झाडावरून खुणावणाऱ्या
डोळे मारणाऱ्या
चुरचुरीत कैऱ्या
आवळे आणि चिंचा
तुडुंब खिसा सद्र्याचा
चोरट्या तिखट मिठाचा
ती जागा माडीवरची
अंधारी अडगळीची
गुहा अलिबाबाची
ती वेळ दुपारची
आजी आई झोपण्याची
चोरट्या साहसांची
कुजबुजत्या गप्पांची
पत्त्यांच्या डावांची
लुतुपुतीच्या भांडणांची
चिमण्या दातांची
अर्धी फोड कैरीची
ती चव सुट्टीची
अनिता १४ -६-०९


माझ्या मनाला माहितीये रे
तुझ येण अशक्य आहे
पण आठवणीना हे कळतच नाही
त्या वहातच जातात
सकाळपासून सन्ध्याकाळपर्यन्त
सकाळी त्या आनन्दात असतात
दुपारी उन्हात सावल्या बनून येतात
पण सन्ध्याकाळी मात्र मनभर दाटून उरतात
कातरवेळ ही अशीच असते
आठवणीन्च्या हिन्दोळ्यावर झुलवणारी

सावळ्याचा मना ध्यास होता,
दूर जातोच तो,आस होता...
संचिताचे जरी भोग सारे,
साद देईल तो, दास होता....
जिद्द झाली पुरी भेटण्याची
सावळ्याचा मनी वास होता...

बासुरीने मना धुंद केले
सूर ओठातला, ख़ास होता....
शोधले मी तरी सापडेना,
तोच श्वासातला ,श्वास होता...
....अरविंद

अहं ठेचला गेला.. की,
उफाळतो तो ...... राग..!
राग वांझोटा असला.. की,
होतं ते ...... दु:ख..!
दुःख रिचवावं लागलं.. की,
येते ती ...... लाचारी..!
लाचारी मान्य केली.. की,
येते ती .. कृतिहीनता...... मृत अवस्था..!
जिवंत मुडद्यांना वास्तवाच्या झळा लागल्या.. की,
येतं ते.. भान..!
भानावर असलेल्याने.. केलेली कृती,
म्हणजे स्वाभिमान......!!!
स्व अभिमान.
स्वाती फडणीस ................... २१-०६-२००९

संपला संपला हा उन्हाळा
जणू अग्निच्याच ज्वाळा
शांत झाली धरणी माता
पिउन ग गार वारा
निळ्या ऐवजी काळे मेघ
दिसू लागले गगनात
अग्नी ऐवजी जलधारा
पडू लागल्या धरणीवर
नटली ही धरणीमाता
हिरवा शालू नेसून
आनंद देई सर्वांना
आपल्या हिरवाईतून
-मैत्रेयी