(मा. राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देणारा लेख.)
राजू परुळेकर
- राजकीय विश्लेषक व लेख़क
माझी पहिली ओळख...
राजला खाजगीत अगदी जवळचे मित्र आणि नातेवाईक राजा म्हणतात. हे त्याला एकदम फिट्ट बसणारं नाव आहे. जर त्याचं स्वभावानुसार नाव ठरवायचं झालं, तर ते राजाच असायला हवं. याची अगदी अनेक कारणं आहेत. पण त्यातलं अगदी महत्त्वाचं कारण म्हणजे तो कधीही कुणाचंही वाईट चिंतीत नाही. अगदी शत्रूचंही. मला त्याच्या या गुणाचं फार आश्चर्य वाटतं. राजा माझा परममित्र असण्याचं हे एक सर्वांत महत्त्वाचं कारण आहे असं मला वाटतं. कारण राजला भेटेस्तोवर मला शत्रूबाबत विषारी भावना माझ्या मनात येत नाही ही माझी दुर्बलता वाटत असे. पण राजला भेटल्यावर माझ्या मनातली भावना न्यूनगंडासारखी होती, ती माझ्या शक्तिस्थानासारखी वाटू लागली.
राजमध्ये प्रचंड करिष्मा आहे, हे मी नव्याने सांगण्याची गरज नाही. त्याबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे. पण हा राजचा करिष्मा किंवा राजची ती जादू योगायोगाने किंवा अपघाताने आलेली गोष्ट नाही. राज वयाच्या तेवीसाव्या वर्षापासूनच राजकारणात आहे. तेव्हापासून त्याने कण-कण करून माणसं जोडलेली आहेत. त्यांची काळजी केलेली आहे. आजही राज जेव्हा बाहेर कुठेही किंवा दौर्यावर जातो, तेव्हा बरोबरच्या माणसांची आधी काळजी घेतो. त्यांची सोय नीट होते आहे की नाही यावर त्याचं अगदी बारीक लक्ष असतं. राज आक्रमक राजकारण करतो किंवा त्याची वक्तृत्वकला तडफदार आहे म्हणून केवळ जादू पसरत नाही, तर सोबतच्या माणसांची तो पराकोटीची काळजी घेतो. जनतेला असा नेता आवडला तर नवल काय? व्यवसायामुळे म्हणा किंवा कामाच्या प्रकारामुळे देशातले अनेक सामाजिक आणि राजकीय नेते मी पाहिले. बहुतेकांना आपल्या बायका-मुलांपलीकडे कुणी माणसं आपल्यासोबत असतात आणि त्यांची काळजी आपणच वाहायला हवी याची जाणीवच नसते. राज या सार्यांपेक्षा अगदी वेगळा आहे.
नारायण राणे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हा मालवणमध्ये पोटनिवडणूक लागली. त्या निवडणुकीसाठी संपूर्ण शिवसेना कोकणात उतरली. त्या वेळी राजचा मुक्काम कणकवलीच्या हॉटेल शर्मिलामध्ये होता. तिथे परिस्थिती अशी होती की माणसं भरपूर होती आणि रुम्स कमी होत्या. राणेंनी मतदारसंघातील सर्व हॉटेल्स आधीच बुक करून ठेवल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भलतीच पंचाईत झालेली होती. अशा वेळी राज हॉटेलमध्ये आपल्या खोलीत जास्तीत जास्त जणांना सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील होता. त्या वेळेला शिवसेनेचे अनेक बडे नेते आपली हॉटेलमधली सोय कशी अधिक 'फुलप्रूफ' होईल ते पाहण्यात मग्न होते. आता शिवसेनेचे नेते असलेले आणि महाराष्ट्राचे विद्यमान विरोधी पक्षनेते रामदास कदम