Showing posts with label व्यक्ती आणी वल्ली. Show all posts
Showing posts with label व्यक्ती आणी वल्ली. Show all posts

एकदा जमिनीवरचे वारे आणि समुद्रावरचे वारे शिकवीत होते.

"हं, गोदाक्का, सांगा वारा कुठल्या दिशेला वाहतोय?"

"गोदाक्का, वारा वाहतोय कुठल्या दिशेनं?"

गोदी आपली शंकू वाण्याच्या दुकानातल्या पोत्यासारखी बाकावरच ढुप्प करून बसलेली. "कार्टे, बूड हलवून उभी राहा की जरा. आश्शी!" अगदी मॅट्रीकपर्येतच्या मुलीलादेखील 'बूड' हलवून उभी राहा असे सांगण्यात काही गैर आहे असे चितळे मास्तरांनाही वाटत नसे आणि त्यांच्या पुढल्या शिष्यगणालाही वाटत नसे. मग गोदी खालचा ओठ पुढे काढुन शुंभासारखी उभी राहायची.

"हां, सांगा आता, कुठले वारे वाहताहेत?" मास्तरांनाही विचारले, गोदी गप्प.

"गोदुताई, तुझा पदर कुठल्या दिशेला उडतोय बघ--डोंगराच्या की समुद्राच्या?
राम्या तु सांग."

मग गोगट्यांच्या राम्या बिनदिक्कत गोदीला म्हणाला होता, "ए गोदे, नीट उभी राहा की--"

"का रे राम्या?" मास्तर दटावायचे.

"मग आम्हाला तिचा पदर नीट दिसणार कसा?"

"तिचा पदर कशाला दिसायला हवा?"

"मग वारा डोंगराकडे की समुद्राकडे कळणार कसं?"

"भोपळ्या, अरे परीक्षेत गोदीला का उभी करणार आहेस?" अरे. दिवसा वाहतात ते लॅंड विंड्स की सी विंड्स?"

मग सगळ्या वर्गाकडुन "दिवसा वाहतात ते--" ह्या चालीवर पाचपंचवीस वेळा घोकंपट्टी व्हायची. आणी मग "गोदीच्या पदराचा आणि लॅंड विंड्सचासंबंध.....?"

"ना~~~~ही!" पोरे ओरडायची.

-------------------------------------------------------------------

नामू परीट

------------------------------------------------------------------

कुठक्या तरी एका इंग्रजी चित्रपटाला मी आणि माझी पत्नी गेलो होतो. कुठल्याही मध्यमवर्गीयाच्या डरपोकपणाला साजेल असे वरच्या वर्गाचे तिकीट काढुन बसलो होतो. काळोखात काही वेळाने माझ्या मांडीवर कुणीतरी थापटल्याचा मला भास झाला. अंधारात मी चम्कुन बाजुला पाहीले.

"पी. यल. साहेब, पान खानार?"

आवाज ओळखीचा वाटला. चित्रपटग्रुहातल्या अंधारात काही वेळाने आपल्याला दिसू लागते. शेजारी बुशशर्ट आणि पॅंट (अर्थात दुस-याची) घालून नामूराव बसले होते. मी निमुटपणे पान घेतले.

"तंबाकू देऊ?"

"नको ---थुकायची पंचाईत होते."

"खुर्चीखाली मारा पिचकारी." नामुचा सल्ला.

"चूप!" "शु~~~" स्मोरून कुणी तरी आवाज दिला.

"च्यायला--- डाकुमेंट्रीत काय बघायचं असतं? मेन पिक्चर इंटर्वल पडल्यावर सुरु होत."

काही वेळाने इंटर्वल झाला. नामुच्या शेजारी आमच्याच चित्रपटांतून काम करणारी, मध्यमवयाची एक्स्ट्रातंली बाई पदरविदर घेऊन मारे एखाद्या सरदारकन्ये-सारखी बसली होती. मला पाहील्यावर तिने मोठ्या थाटात नम्स्कारही ठोकला.

"वैनी , आमची फ्यामिली!"

नामुचे आमच्या कुटुंबाशी तिची ओळख करून दिली. कोल्हापूरला एकदात्याने आम्हाला सत्यनारायणाला बोलावले होते त्या वेळी हिने त्याची 'फ्यामिली'पाहीली होती.

"हो, कोल्हापुरला भेटलो होतो." आमची बायकोही नामूला नको त्या सभ्य पातळीवर आणीत म्हणाली.

"ती निराळी-- ही ष्टेपनी."

कुठेही संकोचाचा लवलेश स्पर्श नाही. मी आणि माझी पत्नी मात्र जागच्या जागी संकोचलो.

"नामू--" मी उगीच विषय बदलीत म्ह्टले, "इंग्लिश पिक्चरमध्ये काय समजतं रे तुला?"

"फुकट पास आहे !"

"ह्याही मॅनेजरचे कपडे तुच फाडतोस वाटतं?"

"नाही, डोरकीपरचे! साहेब, पण पिक्चर झकास आहे. लवशिन काय काय घातले आहेत. ट्रॉली निस्ती गार गार फिरवली आहे.

"माझ्या सुदैवाने अंधार झाला आणि पिक्चर सुरू झाला.

------------------------------------------------------------

सखाराम गटणे

------------------------------------------------------------

सखाराम गटणे आत आला आणि त्याने अत्यंत आदराने माझ्या पायाला हात लावून नमस्कार करून मला दस-याचे सोने दिले. माझे वाह्यात मित्र हे द्रुश्य पाहत होते.

"आपण मला कदाचित ओळखलं नसेल--"

"वा वा ! ओळखलं की! मागे एकदा व्याख्यानाला होता तुम्ही --"

"हे सुर्यानं काजव्याचं स्मरण ठेवण्यासारखं आहे!" गटण्याने सरवाप्रमाणे एक लेखी वाक्य टाकले.

आता ह्या मुलाला काय करावे ते कळेना. बरे, मुद्दाम सोने द्यायला घरी आलेला.त्याला कपभर चहा तरी द्यायला हवा होता. गटण्याच्या चेह-यावरच्या भक्तिभावाने मी हैराण झालो होतो.

"मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे होते."

"आपण पुन्हा केव्हा तरी भेटु या. चालेल का?"

"केव्हा येऊ? आपल्या प्रतिभासाधनेच्या वेळा सोडुन कोणत्याही वेळा सांगा!"

मला त्याला ओरडून सांगावेसे वाटले, "मुला---अरे माणसासारखा बोल की रे.तुझ्या जिभेला हे छापील वळण कुठल्या गाढवानं लावलं? प्रतीभासाधनाची कसलीडोंबलाची वेळ?... "पण ह्यातले काहीही मी म्हटले नाही. गटण्याच्या डोळ्यांतछप्पन्न संशाची व्याकुळता साठली होती. बोलताना त्याचे डोळे असे काही होत, त्याच्या कपाळावरच्या आणि गळ्याच्या शिरा अशा काही विचित्रपणे ताणल्या जात, की असल्या आविर्भावात त्या मुलाने एखाद्या शिव्या दिल्या तरी देखील त्या घेणा-याला ह्या देणा-याची दया आली असती. एथे तर त्याच्या जिभेवर साक्षात सरस्वतीने मराठी भाषेचा 'क्लास' उघडला होता.

"हे पाहा, पुढल्या आठवड्यात एखाद्या संध्याकाळी या."

"निश्चित वार सांगू शकाल का आपण? नाही सांगितला तरी चालेल. मी रोज येत जाईन. प्रयास हा प्रतीभेच्या प्राणवायू आहे असं कुडचेडकरांनी म्हटलचं आहे."

"कुणी?"

"स.तं. कुडचेडकर ---'केतकी पिवळी पडली' चे ख्यातनाम लेखक."

"अस्सं!" कुडचेडकर नावाचा मराठीत कुणी साहित्यिक आहे, याचा मला पत्ताही नव्हता. आणि गटण्याला त्याच्या 'केतकी पिवळी पडली' (हे नाटक होते, कादंबरी होती की आणखी काय होते देव जाणे) पुस्तकातली वाक्ये पाठ होती. ह्या गटण्याची केस अगदीच हाताबाहेर गेली होती.


"दिल्ले दान घेतले दान पुढच्या जन्मी मुस्सलमान" असा एक आमच्या लहानपणी चिडवाचिडवीचा मंत्र होता. दिल्ले दान परत घेणा~याने मुस्सलमानच कशाला व्हायला हवे ? दानतीचे दान काही धर्मावारी वाटलेले नाही. पण 'दाना'ला मुस्सलमानातल्या 'माना'चे यमक जुळते, एवढाच त्याचा अर्थ. पण दिल्ले दान कसलाही विचार न करता परत घेणारा देवाइतका मक्ख दाता आणि घेता दुसरा कोणीही नसेल.

एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये, ह्याला काही उत्तर नाही. पंधरा-पंधरा, वीस-वीस वर्षांच्या परिचयाची माणसे असतात. पण शिष्टाचारांची घडी थोडीशी मोडण्यापलीकडे त्याचा आपला संबंध जातच नाही. त्यांच्या घरी जाणे-येणे होते --- भेटणे-बोलणे होते --- पण भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी पडत नाहीत. आणि काही माणसे क्षणभरात जन्मजन्मांतरी नाते असल्यासारखी दुवा साधून जातात. वागण्यातला बेतशुद्धपणा क्षणार्धात नष्ट होतो. तिथे स्थलभिन्नत्व आड येत नाही. पूर्वसंस्कार, भाषा, चवी, आवडीनिवडी, --- कशाचाही आधार लागत नाही. सूत जमून जाते. गाठी पक्क्या बसतात.

बेळगावच्या कृष्णराव हरिहरांशी अशीच गाठ पडली. त्यांना सगळे लोक 'रावसाहेब' म्हणायचे. ही रावसाहेबी त्यांना सरकारने बहाल केली नव्हती. जन्माला येतानाच ती ते घेऊन आले होते. शेवटपर्यंत ती सुटली नाही. बेताची उंची, पातळ पांढरे केस मागे फिरवलेले, भाग्याची चित्रे रेखायला काढतात तसले कपाळ, परीटघडीचे दुटांगी पण लफ्फे काढल्यासारखे धोतर नेसायचे, वर रेशमी शर्ट, वुलन कोट, एका हाताच्या बोटात हिऱ्याची अंगठी आणि दुसऱ्या हाताच्या बोटांत करंगळीच्या आणि अनामिकेच्या बेचकीत सिगरेट धरलेली, तिचा चिलमीसारखा ताणून झुरका घ्यायची लकब. जिल्ह्याच्या कलेक्टरपासून ते रस्त्यातल्या भिकाऱ्यापर्यंत कुणालाही, दर तीन शब्दांमागे कचकावून एक शिवी घातल्याखेरीज गृहस्थाचे एक वाक्य पुरे होत नसे. मराठीला सणसणीत कानडी आघात आणि कानडीला इरसाल मराठी साज.


साधे कुजबुजणे फर्लांगभर ऐकू जावे इतका नाजूक आवाज ! कुठल्याही वाक्याची सुरवात 'भ'काराने सुरू होणाऱ्या शीवीशिवाय होतच नसे. मराठीवरच्या कानडी संस्कारामुळे लिंगभेदच काय पण विभक्तिप्रत्यय-कर्ता-कर्म-क्रियापदांची आदळआपट इतकी करायचे की, दादोबा पांडुरंग किंवा दामले-बिमले सगळे व्याकरणवाले झीटच येऊन पडले असते. शुद्ध कसे बोलावे आणि शुद्ध कसे लिहावे हे व्याकरण शिकल्याने समजत असेल तर समजो बापडे, पण जगाच्या दृष्टिने सारी अशुद्धे केलेला हा माणूस माझ्या लेखी देवटाक्याच्या पाण्याइतका शुद्ध होता. आवेग आवरता येणे हे सभ्यपणाचे लक्षण मानले जाते. रावसाहेबांना तेवढे जमत नव्हते. तरीही रावसाहेब सभ्य होते. काही माणसांची वागण्याची तऱहाच अशी असते. की त्यांच्या हाती मद्याचा पेलादेखील खुलतो, आणि काही माणसे दूधदेखील ताडी प्याल्यासारखी पितात. रावसाहेब षोकीन होते. पण वखवखलेले नव्हते.

जीवनात त्यांनी दुर्दैवाचे दशावतार पाहिले. पण उपाशी वाघ काय आपली चाल मरतुकड्या कुत्र्याच्या वळणावर नेईल ? सोन्याच्या थाळीतून पहिला दूधभात खाल्लेल्या धनुत्तर हुच्चराव हरिहर वकिलाच्या किटप्पाने पुढच्या आयुष्यात कधीकधी शिळ्या भाकरीचा तुकडाही मोडला होता. पण काही हस्तस्पर्शच असे असतात, की त्यांच्या हाती कण्हेरदेखील गुलाबासारखी वाटते. रावसाहेबांची घडण खानदारी खरी, पण माणूस गर्दीत रमणारा. अंतर्बाह्य ब्राँझने घडवल्यासारखा वाटे. वर्णही तसाच तांबूस-काळा होता. सिगरेटचा दमदार झुरका घेताना त्यांचा चेहरा लाल आणि काळ्याच्या मिश्रणातून होतो तसा होई. मग दहांतल्या पाच वेळा त्यांना जोरदार ठसका लागे. सिगरेट ओढतानाच काय, पण जोरात हसले तरी ठसका लागायचा. कारण ते हसणेदेखील बेंबीच्या देठापासून फुटायचे. स्मितहास्य वगैरे हास्याचे नाजून प्रकार त्या चेहऱ्याला मानवतच नसत. एकदम साताच्या वरच मजले.ह्या राजा आदमीची आणि माझी पहिली भेट कोल्हापूरच्या शालिनी स्टूडिओत पडली.

दहापंधरा वाद्यांचा ताफा पुढ्यात घेऊन मी गाणे बसवीत होतो. रेकॉर्डींगच्या आधीची साफसफाई चालली होती. विष्णुपंत जोग आपल्या पहाडी आवाजात गात होते. चाल थोडी गायकी ढंगाची होती. जोगांचा वरचा षड्ज ठ्यां लागला आणि तो वाद्यमेळ आणि जोगांचा स्वर ह्यांच्या वर चढलेल्या आवाजात कोणीतरी ओरडले --- "हा__ण तुझ्या आXX!"


ही इतकी सणसणीत दाद कोणाची गेली म्हणून मी चमकून मागे पाहिले. बाळ गजबर रावसाहेबांना घेऊन पुढे आले आणि

मला म्हणाले ---"हे बेळगावचे कृष्णराव हरिहर बरं काय ----"मी रीतसर नमस्कार ठोकला आणि रावसाहेबांनी आमची आणि त्यांची शाळूसोबत असल्यासारखा माझ्या पाठीत गुद्दा मारला.

"काय दणदणीत गाणं हो xxxxx !" रावसाहेबांच्या तोंडची वाक्ये जशीच्या तशी लिहायची म्हणजे मुष्किलच आहे. शरीराप्रमाणे मनालाही कुबड आलेली माणसे अश्लील -- अश्लील म्हणून ओरडायची. (तबीयतदार तज्ञांनी फुल्या भरून काढाव्या.)

"वा !--- पण तेवढं तुमचं ते तबलजी शिंचं कुचकुचत वाजिवतंय की हो -- त्याला एक थोडं चा पाज चा -- तबला एक थोडं छप्पर उडिवणारं वाजीव की रे म्हणा की त्या xxxxxला." इथे पाच शब्दांची एक शिवी छप्पर उडवून गेली. तसेच पुढे गेले, आणि त्या तबलजीला त्यांनी विचारलं,

"कोणाचा रे तू ?" तबलजीने वंश सांगीतला. आणि माईकपुढे नरम वाजवावे लागते वगैरे सबबी सुरू केल्या. "मग रेकार्डिंगवाल्याला ह्यें माइकचं बोंडूक वर उचलायला लावू या की. बळवंत रुकडीकराचे ऐकलं नाहीस काय रे तबला ? 'कशाला उद्याची बात'चं रेकार्ड ऐक की -- त्याच्या वाटेत तुझं हे xxxचं माइक कसं येत नव्हतं रे xx?" म्हणत आपणच माइक वगैरे वर उचलून "हाण बघू आता" म्हणत त्या रेकॉर्डिंगचा ताबा घेतला.

स्टुडियोत त्यांचा जुना राबता होता. रेकॉर्डिस्टही परिचयातलेच. थोडा वेळ इरसाल कोल्हापुरीत त्यांचा आणि ह्यांचा एक लडिवाळ संवाद झाला. "मला सांगतोस काय रे रेकार्डिंग? पी.एल. --- अहो, हे तुमचं रेकार्डिष्ट खुंटाएवढं होतं --- माझ्या धोतरावर मुतत होतं. आता मिश्या वर घेऊन मला शिकवतंय बघा --- ह्या कोल्हापुरातल्या क्राऊन शिन्माचा नारळ फुटला तो माझ्यापुढे की रे -- तू जन्म झाला होतास काय तेव्हा -- हं, तुमच्या वाजिंत्रवाल्यांना लावा पुन्हा वाजवायला -- जोर नाही एकाच्या xxx! हें असलं नाटकासारखं गाणं आणि साथ कसलं रे असलं मिळमिळीत ? थूः !

हे काय तबला वाजिवतंय की मांडी खाजिवतंय रे आपलंच ?" एवढे बोलून रावसाहेब ठसका लागेपर्यंत हसले. रावसाहेबांचा हा अवतार मला अपरिचित असला तरी आमच्या स्टुडिओतल्या मंडळींना ठाऊक असावा. कारण त्यांच्या त्या आडवळणी बोलण्यावर लोक मनसोक्त हसत होते. रेकॉर्डिस्टने त्यांना आपल्या बूथमध्ये नेले आणि रावसाहेब त्या काचेमागून माना डोलवायला लागले. त्या माणसाने पहिल्या भेटीतच मला खिशात टाकले

त्यानंतर वर्षा-दोन वर्षांतच मी बेळगावला प्राध्यापकी करायला गेलो, आणि पहिल्या दिवशीच रावसाहेबांच्या अड्ड्यात सामील झालो. रावसाहेब सिनेमाथिएटरांच्या व्यवसायात होते. बेळगावच्या रिझ थिएटरातला बैठकीचा अड्डा हा रावसाहेबांचा दरबार होता. त्या दरबारात अनेक विसंवादी पात्रे जमत. त्या आर्चेस्ट्र्याचे रावसाहेब हे कंडक्टर होते. राजकारणातल्या माणसांना काय तो तिथे मज्जाव होता. म्हणजे कुणी मज्जाव केला नव्हता, पण त्या खुर्च्यांमध्ये मानाची खुर्ची नसल्यामुळे ती जात त्या दिशेला फिरकतच नसे. रिझ थिएटरच्या बाजूला एक ऑफिसची छोटीशी बंगली होती. तिच्या दारात संध्याकाळी खुर्च्या मांडल्या जात. पंखा चालू केल्यासारखी संध्याकाळी सहाच्या सुमारास नेमकी त्या बोळकंडीतून वाऱ्याची झुळूक सुरू व्हायची. एक तर बेळगावी लोण्याइतकीच तिथली हवाही आल्हाददायक. हळूहळू मंडळी दिवसाची कामेधामे उरकून तिथे जमू लागत. त्या बैटकीत वयाचा, ज्ञानाचा, श्रीमंतीचा, सत्तेचा -- कसलाही मुलाहिजा नव्हता. एखाद्या खिलाडू कलेक्टराचेदेखील रावसाहेब "आलं तिच्च्यायला लोकांच्यात काड्या सारून --" अशा ठोक शब्दांत स्वागत करायचे. रावसाहेबांच्या शिव्या खायला माणसे जमत. मग हळूच व्यंकटराव मुधोळकर रावसाहेबांची कळ काढीत. व्यंकटराव मुधोळकर धंद्यानं रावसाहेबांचे भागीदार. पण भावाभावांनी काय केले असेल असे प्रेम. दोघांची भांडणे ऐकत राहावी. एखाद्या शाळकरी पोरासारखे ते हळूच रावसाहेबांची कळ काढीत.

"काय रावसाहेब -- आज पावडरबिवडर जास्त लावलीय --" बस्स. एवढे पुरे होई.

"हं -- बोला काडीमास्तर --" रावसाहेब त्यांना काडीमास्तर म्हणत. ह्या दोघांची मैत्री म्हणजे एक अजब मामला होता. मुधोळकर कुटुंबवत्सल, तर रावसाहेबांच्या शिष्टमान्य संसाराची दुर्दैवाने घडीच विस्कटलेली. मुधोळकरांनी व्यवहारातली दक्षता पाळून फुकट्यांच्या भल्याची पर्वा करायची नाही तर रावसाहेबांनी विचार न करता धोतर सोडून द्यायचे आणि वर "लोकांनी काय पैसा नाही म्हणून नागवं हिंडायचं का हो !" म्हणून भांडण काढायचे. पण जोडी जमली होती. लोकांच्या तोंडी हरिहर - मुधोळकर अशी जोडनावे होती.

त्या अड्ड्यात शाळा आटपून मिस्किल नाईकमास्तर येत -- गायनक्लासातल्या पोरांना सा-रे-ग-म घोकायला लावून मनसोक्त हसायला आणि हसवायला विजापुरे मास्तर येत -- डॉ. कुलकर्णी -- डॉ. हणमशेठ यांच्यासारखे यशस्वी डॉक्टर येत -- कागलकरबुवा हजिरी लावीत -- पुरुषोत्तम वालावलकरासारखा तरबेज पेटीवाला "रावसाहेब, संगीत नाटकाचे जमवा" म्हणून भुणभुण लावी -- विष्णू केशकामतासारखा जगमित्र चक्कर टाकून जाई -- मधूनच रानकृष्णपंत जोश्यांसारखे धनिक सावकार येत -- बाळासाहेब गुडींसारखे अत्यंत सज्जन पोलीस अधिकारी येत -- मुसाबंधू येऊन चावटपणा करून जात... रात्री नऊनऊ वाजेपर्यंत नेमाने अड्डा भरायचा. पण सगळ्यांत मोठा दंगा रावसाहेबांचा. त्यांचा जिमी नावाचा एक लाडका कुत्रा होता. त्यालाही रावसाहेबांच्या शिव्या कळत असाव्या. तोदेखील "यू यू यू यू" ला जवळ न येता "जिम्या, हिकडं ये की XXच्या " म्हटलं तरच जवळ यायचा.

सिनेमाच्या व्यवसायात रावसाहेबांचे आयुष्य गेले. मॅनेजरीपासून मालकीपर्यंत सिनेमाथेटरांचे सगळे भोग त्यांनी भोगले. पण पंधरापंधरा आठवडे चाललेला सिनेमादेखील कधी आत बसून पाहिला नाही. नाटक आणि संगीत हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय.

कर्नाटकातली वैष्णव ब्राह्मणांची घरे म्हणजे अत्यंत कर्मठ. त्या एकत्र कुटुंबातल्या सोवळ्या-ओवळ्यांच्या तारेवर कसरत करीत पावले टाकायची. त्यातून रावसाहेबांचे वडील म्हणजे नामवंत वकील. वाड्याच्या त्या चौदा चौकड्यांच्या राज्यातली ती त्या काळातल्या बाप नामक रावणाची सार्वभौम सत्ता. पोरे ही मुख्यतः फोडून काढण्यासाठी जन्माला घातलेली असतात, असा एक समज असायचा. नफ्फड बापदेखील आपल्या पोराला सदवर्तनाचे धडे द्यायला हातात छडी घेऊन सदैव सज्ज. इथे तर कर्तबगार बाप. घर सोन्यानाण्याने भरलेले. असल्या ह्या कडेकोट वातावरणात विष्णुसहस्त्रनामाच्या आणि तप्तमुद्रांकित नातलगांच्या पूजापाठांच्या घोषात कृष्णरावांच्या कानी बेळगावच्या थिएटरातल्या नाटकांच्या नांद्यांचे सूर पडले कसे हेच मला नवल वाटते.
(अपुर्ण)..

