- पु.ल. देशपांडे

आपल्याकडे भगवंतापेक्षा भक्ताला मान मोठा आहे. जेव्हा पालखी येते, तेव्हा विठ्ठल-विठ्ठ्लपेक्षा निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम - `ग्यानबा तुकाराम', ग्यानबा तुकाराम याचा गौरव जास्त होत असतो. इथं आज झालेला माझा जो गौरव आहे, तो मी गाण्याचा भक्त म्हणून झालेला आहे, हे मला निश्र्चितच कळतंय. मी सुरांसाठी जितकी भिक्षा मागितलेली आहे, तितकी इतर कशासाठीही मागितलेली नाही. हे सगळं कशासाठी? तर गाण्यासाठी. माझं भरून दुसरीकडे देण्यासाठी नव्हे, तर माझ्या हृदयात साठवून ठेवण्यासाठी केलेलं आहे. रवींद्रनाथ टागोरांची एक ओळ आहे, `तू सरे लगायी आग'. तू सुरांची आग माझ्या प्राणाला लावलीस, असं म्हटलेलं आहे. ही मोठी माणसं जी असतात, ती आपल्या प्राणाला सुरांची आग लावून जात असतात. आपण जिवंत असेपर्यंत ती आग काही विझत नाही. ती आग लावल्याबद्दल आपण त्यांच्यावर रागावण्याऎवजी कृतज्ञ व्हावं, ही कलेची किमया आहे. आपण कोणीतरी मोठे झालोय, असं आपल्याला वाटतं. उत्तम गाणं ऎकल्यानंतर, आपण अधिक श्रीमंत झालो आहोत असं वाटतं. ही श्रीमंती या लोकांनी आपल्याला दिली आणि त्या श्रीमंतीचा हा हा गौरव आहे. हा स्विकारण्याचा गौरव नाही, देण्याचा गौरव आहे, असं मला वाटतं. आणि अशा रीतीनं हा कलावंताचा उत्सव इथे साजरा होणं, याला अर्थ आहे.

भारतीय संस्कृती म्हणा किंवा माणसाची संस्कृती म्हणा, दोन गोष्टींवर अधिष्ठीत आहे, असं मला वाटतं. एक म्हणजे आठवड्याचा बाजार आणि एक वर्षाचा उत्सव. आठवड्याचा बाजार हा तुमच्या शरीराच्या ज्या गरजा आहेत, त्या पुरवण्यासाठी असतो; आणि वर्षाचा उत्सव तुमच्या मनाच्या ज्या गरजा आहेत, त्या पुरवण्यासाठी असतो. एक फार सुंदर चिनी म्हण आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की, `तुम्हांला दोन पैसे मिळाले, तर एका पैशाचे धान्य आणा, आणि एक पैशाचं फूल आणा. एक पैशाचं धान्य तुम्हांला जगवेल आणि फूल तुम्हांला कशासाठी जगायचं हे कारण सांगेल.' संगीत तुम्हांला, का जगायचं याचं कारण सांगतं. तुम्हांला जगायचं आहे कशासाठी? मला मोगुबाई ऎकायच्या आहेत, मला भीमसेन ऎकायचे आहेत, मला किशोरीबाई ऎकायच्या आहेत, मला दिनानाथांचं गाणं ऎकायचं आहे. याच्यासाठी जगायचंय. सगळ्या कलांचा आनंद घ्यायचाय. मराठीमध्ये, आपल्या भाषेमध्ये, तो शब्द्सुद्धा तसाच हवा. आपण पोटासाठी जे काही करतो, त्याला `उपजीविका' म्हणतात. ती `जीविका' नाही. जीविका कशासाठी? तर चित्रकलेसाठी, आनंदासाठी, अभिनयासाठी, नर्तनसाठी. यासाठी जगणं ही खरी जीविका आहे, आणि ती जिविका कलावंत माणसं देत असतात, म्हणून हा उत्सव वर्षातून एकदा साजरा होणं, हे आपल्या परंपरेला धरून आहे. गोव्यातील लोकांना मी जत्रा, महोत्सव यांबद्दल सांगणं हे चुक आहे. हा सगळा उत्सवांचा प्रदेश आहे. बोरकरांनी म्हटल्याप्रमाणे `माझ्या गोव्याचा भूमीत, येतं चांदणं माहेरा....' मला तर वाटतं, `माझ्या गोव्याच्या भूमीत येतं संगीत माहेरा,' असं म्हणायला पाहिजे. म्हणून माहेरवाशीणीचे जसे लाड होतात, तसे संगीताचे लाड या गोमंतकाच्या भूमीत झालेले आहेत. अनेक तऱ्हांनी इथं ते फुललेलं आहे. देवाच्या अर्चनेसाठी फुललेलं आहे, शेतात काम करण्यांसाठी फुललेलं आहे, होडीवरती फुललेलं आहे, मैफलीत फुललेलं आहे, बैठकीत फुललेलं आहे, सगळीकडे फुललेलं आहे. श्रीमंत आई-वडिलांनी आपल्या पोरीचे लाड करावेत, तिला असं नटवावं, तिला तसं नटवावं तशा रीतीनं लोकांनी या संगीताच्या कलेकडं पाहिलेलं आहे. आणी त्यातली देदीप्यमान रत्नं- दिनानाथांसारखी किंवा मोगूबाईंसारखी किंवा इतर अनेक आपण पाहत आलेलो आहोत. आणि आनंदाची गोष्ट अशी की, ही परंपरा संपलेली नाही. ही संपण्याइतपत लेचीपेची परंपरा नाही.

पुष्कळ लोक असं म्हणतात की, शाश्रीय संगीत टिकणार की नाही, याबद्दल शंका यायला लागली आहे. त्या लोकांना, चांदणे टिकणार की नाही. अशी शंका यावी इतकं ते मला हास्यास्पद वाटतं. कधीतरी मी बैठकीला जातो. एखादा भूप राग चालू असतो. माझ्या मनात विचार येतो की, हजारो वर्षांपूर्वी तयार झालेला हा राग - त्याचा असर आज १९८५ सालीसुद्धा आमच्या अंगावर तसाच पडतो. त्या वेळचं काय वातावरण असेल? लोक घोड्यावर बसून आलेले असतील, पार्टी करुन आलेले असतील. आणि तोच भूप ऎकतात. हा काय चमत्कार आहे? हे चिरंतनाचं काय आहे, हे अमरत्वाचं काय आहे. हे अमरत्व तुम्ही घालवूच शकणार नाही. आमचं जे अभिजात संगीत आहे, त्याचं स्वरूप लक्षात घेतलं, तर ते का विसरता येत नाही, हे आपल्या लक्षात येतं. एका अर्थी हा संगीत महोत्सव इथे कैवल्याचा व्हावा. हा योगायोग मला विलक्षण वाटतो. आपण इथं राहत असल्यामुळं आपल्याला कदाचीत माहीत नसेल. या गावाचं नाव `कैवल्यपूर' आहे. त्याचं आम्ही `कवळा' केलेलं आहे. जास्त जवळ कवळलंय त्याला. आपल्या बोली भाषेमध्ये ही एक गंमत असते. हे कैवल्यपूर आहे. आणि शास्त्रीय संगीत ज्याला म्हणतात, अभिजात संगीत ज्याला म्हणतात, त्याचं स्वरूप मुळी कैवल्यस्वरूप आहे. आमच्या शास्त्रीय संगीताचं मोठेपण याच्यातच आहे की, त्यात रागाला, सुराला, लयीला अर्थ नाही. ते निरर्थक असण्यामध्येच त्याचं मोठेपण आहे. जसं आकाशाला अर्थ नाही आणि म्हणून त्याचं मोठेपण आहे. चांदण्याला अर्थ विचारला तर त्याला अर्थ नाही म्हणून मोठेपण आहे. अर्थ आला की आपण व्यावहारिक पातळीवर यायला लागतो. म्हणून सगळ्यात मोठा आनंद. म्हणजे वचनामध्ये, शब्दामध्ये बद्ध करता येत नाही, असा तो अनिर्वचनीय आनंद. म्हणून हे अभिजात संगीत जे आहे, हे म्हणजे निर्गुणाशी, निराकाराशी चाललेला खेळ आहे. लयीला आणि सुराला आम्ही शब्दातून, साहित्यातून आकार देतो. शब्द मांडतो तिथं. नुसता आलाप केलेला असताना आपल्याला निर्मळ आनंद झालेला असतो. पण दुसरीकडे मी नाही डोलत असं म्हटलं तर त्याला वेगळा अर्थ तुम्ही चिकटवून टाकता. म्हणून जुन्या शास्त्रज्ञांनी. सांगितलंय की, तुम्ही तुमचं शरीर विणा आहे, असं समजा, विणेतून निघणारे जे सूर असतात, त्याला काही अर्थ नसतात. मला एकानं विचारलं, `तुमच्या गाण्याला अर्थ काय?' मी म्हटलं, `त्याला अर्थ नाहे, हाच सगळ्यात मोठा अर्थ आहे.'

*******
आज आमच्याकडे हे संगीत जे टिकून आहे, याचं कारण ती जी शिस्त आहे, ती कडक शिस्त कार्यक्रमांमध्ये पाळली आहे. भारतीय संगीताचं वैशिष्टच असं आहे की, प्रचंड कडक शिस्तीमध्ये आम्ही दंग असतो. संचार करायला मोकळे असतो. एकदा भूप गायला सुरूवात केली की भूपाचा कायदा पाळा आणि आकाशाला गवसणी घाला, पण भूप सोडू नका. तुम्हांला चांगला सोन्याचा दागिना करायचा असेल, तर त्यात चांदीबिंदी मिसळू नका. नुसत्या सोन्यातून करा. गाढव करा. घोडा करा पणं सोन्याचं सोनेपण त्याच्यामध्ये आम्हांला दिसलं पाहिजे. तसं भुपात काहीही करा, बिहागात काहीही करा, पण बिहागाचं बिहागापण तुम्ही सोडू शकत नाही. ते त्याच्यामध्ये यायलाच पाहिजे. हे जे कमालीच्या शिस्तीत कमालीचं अनिर्बंध स्वातंत्र्य आहे, हा जो चमत्कार आहे, हे भारतीय संगीताचं व्यवच्छेदक लक्षण आहे, वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून ज्या वेळेला त्या रागाची सुरुवात होते, त्या वेळेला त्या माणसाचं नातं दोन हजार वर्षांच्या परंपरेशी असतं. दोन हजार वर्षांची परंपराच आपल्यापुढं तो उभा करीत असतो. असं केलं, म्हणून तर हे शास्त्रीय संगीत टिकलं. पण नुसती शिस्त पाळली नाही, तर त्यात आणखी कुठलंतरी वैशिष्ट्य असं आहे की, जे कुठलं आहे, ते मला सांगता येत नाही. आणि ज्यांना सांगता आलं असं वाटलं, त्यांचे लेख वाचल्यावर त्यांनाही सांगता आलं नाही, हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळं ते सांगण्याचा प्रयत्न मी करणार नाही. जसं, सगळीच लहान मुलं आपल्याला खेळताना दिसतात, पण एखादं कार्टं असं असतं की, ते आपलं लक्ष सारखं ओढून घेत असतं. ते सुदंर असतं असं नाही. पण त्याच्यात तसा कुठला गुण असतो, हे सांगता येत नाही. पण त्याच्यात तसा कुठला गुण असतो, हे सांगता येत नाही. तसं या स्वरांमध्ये काय आहे? भीमपलास काय, सगळी दुनीया गाते. पण बालगंधर्वाचा भीमपलास हा त्यांना आंदण दिल्यासारखा वाटतो. किंवा बेगम अख्तरसारखी गझल गाणारी बाई जेव्हा `कोयलिया मत कर पुकार' म्हणते, तेव्हा तिनं तसं म्हटल्याबरोबर तो जो दादऱ्याचा साक्षात्कार होतो. तो त्यांना आंदण दिलाय, दत्तक दिलाय, असं आपल्याला वाटतं. ही जी कलेची किमया आहे, ही सांगणं मला तर शक्य होणार नाही.

*****

पु.ल. देशपांडे

मित्रांनो, 'तो' मीच का 'तो मी नव्हेच' अशी शंका प्रेक्षकांनी कृपया घेऊ नये. तो 'मी'च पु. ल. देशपांडेच आहे. माझे मित्र श्री. वसंतराव कानेटकर यांनी माझी ओळख करुन देताना माझ्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. अत्यंत निकटचे स्नेही असल्यामुळे अशी अतिशयोक्ती होणे स्वाभाविक आहे. मला भीति वाटू लागली होती की, आता हे मी त्यांना अगदी खाजगीत सांगितलेल्या गोष्टी अशा उघड्यावर बोलतात की काय? आणि त्यांनी तसे केले असते तर मी त्यांच्याच एखाद्या सुंदर नाटकाचा विषय घेऊन त्यावर बोलण्याचे ठरविले होते. वास्तविक "कानेटकरांचे सुंदर नाटक" असे म्हणण्यात द्विरूक्ती झाली आहे; कारण कानेटकरांचे प्रत्येकच नाटक सुंदर असते. परंतु कानेटकरांनी तेवढा संयम राखला आणि मला ती संधी दिली नाही.


