असा गाडीरस्ता आहे. माळशिरस हे लहानसे गाव किल्ल्याच्या दक्षिण पायथ्याला आहे. दुसरा मार्ग पुणे-सोलापूर रस्त्यावरील यवत गावाकडून आहे. यवतच्या दक्षिणेला दौलतमंगळ आहे.
दौलतमंगळ किल्ल्यामधील भुलेश्वर मंदिरापर्यंत गाडीरस्ता आलेला आहे. किल्ल्याची काही तटबंदी तोडून हा रस्ता केलेला आहे. किल्ल्याच्या तटबंदीचे, बुरुजांचे अवशेष आजही आपले अस्तित्व कसेबसे टिकवून उभे राहीलेले दिसतात. किल्ल्याचा दरवाजा, पायर्यांचा मार्ग, पाण्याची टाकी असे वास्तूविशेषही पहायला मिळतात.किल्ल्याचे भग्नावशेष पाहून आपण निश्चितच खिन्न होतो. खिन्न मनाने आपण भुलेश्वरच्या मंदिरात प्रवेश करतो. मंदिर पाहिल्यावर मनाची उदासिनता कुठल्या कोठे पळून जाते आणि आपण प्रसन्न मनाने मंदिराचे शिल्पकाम न्याहळू लागतो.
मुख्य मंदिराच्या बाहेरुन भिंत बांधून मंदिराची सुरक्षितता वाढवल्याचे दिसून येते. मंदिरामधील अनेक मुर्त्यांची तोडफोड केल्याचे दिसते. वरच्या भागातील गिलाव्यामधील मुर्ती मात्र शाबुत असल्याचे पहायला मिळते.
दौलतमंगळ किल्ला पहायला अर्धा तास पुरतो. पण मंदिर निरखायला मात्र किमान तासभर तरी हाताशी पाहिजे. कलाकारांची सौंदर्यवृष्टी आणि कलाकारी मनाला भावते तसेच शिल्पांची अदाकारी ही आपल्याला थक्क करते.
भुलेश्वर परिसरातून वज्रगड, पुरंदर, सिंहगड किल्ले दिसतात तसेच जेजुरी, ढवळेश्वर आणि सपाटीवरचा विस्तृत प्रदेशही पहाता येतो.
दौलतमंगळाच्या भेटीत आपण जेजुरी अथवा ढवळेश्वरालाही भेट देवू शकतो.
रत्नागिरी हा कोकणातील जिल्हा आहे. पश्चिमेला अरबी समुद्र पसरलेला असून पूर्वेला सह्याद्रीची मुख्य रांग दक्षिणोत्तर गेलेली आहे. सह्याद्रीतून वाहत येणाऱ्या अरबी समुद्राला या डोंगर रांगा जेथे मिळतात, तेथे खाडय़ा निर्माण झाल्या. या खाडय़ामुळे कोकणचा किनारा दंतूर झालेला आहे. या दंतूर किणाऱ्यामुळे कोकणचे निसर्गसौंदर्य कैक पटीने वाढले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामधील मुचकुंदी नदीच्या मुखाजवळ पूर्णगड नावाचा छोटासा किल्ला गतवैभवाच्या खाणाखूणा जपत उभा आहे. पूर्णगडाच्या दक्षिण अंगाला मुचकुंदी नदीची खाडी असून पश्चिमेकडे सागर किनारा आहे. लहानश्या टेकडीवर असलेल्या पूर्णगड किल्ल्याच्या पूर्व उतारावर पूर्णगड नावाचे गाव वसलेले आहे.
पावसच्या एस. टी. थांब्याजवळच स्वामी स्वरुपानंदाचे स्मृतीमंदिर आहे. अनेक भाषिकांचा ओघ येथे असतो. हे स्थळ पाहून येथील निसर्ग सौंदर्य न्याहाळत आपण पूर्णगडाकडे निघतो. येथून साधारण १० कि. मी. अंतरावर पूर्णगड किल्ला आहे.
गावरवडीच्या पुलाच्या अलिकडेच पूर्णगड गाव आहे. येथे पायउतार होवून गावातील घरांच्या रांगांमधून चढणाऱ्या पायऱ्यांचा वाटेने २० मिनिटांमध्ये आपण किल्ल्याजवळ पोहोचतो.