प्रकाशन - मौज प्रकाशन गृह.

रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीत लोकोत्तर पुरूष रहातात.देवाने ही माणसांची एक निराळीच घडण केली आहे. त्यांच्यात रत्नागिरीच्या लाल चिर्‍याचे, नारळ-फणसांचे,खाजर्‍या अळवाचे आणि फट म्हणताच प्राण कंठाशी आणणार्‍या ओल्या सुपारीचे गुण अगदी एकवटून आहेत. रत्नागिरीच्या शितातच ही भुतावळ लपली आहे की पाण्यातच प्राणवायु नि प्राणवायूच्या जोडीला आणखी कसला वायु मिसळला आहे ते त्या रत्नांग्रीच्या विश्र्वेश्र्वरालाच ठाऊक.

अंतू बरवा ह्याच मातीत उगवला आणि पिकला. वास्तविक अंतू बरव्याला कुणी अंतू असे एकेरी म्हणावे असे त्याचे वय नव्हे. मी बाराचौदा वर्षांपूर्वी त्यांना प्रथम पाहिले त्या वेळीच त्यांच्या दाढीचे खुंट आणि छातीवरचे केस पिकलेले होते. दातांचा बराचसा अण्णू गोगट्या झाला होता. अण्णू गोगट्या होणे म्हणजे 'पडणे' हा अंतूने मराठी भाषेला बहाल केलेला वाक्प्रचार आहे. रत्नांग्रीचा अण्णू गोगटे वकील कित्येक वर्षे ओळीने मुन्शिपाल्टीच्या निवडणूकीत पडत आला आहे. तेव्हापासून विहिरीत पोहरा पडला तरी पोहर्‍याचा

"'अण्णू' झाला काय रे?" म्हणून अंतू ओरडतो.

त्यांची आणि माझी पहिली भेट बापू हेगिष्ट्याच्या दुकानात झाली. मी सिगरेट घ्यायला गेलो होतो आणि 'केसरी'च्या मागून अर्धा जस्ती काड्यांचा चष्मा कपाळावर घेत अंतूशेटनी तडक प्रश्न केला होता, "

"वकीलसाहेबांचे जावई ना ?"

"हो!"

"झटक्यात ओळखलेंच मी! बसा! बापू, जावयबापूंना चहा मागवा"

एकदम इतक्या सलगीत आलेला म्हातारा कोण हे मला कळेना. पण अंतूशेटनीच खुलासा केला. "तुमचे सासरे दोस्त हो आमचे. सांगा त्यांना अंतू बरवा विचारीत होता म्हणून."

"ठीक आहे !"

"केव्हा आलात पुण्याहून ?"

"परवाच आलो."

"बरोबर. दिवाळसण असेल. मागा चांगली फोर्ड गाडी! काय?"

"तुमचे दोस्त आहेत ना, तुम्हीच सांगा."

"वा! पुण्याचे तुम्ही. बोलण्यात ऐकणार काय आम्हाला! मग मुक्काम आहे की आपली फ्लाईंग व्हिजीट ?"

"दोनतीन दिवसांनी जाईन !"

"उत्तम ! थोडक्यात गोडी असते. त्या सड्यावरच्या कपोसकर वकिलाच्या जावयासारखं नका करू. त्यानं सहा महिने तळ ठोकला. शेवटी कपोसकर वकिलान् एक दिवस खळं सारवायास लावलं त्यास ! जास्त दिवस जावई राहिला की तो दशमग्रह होतो. कसं ?"

"बरोबर आहे !"

"बापूशेट, ओळखलंत की नाही ? आमच्या वकिलांचे जावई ! आम्ही दोघेही त्यांचेच पक्षकार हो !"
हेगिष्ट्यांनी नमस्कार केला.

"चहा घेता ?"

"नको हो, उकडतंय फार !" मी म्हणालो.

"अहो, रत्नांग्रीस उकडायचंच. गोठ्यात निजणार्‍यान् बैलाच्या मुताची घाण येते म्हणून भागेल काय ?" शेवटला 'काय?' वरच्या पट्टीत उडवीत अंतूशेट म्हणाले, "रत्नांग्रीस थंड हवा असती तर शिमला म्हणाले नसते काय आमच्या गावाला ? पण उकाड्याचा तुमच्या सड्यावर अधिक त्रास ! दुपारच्या वेळी मारा सायकलीवर टांग नि थेट या आमच्या पोफळीच्या बागेत झोपायला. पोफळीची बाग म्हणजे एअरकंडिशन हो !" मनमुराद हसत अंतूशेट म्हणाले. वर आणि "आमचा कंट्री विनोद हो जावयबापू" हेही ठेवून दिले.

"बापूशेट, पाहुणे लेखक आहेत हो. आमच्या आबा शेट्यासारखी नाटकं लिहिली आहेत. फार बोलू नका. नाहीतर तुमच्यावर लिहीतील एखादा फर्मास फार्स !"

अंतूशेट बर्व्यांपर्यंत माझी कीर्ती पोहोचल्याचे ऐकून झालेला आनंद बापूशेट हेगिष्ट्याच्या प्रश्नाने मावळला. मला नीट न्याहाळीत बापूशेट म्हणाले, "काय करतात ?"

"करतात काय म्हंजे ? खुळे की काय तुम्ही हेगिष्टे ? ती रद्दी काढा. दहा ठिकाणी फोटोखाली नाव छापलेलं आढळेल तुम्हाला. सिनेमात असतात."

"म्हणता काय ?" हेगिष्टे माझ्याकडे 'अजि म्यां ब्रह्म पाहिलें' असा चेहरा करून पाहत म्हणाले.

"काय हो जावयबापू, एक विचारू काय ?" मिस्किल प्रश्नाची नांदी चेहर्‍यावर दिसत होती.

"विचारा की ----"

"एक सिनेमा काढला की काय मिळतं हो तुम्हाला ?"
मी काही कोकणात प्रथमच आलो नव्हतो; त्यामुळे ह्या प्रश्नाला मी सरावलो होतो.

"ते सिनेमा-सिनेमावर अवलंबून आहे."

"नाही, पण आम्ही वाचलंय की एक लाख दीड लाख मिळतात ..."

"मराठी सिनेमात एवढे कुठले ?"

"समजा ! पण पाच पूज्यं नसली तरी तीन पूज्यं पडत असतीलच ..."

"पडतात... कधीकधी बुडतात ही !"

"अहो, ते चालायचंच ! धंदा म्हटला की चढणं नि बुडणं आलं. आणखी एक विचारू काय ? ...म्हणजे रागावणार नसलात तर..."

"छे, रागवायचं काय ?"

"सिनेमातल्या नट्यांबद्दल आम्ही हे जे काही वाचतो ते खरं असतं की आपलं गंगाधर बाष्ट्याच्या अस्सल बेळगावी लोण्यासारखं पीठ मिसळलेलं ?"

"हे जे काही म्हणजे ?" मी उगीचच वेड पांघरले.

"वस्ताद हो जावयबापू ! कोर्टात नाव साक्षीदार म्हणून नाव काढाल ! अहो, हे जे काही म्हणजे तर्जनीनासिकान्याय यातला प्रकार म्हणतात ते..."

हा तर्जनीनासिकान्याय माझ्या ध्यानात आला नाही. शेवटी अंतूशेतनी आपली तर्जनी नाकपुडीला लावीत साभिनय खुलासा केला. तेवढ्यात हेगिष्ट्यांनी मागवलेला चहा आला. "घ्या" अंतूशेटनी माझ्या हातात कप दिला आणि त्या चहावाल्या पोराला "रत्नांग्रीच्या समस्त म्हयशी तूर्तास गाभण काय रे, झंप्या ?" असे म्हणून जाता जाता चहाच्या रंगावर शेरा मारला आणि बशीत चहा ओतून फुर्र फुर्र फुंकायला सुरवात केली. वास्तवीक त्या पो~याला चहात दूध कमी आहे हे त्यांना सरळ सांगता आले असते. पण अंतूशेटचेच काय, त्यांच्या सा~या आळीचे बोलणे तिरके.

अंतूशेटचा आणि माझा परिचय आता जुना झाला. गेल्या दहाबारा वर्षांत मी जितक्या वेळा रत्नागिरीला गेलो तितक्या वेळा मी त्यांना भेटलो. त्यांच्या अड्ड्यात त्यांनी मला जमवूनही घेतले. एकदोनदा गंजिफा शिकवायचा प्रयत्नही केला. आणि त्या साठीच्या आसपास उभ्या असलेल्या वृद्धांच्या अड्ड्यात मग अंतूशेट आणि त्यांचे सांगाती यांचे जीवनविषयक अचाट तत्वज्ञान मी खूप ऐकले. त्यांची विशिष्ट परिभाषा तिथे मला कळली. खांद्यावर पैरणी, कमरेला पंचा, पायात करकरती वहाण,एका हातात दंडा नि दुस~या हातात फणस घेऊन , "रे गोविंदभट, टाकतोस काय दोन डाव ?" किंवा "परांजप्या, जागा आहेस की झाला तुझा अजगर ?" अश्या आरोळ्या मारीत पत्त्यांतले भिडू गोळा करणा~या त्या मंडळीत मीही भटकलो. पत्त्यांचा डाव फारसा रंगला नाही की पाने टाकून, "जावयबापू, म्हणा एखादा मालकंस. गडबोल्या,कूट थोडा तबला पाव्हण्याबरोबर. खातूशेट, उघडा तुमचा खोका." असल्या फर्माईशीनंतर मी आवाजही साफ करून घेत असे.

"नरड्यात मज्जा आहे हो तुमच्या !" ही दाद इथेच मिळे.
वर्षा-दोन-वर्षांतून एखादी फेरी रत्नागिरीला घडे. दर फेरीत मात्र एखादा मेंबर गळाल्याचे कळे.

"दामूकाका दिसले नाहीत कुठे अंतूशेट !"
"कोण ? दामू नेना ? तो चैनीत आहे ! वरती रंभा त्याच्या टकलावर तेल थापते आणि उर्वशी पंख्यान् वारा घालते म्हणतात."
"म्हणजे ?"
"अहो, म्हंजे वाघाचे पंजे ! दामू नेन्याची रत्नांग्रीहून झाली बदली !" असे म्हणून अंतूशेटनी आकाशाकडे बोट दाखवले.
"अरे अरे अरे ! कळलं नाही मला."
"अहो, कळणार कसं ? दामू नेना चचला म्हणून रेडिओत का बातमी सांगणार आहेत ? केसरीत आला होता गृह्यसंस्कार झापून. मनमिळाऊ, प्रेमळ व धर्मपरायण होते असा ! छापणारे काय, द्याल ते छापतील. दामू नेना कसला प्रेमळ ? ताटीवर आडवा पडला होता तरी कपाळावरची आठी तशीच ! एके रात्री उकडतांय घरात म्हणून खळ्यात झोपला तो तिथेच संपलेला आढळला पहाटे ! पुण्यवान माणूस. गतवर्षी आषाढीच्या दिवशी गेला वैकुंठालोकी. रत्नांग्रीत दोन पालख्या निघाल्या आषाढीला --- एक विठोबाची नि दुसरी दामू नेन्याची. आषाढात तो गेला आणि विजयादशमीला आमच्या दत्तू परांजप्यान् सीमोल्लंघन केलेनीत. अवघ्या देहाचं सोनं झालं. इजा झाला, बिजा झाला, आता तिजाची वाट पाहतोय !" मिष्किलपणाने खांदा उडवीत अंतूशेट म्हणाले.
पाच फुटांच्या आतबाहेरची उंची, तांबूस गोरा वर्ण, तोंडावर बारीक वांगाचे ठिपके, घारे मिचमिचे डोळे, वयोमानाप्रमाणे वाढत चाललेल्या सुरकुत्या, डोक्यावर तेलाच्या कडा उमटलेली टोपी, अंगात अंगरखा, कमरेला गुडघाभर पंचा, पायांत कोकणी वहाणा, दातांची अर्धी पंगत उठून गेलेली, त्यामुळे मोकळ्या हिरड्यांना जीभ लावीत बोलायची खोड आणि ह्या साजासकट वजन सुमारे शंभर पौंड. ह्या सगळ्या जराजीर्ण होत चाललेल्या गोष्टींत एक गोष्ट ताजी म्हणजे सानुनासिक परंतु सुस्पष्ट आवाज आणि डोक्यावर पिढ्यान् पिढ्या थापलेल्या खोबरेल तेलाने दिलेली वंशपरंपरागत तैलबुद्धी ! अंतूशेटच नाही, तर त्या आळीतले त्या वयाचे सारेच नमुने कमीअधिक फरकाने एकाच वळणाचे किंवा आडवळणाचे. भाषेला फुरश्यासारखी पायात गिरकी घेऊन चावायची सवयच झालेली. कुणाचे बरे झाल्याचे सुख नाहीच; वाईट झाल्याचे दुःख नाही. जन्माचे सोयर नाही, मरणाचे सुतक नाही. गाण्याची रुची नाही, तिटकाराही नाही; खाण्यात चवीपेक्षा उदरभरण हाच स्वच्छ हेतू ! आयुष्याची सारवट गाडी वंगण नाही म्हणून कुरकुरली नाही, आहे म्हणून वेगाने पळली नाही. चाल मात्र कोकणी वाटेसारखी सदा नागमोडीची. नशिबात अश्वत्थाम्याघरच्या पिठाच्या दुधाची वाटी ! त्याच्या घरी दुधाचे पीठ झाले. इथे देवाने नारळीचा कल्पवृक्ष दिलेला. पण त्यातल्या खोब~याहून करवंटीची सलगी अधिक !
उन्हाळ्यात कुठली तरी मुंबईची दुय्यम नाटक कंपनी झापाच्या थेटरात 'एकच प्याला' घेऊन आली होती. संच जेमतेमच होता. पहिला अंक संपला. बाहेर सोड्याच्या बाटल्यांचे चीत्कार सुरू झाले. किटसनच्या प्रकाशात अंतूशेटची मूर्ती दिसली. अंतूशेट फरक्यापवाल्या मॅनेजरशी चर्चा करत होते.
"कशी काय गर्दी ?"
"ठीक आहे !"
"प्लान तर मोकळाच दिसतोय. सोडता काय अर्ध्या तिकिटात ?"
"छे ! छे !"
"अहो, छे छे म्हणून झिटकता काय पाल झाडल्यासारखे ? पहिला अंक ऐकला मी हितूनच. सिंधूच्या पार्ट्यात काय दम दिसत नाही तुमच्या. 'लागे हृदयीं हुरहुर' म्हणजे अगदीच पिचकवणी म्हटलंनीत. बालगंधर्वाचं ऐकलं होतंत काय ?" नेहेमीप्रमाणे शेवटला 'काय' उडवीत अंतूशेट म्हणाले.
मॅनेजरही जरा उखडले. "आग्रह नाही आमचा तुम्ही नाटक बघायला चला असा."
"गावात आग्रहाचे बोर्ड तर टांगले आहेत --- आणि काल घरोघर जाहिरातीची अक्षतदेखील घेऊन हिंडत होते तुमचे ब्यांडवाले! अहो, एवीतेवी रिकाम्या खुर्चीला नाटक दाखवायचं --- चार आण्यात जमवा."
"चार आण्यात बघायला काय डोंबा~याचा खेळ आहे काय ?"
"अहो तो बरा ! आधी खेळ तो दाखवतो आणि मग थाळी फिरवतो. तुम्ही तसं करा. पुढलं 'कशि या त्यजूं पदाला' जमलं फक्कड तर थाळीत चार आणे आणखी टाकीन." बाजूची मंडळी हसली आणि मॅनेजर उखडला. तेवढ्यात अंतूशेटची नजर माझ्याकडे वळली. "नमस्कार हो जावयबापू..."
"नमस्कार !"
"काय जमलाय काय 'एकच प्याला' ? "
"ठीक आहे !"
"फुकट पासात की काय तुम्ही ? बाकी तुम्हीही त्यांतलेच. एक न्हावी दुस~या न्हाव्याच्या दाढीचे पैसे घेत नाही म्हणतात."
"'नाही हो. हे पहा तिकीट आहे."
"'मग 'ठीक आहे' म्हणून मुळमुळीतसं उत्तर दिलंत ? दमड्या मोजल्या आहेत ना तुम्ही ? तो सिंधूचा पार्टी तर एकदम कंडम वाटला मला."
"अहो, सिंधूचा पार्टी कसला ? बाई आहे ती काम करणारी."
"सांगताय काय ? कसला तो आवाज नि कसलं ते दिसणं ? मनात आणील तर कडेवर घेईल सुधाकराला. सिंधू कसली ? सिंधूदुर्ग आहे मालवणचा नुसता."
"पाहिलंत वाटतं नाटक ?"
"उगीच जरा. त्या कोप~यातली दोन झापं बाजूला करून पाहिलं घटकाभर... छ्याः ! ह्यांच्यापेक्षा दशावतारी बरे."
काही कारण नसताना आपल्या मताची एक पिंक टाकून अंतूशेट निघून गेले. बाकी अशा दिवसरात्र 'पिंका' टाकीतच त्यांचे आयुष्य गेले. अंतूशेटची माझी आता इतक्या वर्षांची ओळख, परंतु त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीविषयी मला फारसे कधीच कळले नाही. त्यांच्याच अड्ड्यातल्या अण्णा सान्यांनी एकदाच फक्त काही माहिती पुरवली होती. कधीतरी त्यांच्या बोलण्यातून अंतूशेटच्या मुलाची उल्लेख आला.
"'म्हणजे ? अतूशेटना मुलगा आहे ?"
"आहे ? म्हणजे काय ? चांगला कलेक्टर आहे !"
"'कलेक्टर ?"
"भायखळ्याच्या स्टेशनावर तिकिटं गोळा करतो." चेह~यावरची सुरकुती हलू न देता अण्णा म्हणाले.
"मग वडलांना मदत करीत नाही की काय ?"
"अहो, करतो कधी कधी. त्यालाही त्याचा संसार आहे. त्यातून बीबीशीआयला जायपीचा डबा जोडलेला ..."
ह्या अड्ड्यातले हे विशेष शब्द गोळा केले तर एक स्वतंत्र कोश तयाल होईल. बी बी सी आयला जी आय पीचा डबा जोडणे म्हणजे आंतरजातीय विवाह हे लक्षात यायला मला उशीर लागला.
"काय लक्षात आलं ना ? तेव्हा अंतूशेटच्या स्नानसंधेची पंचाईत होते. मुलाच्या घरी थोडी इतर आन्हिकंही चालतात म्हणे. आमच्या अंतूशेटचं जमायचं कसं? एकदा सगळा अपमान गिळून नातवाचा चेहरा पाहण्यास गेला होता. गणित चुकल्यासारखा परतला. दसरा-दिवाळीला अंतू बर्व्याला मिळतं आपलं मनिऑर्डरीतून पितृप्रेमाचं पोस्त ! पाचदहा रुपयांचं ! तेवढ्यात फिरतो मिशीला कोकम लावून तूप म्हणून सांगत ! आणि उगीचच खुर्दा खुळखुळवतो चार दिवस खिशात हात घालून."
"अहो, तिकिट-कलेक्टरला पगार तो काय असणार ?"
"पगार बेताचाच, पण चवल्यापावल्यांची आचमनं चालतात म्हणतात. खरंखोटं देव जाणे. आणि चालायचंच ! घेतले तर घेऊ देत .. काय ? अहो, आठ आणे खाल्ले की चौकडीचा मुगूट घालून रत्नागिरीच्या डिस्ट्रिक्ट जेलात घालतात आणि एक लाख खाल्ले की गांधी टोपी घालून पाठवतात असेंब्लीत ! लोकनियुक्त प्रतिनिधी !"
राजकारण हा तर अंतूशेटच्या अड्ड्यातला लाडका विषय ! प्रत्येक राजकीय पुढा~यावर आणि तत्वप्रणालीवर मौलिक विचार ! कोकणात दुष्काळ पडला होता. तसा तिथे नेहमीच दुष्काळ. पण हा दुष्काळ अंतूशेटच्या भाषेत सांगायचे म्हणजे 'फ्यामिन आक्टान्वये पास झालेला'! दुष्काळी भागातून नेहरूंचा दौरा चालला होता. गावात धामधूम होती. कोणीतरी संध्याकाळी अंतूशेटना विचारले, "काय अंतूशेट? भाषणास दिसला नाही !" "कुणाच्या न्हेरूच्या ? छ्याट् ! अरे, दुष्काळ पडला हितं .. तर भाषणं कसली देतोस ! तांदूळ दे.! हे म्हणजे भाट्याच्या खाडीत बुडणा~या दालद्याला विश्वेश्वराच्या घाटीवर उभं राहून कुराण वाचून दाखवण्यापैकी आहे. तो तिथे बोंबलतोय आणि हा हितं ... ह्याचा त्यास उपयोग नाही आणि त्याचा ह्यास ! तुम्ही आपले खुळे. आला न्हेरू चालले बघायास ! आणि रत्नांग्रीत दाखवलनीत काय त्यास ? बाळ गंगाधर टिळक जन्मले ती खोली आणि खाट ? गंगाधरपंत टिळकास काय स्वप्नात द्रष्टांत झाला होता काय रे ... तुझ्या बायकोच्या पोटी लोकमान्य जन्मास येणार म्हणून ? कुणाची तरी खाट दाखवली नि दिलं ठोकून त्याच्यावर टिळकानं पहिलं ट्यां केलं म्हणून ! पुरावा काय ? का टिळकाच्या आयशीचं बाळंतपण केलेली सुईण होती साक्षीस ? टिळकाचं सोड ! शंभर वर्षं झाली त्याच्या जन्मास. तू जन्मास आलास ती खोली तुझ्या मातोश्रीस तरी सांगता येईल काय ? म्हातारीस विचारून ये घरी जाऊन आणि मग सांग मला टिळकाच्या आणि न्हेरूच्या गोष्टी."
मला नेहमी प्रश्न पडे, की ह्या मंडळीची आदराची स्थानं कोणती ? गावात पंडित आला की त्याला 'पढिक' म्हणून उडव. "बाजारात जाऊन पैशाचं लिंबू आणायास सांग. स्तंभाजवळच्या लायब्ररीत जाईल आणि तिथे मागेल लिंबू !" कुणाचा मुलगा प्रोफेसर झाला हे ऐकल्यावर अंतूशेट चटकन म्हणाले, "सर्कशीत काय हो? पूर्वी एक छत्रे प्रोफेसर होता." कुणी नवे दुकान काढले तर "दिवाळ्याचा अर्ज आत्ताच मागवून ठेव म्हणावं !" हा आशिर्वाद.
जीवनाच्या कुठल्या तत्वज्ञानाचा अर्क ही मंडळी प्याली आहेत देव जाणे. त्यांतली निम्म्याहून अधिक माणसे मनिऑर्डरीवर जगतात आणि त्यातले पैसे वाचवून दावे लढवतात. प्रत्येकाची तारीख पडलेली. विशाल सागरतीर आहे, नारळीची बने आहेत, पोफळीच्या बागा आहेत, सारे काही आहे; पण त्या उदात्ततेला दारिद्र्य विलक्षण छेद देऊन जाते आणि मग उरते एक भयाण विनोदाचे अभेद्य कवच !
कशावरून तरी गांधींच्या गोष्टी निघाल्या. अंतूशेटनी आपले भाष्य सुरू केले. "अहो, कसला गांधी ? जगभर गेला, पण रत्नांग्रीस फारसा आला नाही. पक्का तो ! त्यास नेमकं ठाऊक --- इथं त्याच्या पंचाचं कौतुक नाही नि दांडीचं नाही. आम्ही सगळेच पंचेवाले नि त्याच्याहीपेक्षा उघडे ! सुताबितात तथ्य नाही हो ! आमचा शंभूशेट जन्मभर जानव्याचं सूत काढीत आला ! ब्रिटिश सरकार सोडा पण रत्नांग्रीचा गिलिगन कलेक्टरदेखील घाबरला नाही ! तिसरं शस्र म्हणजे उपासाचं ! इथे निम्मं कोकण उपाशी ! नेहमी तुपाशी खाणाऱ्यास उपाशी माणसाचं कौतुक. आम्हांस कसलं ? नाही, माणूस असेल मोठा... पण आमच्या हिशेबी त्याच्या मोठेपणाची नोंद करायची कुठल्या खात्यावर ? आणि स्वराज्याचा म्हणाल तर संबंध गांधीशीही नाही, टिळकांशीही नाही नि सावरकांशीही नाही."
"म्हणजे स्वराज्य काय आकाशातून पडलं ?"
"ते कुठून पडलं ते तुम्ही तपासा ! पण इंग्रज गेला कंटाळून. अहो, लुटण्यासारखं काय शिल्लक होतं ? धंदा बुडीत खाती जायला लागला --- फुकलंनीत दिवाळं ! कुंभार मडकी घेऊन गेला, तुम्ही फुंका उकिरडा ! हे सगळं चक्रनेमिक्रमेण होतं. सत्ता इंग्रजाची नाही, न्हेरूची नाही आणि जनतेची नाही. सत्ता आहे विश्वेश्वराची !"
"मग तुमचा विश्वेश्वर इंग्रजाच्या ताब्यात कसा गेला ?"
"खुळे की काय तुम्ही ! विश्वेश्वर घट्ट आहे राजिवड्यावर ! अहो, एक खेळ करून दाखवला त्यानं."
"दीडशे वर्षांच्या गुलामीचा कसला खेळ ?"
"'अहो दीडशे वर्षं तुमची ! ब्रह्नदेवाच्या रिष्टवाचातला काटा सेकंदान् देखील सरकत नाही हजार वर्षं ओलांडल्याशिवाय !"
कोकणातल्या त्या मधल्या आळीतल्या ओसरीवर, भोवती माडाच्या काळ्या आकृती हलताना कंदिलाच्या प्रकाशात ती थकलेली सुकलेली तोंडे हे तत्वज्ञान सांगू लागली की काळीज हादरते. "अहो, समाजवादाच्या गफ्फा आहेत हो गफ्फा ! अहो, एक आंब्याचं पानदेखील नसतं हो दुसऱ्यासारखं. ब्रह्नदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडं निराळं. सगळ्या माणसांची नशिबं सारखी होतील कशी '? घटकाभर धरा, तुमचा आला समाजवाद ! तो आमचा रत्नांग्रीचा गावगांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतो तशी आली कोकण रेल्वे नि गेली पांडू गुरवाच्या परसातून -- म्हणून काय थोट्या पांडबाच्या खांद्याला हाताचे खुंट फुटणार काय ? आणि हात नाहीत म्हणजे मग कसेल त्याची जमीन नि दिसेल त्याची थैली ह्या तुमच्या राज्यात थोटा पांडू कसणार कसा आणि काय ? तो तसाच राहायचा ! स्वराज्य आलं म्हणून हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ झाला नाही नि महादेव गडबोल्याचं धोंद आत नाही गेलं ! हे डावंउजवं राहायचंच समाजात ! अहो, रामराज्यातदेखील मारूतीचं शेपूट उपटून रामानं आपल्या पाठीस नाही जोडलं -- हा नरच राहिला नि तो वानरच राहिला."
अश्या वेळी अंतूशेटच्या जिभेवर लक्ष्मी नाचते.
"बरोबर आहे !"
"उगीच तोंडदेखलं बरोबर आहे म्हणू नका त्या श्यामराव मुरकुट्यासारखं ! चुकत असेल तर कान उपटा ! तुम्ही माझ्याहून लहान खरे, पण शिक्षणान् थोर आहात."
अंतूशेटच्या असल्या भाषणात केवळ तिरका विनोद नसतो. त्यांचे कुठेतरी काहीतरी जळत असते. गेल्या चारपाच वर्षांत रत्नागिरीला फार वेळा जाताच आले नाही. आता तिथे वीज आली, कॉलेज आले, डांबरी रस्ते आले, मी दोनतीन वर्षांपूर्वी गेलो तेव्हा अंतूशेटना म्हणालो,
"अंतूशेट, रत्नागिरी झकपक झाली हो तुमची ! विजेचे दिवे आले. तुमच्या घरी आली की नाही वीज ?"
"छे हो, काळोख आहे तो बरा आहे. ! उद्या झकपक प्रकाश पडला तर बघायचं काय ? दळिद्रच ना ? अहो, पोपडे उडालेल्या भिंती नि गळकी कौलं बघायला वीज हो कशाला? आमचं दळिद्र काळोखात दडलेलं बरं !"
अंतूशेट मनमुराद हसले. या खेपेला दातांचा जवळजवळ संपूर्ण अण्णू गोगट्या झालेला दिसला. शिवाय अड्ड्यातली आणखीही एकदोन मंडळी 'निजधामाला' गेल्याचे कळले. कधी नाही ती एक कारुण्याची नि गोडव्याची झाक अंतूशेटच्या बोलण्यात मला आढळली. अड्ड्यातल्या रिकाम्या जागा त्यांच्या मनात कुठेतरी घर करून जात असाव्या. जोगळेकरांचा मुलगा दिल्लीस बदलला हो वरच्या जागेवर." अंतूशेट आपण होऊन सांगत होते. म्हाताऱ्याला काशीविश्वेश्वर, हरिद्वार-ह्रृषिकेश घडवून आणलंनीत. मावंदं घातलं जोरदार शंभू जोगळेकरान् ! गंगेच्या पाण्याचा लहानसा गडू शिलबंद करून आठवणीन् घेऊन आला माझ्यासाठी ! पुढच्या खेपेला याल तेव्हा त्याचं शिल फोडून गडू आमच्या तोंडात उपडा झालेला दिसेल हो जावयबापू." पहिल्या भेटीतले संबोधन अजून कायम होते. त्यानंतर गेल्याच वर्षी पुन्हा रत्नागिरीला जाण्याचा योग आला. अंतूशेटच्या घरचा गंगाजलाचा गडू सुदैवाने सीलबंदच होता.
"वा वा ! कांग्रेचुलेशन हो जावयबापू ! कळलं आम्हांला. जाऊन या हो. एक रिक्वेष्ट आहे. आता इंग्लिश बोललं पाहिजे तुमच्याशी."
"कसली रिक्वेस्ट ?"
"तेवढा कोहिनूर हिरा पाहून या. माझी आपली उगीचच तेवढी इच्छा राहिली हो ! पिंडाला कावळा नाही शिवला तर कोहिनूर कोहिनूर म्हणा. शिवेल ! परत आल्यावर सांगा कसा दिसतो. लंडन, प्यारिस सगळं बघून या." मला उगीचच त्यांच्या पाया पडावे असे वाटले. मी रस्त्यातच त्यांना वाकून नमस्कार केला. "आयुष्यमान् व्हा ! श्रद्धाळू आहात, म्हणून यश आहे हो तुम्हाला."
मी निरोप घेतला आणि चार पावले टाकली असतील, लगेच हाक ऐकू आली.
"ओ जावयबापू --- !"
"काय अंतूशेट ?"
"जाताय ते एकटेच की सपत्नीक ?"
"आम्ही दोघेही जातोय."
"हे चांगलं केलंत ! उगीचच एक किडा आला डोक्यात. म्हटलं, परदेशी विद्या शिकायला निघाला आहात --- देवयानीची कथी आठवली. काय ? आमच्या मुलीलाही आशिर्वाद सांगा हो ! तुमचं भाग्य तिच्यामुळं आहे. तुम्हांला म्हणून सांगतो. मनात ठेवा हो. कुठे बोलू नका. चाळीस वर्षांपूर्वी आमची ही गेली. दारचा हापूस तेव्हापासून ह्या घटकेपर्यंत मोहरला नाही. शेकड्यांनी आंबा घेतलाय एके काळी त्या आंब्याचा. पण भाग्य कुठल्या वाटेनं जातं बघा. असो. सुखरूप या. इथून प्रयाण केव्हा ?"
"उद्या सकाळच्या एस.टी.नं जाणार !"
"डायरेक्ट मुंबई की काय ?"
"हे चांगलं केलंत ! एकदा तो प्रवास घडला की त्या चिकाटीवर माणसांनी पृथ्वीप्रदक्षिणा करून यावं. परवा वरच्या आळीतला तात्या जोग जाऊन आला --- अजून हाडांचा हिशेब जमवतोय. सातआठ हाडं हरवली म्हणतो त्या यष्टीत." अंतूशेट सगळे तोंड उघडून हसत होते. आता त्या तोंडात एकच दात लुकलुकत होता.
पहाटे पाच वाजता एस.टी. स्टँडवर अंतूशेटची "जावयबापू" ही खणखणीत हाक ऐकू आली. मी चकितच झालो. अंतूशेटनी वैद्याच्या पुडीसारखी एक पुडी माझ्या हाती दिलीय.
"तुमचा विश्वास नाही, ठाऊक आहे मला. पण एवढी पुडी असू द्या तुमच्या खिशात. विश्वेश्वराचा अंगारा आहे. विमानातून जाणार म्हणून कळलं वकीलसाहेबांकडून. एवढी पुडी जड नाही खिशाला."
एस.टी. सुटली आणि अंतूशेटनी आमच्या कुटुंबीयांबरोबर सदरा वर करून आपले म्हातारे मिचमिचे डोळे पुसले. तेवढ्या अंधुक प्रकाशात त्यांचे ते खपाटीला गेलेले पोट चटकन माझ्या डोळ्यावर उगीचच आघात करून गेले. कोकणातल्या फणसासारखीच तिथली माणसेदेखील --- खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्यांच्यात.

