Showing posts with label Black Hole-Marathi Novel. Show all posts
Showing posts with label Black Hole-Marathi Novel. Show all posts

जाकोब 'C' लेव्हलच्या खडकाळ गुहेत एका विहिरीशेजारी एका खडकावर बसला होता. त्याच्या बाजुला कागदपत्रांचा एक पुडका पडलेला होता आणि काही कागद पसरलेले होते. जाकोबच्या हातात एक खडकाचा तुकडा होता ज्याच्याकडे तो काळजीपुर्वक न्याहाळून पाहत होता. तो आता त्याच्या हातातल्या खडकाच्या तुकड्याला दुसऱ्या एका खडकाच्या तुकड्याने तोडायला लागला. जेव्हा तो एक खडकाचा तुकडा दुसऱ्या खडकाच्या तुकड्यावर आदळत होता तेव्हा त्यातून ठिणग्या निघत होत्या. बराच वेळ एकाग्रतेने तो ते खडकांचे तुकडे एकमेकांवर आदळत होता. अचानक तो भानावर आला तर कावरा बावरा होवून स्टेलाला आजुबाजुला बघून शोधू लागला. जेव्हा ती त्याला दिसली तेव्हा कुठे त्याच्या जिवात जिव आला.

स्टेला 'C2'विहिरीच्या काठावर उभी होती. ती विहीर जाकोब जिथे आपलं काम करीत होता तिथून जवळच होती पण मधे एक मोठा खडक आडवा होता. ती मधे मधे तिच्या हातातले कागद उकलून त्याचा संदर्भ घेत होती. तेवढ्यात तिला विहीरीच्या काठावर काहीतरी चिटकलेले दिसले. तिने जवळ जावून लक्ष देवून बघितले तर ते कपड्याचे धागे होते.

तेवढ्यात तिला मागून जाकोबचा आवाज आला, '' हे... काय करीत आहेस?''

'' काही नाही '' स्टेला म्हणाली.

' हे बघ... आताच काम करता करता माझी टूलकिट या विहिरीत पडली आहे... प्लीज ती मला आणून देतेस का?'' जाकोबने विचारले.

'' हं आलेच '' ती म्हणाली.

स्टेला जेव्हा त्याच्याजवळ आली तेव्हा जाकोब तिला म्हणाला, '' टूलकीट तर तू बघितलीच आहेना ... तो एक छोटा लाल रंगाचा बॉक्स आहे''

'' हो... मला माहित आहे '' स्टेला म्हणाली आणि 'C3' विहिरीच्या काठावर गेली, ज्यात जाकोबची टूलकीट पडली होती. दोन पावले मागे येवून तिने पटकन त्या विहिरीत उडी मारली. आता तिला ब्लॅकहोलमधे उडी मारण्याची चांगलीच सवय झालेली दिसत होती.

जाकोबला गुहेत दुरवर एका जागी जमिनीवर काहीतरी चमकतांना दिसलं. जाकोब आपल्या हातातला खडक बाजूला ठेवत तिथून उठला. आणि हळू हळू त्या चमकणाऱ्या वस्तूकडे जावू लागला. त्या वस्तूच्या जवळ जाताच त्याने त्या वस्तूवर आपल्या टॉर्चचा झोत टाकला. त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य तरळलं होतं. त्याच्या पुढ्यात जमिनीवर पडलेला तो एक पारदर्शक खडा होता ... अगदी त्याच्या मनगटावर बांधला होता तसाच. त्याने तो खडा उचलून घेतला. त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य अजुन खुललं होतं. त्याने तो खडा आपल्या मनगटावर बांधलेल्या खड्याच्या जवळ नेवून त्यांची एकमेकांशी तुलना केली.

'' माय गॉड! ... काय सुंदर खडा आहे!'' जणू तो स्वत:शीच बोलला.

'' आत्ता पर्यंत तु एकटाच होता ... बघ तुझ्यासाठी एक नवा सोबती आला आहे..'' तो जणू त्याच्या मनगटावर बांधलेल्या खड्याशी बोलत होता.

तेवढ्यात जाकोबच्या पाठीमागुन एक हात येवून जाकोबच्या खांद्यावर विसावला. दचकून जाकोबने दोन्ही खडे पाठीमागे लपवून वळून बघितले.

'' हे घे मी तुझी टूलकीट आणली आहे'' ती स्टेला होती.

स्टेलाला समोर पाहून जाकोबने सुटकेचा सुस्कारा सोडला.

'' ओह ... थॅंक यू... मला वाटलं... तू खरोखरंच मला भिती घातलीस...'' जाकोब म्हणाला.

स्टेलाने त्याची टूलकीट त्याला दिली.

'' हे बघ मला अजुन एक खडा सापडलाय'' जाकोबने आपली खडा असलेली मुठ स्टेलासमोर उघडली.

स्टेलाने तो खडा उचलून आपल्या हातात घेतला आणि ती त्याच्याकडे अगदी जवळून निरखून बघू लागली.

'' खरंच किती गोड खडा आहे हा!'' स्टेला म्हणाली.

स्टेलाने त्या खड्याला आपल्या मुठीत बंद केलं आणि 'C2'विहिरीकडे जात जाकोबला म्हणाली,

'' माझ्याजवळ थोडा वेळ राहू दे ''

'' थोडा वेळ नाही... नेहमीसाठीच असू दे ... तुझ्या मनगटावर बांध बघ त्याला'' जाकोब म्हणाला.

स्टेला जाता जाता थांबली आणि अत्यानंदाने म्हणाली, '' ओह.. थॅंक यू .. थॅंक यू सो मच''

जाकोब तिच्याकडे पाहून गोड हसला.

स्टेलाने त्या खड्याकडे मुठ उघडून पुन्हा एकदा पाहाले आणि ती त्या विहिरीकडे चालू लागली. जाकोब लोभसपणे तिला जातांना पाहत होता.

'' ऐक'' जाकोब म्हणाला.

स्टेला थांबून पुन्हा त्याच्याकडे वळून पाहू लागली.

'' काळजी घे... ज्या ब्लॅकहोलमध्ये तू पुर्वी कधी गेली नाहीस अश्या ब्लॅकहोलमध्ये जावू नकोस...'' जाकोब तिला एखाद्या आपल्या माणसाप्रमाणे सुचना देवू लागला.

'' हो...ठिक आहे '' स्टेलाने प्रतिउत्तर दिले.

क्रमश:...

पोलिस स्टेशनमध्ये पोलिस ऑफीसर ब्रॅट आणि त्याचा सहकारी समोरा समोर बसले होते. ब्रॅट अस्वस्थ दिसत होता. तो त्याच्या सहकाऱ्याच्या पुढ्यात टेबलवर एक फोटो टाकत त्याच्या खुर्चीवरुन उठला.

'' त्या गुन्ह्याचे शिल्पकार ... हे दोघंजणं आहेत ...'' ब्रॅट म्हणाला.

त्याच्या सहकाऱ्याने तो फोटो न्याहाळून पाहाला. तो स्टेलाचा आणि जाकोबचा कॉफी हाऊसमध्ये कॉफी घेत असतांनाचा फोटो होता.

'' मला शंका होतीच... पण आता खात्री झाली आहे... '' फोटोत जाकोबवर बोट ठेवीत ब्रॅट म्हणाला, '' की या माणसाचाच गिब्सनच्या गायब होण्यामागे हात आहे ''

'' तुम्ही असं कसं... म्हणजे एवढ्या खात्रीने असं कसं म्हणू शकता?'' त्याच्या सहकाऱ्याने विचारले.

ब्रॅटने अस्वस्थतेने त्याच्या टेबलभोवती एक चक्कर मारली आणि मग आपल्या रिकाम्या चेअरच्या मागे चेअरवर रेलून हात ठेवून उभा राहत तो म्हणाला, '' कारण.. त्यांची जवळीक जरा जास्तच वाढतांना दिसत आहे... सिझन नसतांना एखादं फुलाचं झाड बहरावं तसं त्यांचं प्रेम जरा जास्तच बहरतांना दिसत आहे... '' ब्रॅट कडवटपणे म्हणाला.

तिकडे ब्रॅट आणि त्याच्या सहकाऱ्यात चर्चा चालली होती, त्याच वेळी इकडे जाकोब आणि स्टेला गिब्सनचा शोध घेण्यासाठी ब्लॅकहोलमधून त्या खडकाच्या गुहेत पुन्हा शिरले होते. आपआपल्या टॉर्चच्या प्रकाशात ते सोबत सोबत समोर चालले होते.

'' तुला माहित आहे?... गिब्सन या सगळ्या भानगडीत का पडला?'' जाकोबने विचारले.

स्टेलाने त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत विचारले, '' कां पडला?''

'' ज्या वैज्ञानिकाने ही छोटी छोटी विश्व तयार केलीत, त्याचा ठाम विश्वास होता की ... जर का असे कृत्रीम विश्व तयार करता येत असतील तर नक्कीच या ब्रम्हांडात अशी खरीखूरी वेगवेगळी विश्व अस्तित्वात असली पाहिजेत... आणि जर आपण जसे या कृत्रीम विश्वात प्रवेश करु शकतो आणि बाहेरही पडू शकतो तसेच आपण खऱ्याखूऱ्या विश्वांमधे सुध्दा प्रवेश करुन बाहेर पडण्याचा काहीतरी रस्ता असला पाहिजे...'' जाकोबने तिला सविस्तर समजावून सांगितले.

'' तो त्यात यशस्वी झाला होता?'' स्टेलाने उत्सुकतेने विचारले.

'' नाही... असं वाटतं की तो शास्रज्ञ यशस्वी होण्याच्या आधीच गायब झाला... आणि गिब्सन त्याचं अपूर्ण राहीलेलं स्वप्न पुर्ण करण्याच्या प्रयत्नाला लागला'' जाकोब म्हणाला.

'' बापरे... म्हणजे गिब्सनही तर नाही ना त्या वैज्ञानिकासारखा गायब झाला?'' स्टेलाच्या चेहऱ्यावर काळजी आणि भिती दिसत होती.

जाकोबच्या चेहऱ्यावर या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे याचा संभ्रम दिसत होता.

क्रमश:...

आज चर्चमध्ये सगळी सुझान आणि डॅनियलच्या लग्नाची गडबड चालली होती. सुझान नवरीच्या शुभ्र पेहरावात अजुनच खुलून दिसत होती. डॅनियलही त्याच्या कोऱ्या करकरीत सुट - बुटात उमदा दिसत होता. जेव्हा चर्चच्या प्रिस्टने त्यांच्या लग्नाच्या सोहळयाला सुरवात केली दोघांचेही चेहरे भावी आयुष्याच्या स्वप्नाने जणू चमकत होते. त्यांचे मित्र, नातेवाईक आणि हितचिंतक जे चर्चमध्ये जमले होते, त्यांच्या चेहऱ्यावरही आनंद ओसंडून वाहत होता. त्या गर्दीतच एका जागी जाकोब स्टेलाच्या शेजारी उभा राहाला होता आणि तो समोर चाललेला लग्नसोहळा पाहत होता. त्याच गर्दीत एका कोपऱ्यात पोलिस ऑफीसर ब्रॅट उभा होता आणि तो स्टेला आणि जाकोबच्या हालचाली बारकाईने टिपत होता.

शेवटी प्रिस्टने लग्न सोहळा संपवून त्यांचं लग्न लागल्याचं जाहिर केलं. सुझान आणि डॅनियलने एकमेकांना किस केलं. समोर जमलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून त्यांच्या सदीच्छा आणि आनंद व्यक्त केला.

रात्री सुझान आणि डॅनियलच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी जोरात सुरु होती. पार्टीत एका कोपऱ्यात स्टेला आणि जाकोब काहीतरी चर्चा करीत होते. तेवढ्यात सुझानचं लक्ष त्यांच्याकडे गेलं

सुझानला पोलीस ऑफीसर ब्रॅटचे शब्द आठवले, '' एक्ट्रा मॅरायटल अफेअर''

ब्रॅटला आलेली शंका खरी तर नाही...

तिच्या मनात डोकावून गेलं. वाकडं तोंड करुन हळू आवाजात ती त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या डॅनियलला म्हणाली,

'' या माणसाला इथे कुणी बोलावलं?''

'' नाही ... मी तर नाही बोलावलं'' डॅनियलने खांदे उचकावीत पटकन उत्तर दिलं.

डॅनियल तिच्याकडे एक टक पाहत गमतीने म्हणाला, '' तुला माहीत आहे... मधमाशी ही नेहमी मधाच्या शोधात असते''

'' डॅनियल प्लीज ... माझा मुड खराब नको करुस... ही वेळ अश्या फालतू गमती करण्याची नव्हे'' ती वर वर तर म्हणाली पण तिची स्टेला आणि जाकोबबद्दलची शंका आता दृढ होत चालली होती.

रिसेप्शन पार्टी आता ऐन रंगात आली होती. लोक छोटे छोटे समुह करुन, हातात मद्याचे ग्लासेस घेवून गप्पा करीत होते. लॉनमध्ये मधेच कुण्या एखाद्या गृपमधून जोरात हसण्याचा आवाज येत होता. पोलिस ऑफीसर ब्रॅट संधी साधून स्टेला आणि जाकोबच्या एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या समुहात सामिल झाला.