किल्ल्याच्या दाराजवळ मारुती मंदिर आहे. या जुन्या मंदिराची सध्या गावकर्यांनी रंगरंगोटी केलेली आहे. मंदिराजवळच पूर्णगडाचा दरवाजा आहे. शिवकालीन बांधकामाच्या वैशिष्टय़ांप्रमाणे हा दरवाजा लपवलेला आहे. दरवाजावर गणेश तसेच चंद्र- सूर्याची शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्यांच्या देवडय़ा आहेत. येथेच दगडात कमळे कोरलेली पहायला मिळतात.
येथे तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. तटबंदीवरुन गडाची पूर्ण फेरी मारता येते. पश्चिम अंगाची काही तटबंदी ढासळलेली आहे. पण इतर तटबंदी काळ्या पाषाणातील असून अजूनही भक्कम अशी आहे. किल्ल्याला पश्चिमेकडे लहानसा दिंडी दरवाजा आहे.
गडामध्ये गडकऱ्यांच्या वास्तूचे अवशेष तसेच इतरही अवशेष पहायला मिळतात. लहानसा आयताकृती आकार असलेला पूर्णगड पहायला अर्धा तास पुरतो. गडामध्ये पाण्याची सोय नाही. पूर्वी गडाबाहेरील विहीरीतून गडामध्ये पाणीपुरवठा केला जात असे.
लहान आकाराचा किल्ला म्हणून पूर्णविरामाच्या लहानश्या टिंबासारखा किल्ला म्हणून पूर्णगड नाव पडले. तर काहींच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधणीचे काम येथे थांबवले म्हणून हा पूर्णगड.
पूर्णगड पाहून आपण पुन्हा रत्नागिरीकडे अथवा पुढे राजापूर कडेही जावू शकतो.
मुंबई-पणजी महामार्गावर हातखंबा फाटा आहे. येथून पश्चिमेकडे रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण सागर किनाऱ्यावर वसलेले आहे. रत्नागिरी मधील प्रेक्षणीय स्थळे तसेच थिबा राजवाडा पाहून आपण पावस या धार्मिक क्षेत्राकडे निघतो. वाटेतील भाटय़े खाडीवरील पूल ओलांडल्यावर भाटय़े गाव लागते. या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा सेनापती मायनाक भंडारी यांचे स्मारक आहे. ते त्यांच्या वंशजांच्या घराच्या अंगणात आहे. या धुरंधर सेनानायकाला नमन करून आपण पावसला येतो.पावसच्या एस. टी. थांब्याजवळच स्वामी स्वरुपानंदाचे स्मृतीमंदिर आहे. अनेक भाषिकांचा ओघ येथे असतो. हे स्थळ पाहून येथील निसर्ग सौंदर्य न्याहाळत आपण पूर्णगडाकडे निघतो. येथून साधारण १० कि. मी. अंतरावर पूर्णगड किल्ला आहे.
गावरवडीच्या पुलाच्या अलिकडेच पूर्णगड गाव आहे. येथे पायउतार होवून गावातील घरांच्या रांगांमधून चढणाऱ्या पायऱ्यांचा वाटेने २० मिनिटांमध्ये आपण किल्ल्याजवळ पोहोचतो.
किल्ल्याच्या दाराजवळ मारुती मंदिर आहे. या जुन्या मंदिराची सध्या गावकर्यांनी रंगरंगोटी केलेली आहे. मंदिराजवळच पूर्णगडाचा दरवाजा आहे. शिवकालीन बांधकामाच्या वैशिष्टय़ांप्रमाणे हा दरवाजा लपवलेला आहे. दरवाजावर गणेश तसेच चंद्र- सूर्याची शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्यांच्या देवडय़ा आहेत. येथेच दगडात कमळे कोरलेली पहायला मिळतात.
येथे तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. तटबंदीवरुन गडाची पूर्ण फेरी मारता येते. पश्चिम अंगाची काही तटबंदी ढासळलेली आहे. पण इतर तटबंदी काळ्या पाषाणातील असून अजूनही भक्कम अशी आहे. किल्ल्याला पश्चिमेकडे लहानसा दिंडी दरवाजा आहे.
गडामध्ये गडकऱ्यांच्या वास्तूचे अवशेष तसेच इतरही अवशेष पहायला मिळतात. लहानसा आयताकृती आकार असलेला पूर्णगड पहायला अर्धा तास पुरतो. गडामध्ये पाण्याची सोय नाही. पूर्वी गडाबाहेरील विहीरीतून गडामध्ये पाणीपुरवठा केला जात असे.