आताच प्राचार्यांकडून मला असे सुचविण्यात आले की, मी काही मार्गदर्शनपर गोष्टी सांगून विद्यार्थ्यांना उपदेश करावा. वास्तविक माझा असा उपदेश करण्यावर आणि तो उपदेश लोक ऐकत असतील या दोन्हींवर विश्वास नाही.प्रथम ह्या प्रसंगी ज्यांना बक्षिसे मिळाली आहेत आणि ज्यांनी त्यांना ती मिळू दिली अशा दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन करतो. विशेषतः स्वतःचे जीव धोक्यात घालून इतरांचा बचाव करण्यात श्री. तिजारे व श्री. शिंदे यांनी दाखविलेल्या सहजस्फ़ूर्त धाडसाबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. तुमच्या ह्या नाशिक शहराला एक विशेष परंपरा आहे. ती म्हणजे कधी तरी राम येथे पंचवटीत येऊन राहिला आणि सीतामाईने त्याचे पाय चुरले म्हणून नव्हे किंवा नाशिकच्या चिवड्यासाठीही नव्हे. परवाच मी कोणाला तरी सांगितले की मी नाशिकला जात आहे. त्यांनी "ऑं!" असा उद्गार काढला व अगदी चेहरा पाडला. मी म्हटले तसे काही नाही-- स्नेहसंमेलनाचा अध्यक्ष म्हणून मी जात आहे.
नाशिक शहराला सावरकर, कान्हेरे यांच्यासारख्या क्रांतिकारकांची परंपरा लाभली आहे आणि आजही जशी ह्या आठवणींची ज्योत माझ्या ह्रदयात तेवत आहे तशीच ही आठवण तुमच्याही ह्रदयात सतत तेवत राहील अशी माझी खात्री आहे. असले प्रसंग किरकोळ म्हणून नाउमेद व्हायचे कारण नसते. कल्पना करा की,सूर्य मावळताना त्याला चिंता पडली की,माझा उजेड संपल्यावर या सर्व जगाचे कसे होणार?--- सर्व सत्ताधारी व्यक्तींची हीच भीती असते की, माझ्यानंतर या खुर्चीचे काय होणार? सूर्य तरी याला अपवाद कसा? सर्व विद्युद्दीप पेटले होते, मशाली पेटल्या होत्या, अशा वेळी एक बारीकशी पणती---केवढी मिणमिणती ज्योत होती त्या पणतीची !---ती म्हणाली,"भगवन , मला होईल तेवढे मी आपले कार्य करीन. कदाचित आपल्याइतके सामर्थ्य नसेल माझ्या या प्रकाशात. परंतु म्हणून त्याचे महत्व कमी होत नाही." स्वा. सावरकर, कान्हेरे यांसारख्या मोठ्या क्रांतिकारकांच्या साहसाइतके तुमच्या तिजारे, शिंदेंचे साहस मोठे नसेल, पण त्यालाही महत्व आहेच. त्यांच्या कर्तव्यतत्पर साहसप्रवृत्तीला महत्त्व आहे.

मी असे ठरविले होते की, काही भाषण तयार करुन जाण्यापेक्षा येथे आल्यावरच तुमच्याशी काही हितगुज करावे. असे भाषण तयार करुन जाण्याचे माझ्यावर अनेकदा प्रसंग येतात आणि येथे तर ते नेहमीच येत असतील. आजचा विद्यार्थीवर्ग बदलला आहे, असा गहजब नेहमी कानांवर पडतो, पण मला तरी हा विद्यार्थीवर्ग बदलला आहे असे वाटत नाही. विद्यार्थ्यांचे बाह्यांग बदलले आहे, पॅंट्सची रूंदी कमी झाली आहे. तरुणींच्या पोषाखाबाबत मी जास्त तपशीलात शिरत नाही. गॅदरींगच्यावेळी एखादा विद्यार्थी बक्षीस घेत असताना 'वशिला' करुन ओरडणे...सर्व तेच आहे. मीही तुमच्यासारखा असताना असेच ओरडत होतो, आणि म्हणून मला वाटते, जे लोक असे म्हणतात की, विद्यार्थी बदलले आहेत ते लोक स्वतःची विद्यार्थीदशा पूर्णतया विसरलेले असतात.
मला काही सांगायचंय ह्या कानेटकरांच्या नाटकाच्या नावाचा आधार घेउन मी असे सांगतो की, प्रत्येकाच्या कृतीत 'मला काही सांगायचंय' ही भावना असते. आणि ऐकू इच्छिणाऱ्या समोरील व्यक्तिमध्येही त्याचा अनुभव जाणून घेण्याची जिज्ञासा असते. बस पकडण्यासाठी काय माणसे धावत नाहीत ? परंतु त्या धावण्यामागे आणि आताच्या या 'रनिंग'च्या स्पर्धकांच्या धावण्यामागे काही निराळा दृष्टीकोण असतो. त्यामधून त्याला काही सांगायचे असते. त्याचप्रमाणे रांगोळीस्पर्धा. त्या स्पर्धकांना माहीत असते की, रांगोळी फार तर उद्यापर्यंत राहील आणि परवा हा दिवाणखाना झाडणारा नोकर ती रंगोळी, ती कलाकृती झाडून टाकणार आहे. आणि हे माहीत असूनही ते कलावंत पाच पाच, सहा सहा तास खपून ती रांगोळी काढीतच असतात.कारण त्या कलाकृतीतून त्यांना काहीतरी सांगायचे असते. परंतु ते सांगणेसुद्धा सुंदर व आकर्षक असावे लागते. उदारणार्थ, एखाद्या मुलीचे लग्न ठरले---मुलीचे येथे नाव मुद्दामच घेत नाही, नाहीतर उद्यापासून तिचा कॉलेजमध्ये छळ सुरु व्हायचा. म्हणूनच मी 'क्ष' असे म्हणतो. आणि क्ष वगैरे म्हटल्याने आपण विद्वान असल्याचा आनंद होतो---तर समजा, त्या मुलीचे लग्न ठरले, तर लागलीच तिची आई पहिल्या शेजारणीला सांगते,"अहो ऐकलं का ?" ती एकदम सांगत नाही, आमच्या मुलीचे लग्न ठरले म्हणून ! "अहो ऐकलं का ?" की त्यावर ती शेजारीण म्हणते,"का हो,काय झालं ?" ती आई मग सांगते ," बरं का ! आमच्या 'क्ष'चं लग्न ठरलं ! आणि अगदी अचानक , अकल्पितच ठरत असतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील ही सर्वांत मोठी चूक अत्यंत आनंदात साजरी होत असते आणि ह्या सर्व गोष्टी सारे जण रस घेऊन ऐकत असतात.

साहित्य-संगीत-कला या सर्वांच्या मुळाशी 'मला काही सांगायचयं' हीच भावना आहे. उक्तीने व कृतीने आपले म्हणणे सांगण्याची ऊर्मी तुम्हा-आम्हा सर्वांत आहे. सूर्योदय आपण कधी नव्हे तो चुकून एखाद्या वेळी पाहिला असला तरी सूर्योदयाचे चित्र आपण आनंदाने पाहतोच. म्हणजेच या सांगण्यामध्ये आनंद असावा. नाहीतर एखाद्या विद्यार्थ्याला "का रे झाला का बक्षीसमारंभ ? किती बक्षीसे वाटली ?" असे विचारल्यावर त्याने " वाटले पन्नाससाठ कप " असे उत्तर दिल्यास विचारणाऱ्याला पुढे हिंमतच व्हायची नाही. पण तेच जर "वा ! केवढी गर्दी झाली होती पु. लं. च्या भाषणाला ! काय त्यांची लोकप्रियता !" (मी पु. ल. नाव फ़क्त उदाहरणादाखल घेतले आहे व 'क्ष' जागी ते घेतले आहे.) असे सांगितल्यावर विचारणाही साहजिकच "ही आली होती का, ती आली होती का," असे विचारील आणि सांगणाराही अत्यंत आनंदाने सांगेल---कॉलेजमध्ये कधी न दिसणाऱ्या मुली आज दिसत होत्या...आणि त्या बोलण्याच्या आनंदात मग पु. ल. आपोआप केव्हाच मागे पडतील.

जीवनातील आपले अनुभवाचे संचित दुसऱ्यापुढे मांडावे, दुसऱ्याचे आपण पहावे, अशी जी आपली इच्छा असते तीतच माणसाचे माणूसपण आहे. परंतु जेव्हा एखादा पालक आपल्या मुलाला "मला तुझं काही ऐकायचं नाही, तुला काही सांगायचं नाही" असे म्हणतो आणि हे सांगणे व ऐकणे जेथे संपते तेथेच त्या माणसातला माणूसही स्वतःला पूर्णपणे हरवून बसतो.परंतु माणसामाणसांचे हे प्रेम व सहानुभूती इतकी उत्कट असते की, माणसाला मरतानासुद्धा निर्जीव उशीचा आधार चालत नाही तर त्याला थरथरणाऱ्या मांडीचा आधार डोक्याखाली लागतो. पाकिस्तानमध्ये झालेल्या वादळाच्या वेळी मृत्युमुखी पडलेल्या वा घरकुले विस्कळित झालेल्यांबद्दल आपणाला सहानुभूतीच वाटते. त्या वेळी आपण त्यांच्याकडे पाकिस्तानी म्हणून न बघता एक माणूस या दृष्टीनेच पाहतो.

दुर्दॆवाने 'सहानुभूती' हा शब्द आजकाल दुःखद घटनांच्या वेळीच वापरला जातो. वास्तविक सहानुभूती म्हणजे सह + अनुभूती = दुसऱ्याचा अनुभव आपला मानून त्याच्या अनुभवविश्वात शिरणे, ही माणसाची महान शक्ती आहे. उदाहरणार्थ, कानेटकरंचे शिवाजीवरील नाटक ! आपणांला माहीत आसते की शिवाजीचे काम करणारा माणूस हा शिवाजी नाही, तर तो रंगमंचावर काम करणारा एक नट आहे आणि तो आपल्याशी बोलत आहे---खरा शिवाजी असता तर आपणांशी बोललाही नसता. कारण आपण नालायक बनलो आहोत---परंतु आपण हे नाटक पाहण्यासाठीसुद्धा पैसे खर्चून जातो आणि विकत काय घेतो तर शिवाजीची व्यथा ! आपल्याही नकळत आपला त्यातील पात्रांशी नाट्यगृहात एक मूक संवाद चाललेला असतो. असे एखादे यंत्र निघाले आणि त्यातून हा मूक संवाद टेप झाला तर तो आपणाला स्पष्टपणे ऐकू येईल. ह्यालाच सहानुभूती ---सह + अनुभूती---म्हणतात. ही शक्ती निसर्गाने फ़क्त मानवालाच दिली आहे आणि ही सहानुभूती जेव्हा आपल्या मनात निर्माण होते तेव्हाच आपणांस आपण माणूस असल्याचा आनंद होतो आणि त्यातील प्रेक्षक हा त्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह तारांपैकी निगेटीव्ह तार बनलेला असतो. त्यातूनच आनंददान नि आनंदग्रहण अखंडतया सुरु असते.

म्हणून साहित्य, संगीत, कला या सर्वांच्या मूळाशी मला काही सांगायचयं हीच भावना असते आणि माणसाची स्वाभाविक भावना दुसऱ्याच्या अनुभवविश्वात रममाण होण्याची असल्यामुळे आपण ही ते अनुभवितो आणि त्यातील कलेचा आस्वाद घेतो. गडकऱ्यांचे 'एकच प्याला' बघायला गेल्यावर आपण आपोआप म्हणतो," काय सुंदर श्ब्दांत यांनी सिंधूचं दुःख वर्णन केलं आहे !" त्या कलेच्या आस्वादापासून आपणांस एक प्रकारचा आत्मिक आनंद प्राप्त होतो आणि एक मूक संवाद पुन्हा आपल्या ह्र्दयात सुरु होतो. परंतु उद्या जर तुमच्या शेजारी एखादा दारुड्या आपल्या बायकोला मारीत असेल आणि ती रडत असताना तुम्ही तिथे जाऊन "वा ! काय सुंदर देखावा आहे !" असे म्हणालात तर पुढचा फटका कोणाला बसेल हे तुम्ही जाणताच !


निराशावादी माणसालासुद्धा "मला मरावंसं वाटतं" असे दुसऱ्या कोणाला तरी सांगावेसे वाटते आणि तो आपल्या कवितेद्वारा आपले ते विचार बोलून दाखवतो. आपण जर त्याला म्हटले," मग आपण गेलात तरी चालेल " तर तो म्हणतो," पुढची कविता तर ऐका ! " खरे म्हणजे आजच्या कॉंग्रेसच्या राज्यात जीव देण्यासारख्या अनेक जागा मला दाखवता येतील.

संगीताच्या मैफलीच्या वेळी मला अनेकदा विचारले जाते, गाणे किती वाजता सुरु होणार आणि किती वाजता संपणार ? मी त्या गृहस्थाला नमस्कार करतो आणि सांगतो, कृपा करुन आपण येऊ नका. गाणे रात्री सुरु होईल आणि पहाटेपर्यंत केव्हातरी संपेल. संगीतातील सूर, लय, ताल यांचे ज्ञान माणसास हळूहळू येते. लहानपणी मुलाला खेळवताना त्यांच्या साऱ्यांच्या आया गाणे म्हणतात---"अडगुलं मडगुलं." पण मला वाटते, शेकडा ४ टक्के मुले बरोबर त्या त्यालावर हातपाय हलवतात. बाकीची मुले इतकी मठ्ठ असतात की त्यांच्या आया स्वतः नाचल्या तरी ती गप्पच असतात. ही मुले बहुतेक पुढे कुठेतरी तत्वज्ञानाचे प्राध्यापक होत असतील.


आजचा विद्यार्थी असंतुष्ट आहे असे आज सर्वत्र म्हटले जाते. पण मी विचारतो विद्यार्थ्यांनी काय संतुष्ट असायला पेन्शन घेतले आहे, की त्यांनी म्हणावे बायकोमुले सुखात आहेत ? विद्यार्थ्यांनी असंतुष्टच असायला हवे. पण तो असंतोष विघातक नको. त्यातून मशाली पेटल्या पाहिजेत. नाहीतर आपण कचराच पेटवाल. हा असंतोष पूर्वापार चालत आल आहे. तुकाराम काय संतुष्ट तरुण होता ? ज्ञानेश्वर असंतुष्ट होते म्हणूनच 'अमृतातेही पैजा जिंके' अशा भाषेत गीतेचे तत्त्वज्ञान मराठीत आणले. एकाच चिखलात कमळ आणि बेडूक दोन्ही असतात, पण बेडूक चिखलातच बुडालेला असतो आणि कमळ मात्र चिखलातूनही मान वर करुन उभे असते. आपण बेडूक होणार की कमळ होणार ते आपणच ठरवा.
आपण आज ह्या कॉलेजच्या स्नेहसंमेलनासाठी मला बोलावले. वास्तविक आपण जे रोज येथे जमता तेव्हा का तुमच्यत स्नेह नसतो ? कधीकधी तर स्नेह जुळावासा वाटतो पण तो जुळत नाही. परंतु अशा स्नेहसंमेलनातून आपणांला काहीतरी सांगायचे असते. अशा वेळी वक्त्याचे भाषण पाडून ओरडा करणे हे विद्यार्थ्याचे साहस नाही. त्या वक्त्याचे त्यात काही जात नाही ! मुले मूर्ख आहेत असे म्हणून तो निघून जातो. परंतु वर्गातील १०० मुलांमध्ये ' मला हे समजलले नाही ' म्हणून उभे राहून प्राध्यापकाला ताडकन विचारणे हे साहस ! परंतु हे साहस कोणी करीत नाही. दोन हजारांतील फक्त पाचशे विद्यार्थीच खरे विद्या + अर्थी या नात्याने आलेले असतात. बाकीचे आई-वडिलांनी पाठविले म्हणून आलेले असतात. या बाबतीत पालकांचे अज्ञानही बघण्यासारखे असते. एखाद्या मुलाने जर म्हटले की " मी 'अर्ध' मागधी घेतो ; ते स्कोअरिंग आहे." तर पालक म्हणतात, "मग 'पूर्ण' मागधी का घेत नाहीस ? 'अर्ध'-मागधीच का घेतोस ?" आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये खरी ज्ञानलालसा कमी असते. पण पुढच्या वर्षी जर ती ज्ञानलालसा असलेली पाचशेच मुले ह्या कॉलेजमध्ये राहिली तर मी ह्या कॉलेजची भरभराट झाली असेच म्हणेन ! मग येथे एवढाल्या लायब्ररीज, लॅबोरेटरीज नसतील तरी ज्ञानलालसेच्या ईर्षेमुळे एखाद्या झाडाखाली फिजिक्सकेमिस्ट्री आणि मॅथ्ससारखे विषयही शिकता येतील.