'' हाय .. मिसेस फर्नांडीस...'' ब्रॅटने स्टेलाला अभिवादन केले.

'' हॅलो...'' स्टेलाने आपल्या गंभीर चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करीत प्रतिउत्तर दिले.

'' मी आपल्याला डिस्टर्ब तर करीत नाही?'' तिच्या डोळ्यात पाहत तो खोचकपणे म्हणाला.

'' ओह.. नाही ... बिलकुल नाही'' स्टेला म्हणाली.

स्टेलाने जाकोबला त्याची ओळख करुन दिली,

''जाकोब... मि. ब्रॅट''

दोघांनीही हस्तांदोलन केले.

'' नाईस टू मिट यू'' जाकोब म्हणाला.

'' यू टू'' ब्रॅट त्याचा हात जरा वाजवीपेक्षा जास्त जोराने दाबत म्हणाला.

'' हे पोलीस ऑफीसर आहेत आणि गिब्सनच्या केसवर काम करीत आहेत... आणि हा जाकोब ... गिब्सनचा मित्र'' स्टेलाने दोघांची एकमेकांना थोडक्यात माहिती सांगितली.

'' आपण आधी कधी भेटलो?'' ब्रॅटने जाकोबकडे निरखुन पाहत विचारले.

'' नाही ... मला नाही वाटत... म्हणजे मला तर आठवत नाही '' जाकोब आपल्या स्मरणशक्तीवर जोर देत म्हणाला.

तेवढ्यात सुझान तिथे त्यांच्या मधे घुसली.

'' सुझान आज तु फार सुंदर दिसते आहेस'' ब्रॅटने तिची तारीफ केली.

'' थॅंक यू'' सुझान लाजून म्हणाली.

तेवढ्यात काहीतरी आठवल्यासारखे करुन ब्रॅटने सुझानला म्हटले, ''सुझान ऍक्चूअली...''

आणि तिला गृपपासून बाजुला घेत गृपला म्हटले, '' ऍक्सूज अस प्लीज''

ब्रॅट सुझानला गृपपासून दूर बाजुला घेवून गेला.

सुझान आणि ब्रॅटची एका कोपऱ्यात काहीतरी कुजबुज चालली होती. तेवढ्यात डॅनियल तिथे आला.

'' आय होप... मी तुम्हाला डिस्टर्ब करीत नाही आहे'' डॅनियल म्हणाला.

'' नाही ... नाही ..'' ब्रॅट म्हणाला.

'' काय आहे ?'' सुझानने विचारले
डॅनियलने कुणीतरी पाठविलेला एक फुलांचा गुच्छ सुझानसमोर धरला. सुझानने तो घेवून त्यात खोसलेले कार्ड बाहेर काढले. त्या कार्डवर लिहिलेलं होतं, '' कॉग्रॅच्यूलेशन्स ऍन्ड हार्टली बेस्ट विशेस... फ्रॉम गिब्सन ... टू माय लव्हली सिस्टर ...'

बराच वेळ कुणीच काही बोललं नाही. फक्त एकमेकांकडे आश्चर्याने बघत राहाले.
क्रमश:...





















संध्याकाळची वेळ होती, सुझान आणि डॅनियल हातात हात गुंफून फुटपाथवर चालत होते.

एका कॉफी शॉपकडे पाहून डॅनियल म्हणाला, '' चल कॉफी घेवूया''

'' थकलास ... इतक्या लवकर .. ही तर सुरवात आहे डियर ... अजुन तर फार मोठा पल्ला गाठायचा आहे..'' सुझान त्याला चिडवित म्हणाली.

'' चालत राहाणंच जिवन नव्हे... जिवनात चालता चालता मधे मधे काही मैलाचे दगडही येत असतात... त्या मैलांच्या दगडांवर थांबने आणि मागे वळून आतापर्यंत आपण किती समोर पोहोचलो आहोत हे जाणण्यातही एक आनंद असतो...'' डॅनियल अगदी फिलॉसॉफीकल होवून बोलत होता.

'' असं म्हणतोस.. तर चल थोडी थोडी कॉफी घेवूया आणि पुन्हा ताजेतवाने होवून पुढचं मार्गक्रमण करुया...'' सुझान गालातल्या गालात हसत म्हणाली.

ते दोघेही कॉफी हावूसमध्ये शिरुन एका कोपऱ्यात एकमेकांच्या समोर बसले.

सुझानने एक कागद आपल्या पर्समधून काढला आणि त्यावर ती काहीतरी मोजत बसली.

' मला वाटते तुही तुझ्या मित्रांची यादी तयार केली असावी'' सुझान तिच्याजवळच्या कागदावर काहीतरी आकडेमोड करीत म्हणाली.

'' कशासाठी? '' डॅनियलने निरागसपणे विचारले.

सुझान एकदम तिची कागदावर चाललेली आकडेमोड थांबवून त्याच्याकडे रागाने पाहात म्हणाली, '' कशासाठी म्हणजे?... लग्नाच्या पत्रीका वाटण्यासाठी ... डॅनियल खरच तु किती अबसेन्ट माईंडेड आहेस.. आता कृपा करुन हे विचारु नकोस की कुणाचं लग्न?''

डॅनियल गोरामोरा झाला होता. पण तसं न दाखविता त्याने कॅफेत इकडे तिकडे पाहत वेटरला बोलावले. वेटर येवून अदबिने त्याच्याजवळ उभा राहाला.

'' दोन ब्लॅक कॉफीज प्लीज''

त्याने ऑर्डर दिली तशी वेटर तिथून निघून गेला.

सुझान पुन्हा आपल्या कामात मग्न झाली आणि डॅनियल कॅफेमधे इकडे तिकडे पाहू लागला. त्यांच्यापासून बरंच दूर, एकदम विरुध्द कोपऱ्यात, डॅनियलचं लक्ष आकर्षीलं गेलं.

'' सुझी'' डॅनियलने तिकडे पाहत सुझानला आवाज दिला.

सुझानने त्याच्यावर एक ओझरती नजर टाकली आणि पुन्हा आपल्या कामात मग्न झाली.

'' सुझी ... तिकडे कोपऱ्यात तर बघ'' डॅनियलने पुन्हा तिला हटकले.

सुझानने डॅनियलने निर्देशित केलेल्या कोपऱ्यात बघितले. त्या कोपऱ्यात जाकोब आणि स्टेला गहन विचारात आणि चर्चेत डूबलेले एकमेकांसमोर बसले होते. त्यांच्या समोर टेबलवर काही कागदही पसरलेले होते.

त्यांना पाहताच सुझानच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ती एकदम उठून उभी राहाली. आधीच जाकोब तिला एकदा समुद्र किनाऱ्यावर त्यांच्यावर वॉच ठेवतांना आढळला होता. तेव्हापासून तिच्या मनात जाकोबबद्दल एक तिव्र तिटकारा होता. आणि आता स्टेलाचं जाकोबसोबत असं कॅफेमध्ये येणं सुझानला बिलकुल आवडलेलं नव्हतं.

'' चल ... लवकर चल इथून ... आपण दुसरीकडे कुठेतरी जावूया'' सुझान बाहेर दाराकडे जात म्हणाली.

डॅनियलही तिच्या मागे मागे मुकाट्याने चालायला लागला.

क्रमश:...

जाकोब आणि स्टेला अजुनही 'A' लेव्हलच्या ब्लॅकहोलमध्ये होते.

'' चल आता परत जावूया'' जाकोब स्टेलाला म्हणाला.

जाकोब रस्ता बदलून एकीकडे चालू लागला आणि स्टेलाही रस्ता बदलून त्याच्या सोबत सोबत चालू लागली. जाकोबने चालता चालता आपल्या खिशातला 'तो' टेनिस बॉल बाहेर काढला. त्या बॉलवर काढलेलं मानवी कवटीचं चित्र स्टेलासमोर धरीत तो म्हणाला,

'' बघ हा बॉल आता आपल्याला बाहेर पडायचा रस्ता दाखवेल''

जॉकोबने तो बॉल खडकांच्या उतारावर दोन खडक एकाला एक लागुन तयार झालेल्या खाचेत ठेवला. तो बॉल उतार असल्यामुळे त्या खाचेत खाली घरंगळायला लागला. जाकोब त्या बॉलचा पाठलाग करायला लागला आणि स्टेलाही त्याच्या मागे धावू लागली.

'' आपण जर या बॉलचा पाठलाग केला तरच आपण बाहेर जावू शकू'' जाकोब गमतीने म्हणाला.

शेवटी तो बॉल घरंगळत जावून त्या गुहेतील एका विहिरीत पडला.

'' हिच ती विहिर आहे जिच्यात आपल्याला बाहेर पडण्यासाठी उडी मारावी लागणार आहे'' जाकोब म्हणाला.

जाकोबने स्टेलाचा हात पकडला आणि दोघांनीही त्या विहिरीत उडी मारली. आता स्टेला उडी मारण्यात पटाईत झाली असं दिसत होतं.

जाकोब आणि स्टेला आता त्या वाड्याच्या समोर विहिरीच्या शेजारी जमिनीवर पडले. दोघंही वर आकाशाकडे पाहत उठून उभे राहाले. इतका वेळ आत ब्लॅकहोलमध्ये त्यांना चारही बाजुला खडकाव्यतिरीक्त काहीही दिसलं नव्हतं. आता वर आकाश आणि आजुबाजुला मोकळं मैदान आणि झाडी पाहून त्यांना हायसं वाटलं. जाकोब तिथेच आजुबाजुला जमिनीवर टॉर्चच्या प्रकाशात काहीतरी शोधू लागला.

'' काय शोधतोस?'' स्टेलाने विचारले.

तेवढ्यात जाकोबला टॉर्चच्या उजेडात तो जे शोधत होता ते दिसलं असावं. कारण खाली वाकुन त्याने काहीतरी जमिनीवरुन उचललं. तो 'तो' टेनिस बॉल होता, ज्याच्यावर मानवी कवटीचं चित्र काढलेलं होतं.

आता दोघंही सोबत सोबत रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या आपल्या कारकडे चालू लागले.

'' तर मग... आपण कसे गिब्सनला शोधणार आहोत?'' स्टेला मुळ मुद्यावर आली.

'' त्याचाच तर आपल्याला आता विचार करावा लागणार आहे'' जाकोब आपल्याच धुंदीच चालत म्हणाला.

स्टेला त्याच्यासोबत चालत असतांना आश्चर्याने त्याच्याकडे पहायला लागली. तिला त्याच्या बेफिकीरपणाचं आश्चर्य वाटत होतं.

'' पण एक गोष्ट मला अस्वस्थ करतेय'' स्टेला म्हणाली.

'' कोणती?'' जाकोबने विचारले.

'' तो सडलेला आणि प्राण्यांनी कुरतडलेला माणूस त्या गुहेत जिवंत राहू शकला नाही ... तर गिब्सन जर त्या गुहेत अडकला असेल तर तो कसा काय जिवंत राहू शकतो?'' स्टेलाने जसे स्वत:लाच विचारले.

जाकोब काहीच बोलला नाही. कारण त्याच्याजवळ त्याचे काहीच उत्तर नव्हते.

क्रमश:...

जाकोबने स्टेलाच्या घड्याळाचा आणि त्याच्या घड्याळाचा टाईम जुळवून बरोबर 7 असा केला आणि स्टेलाची घड्याळ तिथेच 'A3'असं ज्या खडकावर कोरलं होतं त्यावर ठेवून दिली. नंतर स्टेलाकडे वळत तो म्हणाला, '' चल आता माझ्याबरोबर या ब्लॅकहोलमध्ये उडी टाक''

जाकोब तिला तिचा हात धरुन त्या विहिरीकडे नेवू लागला तसा स्टेलाने आपला हात सोडवून घेतला.

'' काळजी करु नकोस ... ही उडीही आधीच्या उडीसारखीच आहे...'' जाकोब तिला हिम्मत देण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.

शेवटी जाकोबने स्टेलाला याही ब्लॅकहोलमध्ये उडी मारण्यास तयार केलं आणि दोघांनीही 'A3'ब्लॅकहोलमध्ये उडी मारली. स्टेलाच्या किंकाळीचा आवाज सुरवातीला हळू हळू कमी झाला आणि मग अचानक बंद झाला.

जाकोब आणि स्टेला दोघंही एका दुसऱ्या खडकाळ गुहेत जमिनीवर खाली पडले. हळू हळू ते उठून उभे राहाले. स्टेलाने या गुहेत काहीतरी वेगळे असेल या आशेने आपल्या टॉर्चच्या प्रकाशात आजुबाजुला बघितले. जाकोबने उठल्याबरोबर आपल्या टॉर्चचा प्रकाश एका बाजुला टाकला. तिथे एक विहिर होती आणि त्या विहिरीच्या शेजारीच एक खडक होता. त्या खडकावर 'Exit' असं कोरलेलं होतं.

'' इथे फक्त एकच विहिर?'' स्टेलाने विचारले.

'' नाही अजुन एक आहे तिकडे... B1... का बरं? '' जाकोबने विचारले.

'' नाही ... असंच विचारलं'' स्टेला म्हणाली.