प्रकाशन - मौज प्रकाशन गृह.

मुळ स्त्रोत - विकिपीडिया

नारायण
"नारायण, पानाचं तबक कुठे आहे ?"
"नारायण, मंगळसूत्र येणार आहे ना वेळेवर ---"
"नारायण, बॅण्ड्वाले अजून नाही आले ? -- काय हे?"
"नारायण, गुलाबपाण्याची बाटली फुटली ---"
"नारूकाका चड्डीची नाडी बांद ना ऽऽ ---"
"नारूभावजी, ही नथ ठेवून द्या तुमच्याजवळ. रात्री वरातीच्या वेळी घेईन मी मागून ---"

"नाऱ्या लेका, वर चहा नाही आला अजून ---व्य़ाही पेटलाय !"
"नारबा पटकन तीन टांगे सांगा ---"
पन्नास ठिकाणाहून पन्नास तऱ्हेचे हुकूम येतात आणि लग्नाच्या मांडवात हा नारायण हे हल्ले अत्यंत शिताफीने परत करीत उभा राहतॊ.
'नारायण' हा एक सार्वजनिक नमुना आहे. हा नमुना प्रत्येक कुटुंबात असतॊ. कुठल्याही समारंभाला स्वयंसेवकगिरी हा जन्मसिद्ध हक्क असलेला हा प्रत्येकाचा कुठून-ना-कुठून-तरी नातें लागणारा नातलग घरातं कार्य निघाले की कसा वेळेवर टपकतॊ .
---ज्या दिवशी मुलगी पाह्यला म्हणून मंडळी येतात --- मंडळी म्हणजे मुलाचे आईबाप, दूरचे काका (हे काका दूरचे असून नेमके या वेळेला इतक्या जवळचे कसे होतात हे एक न सुटलेले कौटुंबिक कोडें आहे.),


नवरा मुलगा आणि मुलाचा मित्र. ह्या मंडळीत आठनऊ वर्षाची एखादी जादा चुणचुणीत मुलगीहि असते. आणि मग तिच्या हुषारीचं मुलीकडील मंडळी बरंच कौतुकहि करतात. मुलीचा बाप मुलाच्या बापाशी बोलत असतो. नवरा मुलगा गप्पच असतो. नवऱ्यामुलाकरून चा मित्र समोरच्या बिऱ्हाडातून जरासा पडदा बाजूला करून पहाणाऱ्या चेहऱ्यावर नजर ठेऊन असतो. आंतल्या भावी विहिणी आपापल्या घराण्यांची सरळ वळणे एकमेकींवर ठसवत असतात. मुलगा अगर मुलगी सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! -- कारण 'वळण' म्हटल्यावर ते सरळ कसे असणार ?

भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आडवळणी व्याख्या आहे. नवरी मुलगी नम्रतेची पराकाष्ठा करीत बसलेली असते. तिच्या कपाळावरचे धर्मबिंदु टिपण्यांत तिच्या बहिणी वा मैत्रिणी दंग असतात. आणि ती आठनऊ वर्षाची 'कल्पना', 'अर्पिता' किंवा कपर्दिका असल्या चालू फ़ेशनच्या नांवाची मुलगी कपाट उघडून त्यातल्या पुस्तकात डोके खुपसून, 'अगबाई ! वाचायची इतकी का आवड आहे ?' हे कौतुक ऎकत बसलेली असते. ती चहा नको म्हणते -- बिस्कीटाला हात लावत नाही -- लाडू 'मला नाही आवडत' म्हणते; एकूण स्वत:च बरंचसं 'कौतिक' करून घेते. ' कार्टीच्या एक ठेवून द्यावी' असा एक विचार मुलीच्या आईच्या डोक्यात येतो आणि 'भारीच लाडोबा करून ठेवलेला दिसतोय' हा विचार नवऱ्यामुलीलाही शिवून जातो.

एकूण ही सर्व मंडळी निरनिराळ्या विंचारात दंग असतां एका इसमाकडे मात्र त्यावेळी कोणाचेच विषेश लक्श जात नाही. सुरवातीला मुलाच्या बापाने 'हा आमचा नारायण' एवढीच माफक ओळख करून दिलेली असते. आणि 'नारायण' संस्था ह्याहून अधिक योग्यतेची असते असेही नाही. नारायण ही काय वस्तू आहे हे मांडव उभा राहील्याशिवाय कळू शकत नाही.हे सर्व नारायण लोक खाकी सदरा दोन खिशांचा घालतात. खाली मळकट पण काचा मारलेले धोतर नेसतात. मागल्या बाजूने मुलाण्याच्या कोंबड्या ठेवायच्या पेटाऱ्यासारखा ह्यांच्या धोतराचा सायकलच्या सीट मधे अडकून-निसटून बोंगा झालेला असतो. धोतराची कमालमर्यादा गुडघ्याखाली चारपाच बोटें गेलेली असते. डोक्याला ब्राउन टोपी असते. खाकी, ब्राउन वगैरे मळखाऊ रंग 'नारायण-लोकांना' फार आवडतात. वहाण घेताना कशी होती हें सांगणे मुष्किल असते. कारण तीचा अंगठा, वादी, पट्टा, हील, सगळे काही बदलत बदलत कायापालट होत आलेला असतो. परंतु उजव्या पायाचा आंगठा उडलेला असला म्हणजे नारायणला विषेश शोभा येते. आमचा नारायण सहसा कोट घालत नाही. एकदा स्वत:च्या लग्नात, एकदा दुसऱ्यासाठी मुलगी पहायला जाताना आणि एकदा मुन्सिपाल्टीत चिकटवून घेतलेल्या सदूभाऊंना कचेरींत भेटायला गेला त्यावेळी त्याने कोट घातलेला होता. घरोघरचे नारायण, कोट असा सणासुदीलाच घालतात. कोटाच्या कॉलरला मात्र ते न चुकता सेफ्टीपिन लावतात. ही दात कोरायला अगर वेळप्रसंगी कोणाच्या पायात काटा रूतला तर काढायला उपयोगी पडते. खाकी सदऱ्याच्या मात्र दोन्ही खिशात डायऱ्या, रेल्वेचे टाईमटेबल, प्रसंगी छोटेसे पंचांग देखील असते. मुलगी पसंत झाली, हुंडा, करणी, मानपानाचें बसल्या बैठकीला जमले की मुहुर्ताची बोलणी सुरू होतात आणि गाडे पंचांगावर अडते. आणि इथे नारायण पुढे सरसावतो.
"हे पंचांग ---" नारायण कोटाच्या खिशांतून पंचांग काढीत पुढे येतो.वा !! कृतज्ञ चेहऱ्याने वधूपीता नारायणाकडे पहातो.

इथून नारायणाची किंमत लोकांना कळायला लागते. आंतल्या बायकाही प्रसंगावधानी नारायणाचे कौतुक केल्याच्या चेहऱ्याने पाहतात. नारायणाचे कुठेच लक्ष नसते. इथून त्याची चक्रे सुरू होतात. एकदा मुहूर्त ठरला की लग्न लागून वरात निघेपर्यंत नारायणाशिवाय पान हलत नाही ! आता चारी दिशांनी त्याच्यावर जबाबदाऱ्या पडत असतात आणि नारायण त्यांना तोंड देत असतो. प्रत्येक गोष्टीत "नारायणाला घ्या हो बरोबर" असा आग्रह होत असतो."मी सांगतो तुम्हाला, शालू भड्सावळ्यांच्या दुकानाइतके स्वस्त दुसरे कुठे मिळणार नाहीत." सुमारे आठनऊ निरनिराळ्या वयाच्या (आणि आकाराच्या) बायकांसह नारायण खरेदीला निघतो. सातआठ पिशव्या त्याच्याच हातात असतात. एका बाई बरोबर कापड खरेदी करणें म्हणजे मन:शांतीची कसोटी असते; पण नारायण आठ बायकांसमवेत निर्धास्तपणे निरनिराळ्या दुकानांच्या पायऱ्याची चढउतर अत्यंत उत्साहाने करू शकतो. त्यातून त्यांना बस मध्ये आपण क्यूच्या शेवटी राहून चढवणे-उतरवणे ही स्वतंत्र कर्तबगारी असते. पण नारायणाला त्याची पर्वा नाही. आता त्याच्या डोक्याने लग्न घेतले आहे. कचेरींत त्याचें लक्ष नाही. (तिथे क्वचितच लक्ष असतें परंतु ती उणीव हेडक्लार्कच्या घरी चक्का पुरवणें, मटार वाहून नेणे इत्यादी कामांनी भरून निघते.) एखाद्याच्या अंगात खून चढतो तसे नारायणाच्या अंगांत लग्न चढतें."काकू तुम्ही माझ ऎका, महेश्वरी लुगड्यांचा स्टॉक द्रौपदी वस्त्रभांडारात आहे. इथे फक्त तुम्ही खण निवडा." मालकाच्या तोंडासमोर ही वाक्ये बोलायचे त्याला धैर्य आहे. बोहोरी आळीपासून लोणार आळीपर्यंत पुण्यात कोठे काय मिळते याची नारायण ही खाकी शर्ट, धोतर, ब्राउन टोपी घातलेली चालती बोलती जंत्री आहे."बरं बाबा ---" काकू शरणचिठ्ठी देतात."
मामी ----- काकूंना खण पाहू दे, तोंपर्यंत नरहरशेटच्या दुकानात जाऊन मंगळसूत्राचे नमुने बघून येऊ---""हो आंगठीच ही माप आणलय जावईबुवांच्या ---"
"आंगठी नरहरशेटकडे नको, रामलाल लखनमलकडे आंगठी टाकूं. मी काल बोललोय त्याला. आज माप टाकलं की पुढल्या सोमवारी आंगठी --- सोनं पुढल्या तीन दिवसांत वाढतंय (ते ही त्याला ठाऊक आहे.) आज सोन्याची खरेदी होऊं द्या --- चला." निमूटपणे मामी आणि भाचीच्या लग्नासाठी आलेल्या बेळगावच्या मावशी नारायणामागून निघतात. गल्ली-बोळातून वाट काढीत त्यांना नरहरशेटजींच्या दुकानी नारायण नेतो."आंगठीचंही इथंच .... म्हणत होते" ----- अशी कुजबुज करण्याचा मामी प्रयत्न करतात. पण नारायण ऎकायला तयार नाही."मी सांगतो ऎका --- हं नरहरशेट, मंगळसूत्र केव्हा न्यायला येऊ ---""चारपाच दिवसात या --""हें असं अर्धवट नको -- नक्की तारीख सांगा -- मला सतरा हेलपाटे मारायला सवड नाही ---" नारायण सोनारदादांना सणसणीत दम भरतो. एरवी त्याला कुत्र्याला देखील 'हाड' म्हणायची ताकद नसते. पण इथे अपील नाही. आता लग्न उभे राहिले आहे. आणि ते यथास्थित पार पाडणे हें त्याचे कर्तव्य आहे -- त्याच्यावर जबाबदारी आहे. गेल्या चार दिवसात त्याला दाढीला सवड नाही त्याला --- चार तांबे अंगावर टाकून सटकतो तो हल्ली. मंगळसूत्राची ऑर्डर दिल्यानंतर मोर्चा परत कापडदुकानी येतो. तिथे अजून मनासारखे खण सापडलेले नाहीत --- नारायण डगमगत नाही."
काकू -- मी सांगतो --- हं हे घ्या पंचवीस -- ह्यांतले निवडा आठ -- हे चार जरीचे -- हा मुलीच्या सासूला होईल ---"
"पण गर्भरेशमी असता तर --"
"काय करायचाय म्हातारीला गर्भरेशमी ?--"
सर्व बायका शत्रुपक्षाच्या पुढारी बाईची चेष्टा ऎकून मनसोक्त हसतात.
"झालं --- हे साधे घेऊन ठेवा -- एक बारा --"
"बारा काय करायचे आहेत ?" काकू शंका काढतात."लागतात -- लग्न आहे सोमवारी.
त्या दिवशी बाजार बंद --- आयत्या वेळी खण काय, सुतळी मिळायची नाही वीतभर --
" नारायणाच्या दूरदर्शी धोरणाचें कौतुक होतें."हे बरीक खरं हो ! ---" कापडाचोपडाच्या खरेदीला आलेल्या घोळक्यांतली एक आत्या उद्गारते. "आमच्या वारूच्या लग्नात आठवतं ना रे नारू, विहीणबाई आयत्या वेळी अडून बसल्या नवऱ्या मुलाला हातरूमाल हवेत म्हणून -- सगळा बाजार बंद, मग नारायणानंच आणले बाई कुठूनसे," नारायण फुलतो."
क्यांपापर्यंत सायकल हाणत गेलो आणि डझनाचं बाक्स आणून आदळलं मी वारूच्या नवऱ्यापुढे --- पूस म्हटलं लेका किती नाक पुसतोस ह्या हातरूमालांनी तें ! हां ! तसा डरत नाही -- पण मी म्हणतो, आधीपासून तयारी हवी --- काय गुजामावशी ? "
"गुजामावशी आपलंही मत्त आगदी नारायणासारखंच आहे असं सांगतात आणि बारा खणांची आयत्या वेंळी असूं द्या म्हणून खरेदी होते ---"खरंच बाई पंचे घ्यायला हवे होते---"
"पंचांचं मी बघतो---तुम्ही ही बायकांची खरेदी पाहा----हां ! खण झाले, शालू झाले, आता अहेराची लुगडी---चला पळसुले आणि मंडळीत---"
"पळसुल्याकडे का जायचं ? मी म्हणत होतें जातांजातां सरमळकरांच्या दुकानी जाऊं----सरलच्या लग्नांत तिथनंच घेतलीं होतीं लुगडीं---"
"त्यावेळीं थोरले सरमळकर जीवंत होते मामी----चार वर्षांपूर्वी वारले ते---चिरंजीवांनी धंद्याचा चुथडा केला---आता आहे काय त्यांच्या दुकानात ? पोलक्याचीं छिटंदेखील नाहीत धड--"एकूण नारायणाला फक्त दुकानांची माहिती आहे असं नाही. त्याला दुकानदारांची आर्थिक-कौटुंबिक परिस्थितीहि ठाऊक असते."बरं अत्तरदाणी----आणि चांदीचं ताट अन वाटी---"मामींना ह्यापुढले वाक्य पुरेंहि न करू देतां नारायण ऒरडतो,"चांदीचा माल शेवटीं पाहूं---आधी कापडाचोपडाचं बघा. नमस्कार---"नमस्कार 'पळसुले आणि मंडळी, कापडाचे व्यापारी, आमचे दुकानी इंदुरी, महेश्वरी इ. इ.' यांना उद्देशून केलेला असतो."नमस्कार, या नारायणराव----"

"हं काकू, मामी, पटापट पाहून घ्या लुगडीं---"
" नारायण कंपनी कमांडरच्या थाटांत हुकूम सोडतो."अरे ह्यांना लुगडी दाखवा--"
"आमच्या मामेबहिणीचं लग्न आहे !"
"हो का ?" पळसुले आणि मंडळी अगत्य दाखवतात. "तुमचे मामा म्हणजे .."
"भाऊसाहेब पेंडसे----रिटायर्ड सबडिविजनल ऑफिसर---"
"बरं बरं बरं ! त्यांच्या का मुलीचं लग्न ?---" वास्तविक पळसुले आणि मंडळींच्या लक्षात कोण भाऊसाहेब काय भाऊसाहेब कांहीही आलेलें नाही, पण
"अरे माधव, त्यांना तो परवा नवा नागपुरी स्टॉक आलायं तो दाखव, " असे सांगून पळसुले आणि मंडळी अगत्य दाखवतात. बायका 'ह्या नारायणाची जाईल तिथे ओळख' ह्या कौतुकित चेहेऱ्यानीं नारायणाकडे पाहतात. नारायण पळसुले आणि मंडळींकडून तपकिरीची डबी घेऊन चिमूटभर तपकीर कोंबून आपली सलगी सिद्ध करतो."हं शालूबिलूची झाली का खरेदी ?"
"होतेय" ----नारायण पलीकडल्या दुकानात शालू खरेदी केल्याची दाद लागून देत नाही.तात्पर्य खरेदी संपते आणि निमंत्रणपत्रिकांचा विचार सुरू होतो. हिंदी, मराठी आणि इंग्रजी अथवा तीनही भाषांमधून पत्रिका काढायचे ठरतं असते.