मी आज सकाळीच तुमच्या कॉलेजच्या एका मुलीला विचारले,"तुम्हांला ज्ञानेश्वरांचं काय काय आहे ?" तर ती म्हणाली,"१० मार्कांचा ज्ञानेश्वर आहे." मी पुढे विचारणार होतो की, "माझं किती साहित्य आहे ?" पण पहिल्या उत्तराने मला पुढील प्रश्न विचारण्याचा धीर झाला नाही. कारण ज्ञानेश्वरच दहा मार्कांचा तर मला १ लक्षांश तरी मार्क असेल की नाही कोणास ठाऊक ! आजकाल समग्र ज्ञान मिळविण्याची ईर्षा कमी झाली आहे. त्यांचा ज्ञान मिळविण्याचा 'स्पॅन' लिमिटेड झाला आहे. एका डिग्रीच्या बिनमहत्त्वाच्या कागदासाठी ही सर्व झटापट आहे. या बाबतीत एका पीएच.डी.च्या विद्यार्थिनीचा मला आलेला अनुभव आपणापुढे मांडतो. तिने पीएच.डी.साठी 'मराठी कादंबरी' हा विषय घेतला होता. मी तिला नंतर विचारले, आपणाला 'रणांगण'बद्दल काय माहिती आहे ? तिने विचारले,'रणांगण'? कारण तिच्या पीएच.डी.साठीच्या कादंबरीच्या स्पॅनच्या पलीकडील हा विषय होता. केवळ डिग्रीसाठी हा खटाटोप होता. ज्ञान मिळवण्याची आस बिलकूल नव्हती. तिच्या परीक्षकाने जर 'नाशिकमधील गाढवे व गाढवांचे प्रकार' या विषयावर प्रबंध लिहिण्यास सांगितला असता तर तोही तिने ह्या डिग्रीच्या कागदासाठी लिहिला असता---स्वतःचाही त्यात समावेश करुन ! आणि तो प्रबंध व ती बाई दोन्हीही बघण्यासारखे नव्हते हे आणखी एक नवल !

आज मला येथे सांगण्यात आले की पारितोषिके बरीच वाटायची आहेत, आपणांला त्रास नाही ना वाटणार ? परंतु मला यात कंटाळा नाही ! अहो त्यासाठीच तर मी येथे आलो आहे. आज येथे स्टेजवर येऊन मोकळेपणाने मुली संगीताची, खेळांची पारितोषिके घेऊन जात असताना मला आठवण होते ती आगरकर, फुले यांनी घेतलेल्या कष्टांची आणि झेललेल्या चिखलमातीची ! मग मला समोर त्या मुली दिसत नाहीत, पारितोषिके दिसत नाहीत, आणि एका निराळ्याच अनुभवविश्वात मी स्वत:ला हरवून बसतो

माझ्याबद्दल अशी एक हकिगत सांगितली जाते की, माझे लहानपण अत्यंत गरिबीत गेले. खरे म्हणजे गरिबीत वगैरे काही गेले नाही, पण आजच्याइतके ते चांगल्या स्थितीत गेले नाही एवढे मात्र निश्चित ! पण तेव्हाही आम्हांला आम्ही गरीब आहोत ह्याची आठवण व्हायला फुरसत नसायची. आज काय बालगंधर्वाचे गाणे आहे, पळा तिकडे ! उद्या काय सी.के.नायडूंची मॅच आहे, जा तिकडे. मग कधी ती झाडांवर चढून बघ, तर कधी दुसऱ्याच्या गच्चीवरुन ! (फुकट बघायला मिळते म्हणून.) आमच्या पाठीमागे इतकी व्यवधाने असत की आमच्या गरिबीचीसुद्धा आम्हांला आठवण होत नसे. ह्याबाबत टागोरांची एक कविता सांगतो.---एक माणूस असतो. त्याच्या गळ्यात एक लोखंडाची साखळी असते. ती सोन्याची करण्यासाठी त्याला परीस शोधायचा असतो. समुद्राच्या काठाने जाताना तो सारखा दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि खाली टाकून द्यायचा ! असे करता करता निराश होऊन खूप पुढे गेल्यावर त्याने सहज साखळीला हात लावून पाहिला तर ती केव्हाच सोन्याची झालेली होती ! त्याच्या हातातून परीस केव्हाच निसटून गेला होता. तुमच्याही प्रत्येकाच्या हातात परीस आहे. कोणाच्या हातात तो चित्रकलेच्या रुपात आहे,कोणाच्या हातात संगीताच्या रुपाने ! फक्त त्याकडे नीट बघावयास शिका. याबद्दल मला एक उर्दू शेर आठवतो---"बगीच्यात फुलांचे ताटवे फुलले आहेत, गुलाबाची फुले डुलत आहेत, पण त्यांकडे बघण्यासच कोणी नाही."

साहित्यकार, लेखक होण्याची इच्छा असणारे अनेक तरुण माझ्याकडे येतात आणि मला विचारतात,आम्ही काय वाचू ? कशाचा प्रथम अभ्यास करु ? मी त्यांना सांगतो, बाहेर पडल्यापासून नाक्यावरच्या जाहिरातीपासून तुम्ही बघत चला. मग ती जाहिरात अगदी 'दो या तीन बच्चे बस !' ही जाहिरात असली तरी चालेल. परंतु फक्त तेच बघू नका. जीवनाच्या महान अर्थाकडे बघण्यास शिका आणि कशावरही लिहा. मग ते झोपडपट्टीचे वर्णन असो अगर एखाद्या ताजमहालाचे ! यावरुन मला मर्ढेकरांच्या एका कवितेवरुन झालेल्या वादाची आठवण होते. विषय होता 'उंदीर' ! त्यावर टीकाकार म्हणाले, एवढ्याशा उंदरावर काय कविता काय करायची ? दुसरे विषय नव्हते ? परंतु काव्यविषय हा त्याच्या आकाराच्या लहानमोठेपणावर ठरत नाही.असे असते तर प्राण्यामधील सर्वात मोठा प्राणी हत्ती आणि निसर्गातील सर्वात उच्च हिमालय ह्यांशिवाय काव्याला विषयच उरले नसते. मग गुलाबाच्या एखाद्या फुलावर किंवा पाकळीवर काव्यच झाले नसते. कारण ते फूल आकाराने लहान होते ना !

लायब्ररीत अनेक ग्रंथ असतात, पण त्यांतील माझे पुस्तक पाहण्याचा मला अजिबात धीर होत नाही. कारण त्यावर अनेक शेरे ठिकठिकाणी मारलेले असतात ! भिकार विनोद ! यापुढे लेखन बंद करावे ! ---कित्येकदा वा ! वा ! फारच सुंदर ! असेही लिहिलेले असते आणि मलाही वाटते नेमके तेच पान उघडले जाईल याची खात्री नसते. व्यावहारिक समीक्षकांच्या टीकेचे काही वाटत नाही. कारण टीका लिहून लिहून त्यांचे कातडे अगदी जाड झालेले असते ! पण तो त्यांचा व्यवसायच असतो. त्याविषयी ते करणार तरी काय बिचारे ! पण ह्या अशा उत्स्फूर्त शेऱ्यांना मात्र एक सत्याची फार मोठी किनार असते. ज्यातून मला फार शिकायला मिळते.

जीवनाच्या तीन अवस्था आहेत. तारुण्य, संयम नि निवृत्ती. तुम्ही तरुण विद्यार्थी जर एखादी सुंदर तरुणी जात असताना आकाशाकडेच डोळे लावून बसलात तर तो तारुण्याचा अपमान आहे. पण हे जाणूनही आपणांकडे नंतरच्याही अवस्था आहेत हे तुम्ही विसरुन चालणार नाही. 'मौनं सर्वार्थसाधनम' अशी पूर्वीच्या गुरुंच्या प्रेरेणेत शक्ती होती. परंतु आज तसे नाही. असले विचारधन अवलोकनाने आपण समृद्ध करायला हवे. गुरुंनी समजावून सांगायला हवे व ऐकणाऱ्याने ते ऐकायला हवे. मौनं म्हणजेच गुरुपण असते तर शिष्यालाच गुरु केले असते.

मला नेहमी विचारण्यात येते, कलावंत जन्माला यावा लागतो का? कलावंत जन्माला यावा लागत नाही. पण जगाकडे आपण सूक्ष्मपणे उघड्या डोळ्यांनी बघावयास हवे ! जे पाहिले ते सुंदर, आकर्षक शब्दांत सांगता आले पाहिजे ! जनतेची नाडी ज्याने पाहिली त्याला आपला अनुभव सांगण्याची ओढ असते. तेथेच कलावंत असतो.

ज्या जगात मी आलो ते हे जग मृत्यूपूर्वी मी सुंदर करुन जाईन अशी जिद्द हवी. केवळ विद्यार्थ्याबद्दलच नव्हे तर आपल्या सर्वच समाजाबद्दल माझी ही तक्रार आहे की, आपण जीवनाकडे पाहतच नाही. तरुण असंतुष्ट म्हणून ओरड होते. मी म्हणतो तरुण असंतुष्ट नाहीत तो काय देश आहे ? तरुणांनी असंतुष्टच राहिले पाहिजे. पण ते या अर्थाने की त्यांनी जीवनाचे आव्हान स्वीकारायचे.-"प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा" असे केशवसुतांनी सांगितले आहे. त्यातील 'लेणी' हा शब्द फार सुंदर आहे. त्यांनी चित्रे रंगवा असे म्हटले नाही. तर, कलानिर्मिती ही त्याहून अवघड कामगिरी आहे. ही निर्मिती सहजासहजी होत नाही.त्यासाठी पत्थर फोडून त्याच्याशी झुंज द्यावी लागते. हे आव्हान तुम्ही स्वीकारा, तशी जिद्द बाळगा, एवढेच माझे आजच्या तरुण पिढीला सांगणे आहे.

महाराष्ट्र टाईम्स १२ जुन २००८


चंद्रपूर येथील अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ४ मार्च १९८९ ला पुलंनी केलल्या भाषणातला अंश...

आयुष्यात माणसाला निखळ माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देणारा मंत्र मला केशवसुतांच्या ' मळ्यास माझ्या कुंपण पडणें अगदी न मला साहे ' या ओळीत सापडला. शाळकरी वयापासून आजतागायत केशवसुतांना मी अनेक वेळा भेटत आलो. माझ्याप्रमाणे तुमच्यापैकी अनेकांसाठी केशवसूत आजही गातचि बसले आहेत. वाढत्या वयाबरोबर आसपास पाहायला लागल्यावर वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाच्या मळ्याला जात, धर्म, राष्ट्रीयत्त्वाच्या भ्रामक कल्पना, देव, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, पुनर्जन्म, पूर्वजन्म, कर्मविपाक अशा नाना प्रकारची नाना कारणांनी उभारलेली असंख्य कुंपणं दिसायला लागली.

ऐहिक आणि पारलौकिक दहशतीच्या दगडांच्या भिंतीची ती कुंपणं होती. अशा या अंधा-या वातावरणात जगणा-यांच्या जीवनात वीज चमकावी, गडगडाट व्हावा, मुसळधार पाऊस कोसळून नांगरल्याविण पडलेल्या भूमीवर नवं पीक येण्याची चिन्हं दिसावी अशी अवस्था झाली. बाबासाहेबांनी एक नवा शब्द शिकवला आणि त्यातून जुनं जग उलथवण्याची शक्ती असलेलं साहित्य उभं राहिलं. तो शब्द म्हणजे ' धम्म ' . ' धम्म ' या शब्दानं समाजात माणसाचं श्रेष्ठत्व आणि ऐहिकता या सर्वात महत्त्वाच्या मूल्यांची प्राणप्रतिष्ठा केली. या नव्या जीवनमूल्यांना त्यांनी धम्म म्हटलं. बाबासाहेबांनी एका धर्माचा त्याग करून दुसरा धर्म स्वीकारला, असं झालं नाही. तर, निखळ प्रज्ञा आणि करुणेचं त्यांना जिथे अपूर्व मिश्रण आढळलं, त्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी स्वीकार केला. अंधश्रद्धांवर आधारलेल्या जीवनपद्धतीकडून प्रेम आणि निर्मळ बुद्धीच्या बळावर चालणा-या जीवनपद्धतीचा त्यांनी स्वीकार केला. या बुद्धिनिष्ठ जीवनपद्धतीचं नाव ' धम्म ' असं आहे.

बाबासाहेब हे सामाजिक शोषणाच्या पाळामुळाशी जाऊन कुदळ चालवणारे पहिले क्रांतिकारक म्हणायला हवेत. उन्मत्ताच्या टाचेखाली रगडल्या जाणा-या माणसाला माणुसकीच्या प्राथमिक हक्कांसाठी लढणारा सैनिक म्हणून उभं करणं हे एक दिव्य होतं. बाबासाहेबांनी ते करून दाखवलं. चवदार तळ्याचं पाणी सर्वांना वापरायला द्यायची घोषणा म्हणजे बाबासाहेबांनी आंधळ्या रुढी पाळणा-या अमानुषांना निखळ सुंदर माणसं बनवण्याची दिलेली एक सुवर्णसंधी होती.