'' तुला विहिरीत उड्या मारण्याची चांगलीच मजा येत आहे असं दिसतं...'' जाकोब तिला चिडवित म्हणाला.

दोघंही एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात गोड हसले. जाकोब तर मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे तिच्या सौंदर्याने मोहून जावून तिच्याकडे एकटक पाहत होता. तिने पटकन आपली नजर दुसरीकडे वळवली.

जाकोब स्टेलाला ज्या विहिरीच्या बाजुला खडकावर 'Exit' असं कोरलेलं होतं तिथे घेवून गेला.

'' ही 'Exit' विहिर आहे, जिच्यातून आपल्याला 'A' लेव्हलला परत जायचं आहे ''

जाकोब आणि स्टेला आता 'Exit'विहिरीच्या अगदी काठावर उडी मारण्याच्या पावित्र्यात उभे होते.

'' असं होवू शकतं का की गिब्सन असाच एखाद्या ब्लॅकहोलमध्ये अडकला असेल?'' स्टेलाने विचारले.

'' हो... होवू शकतं'' जाकोब अगदी सहजतेने म्हणाला.

'' तर मग आपण सगळ्या लेव्हल्सच्या सर्व ब्लॅकहोलमध्ये गिब्सनचा शोध घेतला तर?'' स्टेलाने विचारले.

'' हं... बरोबर आहे तुझं... या परिस्थितीत कुणीही हाच विचार करेल... पण ते जेवढं वाटतं तेवढं सोप काम नाही आहे... ते फार जोखिमीचं काम आहे...''

स्टेला पुढे काही विचारण्याच्या आधीच जाकोबने तिचा हात आपल्या हातात घेवून 'Exit'विहिरीत उडीसुध्दा मारली.

जाकोब आणि स्टेला आता लेव्हल 'A' च्या गुहेत जमिनीवर खाली पडलेले होते. ते एकमेकांकडे बघत, गालातल्या गालात हसत उठून उभे राहाले. उठून उभा राहाल्याबरोबर जाकोब त्या 'A3'असं कोरलेल्या खडकावर ठेवलेल्या स्टेलाच्या घड्याळाजवळ गेला. जाकोबने ते घड्याळ उचललं आणि आपल्या घड्याळाशी जुळवीण्यासाठी जवळ धरीत म्हणाला,

'' बघ तुझ्या घड्याळात 7.15 वाजले आहेत तर माझ्या घड्याळात 8.15 वाजले आहेत...''

'' अरे खरंच की ... पण असं कसं?'' स्टेला त्या घड्याळाकडे बघत आश्चर्याने म्हणाली.

'' या ब्लॅकहोलच्या वेळेचं मोजमाप हे इथल्या मोजमापापेक्षा पुर्णपणे वेगळं आहे... इथले 15 मिनिट म्हणजे या ब्लॅकहोलमधील वेळेच्या 1 तासाबरोबर आहे... '' जाकोब स्पष्टीकरण देत होता.

'' बापरे... खरंच की ...किती अदभूत... अशाने तर माणूस त्याच्या एका जिवनात कितीतरी आयुष्ये जगु शकेल...'' स्टेलाला सगळं कसं विस्मयजनक वाटत होतं.

'' तुला किती आयुष्ये जगावीशी वाटतात?'' जाकोबने विचारले

'' गिब्सनशिवाय कितीही आयुष्ये जगली तरी त्याला गिब्सनसोबत जगलेल्या एका जिवनाची सर येणार नाही'' स्टेला गंभीर होवून म्हणाली.

जाकोबने तिच्याकडे प्रेमाने बघत तिची घड्याळ परत केली.

क्रमश:...

जाकोब आणि स्टेला आता त्या अंधाऱ्या गुहेत आपल्या हातातील टॉर्चचा प्रकाश टाकीत हळू हळू समोर जात होते. अजुनही त्या गुहेत असलेल्या हिंस्त्र पशूच्या अस्तीत्वाची जाणीव आणि भिती त्यांच्या मनात होतीच.

'' पण आपण हे इथे कुठे आहोत?'' स्टेलाने विचारले.

जाकोबने त्याच्या हातातील टॉर्चचा झोत एका खडकावर टाकला. त्या खडकावर मोठ्या अक्षरात 'A' असं कोरलेलं होतं.

'' आपण आता एका पुर्णपणे वेगळ्या विश्वात आहोत... फार वर्षापुर्वी एका भौतिकशास्त्राच्या वैज्ञानिकाने हे जग तयार केलं आहे...'' जाकोब म्हणाला.

स्टेला आश्चर्याने आणि अविश्वासाने त्याच्याकडे पाहत होती.

'' वेगळं विश्व? ... कसं काय?'' स्टेलाने विचारले.

आता ते बोलता बोलता त्या गुहेत कुठेतरी उपस्थित असलेल्या त्या हिंस्त्र श्वापदाविषयी विसरुन गेलेले दिसत होते.

'' ज्याच्यावर त्याचा विश्वास होता... ते त्यानं बनविलं'' जाकोब म्हणाला.

'' खरंच ... किती अविश्वसनिय वाटते'' स्टेलाच्या तोंडातून त्या गुहेत इकडे तिकडे पाहत असता आश्चर्योद्गार निघाले.

जाकोबने त्याच्या टॉर्चचा प्रकाशझोत त्या गुहेत पुन्हा सगळीकडे फिरविला. प्रकाशझोत फिरवित असतांना त्यांना त्या गुहेत बऱ्याच दुसऱ्या विहिरी दिसल्या. त्याने त्यातल्या एका विहिरीच्या शेजारी असलेल्या खडकावर आपल्या टॉर्चचा प्रकाश टाकला. त्या खडकावर मोठ्या अक्षरात 'A1' असे कोरलेले होते. दुसऱ्या एका विहिरीच्या शेजारी खडकावर 'A2'तर अजुन एका विहिरीच्या शेजारी खडकावर 'A3' असे लिहिलेले होते.

"" इथे तर बऱ्याच विहिरी दिसताहेत'' स्टेला म्हणाली.

'' त्या नुसत्या विहिरी नाही आहेत ... तर ते अजुन दुसऱ्या विश्वात प्रवेश करण्याचे रस्ते .. म्हणजे अजुन दुसरे ब्लॅक होल्स आहेत...'' जाकोब म्हणाला.

'' ब्लॅकहोल्स... बापरे म्हणजे ब्लॅकहोलच्या आत ब्लॅकहोल...'' स्टेला आश्चर्याने म्हणाली.

'' हो बरोबर आहे तुझं ... ब्लॅकहोलच्या आत ब्लॅक होल'' जाकोबने दुजोरा दिला.

'' आणि त्या ब्लॅकहोल्सच्या आत? '' स्टेलाने उत्सुकतेने आणि आश्चर्याने विचारले.

'' त्या ब्लॅकहोल्सच्या आत अजुन ब्लॅक होल्स'' जाकोबने उत्तर दिले.

'' त्या ब्लॅकहोलच्या आतही ब्लॅकहोल! ... खरोखर किती अविश्वसनिय!'' स्टेलाच्या तोंडून निघाले.

'' बाहेरच्या ब्लॅकहोलच्या आत हे सगळे ब्लॅकहोल्स... आणि यांच्या आत अजुन ब्लॅकहोल्स... आणि त्यांच्या आतही ब्लॅकहोल्स ... असं किती वेळा?... त्याला काही तर अंत असेल?'' स्टेलाने विचारले.

'' आहे ना... असं वाटतं की त्या वैज्ञानिकाने A B C D आणि E अश्या पाच लेव्हल्स तयार केलेल्या आहेत... म्हणजे A ब्लॅकहोलच्या आत B ब्लॅकहोल, B ब्लॅकहोल च्या आत C, C च्या आत D आणि D ब्लॅकहोल्सच्या आत E ब्लॅकहोल्स असे...'' जाकोबने तिला सविस्तर माहिती दिली.

'' पाच लेव्हल्स? ... माझा तर विश्वासच बसत नाही आहे... खरं म्हणजे कुणाचाही बसणार नाही'' स्टेला आश्चर्याने म्हणाली.

जाकोब आता ब्लॅकहोल 'A3' कडे जायला लागला. स्टेलाही त्याच्या मागोमाग जायला लागली.

'' तुला माहित आहे? ... या ब्लॅकहोलच्या आत एक जादू आहे... तुला बघायची आहे?'' जाकोबने विचारले.

'' जादू... हे सगळं काय जादूपेक्षा कमी आहे?'' स्टेला अजुनही चहूकडे आश्चर्याने पाहत म्हणाली.

जाकोब तिला तिचा हात धरुन 'A3' असं लेबल असलेल्या विहिरीजवळ नेत म्हणाला,

'' हे तर काहीच नाही ... तुला मी याहीपेक्षा मोठी एक जादू दाखवितो''

'A3' विहिरीजवळ आल्यानंतर जाकोब थांबला आणि स्टेलाकडे वळून म्हणाला, '' जरा तुझ्या हातातलं घड्याळ देतेस?''

स्टेलाने जाकोबकडे गोंधळून बघितले.

'' तुला जादू मी दाखविणारच आहे... आधी तुझ्याजवळचं घड्याळ तर दे'' जाकोब तिला गोंधळलेलं पाहून म्हणाला.

स्टेलाने आपल्या मनगटावरचे घड्याळ काढून जाकोबच्या हातात ठेवले.

जाकोबने ते त्याच्या मनगटावरच्या घड्याळासोबत मॅच केले आणि स्टेलाच्या घड्याळीची वेळ ऍडजेस्ट करीत म्हणाला, '' बघ दोन्हीही घडाळ्यात आता बरोबर संध्याकाळचे 7 वाजले आहेत''

स्टेला दोन्हीही घड्याळाकडे आलटून पालटून पाहात गमतीने म्हणाली , '' यात अशी कोणती जादू आहे?''

'' जरा धीर तर धरशील.. अजुन खरी जादू सुरुच व्हायची आहे'' जाकोब तिच्याकडे पाहात, गालातल्या गालात हसत म्हणाला.

तिही त्याच्याकडे पाहून हसत होती.

' ठिक आहे... '' स्टेला गंभीर होण्याचा अविर्भाव करीत म्हणाली.

जाकोब पुन्हा तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसला आणि तीही आपला गंभिरपणाचा अविर्भाव सोडून हसायला लागली.

क्रमश:...

स्टेला जेव्हा पुन्हा तिच्या भूतकाळातील विचारांच्या दूनियेतून वर्तमान काळात आली तेव्हा जॉकोबने कार हळू केली होती. त्यांची कार आता एका वाड्याकडे हळू हळू जात होती. स्टेला मंत्रमुग्ध झाल्यासारखी त्या वाड्याकडे बघायला लागली.

अरे हा तर हुबेहुब आपल्या स्वप्नात आलेलाच वाडा...

तिच्या डोळ्या समोरुन गिब्सन त्या वाड्यातून बाहेर येत आहे असे एक स्वप्नातले चित्र तरळून गेले.

'' हा तर तोच वाडा...'' स्टेलाच्या तोंडून आश्चर्याने निघाले.

स्टेलाने आजुबाजुला बघितले. आजुबाजुला शेतात सगळीकडे दाट झाडी आणि गवत वाढलेलं होतं.

'' ... आणि जागाही तिच'' स्टेला पुढे म्हणाली.

जाकोबने वाड्याच्या समोर रस्त्यावर एका कडेला कार थांबवली. स्टेला आणि जाकोब दोघंही कारमधून उतरले. जाकोबने उतरल्याबरोबर कारमधून आपल्या सोबत दोन टॉर्च घेतले. एक त्याने स्वत:जवळ ठेवला तर दुसरा स्टेलाकडे देत म्हणाला, '' हे असूदे... आत आपल्याला लागेल''

जाकोब वाड्याकडे जावू लागला. स्टेला गोंधळलेल्या मनस्थितीत आपल्या हातातला टॉर्च उलटून सूलटून बघत त्याच्या मागे मागे चालत होती.

'' तू इथे आधीही आलेला दिसतोस?'' स्टेलाने तो ज्या आत्मविश्वासाने त्या वाड्याकडे चालत होता त्यावरुन अंदाज बांधीत विचारले.

'' हो... एकदा .. गिब्सन सोबत..'' जाकोब चालता चालता उत्तर दिले.

'' कधी?'' स्टेलाने आश्चर्याने विचारले.

'' जवळ जवळ 15 दिवसांपूर्वी... '' जाकोब सरळ वाड्याकडे न जाता उजवीकडे वळत म्हणाला, '' इकडून ये... अशी ''

तो तिला वाड्याला लागुन उजवीकडे असलेल्या विहिरीजवळ घेवून गेला. विहिरीजवळ येताच पुन्हा स्टेलाला आश्चर्याचा धक्का बसला. पुन्हा तिच्या डोळ्या समोरुन तिच्या स्वप्नातला एक एक प्रसंग चलचित्राप्रमाणे तरळून जावू लागला ज्यात ती एका विहिरीच्या काठावर उभी होती. स्टेलाला गिब्सनच्या फाईलमध्ये ठेवलेलं विहिरीचं चित्रही आठवलं.

जाकोब तिला अजुन विहिरीच्या जवळ घेवून गेला.

