वाटतं,

मैना व्हावं..



बागडावं

गाणी गात तुझ्या फांद्याफांद्यांवर

गोंजारावं

तुझ्या अग्निफुलांना चोचीनं अलवार

अन

छेडावं तुझ्या राकट देहाला

नाजूक पंखांच्या फडफडीने



अन

पेटवावी

तहान



आगीत....

- स्वप्ना

त्या वळणावर

रस्त्याच्या दुतर्फा

तू उभा असतोस



माझी वाट पहात..



अन

तिथे पोहचण्याआधीच

मीही तिथेच पोहचलेली असते



तुझ्या अनावर ओढीने..



वार्‍याच्या झुळका

तुझ्या पाकळ्या माझ्यावर उधळत येतात

अन त्या वळणावर पोहचतांना

माझी हळवी स्पंदनं कोलमडतात



तुझे निखारे माझ्या वाटेवर

पसरवून तू मात्र निवांत उभा असतोस

" मला तुडव वा भिडव " म्हणत..



खाली पडलेलं एकेक फुल

पायदळी तुडण्यापासून वाचवत

मी ते वळण पार करते

टुपकन कुठल्याशा फांदीवरली

एक मोठ्ठी शेंग

माझ्या पुढ्यात दाणकन आदळून

मला घाबरवते..



पण मी मात्र तुझे निखारे चुकवत

त्या वळणाला सहज पार करते..



वळून पाहतांना..



तुला मनात बंदिस्त करते

नि ओढणीत अडकलेल्या तुझ्या पाकळ्या

अलवार पर्समधल्या वहीत निजवते..



- स्वप्ना

देव काय असतो माहित नव्हते मला

जाणीव झाली मला जेव्हा मी पाहिले तुला



वेदना काय असतात माहित नव्हते मला

जाणीव झाली मला जेव्हा तिने माझ्यासाठी सहन केल्या तेव्हा



प्रेम काय असते माहित नव्हते मला

जाणीव झाली मला जेव्हा तिने माझ्यावर जिवापाड प्रेम केले तेव्हा



त्याग काय असतो माहित नव्हते मला

जाणीव झाली मला जेव्हा तिने माझ्यासाठी त्याग केला तेव्हा



वाट काय असते माहित नव्हते मला

जाणीव झाली मला जेव्हा तू मला योग्य वाट दाखवालिस तेव्हा



कोणत्याही जाणीवशिवाय आलो होतो या जगात मी

जीवन काय असते हे तू दाखवून दिले मला

लांबलेला पाऊस
रानाची उजाड कूस
आणि
गुलमोहराचा आटता बहर !
सपासप चाबुक फिरवलाय ' त्याने ' यंदा..

विचार करत करतच
शेवाळलेल्या कंपाउंडच्या भिंतीनं
माझी पावलं तुझ्या दिशेने निघतात
तर
गलबलून माझं स्वागत करायला तू
पुढे झेपावलेला
माझ्या लक्षात येते
तुझी भोळीशी धडपड
विरळसे धगधगते
तुझे निखारे
माझ्या नजरेत आणण्यासाठीची..
माझ्या खांद्यावर झुलणार्‍या
तुझ्या मऊशार पानांचा हिरवा स्पर्श
जणू माझी समजूत काढतो
बहर येतो अन जातो..हेच अंतिम सत्य..

तुला टेकून मी पहुडते
उन्हं कलत असतात
तू डोलत असतो
कुठूनशी एक चोरटी जलधार बरसून जाते

तुझ्या ओल्या खोडावरुन हात फिरवत फिरवत
मी आजूबाजूस बघते
तर
तुझा शेजारी निलगिरी टक लावून बसलेला
अन शेवगा तर बावराच..शिट्टी मारत बसलेला
अन गुलाब तर..
तुझ्याकडे येतांनाच त्याने मला ओरखडलेले..

रागाने मी मनातल्या मनात xx

तू खदखदून हसतो
मीही हसते

परत कधी रे ?
उत्तर माहित असलेला प्रश्न ओठांवर येतो..

इवल्याशा पानांना सोबत घेऊन
तुझ्या कुशीतून अलगद एक फुल माझ्या ओंजळीत पडतं..

आणि मला उमगतं
झाडावरच्या अग्निपाखरांनी नवीन घर शोधलंय..

माझं मन....

- स्वप्ना