दलित साहित्याचं जे सूर्यकूल आपण मानतो त्याची पहाट महाडच्या क्षितीजावर फुटली होती, असं म्हणायला पाहिजे. शरसंधानासारखं हे शब्दसंधान होतं. एका नव्या त्वेषाने पेटलेल्या कवींना आणि कथा-आत्मकथा-कादंबरीकारांनी या प्रतिमासृष्टीतून वास्तवाचं जे दर्शन घडवलं, ते साहित्यात अभूतपूर्व असं होतं. जिथे धर्म, वर्ण, वर्ग या शक्ती माणसाच्या छळासाठी अन्याय्य रीतीने वापरल्या जातात, तिथे त्या प्रवृत्तींचा नाश करायला शस्त्र म्हणून जेव्हा शब्द वापरले जातात त्या क्षणी दलित साहित्याचा जन्म होतो. त्या साहित्यिकाचा जन्म कुठल्या जातीत आणि कुठल्या धर्मात झाला याचा इथे काहीही संबंध नाही. शोषण, उपेक्षा, जन्मावरून उच्चनीच भेद ठरवणा-या रुढी यांचा बीमोड करायला उठलेलं हे साहित्य फक्त माणुसकीला मानतं. ' बहुजन हिताय बहुजन सुखाय ' हीच मुळी या साहित्याची मूळ प्रतिज्ञा आहे. वास्तवाशी इमान राखून तिथे पदोपदी जाणवणा-या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, या ध्येयाने प्रेरित झालेले हे साहित्य जन्मजातच दुय्यम दर्जाचे, असा साहित्यिक हिशेब मांडणा-यांना दलित साहित्य हा शब्द खटकणारच.

दलित शब्दाची व्याप्ती लक्षात न घेणा-यांना दलित संमेलन हा सवतासुभा वाटतो. पण ही विचारसरणी नवी नाही. माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, हा विश्वव्यापी विचार घेऊन लढलेल्या आंबेडकरांना हिंदू समाजातल्या अस्पृश्यांचे पुढारी म्हणून एका कुंपणात टाकून देण्यात आले होते. त्यांच्या प्रेरणेने निर्माण झालेल्या साहित्यालाही अशाच प्रकारचं लेबल लावून त्यामागील व्यापकता आकुंचित करण्यात आली तर त्यात नवल नाही. बाबासाहेबांसारखा ग्रंथप्रेमी आजच्या काळात लाखात एखादा झाला असेल. पण जीवनातला त्यांचा प्रवास मात्र ग्रंथाकडून ग्रंथाकडे असा झाला नाही. ग्रंथाकडून जीवनाकडे आणि जीवनाकडून ग्रंथाकडे अशी त्यांची परिक्रमा चालली होती. अशी जीवनातून प्रेरणा घेऊन पुन्हा जीवनालाच सार्थ करणारे साहित्य निर्माण करायची प्रेरणा लाभावी या साहित्य संमेलनाचा प्रपंच आहे, असं मी मानतो.

महाराष्ट्र टाईम्स १२ जुन २००८

३ जुलै १९८७ ला अमेरिकेत न्यू जर्सीला झालेल्या बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात पुलंनी केलेल्या अध्यक्षीय भाषणातील अंश...

* इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की, साँग हॅज द लाँगेस्ट लाइफ. गाणं हे चिरंतन असतं. या मराठी मुलांच्या ओठांवर, मनामध्ये तुम्ही मराठी गाणी दिलंय. अशी पाचपन्नास गाणी दिलीत, तर मराठी संस्कृतीची चिंता करण्याचं तुम्हाला काहीही कारण उरणार नाही. हे गाणं या बालकांबरोबर त्यांच्या वयाच्या ऐंशीव्या-नव्वदाव्या वर्षापर्यंत जाईल, कदाचित शंभराव्या वर्षापर्यंतसुद्धा जाईल. जोपर्यंत एक मराठी गाणं तुमच्या ओठांवर आहे, तोपर्यंत तुम्ही अमेरिकेत राहा, नाहीतर टिंबक्टूत राहा, कुठंही राहा, तुम्ही मराठीच आहात. त्यात काही चिंता बाळगण्याचं कारण नाही.

* तुकारामासारख्या संतानंसुद्धा म्हटलंय की, ' माझिया जातीचा मज मिळो कोणी ' . इथे ' जातीचा ' याचा अर्थ माझ्यासारखी ज्याला विठ्ठलाची ओढ आहे, देवाची ओढ आहे. अशा प्रकारचा कोणीतरी मला मिळो. तुकारामाच्याच उक्तीप्रमाणे बोलायचं तर ' माझिया भाषेचा मज मिळो कोणी ' या भावनेनं आपण इथे एकत्र आलेले आहोत. आणि इतक्या संख्येनं इथे एकत्र जमलेले आहोत की , मला तर असं वाटतं, कोणीतरी तिथून ' न्यू जर्सीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ', असं म्हणेल की काय !

* परदेशात आपल्या भाषेचा शब्द कानांवर पडणं मुश्कील. म्हणूनच तर तो ' परदेश ' होतो ना ! मला खात्री आहे की, इथे अगदी अनोळखी प्रदेशातून प्रवास करताना कानांवर बालकवींची कविता वगैरे जाऊ दे, पण ' च्यायला ' अशी शिवी जरी ऐकू आली, तर ती ओवीसारखी वाटेल आपल्याला त्यावेळी.

* हे जीवन सुंदर व्हावं, आनंददायक व्हावं, हाच हेतू सगळ्या संस्कृतीच्या मुळाशी असतो. गुलाबाचं फूल आणि मोग-याचं फूल ही फुलं भिन्न आहेत, म्हणजे त्या फुलांचं वैर आहे असं नव्हे. त्यातलं फूलपण एकच आहे. ' ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा ' असं चोखोबांनी म्हटलंय. ऊस वाकडा पण रस वाकडा नसतो. गाय काळी म्हणून दूध काळं नसतं. तसं हे फुलातलं फूलपण खरं. तिथे पुष्पसृष्टीचेच कायदे लागू पडतात. प्रत्येक माणसाला, तो कुठलाही असला तरी जीवसृष्टीचेच कायदे लागू पडतात. दाढ ठणकायला लागली की, कानडी मनुष्य ' अय्यय्यो ' म्हणून कानडीत ठणाणा करील. तो कानडीतून असला, इंग्लिशमधून असला किंवा जपानीतून असला, तरी दाढ ठणकण्याची वेदना तीच आहे. त्याच्यामध्ये काही फरक नसतो. एकात्मतेत विविधता आणि विविधतेत एकात्मता - ' युनिटी इन डायव्हर्सिटी ' म्हणतात ती हीच. एकात्मता हे जसं सत्य आहे, त्याचप्रमाणे विविधता हेही सत्य आहे.

* कुसुमाग्रजांची एक कविता आहे, ' नवलाख तळपती दीप विजेचे येथ, उतरली जणु तारकादळे नगरात, परि स्मरते आणिक करिते व्याकुळ केव्हा, त्या माजघरातील मंद दिव्याची वात. ' आपल्या माणसांपासून, आपल्या भाषेपासून हजारो मैल दूर असलेल्या आपल्यासारख्या मराठी माणसांच्या मनाच्या माजघरामध्ये आजूबाजूला एवढं सारं ऐश्वर्य असूनही जिवाला व्याकूळ करणा-या मंद दिव्याच्या वाती या असणारच. या मेळाव्यात अशा माजघरातल्या मंद दिव्याच्या वातींचं स्मरण न होणारं असं कुणी असेल, असं मला वाटत नाही. ती रुखरुख नसती, तर मराठी भाषेची ज्योत तशीच पेटत राहावी, या भावनेनं तुम्ही असे एकत्र आला नसता. ज्या भाषेचे संस्कार तोंडावाटे शब्द फुटण्याच्या आधी आपल्या कानांवर झाले, त्या भाषेची नाळ ही नुसती कानाशी जुळलेली नसते, प्राणाशी जुळलेली असते. शरीरातून रक्त वाहावं तशी आपल्या व्यक्तिमत्त्वातून भाषा वाहत असते, तो प्रवाह थांबवणं अशक्य असतं. आईच्या दुधाबरोबर शरीराचं पोषण होत असताना तिच्या तोंडून येणा-या भाषेनं आपल्या मनाचं पोषण होत असतं. केवळ देहाच्या पोषणानं माणसाचं भागत नाही. किंबहुना मानव म्हणजे ज्याला मन आहे तोय मन एव मनुष्यः अशी योगवासिष्ठामध्ये माणसाची व्याख्या केलेली आहे. या मनाचं पोषण भाषा करत असते. त्या पोषणाचे पहिले घास ज्या भाषेतून मिळतात, ती आपली भाषा.

* ' पुंडलिक वरदा ' म्हटल्यानंतर तुम्ही आस्तिक असा की नास्तिक असा, ' हारी विठ्ठल ' तोंडातून येणारच तुमच्या. तो प्रतिसाद तुम्हाला कळण्यापूर्वी उमटलेला असतो. अशा नेणिवांतून, आपोआप उमटणा-या प्रतिक्रियांतूनच समाजमानस तयार होत असतं. ' छत्रपती शिवाजी महाराज की ' म्हटल्यानंतर ज्याच्या तोंडून आपोआप ' जय ' येत नाही, तो मराठी माणूस आहे असं आपल्याला वाटतच नाही.

* खुद्द महाराष्ट्रात आज मराठीपेक्षा इंग्रजी भाषेलाच जास्त मान आहे. इंग्रजाच्या अमदानीमध्ये तिला राजभाषा म्हणून मान मिळत होता. इंग्रजी शिकायची सक्ती होती, आता तशी सक्तीही नाही. पण इंग्रजी भाषेची किल्ली हातात असली की, अभ्युदयाची अनेक दारं उघडली जातात, हे अनेक लोकांनी ओळखलेलं आहे. किंबहुना, पुण्याहून मुंबईला जाताना नव्यानेच कारखानदारीत शिरलेले जोशी-कुलकर्णीसुद्धा एकमेकांशी इंग्रजीत बोलत असतात. आता त्यांचं इंग्रजी ऐकल्यावर इंग्रज हा देश सोडून का गेला, हे आपल्याला कळतं.

* अमेरिकेमध्ये आल्यानंतर केवळ डॉलर्सचा संचय हे एकमेव उद्दिष्ट राहू नये, तर नवी निर्मिती करण्याचे जे जे काही प्रकार इथे चाललेले आहेत, चांगले आहेत, सुंदर आहेत, त्याच्यामागे आपली मुलं कशी लागतील, त्याची त्यांना आवड उत्पन्न कशी होईल, याची तळमळ हवी. आजच्या काळामध्ये मी एकच विनंती करणार आहे, इथं तुम्ही जमलेले आहात, फार मोठे तंत्रज्ञ-शास्त्रज्ञ आहात, तुम्हाला महाराष्ट्राची सेवाच करायची असेल, तर तुमचा जो विषय आहे, त्याच्यावरचे लेख मराठीत लिहून ते महाराष्ट्रात पाठवा. ही मराठी भाषेची सगळ्यात मोठी सेवा होईल. तळमळ खरीखुरी असेल तर अशक्य काहीही नाही.

"कुर्यात सदा मंगलम--" मी मंगलाष्टके म्हणायला सुरुवात केली. माझ्या आयुष्यातला तो एक अद्भुत अनुभव होता. बाबा आमट्यांच्या आनंदवनात महारोगातुन मुक्त झालेली आठ जोडपी उभी होती. एका मुहूर्तावर आठ लग्ने लागत होती आणि अचानकपणे मंगलाष्टके म्हणणाऱ्या भटजीची भूमिका माझ्याकडे आली होती! जरीकाठी धोतराचा लांबच लांब अंतरपाट धरला होता. हातात वरमाला घेऊन आठ रोगमुक्त वधू उभ्या होत्या आणि समोर आठ रोगमुक्त वर होते. सुदंर मांडव सजला होता, पण गर्दी खूप दाटली होती. त्यामुळे शेकडो माणसे उघड्यावर आकाशाच्या छताखाली बसली. आनंदवनातल्या गायींच्या खिल्लाराने मुहूर्त गोरज आहे हे गोठ्यात परतताना उडवलेल्या धुळीतून सिद्ध केले होते.

"आली लग्नघडी वधूवरशिरी टाका सुमंत्राक्षता-" मंगलाक्षतांचा वर्षाव झाला. एकेकाळी केवळ क्षतांनी भरलेल्या शरीरावर आज साताठशे लोकांच्या समुदायाने शरीरावर आज साताआठशे लोकांच्या समुदायाने मंगलाक्षतांची वृष्टी केली. अंतरपाट दुर झाला. आठ लग्ने एकदम लागली.

त्या आनंदवनात मंगलाष्टके म्हणताना मनात आनंदाचे आऊर दाटले होते, ते क्रांतीच्या अशाच एका सुदर्शानाने! बाबा आमटे या माणसाने एक अलौकिक प्रयोग सुरू केला. नुसता मानवतावादाचे शांतिपाठ गाणाऱ्या प्रवचनकाराचा नव्हे. आमच्या देशात जिवंतपणे जगणारे कमी आणि जीवनाचे भाष्यकार रगड. बाबा आमटे तसले योगी नव्हते.

वऱ्हाडातल्या गोरजे गावच्या सधन इजारदार घराण्यात छपन्न वर्षांपूर्वी जन्माला आलेला हा मुरलीधर आमटे. चांदीच्या चमच्याने उष्टावण झालेला. शेकडो एकर उत्पन्नाच्या जोडीला वडिलांना मानाची सरकारी नोकरी. बाबांच्या आईने तर लहानपणी त्यांना बोंडल्यातून दुधाऎवजी धाडसच पाजलेले दिसते. या माणसाला भीतीचा स्पर्शच नाही. नुकती पन्नाशी उलटलेल्या या माणसाने आयुष्यात नरभक्षक वाघांपासून ते नरराक्षक गुंडांपर्यंत कुणाकुणाशी कसा-कसा मुकाबला केला, याचा वृत्तांत 'टारझन'च्या कथेपेक्षाही अधिक रोमांचकारी आहे. मोठ्यामोठ्या संस्थानिकांकडेच असणारी रेसर गाडी स्वत: बाळगून कराचीच्या मोटार रेसमध्ये भाग घेणारा हा तरूण सर्वसंगपरित्याग करून डोक्यावर घाणीची पाटी घेऊन हिंडला आहे. हॉलीवूडच्या नटनटींना त्यांच्या चित्रपटांवीषयी परिक्षणे लिहून पाठवली आहेत.