'' ही विहिर बऱ्याच दिवसांपासून कुणी वापरत नसावं असं दिसतं..'' स्टेला म्हणाली.'

'' ही विहिर नाही आहे '' जाकोब मधेच म्हणाला.

'' ये ... बघ आत तर बघ..'' जाकोब तिला अजुन पुढे घेवून जात म्हणाला.

स्टेला भितभितच विहिरीच्या काठावर गेली. जॉकोब खाली वाकुन बघत तिलाही खाली बघण्यास मदत करु लागला.

'' तु जरा टॉर्चचा उजेड आत पाडशिल का?'' तिने त्याला सुचविले.

जॉकोबने टॉर्च लावून आत विहिरीत प्रकाशाचा झोत टाकला. स्टेला अजुन वाकुन आत बघु लागली.

'' तुला आत अंधाराशिवाय काहीएक दिसणार नाही... येथील खेडूत या विहिरीला 'ब्लॅक होल' म्हणतात.'' जाकोब म्हणाला.

स्टेलाने त्याच्याकडे आश्चर्याने पाहत विचारले, '' ब्लॅक होल?... म्हणजे?... असं काय आहे या विहिरीत?''

जॉकोब काहीही उत्तर न देता दोन पावलं मागे आला. स्टेलाही त्याच्या सोबत मागे आली.

'' आता तयार हो ... आपल्याला या विहिरीत उडी मारायची आहे'' जाकोब म्हणाला.

'' काय? ... उडी मारायची आहे?... काहीतरी बोलू नकोस '' स्टेला तो गंमत करीत असावा या अविर्भावाने म्हणाली.

जाकोब तिच्या शेजारी उभा राहून तिच्या होकाराची वाट पाहात तिच्याकडे एकटक पाहू लागला.

'' काहीतरी गंमत करु नकोस...'' ती म्हणाली.

'' मी गंमत नाही करीत आहे... खरंच आपल्याला आत उडी मारायची आहे.. चल लवकर ... माझ्यासोबत उडी मारण्यास तयार हो'' जाकोब गंभीरतेने म्हणाला.

जाकोबने हलकेच तिचा हात धरुन तिला विहिरीकडे नेण्याचा प्रयत्न केला. स्टेला पटकन आपला हात सोडवून घेत मागे सरली.

'' नाही .. नाही मी नाही येणार'' ती घाबरुन म्हणाली.

जाकोबने आपलं डोकं खाजवीत थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, '' ठिक आहे ... एक गोष्ट तर करशील?... तु इथे फक्त थांब... मी तुला उडी मारुन दाखवतो...''

जाकोब विहिरीकडे एक एक पाउल टाकीत जावू लागला. स्टेला अविश्वासाने त्याच्याकडे पाहत होती. जाकोबने एकदा वळून तिच्याकडे पाहाले, तिच्याकडे पाहून तो गालातल्या गालात हसला आणि अचानक त्याने विहिरीत उडी मारली.

क्रमश:...

संध्याकाळची वेळ होती आणि समुद्राच्या काठावर, बिचवर थंड हवा वाहत होती. बरीच प्रेमी जोडपी समुद्राच्या काठावर वातावरणाचा आस्वाद घेत जमली होती. सुझान आणि डॅनियल हातात हात घेवून बिचवर पसरलेल्या रेतीतून चालत होते. दोघंही काही न बोलता समोर दूरवर पाहत होती, जणू आपल्या भावी आयुष्यात डोकावीत असावीत.

'' आता जवळ जवळ पंधरा दिवस झाले आहेत ... माझ्या भावाचा अजूनही काही पत्ता लागत नाही ...'' सुझान गंभिरतेने म्हणाली.

डॅनियल तिच्याकडे बघायला लागला, जणू तिच्या भावना समजून घेत 'मीही तुझ्या दु:खात सहभागी आहे' असं तो म्हणत असावा.

'' सुझान... तू एवढी काळजी का करतेस ... आपण अटोकाट प्रयत्न करीत आहोतच की...'' डॅनियल तिला दिलासा देत म्हणाला.

'' जरी स्टेला नॉर्मल दिसत असली तरी... ती आतून अगदी कोलमडलेली आहे... तिला या स्थितीत मी पाहू शकत नाही ... कधी कधी तर रात्री बेरात्री उठून ती वेड्यासारखी रडत सुटते...'' सुझान म्हणाली.

'' मी तुला आधीपासूनच सांगत होतो...''

सुझानने डॅनियलकडे प्रश्नार्थक नजरेने पाहाले.

''.... की तीला एखाद्या चांगल्या मनोचिकित्सकाकडे घेवून जा,... तिला काऊंन्सीलींगची अत्यंत आवश्यकता आहे...'' डॅनियलने आपलं वाक्य पुर्ण केलं.

तेवढ्यात तिथेच बाजुला बसलेल्या एका माणसाने सुझानचं लक्ष आकर्षीत केलं. तो माणूस एका बेंचवर बसून वर्तमान पत्र वाचण्यात गुंग दिसत होता. पण तो वर्तमान पत्र वाचण्याचं नाटक करीत सुझान आणि डॅनियलवर लक्ष ठेवून होता असं तिला जाणवलं.

'' डॅनियल बघ... त्या माणसाकडे तर बघ''

डॅनियलने त्या माणसाकडे बघितले. त्या दोघांची नजरानजर होताच त्या माणसाने पटकन आपलं डोकं पेपरमध्ये खुपसलं.

'' बघ तो वाचण्याचं नाटक करतो आहे खरा .. पण त्याचं पुर्ण लक्ष आपल्याकडे आहे'' सुझान म्हणाली.

'' लंडनच्या प्लेनमध्ये बसून न्यूयार्कला जाण्याचा प्रयत्न करतोय साला'' डॅनियल उपरोधाने म्हणाला.

हे दोघं सारखे त्याच्याकडे पाहून काहीतरी चर्चा करीत आहेत हे लक्षात येताच तो माणूस तिथून उठला आणि काहीही झालं नाही या अविर्भावात तिथून निघून गेला. तो माणूस म्हणजे दूसरं तिसरं कुणी नसून जाकोब होता.

सुर्यास्त झाला होता आणि बिचवर अजुनच अंधारुन आलं होतं. आकाशात समुद्राच्या त्या टोकाला सुर्यास्ताची लाली अजुनही शिल्लक होती. बिचवर एका बाजुला सुझान आणि डॅनियलच्या दोन आकृत्या प्रेमाने एकमेकांना बिलगुन समुद्राच्या लाटांचा आनंद घेत होत्या.

डॅनियलने सुझानकडे एकटक पाहत म्हटले, '' हनी... मला वाटते ही अगदी योग्य वेळ आहे?''

'' कशाची?'' सुझानने विचारले.

त्याने तिच्या डोळ्यात बघत विचारले, '' आपण कधी लग्न करणार आहोत?''

सुझान अगदी सहजतेचा आव आणित म्हणाली, '' मला विचार करु दे...''

डॅनियल आश्चर्याने तिच्यापासून वेगळा होत म्हणाला, '' काय? ... म्हणजे?''

'' म्हणजे मला विचार करु दे की किती लवकरात लवकर आपण लग्नबद्ध होवू शकतो...'' सुझान गालातल्या गालात हसत म्हणाली.

'' ओह माय स्वीट सुझी'' आनंदाने तिला आपल्या बाहुपाशात ओढत डॅनियल म्हणाला. तो आता तिच्यावर आवेगयुक्त चुंबनाचा वर्षाव करु लागला होता.

क्रमश:...

सुझान अचानक गाढ झोपेतून जागी होवून आपल्या बेडवर उठून बसली. तिला जोर जोराने दार ठोठावण्याचा आवाज येत होता.

कदाचित याच आवाजामुळे आपल्याला जाग आली असावी...

ती एकदम उठून बेडवरुन उतरुन खाली उभी राहाली.

यावेळी कोण असावं ?...

बघण्यासाठी ती तिच्या बेडरुमच्या दरवाजाजवळ गेली. अजुनही ती अर्धवट झोपेतच होती. दरवाजा उघडून किलकिल्या डोळ्यांनी तिने बाहेर बघितलं. बाहेर कुणीच नव्हतं. तरीही दार ठोठावण्याचा आवाज येतच होता. आतामात्र तिची झोप पुर्णपणे उडाली होती. ती माग घेत आवाजाच्या दिशेने निघाली.

स्टेलाच्या बेडरुमजवळ येताच तिच्या लक्षात आले की स्टेलाचा दरवाजा आतून ठोठावला जात आहे. तिने स्टेलाच्या बेडरुमचं दार व्यवस्थित बघितलं तर त्याला बाहेरुन कडी घातलेली नव्हती.

तर मग ती दार आतून का ठोठावते आहे?...

दार जाम तर झालं नाही ना?...

तिने दार आत ढकलून बघितलं. पण तिच्या लक्षात आलं की स्टेलाही दार आतून ढकलीत आहे. जेव्हा सुझानने दार जोरात ढकललं तर ते उघडलं. दार उघडताच स्टेला भेदरलेल्या स्थितीत बाहेर आली. ती घामाने पुर्णपणे ओली झाली होती. बाहेर आल्याबरोबर ती सुझानला बिलगली.

'' काय झालं?'' सुझान तिला शांत करण्याच्या प्रयत्नात म्हटली.

'' कुणीतरी माझ्या खिडकीतून आत पाहत होतं... आणि दारही उघडत नव्हतं'' स्टेला कशीतरी म्हणाली.

ती अजुनही भ्यालेली होती.

सुझान स्टेलाच्या बेडरुमच्या दाराकडे पाहत म्हणाली, '' स्टेला तू वेडी आहेस का?''

स्टेलाने आश्चर्याने सुझानकडे पाहाले.

'' तुझ्या बेडरुमचं दार आत उघडतं... तू जर त्याला बाहेर ढकलशील तर ते कसं काय उघडेल?'' सुझानने तिला विचारले.

गोंधळून स्टेलाने उघड्या दाराकडे पाहाले. स्टेलाने पुन्हा सुझानला मिठी मारली आणि ती हमसून हमसून रडायला लागली. सुझान तिला थोपटून समजावण्याचा प्रयत्न करीत होती.

'' जेव्हा मी आठ वर्षाची होती तेव्हा माझी आई मला सोडून गेली... नंतर माझे वडील... तेव्हा मी तेरा वर्षाचे होते... आणि आता गिब्सनही मला एकटा सोडून गेला...'' स्टेला रडत रडत बोलत होती.

सुझान तिला समजावण्याचा प्रयत्न करीत होती, '' शांत हो... शांत हो... काळजी करु नकोस आपण त्याला शोधून काढू...''

... स्टेला जेव्हा पुन्हा तिच्या विचारांच्या दूनियेतून बाहेर आली तेव्हा जाकोब अजुनही कार चालवित होता. कार आता शहरापासून बरीच दूर आली होती. दोघांची पुन्हा नजरा नजर झाली.

'' कुठे चाललो आहोत आपण?'' स्टेलाने विचारले.

जाकोबने नुसते स्माईल देत तिच्याकडे पाहाले.

'' कुठे आहे तो?... तुला माहीत आहे का?'' स्टेलाने न राहवून पुढे विचारले.

'' सध्या तरी, तो जिवंत आहे का मेलेला आहे हे मी काहीही सांगू शकत नाही'' जाकोब म्हणाला.

स्टेलाच्या चेहऱ्यावर एक दु:खाची छटा पसरली.

'' पण तो जर जिवंत असेल ... तर आपल्याला त्याला शोधावे लागेल...आणि आपण त्यासाठीच चाललो आहोत...'' जाकोब म्हणाला.

क्रमश:...

.... स्टेला रस्त्यावर एकटीच चालत होती. तिने रस्त्यावर समोर पाहाले. पुढे दूर दूरपर्यंत कुणीही दिसत नव्हतं. तिने वळून मागेही पाहाले, मागेही दूर दूर पर्यंत रस्त्यावर कुणीही दिसत नव्हतं. तरीही ती तशीच समोर समोर चालत राहाली. अचानक तिला रस्त्याच्या बाजुला एका शेतात एक जुना वाडा दिसला. आपसुकच तिची पावले त्या वाड्याकडे वळली.

वाड्याच्या आत भिंतीवर तिला मोठ मोठे पोर्ट्रेटस लावलेले दिसत होते. प्रत्येक पोर्ट्रेट जणू गुढ काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत असावं असं तिला वाटत होतं. एका भिंतीवर तिला एक प्रिझमसारखं काहीतरी कोरल्यासारखं दिसलं. तिने त्या कोरलेल्या प्रिझमला हात लावून बघितला. बराच वेळ ती त्या प्रिझमला स्पर्ष करीत चाचपडून पाहत होती. जणू त्या स्पर्षाची जाणीव ती मनात साठवून घेत असावी.

अचानक वाड्यात तिला कुणाच्या तरी उपस्थितीची जाणीव झाली. तिने आजुबाजुला पाहाले. तिला वाड्यात एका कोपऱ्यावर एक सावली दिसली आणि तिने पाहताच ती सावली पुढे निघून गेली. ती त्या सावलीचा पाठलाग करायला लागली. तिला मनात कुठेतरी वाटत होतं की ती सावली गिब्सनचीच असावी.