हे शर्मिला हॉटेलमधल्या आमच्या शेजारच्याच रूममध्ये राहत होते. इतर अनेक नवे कार्यकर्ते येऊन आपल्या राहण्याच्या सोयीवर आक्रमण करू पाहताहेत हे पाहिल्यावर रामदास कदम हे ‘मानापमाना’ चा खेळ सुरू करून बॅगा घेऊन निघाले होते. ‘‘तुमच्या निवडणुका तुम्ही लढवा. मी चाललो खेडला’’, असे बाणेदार उद्गार काढून ते निघाले. तेव्हा ज्येष्ठ - कनिष्ठतेचा वाद बाजूला सारून राज स्वत: समजूत काढून कदमांना परत घेऊन आला. शिवसेनेच्या इतिहासातल्या सारगर्भ दिवसात मी निवडणूक क्षेत्रात राजसोबत होतो. त्या क्षणी सभोवतालच्या परिस्थितीचं अचूक राजकीय आकलन त्याच्याएवढं दुसर्या कोणत्याच शिवसेना नेत्याला नव्हतं. त्या काळात राजने शिवसेना सोडण्याचं ठरवलेलं होतं अशा वावड्या नंतर उडवण्यात आल्या. खरं तर त्या काळात राजने कमालीचा संयम पाळला होता. जो पाळणं हे कमालीचं कठीण होतं. एक तर संपूर्ण निवडणूक मोहिमेची आखणी ही राजला वगळून करण्यात आलेली होती. दुसरं म्हणजे, त्याला राणेंशी लढवून एकंदरीत महाराष्ट्र आपल्या ताब्यात ठेवावा अशी पुढच्या काळासाठीची संकल्पना शिवसेनेत आकारत होती. राजला हे कळत होतं. तो प्रचंड अस्वस्थ होता. गंमत म्हणजे त्याची ही अस्वस्थता राजकीय असुरक्षिततेतून आलेली नव्हती, तर त्याला त्रास होत होता तो भावनिक. संपूर्ण शिवसेना आणि शिवसेना नेते हे कमालीच्या राजकीय असुरक्षिततेने भेदरलेले होते.
राजला त्याबाबतीत मात्र कधीच काही असुरक्षितता नव्हती. त्याचा स्वत:च्या नेतृत्व क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. पण त्या काळात त्याची भावनिक आंदोलनं ही त्याच्या जवळच्यांना प्रचंड अस्वस्थ करत होती. तेव्हा आणि त्यानंतरच्या अनेक रात्री राजने जागून काढलेल्या आहेत. त्याच्या मनात विचार फक्तं बाळासाहेबांचाच असे. He loves me, He loves me not... असं काहीसं त्याच्या मनाशी चाललेलं असे. बाळासाहेबांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. बाळासाहेबांचं माझ्यावर प्रेम नाहीए... अशा मानसिक आंदोलनात त्याने इतक्या शक्यतांचा विचार केला होता की मला नाही वाटत की, त्याच्या राजकीय आणि व्यक्तिगत शत्रूंनी बाळासाहेबांसंबंधी त्याच्या एक लक्षांश विचार केला असेल. अगदी निष्पक्षपणे, नीरक्षीरविवेक ठेवून आणि ईश्वराला स्मरून जर मी लिहायचं ठरवलं, तर मी बाळासाहेबांसोबतच्या आणि शिवसेनेच्या नेतृत्वातल्या पहिल्या वर्तुळातल्या प्रत्येक माणसाला त्या काळात अगदी जवळून पाह्यलंय. मी नि:संदिग्धपणे असं म्हणेन की, बाळासाहेबांवर राजइतकं निस्सीम आणि इतकं परिपक्व प्रेम इतर कुणीही केलेलं नाही. मुख्य म्हणजे त्याच्याइतके बाळासाहेब कुणाला नीट कळलेच नाहीत. त्यांचं सामर्थ्य आणि त्यांच्या चुकांसहित राजने त्यांना समजावून घेतलं आणि निरपेक्षपणे त्यांच्यावर प्रेम केलंय.
|
0
comments
]