आजदेखील बाबा आमट्यांच्या चंद्रमौळी घरात भिंतीवर पुढारी लटकलेले नाहीत. सुरेख तसवीर आहे ती नॉर्मा शिअररची. ही असामान्य नटी व तिचा अभिनय हा आजही बाबांच्या गप्पांचा आवडता विषय आहे. ज्या हातांनी त्यांनी शिकार केली, त्याच हातांनी त्यांनी माहारोग्यांच्या जखमा धुतल्या आहेत. विनोबांच्या `गिताई' चे गठ्ठे डोक्यावरून वाहून विकले आहेत आणि धनाढ्य, धंदेवाईक बुक-डेपोवाल्यांना अधिक कमिशन आणि दारोदार नेऊन `गिताई' पोचविणाऱ्या अर्धपोटी बाबाला आणि ताईला फडतूस कमिशन देणारे सर्वोदयी गणित न समजल्यामुळे जे मिळाले तेही फेकून दिले आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय इत्यादी व्रतांचे त्यांनी खडतर पालनही केले आहे. त्यामुळे असल्या व्रतांच्या मर्यादा ते ओळखून आहेत आणि वनवासी भिल्लांना रानडुक्कर मारून स्वत: भाजून देऊन खाऊ घातला आहे. हा माणूस आहे की वेताळ असे वाटावे, असल्या धाडसाने भरलेले हे आयुष्य या गर्भश्रीमंत तरूणाचे पुर्वायुष्य आणि आजची त्याची आनदं वननिर्मीती यांच्यामागे एकच प्रवृत्ती होती. ती म्हणजे मनाला पटले ते प्रमाण पणाला लावून करण्याची! पेटायचे ते कापरासारखे सर्वांगाने पेटायचे. नुसता फुटबॉल खेळायचा म्हटले तरी जीवनमरणाचा लढा आहे. अशा ईर्ष्येने खेळणारा हा खेळाडू आणि म्हणूनच त्याचे कार्य पहायला कुणी आले काय, न आले काय, बाबांची धूंदी उतरत नाही.

(पु.ल. देशपांडे यांच्या `गुण गाईन आवडी' या पुस्तकातून साभार)

समजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..
पु.ल. देशपांडे

"घाबरू नका-मारा बुक्की." मी उगीचच टिचकी मारल्यासारखी बुक्की मारली.

"असे घाबरता काय? हाणा जोरदार बुक्की! अहो एका बुक्कीत आम्ही सुपारीची भुगटी पाडीत होतो."

"वा हॅ हॅ..." माझी क्षीण हास्य. क्षणापूर्वीच तर हा म्हणाला होता की आपल्याला सुपारीच्या खांडाचेसुद्धा व्यसन नाही म्हणून.

"हसण्यावारी नेण्यासारखी गोष्ट नाही बंधो. येत्या नारळी पौर्णिमेला पंचाहत्तर पुरी होताहेत-दात पहा."

`अहा मज ऎसा दैवहत प्रा आ आ आ आ आणी
खचित जगती या दिसत नसे को ओ ओ ओ ओ ओणी.'

असे आपल्याला वाटत असते असला हा प्रसंग होता. एका लग्नाच्या मांडवात मी एका टणक म्हाताऱ्याच्या तावडीत सापडलो होतो. हल्ली सहसा मी लग्नाचे सगळे अंक पाहायला जात नाही. पानसुपारीच्या अंकाला तेवढा जातो. कारण दिवसभर मांडवात असंख्य अनोळखी लोकांच्यात वेळ काढायचा म्हणजे धर्मसंकट असते. राशिभविश्यापासून संकर पिकापर्यंत कोण कूठला विषय मांडून बसेल काही सांगता येत नाही. त्यातून आपण वधूसारख्या नरम बाजूचे असलो तर मुकाट्य़ाने सारे काही घ्यावे लागते. मी मात्र पूर्वीपासून एक धोरण सांभाळले आहे. लग्नाच्या मांडव्यात आपल्याशी बोलायला येणारा प्रत्येक इसम हा वरपक्षातला गुप्तहेर असावा अशा सावधगिरीने मी बोलतो. त्यामुळे एकाच मांडवात मी कॉंग्रेस, जनसंघ आणि द्रविड मुन्नेत्र कहढळखगम ह्या सगळ्या पक्षांना आळीपाळीने पाठिंबा दिला आहे. द्रविड मुन्नेत्र नंतरच्या त्या शब्दाचा उच्चार जीभ टाळूला नेमक्या कुठल्या ठिकाणी लावून करायचा असतो हे शिक्षण मला एका गृहस्थाने त्या मांडवातच दिले. हे मराठी गृहस्थ मद्रासला कुठेशी टायपिस्ट म्हणून `एक दोन वर्स नव्हे तर नांपीस वर्स सर्विस करून परतले होते.' बाकी पुण्यातल्या माणसाने मद्रासला टायपिस्टची नोकरी-तीही वट्ट चोवीस वर्स करीत राहणे ही घटना इतीहासात नोंदवण्यासारखी आहे. अटकेवरि जेथील तुरंगि जल पिणे-म्हणतात ते हेच! असो. हे विषयान्तर झाले. खरे म्हणजे जाणूनबाजून केले. कारण मूळ विषय इतका कडु आहे की त्याकडे वळणॆ नको असे वाटते.

भर मांडवात एक पंचाहत्तरी गाठू लागलेला म्हातारा पैरणीची अस्तनी वर करून दंडाच्या बेटकुळीवर दणकून बुक्की मारा असा आग्रह धरून बसला होता. मी एक दोन बुक्क्या माझ्या ताकदीप्रमाणे मारल्या. पण त्याचे समाधान होईना.

"घाबरता काय?" तो कडाडला. ह्या तालीमबाज लोंकाच्या आवाजानदेखील एक प्रकारच्या बसकट दणका असतो. त्याने `हाणा' हे एवढ्या जोरात म्हटले की कसल्याशा विधीसाठी होमाच्या आसपास जमलेला सगळा घोळका `तमाम दहिने निगाह' केल्यासारखा एकदम आमच्या दिशेला बघू लागला.

"अय्या बाप्पांचे शक्तीचे प्रयोग सुरू झालेले दिसताहेत.". असा एक स्त्रीस्वर त्या घोळक्यातून उमटला आणि घोळक्याने पुन्हा होमात लक्ष घातले. मी बाप्पांच्या बेटकुळीवर आणखी एक चापटी मारली.

"चापटी काय मारताय कुल्ल्यावर मारल्यासारखी?" प्रस्तुत वाक्यातील चौथ्या क्रमांकाचा शब्द मी तरी भर मांदवात उचारला नसता. पण बाप्पांनी मात्र तो `हाणा'च्याच एवढ्या मोठ्याने उचारला. घोळक्यावर त्याचा परिणाम नव्हता. त्यानंतरदेखील बाप्पांच्या तोंडून जे काही बलसंवर्धनविषयक शब्द पडत होते ते ऎकल्यावर मला त्या होमात जाऊन उडी मारावी असे वाटत होते. बाप्पांनी माझी मूठ लचकेपर्यंत आपल्या दंडातल्या बेटकुळीवर बुक्क्या मारून घेतल्या. भर मांडवात अंगातली पैरण काढून पोटाला चिमटे काढायला लावले. बाप्पा "काढा चिमटा" म्हणून पोट असे काही टणक करीत्स की, त्यांच्या त्या पोटाला चिमटा काढण्यापेक्षा गोद्रेजच्या तिजोरीला चिमटा काढणे सोपे असावे असे मला वाटले. तो कार्यक्रम संपल्यावर त्यांनी जमिनीवर घट्ट बसकण मारले आणि "इथुन मला धक्के देऊन इंचभर हलवून दाखवा" म्हणून धक्के मारायला लावले.

"पुढच्या नारळी पौर्णीमेला पंचाहत्तरावं सरून शहात्तरावं लागतंय. दात पहा." बाप्पांनी माझ्यापुढे दात विचकले. मी बुक्के मारली. आणि एक गर्जानात्मक किंकाळी मांडवाचे छत फॊडुन गेली. दात बुक्की मारण्याच्या हेतूने दाखवण्यात आले नव्हते हे मला काय ठाऊक? कारण आतापर्यंत बाप्पांचा जो जो अवयव माझ्यापुढे आला तो बुक्का, गुद्दा चिमता किंवा धक्का मारण्यासाठी आला होता. मला वाटले तोच कार्यक्रम चालू आहे. कुणाचेही दात घशात घालणे, कुणावर दात धरणे वगैरे दातांचे जे खाण्याखेरीज इतर उपयोग आहेत ते करण्याकडे माझी अजोबात प्रवृत्ती नाही. बसकंडक्टरने `जगा नही' म्हटल्याक्षणी खाली उतरणारे आम्ही. केवळ गाफीलपणाने एका तालीमबाजाचा दात माझ्या हातुन पडला.

ह्या शक्तीचे प्रयोगवाल्य़ांनी मला प्राचीन काळापासून पिडले आहे. माझा आरोग्य सांभाळून जगण्याऱ्यावर राग नाही. धोतराऱ्या निऱ्या काढून व्यवस्थित ठेवावे तसे ते आपले शरीर लख्ख ठेवतात. पण स्नायू फुगवून दाखवणारांचे आणि माझे गोत्रच जमत नाही. पहिलवान होणे हा माझा कधीही आदर्श नव्हता.

...आपण खुल्या ढंगाची कुस्ती खेळतो आहो... कुठल्या तरी भयाकारी पहिलवानाला लाथाबुक्या मारतो आहो... तो आपली गर्दन मुरगाळतो आहे... मग आपण त्याच्या नाकाचा शेंडा चावतो आहो.. मग त्याने आपल्या कानशिलात भडकवली आहे... मग आपण मुंडक्याच्या ढुशीने त्याचे माकडहाड मोडले आहे... मग तो कोसळला आहे...मग त्याचा मोडका हात उचलून दसऱ्याच्या रेड्यासारखे रक्तबंबाळ होऊन आपण उभे आहो आणि मग लाखो लोक आपल्या ह्या कुणाची तरी हाडे मोडल्याच्या आणि लाथाबुक्क्यांचा खुराक खाल्ल्याच्या शतकृत्याबद्दल टाळ्या वाजवता आहेत...हे माझे माझ्या भविष्याबद्दलचे स्वप्न कधीही नव्हते. इंग्रज हा देश सोडून जाईल ही कल्पना नव्हती. त्यामुळे सर्वात मोठे स्वप्नचित्र पाहत असे ते एकच : आपल्या ड्राफ्ट्मध्ये यत्किंचितही खाडाखोड न करता तो ऍप्रूव्ह करुन साहेबाने टायपिंगला पाठवला आहे... कधी कधी हसून स्वत: होऊन आमच्या नावाचा उच्चार करून गुडमॉर्निंग केले आहे.

एकदा मी माझ्या ह्या साऱ्या शंका एका गुरूजीना, आधी त्यांच्या बेटकुळ्या, गर्दन, पोटऱ्या, मांड्या वगैरे अवयवांची तुफान तारीफ करून विचारल्या होत्या.

"समजा-" गुरूजी सांगू लागले, "समजा, तुम्ही रस्त्यातुन जाताना एखाद्याने तुमच्या मुस्काटीत मारली-"

वास्तविक चालायला लागल्यापासून मी रस्त्यातून चालतच आलो आहे. पण आजवर कुणीही कारणाशिवाय माझ्या मुस्काटीत मारली नाही. ज्यांनी मारली त्यांना ह्या कामाबद्दल शाळाखाते पगार देत असे. त्यामुळे त्या वेळी माझ्या दंडात जरी बेटकुळ्यांच्या बेचाळीस पिढ्या नांदत असल्या तरी हात वर करणे मला शक्य नव्हते. मी कधी कुणाच्या मुस्काटीत मारली नाही, की कुणी माझ्या मारली नाही. अशा परिस्थितीत बगलेत छत्री आणि हातात मेथीची जुडी घेऊन तुटत आलेला चपलेचा आंगठा-घरी पोहोचेपर्यंत तरी न तुटो' अशासारखा भाव सदैव चेहऱ्यावर घेऊन जाणाऱ्या मज पामरावर कोणीही केवळ ताकद अजमवण्यासाठी म्हणूनसुद्धा हा मुस्काटीत मारण्याचा प्रयोग करील असे मला कधीही वाटले नव्हते.

"बोला की..." गुरूजींच्या घनगर्जनेने मी दचकुन भानावर आलो. "समजा, तुमच्या थोबाडीत एखाद्दाने हाणली..." शब्द बदलून गुरूजींनी पुन्हा तोच सवाल केला "काय? समजा. थोबाड फोडलं तुमचं तर काय नुसता गाल चोळीत बसाल?"

आपण रस्त्यातुन चालताना केव्हातरी कोणीतरी माझ्या मुस्काटीत षोकाखातर एक हाणून जाईल या भितीने त्या दिवसावर नजर ठेवून चालू आयुष्य पहाटे उठून तालमीत जाऊन, ऱ्हां, ऱ्हीं, ऱ्हॅं, ऱ्हं करण्यात घालवावे हा सिद्धान्त मला तरी पटेना. पुन्हा गर्जना झाली...

"किंवा समजा, एखाद्दाने तुमच्या पेकाटात लाथ हाणली..." गुरूजींनी हाणण्याचे स्थळ आणि हाणणाऱ्या अवयव फक्त बदलला.

"अहो, पण असं उगीचच कोण कशाला हाणील?" मी गुरुजींच्या लाथेच्या कक्षेबाहेर माझा देह नेऊन हा सवाल केला.

"समजा हाणली तर?"

"समजा हाणलीच नाही तर?"