'' गिब्सन '' स्टेलाने आवाज दिला.

अचानक ती सावली अंधारात नाहीशी झाली.

'' गिब्सन '' स्टेलाने अजुन जोरात आवाज दिला.

हाका मारीत तिने पुर्ण पॅसेजमध्ये शोधलं पण ती सावली दिसत नव्हती की गिब्सन.

अचानक दुरवरुन तिला वाड्याचा मुख्य दरवाजात काहीतरी हालचाल दिसली. ती मुख्य दरवाजाकडे धावली. दरवाजाजवळ पोहोचून ती वाड्याच्या बाहेर आजुबाजुला बघायला लागली. वाड्याच्या समोर एका झुडपाजवळ तिला काहीतरी हालचाल दिसली. म्हणून ती त्या झुडपाकडे धावत सुटली. अचानक तिला जाणवले की आपण एका विहिरीच्या बाजुने जात आहोत. तिने विहिरीकडे बघितले. त्या विहिरीला एका काळ्या खडकाच्या ठिगाने घेरले होते. तेवढ्यात तिला तिच्या मागे काहीतरी हालचाल जाणवली. तिने वळून बघितले तर गिब्सन वाड्यातून बाहेर येत होता. तिही हळू हळू त्याच्याकडे चालायला लागली. अचानक एक लख्ख प्रकाशाचा झोत गिब्सनवर पडला. त्या प्रकाशाच्या झोतामुळे गिब्सनची सावली जमिनीवर पडली होती. पण हळू हळू ती जमिनीवर पडलेली गिब्सनची सावली नाहीशी झाली. ती अजुन वेगाने... जवळजवळ त्याच्याकडे धावायला लागली. पण ती जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत गिब्सनही हळू हळू नाहीसा झाला होता. तो जिथे उभा होता तिथे ती पोहोचली. आणि पाहते तर जिथे गिब्सन उभा होता तिथे जमिनीवर एक पारदर्शक खडा पडलेला होता. तिने तो खडा उचलला आणि त्या खड्याकडे पाहत ती दु:खाने हंबरडा फोडत रडायला लागली.

... जेव्हा आपल्या हाताकडे पाहत स्टेला झोपेतून उठली तेव्हा तिला कळले की आपण पाहत होतं ते एक स्वप्न होतं. तिने पुन्हा आपल्या हाताकडे पाहाले. हातात काहीच नव्हते. तिने भेदरलेल्या चेहऱ्याने आपल्या आजुबाजुला पाहाले, तेव्हा तिच्या लक्षात आले की ती आपल्या बेडरुमध्ये बेडवर झोपलेली होती.

ती बेडवरुन खाली उतरली. अचानक तिला जाणीव झाली की तिच्या बेडरुमच्या खिडकीतून कुणीतरी डोकावून पाहत आहे. तिने खिडकीकडे बघितले तर तिला कुणीतरी एकदम खाली बसून लपल्यासारखे जाणवले. ती जशी जशी खिडकीजवळ जावू लागली तशी एक सावली तिथून पटकन उठून पळाली. ती आता घाबरली होती. ताबडतोब ती आपल्या बेडरुमच्या दरवाजाकडे झेपावली.

क्रमश:...

ड्रॉईंग रुममध्ये सुझान आणि पोलिस अधिकारी ब्रॅट समोरा समोर बसले होते.

'' तुला काय वाटते?'' अचानक काहीही संदर्भ न देता ब्रॅटने सुझानला प्रश्न विचारला.

गोंधळून सुझानने त्याच्याकडे बघितले.

'' म्हणजे... गिब्सन कुठे गेला असेल?'' ब्रॅटने स्पष्ट करुन विचारले.

'' नाही ... मला तर बिलकुलच काही अंदाज नाही... तसं पाहलं तर तो नेहमीच फार प्रॉम्ट असायचा... दोन तिन तासांकरीता सुध्दा जर त्याला उशीर होत असला तरी तो फोन करुन सांगायचा... '' सुझान म्हणाली.

'' तुही तेच तेच सांगत आहेस जे तुझ्या वहिनीने सांगितलं'' ब्रॅट उपहासात्मकरीत्या म्हणाला.

'' खरं म्हणजे असं पुर्वी कधी झालंच नव्हतं...'' सुझान म्हणाली

'' त्याच्या किडन्यपींगच्या शक्यतेबद्दल तुझे काय मत आहे? ब्रॅटने विचारले.

'' त्याला कोण किडन्यप करु शकतो?'' सुझानने जणू स्वत:लाच प्रश्न विचारला.

'' कुणी त्याचा शत्रु... कुणी दुष्मन...'' ब्रॅटने सुचवले.

'' नाही ... मला नाही वाटत... शत्रुचंतर सोडाच त्याला विशेष मित्रसुध्दा नाहीत... त्याच्या स्वभावच तसा आहे... थोडा लाजाळू थोडा एकलकोंडा...'' सुझान म्हणाली.

ब्रॅट आपलं डोकं खाजवू लागला, कदाचित काही विचार करीत असावा.

'' त्याचं वैवाहीक जिवन कसं होतं?... आय मीन ... तो त्याच्या वैवाहीक जिवनापासून खुश होता?'' ब्रटने त्याचा मोर्चा आता दुसऱ्या शक्यतेकडे वळविला.

'' ऍब्सुलेटली... '' सुझानने एक क्षणही विचार न करता उत्तर दिले.

'' स्टेलाचा दृष्टीकोण त्याच्या बाबतीत कसा आहे?'' ब्रॅटने पुढे विचारले.

'' चांगला आहे ... म्हणजे ती नेहमीच त्याच्याशी एखाद्या मित्राप्रमाणे राहाली आहे'' सुझान म्हणाली.

'' स्टेलाबद्दल काही शंका घेण्याजोगं ?'' ब्रॅट ने विचारले.

'' शंका घेण्यासारखं... म्हणजे तुम्ही तिच्यावर शंका घेत आहात की काय?... ती एकदम साधी आहे... तुम्ही जी तिच्याबद्दल शंका घेत आहात तसं करण्याचं तर सोडूनच द्या ... ती कधी तसला विचारही करु शकत नाही'' सुझानने अगदी स्पष्टपणे तिचे स्टेलाबद्दलचे मत मांडले.

'' नाही, तसं नाही... माझी शंका थोडी वेगळ्या प्रकारची आहे'' ब्रॅट त्याचं मत अजुन स्पष्ट करुन मांडण्याचा प्रयत्न करु लागला.

'' वेगळी ... म्हणजे .. तुम्हाला म्हणायचं तरी काय आहे?'' सुझानने आश्चर्य व्यक्त करीत म्हटले.

'' म्हणजे ... बघ असं आहे ... काही विवाहबाह्य संबंध वैगेरे.. किंवा तसंच काहीतरी '' ब्रॅटला त्याची शंका व्यक्त करतांना अवघड जात होतं.

'' नाही .. नाही ... तसं काही शक्यच नाही..'' सुझान ठामपणे म्हणाली.

सुझानला ब्रॅटने असे तिच्या वहिणीचे धिंडवडे उडवावे हे काही योग्य आणि आवडलेलं दिसत नव्हतं.

'' माफ करा ऑफीसर ... पण मला वाटतं तुम्ही जरा मर्यादा ओलांडून बोलत आहात...'' सुझान रागाने लाल लाल झाली होती.

पण पुढे तिचा राग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत ती म्हणाली, '' .. म्हणजे ... मला वाटतं तुम्ही तुमचा तपास चूकीच्या दिशेने करीत आहात... तिच्याकडे जरा बघा... आणि विचार करा... ती अश्या काही गोष्टी करु शकते का? ''

ब्रट विचित्रपणे गालातल्या गालात हसत म्हणाला, '' तुला माहित आहे... दाखवायचे दात आणि खाण्याचे दात हे नेहमी वेगळे असतात''

'' हिरवा चष्मा घातलेल्या माणसाला सगळीकडे हिरवळच दिसते'' सुझानही रागानेच म्हणाली.

'' हे बघा .. .मिस...?'' ब्रॅट जणू तिचं नाव आठवत नाही असा अविर्भाव करुन म्हणाला.

'' सुझान .. मिस सुझान..'' सुझानने मधेच त्याला आपल्या नावाची आठवण करुन दिली.

'' हो... मिस सुझान... मी तुमच्या भावना समजू शकतो... पण माझा नाईलाज आहे... हा माझ्या नेहमीच्या तपासाचा भाग आहे...'' ब्रॅट म्हणाला.

सुझान आपला राग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होती आणि त्या प्रयत्नात ती खिडकीच्या बाहेर बघत आपल्या बोटांची नखं दाताने कुरतडत होती.

'' तुम्ह जरा शांत व्हा ... जस्ट रिलॅक्स '' ब्रॅटने तिचा रागाने लाल लाल झालेला चेहरा बघून तिला शांत करण्याचा प्रयत्न केला.

त्याचवेळी ती अश्या नाजुक प्रसंगी अजुन काही महत्वाचं बोलू शकते हीही शक्यता तो धरुनच होता.

पण त्याच्या अपेक्षेच्या विपरीत सुझान काहीएक बोलली नाही.

ब्रॅट जाण्यासाठी उठून उभा राहाला.

'' ठिक आहे तर मग... मी निघतो... तुला काही महत्वाचं मला सांगण्यासारखं ... '' ब्रॅट आत घराच्या पडद्याकडे अर्थपूर्ण नजरेने पाहत पुढे म्हणाला, '' ...किंवा काही लपविण्यासारखं आढळल्यास मला फोन करण्यास विसरु नकोस''

'' हो जरुर '' सुझानही उठून उभी राहत म्हणाली.

ब्रॅट दरवाजाकडे निघाला आणि जाता जाता अचानक एकदम थांबला, पुन्हा त्याने घराच्या आत पाहाले. त्याने आजुबाजुला आपली नजर फिरवली आणि आत दारचा पडदा हलल्याचं त्याच्या सतर्क नजरेतून सुटू शकलं नाही.

तो पुन्हा वळला आणि भराभर लांब लांब पावले टाकीत निघून गेला. सुझान त्याला बाहेर पर्यंत सोडविण्यास त्याच्या सोबत गेली.

क्रमश:...

सुझान पोलिस ऑफीसर ब्रॅटला घराच्या बाहेरपर्यंत सोडायला आली. पण बाहेर आल्यावर तो पुन्हा दरवाजाजवळ घूटमळायला लागला. कदाचित त्याला अजुन काही बोलायचे असावे म्हणून सुझान थांबली.

तेवढ्यात घराच्या फाटकासमोर एक बाईक येवून उभी राहाली. गाडीस्वाराने आपली हेलमेट काढली. तो सुझानचा मित्र डॅनियल होता. दारात ब्रॅट आणि सुझानला पाहून तो तिथेच थांबला आणि गाडीवर बसून राहाला. ब्रॅटने पुन्हा आपल्या चिकित्सक नजरेने डॅनियलकडे पाहत विचारले,

'' कोण तो?''

'' माझा मित्र .. डॅनियल'' सुझानने उत्तर दिले.

ब्रॅटने डॅनियलकडे थोड्या विचित्र नजरेने पाहत दबलेल्या आवाजात म्हटले.

'' आय सी... तहानलेला बरोबर विहिरीवर आलेला दिसतो''

'' काय? .. तुम्ही काही म्हणालात?'' सुझानने त्याची अस्पष्ट बडबड ऐकत म्हटले.

'' नाही ... काही नाही'' ब्रॅट पुन्हा सुझानकडे पाहत म्हणाला.

पुन्हा ब्रॅट तिथून निघून जाण्याच्या पावित्र्यात सुझानला म्हणाला,

' स्टेलाची काळजी घे... ती सध्या एका मोठ्या धक्यातून जात आहे... म्हणजे वरुन तसं 'वाटते' तरी...''

ब्रॅटने 'वाटते' या शब्दावर जरा जरुरीपेक्षा जास्त जोर दिलेला कुत्सीत स्वर सुझानच्या लक्षात आला होता.

'' 'वाटते'... म्हणजे तुम्हाला काय सुचवायचं आहे?'' सुझानने प्रतिवाद करीत विचारले.

ब्रॅट गेटकडे निघाला होता तो पुन्हा ब्रेक लागल्यागत थांबला आणि अर्थपूर्णपणे हसत सुझानकडे वळत म्हणाला,

'' ते काय आहे... जगात सर्वात मोठा कलाकार कोण असतो?... माहित आहे?'' ब्रॅटने विचारले.

सुझानने गोंधळून त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहाले.

आता हा अजुन काय बरळतो आहे?...

तिला काही समजत नव्हते.

तो काही पावलं गेटकडे चालत जावून पुन्हा थांबला आणि तिच्याकडे वळून म्हणाला,

'' गुन्हेगार हा जगात सर्वात मोठा कलाकार असतो..''

ती काही बोलायच्या आधीच तो भराभर पावले टाकीत गेटच्या बाहेर सुद्धा गेला होता.

गेटच्या बाहेर गेल्यावर तो पुन्हा बाईकवर बसून तिथेच थांबलेल्या डॅनियलजवळ थांबला. त्याच्या अगदी जवळ जावून त्याने त्याच्या खांद्यावर थोपटल्या सारखे केले आणि त्याची कॉलर व्यवस्थित केल्यासारखी केली.