"इंग्रजी कशाला ?" नारायणाचा देशाभिमान जागृत होतो. शिवाय इंग्रजापेक्षा इंग्रजीवर त्याचा राग विशेष आहे. ह्या इंग्रजीच्या पेपरानेच मॅट्रिकच्या परीक्षेंत त्याला सारखे धक्के दिले होते ! वधूवरांचे फोटो द्यायचे की नाही---खाली 'आपले नम्र' ह्यांत कोणाकोणाची नावे घालायची--- छापखाना कुठला, टाईप कुठला, शाई कुठली, सारें सारें काही नारायण ठरवतो आणि बाकीचे निमूट्पणे ऎकतात."उद्या संध्याकाळी प्रुफें येतील ! नीट तपासा नाहीतर त्या अण्णूच्या लग्नांत झाली तशी भानगड नको व्हायला---"
"कसली भानगड ?" स्त्रीवर्गाकडून पृच्छा होते. धोतराने टोपींतल्या पट्टीवरचा घाम पुसत नारायण प्रत्येक लग्नांत सांगितलेली विनोदी गोष्ट पुन्हा सांगतो."अहो काय सांगू काकू---" ( ह्या काकू म्हणजे कापडखरेदीला गेलेल्या काकू नव्हेत----त्या येवल्याच्या काकू---- ह्या अंतूच्या काकू !) काकू कौतुकाने कानावरचा पदर कानामागे टाकून ऎंकू लागतात. "अहो अण्णू आपला----"" म्हणजे भीमीचा भाचा ना----ठाऊक आहे कीं---धांद्रटच आहे मेलं तें एक---" काकू कारण नसताना अण्णूला धांद्रट ठरवतात."तेच ते ! अहो त्याचं तिगस्त सालीं लग्न झालं---"
"अरे जानोरीकरांची मेहुणी दिलीय त्याला---" कुणीतरी एखाद्या प्रभाताई उद्गारतात."हें तूं सांगतेस मला ? ----- मी स्वत: ठरवलं लग्न ! मुलगी काळी आहे म्हणून नको म्हणत होता अण्णू कानाला धरला आणि उभा केला बोहल्यावर ! --- तर मजा काय सांगत होतो---त्याच्या लग्नाच्या निमंत्रणपत्रिका त्यांनी छापून घेतल्या गोणेश्वर प्रेसमध्ये--- मी म्हणत होतों आमच्या हरिभाऊंच्या ज्ञानमार्ग मुद्रणालयांत घ्या--- पण नाही ऎकलं माझं--- मी म्हटलं मरा---"
"अय्या !" 'अय्या'च्या वयाची कोणी तरी मुलगी 'मरा' ह्या शब्दानं दचकून ओरडली."अय्या काय ?----भितो काय मी ?" नारायणाला अवसान येते. मी त्याला वार्न केलं होतं की, गोणेश्वर छापखाना म्हणजे नाटकसिनेमाचीं तिकिटं आणि तमाशाची हँडबिल छापणारा----तो निमंत्रणपत्रिका छापणार काय डोंबल? पण नाही---आणि तुला सांगलो काकू, पत्रिका छापून आल्या नि जोड्यानं मारल्यासारखी बसली मंडळी---""म्हणजे ?""सांगतो ! " नीरगाठं-उकलीच्या तंत्राने नारायण कथा सांगतो."---पत्रिका आल्या बरं का----पोष्टांत पडल्या----मी आपली सहज पत्रिका उघडून पहातों तर पत्रिकेच्या खाली 'वडील मंडळींच्या निमंत्रणास मान देऊन अवश्य येणेचे करावें' असं असतं की नाही ? तिथं 'तिकीटविक्री चालू आहे' ही ओळ छापलेली---"सर्व बायका मनमुराद हसतात----"जळ्ळं मेल्याचं लक्षण ! अरे लग्न म्हणजे काय शिनिमा वाटला की काय तुझ्या गोणेश्वराला---"
"सारांश काय ? पत्रिका उद्या येतील त्या नीट तपासा----नाहीतर एक म्हणतां एक व्हायचं चला मी निघतो."
"तू कुठे निघालास उन्हाचा-----चहा घेऊन जा थोडा---"
"इथे चहा पीत बसलों तर तिथे आचा-यांची आर्डर कोण देईल ? नाना तेरेदेसायाला भेटतों जाऊन."
"नाना तेरेदेसाई कोण ?"
"अग तो चोळखण आळींतला----स्वयंपाकी पुरवायचं कंत्राट घेतो तो---"
"पण मी म्हणत होते नारायणा----की आपलं एकदम चारशें पानांचं कंत्राट द्यावं---" एक उपसूचना."छे छे ! महागांत लागेल. तेरेदेसाई हा बेस्ट माणूस आहे--- चार आचारी पाठवील---वाढायचं आपण बघूं...." लगेच टोपी चढवून नारायण चोळखण आळीच्या दिशेला सायकल हाणू लागतो---आणि खुद्द लग्नाच्या दिवशीं नारायण म्हणजे डोकं गमावलेल्या मुरारबाजीसारखा मांडवात थैमान घालत असतो. आज त्याच्यावर चौफेर हल्ले होत असतात----आणि एका हातांत केळीच्या पानांचा बिंडा, बगलेत केरसुणी (बोहलं झाडायला), खिंशातून उदबत्यांचा पुडा डोकावतो आहे, एका हातात कुणाचं तरी कारटं धरलं आहे आणि तोंडानं क्रिकेट कॉमेंटरीच्या वेळीं रेडिओ जसा अविश्रांत ओरडत असतो तसा त्याच्या जिभेचा पट्टा चालू आहे."हं भटजी, ही केरसुणी---पांड्या, बोहलं स्वच्छ झाडून घे---कोण? मंगल कार्यालयाचे मॅनेजर ? मला कशाला बोलावताहेत ?


त्यांना म्हणावं इकडे या.... वसंतराव, पॅण्ट सोडून धोतर नेसा बघूं झटपट---देवक बसायला पाहिजे एव्हाना...काकू, बॅण्ड संध्याकाळी---आता सनई चौघडा--- बरोबर सात वाजतां हजर आहेतं इथं सनईवाले ! तुम्ही चिंता नका करूं--- बायकांचा फराळ आटोपला की नाही?... किल्ली ? काय हवं आहे ? ताम्हन मी देतो---किल्ली नाही मिळायची...हं---- या तेरेदेसाई---मथूमावशी, ते आचारी आले---तुम्ही चला सरळ---काय ?---टांग्याचं भाडं ?--देतों मी, तुम्ही जा.. चोळखण आळींतून इथपर्यंत रूपाया तीर्थरूपांना मिळाला होता तुमच्या---आठ आण्यावर दमडी नाही मिळाणार...हं---हे घ्या दहा आणे---चला...तुम्ही कुठे निघालां ग--- सरल, आता नाही जायचं कुठे---हं---

"प्रत्येकजण नारायणाचा सल्ला घेतं असतं---काम सांगत असतं---त्याची चेष्टाही करीत असतं---एवढं सगळं करून प्रत्यक्ष 'लग्न' ह्या घटनेंत त्याला कांहीच 'इंटरेस्ट' नसतो. कारण इकडे मंगलाक्षता वधूवराच्या डोक्यावर पडत असतांना एखाद्या कुर्यात सदा मंगलमला चार मंगलाक्षता उडवून तो एकदम जो निसटतो---तो आंत पानं मांडायला. उदबत्यांचा पुडा त्यालाच कुठे ठेवला आहे तें ठाऊक असतं---रांगोळी ओढायची दांडी त्याने नेमक्या वेळीं सापडावी म्हणून विलक्षण ठिकाणी ठेवलेली असते. त्याला सर्वत्र संचाराला मोकळीक असते. बायकामंडळीत बेधडकपणे घुसून मामींच्या ट्रंकेच्या वरच्या कप्प्यांत ठेवलेल्या कापराच्या पुड्या काढायचे लैसन नारायणखेरीज अन्यांस नसतं. तेवढ्यांत एखाद्या थोरल्या आजीबाई----"नारायणा----अरे राबतोयस बाबा सारखा---कोपभर चहा तरी घे---थांब---

" नारायणाला थांबायला सवड नसते. परंतु तेवढ्यांत शंभराच्या नोटेचे रूपये करून आणलेले असतात ते मोजायला त्याला एक पांच मिनीटं लागतात आणि काकू गळ्यांतली किल्ली काढून फडताळ उघडून 'हे एक चार लाडू आणि बशीभर चिवडा' त्याच्यापुढे ठेवतात.....आणि मग ती थोरली आजी आणि तिचा हा उपेक्षित नातू यांचा एकूण मुलाकडील मंडळी या विषयावर आंतल्या आवाजांत संवाद होतो. आजीला नारायणा बद्दल पहिल्यापासून जिव्हाळा. आईवेगळें पोर म्हणून तिने ह्याला पाहिलेला. लग्नाच्या गर्दीत बाहेर राहून नारायण मांडवाची आघाडी सांभाळीत असतो. आणि आजीबाईच्या ताब्यांत कोठीची खोली असते. गळ्यांतल्या चांदीच्या गोफांत कानकोरणें, किल्ल्यांचा जुडगा आणि यमनीची आंगठी अडकवून आजीबाई फराळाचं---आणि मुख्यत: साखर सांभाळीत असतात. साखर उपसून देण्याचें काम त्यांचे ! तेवढ्यांत पेंगुळलेली दोनचार पोरेंहि त्यांच्यापुढे गोधड्यांवर आणून टाकून त्यांच्या आया बाहेर मिरवायला गेलेल्या असतात. फक्त लग्न लागल्यावर पहिल्या नमस्काराला वधूवर आजींच्या पुढे येतात त्यावेळीं---'आजी कुठाय---आजी कुठाय----' असे हाके सुरू होतात."औक्षवंत व्हा" असा आशीर्वाद देऊन आजी गळ्यांतून खर्र असा आवाज काढून नातीच्या पाठीवरून हात फिरवतांना एक आवंढा गिळतात. नारायण चिवड्याचा बकाणा मारतो."नव-यामुलाकडील मंडळी समंजस आहेत हो चांगली---" आजी विषयाचा प्रस्ताव मांडतात. वास्तविक समंजस आहेत की नाहीत असा हा प्रस्ताव असतो."डोंबलाची समंजस !" नारायणाचा शेरा पडतो. "अग साधी गोष्ट---मी त्या मुलाच्या काकाला म्हटलं की तुमच्याकडलीं एकदा माणसं मोजा---म्हणजे पानावर बसवतांना चटचट बसवतां येतील. तर मला म्हणाला, मी मोजणी-कारकून म्हणून नाही आलों इथे---हें काय बोलणं झालं? आम्हीही बोलूं शकलों असतों---वधूपक्ष पडला ना आमचा---". नव्या को-या धोतराला हात पुसून नारायण तिथून उठतो आणि गर्दींत पुन्हा दिसेनासा होतो.

आजींना एकूण नव-यामुलाकडील्या मंडळींना रीत नाही एवढें कळतें.पंक्तींत वाढायचे काम वास्तविक नारायणाचें नव्हे. पण पाणी वेळेवर वाढायचे नाही हा एक लग्नांतल्या वाढप्यांचा शिरस्ताच आहे. बर्फ आणायला पाठवलेली मंडळी कधीही वेळेवर येत नसतात. पंगत उठत आली की बर्फ येतो. मग नारायण भडकतो आणि पाणी वाढण्याचें काम स्वत: करतो. ग्लासें, कप, द्रोण, फुलपात्रे, वाट्या जें काय हाताला लागेल तें प्रत्येकाच्या पानापुढे आदळीत---थोडें पाणी कपांत तर थोडें पानांत अशा थाटांत दणादण पाणी वाढत जातो. मधूनच श्लोकांचा आग्रह सुरू होतो. मंडळी आढेवेढे घेतात. नारायणहि 'अरे म्हणा श्लोक---हं चंदू म्हण...' असं कोणाच्या तरी अंगावर खेकसतो. [चंदू इंग्रजी नववींत गेल्यामुळे श्लोक वगैर बावळटपणा त्याला आवडत नाही. त्यांतून वधूपक्षाकडील एक फ्रॉकवाली मुलगी दोनदा-तीनदा त्याच्याशी बोललेली असते. ती आठवीत आहे---'जॉग्रफीचा स्टडी' कसा करावा हें चंदूने तिला सांगितलेलें आहे. चंदू जरासा घोटाळ्यातंच वावरत असतो. नारायणाच्या हुकुमाने तो उगीच गांगरतो आणि त्या फ्रॉकवाल्या मुलीच्या दिशेने पाहातो---ती त्याच्याकडे पाहून हसत असते.] बराच वेळ कोणीच श्लोक म्हणत नाही हें पाहून नारायण दणदणीत आवाजांत----'शुकासारिखें पूर्ण वैराग्य ज्याचें...' हा श्लोक एका हातांत पाण्याची झारी आणि दुस-या हातांत खास आग्रहाचे जिलब्यांचे ताट घेऊन ठणकावतो. श्लोकांची माळ सुरू होते---नारायण भक्कम भक्कम मंडळी पाहून जिलब्या वाढतो---पंगती उठतात----धर्माघरी भगवंतांनी खरकटीं काढलीं तसा नारायण पत्रावळी उचलायला लागतो---नोकरचाकर त्याच्या जोडीला कामाला लागतात---तेवढ्यांत नारायण पुन्हा सटकतो---आता तो वरातीच्या नादांत आहे. फुलांनी मढवलेली मोटार स्वत: जाऊन तो घेऊन येतो---बॅण्डवाल्यांना चांगली गाणीं वाजवण्याची धमकीहि देतो. रात्रीं अकराबाराच्या सुमाराला वरात निघते. नवरी मुलगी (नारायणाचीच मामेबहीण) नारायणाला वाकून नमस्कार करते---इथे मात्र गेले कित्येक दिवस इकडेधाव तिकडेधाव करणा-या हनुमंतासारखा भीमरूपी महारूद्र झालेल्या नारायणाचे ह्रदय भरून येते ! वधूवेषांत नटलेली सुमी !---- एवढीशी होती कारटी---माझ्या अंगाखांद्यावर खेळली वाढली----माझ्या हाताने नेऊन बालक मंदिरांत बसवली होती हिला---आता चालली नव-याच्या घरीं ! वरून अवसान आणून नारायण म्हणतो, "सुमे---मजेंत रहा बरं---वसंतराव अशी मुलगी मिळाली नसती तुम्हांला---हां---आय ऍम द नोईंन हर चाईल्डहूड...." भावना आवरायला नारायणाला इंग्रजीचा आधार घ्यावा लागतो. सदैव नाकाच्या मध्यभागीं उतरलेला चष्माच साधा वर करण्याचें निमित्त करून नारायण डोळे पुसतो---- भाऊसाहेबहि विरघळतात-- वरात जाते----नारायण मांडवांतल्या एका कोचावर अंगाची मुटकुळी करून गाढ झोपतो--वरातींतली मंडळी एक दीडला परततात---कोचावर मुटकुळी करून झोपलेल्या नारायणाकडे कोणाचेंहि लक्ष जात नाही-- फक्त नारायणाची बायको आंत जाते---पिशवींतून दहा ठिगळं जोडलेलं पांघरूण काढते आणि हळूच कोचावर झोपलेल्या नारायणाच्या अंगावर टाकून पुन्हा आतल्या बायकांत येऊन मिसळते--समोरच एका बाजूला गोधडीवर नारायणाचें किरटें पोर झोपलेलें असतें----त्याच्या बाळ मुठींत सकाळी दिलेला बुंदीचा लाडू काळाकभिन्न झालेला असतो---मांडवात आता फक्त एका कोचावर नारायण आणि लांब दुस-या टोकाला मांडववाल्याचा नोकर घोरत असतात. बाकी सर्वत्र सामसूम असतें.

प्रकाशन - मौज प्रकाशन गृह.

मुळ स्त्रोत - विकिपीडिया

"सर, हे पेढे--" सखाराम गटण्याने माझ्या हातात एक पुडी ठेवली.

"कसले रे?"

"प्राज्ञ परीक्षेत पास झालो."


"छान!" प्राज्ञ परीक्षेची पातळी झटकन माझ्या लक्षात आली. "किती पर्सेंट मार्क मिळाले?"

"अजून गुणांची टक्केवारी कळली नाही. कळल्यावर सांगेन. पण निदान पासष्ट प्रतीशत तरी मिळावेत."

सखाराम गटणे प्राज्ञ मराठी बोलतो. पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यात भिजलेले एखादे दिनवाणे कुत्रे उचलून आपण घरी आणावे, तसाच या गटण्याचा आणि माझा योग आला. ज्यांच्याकडे पाहिले म्हणजे अतीव करूणा खेरीज दुसरी कोणतीही
भावना जाग्रूत होत नाही अशा कारूण्यभजनांपैकी तो एक आहे. बाकी माणसे तरी चेह-यावर काय काय भाव घेऊन जन्माला येतात! कूणी सदैव अनाथालयाची वर्गणी मागायला आल्यसारखा, कुणी नुकतीच बस चुकल्यासारखा , कुणी सदैव आश्र्चर्यचकित, कुणी उगीचच अंतराळात, तर कुणी निष्कारण कपाळावर आठ्यांचे उभे गंध लावून.सखाराम गटणेच्या चेह~यावर हवा गेलेल्या फुटबॉलचा भाव आहे. त्याचे प्रथम दर्शन झाले तेदेखील त्याच भावात. वास्तवीक हा मुलगा माझा कोणीही नव्हे. माझ्या एका व्याख्यानानंतर ह्याची आणि माझी ओळख झाली. हा त्या वेळी मॅट्रीकच्या वर्गात होता. अर्ध्या विजारीत पांढरा सद्रा खोचलेला, त्याला नाकासमोर गांधीटोपी घातलेला, लहानसेसे भावशुन्य डोळे, काळा रंग, वेडेवाकडे दात- अशा थाटात हा मुलगा त्या हॉलच्या दारात उभा राहिला होता. मी हारतुरे घेऊन बाहेर आलो आणि त्याच्यावर नजर गेली. त्याने अत्यंत आदराने मला नमस्कार केला.


"स्वाक्षरी---" आपली वही पुढे करीत तो म्हणाला.

"छे छे, मी स्वाक्षरीबिक्षरी देत नाही." मी उगीचच टाफरलो.

"जशी आपली इच्छा--"

त्याने दोन्ही हात जोडुन मला नम्स्कार केला. अगदी देवाला नमस्कारकरावा तसा. दुस-या एखाद्याने मला तसला नमस्कार केला असता तर मी चिडलोच असतो. पण सखाराम गटण्याचा नमस्कार इतका प्रामाणिक होता की, तो नमस्कार मला कुठेतरी जाऊन लागला. स्वाक्षरी नाकारण्याचा माझा हा काही पहीला प्रसंग नव्हता.वास्तविक मी स्वाक्षरी नेहमीच नाकारतो असे नाही. पण कधीकधी छ्योट्याछ्योट्या पोरांपुढे उगीचच शिष्टपणा करायची हुक्की येते. स्वाक्षरी देण्यात अर्थ नाही हे खरे; पण न देण्यातही काही खास अर्थ आहे असे नाही. सखारामगटणे कोप-यात उभा होता. तेवढ्यात संस्थेचे चिटणीस एक मोठे रजिस्टर घेऊन माझ्यापुढे आले.

"संस्थेला भेट देण्या-या सर्व थोरामोठ्यांच्या हात आम्ही सह्या घेतो. पुण्यातल्या पुण्यात असून आपल्या भेटीचा स्योग असा आजच येतोय."

मी ते रजिस्टर चाळू लागलो. त-हेत-हेच्या लोकांनी संस्था पाहून संतोष व्यक्त केला होता. मीदेखील असंतोष व्यक्त करावा असे काहीच घडते नव्हते, त्यामुळे दोनचार ओळीत संतोष व्यक्त केला. त्यानतंर आर्य्कारी मंडळाच्या सभासदांबरोबर
चहापान (ग्लूको बिस्कीट, चिवडा आणि केळी!!) झाले. सभासंदाचा माफक विनोदही सहन करीत होतो. पण खिडकीबाहेर आपली वही घेऊन उभा असलेला सखाराम गटणे मला उगीचच अस्वस्थ करायला लागला होता. अगदी अनिमिष उभा असलेला तो चार-साडेचार फूट उंचीचा जीव--एखादी केरसूणी ठेवावी तसा राहीला होता. त्या मुलाकडे आता पाह्यचे नाही असे दहाबारा वेळा ठरवले. पण हट्टी असह्य झाले आणी मी चिटणीसांना त्याला बोलावून घ्यायला सांगितले.