लहान आकाराचा किल्ला म्हणून पूर्णविरामाच्या लहानश्या टिंबासारखा किल्ला म्हणून पूर्णगड नाव पडले. तर काहींच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधणीचे काम येथे थांबवले म्हणून हा पूर्णगड.
पूर्णगड पाहून आपण पुन्हा रत्नागिरीकडे अथवा पुढे राजापूर कडेही जावू शकतो.
घोसाळगड उर्फ वीरगड हा किल्ला रायगड जिल्ह्यामधे आहे. दुर्गसंपन्न असलेल्या कोकणातील रायगड जिल्ह्यामधे रोहे तालुका आहे. रोहे तालुक्यात घोसाळगडाचा किल्ला आहे.
मुंबई-पुणे या महानगरांशी रोहे हे गाडीमार्गाने जोडले गेले आहे. शिवकालापासून प्रसिध्द असलेले रोहे गाव कुंडलिका नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले आहे. मुंबई - पणजी महामार्गाच्या पश्चिमेकडे असलेल्या रोहे येथे जाण्यासाठी महामार्गावरील नागोठेणे तसेच कोलाड येथून फाटे आहेत. तसेच रोहे हे कोकण रेल्वेवरील महत्त्वाचे रेल्वे स्थानकही
रोहे एस.टी. स्थानकावरून घोसाळगडाला जाण्यासाठी एस.टी.बसेसची सोय आहे. साधारण तासाभरात आपण घोसाळगड गावात पोहोचतो. गडाच्या पायथ्याला घोसाळगड गाव आहे.
गावातूनच गडावर जाणारा रस्ता आहे. रस्ता संपल्यावर पायर्यांचा मार्ग केलेला आहे. या पायर्यांच्या मार्गावर भवानी मातेचे मंदिर असून त्यापुढे गणपतीचे प्रशस्त मंदिर आहे. मंदिरामधील गणेशमुर्ती स्वयंभु आहे. गणेशाला वंदन करुन चढाई सुरु करायची पंधरावीस मिनिटांमधे आपण गडाच्या तटबंदीजवळ येऊन पोहोचतो.
कातळात कोरलेल्या पायर्या समोर दिसतात. यातील काही पायर्या तोफांच्या मार्यामुळे उध्वस्त झालेल्या आहेत. या पायर्यांवरुन वर पोहोचल्यावर मधेच काही चांगल्या पायर्या लागतात. या पायर्या आपल्याला दरवाजापर्यंत घेऊन जातात. मात्र येथील प्रवेशव्दार पूर्णत: नष्ट झालेले आहे. त्याचे अवशेष येथे विखूरलेले आहेत. या अवशेषांमधे वाघांची चित्रे कोरलेले दगडही पहायला मिळतात. येथून थोडे वर दारूगोळ्याचे कोठार म्हणून जागा आहे.
येथून पुढे गेल्यावर गडाचे दोन भाग पडतात. एक माचीकडील तर दुसरा बालेकिल्ल्याकडील अरुंद असलेल्या डोंगर सोंडेवर तटबंदी बांधून ही माची तयार केलेली आहे. तटबंदीवर चढण्यासाठी पायर्या आहेत. या तटबंदीमधे त्याकाळातील शौचकूप पहायला मिळतात. माचीच्या टोकावर पुर्वी एक तोफ पडलेली होती. माची पाहून आपण बालेकिल्ल्याकडे प्रस्थान करायचे बालेकिल्ल्याच्या उंचवटय़ावर पाण्याच्या कोरीव टाक्या, घरांचे अवशेष, माथ्यावर किल्लेदाराचा वाडा असल्याच्या खुणा आढळतात.
गडाच्या माथ्यावरुन तळागडाचे दर्शन मनाला सुखवून जाते. कुडे मांदाडच्या खाडीचे दृष्य आपल्याला खिळवून ठेवते. शिवकालामधे स्वराज्यात असलेला घोसाळगड पूर्वी निजामशाही मधे होता. छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडाच्या समर प्रसंगात अडकलेले पाहून जंजिर्याच्या सिध्दीने घोसाळगडाला वेढा दिला होता पण अफझलखान मारला गेल्याचे कळल्यावर सिध्दी वेढा उठवून पळून गेला. पुढे पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी घोसाळगड मोगलांना दिला नाही. तो आपल्याकडेच राखला. असा हा महत्त्वाचा किल्ला दुर्लक्षित आहे.