डॅनियलला हा काय प्रकार आहे काही समजत नव्हते. तो फक्त गोंधळून त्याच्याकडे पाहत होता.

एकदम पुन्हा ब्रॅट वळून भराभर आपले पावलं टाकीत आपल्या जिपकडे निघाला. डॅनियल अजुनही गोंधळून ब्रॅटच्या जिपकडे जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता.

ब्रॅटची जिप सुरु झाली आणि वेगात तिथून निघून गेली. डॅनियल आपल्या चेहऱ्यासमोर आलेली धूळ आणि धूर हाताने टाळण्याचा प्रयत्न करीत त्या जाणाऱ्या जिपला बघू लागला.

क्रमश:...

...जेव्हा स्टेला आपल्या विचारांतून भानावर आली तेव्हा तिच्या लक्षात आले की जाकोब कार ड्राईव्ह करीत आहे आणि ती त्याच्या शेजारच्या सिटवर बसली आहे. ती पुन्हा समोर रस्त्यावर बघायला लागली. जाकोबने एक खोडकर कटाक्ष तिच्याकडे टाकला.

'' काही दिवसापुर्वीच गिब्सन माझ्याकडे आला होता'' जाकोब म्हणाला.

'' तुझ्याकडे?... तो तुला भेटला होता?'' स्टेलाने उत्सुकतेने विचारले.

त्याने फक्त मान हलवून होकार दिला.

'' कशाच्या संदर्भात?'' तिने विचारले.

पण जाकोबने काहीच उत्तर दिले नाही. जणू त्याला काही ऐकूच आले नाही.

तिने विचार केला की त्याला ड्राईव्ह करतांना विचारने योग्य होणार नाही. म्हणून ती पुन्हा सरळ समोर रस्त्यावर पहायला लागली. आणि पाहता पाहता पुन्हा विचारांच्या दूनियेत हरवून गेली ....

.... स्टेला ड्राईंगरुम मध्ये बसलेली होती आणि तिच्या समोर सोफ्यावर एक पोलीस अधिकारी ब्रॅट बसला होता. ब्रॅट साधारण सदतिशीतला अंगाने जाड, उंची पोलिसांत भरती होण्यास लागेल एवढी जेमतेम उंची, असा पोलिस अधिकारी होता. स्टेला अजुनही शुन्यात पाहत विचार करीत होती. तो पोलिस अधिकारी काळजीपुर्वक तिचे सगळे हावभाव टीपत होता.

'' हं तर तुम्ही काय सांगत होतात?'' ब्रॅटने आपल्या नोटबूकमध्ये काही नोंदी घेतल्या आणि समोर ठेवलेल्या पाण्याच्या ग्लासमधून एक घोट घेत तिला पुढे विचारले.

स्टेला तिच्या विचारांतून भानावर येत एक उसासा टाकीत पुढील हकिकत सांगू लागली, '' तो गाडीतून निघून गेला... आणि मी त्याच्या गाडीच्या मागे धावत त्याला आवाज देत होती... पण त्याने मागे वळून सुद्धा पाहिले नाही... एकदासुध्दा नाही... आता जवळपास एक हप्ता होत आहे ... तो तर आलाच नाही पण त्याचा साधा फोन किंवा निरोपही आला नाही...''

ब्रॅट त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास परत ठेवण्याच्या बेतात होता, त्याने तो ग्लास तसात हातात धरीत विचारले, '' तेव्हापासून कुणी त्याच्यासाठी फोन वैगेरे केला का?''

'' नाही'' स्टेला म्हणाली.

ब्रॅटने तिच्याकडे पाहत त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास परत समोर टेबलवर ठेवून दिला. आता तो खोलीत ठेवलेल्या एकेका वस्तूंवरुन आपली नजर फिरवायला लागला. खोलीत एका भिंतीवर लावलेल्या एका कॉलेजातल्या मुलीच्या फोटोने त्याचं लक्ष वेधून घेतलं.

'' ती कोण आहे?'' ब्रॅटने विचारले.

'' सुझान ... माझी ननंद'' स्टेलाने उत्तर दिले.

'' ती काय करते?'' ब्रॅटने त्या फोटोकडे एकटक पाहत पुढे विचारले.

'' एम. बी. ए. लास्ट इयर '' स्टेलाने उत्तर दिले.

'' मी तिच्याशी बोलू शकतो?'' ब्रॅटने आपल्या कपाळावर खाजवित विचारले.

'' सुझान...'' स्टेलाने घरात जोरात आवाज दिला.

'' म्हणजे... खाजगीत'' ब्रॅट म्हणाला.

त्याचा रोख लक्षात येवून स्टेला जागेवरुन उठली आणि जड पावलाने आत जावू लागली.

'' दोन मिनीट... मी पाठवते तिला.'' म्हणत स्टेला आत गेली.

ब्रॅट स्टेलाच्या हळू हळू आत जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता.

क्रमश:...

स्टेलाच्या घराची बेल वाजली. तिने समोर जावून दार उघडले तर दारात गिब्सन होता. तो दार उघडल्याबरोबर तिच्याकडे विशेष लक्ष न देता घरात आला. स्टेला त्याच्याकडे सारखी एकटक पाहत होती. त्याचा चेहरा मलिन आणि दाढी वाढलेली होती.

'' कुठे होतास?'' तिने विचारले.

गिब्सन काही बोलला नाही.

'' ना फोन ना काही निरोप'' ती पुढे म्हणाली.

तरीही गिब्सन तिच्याशी काहीही न बोलता घरात जात होता.

'' मी तुझ्याशी बोलतेय... भिंतीशी नाही'' ती चिडून म्हणाली.

तरीही तो काहीच बोलला नाही.

'' गिब्सन प्लीज... मी तुझ्याशी बोलतेय'' ती त्याला अडवीत म्हणाली.

तो थांबला, पण तिच्याकडे न पाहताच बोलला, '' मला वाटते आपण यावर नंतर बोललो तर बरं होईल... आता सध्या मी घाईत आहे''

गिब्सन बेडरुममध्ये घूसला. स्टेला तो बेडरुममध्ये जाईपर्यंत त्याच्याकडे पाहतच राहाली.

स्टेलाला त्याच्या वागण्याचं आश्चर्य वाटत होतं. तो तिच्याशी आधी असा तुटक तुटक कधीच वागला नव्हता.

स्टेला किचनमध्ये ब्रेकफास्ट बनविण्यात बिझी होती. तिने पॅनच्या काठावर हलकेच आपटून एक अंडं फोडल आणि ते पॅनवर ओतून त्यातला बलक पसरवून सारखा केला. तेवढ्यात तिला समोरचं दार वाजल्याचा आवाज आला. तिनं तिचं ऑम्लेट बनविणं थांबवलं.

गिब्सन बाहेर गेला की काय?...

पण असा कसा हा न सांगताच बाहेर जावू शकतो?..

ती किचनमधलं काम तसंच अर्धवट सोडून समोरच्या दरवाजाकडे लगबगीने गेली.

जाता जाता तिला बेडरुमचं दार उघडं दिसलं आणि बेडरुमध्ये खाली जमिनीवर एक कोळशाने काढलेली आकृती खाली पडलेली दिसली. तिने जावून तो आकृती काढलेला कागद उचलला. जशी ती तो कागद घेवून उभी राहाली, बेडरुममध्ये टेबलवर ठेवलेल्या कशाने तरी तिचं लक्ष आकर्षीत केलं. एक जोरदार किंकाळी तिच्या तोंडातून निघाली. एका प्राण्याची कवटी टेबलवर ठेवलेली होती. ती ताबडतोब बाहेर आली आणि समोरच्या दरवाजाकडे झेपावली. तिला गिब्सन आपल्या कारकडे जातांना दिसला. स्टेला जवळ जवळ धावतच त्याच्या जवळ जावून पोहोचली.

'' कुठे जातो आहेस? ... आणि बेडरुममध्ये टेबलवर ते काय आणून ठेवलंस?...'' तिने विचारले.

तरीही गिब्सन कारकडे काही न बोलता चालतच होता.

'' गिब्सन ... काहीतरी बोलशील तू?'' ती चिडून म्हणाली.

गिब्सन एकदम थांबला.

'' मी आता येतो..'' तो तिच्याकडे वळून म्हणाला आणि पुन्हा कारकडे चालू लागला

अचानक जेव्हा स्टेलाचं जमिनीकडे लक्ष गेलं ती आश्चर्याने आ वासून बघायला लागली.

तिने बघीतलं की सकाळच्या उन्हात अंगणात कारची सावली पडत होती पण ... पण... गिब्सनची सावली पडत नव्हती. तिच्या अंगातून एक भितीची लहर गेली. असला प्रकार ती प्रथमच पाहत होती. तिला बोलायचं होतं पण जणू तिची वाचा हरपली होती. तिला अचानक क्षणातच दरदरुन घाम फुटला. तिने पुन्हा एकदा त्याच्याकडे पाहाले आणि पुन्हा जमिनीवर पाहाले. खरोखरच त्याची सावली पडत नव्हती.

तेवढ्या वेळात गिब्सन कारमध्ये घूसला, कारचं दार ओढून घेतलं आणि कार सुरु केली.

जेव्हा स्टेला धक्यातून सावरली, तिने आवाज दिला, '' गिब्सन''

पण त्याचं लक्ष कुठे तिच्याकडे होतं. तो आपल्याच विचारांच्या विश्वात होता. ती धावत त्याच्याजवळ जाणार तेवढ्यात त्याची कार धावायला लागली होती.

'' गिब्सन ऐक...'' ती जाण्याऱ्या कारच्या मागे धावत जावून त्याला मागुन आवाज देत होती.

पण त्याची कार आता वेगात धावायला लागली होती.

'' गिब्सन '' तिने जोरात एकदा आवाज दिला आणि ती रस्त्यावरच थांबली.

थोड्याच वेळात कार दिसेनाशी झाली.

आज मध्यरात्री पुन्हा गिब्सन त्या विहिरीजवळ आला. विहिरीच्या काठावर उभा राहून त्याने त्याच्या टॉर्चचा प्रकाशझोत विहिरीत टाकला. सगळं कसं काळं काळं होतं... शेवटपर्यंत... पण हो.. जर त्याला शेवट असेल तर! दोन पावले तो विहिरीच्या काठावरुन मागे सरला आणि अचानक त्याने विहिरीत उडी मारली. ना आवाज .. ना काही ... फक्त शांतताच शांतता ... भयानक शांतता...

क्रमश:...

तो वाडा काही गिब्सनला स्वस्थ बसू देत नव्हता. कारण आज रात्री पुन्हा गिब्सन त्या वाड्यात आला होता. वाड्याच्या आतल्या भागात त्याला एका जागी एक मोठा दगड दिसला. त्याने काही क्षण त्या दगडाकडे आणि त्या दगडाच्या आजुबाजुला निरखुन बघितले आणि तो पुर्ण ताकदीनिशी त्या दगडाला तिथून हलवायला लागला. जसा तो दगड तिथून थोडा हलला त्याला दगडाच्या मागे पोकळी दिसली आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्याचा अंदाज खरा ठरला होता. तो दगड पुर्णपणे तिथून हलविताच त्याला तिथे आत जाणारा एक काळा कुट्ट अंधाराने भरलेला रस्ता दिसला. त्याने त्याच्याजवळच्या टॉर्चने आत प्रकाशाचा झोत टाकला. आत एक गुढ आणि जुनी गुफा दिसू लागली. त्याच्या जवळच्या टॉर्चचा प्रकाशाचा झोत टाकत तो आत त्या गुहेत शिरू लागला.

गुहेच्या आत शिरताच त्याने त्याच्या टॉर्चच्या प्रकाशाचा झोत आजुबाजुला फिरवला. त्या गुहेत त्याला वेगवेगळी भौतिकशास्त्राच्या प्रयोगाची उपकरणं अस्तव्यस्त पसरलेली आणि धूळीने माखलेल्या परिस्थीतीत दिसू लागली. गुहेत सर्वत्र कागदाचे तुकडे आणि कोळशाने काठलेली चित्रंही इकडे तिकडे पसरलेली होती. गुहेच्या एका कोपऱ्यात त्याला एक वाळूचे घड्याळ ठेवलेले दिसले, ज्यात वाळू अगदी हळू गतिने अजुनही वाहत होती. तिथे ठेवलेल्या उपकरणांवर साचलेल्या धूळीवरुन उघड होते की बऱ्याच दिवसांपासून त्या उपकरणांना कुणी वापरले नव्हते किंवा स्पर्शही केला नव्हता. गिब्सन त्या गुहेत मधे येणारे अडथळे टाळत काळजीपुर्वक एका बाजुकडून दुसऱ्या बाजुला गेला.