"कुणाला? सख्याला?" चिटणीस आश्चर्याने म्हणाले.

"मला त्याचं नाव ठाऊक नाही. प्ण तो तिथे उभा आहे तो--"

"सख्याच तो. अरे ए गटण्या--"इतक्या लाबूंनदेखील सखाराम गटण्याचे दचकणे मला दिसू शकले, इतक्या जोरात तो दचकला. एखाद्या अपराध्यासारखा तो माझ्यासमोर उभा राहीला.

"काय नाव तुझं बाळ?" मी आवाजात जमेल तितका मऊपणा आणित विचारले.

"सखाराम आप्पाजी गटणे."

"अक्षर झकास आहे बंर का ह्याचं! आमच्या व्याख्यानमालेच्या जाहिराती, बोर्डहाच लिहीतो. वडलांचं साइनबोर्डपेंटरचं दुकानच आहे, आप्पा बळवतं चोकात.""अरे, तुझं अक्षर इतकं झकास आहे मग स्वाक्ष-या कशाला गोळा करतोस?" ह्यात इतकं खास मोट्याने हसण्यासारखे नव्हते, पण मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद हसले. "कोणाकोणाच्या सह्या गोळा केल्या आहेस बघूं---"

"मी फक्त साहित्यिकांच्याच स्वाक्ष-या घेतो." स्वाक्ष-यांचे पुस्तक माझ्या हातीदेत सखाराम गटणे म्हणाला.

मी त्याचे स्वाक्ष-यांचे पुस्तक चाळू लागलो. प्र्त्येक साहित्यिकाच्या लिखाणातून एक-एक वाक्य निवडून काढून गटण्याने त्याखाली त्या त्या साहित्यिकाची सही घेतली होती. मी शेवटले माझे पान उघडले. तिथल्या वाक्याखाली सही नव्हती.

"हे वाक्य कोणाचं आहे?"

"आपल्याच एका नाटकातलं!" सखाराम गटणे अत्यादरपूर्वक म्हणाला. संदर्भ सोडून काढलेले ते माझे वाक्य वाचताना माझी मलाच दया आली.

"हे वाक्य का निवडलंस तू बाळ?"

"हे वाक्य मला आपलं जिवनविषयक सूत्र वाटतं."

"बापरे!" मी मनात म्हणालो. त्या चार-साडेचार फुटी उंचीच्या दिनदुबळ्यादेहातून जीवनविषयक सूत्र वैगेरे श्ब्दांची अपेक्षा नव्हती. मी सखारामच्या चेह-याकडे पाहत राहिलो. कार्यकारी मंडळाच्या एका म्हाता-याशा सभासदावर गटण्याच्या
'जीवनविषयक सूत्र' ह्या शब्दामुळे काहीतरी परिणाम झाला असावा. त्यांनी गटण्याला खुर्चीवर बसायला सांगितले.

"कशावरून? तू माझी पुस्तकं वाचली आहेस का?"

"आपली छापून आलेली ओळ न ओळ मी वाचली आहे. आपण आणि सानेगुरूजी हे माझे आदर्श लेखक आहात."

"अरेम पण गेल्या खेपेला ते कोण आले होते त्यांना तू ते आणि सानेगुरूजी म्हणालास--"

सेक्रेटरी ह्या मनुष्यविशेषाला पोच असता कामा नये असा अलिखित दंडक असावा. वास्तविक गटण्याने दुस-या एखाद्या लेखकालाही सानेगुरूजींच्या जोडीने बसवले असेल, किंबहुना आणखी एकदोन आडवड्यांत एखादा तिसरा साहित्यिक आला की तो आणि सानेगुरूजी अशीही जोडी होईल. ह्याचे मुख्य कारण गटणे अजून सानेगुरुजींच्या इयत्तेतून बाहेर पडला नव्हता; पण खिडकी बाहेरची इतर दुश्येही आता त्याला आवडायला लागली होती.

सेक्रेटरीच्या बोलण्याने सखाराम हिरमुसला. मी विषय बदलण्याच्या द्रूष्टीने म्हणालो,

"काय शिकतोस?"

"यदां एसेस्सीला बसणार आहे."

"अस्सं!" मी त्याची ती अनेक साहीत्यिकांच्या जिवनविषयक सुत्रांच्या गुडांळ्यांनी भरलेली वही पाहत म्हणालो. स्वाक्षरीसाठी भित भित पुढे येणारा सखाराम गटणे हा काही पहीला नमूना नव्हता. अमुक अमुक इसम हा स्वाक्षरी घेण्यालायक आहे असा गैरसमज एखाद्या अफवेसारखा पसरतो. पण स्वाक्ष-या जमवण्या-या पुष्कळ पोरांच्या आणि पोरींच्या चेह-यावर बहुधा एक खट्याळ भाव असतो. वही पुढे सरकवताना चेह-याव्र असतो तो आदरांच्या बिलंदर अभिनय! सराईत स्वाक्षरी करणारांना तो ओळखू येतो. सखाराम गटण्याच्या चेह-यावरची रेषा न रेषा कमालीची करी होती. त्याचे ते लहानसहान डोळे काही खोटा, दडवलेला, लुच्चा व्यक्त करायला केवळ असमर्थ होते.

"आपण स्वाक्षरी दिलीत तर मी आजन्म अपकृत होईन."

सखाराम गटण्याच्या तोडूंन हे वाक्य ऎकताना त्याच्या तोंडात दातांऎवजी छाप-खान्याचे खिळे बसवले आहेत असे मला वाटते. हा मुलगा विलक्षण छापील बोलतो, पण भाषेचा तो छापीलपणा कमालीचा खरा वाटतो. मी त्याची वही उघडून माझ्या
जीवनविषयक सूत्राखाली निमूटपणे सही केली. त्यानंतरचा सखाराम गटण्याच्या नमस्काराने माझ्या पोटात अक्षरशः कालवल्यासारखे झाले. साडेसातीने पछाडलेली माणसे शनीचा काटा काढणा-या मारूतीलादेखील इतका करूण आणि भाविक नमस्कार करीत नसतील. माझ्या आयूष्यात मी इतका कधीही ओशाळलो नव्हतो.

'सखाराम गटणे' हा प्रकार त्या दिवशी माझ्या आयूष्याच्या खातेवहीत नोंदला गेला. ह्या घटनेला आता खूप वर्षे झाली. सखाराम गटणे त्यानंतर माझ्या घरी येऊ लागला. प्रथम आला तो दस-याच्या दिवशी सोने वाटायला. माझे काही मित्र घरी
आले होते. त्यांतला एकानेही मी लिहीलेली एकही ओळ वाचलेली नाही आणि यापुढेही ते वाचणार नाहीत. त्यामुळे मैत्री अबाधीत आहे. रमी, फालतू गप्पा, जागरणे करण्याची अमर्याद ताकद, असल्या भक्कम पायावर ती उभी आहे. साहित्यीक
मंडळीत एकूण माझा राबता कमीच! त्यामुळे एकटादुकटा अस्लो तर ह्या साहित्यविषयक गोष्टी मी सहन करू श्कतो. पण माझ्या ह्या खास मित्रांच्या अड्ड्यात मला माझा वाचकच काय, पण प्रकाशदेखील नको वाटतो.

सखाराम गटणे आत आला आणि त्याने अत्यंत आदराने माझ्या पायाला हात लावून नमस्कार करून मला दस-याचे सोने दिले.माझे वाह्यात मित्र हे द्रुश्य पाहत होते.

"आपण मला कदाचित ओळखलं नसेल--"

"वा वा ! ओळखलं की! मागे एकदा व्याख्यानाला होता तुम्ही --"

"हे सुर्यानं काजव्याचं स्मरण ठेवण्यासारखं आहे!" गटण्याने सरवाप्रमाणे एक लेखी वाक्य टाकले.आता ह्या मुलाला काय करावे ते कळेना. बरे, मुद्दाम सोने द्यायला घरी आलेला. त्याला कपभर चहा तरी द्यायला हवा होता. गटण्याच्या चेह-यावरच्या भक्तिभावाने मी हैराण झालो होतो.

"मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे होते."

"आपण पुन्हा केव्हा तरी भेटु या. चालेल का?"

"केव्हा येऊ? आपल्या प्रतिभासाधनेच्या वेळा सोडुन कोणत्याही वेळा सांगा!"

मला त्याला ओरडून सांगावेसे वाटले, "मुला---अरे माणसासारखा बोल की रे. तुझ्या जिभेला हे छापील वळण कुठल्या गाढवानं लावलं? प्रतीभासाधनाची कसली डोंबलाची वेळ?... "पण ह्यातले काहीही मी म्हटले नाही. गटण्याच्या डोळ्यांत छप्पन्न संशाची व्याकुळता साठली होती. बोलताना त्याचे डोळे असे काही होत, त्याच्या कपाळावरच्या आणि गळ्याच्या शिरा अशा काही विचित्रपणे ताणल्या जात, की असल्या आविर्भावात त्या मुलाने एखाद्या शिव्या दिल्या तरी देखील त्या घेणा-याला ह्या देणा-याची दया आली असती. एथे तर त्याच्या जिभेवर साक्षात सरस्वतीने मराठी भाषेचा 'क्लास' उघडला होता."

हे पाहा, पुढल्या आठवड्यात एखाद्या संध्याकाळी या."

"निश्चित वार सांगू शकाल का आपण? नाही सांगितला तरी चालेल. मी रोज येत जाईन. प्रयास हा प्रतीभेच्या प्राणवायू आहे असं कुडचेडकरांनी म्हटलचं आहे."

"कुणी?"

"स.तं. कुडचेडकर ---'केतकी पिवळी पडली' चे ख्यातनाम लेखक."

"अस्सं!" कुडचेडकर नावाचा मराठीत कुणी साहित्यिक आहे, याचा मला पत्ताही नव्हता. आणि गटण्याला त्याच्या 'केतकी पिवळी पडली' (हे नाटक होते, कादंबरी होती की आणखी काय होते देव जाणे) पुस्तकातली वाक्ये पाठ होती.ह्या गटण्याची केस अगदीच हाताबाहेर गेली होती.

गटणे त्यानंतर असाच सणासुदीला येत गेला. संक्रांतीची कार्डे, दिवाळिचे अभीष्टचिंतन, नववर्षाच्या सुभेच्छा वगैरे न चुकता पाठवीत असे. माझे कुठेही काही लिहून आले की आपल्या सुंदर अक्षरात ते वाचल्याचे कळवीत असे.
अधूनमधून भेटातही असे.

अधूनमधून भेटातही असे.

त्यानंतर एका संध्याकाळी सखाराम गटणे घरी आला. नेहमीप्रामाणे नाकासमोर टोपी, हातात पिशवी, असे त्याचे ते हडकुळे आणि डोळ्यावर घालीन लोटांगण असा भाव असलेले ध्यान येऊन दारात उभे राहिले.

"या!" मी त्याला आत बोलावले."

आपल्या साधनेत व्यत्यय तर नाही ना आणला?"

"अहो, साधना कसली? आराम करीत पडलो होतो--"

"चिंतन वगैरे चालंल होतं का?"

"छे हो! चिंतनविंतन काही नाही. हं, काय, चहा घेणार?"

"नको. मी चहा घेत नाही. उत्तेजक पेयांपासून मी पहील्यापासून अलिप्त आहे."

ह्या मुलाच्या मेंदूत पाण्याचे फवारे सोडून त्यातून ही सारी साहित्यीक श्ब्दांची जळमुटे धूऊन काढता येतील का, अशा विचारात मी पडलो.

"अहो, चहा हे उत्तेजक पेय आहे म्हणून कोणी सांगितलं?"

"उन्नती मासिकाच्या विजयादशमी अंकात चोखुरेगुरूजींच्या लेख आहे. 'जीवनोन्नतीचे सहा सोपान!'" 'जीवनोन्नतीचे सहा सोपान; हे शब्द गटण्याच्या वेद्यावाकड्या दातांतून पोरांच्या चड्ड्यांतून खिसे उलट केल्यावर गोट्या पडाव्यात तसे पडले!

"माझं ऎकाल का गटणे--असले लेख नका वाचत जाऊ."

"मी आपलं ह्याच बाबतीत योग्य मार्गदर्शन घ्यावं म्हणून आलो होतो."

"कसलं मार्गदर्शन?"

"मला माझा व्यासंग वाढवायचा आहे.
योग्य व्यासंगाशिवाय व्यक्यिमत्वाचा पैलू
पडत नाहीत."

"कुठल्या गाढवानं सांगितलं हे तुम्हाला?"

गटणे दचकला. त्याच्या असंख्य गुरूजीपैकी कुठल्यातरी गुरूजीच्या पंच्याला मी नकळत हात घातला होता. गटणे गप्प उभा होता. त्याच्या त्या केविलवाण्या डोंळ्यात फक्त आसवे जमा व्हायची राहिली होती. मला हे माझ्या उद्गारांचा राग आला होता. पण गटण्याने एक एक वाक्य माझा अतं पाहत होत. ह्या मुलाला आता नीट बिघडवायचा कसा ह्या विचारात मी पडलो.

"हे बघा, प्याच थोडा चहा. यापूर्वी कधी प्यायला होतात ना?"

"हो-- पूर्वी पीत होतो." एखद्या महान पातकाची कबुली द्यावी तसा चेहरा करून गटणे म्हणाला.

माझ्या आदेशानुसार तो चहा प्यायला. त्याच्या अनेक गुरूजीपैकी मीही एक होतो. चहा पिताना त्याच्या चेह-याकडे पाहवत नव्हते. सर्कशीत वाघाच्या ताटात शेळीला जेवायला लावतात त्या वेळी शेळीचा चेहरा कदाचीत तसा होत असेल. बाकी गटण्यात आणि शेळीत काहीतरी साम्य होते. शेळी झाडाची पाने खाते, हा पुस्तकांची पाने खात होता. त्याला मी जी जी काही आठवतील ती पुस्तके लिहून त्यांची यादी दिली. ती यादी वाचताना त्याच्या चेह-यावर विलक्षण कृतज्ञतेचा भाव दाडला होता. त्यांची यादी दिली. काहीतरी विस पुस्तकांची नावे असावित.

"ही मी वाचली आहेत.!"

"सगळी?" मी ख्रुर्चीवरून कोलमडायच्या बेतात आलो होतो.

"हो! पण पुन्हा एकदा वाचून काढीन."

"छे छे-- पुन्हा कशाला वाचता?" वास्तविक मला त्याला सांगायचे होते की,

"मित्रा, आणखी पाच वर्षे रोजचं वर्तमानपत्रदेखील वाचू नकोस."

'भस्म्या' नावाचा एक रोग असतो म्हणतात. त्यात माणसाला म्हणे 'खाय खाय' सुटते आणि खाल्ले की भस्म, खाल्ले की भस्म, अशी रोग्याची अवस्था होते. गटण्याला असलाच पुस्तकांचा भस्म्या रोग झाला असावा. ह्या मुलाला काय करावे मला कळेना. शेवटी मी माझे कपाट उघडले. त्यातली पुस्तके पाहिल्यावर खेळण्यांच्या दुकानात गेल्यावर पोरांचे चेहरे होतात तसा त्याचा चेहरा झाला.

"ह्यांतली वाटेल ती पुस्तकं घेऊन जा." वस्ता, तुजप्रत कल्याण असो'च्या चालीवर मी त्याला सांगितले.

"असा व्यासंग करायची इच्छा आहे माझी--"

गटण्याच्या उद्गारांनी मला भयंकर शरमल्यासारखे झाले. त्या पुस्तकांतल्या निम्म्याहून अधिक पुस्तकांची मी पानेही फाडली नव्हती. आपल्या थैलीत पुस्तके भरून घेऊन गटणॆ गेला आणि मी सुटकेचा निःश्र्वास टाकला.

आठ्दहा दिवसांनंतर एके दिवशी संध्याकाळी त्याचे ते "आपल्या साधनेत व्यत्यय तर आणित नाही ना मी?" हे वाक्य पुन्हा मला येऊन टोचले. त्याच्याहातात पुस्तकांनी भरलेली पिशवी होती. गटण्याने आठदहा दिवसांत ती सत्राअठराशे पाने खाल्ली होती. हा म्हणजे अल्लाउद्दिनच्या दिव्यातल्या राक्षचाच प्रकार झाला होता. 'दिलं पुस्तक की खा-- दिलं पुस्तक की खा--' हे काम कठीण होते.

"'काय, कशी काय वाटली पुस्तकं?" त्याला काहीतरी विचारणे प्राप्त होते. गटणे एक अक्षरही न बोलता उभा होता. मला वाटले माझा प्रश्र्न ऎकला नाही. म्हणून मी पुन्हा त्याला विचारले. गटण्याच्या डोळ्यांत पाणी तरारले होत्ते.
मला कुणी रडायबिडायला लागले की काही सुचेनासेच होते. "काय रे, काय झालं?" एकदम त्याला अरेतुरे करायला लागलो. त्या आपुलकीने गटणे अधिकच मुसमुसायला लागला.

रडताना तो एखाद्या लहान शाळकरी पोरासारखा दिसत होता. वास्तविक आता तो विशीच्या पलीकडे गेलेला होता. पण त्याला मी प्रथम पाहिला त्यानंतर त्याच्यात मला काहिच फरक वाटत नव्हता. अर्धी विजार जाऊन पायजमा-कोट आला होता. टोपीचे टोक अगदी तसेच नाकासमोर होते. आणि डोळ्यातंला भावदेखील कायम होता.

"काय झालें गटणे? रडू नकोस---"

"मला क्षमा करा."

"पुस्तकं वाचायला वेळ नाही का झाला?"

"नाही, रात्रीचा दिवस करून आपल्या अनुज्ञेप्रमाणं मी पुस्तकं वाचून काढली--- हे पहा." एक वही माझ्या हातात देत तो म्हणाला.

"मग--" त्या तशा अवस्थेतदेखील त्याच्या 'अनुज्ञा' हा शब्द ऎकून मौज वाटली. ज्या वयात पाचपंचवीस इरसाल शिव्या तोंडात असाव्यात तिथे 'अनुज्ञा'', "मार्गदर्शन', 'जीवनानुभूती', 'साकल्याने मिळणारे समाधान' असली छापील शब्दांची अडगळ त्याच्या तोंडात आठली होती. मी त्याने अत्यंत सुवाच्य अक्षरात लिहीलेली वही उघडली.

"त्यात मी आपण दिलेल्या प्रत्येक पुस्तकाचं समालोचन लिहिलं आहे."

गटण्याने प्रत्येक पानावर 'समालोचन' लिहीले होते. "पुस्तकाच्या वाचनाला लागलेला समय रात्री साडेआठ ते एक वाजून पस्तीस मिनीटे. पृष्ठसंख्या दोनशे बत्तीस पाने." अशा थाटात सुरूवातीचे कॉलम भरले होते. पुढे लेखकाचे संपूर्ण नाव, प्रकाशकाचे नाव, पत्ता, किंमत अस्ली माहीती होती--आणि मग खाली समालोचन होते. "कथावस्तू आकर्षक आहे. पात्रनिर्मीती वोलोभनीय आहे. कथा मुंबई, नागपुर व लखनौ ह्या तीन स्थळांत घडते..." असा प्रत्येक पुस्तकाचा सुंदर
अक्षरात पंचनामा केला होता. गटण्याचा हा 'व्यासंग' पाहून मी थक्क झालो. शब्द तर डबक्यावर शेवाळ माजावे तसे माजले होते. नेत्रदीपक काय, आल्हाद काय, मनाची प्रगाढ खोली काय--छे! पोट साफ करायच्या औषधासारखे तोंडातले हे शब्द साफ करणारे एखादे ओषध का नाही निघत, ह्या विचारात मी पडलो. शेवटी काही तरी बोलायचे म्हणून मी म्हटले, "वा! खूप बारकाईअनं अभ्यास चालवला आहेस--"

"माझ्या जिवनातल्या वाडःयीन कालखंडातलं शेवटलं प्रकरण आहे."

"म्हणजे?" हा मुलगा आता जीवजीव देणार आहे की काय अशी मला भीती वाटली, कारण असली पुस्तके खाऊन जगणारी मुले भलत्याच कुठल्यातरी श्रीमंताच्या नुसत्याच गो-या म्हणून सुंदर मानल्या गेलेल्या पोरींच्या प्रेमात पडतात आणि जीव तरी देतात किंवा डरपोक असली तर 'ऍंग्री यंग मेन' म्हणून चित्रविचीत्र पोशाख करून हिंडतात आणि दुस-याच्या खर्चाने कॉफीहाऊसमध्ये कॉफी पीत भयाण दिसणा-या, रोडक्या, माफक मिशीवाल्या पोरींबरोबर घाणेरड्या चित्रांतली आणि कवितांतली कला शोधत बसतात. पण गटण्या त्यांपैकी कशातच बसण्यासारखा नव्हता. नुसता फटाका फुटल्याचा आवाज सांगण्याचा प्रयास करीत होता, पण त्याला पुन्हा एकदा रडू फुटत होते. एकूण चमत्कारिकच प्रसंग होता.

शेवटी गटण्याने आपले रडू आवरीत बोलायला सूरूवात केली.

"मला क्षमा करा. यापुढं मी अपल्याला कसलीच तसदी देणार नाही."

"म्हणजे?" मी आपल्या मित्रमंदळीत ह्या गटण्याची कधी तरी चेष्टा केली होती. ती ह्याच्या कानावर गेली की काय? पण ते शक्य नव्हते. आमचे मित्र आणि गटणे यांचा सबधंच येणे सभंवत नव्हते. एक पोलीस प्रॉसिक्युटर, एक मोटारीचे स्पेअर पार्ट विकणारा, कोणी फायर इन्शुरन्स एजंत, तर कुणी मिलीटरीतला कप्तान असल्या माझ्या कथाकाव्याच्या वाटेलादेखील चुकून न जाणा-या निरोगी मित्रांत मीच फक्त लेखनकामासाठी करणारा होतो. ते जगत होते आणि मी लिहीत होतो. आमच्या मित्रांच्या वासाने गटण्याला घेरी आली असती. मी गटण्याची समजूत काढायची म्हणून म्हटले, "अरे तसदी कसली?"

"तसं नाही. तुम्ही फार केलंत माझ्यासाठी. वटवृक्षाच्या शितल छायेत अनेक पांथस्थ येतात त्याची वटवृक्षाला काय कल्पना?"

गटण्य़ाच्या ह्या वाक्याने गटणे 'नॉर्मल'वर आला हे मी ओळखले. मला वटवृक्षाची दिलेली उपमा पाहून उगीचच माझ्या नाकाखाली एक पांरबी लोंबायला लागली आहे असे मला वाटले आणी हसू आले.

"आपण माझ्या ह्या मुग्ध वाक्याला हसणं साहजिकच आहे. पण आपल्या मायेच्या शीतल छायेत बसणं माझ्या नशिबात नाही. जीवनात--"

"अरे पण--" मला ह्या 'जीवन' वगैरे शब्दांची भयंकर धास्ती वाटते. जगण्याला 'जीवन' म्हणावे अशी माणसे हजार वर्षातून एकदा जन्माला येतात. गटण्याने स्वतःच्या जगण्याला 'जीवन' म्हणणे म्हणजे सशाने स्वतःच्या टाळूला गंडस्थळ म्हणण्यापैकी होते. त्याचे ते जीवनापासून सूरू होणारे वाक्य मध्येच तोडून मी म्ह्टले, "अरे पण गटणे, झालं काय असं?"

"माझ्या जीवनात आता एक नवं पर्व सुरू होतंय!"