गडदर्शन करुन आल्यावाटेने उतरुन परतीचा मार्ग पकडता येईल. अथवा येथून चालत तीन तासांच्या पायपिटीनंतर बिरवाडीच्या किल्ल्याला जाता येते. बसने तळा किल्ला अथवा जंजिरा किल्ला ही गाठता येईल.
सह्याद्रीची मुख्य रांग महाराष्ट्रामध्ये दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेत सर्वात दक्षिणेकडील किल्ला म्हणजे पारगड किल्ला होय. कोल्हापूर जिल्ह्यात चंद्रगड तालूका आहे. चंदगड तालुक्यामध्ये पारगड किल्ला मोडतो.
चंदगड या तालुक्याच्या गावापासून साधारण ३० कि.मी. अंतरावर पारगड आहे. पारगड नावाचे गाव किल्ल्यामध्येच वसलेले आहे. पारगडापर्यंत गाडीमार्ग आहे. पारगडापर्यंत चंदगडहून एस.टी. बसची सोय उपलब्ध आहे. ही बस गडाच्या पायर्यांपर्यंत जाते. खाजगी वाहन गडाला वळसा घालून गडाच्या माथ्यावर नेता येते.
चंदगडाहून निसर्गरम्य परिसरातून प्रवास करीत आपण तासाभरात पारगडाच्या पायर्यांशी पोहोचतो. तिनशे पायर्या चढून जाव्या लागतात. यात नव्याने केलेल्या पायर्यांबरोबर शिवकालीन पायर्याही आपल्याला आढळतात. गडाचा दरवाजा नष्ट झालेला आहे. गडप्रवेश करताच समोर तुटक्या तोफांचे काही तुकडे मांडलेले दिसतात. बाजूलाच हनुमानाच्या मंदिराचा कायापालट करण्याचे काम सुरु आहे. मंदिरासमोर अनामिक असे स्मारक आहे. हे घडीव दगडामध्ये बांधलेले स्मारक कोणातरी महत्वाच्या व्यक्तीचे असावे. येथून थोडे वर चढल्यावर पारगडावरील वस्ती लागते.
दुतर्फा असलेल्या वस्तीमधून रस्ता गेला आहे. या वस्तीमध्येच रस्त्याच्या डाव्या बाजूला शाळा आहे. शाळेच्या आवारातच छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटासा पण पुर्णाकृती पुतळा चौथर्यावर बसविलेला आहे. या पुतळ्याच्या परिसरातच पुर्वी गडावरची सदर होती.
येथून समोरच आपल्याला भवानीमातेचे मंदिर दिसते. या मंदिराचा कायापालटच करण्यात आला आहे. शिवकालीन मंदिर तसेच ठेवून त्याभोवती नविन इमारत उभी करण्यात आली आहे. बांधलेले मंदिर भव्य असून नव्याने शिखर व सभामंडप बांधण्यात आला आहे. मंदिरात भवानीमातेची देखणी मुर्ती आहे. मंदिराच्या सभामंडपात शिवकालातील अनेक प्रसंग चितारलेली चित्रे लावली आहेत.
सिहंगड किल्ला माघ वद्य नवमी इ.स. १६७१ मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांनी जिंकला. या वेळी झालेल्या युद्धात तानाजींना मृत्यु पत्करावा लागला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी पारगड किल्ला बांधला व त्याची जबाबदारी किल्लेदार म्हणून तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे यांच्याकडे सोपवली. बहुदा हे १६७६ साल असावे. त्यावेळेस काही काळ महाराजांनी या गडावर मुक्काम केला होता.
त्यावेळी महाराजांनी किल्लेदार आणि तेथील मावळ्यांना आज्ञा केली की, जो पर्यंत आकाशात चंद्र, सूर्य आहेत तो पर्यंत हा गड जागता ठेवा. ही आज्ञा राजाज्ञा होती. गडावरच्या मावळ्यांनी आणि किल्लेदारांनी आजतागायत पारगड जागता ठेवला आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांचे अकरावे वंशज बाळकृष्ण मालुसरे तसेच शेलार मामांचे वंशज कोंडीबा शेलार आणि त्या काळातील मावळ्यांचे वंशज आजही अनंत अडचणींना तोंड देत गडावर वास्तव्य करुन आहेत.
इ.स. १६८९ मध्ये औरंगजेबाचा मुलगा मुअज्जम याने पारगड जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्याला या मावळ्यांनी दाद लागू दिली नाही.