मी आयुष्यात प्रतीपश्र्न करायचे एवढे धैर्य कधीही दाखवले नव्हते. पण आजचा प्रसंग, स्थळ, पात्रयोजना सर्व काही निराळे होते. गुरुजी माझ्या पेकाटात लाथ सोडा, पण कानाच्या पाळीला करंगळीदेखील लावू शकले नसते. आपल्या पुतणीसाठी माझ्या चुलतभावाच्या स्थळाविषयी बोलणी करायला आले होते. त्यांच्या पुतणीला दांडपट्टा, फरीगदगा आणि वेताचा मल्लखांब उत्तम येत असून ती खोखॊच्या टीमची कॅप्टन होती. असल्या भांडवल्यावर माझ्या चुलतभावाने ती जोखीम स्वीकारावी अशी त्यांची इच्छा होती. संसारात दांडपट्टापेक्षा जिभेच्या पट्ट्याला आणि खो-खोपेक्षा लपंडावाला आधिक महत्व आहे, हे त्या आजन्म शक्तीचे सेव्हिंग्ज अकौंट सांभाळीत राहिलेल्या बजरबट्ट बेटकुळीवाल्याला ठाऊक नसावे. वधूपक्षाकडून हे गुरूजीच काय, पण साक्षात एकादा हिंदकेसरी जरी आला तरी बापजन्मी आखाड्यात ने गेलेल्या मुलाचा बाप त्याला क्षणात लोळवू शकतो. त्यामुळे माझ्या `समजा हाणलीच नाही तर?' ह्या सवालाला हिंदुविवाहपद्धतीच तारांबळ आणि चंद्रबळ होते. त्या बळावर मी गुरुजींना नुसत्या तोंडाने धोबीपछाड घातली होती. एवढ्या गडगंज ताकदीचा तो भीमरूपी महारुद्र माझ्या एका सवालाने गडबडला. ह्या जरत्कारुला असला उलटा सवाल विचारण्याचे धैर्य केवळ वरपक्षाचा प्रतिनिधी ह्या भुमिकेमुळे आले हे त्यांच्या ध्यानात आले असावे. कारण त्यानंतर "त्याचं असं आहे..." अशी मवाळ वाक्याची सुतळी जोडून त्यांनी पवित्रा बदलला. "बरं का... वेळ काय सांगून येते? त्यासाठी लाठी, बोथाटी, दांडपट्टा वगैरे शिकून ठेवावे-"

"अहो, पण हापिसात काय पोळीभाजीच्या डब्याबरोबर दांडपट्टा घेऊन जायचे की काय?"

बाकी कधीतरी दांडपट्टा शिकुन हवेतले उडते लिंबू सपकन कापतात तशी आमच्या हेडक्लार्कची टोपी उडवून कापावी असा एक सुखद विचार माझ्या मनाला शिवून गेला. आणि नुसत्या विचाराने सुद्धा माफक घाम फुटला. खरे म्हणजे उद्या ताकद कमावलीच तर ती कोणाविरुद्ध चालवावी हा मला प्रश्र्न्च आहे. त्यापेक्षा भल्या पहाटे कुशी बदलून साखर स्वस्त झाली आहे, दुधाच्या बाटल्या आपोआप घरात येताहेत, ही अति मंजुळ स्वरात `चहा घेता ना~~' म्हणते आहे, हेडक्लार्क कामावर खुष आहे... वगैरे वगैरे स्वप्ने पाहायची सोडुन केवळ कल्पनेने उगीचच मुस्काटात मारणारे शत्रू निर्माण करून पहाटे तालमीत जाऊन बुभु:कार कशासाठी करायचे?

जोरदार शत्रु लाभायलादेखील आपल्यात कुवत पाहिजे. आमच्या मुस्काटावर शकतीचा अंदाज घेणाराने शक्तीचे प्रयोग धर्मार्थ लावले तरच ते शक्य आहे. टिचकीच्या कामाला उगीचच कोणी पाची बोटांचा प्ण्जा कशाल वापरील?

अंग कमवण्यापेक्षा अंग चोरण्याचे धोरण अधिक चांगले. नवाची गाडी गाठायला साडेआठापासून फलाटावर बसणारे आम्ही. गाडीत शिरायला आपण होऊन आजवर धक्काबुक्की करावी लागली नाही. मारली टणक माणसे ऎशा जोरात रेटत असतात की डब्याच्या दरवाजापुढे आपण नुसते उभे राहिलो की मागल्या रेट्याच्या बळावर आत शिरायला होते. `जगाचे याज्य दुबळे करतील' असे येशु ख्रिस्त उगीचच नाही म्हणाला. तो बिचारा आमच्यासारखा. त्याच्या दंडात बेटकुळी-विटकुळी काही नव्हती. पण मग एवढे बलदंड बेटकुळीवाले त्याला एवढे का भ्याले?

जगातले बरेचसे तापत्रय ह्या असल्या कारणाशिवाय बळ साठवणाऱ्या लोकांनीच निर्माण केले आहे. मग ते बळ कुणी सोन्यानाण्यांतून साठवतात, कुणी दंडांतून, तर कुणी बेटकुळीसारख्या टराटर फुगवलेल्या शब्दांतून! खिशात पैसा खुळखुळायला लागला की तो खर्च केल्याशिवाय चैन पडत नाही-खर्च करायला लागले की अधिक वाढवल्याशिवाय चैन पडत नाही. ह्या दंडमांड्यातली ताकदही वाजवीपेक्षा जास्त वाढली, की तीही खर्च करायची खुमखुमी सुरू होते. मग डोळे नसलेले शत्रू शोधले जातात. डॉन किशॉटला पवनचक्क्यात राक्षक दिसू लागले तसे ह्यांच्याही कल्पनेत राक्षक दिसू लागतात. आपल्या मानेची गर्दन झाली की दुसऱ्यांच्या माना मुरगळण्यासाठीच आहेत असे वाटू लागते. मग जो तो आपापल्या मानेची गर्दन करायला लागतो. मग हाताचे बळ अपुरे वाटायला लागते. "एखाद्याने मुस्काटीत मारली तर?" ह्याऎवजी `लाठी मारली तर?' असल्या कल्पनांची भुते उभी राहतात. मग लाठी अपुरी पडते. तलवारी येतात. तलवारीतून तीरकमठा येतो. बंदुका येतात. तोफा येतात. मग चतुर लोक पैसे खूळखुळावीत त्या तोफा तोफवाल्यासकट विकत घेतात आणि हां हां म्हणता दंडातल्या बेटकुळ्यांचे बॉंब होतात. मग शब्दांच्या बेटकुळ्या फुगवणारे काल्पनिक सवाल उठवतात, "समजा, एखाद्याने तुमच्यावर बॉंब टाकला तर?"


...आणि भोवतालचे सुंदर युवतीचे मोहक विभ्रम, नुकतीच पावले टाकायला लागलेल्या बाळाचे एक पाय नाचिव रे गोविंदा... जयजयंतीतील तो लाडिवाळ फरक... हे सगळे सोडून यारी दिशांहून एकच सवाल उठतो, `समजा, तुमच्या कोणी मुस्काटीत मारली तर?', `समजा. कोणी तुमच्यावर कोणी बॉंब टाकला तर?'

ह्या लोकांना, `समजा, तुम्हांला कोणी जेवायला बोलावले तर! श्रीखंड हवे म्हणाल की बिर्याणी?" . "समजा, तुम्हांला कुणी नाच पाहायला बोलावले तर, कथ्थक हवा म्हणाल की मणिपुरी?" . "समजा, एखादी तरुणी तुम्हांला म्हणाली की, सांग तु माझा होशिल का?" असले सवाल सुचतच नाहीत. कारण ह्या तऱ्हेऱ्हेच्या बेटकुळ्या आपण कशासाठी फुगवतो आहोत ह्या प्रश्र्नाला त्यांच्या कल्पनेतल्या मुस्काटीत मारणाऱ्या इसमापलीकडे त्यांना दुसरे उत्तरच नसते. मग मुस्काटीत मारणारा तो कल्पनेतला इसम असतो, धार्मीक गट असतो, वांशिक गट असतो, तर कधी देश असतो. मग शेख महंमदाने मारलेल्या लाथेप्रमाणे कल्पनेतल्या भांडणात खरी लाथ मारून माणसे काचेच्या सुंदर रंगीबेरंगी भाड्यांसारखी ज्यांना ही कल्पनेतली भुते छळत नाहीत अशा लोकांनी उभारलेली रंगीबेरंगी संस्कृतीची सूंदर पात्रे खळाळाकन फोडून टाकतात. त्या विध्वंसानंतर भानावर आल्यावर कळते की कूणी कुणाशी भांडत नव्हते. कारण ज्या घरातून आपल्यावर हल्ला होईल अशा भितीने आधीच बॉंब टाकून ते घर उदध्वस्त केलेले अस्ते- त्या घरात ते बॉंब पडण्याचा क्षणी एक आई मुलाला दुध पाजीत होती, एक कवी कविता रचत होता, एक शिल्पकार मुर्ती घडवीत होता, एक गवई तंबोरे जुळवीत होता आणि एका तरुणीचे ओठ तिच्या प्रियकराच्या चुंबनासाठी आतुर होते.

फक्त कूणीतरी आपल्याला मारील या भीतीच्या भुताने पछाडले होते, वेळीअवेळी आपले दंड फुगवीत बसलेले आणि दुसऱ्याला ते सामर्थ्य दाखवण्यासाठी आसुसलेले दंडशक्तीचे उपासक, त्यांची पहाट गवतावरचे दवबिंदु पाहण्यासाठी नव्हती.

हल्ली मांडवात मला कुणी दंडातली बेटकुळी वगैरे दाखवायला लागला, की मी विचारतो, "सनईवर चाललाय तो सारंग का हो?" उगीचच वर्तमानपत्री अधारावर कोणी कुठल्या दंग्यात हिंदू अधिक मेले की मुसलमान ह्याची चर्चा सुरू केली, की चक्क अब्दुल करीमखॉं साहेबांची रेकॉर्ड लावतो, `गोपाला मेरी करुणा क्यो नही आये' किंवा हरीभाऊ सवाई गंधर्वाच्या `तूं है मोहमदसा दरबार निजामुद्दीन सुजानी...' च्या तानांनी खोली भरून टाकतो.

मला पहाटे उठवायची ताकद आहे ती फक्त ललत, भैरव, तोडी ह्या अशरीरिणी शुरांगना. `समजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर'च्या कल्पनेतल्या भुतांनी पछाडलेल्यांना नव्हे!

सुगंध, दिवाळी १९६९

... मला कधी क्रांती, मोर्चे घेऊन- फलक घेऊन येते असं वाटत नाही. किंबहुना, मी कधी मोर्चातून घोषणा देत किंवा ओरडत गेलो नाही. मुंबईत मी असंख्य मिरवणुका पाहिल्या आहेत. अगदी एकतीसाच्या चळवळीपासून ते आजतागायत. माझी पुष्कळदा त्या मोर्चेवाल्यांच्या मागण्यांशी संपूर्ण सहानुभूती असते. पण मला रस्त्यातून माणसं अशी ओरडत निघाली की गलबलतं. मोर्चे हे एक तंत्र झालंय असंही म्हणतात. असेलही. पुढारीपण हा धंदा झाल्यावर मोर्चे-घोषणा ही धंद्याच्या जाहिरातीची तंत्रं होणं साहाजिक आहे. पण या मोर्चाने मात्र मी अगदी आतून हलून गेलो होतो. त्या मोर्चाच्या अग्रभागी चांगले वयोवृद्ध लोक होते. चारी वर्णांचे लोक दिसत होते. बायका होत्या. कामगार स्त्रिया वाटत नव्हत्या, पण फार सुशिक्षितही दिसत नव्हत्या. बऱ्याचशा पांढऱ्या पोशाखांत होत्या. पण नर्सेस नव्हत्या. आणि आश्चर्य म्हणजे त्या मोर्चात मुलं अजिबात नव्हती. मी हा मोर्चा अगदी काही खेड्यांत पाहिला नाही. पण मोर्चातली माणसं शहराशी फार रुळलेली दिसत नव्हती. एका जिल्ह्माच्या गावाला पाह्मला होता. मी सायकलीवरुन उतरलो आणि विचारलं,

'कुणाचा मोर्चा आहे हो हा?'

'शाळामास्तरांचा- '

एक चमत्कारिक लज्जा, असहायता, संतापापेक्षाही कारुण्य, यापूवी- आम्ही असे कधीही हिंडलो नव्हतो...असा प्रासंग आमच्यावर येईल असं वाटलं नव्हतं असं सांगता बोलता नुसतं चेहऱ्यावर अदृश्य अक्षरांनी लिहून तो मोर्चा चालला होता. सर्वात पुढे फलक होता. तो वाचायला मिळाला नाही. कुणी कुणाचा जयजयकार करीत नव्हतं. कुणी बोलत नव्हतं. मुठी वळत नव्हत्या. त्वेष नव्हता. आवेश नव्हता. आजवर आवरुन धरलेली एक अब्रू परिस्थितीच्या तडाख्याने फुटली होती आणि रस्त्यांतून सांडत चालली होती. माझ्या कानी शब्द आले... 'अय्या त्या बघ आपल्या दामलेबाई' एक पेन्शनीला आलेली विधवा वृद्धादेखील पोटाला दोन वेळचं मिळत नाही हे यापूर्वी पोटात दडवून ठेवलेलं वाक्य बोलता सांगत निघाली होती. दामलेबाईंची नजर त्या पोरींच्यावर गेली. पोरी तोंडावर हात घेऊन लाजल्या. आपल्या दामलेबाई, पुढे कुठे बॅंड नाही- घरात नाही- तरीसुद्धा भर शाळेच्या वेळी अशा कुठे रांगेतून चालल्या आहेत हे त्या पोरींना कळत नव्हतं.