मुलगा अगदीच हाताबाहेर गेला होता. साइनबोर्ड पेंटरचा हा मुलगा स्वतः जणू काही महाभारताचा नायक असल्यासारखा पर्वविर्व म्हणायला लागला होता.

"कसलं पर्व?"

"कसं सांगू?" आपले भित्रे डोळे पायच्या आंगठ्याला लावून गटणे म्हणाला.

मग माझी खात्री झाली की, बापाच्या नावाचा बोर्ड रंगवून घ्यायला आलेल्या कुठल्या तरी मोटारीतून उतरणा-या गो-या तरूणीने गटाण्याचा खातमा केला. आजवर वाचलेल्या सर्व कादंब-यांचा कथानकांचे तात्पर्य ह्याच्या बापाच्या ध्यानी आले असणार आणि सखाराम गटणे तिथेच समात्प झाला असणार! शेवटी मीच होऊन त्याला विचारले,

"कुठे प्रेमाविमात पडलास की काय?"

"नाही!" विजापूरच्या चिमुकल्या शिवाजीने छाती काढून बादशहाला सांगावे तशी आपली अठ्ठावीस इंची छाती काढुन तो म्हणाला, "आजच्या जगात विशुद्ध प्रेम कुठंच मिळत नाही."

"कुणी सांगितलं तुला?"

"आपल्याच 'पाखरांची शाळा' नाटकातल्या नायकांच्या वाक्य आहे हे!"

मी मनातल्या मनात कपाळाला हात लावला. 'पाखरांच्या शाळे' तले एक विनोदी पात्र हे वाक्य म्हणते. शेवटी मलाही हा प्रकार असह्य झाला आणि मी म्हटले,

"मग झालं काय तुला? एवढा तरुण तू, इतका व्यासंगी--माझ्यापेक्षादेखील तुंझ वाचन दांडगं--आणि रडतोस?"

"काय करू? परिस्थिती हा अश्रूंचा सर्वात मोठा कारखाना आहे असं वाळिंबे म्हणत असत."

"कोण वाळिंबे?"

"आमच्या प्राज्ञेचे सर!"

तो कोण वाळिंबे भेटला असता तर जुन्या सुलतानासारखा मी त्याला उलटा टांगून पुस्तके जाळून त्याची धूरी दिली असती.

"असली काय परीस्थीती आली तुझ्यावर?"

"माझ्या वडिलांना माझ्या जीवनाचं ध्येय कळत नाही."

माझ्या डोळ्यांपुढे सखाराम गटण्याचा पेंटर बाप आला. मी त्याला काळा की गोरा ते पाहिले नव्हते. बाकी पेंटर असल्यामुळे काळागोराच काय, तो अनेकरंगी असेल. त्या, अक्ष्ररे इंचावर मोजून रंग भरणा-या इसमाला त्याच्या घरात जन्माला आलेल्या ह्या बालबृहस्पतीचे जीवनध्येय काय कळणार? 'जीवनध्येय' म्हटल्यावर "कुठल्या साइजमध्ये लिहू साहेब?" म्हणणारा इसम तो!

"काय जीवनध्येय कळंल नाही त्यानां?"

"त्यांनी माझं लग्न करायचं कुटील कारस्थान रचलंय!" गटण्याचे लहानसे जांभळट ओठ थरथरत होते.

"अरे, मग कुटील कारस्थान कसंल त्यात? तुला लग्न करायचं नसल तर नाही म्हणून सांग!

"तिच विनंती करायला मी आलो होतो. मला माझं काही वाटत नाही जीवनाच्या समरात..."

पुन्हा 'जीवन'! गटणे आता बाधं फोडून बोलत होता.

"...जीवनाच्या समरात रक्तबंबाळ व्हायचे प्रसंग यायचेच."

"अरे, चांगलं लग्न ठरवताहेत वडील तर रक्तबंबाळ कसाला होतोस?"

"मला माझं काही वाटत नाही. मी वडिलांच्या आज्ञेनुसार विवाहबंधनात स्वतःला जखडून घेईनही! प्रभू रामचंद्र हा माझा आदर्श आहे! मीही वडिलांची अनुज्ञा पाळीन."

प्रभू रामचंद्राने लग्न झाल्यावर अनुज्ञा पाळली होती हा तपशील गटणे विसरला. त्या एवढ्याशा देहातून प्रभू रामचंद्र वगैरे शब्द ऎकताना मला हसू आवरेना.

"बरं मग तुझं काय म्हणणं? मी तुझ्या वडलांना येऊन भेटू?"

"हे मी आपल्यावर सोपवतो. मी लग्नाला तयार आहे."

आता मात्र मला कळेना की हा वीर जर मान उतरवून द्यायला तयार आहे तर मी जाऊन काय शत्रूच्या तलवारीला धार काढून देऊ?

"मी एकदा सोडून दहादा लग्नाला तयार आहे--पण मी आपणाशी प्रतारणा करू इच्छीत नाही." मी गटण्याच्या डोळ्यातं काही वेडाबिडाची झाक दिसते की काय ते पाहू लागलो.

"माझ्याशी कसली प्रतारणा?"

"आपण विसरलात म्हणून मी विसरणार नाही. आपल्या पहिल्या भेटीत दिलेलीस्वाक्षरी मी रोज वाचतो. त्याच्यावर आपण संदेश दिला आहे-- 'साहीत्याशी एकनिष्ठ राहा!'"

मी कोटटोपी घालून निमूटपणे त्याच्या वडलांना भेटायला गेलो. एका जुनाट वाड्यापुढे आमचा टांगा थांबला.वाड्यातल्या कुठल्या अंधे-या खोलीत आता मला हा माझा हनुमंत नेतो याची मी वाट पाहू लागलो. इतक्यात डाव्या बाजूच्या जिन्याच्या अंधारातून एक भरभक्कम गृहस्थ उतरला. चांगले भरघोस टक्कल,करवती मिश्या, कानाम्वर घनदाट केस, कपाळाला दुबोती उभे गंध, पोटाचा विस्तार पंच्यात्न डोकावणारा, पांढरे स्वच्छ धोतर नेसलेला. हा पन्नाशीतला धष्टपुष्ट गृहस्थ गटण्याचा बाप आहे हे कळल्यावर माझी छातीच धडधडायला लागली. मी त्यांना नमस्कार केला.

गटण्याचा घराबद्दलची माझी कल्पना साफ खोटी ठरली. पेंटिंगचे दुकान हा गटण्यांचा अनेक व्यवसायापैकी एक होता. त्याच्या बापाने, रंगाचा तर सोडाच पण दाढीचा ब्रशदेखील हातात धरला नव्हता. कारण खाली उतरल्याबरोबर त्यांनी ओसरीवर उभ्या न्हाव्ह्याला आपण आज दाढी करणार नसल्याचे सांगितले, असल्या घनघोर माणसाच्या घरात साहित्याची मुळी कशी उगवली मला कळेना.

"या साहेब!" गटण्याच्या बापाने माझे रुंद आवाजात स्वागत केले.

"सख्या,आज जाऊन चहा सांग."

बिळात उंदीर शिरावा तसा सख्या आत पळाला. अर्ध्या तासाच्या मुलाखतीनंतर पुण्यात गटण्यांच्या सहा इमारती आहेत ही माहिती मिळाली. गटण्याच्या घरात म्हता-या विधवा आतेखेरीज बाईमाणूस नाही हे समजले. आणि ती म्हातारी सध्या दम्याने हलकी होत चालल्यामुळे घरात बाईमाणूस येणे हे किती आवश्यक आहे ते कळाले. त्या वाघासारख्या चेह-याच्या बापाने सख्याची आई त्याच्या वयाच्या बाराव्या दिवशी वारल्यानंतर पुन्हा लग्न केले नव्हते.

"सावत्र आई म्हणजे काय साहेब मी स्वानुभवानं जाणतो. तुमच्यासारख्या विद्वान माणसाशी खोटं का बोलू? आजवर तीन बाया ठेवल्या!" बोटांतल्या पोवळ्याच्या आंगठीकडे पाहत गटण्याचा बाप म्हणाला," आज आपल्यासारख्यांचा आर्शीवादानं सारं काही आहे." गटण्याच्या बापची श्रीमंती आणि माझ्यासारख्याचा आर्शीवाद ही जोडी अजब होती. हे म्हणजे नळाच्या आर्शीवादाने पाऊस पडण्यापैकी होते. "काय वाटेल ते करा, पन पोराला लग्नाला उभा करा!" एवढा धिप्पाड माणूस माझ्यापुढे कोकरू झाला होता. "मुलगी नक्षत्रासारखी आहे साहेब! सोनगावकर सराफांच नाव ऎकल असेल आपण--" मी सराफांच फक्त नावच
ऎकतो हे मी गटण्याच्या बापाला सांगण्याचा मोह आवरला. "बुधवारात पाच घंर आहेत--- एकुलती एक मुलगी. चांगली शिकली आहे चारपाच यत्ता. शिवाय कूंडली जुळते आहे आणि सखा काहीतरीच खुळ्यासारखं धरून बसलाय. तुम्हाला वचन
गेलंय म्हणतो."

"छे छे!"

"वर या साहेब--"

मग चारपाच काळोखे जिने चढून आम्ही सख्याच्या खोलीत गेलो. माझ्या खोलीत पुस्तकांचे एक कपाट होते; सख्याच्या भिंती पुस्तकांच्या कपाटांनी भरल्या होत्या. आणि भिंतीवर सानेगुरूजींच्या शेजारी माझ फोटो होता. त्याच्याखाली थेट माझ्या अक्षरात बोर्ड होता-- 'साहीत्याशी एकनिष्ठ राहा!' खाली माझ्या सही- सारखी सही होती.

सख्याच्या लग्नात मी माझे सर्व पुस्तके त्याला भेट म्हणून दिली. प्रत्येक पुस्तकावर नवा संदेश लिहून दिला होता-'साहित्याशी एकनिष्ठ राहा आणि जीवनाशीही!'

माझ्या हाताने 'जीवन' हा शब्द त्यानंतर लिहीला नाही. सख्या जीवनाशी एकनिष्ठ राहू लागल्याचे वर्षभरातच मला कळले. सख्याचे वडील स्वतः चांदीच्या वाटीतून नातवाचे पेढे घेऊन आले. काही वर्षापूर्वी सख्याने प्राज्ञेचे पेढे दिले होते; त्याच्या बापाने नातवाचे दिले.

सखाराम गटणे मार्गाला लागला. त्याच्या 'जीवनातला' साहित्याचा बोळा निघाला.
पाणी वाहते झाले!










प्रकाशन - मौज प्रकाशन गृह

मुळ स्त्रोत - विकिपीडिया


शनिवारी दुपारी ऑफिस सुटले. फोर्टमधून हिंडत निघालो. एका घड्याळाच्या दुकानाची दर्शनी खिडकीपुढे उभा राहून काचेमागे मांडलेली घड्याळे मी पाहत होतो. इंग्रजीत ह्याला 'विंडो शॉपिंग' म्हणतात. मोठमोठ्या दुकानांतून अतिशय आकर्षक रितीने विक्रीच्या वस्तू मांडून ठेवलेल्या असतात. बहुधा किंमतीच्या चिठ्या उलटून ठेवतात. तिथली अत्यंत आवडलेली वस्तू सगळ्यांत महाग असते! मागे एकदा एका दुकानाच्या काचेआड ठेवलेला टाय मी पाहिला होता. मला फार आवडला होता. कदाचित तो तितका सुंदर नसेलही, कारण तो त्या काचेआड बरेच दिवस होता. एके दिवशी मी हिय्या करून त्या दुकानात शिरलो आणि त्या टायची किंमत ऎकून बाहेर पडलो. टायची किंमत तिस रुपये असू शकते हे ऎकून माझा कंठ दाटला होता! आता ती घड्याळे पाहताना देखील माझ्या मनगटाला कुठले शोभेल याचा विचार करीत होतो. उगीचच! वास्तविक मनगटाला शोभण्याऎवजी खिशाला पेलण्याचा मुद्दा महत्वाचा होता. तरीसुद्धा मनातल्या मनात मी माझ्या मनगटावर त्या काचेतली सगळी घड्याळे चढवून पाहिली. तसे मी सूटही चढवले आहेत; फर्निचरच्या दुकानातल्या त्या त-हेत-हेच्या फर्निचरवर बसलो आहे; मनातल्या मनात तिथल्या गुबगुबीत पलंगावर झोपलोही आहे. एक दोनशे रुपयांचा रेडिओ घ्यायला पंचवार्षिक योजना आखावी लागते आम्हाला! डोंबिवली ते बोरीबंदर प्रवास फक्त एकदा फर्स्टक्लासमधून करायची इच्छा अजून काही पुरी करता आली नाही मला! मी काचेतुन तसाच घड्याळे पाहत उभा होतो. नाही म्हटले तरी मनात खिन्न होत होतो. तेवढ्याच माझ्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला, आणि आवाज आला, "हलो!"

मी एकदम चमकून मागे पाहिले.


"नंदा! हो, नंदा....नंदाच तू---"

"विसरला नाहीस!"


नंदाला एकदा ओझरते पाहणारा:माणूसदेखील विसरणार नाही. इथे मी तर चार वर्षे कॉलेजमध्ये बरोबर काढली होती. मीच काय, पण आमच्या कॉलेजमध्ये त्या काळात शिकत किंवा शिकवीत असलेले कोणीच विसरू शकणार नाही. पण आज जवळजवळ वीस वर्षांनी भेटलो आम्ही. मुली तर त्याच्यावर खूष होत्याच, पण कॉलेजमधली यच्चयावत मुलेही खूष! नंदा प्रधान हे नाव आम्ही गॅरी कूपर,फ्रेडरिक मार्च, डिक पॉवेल, रोमन नव्हॅरो यांच्या नामावळीत घेत होतो. दिवाळीच्या आणि नाताळाच्या सुटीतदेखील होस्टेलमधल्या आपल्या खोलीत राहणारा नंदा प्रधान! कॉलेजच्या इंग्लिश नाटकांतून पारशी आणि खिश्र्चन मुलामुलींच्या गटांतून काम करणारा नंदा! मी बी०ए० ला होतो, त्या वर्षी नंदाने हॅम्लेटचे काम केले होते.त्यांनतर मी ब्रिटिश रंगभूमीवरचे हॅम्लेटदेखील सिनेमात पाहिले, पण डोक्यात नंदाचा हॅम्लेट पक्का बसला आहे. इतका गोड हॅम्लेट! फ्रेनी सकलातवाला ओफीलिया होती. नंदा फ्रेनीशी लग्न करणार, अशी त्या वेळी अफवादेखील होती. पण नंदाच्या बाबतीत दर दोन महिन्यांनी अशा अफवा उठत. मला वाटते, कॉलेजातल्या सगळ्यांत सुंदर मुलीशी नंदाचे लग्न व्हावे अशी संर्वाचीच मनोमन इच्छा असावी. ह्या बाबतीत कॉलेजमधल्या इतर इच्छुकांनी नंदाला अत्यंत खिलाडूपणाने वॉक ओव्हर दिला होता!

जवळजवळ पावणेसहा फूट उंच, सडपातळ, निळ्या डोंळ्याचा, लहानशा पातळ ओठांचा, कुरळ्या केसांचा नंदा हा प्रथमदर्शनी हिंदू मुलगा वाटतच नसे. त्यातून तो नेहमी असायचादेखील इंग्लिश बोलणा-या कॉस्मॉपॉलिटन गटात! वास्तविक त्याची आणी माझी कॉलेजमधली मैत्री कशी जुळली हे देखील मला ह्या क्षणापर्यंत कोडे आहे. इंग्लिश ऑनर्सच्या तासाला आम्ही साताआठच मुले-मुली होतो. त्यांत संपूर्ण देशी असा मी आणि इंदू वेलणकर नावाची मुलगी होती. अर्धमागधीला जायची ही मुलगी इंग्रजीच्या वर्गात केवळ फॉर्म भरण्यात गफलत झाल्यामुळे बसत असावी, अशी माझी समजूत होती! नऊवारी साडी, अंबाडा, हातात पुरुषांनी बांधावे एवढे लठ्ठ घड्याळ, हातावर भाराभर पुस्तकांचा ढिगारा आणि मंगळागौरीचे जाग्रण करुन आल्यासारखी दिसणारी ही वेंधळी मुलगी जेव्हा इंग्लिशच्या परिक्षेत विश्र्वविद्यालयातली सगळी बक्षीसे घेऊन गेली, त्या वेळी आम्ही भान हरपून तिच्या घरी तिचे अभिनंदन करायला गेलो होतो! वास्तवीक एखाद्या मुलीच्या घरी जाऊन अभिनंदन करण्याचे मला धैर्य नव्हते; पण नंदा माझ्या खोलीवर आला होता. त्या वेळी मी भिकारदास मारूतीजवळ एका चाळीत खोली घेऊन राहत होतो. त्या काळच्या पुण्यात चार रुपये भाड्यात ज्या सुखसोयींसह खोली मिळे, त्या खोलीत मी आणि अरगडे नावाचा माझा एक पार्टनर राहत होतो. तो रात्रंदिवस फ्लूट वाजवायचा. मग त्याचे आणि मालकाचे भांडण होई. माझ्या त्या खोलीवर नंदा आला की, मला ओशाळल्यासारखे होई. तारेवर माझा घरी धुतलेला लेंगा आणि फाटका बनियन, शर्ट वगैरे वाळत पडलेला असे. अरगड्याने एक जुने चहाचे खोके मिळवून त्याच्यावर बैठक केली होती. त्याच्यावर बसून तो फ्लूटचा रियाज करीत असे. चांगली वाजवायचा,पण पुढे त्याला फ्लूरसी झाली.

"आपल्याला जायंच आहे." नंदा म्हणाला.

"कुठे?"

"इंदू वेलणकरकडे. चल."

त्याची अशी चमत्कारिक तुटक बोलण्याची पद्धत होती. आवाजदेखील असा खजीतला, पण कठोर नाही, असा काहीतरी होता. त्याला ज्याप्रमाणे काहीही शोभून दिसे तसा तो आवाजही शोभे. नंदा एकदा माझ्याबरोबर एका गाण्याला लेंगा आणि नेहरू शर्ट घालून आला होता. त्या वेशातही तो असा उमदा दिसला की,बुंवानी काही कारण नसताना गाता गाता त्याला नमस्कार केला होता. त्या दिवशी तो खोलीवर आला तेव्हा मी अक्षरश: भांबावलो होतो. काही माणसे जन्मतःच असे काहीतरी तेज घेऊन येतात की, त्यांच्यापुढे मी मी म्हणणारे उगीचच हतबल होतात.काही स्रियांचे सौंदर्य असेच आपल्याला नामोहरम करून टाकते. त्यांच्यापुढे आपण एखाद्या फाटक्या चिरगुटासारखे आहोत असे वाटायला लागते. नंदामध्ये ही जादू होती. मला आठवतेय, आमचे प्रिन्सिपॉल साहेबदेखील जिमखाना कमिटीच्या सभेत नंदाची सूचना कमालीच्या गंभीरपणाने ऎकत असत. तिथेदेखील नंदा असा तोटकीच वाक्ये बोलायचा; पण इंग्लिशमध्ये! तीनचार शब्दांहून अधिक मोठे वाक्य नसायचे.त्या दिवशीसुद्धा "आपल्याला जायचंय" हे एवढेच म्हणाला होता. मी

"कुठे?"म्हटल्यावर

"इंदू वेलणकर" म्हणाला.

"इंदू वेलणकर?"

"अभिनंदन करायला."

"तिच्या घरी? अरे. तिचा म्हातारा भयंकर चमत्कारिक आहे म्हणे!"

"असू दे! मीसुद्धा आहे. चल."

"बरं, तू जरा गॅलरीत उभा राहा. मी कपडे बदलतो." आमच्या महालातल्या अडचणी अनेक होत्या.

"मग मी बाहेर कशाला?"

मी शक्य तितके त्या आठ-बाय-सहाच्या खुराड्यात कोप-यात तोंड घालून माझीएकुलती एक विजार चढवली. शर्ट कोंबला आणि आम्ही निघालो. इंदू वेलणकरचा राहता वाडा तिच्या इंग्लिशखेरीज इतर सर्व गोष्टींना साजेसा होता. बोळाच्या तोंडाशी"कल्हईवाले पेंडसे आत राहतात" असा एक तर्जनी दाखवणारा हात काढलेला बोर्ड होता. खाली कुठल्या तरी पुणेरी बोळ संप्रदायात वाढलेल्या इब्लिस कार्ट्याने खडूने "पण कल्हई रस्त्यात बसून काढतात" असे लिहीले होते. काही काही माणसे कुठे राहतात ते उगीचच आपल्याला ठाऊक असते. इंदू वेलणकर हा त्यांतलाच नमुना. एकदा कोणीतरी मला कल्हईवाल्या पेंडशांच्या बोळात राहते हे सांगितले होते. त्या बोळातून मी आणि नंदा जाताना ओसरीवर आणि पाय-यांवर बसलेल्या बायका आणि पोरे नंदाकडे माना वळवून वळवून पाहत होती. इतक्या देखण्या पुरूषाचे पाय त्या बोळाला यापुर्वी कधी लागले नसतील! जनस्थानातून प्रभू रामचंद्राला जाताना दंडकारण्यातल्या त्या शबर स्रियांनी ह्याच द्र्ष्टीने पाहिले असेल. बोळ संपता संपता 'ज०गो० वेलणकर, रि०ए० इन्स्पेक्टर' अशी पाटी दिसली.आम्ही आत गेलो. दाराबाहेर एक दोरी लोंबकळत होती. तिच्या खाली "ही ओढा" अशी सूचना होती. त्याप्रमाणे 'ती' ओढली. मग आत कुठेतरी काहीतरी खणखणले आणि कडी उघडली. एका अत्यंत खत्रूड चेह-याच्या पेन्शनराने कपाळावरचष्मा ठेवून आठ्या वाढवीत विचारले,

"काय हवॅंय?"

"इंदूताई वेलणकर इथंच राहतात ना?" मी चटकन 'इंदू' ला 'ताई' जोडून आमचे शुद्ध हेतू जाहीर केले.

"राहतात. आपण?" हाही थेरडा नंदासारखा तुटक बोलत होता.

"आम्ही त्यांचे वर्गबंधू आहोत."

तेवढ्याच स्वतः इंदूच डोकावली. नंदाला पाहून ती कमालीची थक्क झाली होती आणि तिला पाहून मी थक्क झालो होतो. कॉलेजात काकूसारखी नऊवारी लुगडे नेसून भलामोठा अंबाडा घालणारी इंदू घरात पाचवारी पातळ नेसली होती. तिची वेणी गुडघ्यापर्यंत आली होती. केसांत फूल होते.

"या या--- तात्या, हेही माझ्याबरोबर ओनर्सला होते."

"मग मिळाले का?"

"हो, आम्ही दोघांनाही मिळाले." मी चटकन सांगून टाकले, नाहीतर म्हातारा "बाहेर व्हा" म्हणायचा.

"बसा-- बसाना आपण." इंदू नंदाकडे पाहत मला सांगत होती. इतकी बावचळली होती, घाबरली होती, आणि त्यामुळेच की काय कोण जाणे, क्षणाक्षणाला अधिकच सूंदर दिसत होती.

नंदा मात्र शांतपणे बसला.

"हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन!" नंदा ह्या माणसाला देवाने काय काय दिले होते! त्या बुद्रक म्हाता-याच्या दिवाणखाण्यात एका व्हिक्टोरिअन काळातल्या खुर्चीवर नंदा अशा ऎटीत बसून हे बोलला की, मला वाटले, तो थेरडा तिथे नसता तर तेवढ्या बोलण्याने इंदू त्याच्या गळ्याला मिठी मारून आनंदाने रडली असती.