पारगड किल्ल्याच्या गडफेरीमध्ये आपल्या दृष्टीला निसर्गाची विविध रूपे, दिसतात. गडावर अनेक तलाव, विहीरी, तटबंदी, स्मारके पहाता येतात. गडावर पोहोचण्यासाठी असलेली सुविधा, निसर्गरम्य परिसर, ऐतिहासीक महत्व, ऐतिहासीक घराणी, जेवणाची व रहाण्याची सोय यामुळे पारगडाला पुन्हा यावेसे वाटले तर नवल नाही
पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुक्यातील किल्ले आणि लेणींसाठी समृध्द आहे. पुण्याच्या उत्तरेकडे असणाऱ्या जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी, चावंड हडसर, निमगिरी, नारायणगड, जिवधन आणि सिंदोळा हे किल्ले आहेत.
सिंदोळा किल्ला जुन्नरच्या वायव्येला आहे. मढनेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोप्यात असलेला सिंदोळा किल्ला माळशेज घाटाच्या माथ्यावर आहे. अहमदनगर-कल्याण हा गाडीमार्ग माळशेज घाटामधून जातो. या गाडीमार्गावर मढ गावाच्या पश्चिमेला ४ कि.मी. अंतरावर खुबी फाटा आहे. या खुबी फाट्यावर जुन्नर कडूनही येता येते. खुबी फाट्यावर उतरुन येथून उत्तरेकडील हरिश्चंद्रगडाकडे जाणारी वाट आहे.
खुबी फाट्याच्या नैऋत्येला सिंदोळा किल्ला उढावलेला दिसतो. सिंदोळा किल्ल्याच्या माथ्यापासून पुर्वेकडे एक डोंगर धार गेलेली आहे. या डोंगर धारे मधे एक खिंड दिसते. या खिंडीमधून गडावर जाणारा मार्ग आहे. अर्ध्या पाऊण तासात आपण या खिंडीमधे पोहोचतो. खिंडीतून पुढे न जाता डावीकडे डोंगरदांडावर चढणारी वाट पकडून डोंगर दांडावर यावे लागते. या दांडावर आल्यावर डावीकडे खोप्याच्या पलिकडे निमगिरीचा किल्ला दिसतो. समोर सिंदोळ्यामागे उधळ्या पर्वत दिसतो तर उत्तरेकडे टोलारखिंड आणि हरिश्चंद्रगड पसरलेला दिसतो. समोरच्या सिंदोळ्या दिशेने चढाई केल्यावर आपण माथ्याच्या खाली येवून पोहोचतो. आता माथ्याच्या वरुन आलेली मोठी घळही दिसते. ही घळ उजवीकडे ठेवून तसेच आडवे चालत गेल्यावर आपण सिंदोळ्याच्या पश्चिम अंगाला येतो. पश्चिमेकडील घळीमधूनच गडावर जाणारा मार्ग आहे. वाटेमधे तुटलेल्या पायऱ्या लागतात. या पायऱ्यांच्या मार्गाने चढताना उधळ्या डोंगर आपल्या पाठीमागे रहातो. दरवाजाचे नाममात्र अवशेष आणि तटबंदीचे थोडेसे अवशेष आपल्याला दिसतात.
गडाच्या माथ्यावर पाण्याची काही टाकी आहेत. पाणी बारामहीने टिकत नाही. एक उघड्यावरचे मंदिर आहे. एका खडकातील खड्डयामध्ये अनेक त्रिशुळ उभे केलेले दिसतात. गडाच्या माथ्यावरुन हडसर, चावंड, शिवनेरी तसेच माळशेज घाटाखालील प्रदेश न्याहाळता येतो. गडफेरी करण्यास अर्धातास पुरतो. पुन्हा आल्यावाटेने खाली उतरावे लागते. कड्यात कोरलेल्या गणेशाला नमन करुन आपण परतीच्या वाटेवर निघतो. सिंदोळा किल्ल्याचा परिसर निसर्ग सौंदर्याने संपन्न आहे. मात्र हे सौंदर्य पावसाळ्यानंतर शतपटीने वाढते. सिंदोळ्याची भ्रमंती म्हणजे एक दुर्लक्षीत किल्ला पाहिल्याचे समाधान देवून जाते हे निश्चित.