पण दामलेबाईंनी ज्या अनोळखी नजरेनं त्या पोरींच्याकडे पाहिलं, ती नजर त्या पोरींना नवी होती. ज्या बाईंना फुलं नेऊन दिल्यावर कौतुकाचा गालगुच्चा घेतात त्या आपल्या दामलेबाईंची नजर अशी परकी? पोरी बावरल्या. ह्मा दामलेबाई अशा काय निराळया दिसताहेत? आपल्या बरोबर गाणी म्हणणाऱ्या, कधी कधीसुद्धा छडी मारणाऱ्या दामलेबाईच ना त्या? दामलेबाईंनी कष्टाने सावरुन धरलेले ते तोंडावरचे 'शिक्षिकेने प्रेमळ असावे' चे कवच कशामुळेतरी फुटले होते. नुसत्या दामलेबाईंचेच नाही- सावंतबाई, साठेबाई, गुंजाळबाई, लोकरेबाई, शेखबाई, थोरात गुरुजी, भांगले गुरुजी, दाढे गुरुजी, तांबे गुरुजी, कुलकर्णी, देशपांडे, तांबट, कोष्टी, पागे, माने, साटम, काळे सगळया सगळया गुरुजींना जो प्रसंग कधी कधी यायला नको होता तो आला होता. शिक्षकांचा मोर्चा नावाची एक फार मोठी क्रांती झाली होती. पूर्वी शिक्षक मोर्चात गेले होते. गांधींच्या मागून मुलांना राष्ट्रीयत्वाचे धडे देण्यापूर्वी आपण शुद्ध होऊन येऊ या म्हणून. हा मोर्चा निराळा होता. हा पुकारा भावनेचा नव्हता. साधा, भूक नावाच्या प्राथमिक गरजेपोटी प्राथमिक शिक्षक प्रथम रस्त्यात आपले लक्तर मोकळे टाकून आला होता. मी त्या मोर्चामागून चालत गेलो हे तो मोर्चा चौकात आला त्या वेळी कळले. पोलीससुद्धा नव्हते. मास्तरांच्या मोर्चाला पोलीस कशाला? शंभर उंदीर एकदम कुचकुचले म्हणून काय एका डरकाळीइतका तरी आवाज थोडाच होणार आहे? कोणीतरी बसा बसा म्हणू लागलं. मैदानात मोर्चा बसला. मीदेखील सायकल झाडाला टेकून बसलो. एक शिक्षक उभे राहिले. दुरुन मला ते थोडेसे हरी नारायण आपट्यांसारखे वाटले. रुमाल बांधलेले असे ते एकटेच होते. शुद्धलेखन घालावं तसं ते बोलत होते. त्यांची लहान लहान वाक्यं एकेका शब्दावर जोर देऊन येत होती.

"शिक्षक बंधुभिगनींनो, व्यवसायाची पुण्याई संपली. समाजाने अंत पाहिला. सरकारने कशाला म्हणू? सरकार आपले आले काय, परक्याचे काय, आपले दुबळे हात पोहोचण्याच्या पलिकडले. पण समाजाने कातडे ओढले स्वत:च्या डोळयावर. 'मास्तर, दोन वेळेची चूल पेटते ना हो?' असं विचारणारं इतक्या वर्षात कोणी भेटलं नाही. दडपलं होतं. पण आज आपल्या भुकेचं बेंड रस्त्यात फुटलं. आता सभ्यतेचा बुरखा कशाला ठेवू? हा माझा कोट. पंधरा वर्षांपूर्वी लग्नात मिळाला होता. सद्राही होता. तो फाटला, नवा शिवायचा संकल्प सोडत होतो. नाही परवडलं. खोटं नाही सांगत. हे पाहा." असं म्हणून त्यांनी स्टेजवर कोट काढला आणि आतला अस्थिपंजर डोळयावर भयानक आघात करुन गेला. "आता रस्त्यात आलो. इच्छा नव्हती पण गत्यंतर नव्हतं. आता आत शर्ट नसतो. एका फुकट मिळालेल्या कोटावर व्यवसायाची प्रतिष्ठा सांभाळीत होतो हे गुपित उघडं केलं. माझी काय सगळयांची गोष्ट एकच! व्यवसायाची पुण्याई संपली. आमची एकच विनंती. उपाशी ठेवून गुरुजी वगैरे नका म्हणू. नवराबायको आणि दोनचार अर्भकांच्या भुकेच्या वेळा साजऱ्या होतील एवढं द्या आणि मग शाळा खात्यातले मजूर म्हणा आणि एज्युकेशन आक्टा ऐवजी फ्याक्टरी आक्ट लावा." काढलेला कोट खांद्यावर घेऊन मास्तर खाली उतरले. माणसं भाषण संपल्यानंतरच्या टाळया वाजवायला विसरली होती. कारण त्या सर्व स्त्रिपुरुषांचे हात डोळे पुसण्यात गुंतले होते. माझ्या मनात घर करुन राहिलेला हा एकच मोर्चा आणि मोर्चातले ते एकच भाषण आणि दामलेबाईंनी त्या पोरींकडे फेकलेली ती एकच अनोळखी नजर!


(- 'पु. . एक साठवण')

महाराष्ट्र टाईम्स १२ जुन २००८

मला तर कित्येकदा भारतीय संस्कृती नेमकं कशाला म्हणावं तेच कळत नाही. एकीकडून रामभक्तीचे सुंदर उमाळे काढणारा तुळसीदास ' ढोरं , गॅंवार , शूद्र , पशु , नारी , ये सब ताडनके अधिकारी ' म्हणतो , म्हणजे संत तुळशीदासांच्या मताने गुरं , खेडवळ माणसं , इतर पशू आणि स्त्रिया ह्मा फक्त चोप खाण्याच्याच लायकीच्या आहेत!

बायकांना नव-यांनी लाथाबुक्क्यांचा प्रसाद देण्याच्या बाबतीत आपल्या देशातल्या लक्षावधी खेड्यांत सर्वधर्मसमभाव आहे. खुद्द दिल्लीतही आपल्या बायकांना फारशा न्यायबुद्धीनं वागवतातच असं नाही. पुष्कळदा मला वाटतं की ह्मा देशात फक्त पुरुषाला स्वातंत्र्य मिळालं आहे. स्त्रिया पारतंत्रातच आहेत. अशा ह्मा आपल्या देशात भारतीयत्वाचा विचार रुजवायचा आहे.

' उपकार म्हणून तुम्हाला ह्मा देशात राहू देतो ' ही वृत्ती जशी हिंदूंनी सोडायला हवी तशीच कालबाह्म झालेल्या आणि देशाला पोषक नसलेल्या रुढींच्या उच्चाटनाचं काम करायला मुसलमान आणि इतर धर्मीयांनीही आपल्यातील भारतीयत्वाला अग्रक्रम द्यायला हवा.


हमीद दलवाईंच्या अनुभवांवरुन मुसलमानात हे विचारपरिवर्तनाचं कार्य किती अवघड आहे हे ध्यानात येतं. इतर धर्मांत आणि जातींत ते सोपं आहे असं नाही. वास्तविक माणसांत देवाला पाहणाऱ्या भटजी , मुल्ला , शेख यांच्या संकुचितपपणाविरुद्ध पूर्वीपासून आमच्या भारतीय संतांनी झोड उठवलेली आहे.

' मुल्ला होकर बांग पुकारे वह क्या साहब बहिरा है ?' असा सवाल कबीरानं केला आहे. महाकवी गालिबनं तर देव फक्त मशिदीतच नसतो हे ठसवण्यासाठी शेखजींना म्हटलं आहे की ' शेखजी मला मशिदीत बसून पिऊ दे , वर्ना ऐसी जगह बताव जहॉं खुदा नही! ' आमचे तुकोबा विचारतात , ' ऐसे कैसे रे सोवळे , शिवता होतसे ओवळे ?' ह्मा सर्व मंडळींची देवावरची श्रद्धा कमी प्रतीची होती असं कोण म्हणेल ?

त्यांनी ते देवत्व माणसांत पाहिलं. कलेच्या ख-या उपासकाला आणि रसिकाला तर राष्ट्रीयतेचं कुंपण देखील संकुचित वाटतं. मग धार्मिक कुंपणांची तर गोष्टच नको. म्हणूनच केशवसुतांनी ' ब्राह्मण नाही हिंदुही नाही , न मी एक पंथाचा | तेच पतति की जे आखडती प्रदेश साकल्याचा | खादाड असे माझी भूक | चतकोराने मला न सुख , कूपातिल मी नच मंडूक | मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे | कोण मला वठणीवर आणू शकतप ते मी पाहे ' असं विचारलं आहे.

मुखमें रामनाम बगलमे छुरी , ह्मा तत्वाचं आचरण करणा-याविरुद्ध प्रत्येक काळांतले साहित्यिक , कवी आणि कलावंत उभे राहिलेले आहेत. मुस्लिम धर्मांधतेविरुद्ध प्रेममार्ग सांगणारे सुफी उभे राहिले , जातिभेदाचं पोषण करणा-याविरुद्ध रामी धोबिणीबरोबर संसार करणारा ब्राह्मण चंडिदास ' सर्वांहून श्रेष्ठ माणूस त्याहून श्रेष्ठ कोणीही नाही ' असं सांगत उभा राहिला.

यज्ञामुळे होणारी भरमसाठ पशुहत्या आपल्या देशातली शेती धोक्यात आणीत होती. त्याविरुद्ध गौतमबुद्ध प्रज्ञा आणि करुणेचा संदेश घेऊन उभे राहिले. बुद्धीला सतेज ठेवून प्रज्ञा आणि प्रत्यक्ष वृतीतून जी सिद्ध होते त्या करूणेचा मार्ग प्रमाण मानून ही एकात्मता साधायची आहे. रवीन्द्रनाथांनी त्याला ' मानुषेर धर्म माणसाचा धर्म ' म्हटलं आहे ज्या रुढी आपल्यांत दूरत्व निर्माण करतात त्या दूर सारुन ह्मा प्रज्ञा आणि करुणेच्या मार्गानंच भारतीयांची एकात्मता साधली जाईल.

' नान्य: पंथा अथ:नाय विद्यते '- दुसरा कुठलाच मार्ग यासाठी नाही ' समाजाच्या ऐहिक अभ्युदयासाठी ज्यांना तन देता येईल त्यांनी तन , धन देता येईल त्यांनी धन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांशी युक्त केल्यामुळे मुक्त झालेलं मन देण्याची ही एक ऐतिहासिक महत्वाची घडी आलेली आहे.

' हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणूनच मरणार नाही ' असं म्हणून आंबेडकरांनी धर्माचं प्रवर्तन केलं. कुठल्याही धर्माचा किंवा प्रांताचा माझ्यावर शिक्का असला तरी मी भारतीय म्हणूनच जगेन , अशा विचारचक्र प्रवर्तनाचं हे कार्य आहे आणि ते होणं ही आजच्या काळातली भारताची सर्वांत मोठी गरज आहे....

( राष्ट्रीय एकात्मता परिषदेतील भाषण)

सावरकर आणि समाजकारण
पु.ल. देशपांडे


'सावरकरांच्या जिवनातली प्रत्येक घडी ही आत्मार्पणाचीच होती'

मित्रहो,
माझ्या आयुष्यातली हा मी एक परमभाग्याचा दिवस समजतो. पूर्वजन्मावर माझी श्रद्धा नाही. त्यामुळे ह्या भाग्याचा मी पूर्वजन्माशी संबंध जुळवू इच्छित नाही. पण हा क्षण माझ्या आयुष्यात यावा ह्याला 'भाग्य' या पलिकडे मला काय म्हणावं ते सुचत नाही.


आपण आत्ताच सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्या खोलीचा उल्लेख अंदमानतली कोठडी असा केला जातो, परंतु ज्या वेळेला एखाद्या कोठडीमध्ये प्रत्यक्ष तेजच वस्तीला येत असतं, त्यावेळी त्या कोठडीचा गाभारा होतो. आपण आता जिथे गेलो होतो तो असाच एक गाभारा झालेला आहे. तिथे एक मुर्तीमंत तेज वावरत होत. 'तेजस्विनावधीत्मस्तु' असं आपण पुष्कळ वेळेला नुसतं म्हणतो आणि म्हटलेलं विसरुन जात असतो. पुन्हा रोज म्हणत असतो, परंतु ज्याची काया, वाचा, मन, अवघं व्यक्तिमत्व अंतबार्ह्य तेजस्वी होतं अशी अलिकडल्या काळातली भारतीय इतिहासातली व्यक्ती शोधायला गेली तर वीर सावरकरांची मुर्ती डोळ्यापुढे आल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक क्षण हा जीवन उजळण्यासाठी आहे अशा इर्षेने ते जगले. अधांराचे ते सगळ्यात मोठे शत्रू होते. मग तो अंधार अंधश्रद्धेने आलेला असो, अंधविश्वासाने आलेला असो किंवा पारतंत्र्याचा असो. त्या अंधाराविरुद्ध त्यांची झुंज होती. जीवनात प्रत्येक माणसाला तीन शक्तीशी सतत झूंज द्यावी लागते. बर्टुड रसेलने त्याचं वर्गीकरण केलं आहे. मनुष्य आणि निसर्ग, मनुष्य आणि समाज, आणि मनुष्य आणि तो स्वत: ह्या तिन्ही शक्तीशी त्याची रस्सीखेच चाललेली असते. 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' असं तुकोबांनी म्हटलं आहे. हे एक अंतर्गत युद्ध चालु असतं. आणि युद्धाचा पहिला नियम असा आहे की मी जिंकणारच आहे अशा भावनेनेच युद्धात उतरावं लागतं.सावरकरांनीसुद्धा 'मारिता मारिता मरावे' ह्याचाच जयघोष केला होता. पराजित मनाने लढणारा माणूस कधीही युद्ध जिंकू शकत नाही. सावरकरांच्या सगळ्या साहित्यातून ज्या जिवनविषयक तत्वज्ञानातून ते साहित्य निर्माण झाले होती. त्यातून जर सार काढायंचं असेल तर तर असंच म्हणावं लागेल की, केवळ राजकिय शत्रूंवरच नव्हे तर जिथे जिथे तुम्हाला अंधश्रद्धा दिसेल, अज्ञान दिसेल तिथे तिथे वीर पुरुषासारखे त्याच्यावर तुटून पडा. म्हणूनच आधुनिक काळातल्या इहवादी महर्षींमध्ये सावरकरांच नाव आदराने घायला हवे. विज्ञाननिष्ठेवरचे त्यांचे निंबंध ह्या दृष्टीने अभ्यास करण्यासारखे आहेत आणि ही विज्ञाननिष्ठा का? तर ती सदैव अज्ञानापोटी जन्माला येणाऱ्या अंधश्रद्धेच्या काळोखावर मात करायला निघालेली असते म्हणून. काळोख याचा अर्थ भय, आंधळेपण, सर्व क्षेत्रातलं आंधळेपण जावं ह्यासाठी त्यांनी आपल्या सर्वस्वाचा होम पेटवला.