"थॅं...क्य़ू..." सुकलेल्या थरथरत्या ओठांनी ती म्हणाली.

"आज रात्री जेवायला याल का?" नंदा विचारीत होता.

"कोण मी?" इंदूचा आवाज इतका मऊ होता की, मला उगीचच गालावर पीस फिरवल्यासारखे वाटले.

"मी डिनर ऍरेंज केलंय."

"डिनर?" म्हातारा तेल न घातलेल्या झोपाळ्याच्या कड्या किरकिरतात तसा किरकिरला.

"यस सर! टू सेलेब्रेट युअर डॉटर्स सक्सेस."

"कुठं डिनर केलंय ऍरेंज?"

"मोरेटोरमध्ये!"

"हॉटेलात कां? घर नाही का तुम्हाला?" स्वतःच्या डोक्यावरचे एरंडाचे पान जोरात थापीत म्हातारा रेकला

"नाही!"

नंदाचे ते 'नाही' माझे काळीज चिरत गेले. नंदाला घर नाही ही गोष्ट कॉलेजात फार फार थोड्या लोकांना ठाऊक होती.

इंदूच्या चेह-याकडे मला पाहवेना.


रात्री मी आणि नंदा मोरेटोरमध्ये जेवायला गेलो होतो. नंदा दारातच माझी वाट पाहत उभा होता. मोरेटोरला माझी चरणकमळे अधूनमधून नंदाच्या आग्रहाने लागायची. मला संकोच वाटे. एका दरिद्री मराठी दैनिकात तारांची भाषांतरे करण्याची उपसंपादकी, अधूनमधून हिटलर-चर्चिल वगैरे मंडळींना, संपादकांना अगदीच आळस आला तर, चार समजुतीच्या गोष्टी सांगणारे अग्रलेख लिहीणे, ह्या कार्याबद्दल मिळणा-या अखंड तीस रुपयांत मला त्याला 'लकी'त नेण्याची देखील ऎपत नसे. पण नंदा "आज आठ वाजता मोरेटोरमध्ये" असा लष्करी हूकूम दिल्यासारखा आमंत्रण देई आणि मी हिन्पोटाइज्ड माणसासारखा तिथे जात असे. आज नंदा सुंदर सूट घालून उभा होता. आजूबाजूंनी येणा-याजाणा-या साहेब लोकांच्या मेळाव्यात तो त्यांच्यातलाच दिसे. इंग्रजाने त्यानंतर आठदहा वर्षांनी हा देश सोडला: त्यापूर्वी कॅंपात जायला उगीचच भिती वाटायची.

"आलास? ये!" त्याच्या मंद्र्सप्ताकाच्या स्वरात त्याने स्वागत केले. "चल!"

अंग सावरीत मी टेबलांमधून जात होतो. तेवढ्यात एका पारशी पोरीने नंदाला टेबलावर कोपरे ठेवून आपल्या गो-यागो-या चवळीच्या शेंगेसारख्या नाजूक बोंटानी'विश' केले. नंदानेही हात वर उचलून त्याचा स्विकार केला. त्याला हे सहज जमत होते. मी तर त्या मोरेटोरमध्ये, साहेब देशात असेपर्यंत, कधी पोटभर जेवूच शकलो नाही. नंदा तिथला सराईत होता. त्या हॉटेलच्या मागल्या बाजूला एक प्रशस्त लतामंडप असे. तिथल्या कोप-यातले एक ठराविक टेबल त्याला नेहमी मिळत असे.आम्ही त्या दिशेला जाऊ लागलो. आणि...बाजूला ट्रेवरून व्हिस्कीचे लखलखणारे प्याले घेऊन जाणा-या वेटरला धक्का लागून होणारा अपघात अर्ध्या इंचाने टळला.त्या टेबलाशी इंदू वेलणकर बसली होती. रंगीबेरंगी झग्यांतल्या गौरागंना! काळे सुट आणि कडकडीत कॉलरचे पांढरे शर्ट घातलेले ते लालबुंद साहेब! त्यात न शोभणारी आम्ही दोघेच होतो--मी आणि लिंबू रंगाची साडी नेसलेली इंदू! पण त्या विलायती फुलांत ती केतकीसारखी वाटली मला.

"हा घाबरतो." नंदा म्हणाला.

"कशाला?" इंदूने विचारले.

ती इतक्या सहजपणे बोलत होती की, दुपारी कल्हईवाल्या पेंडशांच्या बोळात घडलेला प्रकार खरा की स्वप्न, हे मला कळेना! की स्वप्न?

"ह्या हॉटेलला घाबरतो."

"आपल्याला ह्या साहेबी हॉटेलात अन्न नाही बुवा जात!"

माझ्या ह्या उद्गारांवर इंदू हसली. दोन वर्षे एका वर्गात बसलो आम्ही, पण इंदूच्या गालांना खळ्या पडतात, ही तेव्हा प्रथम पाहिले मी! पुस्तकांचा भारा आणिपदर सांभाळीत वर्गात शिरून खालच्या मानेने प्राध्यापकांच्या तोंडून निघणारी ओळनओळ टिपून घेणारी इंदू ती हीच का, ते मला कळेना.

"काय घेणार?" नंदाने इंदूच्या हातात मेनू दिला.

"ह्यांना काय हवं ते विचार--" इंदू ते कार्ड माझ्या हातात देत म्हणाली.

मी तिच्या 'विचार' ह्या एकेरी क्रियापदावर ठेचाळलो आणि वेड्यासारखा नंदाकडे पाहतच राहिलो. तेवढ्याच इंदूने ते कार्ड माझ्या हातातून घेतले आणि अत्यंत सराईतपणाने पदार्थाची यादी सांगितली.

"छान दिसतेस आज!"


नंदा म्हणाला आणि मला उगीचच गरगल्यासारखे व्हायला लागले. माझी छाती धडधडत होती. धनाजीचा घोडा मुसलमानांना म्हणे पाण्यात दिसायचा. मला पुढल्या टोमॅटो सुपात इंदूचा थेरडा दिसायला लागला. मला काही कळेना. नंदा कॉलेजातल्या कुठल्या मुलीबरोबर कुठे गेला ह्याचा सर्व तपशील आम्हा मित्रांना ठाऊक असे. किंबहुना, त्या वेळी फर्स्ट इयरमधल्या रेवती अमलाडी नावाच्या अतिशय देखण्या मुलीबरोबर आम्ही त्याचे नाव नक्कीही करून टाकले होते. उद्या जर मी आमच्या इतर मित्रांना नंदा आणि इंदू वेलणकर ही नावे एकत्र म्हणून दाखवली असती तर त्यांनी मला विनाचौकशी येरवड्याला धाडले असते. पण मी प्रत्यक्ष पाहिले होते.

पाश्र्चात्य संगीताचे सूर येत होते. पलीकडच्या टेबलावरून व्हिस्कीचा वास येत होता. टेबलाच्या बाजूने जाणा-या आग्लंयुवतीच्या दिशेने जीवघेण्या विलायती सुंगधाचा दरवळ अंगावरून रेशमी वस्र ओढल्यासारखा सरकत होता. साक्षात मदनासारखा दिसणारा नंदा माझ्या डाव्या बाजूला होता आणि समोर इंदू वेलणकर कसल्यातरी जादूने परी होऊन पुढे येऊन बसली होती.

ते द्रुश्य एखाद्या तपस्वी चित्राकारच्या चित्रासारखे फुलून आले. त्या रात्रीमी त्या दोघांना कॅंपमध्ये सोडून निघालो. ती बहुधा बंडगार्डनवर गेली असावीत.

त्या रात्रीच्या चांदण्याला ह्या दोघांच्या अंगावर बरसताना स्वतःचे जीवित धन्य झाल्यासारखे वाटले असेल. सिंडरेलाच्या गोष्टीत कोण्या यक्षिणीने तिला नटवली होती. इथे इंदूचा हात साक्षात एका यक्षाच्या हातात होता.

पण यक्षांना शाप असतो म्हणतात. त्या रात्रीनंतर त्या दोघांनाही कुणाची द्र्ष्ट लागली देव जाणे! मला काहीच कळले नाही. बी० ए० वर शिक्षण आटपून नोकरीच्या शोधात मी मुंबईला आलो आणि एका कचेरीत चिकटलो.

"पाहतोस काय?" नंदाच्या ह्या उद्गारांनी मी भानावर आलो. मनाचा वेग काय भयंकर असतो! एका क्षणात मी किती हिंडून आलो. नंदा माझ्यापुढे उभा आहे, ह्याच्यावर माझा विश्र्वास बसेना. तो इंग्लंडला गेला आणि तिथेच राहिला, एवढेच मला कळले होते. हरवलेले खेळणे सापडल्यावर एखाद्या लहान मुलाचे होईल तसे मला झाले होते.

"नंदा!" मी वेड्यासारखा ओरडलो. अक्षरशः जीव अर्धाअर्धा होतो म्हणजे काय होते, ते मला त्या वेळी कळले. नंदा तसा बदलला नव्हता. मात्र त्याचे कुरळे केस विरळ झाले होते. चेह-यावर चाळिशी उलटल्याच्या फार फार सूक्ष्म खुणा होत्या. काळसर टेरेलिनची पॅंट आणि पांढरा बुशशर्ट घालून तो पुढे उभा होता. बुशशर्टावर बारीक डिझाइन होते कसले तरी. त्याचे ते निळे डोळे अगदी तस्से होते. चेह-यावर नव्या साबणाच्या वडीचा ताजेपणा होता.

"केव्हा आलास हिंदुस्थानात?"

"केव्हाच! चल."

एखाद्या जादुगारामागून जावे तसा मी त्याच्यामागून गेलो. 'वेसाइड इन' मध्ये शिरलो. गेली कित्येक वर्षे मी ह्या हॉटेलमध्ये जाऊन चहा घ्यायचा बेत करीत होतो.

"बोल!" नंदा जणू काय आम्ही रोज भेटत होतो अशा सहजतेने म्हणाला.

मला उगीचच आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. आणि हा सत्पुरष शांत होता.

"मी काय बोलणार? तूच बोल! किती वर्षांनी भेटलो! नंदा, मला वाटलं तू इंग्लंडातच स्थायिक झालास." मला 'स्थायिक' शब्द कसासाच वाटला. हा शब्द पुण्याबिण्यात कायम राहणा-याला ठिक आहे. पण इंग्लंडात 'स्थायिक' काय व्हायचे? मी 'सेटल' म्हणायला हवे होते.

"छे! इंग्लंडात काय आहे?" अजूनही त्याचे ते तीनतीन शब्दांचे बोलणे कायम होते. आवाजही तोच. उजवा हात डोक्याच्या मागून फिरवायची लकबही तीच.

"मला काय ठाऊक? तूच सांग. इतकी वर्षे काय केलंस इंग्लंडला? सतराअठरा वर्षे झाली. एक प्रचंड महायुद्ध येऊन गेलं. स्वातंत्र्य मिळालं--"

"कोणाला?"

"भारताला!"

"ओ आय सी--हो, मिळाल! टू टीज!" हा हुकूम वेटरला होता. मी खरोखरी एखाद्या अधाशासारखा त्याच्याकडे पाहत होतो.

"लठ्ठ झालास." नंदा म्हणाला.

"तू मात्र आहे तस्साच आहेस. असं वाटंत, आपण कालच बी०ए० पास झालो. आठवतंय तुला? बाकी तुला कशाला आठवेल म्हणा ते भटजी पुणं? लंडनला राहिलास इतकी वर्षे---लंडनमध्येच होतास कारे?"

"नाही. खूप ठिकाणी होतो."

"पॅरिस पाहिलं असशील, नाही?" हा प्रश्न विचारल्यावर माझा बावळटपणा ध्यानात आला.

"पाहिलं." नंदाच्या लक्षात माझा भोटंपणा आला नसावा.

"आणखी काय पाहिलंस?"

"खूप पाहिलं."

"नशीबवान आहेस बुवा!" माझ्या ह्या वाक्यावर नंदा एखद्या लहान मुलाच्या बालिश उद्गाराला हसावे तसा हसला. "का रे हसलास? मी बघ गेली अठरा वर्षे ह्या मुंबईत आहे. ऑफिस आणि मी! रविवार लोळून काढतो. पळापळीत चांगली दादरला जागा होती ती सोडून डोंबिवलीला गेलो. तिथून येतो रोज."

"कसली पळापळ?"

"अरे, युद्धात बॉंबहल्याच्या भीतीनं माणसं पळाली नाहीत का?"

"ओ आय सी! मग झाला का बॉंबहल्ला?"

"छे रे! तुला म्हणजे काहीच माहिती दिसत नाही. बाकी तू मात्र खूप बॉंबहल्ले पाहिले असशील, नाही? वाचलास. खरंच, देवाच्या मनात आपली भेट घडवायचं होतं---"

"कोणाच्या मनात?"

"देवाच्या! नाहीतर कोणाच्या?"

"ओ आय सी!"

मला हे कळेना की इतक्या वर्षांनी भेटलेला हा मित्र माझे बोलणे रेडिओवरच्या बातम्या ऎकतात तशा पद्धतीने अर्धवट अर्धवट काय ऎकतोय?

"ते मरू दे. तुझं काय काय चाललंय सांग!"

"चागंल चाललंय." तो म्हणाला.

माझ्या मनात वास्तविक त्याला विचारायचे होते की लग्नबिग्न केलेस की नाही, पण धैर्य होईना. मला त्या तिस-या रिकाम्या खुर्चीवर एकाएकी इंदू वेलणकर दिसायला लागली. खरे तर नंदा भेटेपर्यंत इंदूची आठवणही मला त्या इतक्या वर्षात आली नव्हती. डोंबिवली ते मुंबई प्रवासात असल्या आठवणी कुठल्या यायला?

"राहतोस कुठे?" मी नंदाला विचारले.

"ताजमध्ये."

"बापरे?" माझ्या तोंडून चटकन उद्गार बाहेर पडले. ताजमहाल हॉटेलच्या आसपास हिंडायचासुद्धा माझी ऎपत नव्हती.

"का रे?"

"अरे, काय भयंकर महाग हॉटेलं ही! दिवसाला पंधरासोळा रुपये पडतात ना?"

"पंचेचाळीस रूपये--एकाला."

एकाला पंचेचाळीस, हा आकडा ऎकल्यावर ह्याच्या जोडीला दुसरे कोणी आहेकी काय ही शंका बळावली. पण विचारायचा धीर होईना.

"नंदा, बाकी इतक्या वर्षात ओळख विसरला नाहीस हे खरंच आश्र्चर्य आहे. तुझ्या मानांन आम्ही म्हणजे--

"कुठे असतोस नोकरीला?"

मग मी त्याला माझ्या ऑफिसच्या पत्ता सांगितला. त्याने टेलिफोन नंबर लिहून घेतला. आणि त्यानंतर त्याचे मला फोन यायला लागले. टेलिफोनवर देखील तो मला"संध्याकाळी येतो. गेटपाशी उभा राहा." एवढेच सांगून गाडी घेऊन येई आणि मग आम्ही फिरायला जात असू. मला त्याला घरी बोलवाले असे सारखे वाटे.पण का कोण जाणे, त्याला माझ्या त्या डोंबिवलीच्या गचाळ बि-हाडात बोलवायची विलक्षण लाज वाटे. मी कधीच त्याला बोलावले नाही. पण नंदाने माझी ओळख ठेवली याचे कुठेतरी मला विलक्षण समाधान वाटत होते. आम्ही वारंवार भेटू लागलो आणि हळूहळू जो नंदा मला कधीच दिसला नव्हता तो दिसायला लागला.

तो पाच वर्षाचा होता तेव्हा त्याच्या आईने घटस्फोट घेऊन दुस-या एका लक्षाधीश माणसाशी लग्न केले होते. त्याचे वडील बॅरिस्टर होते. नंदाने कळायला लागल्यापासून त्यांना कधी शुद्धीवर असलेले पाहिलेच नव्हते! पाचव्या वर्षी तो एका पब्लिक स्कूलच्या वसतिगृहात गेला. आणि त्यानंतर आजतागायत घर म्हणजे काय असते ते त्याने कधी पाहिलेच नाही. त्याच्या वडलांची प्रचंड इस्टेट होती. कितीतरी चाळी होत्या. बंगले होते. गिरणीत शेअर्स होते.

एकदा आम्ही बांद्रा पॉइंटवर बसलो होतो. नंदाला ही जागा फार आवडत असे. मी काहीही न विचारताच नंदा सांगायला लागला. बराच वेळ तो एका पारशाच्या गोंडस पोराकडे पाहत होता. तो चारपाच वर्षाचा मुलगा आणि त्याचा बाप समुद्रात दगड फेकत होते. कितीतरी वेळ नंदा त्या बापलेकांचा खेळ पाहत होता. आणि एकाएकी तो बोलायला लागला. अगदी नाटकातले स्वगत बोलतात तसे. रेडिओ जसा श्रोत्यांची फिकीर न करता बोलतो तसा. ते बोलणे कोणालाही उद्देशून नव्हते.

"मी माझ्या वडलांबरोबर इथं असेच दगड फेकत होतो. तो वर बंगला दिसतो ना? हिलवर? ते आमचं घर होतं."

मी वर पाहिले. झाडीतून एका प्रासादाचे शिखर दिसत होते. पलीकडे माउंटमेरीचे चर्च होते.

"वर जाऊ या?"

मग मी निमूटपणे त्याच्यामागून चढण चढायला लागलो. त्या रस्त्याच्या दुतर्फा सुंदर बगीचे आहेत. आलीशान बंगले आहेत. मी मुंबईस इतकी वर्षे राहून तो भाग कधीच पाहिला नव्हता. ज्या भागात हिंडायला देखील कदाचीत पैसे लागतील ही भीती, त्याची माहिती मला कशाला असणार? पारशांची नि खोजांची गुटगुटीत मुले आणि मधूनच एखादी यौवन मिरवीत जाणारी फ्रॉकमधील पोरगी दिसत होती. पोरेदंगा करीत उतरत होती. आम्ही दोघे चर्चच्या दिशेने वर चढत होतो. नंदा आसपास काहीतरी ओळखीच्या खुणा शोधीत चालल्यासारखा पाहत पाहत चालला होता.

"तुला आठवतंय का रे लहानपणीचं?"

"तेच पाहतोय--" एका घराच्या फाटकाची पाटी पाहत तो म्हणाला.
"यस,इट इज देअर!"

"काय ते?"

"झोपाळा! इथं मी झोके घेत होतो. शिरीन नावाची मुलगी होती ती आमच्या बंगल्यात यायची. यस--- अजून ते लोक राहतात इथं!"तेवढ्याच त्या झोपाळ्याच्या दिशेने एक चारपाच वर्षाची संदर छोकरी धावत गेली.

"तुझ्या शिरीनची मुलगी असेल." मला फार वेळ काव्यमय वातवरणात राहता येत नाही.

"नाही!"

"कशावरून?"

"मी शेवटच्या वर्षी घरी आलो. आठ वर्षाचा होतो. सुट्टीत आलो होतो.शिरीनला टायफॉइड झाला आणि ती वारली."

"इतकं आठवतंय तुला?"

"टायफॉइड हा शब्द तेव्हापासून डोक्यात आहे माझ्या. त्यानंतर अनेक वर्षे मला माणूस मरताना त्याला टाइफॉइड होतो असं वाटे! फनी!" हे बोलताना नंदा त्या झोपाळ्यावरच्या मुलीकडे टक लावून पाहत होता. "पण त्याच फॅमिलीतली असणार."

"कशावरून?"

"तिचे डोळे आणि केस!"

"काय?"

"ही फजलमॉय फॅमिलीची ट्रेट आहे."

"जाऊ या का आत? तुझ्या ओळखीचं कोणीतरी असेल."

"आहे ना."

"कोण आहे?"

"माझी आई!"मी घेरी येऊन खाली पडलो कसा नाही, याचे मला आश्र्चर्य वाटते. नंदाच्या आईने त्याच्या वडिलांशी घटस्फोट घेऊन ह्या बंगल्यात दुसरा घरोबा केला होता.

"पुढे चल" मग काही वेळ न बोलता आम्ही पुढे गेलो. "हे आमचं घर."

व्हरांड्यातून एक अल्सेशियन कुत्रा भुंकायला लागला. "हेय- गोल्डी-गोल्डी!"असे पुकारीत एका युरोपियन बाईने त्या कुत्र्याला आवरले व आमच्याकडे जराशा संशयाने पाहिले.

"फार छान कुत्रा आहे तुमचा!"

नंदाचे सफाईदार इंग्रजी ऎकून, की त्याचे ते चाळिशीतही न ओसरलेले देखणेपण पाहून, कोण जाणे, ती बाई खूष झाली आणि मग तिने पाच मिनिटे कुत्र्याचे कौतूक केले. नंदा तेवढ्यात बाग पाहू लागला. बंगला जुन्या पद्धतीचा होता. व्हरांड्यात चौफेर कठडा होता आणि त्याच्या लोखंडी वेलबुट्टीवर इंग्रजी 'पी०' 'पी०' अशी अक्षरे होती. प्रधानातली ती 'पी' होती.

"आता कोणाच्या मालकीचा आहे हा?"

"ठाऊक नाही. वडलांनी विकला मला वाटतं"

"वडील कुठे असतात रे तुझे?" मला मौज वाटली, विस वर्षाच्या दोस्तीत हा प्रश्र्न मी त्याला आपण होऊन आज विचारीत होतो.

"बघायंच आहे?"

मी हो म्हणण्यापूर्वीच तो मला त्या चर्चपाशी घेऊन गेला. त्या चर्चच्या मागल्या बाजूला खिस्र्ती स्मशानभूमी होती. तिथे थडग्याथडग्यातून वाट काढीत आम्ही पुढे गेलो. एका थडग्यावर त्याच्या वडलांचे नाव होते! मुक्तिदिनाची वाट पाहत ते पडले होते! नंदा धर्माने खिस्र्ती आहे याची मला कल्पना नव्हती.

"तुझा धर्म खिस्र्ती आहे हे ठाऊक नव्हतं मला--"

"माझा? छे, छे, वडलांचा!"

"पण आई-वडिलांचा धर्म तोच मुलांचा नाही का?"

"आईनं इस्लाम स्विकारला, डॅडींनी मरताना खिश्र्चनिटी पत्करली. त्यांनी एका अमेरिकन बाईशी लग्न केलं होतं."

मला हे असह्य होऊ मागले होते. माझ्या एका मामेबहिणीने पोटजातीतल्या तरूणाशी लग्न केले तेव्हा आमच्या कुटुंबात काय गहजब उडाला होता! अजूनही ती आली की एखादी पराक्रमी वीरकन्या किंवा वाह्यात कुलबुडवी आल्यासारखे तिच्याकडे पाहतात! आणि इथे नंदा मला शांतपणे विजेचे झटके देत होता.

नंदाच्या आईने घर सोडल्यावर त्याच्या वडलांनी दारू प्यायला सुरूवात केली. इस्टेट 'कोर्ट ऑफ वॉर्डस' कडे होती आणि नंदा वयात येईपर्यंत त्याचा संभाळ कोर्टातली ती रुक्ष मंडळी करीत होती. 'घर' नावाच्या संस्थेचा आणि त्याचा संबंध आठव्या वर्षी कायमचा सुटला!

"डॅडी मला खाली खांद्यावरून घेऊन जायचे!"