बेलाग सालोटा किल्ला
नाशिक जिल्ह्यातील सटाणे तालुक्यामध्ये असलेल्या साल्हेर किल्ल्याच्या शेजारीच सालोट्याचा किल्ला आहे. साल्हेर गडाचा सोबती आणि उपदुर्ग असलेला सालोटा किल्ला दुर्गम आणि बेलाग आहे. सालोटा किल्ल्याचा उल्लेख काही ठिकाणी सालुता असाही करतात.
साल्हेर किल्ल्याच्या भटकंती दरम्यान याही किल्ल्याला भेट देणे सोयीचे ठरते. सालोट्याला जाण्यासाठी सटाणे-तिळवण मार्गे महारजर या छोट्याशा वाडीजवळ पायउतार व्हावे लागते. अथवा सटाणे ताहराबाद-मुल्हेरमार्गे वाघांबे गाठून साल्हेर-सालोट्याच्या खिंडीमध्ये यावे लागते.
महारजर गावाकडून साल्हेर-सालोट्याच्या मधील खिंड दिसते. मधल्या नाळेच्या वाटेने या खिंडीपर्यंत पोहोचेपर्यंत चांगलीच दमछाक होते. या मार्गावर पाणी नसल्याने पाणी तसेच खाण्याचे पदार्थ सोबत असणे गरजेचे ठरते.खिंडीतून पश्चिमेकडे साल्हेर गडावर जाणारा धोपटमार्ग आहे. सरळ उत्तरेकडे जाणारी वाट वाघांबे गावाकडे जाते. सालोटा किल्ल्यावर येणार्या पर्यटकांचे प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे किल्ल्याची वाट फारशी रुळलेली नसते. साल्हेर-सालोटा खिंडीमधून सालोटा किल्ल्याचा माथा डावीकडे ठेवून आपण पूर्वेकडे आडवे चालत निघतो. साधारण अर्धामाथा ओलांडल्यावर थांबून माथ्याचे निरीक्षण केल्यावर डावीकडे कातळामध्ये याचा दरवाजा दिसतो. दरवाजाच्या पुढे काही अंतरावरुन कातळात कोरलेल्या काही पायर्या दिसतात. याच मार्गाने आपल्याला गडावर चढायचे आहे. या पायर्यांच्या खालच्या भागातील पायर्या मातीने बुजतात तसेच तिथपर्यंत जाण्याचा मार्गही घसार्याचा असल्याने काळजीपूर्वक चढाई करावी लागते.
या पायर्यावरुन आपण कसरत करीतच कातळकड्यामध्ये पोहोचतो. आता कातळकडा उजवीकडे तर दरी डावीकडे राहते. समोरच दरवाजा दिसतो. बुलंदपणे उभा असलेला साल्हेर समोरुन खुणावत असतो. दारातून पुढे येवून आपण डावीकडे वळाल्यावर पुन्हा एक दरवाजा लागतो. या दरवाजाच्या आतल्या बाजूला माळा केलेला आहे. आपल्या घरातील माळ्यासारखा हा माळा आहे. दरवाजाला माळा असणे अशी रचना दुर्मिळच आहे. या माळ्यावर दोन चार लोकांना मुक्कामही करता येइल. येथून दहा पंधरा मिनिटांमध्ये गडाचा माथा गाठता येतो. सालोट्यावर पाणी मुबलक आहे. कातळात तसेच कपारीत पाणी आहे.
गडाच्या माथ्यावर घरांची जोती पहायला मिळतात. सालोट्यावरुन आजुबाजूचा मोठा परिसर पहायला मिळतो. गुजराथमधील डांगचा परिसरही दिसतो. डांगमधील पिंडवलचा किल्ला तसेच विलासन हिलवरील छत्रीही स्वच्छ वातावरणामध्ये पहायला मिळते. अर्थात साल्हेरचे रौद्ररुप मात्र मनाचा ठाव गाठते यात शंका नाही.
घोसाळगड उर्फ वीरगड हा किल्ला रायगड जिल्ह्यामधे आहे. दुर्गसंपन्न असलेल्या कोकणातील रायगड जिल्ह्यामधे रोहे तालुका आहे. रोहे तालुक्यात घोसाळगडाचा किल्ला आहे.