गिब्सन त्या गुहेच्या एका भिंतीवर टार्चच्या प्रकाशझोतात काहीतरी निरखून पाहू लागला. त्याला त्या धुळीने माखलेल्या भिंतीवर पुसटसे काहीतरी लिहिलेले दिसले. धूळीमूळे काय लिहिले ते ओळखू येत नव्हते. गिब्सनने तेथील भिंतीवरची धूळ पुसली. भिंतीवर काही अक्षरं दिसू लागली, लिहिलेलं होतं, '' टाईम इज मनी'. त्याच्या समोरही काहीतरी लिहिलेलं अस्पष्ट दिसत होतं म्हणून गिब्सनने भिंतीवरील पुढील भागही साफ करुन तेथील धूळ हटवली. समोर लिहिलेलं होतं,'' ऍन्ड स्पेस इज ऍन ऍसेट ''

'' टाईम इज मनी ऍन्ड स्पेस इज ऍन ऍसेट'' गिब्सनला पुर्ण वाक्यात काहीतरी अर्थ दडलेला दिसत होता.

गिब्सन ते भिंतीवर लिहिलेलं वाचल्यानंतर दुसरीकडे जाण्यासाठी वळला. तेवढ्यात त्याच्या डोक्यावर काहीतरी पडलं. घाबरुन तो दोन पाऊल मागे सरला. टॉर्चच्या उजेडात त्याने बघितले की जुन्या, कुठे कुठे फाटलेल्या कागदांचा गठ्ठा जमिनीवर पडला होता. ते जुने कागद जिर्ण होवून पिवळे पिवळे झाले होते. त्याने तो गठ्ठा उचलला आणि तो एक एक कागद चाळून पाहू लागला. त्या कागदांवर काही गणिती सुत्र लिहिलेली होती तर कुठे कुठे काही आकृत्या काढलेल्या होत्या. गिब्सन ते कागद आता काळजीपुर्वक वाचू लागला. हळू हळू त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी सापडल्याचा आनंद पसरु लागला. जसा जसा तो पुढे वाचू लागला त्याचा चेहरा अजुनच प्रफुल्लीत दिसायला लागला. हळू हळू त्याच्या चेहरा एवढा जास्त आनंदी दिसायला लागला की तो वेडा झाला की काय अशी कुणाला शंका यावी.

गिब्सन त्या विहिरीच्या अगदी काठावर उभा होता. आपण त्या विहिरीत पडू किंवा काय अशी भिती त्याच्या चेहऱ्यावर बिलकुल दिसत नव्हती. त्याच्या हातात अजुनही तो कागदांचा गठ्ठा होता. त्याने अजुन समोर जावून एकदा विहिरीत डोकावून बघितले.

दोन पाऊल मागे येवून पुन्हा तो टॉर्चच्या प्रकाशात त्याच्या हातातली कागदपत्रे चाळू लागला. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा ते वेडसर हास्य झळकायला लागलं.

क्रमश:..

सकाळचा चहा घेत गिब्सन ब्रायनच्या घरी त्याच्या समोर बसला होता. ब्रायनच्या डोक्याला बांधलेल्या बॅन्डेजकडे पाहून गिब्सनला रात्रीच्या त्या प्रसंगाची आठवण झाली. त्याला हसूही येत होतं आणि ब्रायनच्या डोक्याला चांगलाच फटका बसला होता त्याचं वाईटही वाटत होतं. आलेलं हसू चेहऱ्यावर दिसू न देता त्याने गंभीर होवून ब्रायनला विचारले, '' आता बरं आहे ना?''

ब्रायनने फक्त होकारार्थी मान हलवली.

थोडा वेळ काहीच न बोलता शांततेत गेला.

'' तु कधी कुणाला त्या वाड्यात राहतांना पाहालं आहे?'' गिब्सनने विचारले.

त्याच्या डोक्यात अजुनही त्या वाड्याचेच विचार घोंगावत होते.

'' नाही... पण लोक सांगतात की एक म्हातारा त्या वाड्यात राहात होता... म्हणजे खुप वर्षापुर्वीची गोष्ट आहे...'' ब्रायन सांगु लागला.

'' ते सांगतात की खेड्यातला कुणाशीच तो कधी बोलत नसे...कुणी म्हणायचं तो शहरातून आला आहे... पण नक्की कुणालाच काही माहित नव्हतं...'' ब्रायनने पुढे माहिती पुरवली.

'' मग आता कुठाय तो?'' गिब्सनने विचारले.

'' नाही ... कुणालाच माहित नाही... माझे वडील सांगायचे की तो भूत असावा... कारण तो गायब झाला खरा पण नंतर कुणालाच त्याचं शव किंवा काहीच मिळालं नाही...'' ब्रायन म्हणाला.

'' भूत? ... तुझा भूतांवर विश्वास आहे?'' गिब्सनने विचारले.

'' मला वाटते तोही असाच त्या ब्लॅकहोलमध्ये गायब झाला असावा'' ब्रायन म्हणाला.

गिब्सन पुन्हा आपल्या विचारांच्या दूनियेत निघून गेला आणि काहीतरी लक्षात आल्यासारखं करुन त्याने विचारले , '' ती विहिर कधी खोदली किंवा बांधली असेल याचा काही अंदाज आहे तुला?''

'' लोक सांगतात की तो आला आणि त्याने स्वत: एकट्याने ती विहिर खणली... त्याच्या विक्षीप्त वागण्यामुळे लोक त्याला घाबरायचे...'' ब्रायन म्हणाला.

तेवढ्यात ब्रायनचा साधारणत: सात-आठ वर्षाचा मुलगा फ्रॅंक बाहेरुन धावतच तिथे आला. पोरगा रंगाने काळा जरी असला तरी चेहऱ्याने फारच गोड होता. गिब्सनने मधे येवून त्याला अडविले,

'' हॅलो क्यूटी ... काय नाव तुझं?''

त्या पोराने लागलीच आपल्या वडीलाकडे पाहाले. त्याच्या वडीलाने खुणेनेच त्याला संमती दिली. त्या पोराने लाजत लाजत इकडे तिकडे पाहत हळू आवाजात आपले नाव सांगितले, '' फ्रॅंक ''

'' अरे वा... चांगलं नाव आहे'' गिब्सन त्याचा गालगुच्चा घेत म्हणाला.

आता गिब्सनने आपल्या पॅंन्टच्या खिशातून 'तो' टेनिसचा चेंडू काढला आणि फ्रॅंकसमोर धरला.

'' फ्रॅंक ... हा चेंडू तुला कुठे सापडला बेटा?'' गिब्सनने विचारले.

अचानक त्या पोराच्या चेहऱ्यावर भितीचं सावट दिसायला लागलं. त्याने घाबरुन आपल्या वडीलांकडे बघितले.

'' भिऊ नकोस ...तुझे वडील काही करणार नाहीत'' गिब्सनने त्याची भिती दूर करण्याचा प्रयत्न केला.

'' सांगना ...ते काका काय विचारताहेत... कुठे सापडला तो बॉल?'' ब्रायनने त्याला रागावल्यासारखं करीत कडक आवाजात विचारले.

गिब्सनने इशाऱ्यानेच ब्रायनला शांत राहण्यास सांगितले. तो फ्रॅंकजवळ गेला आणि त्याच्या समोर उभा राहाला. हळूच फ्रॅंकच्या खांद्यावर हात ठेवून तो त्याच्या समोर गुढग्यावर बसला. गिब्सनने त्याच्या निरागस डोळ्यात बघितले, त्याचे छोटे छोटे हात आपल्या हातात घेवून थोपटत त्याला विचारले,

'' तू मला त्या जागेवर नेवू शकतोस का?''

फ्रॅंक जरी भ्यालेला होता तरी त्याच्या चेहऱ्यावर होकार दिसत होता.

क्रमश:..

रात्रीची वेळ होती. सगळीकडे गडद अंधार पसरला होता. आणि अश्या वेळी गिब्सन त्या जुन्या वाड्याच्या जवळ येवून पोहोचला. आजुबाजुला सगळीकडे निरव शांतता होती आणि आवाज येत होता तो फक्त 'किर्र .. किर्र ..' असा रातकिड्यांचा आवाज. गिब्सनने आपल्या टार्चचा झोत वाड्याच्या शेजारी असलेल्या विहिरीवर टाकला आणि हळू हळू जणू मंतरल्यागत तो त्या विहीरीजवळ जावू लागला. विहिरीच्या काठावर पोहोचताच त्याने त्याच्या टॉर्चचा झोत विहिरीत टाकला आणि तो वाकुन आत बघू लागला.
विहिरीच्या काठावरुन दोन पावलं मागे सरुन गिब्सनने आपल्या टार्चचा झोत आजुबाजुच्या परिसरावर फिरवला. आजुबाजुला रात्रीच्या त्या गडद अंधारात वाड्याच्या जुन्या भिंती आणि वाढलेली उंच उंच झाडी भयानक वाटत होती. कुत्र्यांचा दूरवरुन कुठूनतरी येणारा रडण्याचा आवाज वातावरणाच्या भयानकतेत अजुनच भर घालीत होता. विहिरीच्या बाजुला जो जुना वाडा होता, आता हळू हळू तिकडे गिब्सनची पावले वळली होती.

वाड्यामध्ये गिब्सन चहुकडे टार्चचा प्रकाश टाकीत चौकसपणे आणि सतर्कतेने एक एक पाऊल पुढे जात होता. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलेकी काही तरी काळं त्याच्यावर हल्ला करण्यासाठी त्याच्याकडे झेपावलं आहे. भितीने मागे हटून पटकन तो खाली बसला. नंतर त्याच्या लक्षात आले की तो पाकोळ्यांचा एक मोठा कळप होता. तो कळप काही वेळ त्याच्या डोक्याभोवती घोंगावत राहाला आणि मग दूर उडून गेला. गिब्सनने सुटकेचा निश्वास सोडला.

वाड्यातल्या आतल्या बाजुला भिंतिवर लिओनार्डो दा व्हिन्सीचे पोर्ट्रेटस लावलेले होते. गिब्सनने हळूवारपणे त्या पोर्ट्रेटसना एक एक करुन स्पर्श केला. त्यातून त्याचं लिओनार्डे दा व्हिन्सीच्या आर्टबद्दल एक आदर एक प्रेम दिसत होतं.

अचानक गिब्सनला वाड्याच्या बाहेर कुणाची तरी उपस्थिती जाणवली. गिब्सन एकदम स्थिर आणि स्तब्ध होवून पुन्हा कानोसा घेवू लागला. बाहेर जो कुणी असेल त्याला आपण दिसू नये म्हणून त्याने आपला टॉर्च बंद केला. तो स्तब्ध झाला तसा बाहेरचा आवाजही थांबला. त्याने आपल्या डोळ्यावर आलेले त्याचे लांब कुरळे केस मागे सारले आणि अंधारातच बाहेर डोकावून बघितले.

बाहेर त्याला एक आकृती हातात कंदील घेवून त्याच्याकडेच येतांना दिसली.

कोण असावी ती आकृती?...

त्या भयानक परीसरात ती काळी आकृती अजुनच भितीदायक दिसत होती.

गिब्सन जिथून वाकुन बघत होता तिथेच एका भिंतीच्या मागे दडून बसला आणि मधे मधे वाकुन बघून चाहूल घेवू लागला. ती आकृती तो जिथे लपून बसला होता तिकडेच येत होती.

जेव्हा ती आकृती गिब्सनच्या अगदी जवळ आली गिब्सनने बाजुलाच पडलेले एक लाकुड उचलले. जशी ती आकृती अजुन अजुन जवळ येवू लागली तशी तशी गिब्सनची त्या लाकडावरची पकड घट्ट व्हायला लागली. ती आकृती त्याच्या आवाक्यात येताच एका क्षणाचाही विलंब न लावता त्याने त्या लाकडाने त्या आकृतीवर एक जबर घाव केला. ती आकृती खाली कोसळली आणि ओरडू आणि विव्हळू लागली.

आवाज तर ओळखीचा वाटत होता...

गिब्सनने आपला टॉर्च सुरु करुन प्रकाशाचा झोत त्या आकृतीवर टाकला. ती आकृती दूसरे तिसरे कुणी नसून बाजूच्या खेड्यातला ब्रायन होता. ब्रायन साधारण पस्तीशीतला, काळा कुट्ट रंग, चमकणारी त्वचा आणि पिळलेलं शरीर असा अवतार होता. त्या दोघांची आधीच त्या खेड्यात ओळख झाली होती. त्याने त्याच्यावर टॉर्चने प्रकाश टाकताच तो भितीने आपल्या हाताने आपल्या डोक्याचा बचाव करीत ओरडला, '' साहेब ... मी ...मी ब्रायन आहे... मी इथं तुमच्या मदतीसाठी आलो होतो''

'' मदतीसाठी? ... इतक्या रात्री?... आणि ही अशी पद्दत आहे?'' गिब्सन चिडून म्हणाला.

ब्रायन आपलं डोकं दोन्ही हाताने धरीत उठून बसला. गिब्सनने त्याच्या जवळ जावून टॉर्चच्या प्रकाशात त्याच्या डोक्याला झालेली इजा तपासून बघितली.

'' आय ऍम सॉरी.. खरं म्हणजे... मला वाटलं..."' गिब्सन गोरामोरा होवून म्हणाला.

'' मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती...'' ब्रायन अजून व्यवस्थीत बसत म्हणाला.

'' कोणती?'' गिब्सनने विचारले.