त्या थडग्याकडे पाहत नंदा मला सांगत होता. "आणि आम्ही समुद्रात दगड फेकत होतो. ही वॉज ए नाइस सोल. नंदाने हे वाक्य उच्चारताना त्या थडग्यावरून असा काही हात फिरवला की, माझ्या अंगावर सर्रकन शहारा आला!

ह्या असल्या पार्श्र्वभूमीत वाढलेला हा नंदा माझ्याबरोबर त्या दिवशी कल्हईवाल्या पेंडशांच्या बोळात आला होता आणि एरंडीच्या पानाने थंडावण्या~या त्या वेलणकर थेरड्याने त्याचा काय विलक्षण अपमान केला होता!

दिवसेंदिवस मला नंदा नावाची एक देखणी वावरतेय असे वाटू लागले. माझे त्याचे काय गेल्या जन्मीचे ऋणानुबंध होते देव जाणे! तो आठवड्यातून नेमका शनिवारी मला फोन करून बाहेर काढीत असे. मी त्याच्या ताजमहालात मात्र कधीच गेलो नव्हतो. तो ऑफिसच्या दारात गाडी घेऊन यायचा. जोडीच्या कारकुनांना सोडून त्याच्या त्या गाडीत चढताना मला भारी संकोच वाटे. अनेक वेळा कचेरीत "कोण हो तुमचा तो पारशी दोस्त?" अशी पॄच्छाही झाली होती. मी "कॉलेजातला जुना मित्र आहे--"ह्यापलीकडे एक अक्षर बोललो नव्हतो. श्रावण्या,शनिवार, साईबाबा, राशी-गोत्रे-प्रवर वगैरे जपून ठेवणा~या आमच्या त्या सरकारी कचेरीतल्या सोवळ्यात बांधलेल्या लोणच्याच्या बरणीसारख्या विश्र्वात मी नंदाची कहाणी सांगितली असती तर नंदा बसलेल्या कचेरीतल्या खुर्चीवर लोकांनी गोमूत्र शिंपडले असते! कधीकधी मी गेटपाशी गेलो नाही तर नंदा आत येई आणि आमच्या त्या फायलींच्या ढिगा~यांनी लिडबिडलेल्या सेक्शनमधून त्याला बाहेरकेव्हा काढतो असे मला होई.

इतक्या दिवसांत मात्र इंदू वेलणकरचा विषय मी कटाक्षाने टाळला. नंदाच्या बोलण्याची, जीवनातले अंगावर शहारे आणणारे अनुभवदेखील अलित्पपणे सांगण्याची त-हा मला आता परिचीत झाली होती. एकदा माझ्या हातात एक मराठी कादंबरी होती.

"बघू! फार वर्षांत मी मराठी पुस्तकच पाहिलं नाही." त्याने बिगरीतली मुले वाचतात तसे एक एक अक्षर लावून कादंबरीचे नाव वाचले. "ती...मला... म्हणाली...ओ आय सी. काय म्हणाली?"

"अरे काय म्हणणार? 'माझं प्रेम आहे तुझ्यावर.' असं म्हणाली."

"चांगली आहे का नॉव्हेल?"

"साधारण! काहीतरी वाचायला लागतं वाचायला लागतं" मी उगीचच बचावाचे भाषण केले.

"प्रेम केलं काय? सिली! किती बाया पाहिल्या आहेत यानं?"

ती संध्याकाळ मी मात्र जन्मात विसरणार नाही. नंदा भर बॉंबहल्ल्यात लंडनमध्ये राहत होता. भुयारी रेल्वेच्या फलाटावर त्या वेळी माणसे जीव बचावण्यासाठी रात्रभर येऊन राहत. मॄत्युच्या जबड्यातुन सुटून मुंग्यासारखी माणसे एकमेकांना चिकटून
झोपत. तेव्हा प्रत्येक क्षण हा शेवटला क्षण होता. कुणीही कुणाच्याही मिठीत त्या वेळी केवळ भय विसरण्यासाठी विसावत, विलीन होत. तेथे वासनाहीन भेग होते; भीतीखेरीज दुसरी भावना जागत नव्हती. धर्म, नीती, सदाचार, पातिव्रत्य हे शब्द
तेव्हा रद्द केलेल्या चलनासारखे कागदाचे कपटे होऊन गटारात पडले होते. त्या वेळी जगात ज्याला कोणी कोणी नाही असा नंदा त्या मृत्युच्या तांडवाकडे नाटक पाहिल्यासारखा पाहत हिंडत होता.

"तू घाबरला नाव्हतास?"

"घाबरण्याच्या पलीकडली एक विचीत्र भावना असते. घाबरण्यालादेखील एक 'आपण जिवंत आहोत, जिवंत राहणार आहोत' असा आधार असावा लागतो. पायाखाली फळी असते ना एखाद्या लाकडी पुलावर? तसा. समज, ती काढली आणि तू अधांतरीच चालायला लागलास तर काय होईल? तसं होतं! प्रेतांच्या खचातून पहिलं प्रेत तूडवून जाईपर्यंत भीती असते; मग काही वाटत नाही. अरे, बाजूला कुणाची मांडी पडली आहे, हात उडालेला आहे, रस्त्याच्या दुतर्फा असलेली घरं जमीनदोस्त झाली आहेत, अर्धवट उभी आहेत त्यांतून एखाद्या पलंगच लोंबकळतो आहे, बर्फ पडून चिखल झाला आहे .... अशा वातवरणातदेखील एकदा एक लंडन युनिव्हर्सिटीचा म्हातारा प्रोफेसर, मी आणि बॉंब पडून उद्ध्वस्त झालेल्या समोरच्या घरातली एक तरूण पोरगी मिळून आमचा वादविवाद चालला होता."

"हसू नकोस! 'जगात प्रेम नावाची गोष्ट आहे की नुसती आसक्ती आहे?" प्रोफेसर म्हणत होता,`नाही. प्रेम आहे.' ती पोरगी म्हणत होती. `जगात फक्त प्रेमच आहे.' तिचं एका तरूण सैनिकावर प्रेम होतं आणि तो हिंदुस्थानात होता म्हणून ती खूष होती. कारण तिला तिथं युद्ध नाही याची खात्री होती. त्याला वाघ खाईल म्हणून ती भीत होती! मला विचारीत होती की, तुम्हा लोकांकडे जादू असते ना वाघ आल्यावर त्याला परत पाठवण्याची? मी तिला मग मंत्र सांगितला आणि म्हटलं, हा लिहून पाठव तुझ्या प्रियकराला!"

"कसला मंत्र"

"ओह स्टुपिड 'रघुपती राघव राजाराम'. तिला मी हे लिहून दिलं आणि सांगितलं की, मुंबईत कुठंही वाघ दिसला की, ही अक्षरं मोठ्यानं म्हणायची--"

"मुंबईत?"

"तो मुंबईत होता म्हणे--"

"बिचारी!"

"त्या पोरीनं आपल्याजवळची शेवटली दोन चॉकलेटं मला दिली."

"तू घेतलीस?"

"नाही. मी तिला सांगितलं की, हिंदुधर्मात जादू सांगणाराला अशी प्रेझेंट्स घेता येत नाहीत."

"आणि तुझी ही थट्टा बॉंबहल्ल्यात चालू होती?"

"मग काय करायचं? सुरुवातीला माणसं रडली, ओरडली मग पंधराच दिवसांत कंटाळली."

"नंदा, एक विचारू?"

"लग्न का केलं नाहीस? राइट?"

"हो!"

"केलं होतं मी लग्न."

"कुणाशी?"

"आता तुला काय सांगू?--- एका मुलीशी."

"अस्सं होय? मला वाटलं, इंग्लंडात फक्त मुलांचीच लग्नं होतात!"

"मग मुलींशी लग्न नाही होत तर कुणाशी?"

"अरे, पण तिला काही नाव-गाव?"

"तिला नाव होत--विल्मा. आणि गाव नव्हतं--फक्त देश होता, जर्मनी."

"जर्मन मुलगी पण तुला जर्मन भाषा येते?"

"त्यात काय अवघड आहे? पण तिला इंग्लिश येत होतं ना!"

"मग ठिक आहे."

"हं, ठिक आहे--आणखी काही प्रश्न?"

"रागवलास का बाबा?"

"नाही रे ! तुझा पुढचा प्रश्न सांगू?--हल्ली ती कुठं आहे?"


"खरंच तुला त्रास होत असेल तर नको सांगू. आपण दुसरं काहीतरी बोलू."

"अरे त्रास कसला? मी बर्लिनमध्ये राहत होतो. एका जर्मन रंगाच्या फर्ममध्ये होतो. तिथं ती राहत होती."

"तिथं तुमचं प्रेम जमलं--"

"कोण जाणे! पण आम्ही लग्न केलं. ती ज्यू होती. मग युद्ध सुरू झालं पुढचा प्रकार ऎकायचा आहे?"

"नको!"

यक्षांना शाप असतात हे वाचले होते मी. पण ह्या यक्षाला किती शाप होते!

"मग त्यानंतर तू लग्न नाही केलंस?"

"अरे ! लग्न लावायला भटजी, पाद्री, काजी--कोणीतरी जागेवर हवा ना? कोणीच नव्हतं. मग खूप लग्न केली मी. खूप प्रेमं केली. त्यांत काय? तीच वाक्ये--इंग्लिश, फ्रेंच, जर्मन भाषेत बोलायची आणि ऎकायची...तुझ्या ह्या नॉव्हेलमध्ये नाही का हे?"

मला त्या मराठी कादंबरीकाराची दया आली. स्वत:च्या धर्मपत्नीबरोबर 'एकी एक दुर्की दोन' करीत हिंदू कॉलनीतल्या गल्यांकडे आपल्या खिडकीतून पाहत जगणारा तो पापभीरू कादंबरीकार स्रिजातीबद्दल लिहीत होता. आणि इथे बॉंबहल्ल्यात वावटळीतल्या पानांसारख्या उडून आलेल्या असंख्य स्रियांना कल्पनातीत अवस्थेत पाहिलेला महाभाग माझ्यापुढे बसला होता! त्याची आई त्याला पाचव्या वर्षी सोडून दोन घरे पलीकडे टाकून संसार करीत होती. बॅरिस्टर बाप थडग्यात दारू आणि बाया मिळण्याची सोय का नाही याबद्दल मुक्तिदिनाच्या दिवशी देवाच्या उलटतपासणीला कोणत्या प्रश्नापासून सुरूवात करावी याची चिंता करीत पडला होता. नंदाने हलाहलाच्या घोटानेच जीवनाचे पहिले आचमन केले होते. कशाला तरी सदैव जपायचे एवढाच हेतू बाळगून जगणारा मी आणि "जपण्यासारखे जगात काही असते का?" असा प्रश्न करणारा नंदा! देवाच्या दुनियेतली एक अजब जोडी जमली होती. नियती तरी काय काष्ठे जमवते! वा!

नंदा जगण्यासाठी काय उद्योग करीत होता याची मात्र मला कल्पना नव्हती. भली मोठी मोटारगाडी होती. ताजमध्ये राहायचा. कदाचित बापाची प्रचंड इस्टेट शाबूत राहिली असेल.

आता मात्र आम्ही खूप मोकळेपणाने बोलते होतो. पण मला तो माझ्याबरोबर इतका वेळ का घालवतो याचे कोडे होते. एकदा मला तो ताजमहाल हॉटेलातल्या आपल्या खोलीत घेऊन गेला. ते वातावरण पाहून मी जवळजवळ भेदरूनच गेलो होतो. नंदा मात्र त्या वैभवात अत्यंत अलिप्तपणाने संचार करीत होता.

"आज आपल्याला बरोबर जेवायचं आहे."

"पण तुमच्या ह्या हॉटेलात जेवण्याचा पोशाख घालावा लागतो."

"डोंट वरी! तूच सांगितलंस ना भारत स्वतंत्र झाला म्हणून? तुझा हा वेष चालेल. अरे धोतर कुठंही चालतं!"

आणि त्या दिवशी प्रथम इंदू वेलणकर हा विषय निघाला. वीस वर्षापूर्वी ह्याच तारखेला आम्ही मोरेटोरमध्ये जेवायला गेलो होतो. माझ्या लक्षात तारीख नव्हती, नंदाच्या होती. हा योगी पुरूष भुतलाशी असला काही धागा ठेवून राहिला असेल अशी मला कल्पनाही नव्हती!

मी त्यांना कॅंपमध्ये सोडल्यानंतरचा सारा इतिहास त्याने मला सांगितला. युद्धाच्या त्या पेटत्या खाईत त्याच्या सर्वस्वाचा असंख्य वेळा नाश झाला होता; फक्त एक गोष्ट टीकून होती. ती त्याने एका पाकिटातून काढून माझ्यापुढे ठेवली! एक फार फार जुने पत्र होते. इंदूचे त्याला आलेले पत्र! इंदूने त्यात आपले अतं:करण मोकळे केले होते. मी पुस्तकातूनच काही प्रेमपत्रे वाचली होती. हे खरेखुरे प्रेमपत्र होते! वीस वर्षापूर्वीची त्याच्यावर तारीख होती. ते पत्र वाचता वाचता माझ्या डोळ्यांतून अश्रूंची धार लागली.

" ए वेड्या , रडतोस काय?" नंदा माझे सांत्वान करीत होता.

मला एकएकी नंदा वांद्रयाच्या समुद्रात दगड फेकणार्‍या पोराएवढा लहान वाटू लागला! माझ्या लहान मुलांना मी कुरवाळतो, त्यांची पाठ थोपटतो, त्यांचे मुके घेतो,त्याचे त्याला करावे असे वाटू लागले. पण वाटेल ते करून मन स्वच्छ करायला मी नंदा नव्हतो. कसली कसली सभ्यतेची, शिष्टाचारांची अनेक बंधने घेऊन हिंडणारा मी एक दुबळा कारकून होतो. फक्‍त माझ्या डोळ्यानी ही बंधने पाळली नाहीत. शेवटी ते पत्र त्याच्या हातात देऊन मी म्हणालो, " नंदा, जगात देव नाही आहे रे !"

"अरे जगात काहीच नाही! ज्या क्षणाला आपण श्वास घेत असतो ना, तेवढा क्षण असतो. ते बघ" - खिडकी बाहेरचा समुद्र दाखवीत मला तो म्हणाला, "तो समुद्र आहे ना ? त्यात आपल्याला काय दिसतं? लाटा दिसतात, त्या बोटी दिसतात. ते कोळी, ती बघ लहान होडी घेऊन निघाले आहेत. त्यांना काय दिसत? फक्त मासे दिसतात. ते आणि मासे - त्यांच्यात येणारी अडचण म्हणजे समुद्र ! जीवन जीवन ज्याला म्हणतात ना , ते आपल्या जन्मापासून मरणापर्यंत नुसतं असं आड येत असत. बाकी काही नसतं! कधी प्रचंड लाटा होऊन येत. कधी उगीचच मठ्ठ्पणानं आडवं पडून राहतं मग कंटाळा येऊ नये म्हणून आपण त्याला लेबल लावतो - प्रेम म्हणतो, बायको म्हणतो, आई म्हणतो, धर्म म्हणतो, देव म्हणतो - काय वाटेल ते म्हणतो. एरवी जीवन म्हणजे एक निरर्थक फसवी,वस्तू आहे, ह्या समुद्रासारखी"

"असं का म्हणतोस? इंदूची आठवण तुला होतेच की नाही?"

"अरे, तु कोळ्याचं प्रचंड जाळं जेव्हा समुद्रातून ओढून काढतात तेव्हा पाहिलं आहेस? त्या जाळ्यात अडकलेले मासेदेखील तेवढ्यातल्या तेवढ्यात छोट्या मासळीला मट्ट करून गटकावतात. पुअर सोल्स!"

"इंदूनं तुला का रे नकार दिला?"

"विल्माला हिटलरच्या शिपायांनी माझ्या देखत खेचून कां नेलं? उंदरालासुद्धा घाबरणारी विल्मा काय हिटलरला खाणार होती? तू पाह्यला हवं होतंस तिला---

"फोटो आहे तिचा?"

"अरे, कुणाकुणाचे फोटो ठेवू? आणि कशाला?"

"मग इंदूचं पत्र का ठेवलंस?"

"तुला खरं सांगू.... थांब--"

एक क्षणभर नंदा स्वस्थ बसला. गाणे सुरू करण्यापूर्वी गवई नुसत्या तंबो~याच्या स्वरात गुंगल्यासारखा बसतो तसा तो बसला होता. "तुला आठवतंय, आपल्या इंग्लिश ऑनर्सच्या मुलांची कार्ला केव्हजमध्ये ट्रिप गेली होती."

"चांगलीच आठवते! मधमाशांच्या मोहोळाला तू दगड मारलास आणि माश्या उठल्या होत्या. सगळ्यांना चावल्या--तोंडं ही~~ झाली होती सुजून ! फक्त मी सुटलो होतो. कारण मी वाटेतच बसलो होतो.

"एक चुकलं! इंदूला नव्हत्या चावल्या-- मला तर फोडून काढलं होतं मधमाश्यांनी. पुण्याला परतलो तेव्हा फ्रॅंकेस्टीनसारखं तोंड झालं होतं! स्टेशनात इंदू मला म्हणाली, `आता कुठं जाणार तुम्ही?' मी म्हटलं, 'आमच्या खोलीत.' `पण तुमच्याकडे पाहणार कोण?' मी विनोदानं म्हटलं, `तुम्ही पाहा.' आणि तुला ठाऊक आहे? ती वेडी मुलगी-- घरी गेली आणि रात्री माझ्या खोलीवर आली. रात्रभर माझं डोकं मांडीवर घेऊन बसली आणि वेड्यासारखी रडत होती. कारण तिला कोणीतरी माझी आई मला सोडून पळून गेली वगैरे सांगितलं होतं. आयुष्यात मला फक्त एक दिवसाचं बालपण मिळालं! आया आणि नॅनीच्या दमदट्यांत बालपण गेलं. क्वचित डॅडी शुद्धीवर असले की समुद्रावर घेऊन जायचे. बस्स!"

"पण कॉलेजमध्ये हे कोणालाच कळले नाही."

"पहाटे मी तिला तिच्या घरी सोडून आलो होतो."

"आणि तिचा थेरडा?"


"त्याला तिनं काय सांगितलं तीच जाणे! रात्रभर डोळ्याला डोळा न लागू देता ती बसली. वेडी! माझ्या तोंडाला स्नो फासला. पदरानं वारा घालीत होती. तुला काय सांगू, चमच्यानं मला चहा पाजला तिनं. त्या रात्री कित्येक वर्षांनी मी प्रथम रडलो. आणि त्या रडण्यातून कुणालाही कधीही न सांगितलेला माझा इतिहास तिला सांगितला. नोव्हेंबर महिना होता. थंडीत कुडकुडत ती पहाटे माझ्याबरोबर चालली होती. मी माझा कोट तिला घालायला लावला. ती ऎकेना. मग, ओ माय गॉडचाइल्डिश!"

"काय रे?"

"मी तिला शपथ घातली!"

"कुणाची?"

"माझी! आणि ती वेडी म्हणाली, सुटली म्हण, सुटली म्हण. मला असं काही म्हणतात ते ठाऊक नव्हतं. मी म्हटलं, आधी कोट घाल, ती म्हणे, आधी सुटली म्हण... मग मी सुटली म्हणालो. मी तिला विचारलं की, सुटली नाही म्हटलं तर काय होतं-- माणूस मरतो? तिनं चटकन माझ्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, आईचं दु:ख काय भयंकर असेल याची काल रात्री मला कल्पना आली! अशा चमत्कारिक कल्पना होत्या तिच्या. आम्ही लग्न करणार होतो रजिस्टर्ड! तू आमचा साक्षीदार आणि तिची एक मैत्रीण दुसरी साक्षिदार होणार होती. आणि लग्न झाल्यावर प्रथम ती मला... हसशील मला-- मलाही हसू येतंय-- काय वेडी पोरं होतो रे आपण... ती मला न्हाऊ घालणार होती. तीट लावणार होती... आणि झारीनं दुध पाजणार होती... असलं खुळं कोर्टींग केलं असेल का रे कुणी?... ही वेडी..." ते पत्र हातात धरून नंदा म्हणाला, "पण इथंही एक हिटलर आला. काही कारण नव्हतं. इंदू त्या रात्री त्याला सांगणार होती. पण तो म्हतारा हातात काठी घेऊन जागत बसला होता.

मी तिला दारात सोडलं आणि मला किंचाळी ऎकू आली. मी तसाच त्याच्या घरात घुसलो. त्या रिटायर्ड एज्युकेशनल इन्सपेक्टर हा बोर्ड बाहेर लावणा-या माणसानं तिला काठीनं मारायला सुरूवात केली होती. मी त्याच्या हातातली काठी खेचून त्याच्या तोंडात एक ठेवून दिली! म्हातारा कळवळून खाली पडला. आतून एक बाई धावत आली. इंदूपेक्षा थोडी मोठी असेल. ती त्या थेरड्याची तिसरी बायको! सगळी आसपासची माणसं गोळा झाली. आणि मी इंदूला म्हणालो, `चल, अश्शी चल माझ्याबरोबर.' म्हातारा तरातरा आत गेला. झोपलेली दोन पोरं ओढत आणली, दारात टाकली. पाळण्यातलं एक पोर आणून तिच्या पायाशी आदळलं आणि किंचाळून म्हणाला. `जा-- तुझ्या शिक्षणासाठी एवढे पैसे खर्च केले म्हतारपणी. ह्या तुझ्या भावंडाच्या पोटात दोन घास घालशील असं वाटलं होतं. तुडव त्यांना आणि जा दाराबाहेर!' असं म्हणून तो म्हातारा ओक्साबोक्शी रडायला लागला. इंदू `नंदा~~' म्हणून ओरडली आणि जिन्यातून वर पळत गेली. गेली ती गेली. त्यानंतर तिचं एक पत्र आलं होतं... ते गेलं कुठं तरी!"

"पण तू इथं आल्यानंतर भेटला नाहीस तिला?"

"मी? नाही"

"भेटावंसं वाटतं का तुला?"

"बहुधा नाही!"

"बहुधा नाही म्हणजे?"

"म्हणजे--खरं सांगू का तुला, मला काहीच वाटत नाही."

"मग तू मला कसा भेटतोस?"

"काही कळत नाही मला. कदाचित भेटणारही नाही."

"असं नको करू बाबा! तु नाही भेटलास तर मी येऊन दारात उभा राहीन तुझ्या!"

मग आम्ही खाली त्या मोठ्या हॉलमध्ये जेवायला गेलो. एका टेबलाशी तिघांच्या जेवणाचे काटेचमचे मांडले होते. मी एकदम दचकलो. इतक्यात एखाद्या संस्थानाच्या राणीसारखी दिसणारी बाई शुभ्र पोषाखात आली. पन्नाशीच्या पुढली होती. तिने नंदाच्या कपाळाचे चुंबन घेतले. मी लक्ष नाही असे दाखवत दुसरीकडे पाहू लागलो. तेवढ्यात त्या बाईच्या चेह-याकडे पाहताना डोळ्याकंडे लक्ष गेले आणि माझ्या लक्षात काहीतरी आल्यासारखे होत होते, आणि नंदाचे शब्द माझ्या कानांवर पडले--

"माझी आई!"

तिस-या रिकाम्या खुर्चीवर ती बसली.

अजुनही शनिवारी दुपारी टेलिफोनची घंटा वाजते आणि नंदा आपल्या त्या तश्शा आवाजात म्हणतो, "फाटकापाशी उभा राहा."
मी त्याची वाट पाहत फाटकाशी उभा राहतो.