मुंबई-पुणे या महानगरांशी रोहे हे गाडीमार्गाने जोडले गेले आहे. शिवकालापासून प्रसिध्द असलेले रोहे गाव कुंडलिका नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले आहे. मुंबई - पणजी महामार्गाच्या पश्चिमेकडे असलेल्या रोहे येथे जाण्यासाठी महामार्गावरील नागोठेणे तसेच कोलाड येथून फाटे आहेत. तसेच रोहे हे कोकण रेल्वेवरील महत्त्वाचे रेल्वे स्थानकही आहे.
रोहे येथून मुरुड या सागरकिनार्यावरील गावाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यापैकी एक चणेरे - बिरवाडी कडून कुंडलिका नदीच्या किनार्याने जातो. तसेच दुसरा मार्ग घोसाळगडाकडून भालगाव मार्गे जातो. याच मार्गावर घोसाळगडाचा किल्ला आहे. चारही बाजुंना लहान मोठय़ा डोंगरांच्या मधे घोसाळगड विराजमान झालेला आहे. समुद्र सपाटीपासून २६० मीटर उंच असलेल्या घोसाळगडाचा आकार दूरुन शिवलिंगासारखा भासतो.
रोहे एस.टी. स्थानकावरून घोसाळगडाला जाण्यासाठी एस.टी.बसेसची सोय आहे. साधारण तासाभरात आपण घोसाळगड गावात पोहोचतो. गडाच्या पायथ्याला घोसाळगड गाव आहे.गावातूनच गडावर जाणारा रस्ता आहे. रस्ता संपल्यावर पायर्यांचा मार्ग केलेला आहे. या पायर्यांच्या मार्गावर भवानी मातेचे मंदिर असून त्यापुढे गणपतीचे प्रशस्त मंदिर आहे. मंदिरामधील गणेशमुर्ती स्वयंभु आहे. गणेशाला वंदन करुन चढाई सुरु करायची पंधरावीस मिनिटांमधे आपण गडाच्या तटबंदीजवळ येऊन पोहोचतो.
कातळात कोरलेल्या पायर्या समोर दिसतात. यातील काही पायर्या तोफांच्या मार्यामुळे उध्वस्त झालेल्या आहेत. या पायर्यांवरुन वर पोहोचल्यावर मधेच काही चांगल्या पायर्या लागतात. या पायर्या आपल्याला दरवाजापर्यंत घेऊन जातात. मात्र येथील प्रवेशव्दार पूर्णत: नष्ट झालेले आहे. त्याचे अवशेष येथे विखूरलेले आहेत. या अवशेषांमधे वाघांची चित्रे कोरलेले दगडही पहायला मिळतात. येथून थोडे वर दारूगोळ्याचे कोठार म्हणून जागा आहे.
येथून पुढे गेल्यावर गडाचे दोन भाग पडतात. एक माचीकडील तर दुसरा बालेकिल्ल्याकडील अरुंद असलेल्या डोंगर सोंडेवर तटबंदी बांधून ही माची तयार केलेली आहे. तटबंदीवर चढण्यासाठी पायर्या आहेत. या तटबंदीमधे त्याकाळातील शौचकूप पहायला मिळतात. माचीच्या टोकावर पुर्वी एक तोफ पडलेली होती. माची पाहून आपण बालेकिल्ल्याकडे प्रस्थान करायचे बालेकिल्ल्याच्या उंचवटय़ावर पाण्याच्या कोरीव टाक्या, घरांचे अवशेष, माथ्यावर किल्लेदाराचा वाडा असल्याच्या खुणा आढळतात.
गडाच्या माथ्यावरुन तळागडाचे दर्शन मनाला सुखवून जाते. कुडे मांदाडच्या खाडीचे दृष्य आपल्याला खिळवून ठेवते. शिवकालामधे स्वराज्यात असलेला घोसाळगड पूर्वी निजामशाही मधे होता. छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडाच्या समर प्रसंगात अडकलेले पाहून जंजिर्याच्या सिध्दीने घोसाळगडाला वेढा दिला होता पण अफझलखान मारला गेल्याचे कळल्यावर सिध्दी वेढा उठवून पळून गेला. पुढे पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी घोसाळगड मोगलांना दिला नाही. तो आपल्याकडेच राखला. असा हा महत्त्वाचा किल्ला दुर्लक्षित आहे.
गडदर्शन करुन आल्यावाटेने उतरुन परतीचा मार्ग पकडता येईल. अथवा येथून चालत तीन तासांच्या पायपिटीनंतर बिरवाडीच्या किल्ल्याला जाता येते. बसने तळा किल्ला अथवा जंजिरा किल्ला ही गाठता येईल.