उठून उभा राहत ब्रायनने त्याच्या खिशातून एक टेनिसचा बॉल काढला आणि गिब्सनसमोर धरला.

'' हे काय आहे?'' गिब्सनने विचारले.

'' हा तोच बॉल आहे जो ती पोरं खेळत होती आणि मग खेळता खेळता ब्लॅकहोलमध्ये पडला होता ...'' ब्रायन म्हणाला.

'' तुला कुठे मिळाला?'' गिब्सन बॉल आपल्या हातात घेत, निरखुन बघत आश्चर्याने म्हणाला.

'' माझ्या मुलाला सापडला'' ब्रायन म्हणाला.

गिब्सनने त्या बॉलला खाली वर फिरवून निरखून बघितले. त्या बॉलवर एका जागी त्याला काळ्या पेनने मानवी कवटीचे चित्र काढलेले दिसले.

क्रमश:...

वाड्याच्या समोर विहिरीभोवती आता सायमनचे वडील, आई आणि इतर गावातली लोक जमली होती. पोराच्या वडीलाने आणि इतर लोकांनी सोबत मोठमोठे दोरखंड आणले होते. ते आता आत उतरण्यासाठी दोरखंड विहिरीत सोडू लागले. तेवढ्यात तिथे एक म्हातारा आला. कुठून आला कुणास ठाऊक? तो पोराच्या वडीलांजवळ गेला आणि त्याचे खांदे गदगद हलवून त्याला इशारा देत म्हणाला, '' असं वेड्यांसारखं काही करु नका... तुम्हाला माहित नाही... आतापर्यंत या विहिरीत उतरलेला कुणीही अजुनपर्यंत तरी परत आलेला नाही...''

सायमनच्या वडीलाने त्या म्हाताऱ्याकडे एक नजर टाकली आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करीत ते आपलं दोरखंड आत सोडण्याचं काम करीत राहाले. म्हातारा आपलं कुणी ऐकत नाही असं पाहून आला तसा निघून गेला.

त्या विहिरीभोवती जमलेल्या लोकांनी विहिरीत दोर सोडला आणि सायमनचे वडील तो दोर पकडून विहिरीत उतरु लागले. ते उतरत असतांना दोराचे एक टोक विहिरीच्या बाहेर, बाकीचे लोक घट्ट पकडून होते आणि जसे जसे सायमनचे वडील विहिरीत खाली उतरत होते ते दोर हळू हळू खाली सोडू लागले.

पहिला दोर संपला म्हणून बाहेरच्या लोकांनी आत सोडलेल्या दोराला अजुन एक दोर बांधला आणि पुन्हा थोडा थोडा दोर आत सोडू लागले. हळू हळू दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा असे दोरावर दोर संपले. आता त्यांच्याजवळ अजुन बांधण्यास दोर शिल्लक नव्हता.

अचानक दोर खाली सोडता सोडता त्या दोराला एक झटका बसला आणि दोराचा ताण पुर्णपणे नाहीसा झाला. जे लोक जोर लावून दोराला धरुन होते ते मागे खडकाच्या ढिगाऱ्याच्या शेजारी पडले. ते पटापट उभे राहाले आणि भितीयूक्त आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले.

'' काय झाल?''

'' दोर तूटला की काय?''

एका जणांनी विहिरीत सोडलेला दोर हलवून आत सायमनच्या वडिलाला इशारा करुन पाहाला. पण आतून काहीच प्रतिक्रिया नव्हती.

हळू हळू विहिरीभोवती गावातले अजुन लोक जमा झाले. काही जण अजूनही विहिरीत सोडलेला दोर हलवून पाहत अजुनही सायमनच्या वडिलांना इशारा देण्याचा प्रयत्न करीत होते तर काही जण विहिरीत वाकुन बघत होते. आत कुणी असण्याचं किंवा कशाचंच काही चिन्ह दिसत नव्हतं, फक्त काळी कुळकुळीत अमर्याद पोकळी दिसत होती. तिथे जमलेले लोक गोंधळून एकमेकांकडे पाहू लागले. त्यांना आता पुढे काय करावं काही सुचत नव्हतं.

सायमनच्या आईला काय झाले असावे हे आजुबाजूला जमलेल्या लोकांचे भितीने काळवंडलेले चेहरे पाहून आता लक्षात आले होते. इतक्या वेळेपासून धीराने घेणाऱ्या तिचा शेवटी बांध तूटला. ती हंबरडा फोडून रडायला लागली. काही गावातल्या बाया ज्या तिथे जमा झाल्या होत्या त्या तिची समजुत घालण्याचा प्रयत्न करु लागल्या.

सायमनचे वडील गेल्यामुळे गावात एक दु:खद वातावरण होते. सायमनचे वडील गेले होते आणि त्यांचं पार्थीवसुध्दा मिळालं नव्हतं आणि मिळण्याची काही शक्यताही नव्हती. लोकांनी सायमन आणि त्याचे वडील यांच्या पार्थीवाचं प्रतिक म्हणून दोन दगड त्यांच्या घरासमोर ओट्यावर ठेवले. मोठा दगड म्हणजे सायमनचे वडील तर छोटा दगड म्हणजे सायमन. गावातले लोक त्या दोन दगडाभोवती जमा झाले होते. त्या दगडांची माती राख वैगेरे लावून पुजा करुन त्या लोकांनी त्या दगडावर छोटी छोटी कापडंसुध्दा पांघरली होती. मुलाची आई आणि त्या माणसाची पत्नी आता हुंदके देवून रडत होती.

गर्दीतली चार लोक आता त्या दगडांच्या सामोरी गेली. त्यांनी जणू ते सायमनचे आणि त्याच्या वडीलाचे प्रेत उचलीत असावे असे त्या दगडांना काळजीपुर्वक उचलून खांद्यावर घेतले, त्या दगडांना खांद्यावर घेताच सायमनची आई उठून पुन्हा जोरजोराने रडायला लागली. तिच्या आजुबाजुला जमलेल्या इतर बायांनी तिची समजुत काढून तिला आवरण्याचा प्रयत्न केला.

ती चार लोक आता त्या दगडांना खांद्यावर घेवून त्यांच्या अंतविधीसाठी जंगलाकडे चालायला लागली. रडणारी सायमनची आई आणि गावातली इतर जमलेली लोक त्या लोकांच्या मागे मागे जावू लागले. सगळ्यात मागे, जड पावलांनी गिब्सनही त्या गर्दीच्या मागे मागे जंगलाकडे जावू लागला.

क्रमश:...

थोडा वेळ तो वाडा, ती विहिर आणि आजुबाजुचा परीसर पाहिल्यानंतर गिब्सन आपल्या कारजवळ परत आला. कारजवळ आल्यानंतर पुन्हा तंद्री लागल्यागत थोडावेळ त्या वाड्याकडे पाहत राहाला. थोड्यावेळाने भानावर येत त्याने आजुबाजुला बघितले. रस्त्याच्या दोनही टोकांकडे त्या वाड्यापासून दूर दूर पर्यंत चिटपाखरुही फिरकतांना दिसत नव्हतं. तिथून दोन एक मैल दूर एका डोंगराच्या पायथ्याशी वसलेली एक वस्ती बघून गिब्सनला हायसं वाटलं.

गिब्सन कारमध्ये बसला आणि गाडी सुरु करुन तिथून समोर त्या वस्तीकडे त्याने आपली गाडी दौडविली. जशी त्याची कार तिथून निघून गेली एका झूडपाच्या मागे लपलेले चार पोरं सायमन, रेयान, माल्कम आणि अब्राहम बाहेर आले.

'' ए चला तो गेला आहे '' अब्राहम म्हणाला.

'' कोण होता तो?'' सायमनने विचारले.

ते सगळेजण त्या जुन्या वाड्याकडे जायला लागले.

'' मला काय माहित ... असेल कुणीतरी नविन वाटसरु..'' माल्कम म्हणाला.

'' ए माझ्या आईने या भागात यायला मनाई केली आहे'' त्यातला सायमन दुसऱ्यांना सावध करण्याच्या उद्देशाने म्हणाला.

'' अरे... मोठी माणसं नेहमीच आपल्याला भिती दाखवित असतात'' अब्राहम बेफिकीरपणे त्याची काळजी दूर करण्याच्या उद्देशाने त्याच्या पाठीवर थाप देत म्हणाला.

'' नाही ... मी एकलं आहे की त्या ब्लॅक होलमध्ये भूत आहे म्हणे'' रेयान म्हणाला.

'' अरे ... आपण त्या ब्लॅक होलकडे जाणार नाही आहोत'' माल्कमने त्याची समजूत घातली.

'' ब्लॅक होल?'' च्याच्यातल्या लहान असलेल्या सायमनने विचारले.

'' तुला माहित नाही?... लोक त्या विहिरीला ब्लॅक होल म्हणतात'' माल्कमने त्याला आश्चर्याने विचारले.

'' का? ... का म्हणतात?'' सायमनने विचारले.

त्यातल्या सगळ्यात मोठ्या अब्राहमने सायमनच्या ढुंगणावर चापटी मारीत म्हटले, '' कारण... सगळे 'होल' ब्लॅक नसतात म्हणून

''रेयान, माल्कम आणि अब्राहम त्याची उडवल्यागत हसायला लागले. सायमनही काही न समजुन हसायला लागला.

पोरं वाड्याच्या समोर असलेल्या मैदानात चेंडू खेळू लागली. अब्राहमच्या हातात बॉल होता त्याने तो दुसऱ्या पोरांना फेकून मारण्याच्या आधी त्या चेंडूला निरखुन पाहाले. त्या चेंडूवर कुणीतरी काळ्या पेनने मानवी कवटीचे भयानक चित्र काढलेले होते.

त्यांच्यापैकीच कुण्या पोराचे ते काम असावे...

अब्राहम आता कोण पोरगा त्याच्यापासून सगळ्यात जवळ आहे हे बघायला लागला. रेयान त्याला त्यातल्या त्यात जवळ वाटला म्हणून तो त्याच्या मागे जोराने धावायला लागला. धावता धावता त्याने जोराने तो चेंडू समोर धावणाऱ्या रेयानच्या पाठीत मारला. रेयानच्या पाठीत बरोबर मधोमध तो लागला.

'उं..क' रेयानच्या तोंडून आवाज आला. कारण तो चेंडू बराच कडक असल्यामुळे त्याला जोरात लागला असावा.

तो चेंडू त्याच्या पाठीत लागून उडाला आणि एका दिशेने घरंगळत टप्पे खात जावू लागला. त्यांच्या ग्रुपमधल्या दुसऱ्या एका पोराजवळ, माल्कमजवळ तो चेंडू पोहोचला. त्याने धावत जावून तो उचलला आणि तो आता कोण जवळ आहे हा अंदाज घेवू लागला. त्याच्या जवळ आणि आवाक्यात असलेली पोरं आता दूर दूर पळायला लागली. त्यातल्या एका जणाला, अब्राहमला हेरुन तो त्याचा पाठलाग करायला लागला. पाठलाग करता करता त्याने तो चेंडू समोर धावणाऱ्या अब्राहमच्या पाठीत जोराने फेकून मारला. पण अब्राहम चपळतेने खाली वाकला आणि त्याच्या चेंडूचा नेम हूकला.

बॉल आता दुसऱ्या एका पोराच्या, सायमनच्या समोरून घरंगळत, टप्पे खात समोर समोर जावू लागला. यावेळी मारतांना माल्कमचा नेम चुकल्यामुळे चेंडूला बरीच गती होती. सायमन त्या चेंडूमागे धावायला लागला. त्या चेंडूमध्ये एवढी गती होती की तो चेंडू टप्पे खात खात त्या ब्लॅकहोलच्या सभोवताली असलेल्या खडकाच्या ढिगाऱ्यावर जावून पोहोचला आणि खाली विहिरीच्या दिशेने घरंगळायला लागला. सायमन त्या चेंडूला पकडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करु लागला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तो चेंडू घरंगळत जावून त्या विहिरीत पडलाच. पण हे काय? त्या खडकाच्या ढिगाऱ्यावरुन सायमनची पकड निसटली आणि तोही त्या चेंडूमागे विहिरीत घरंगळायला लागला.

बाकीची पोरं विहिरीभोवती जमा झाली आणि सायमनला मदत करण्याचा प्रयत्न करु लागली. सायमन त्या विहिरीच्या काठावर एका खडकाचा आधार घेत एक पाय विहिरीत तर दुसरा पाय वर खडकावर एखादा आधार शोधीत अशा परीस्थीत लोंबकळत होता. पोरं गोंधळली, घाबरली, त्यांना काय करावं काही कळेना. ती एकमेकांचा हात पकडून त्याची साखळी तयार करुन सायमनजवळ पोहचण्याचा प्रयत्न करु लागली. साखळीत सगळ्यात शेवटी माल्कम सायमनच्या जवळ पोहोचणार एवढ्यात सायमनने ज्या खडकाला पकडले होते तोच खडक निखळून बाहेर आला आणि तो खडक आणि सायमन विहिरीत पडले. पडतांना त्याची एक मोठी किंकाळी वातावरणात गुंजली आणि तो एखाद्या राक्षसाच्या तोंडात गुडूप व्हावा तशी एकदम बंद झाली.

क्रमश:...