आजच्या दिवसाचा आपण सावरकरांच्या अत्मार्पणाचा दिवस म्हणतो. केवळ तिथीच्या हिशेबात, 'जीवनाध्वरि पडे आज पूर्णाहुती' ह्या दृष्टीने हा दिवस आत्मार्पणाचा म्हणणे संयुक्तिक होईल. पण वयाच्या सातव्या आठव्या वर्षापासून त्यांच्या जीवनातली प्रत्येक घडी ही आत्मार्पणाचीच होती. 'एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार' अश्या निष्ठेने ज्यांच्या जीवनातली वाटचाल क्रांतिपथावरुन चालत असते त्यांचा मृर्त्यु हा सांगाती असतो. आपण पुष्कळसे लोक केवळ मरता येत नाही म्हणुन जगत असतो. क्षणोक्षणी मरणाच्या धास्तीने जगत असतो. असल्या जगण्याला श्वासोच्छवास घेणे यापलिकडे फारसा अर्थ नसतो. परंतू ज्या वेळेला मनुष्य हा श्वासोच्छवास मी कशासाठी घेतो आहे याचा विचार करील त्यावेळी सार्थ जगण्याचा वाटा तो शोधायला लागेल आणि जिथे राजकिय धार्मिक किंवा आर्थिक दडपणामुळे आलेला गुदमरलेपणा, धूत:शरीरेण मृत:स जीवती अशी परिस्थिती त्याला आढळेल. जिथे जिथे म्हणून मोकळा श्वास घेता येत नाही तिथे उडी मारून तो श्वास मोकळेपणाने घेता येण्याची परिस्थिती निर्माण करण्यासाठी स्वत:चे प्राण पणाला लावेल त्याचवेळी ते जगणं खऱ्या अर्थाने पारमार्थिक होईल. आपण पारमार्थिक ह्याचा अर्थ गळ्यात माळा आणि कपाळी टिळा लावून जयजय राम कृष्ण हरी करित राहणं असा करतो पण जोवर माणुस आणि निसर्ग, माणुस आणि माणुस, माणुस आणि तो स्वत: ह्या द्वंद्वांना सामोरे जाऊन ती कोडी उलगडण्याच्या मागे लागत नाही तोवर ते जगणं केवळ आहार, निद्रा, भय, मैथुन ह्या चौकोनातच पशुवत सीमित राहिल. ते पारमार्थिक होणार नाही आणि एकदा का ह्या जीवनाचं यशार्धत्व पटलं की मग चित्त भयशून्य होत. प्रथम ते मुक्त होतं मरणाच्या महामायतून. सावरकरांना मुर्त्युंजय म्हणायचं ते ह्या अर्थाने.

ह्या जेलमध्ये आजसुद्धा पहा. हे पर्यटनस्थान असूनही नुसत्या त्या जेलच्या विराट स्वरुपामुळे सारं कसं भयाण वाटतं.
आपण कल्पना करा १९११ साली वर्षापूर्वी यापुढली थोडी थोडकी नाही पन्नास वर्ष या ठिकाणी डांबलेल्या असस्थेत सजा भोगण्यासाठी ते शिरत होते. भोवताली दैत्यांसारखे पहारेकरी होते ब्रिटीश सत्ता टिकवण्यासाठी. स्वातंत्र्य हा शब्द उच्चारण्यालाही ठार मारणं, त्याचे अनन्वित हाल करणं हा त्यांचा खेळ होता. अशा ह्या नरकपुरीत प्रवेश करताना सावरकरांनी उद्गार काय काढावे? ते म्हणाले होते, 'मित्रांनो एक दिवस इथे आमचे पुतळे उभे राहतील. मी जिंकणारच ह्या आत्मविश्वासाने युद्धात पडायचं असतं.' ह्या तत्वज्ञानाच्या खरेपणाचं आणखी दुसरं उदाहरण आवश्यकच नाही. हा भाबडा विश्वास नव्हता. साम्राज्यशाहिच्या आत्म्याचे गणित ते वैज्ञानिक पद्धतीने मांडू शकत होते. लोंकांमध्ये गूलामगिरीविरुद्ध द्वेष उत्पन्न होत असलेले ते पाहत होते. त्या द्वेषाला सामर्थ्या़ची जोड हवी याची त्यांना जाणीव होती. त्यासाठी प्रथम आपल्या देशबांधवांच्या मनाचे सामर्थ्य अपरंपार वाढवले पाहिजे याची तळमळ होती. त्यासाठी त्यांनी देवधर्मापेक्षा 'राष्ट्र' ह्या कल्पनेला अग्रमान दिला. आमचे देव इंग्रजांच्या बंदीत नव्हते. त्याची षोडपचार पुजा चालू होती. धर्मातही राज्यकर्ता इंग्रज लुडबुड करीत नव्हता. पण इथला माणुस मात्र त्याला सदैव दुबळाच राहायला हवा होता. सावरकरांनी हिंदु हा शब्द्च राष्ट्राला समानार्थी करुन टाकला. मी हिंदुस्थानाचाच रहिवासी आहे. माझी पुण्यभू, मातृभू, धर्मभू हिंदुस्थान हीच आहे असे म्हणणारा तो हिंदू, अशी त्यांनी धर्माची इहवादी व्याख्या बनवली आणि त्या हिंदुला समर्थ करण्यासाठी त्यांनी इथल्या रहिवाश्यांना तुम्ही 'अमृताचे पुत्र' अहात. तुम्ही मरण स्विकारायचे आहे ती होतात्म्यातून तुम्हाला अमर करणारे- हा मंत्र सांगितला हिंदू-मुसलमान-खि्स्ती कुणाचाही देव दुबळ्याच्या मदतीला धावत नाही हे ते पक्के जाणुन होते. त्यांनी सतत जर कसला धिक्कार केला असेल तर तो दुबळेपणाचा. दैववादाचा, मनुष्य बुद्धीच्या निकषावर प्रत्येक गोष्ट घासून मगच ती स्विकारतो. त्यावेळी त्याच्या आचारविचारांत एक निराळेच तेज दिसू लागते. तो जय-पराजयाची भाषा करीत नाही प्रयत्नात आपण कमी पडलो असे मानुन पराजयाच्या क्षणीही पुन्हा उठुन उभा राहतो. मर्ढेकरांनी म्हटलं आहे 'भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्य़ाची कसोटी.' अखाद्या दृश्याने किंवा कल्पनेने भावनाबंबाळ होणं ह्याला अर्थ नाही. उदाहरणार्थ हा सेल्युलर जेल पाहून मी लगेच भावनाविव्हळ होऊन ओक्साबोक्सी रडायला लागणं आणि थयथयाट करून मला किती दु:ख झालं आणि सावरकरांना भोगाव्या लागलेल्या भळाच्या आठवणींनी मी किती व्हिवळ झालो याचं प्रदर्शन माम्डणं म्हणजे माझी भावना शंभर टक्के खरी आहे असं नाही. एखाद्या गोष्टीच्या बाबतीतली उत्कट भावना तिला अश्रूंची वाट करून देण्याने सिद्ध होत नाही. उलट स्वत:ला आवर घालून जे कार्य हाती घ्याचं असतं. ते करण्याच्या हेतूने सामर्थ्य मिळायला लागणे हे महत्वाचं असतं.


आत्ताच श्री. हर्षे यांनी सांगितलं की सावरकरांच्या विषयीच्या माझ्या काही आठवणी असल्या तर त्या मी सांगाव्या. खरं सांगायचं तर त्यांच्याजवळ जाण्याची छाती आणि हिंमत मला नव्हती. सुर्याचं तेज दुरून घ्यावं, फार जवळ गेलो तर भस्मसात होण्याची भि्ती. त्यामुळे आम्ही सावरकरांना भेटत आलो ते त्यांच्या पुस्तकातून. पण माझ्या आयुष्यात एक सुंदर क्षण आला होता तो म्हणजे परशुरामभाऊ कॉलेजच्या मैदानावर त्यांचा मृत्यंजय समारंभ झाला त्यावेळी मी त्यांचे भाषण ऎकलं.

पारल्याला माझ्या लहानपणी सावर्करांची टिळक मंदिरात झालेली भाषणंही मी ऎकली आहेत. चांगल्या वक्तृत्वाच्या बाबतीत आपण 'गंगेसारखा ओघ' असं म्हणतो. त्या ओघाचा साक्षात्कार सावरकरांइतका शंभरटक्के मला कोणत्याही भाषणाने झाला नाही. विचार आणि उचार एकाच सामर्थ्याने तळपत असायचे. मातृभाषाप्रेम हा राष्ट्रप्रेमाचाच एक महत्वाचा घटक असतो. सामर्थ्याच्च्या उपासनेत आपल्या भाषेला जुलमी राज्यकर्त्याच्या उदासीपणातून, अवलबित्यातून वाचवणं हा विवेक सावरकरांच्या भाषाशुद्धीच्या चळवळीमागे होता. वास्तविक एंग्रजीवर त्यांच चांगलंच प्रभुत्व होतं. मराठी भाषणाच्या ओघात एकादा मुळातला इंग्रजी उतारा स्मरणाने धडाधड म्हणत. कुठल्याही सोवळेपणाच्या भावनेने त्यांनी इंग्रजीला अब्रहण्यम मानले नाही. त्यांना आमान्य होतं ते दुबळेपणाच्या भावनेने विदेसी भाषेतल्या श्ब्दांची घूसखोरी चालू देणं. सावरकरांची ही राष्ट्रीय अस्मिता जागवण्याची भावना ज्यांनी समजून घेतली नाही. त्यांनी त्यांच्या भाषाशुद्धीची चेष्टा केला. हे शब्द रूढच होणे शक्य नाही असे म्हणायला सूरुवात केली. पण ते सरकारी शब्दांच्या टाकसाळीत तयार केलेले नव्हते. एका प्रतिभावंत कवीची ती निर्मीती होती.

सरकारात मोले घातले रडाया (की खरडाया?) ह्या भावनेने भाषाशुद्धीचे पगारी कर्मचारी जेव्हा बसतात तेव्हा"ते इकडली इंग्रजी डिक्शनरी आणि कर त्याचा मराठी शब्दकोश' असा व्यवहार चालतो. सावरकरांना तो शब्द कोशात पडून राहणारा नको होता. तो कवितेसारखा लोंकाच्या तोंडी रूळायला हवा होता. त्यांनी रिपोर्टरला 'वार्ताहर' हा शब्द निर्माण केला. वार्ता खेचून आणणारा. इथे इंग्रजी शब्दाच्या ठिकाणी मराठी प्रतिशब्द असे होता, एक कविनिर्मीत प्रतिमा तयार झाली. प्रारंभी थट्टेवारी नेलेले शब्द व्यवहारात आले. हे शब्द सावरकरनिर्मीत आहेत ह्याचा देखील लोकांना विसर पडला. आज महाराष्ट्रात सामान्य माणसाला मेयरपेक्षा महापौरच जास्त अप्रिचित आहे. वृत्तपत्रांच्या क्षेत्रात तर संपादकापासुन स्तंभापर्यंत अनेक मराठी शब्द त्यांनी दिले आहेत. तीच गोष्ट चित्रपटसुर्ष्टीची, दिग्दर्शन, संकलन, ध्वनिमुद्रण, पटकथा हे सारे त्यांचे शब्द. मराठीला त्यांचं हे सत्व जागविण्यासाठी दिलेल मोठं देण आहे. शिवाय ते उत्तम वक्ते असल्यामुळे शब्द निर्मिती करताना त्यात उच्चारांचा सोपेपणाही त्यांनी सांभाळला. पुष्कळदा मला वाटतं की भाषेचं सामर्थ्य म्हणजे काय, ओघवती भाषा म्हणजे काय ह्याचा मुलांना साक्षात्कार घडवायचा असेल तर त्यांच्याकडून सावरकरांचे 'माणसाचा देव आणि विश्वाचा देव.' दीन शब्दांत संस्कृती, ह्या सारखे निंबंध मोठ्याने वाचून घायला हवेत. वैचारिक संस्कार आणि भाषेचे उत्तम संस्कार ह्या दोन्ही दृष्टीनी हे वाचन उपयोगी ठरेल. सावरकरांच्या जीवनात तर ग्रीक नाट्य़ातल्या महान नायकांसारखं नाट्य होतं. आणि ते त्यांच्या वाणी-लेखणीतूनही ओसंडत होतं. ते स्वत: नाटककार, थोर कवी असल्याचा दुर्दवाने त्यांच्या केवळ राजकिय कर्तूत्वाकडेच पाहिल्यामुळे विसर पडतो. 'उत्कट भव्यतेज्याचे मिळमिळीत अवघेची टाकावे' हा समर्थांचा उपदेश सावरकरांइतका तंतोतंत आचरणात आणलेला क्ववित आढळतो. त्यामुळे कवितेत देखील ते कल्पनेची हिमालयीन शिखरे गाठतात. प्रियकर प्रेयसीच्या मीलनाच्या प्रतिक्षा काळाबद्दल कविता लिहिताना ते म्हणतात-


'शतजन्म शोधताना शत आति व्यर्थ झाल्या !
शत सुर्यमालिकांच्या दिपावली विझाल्या !’

कालाचं किती विराट स्वरूप दोन ओळीत त्यांनी उभं केलं आहे पहा ! एका सुर्य मालिकेचं चित्र डोळ्यांपुढे आणताना आपण थकून जाऊ हा महाकवी शतसुर्यमालिकांच्या दिपावली विझाल्या म्हणून जातो. इतकी प्रचंड प्रतिमा घेऊन आलेल्या ह्या कोठडीत राहावं लागलं आणि ही भयाण कोठडी 'कमला सप्तर्षी, विरहाच्चवास असल्या प्रतिभेची उत्तुंग शिखर दाखवून देणाऱ्या काव्यांचं जन्मस्थळ ठरली.

ह्या कोठडीत त्यांनी जे हाल सहन केले त्याची कल्पना 'माझी जन्मठेप' वरुन येते. पण मला वाट्तं. त्यांनी खरोखरी जे शारीरिक आणि मानसिक हाल सहन केले असतील त्यातल्या एक दशांशाचं सुद्धा वर्णन त्यात लिहिलेलं नसेल. कारण हालाच वर्णन करताना त्यांना जराही संषय आला असावा की ह्या कथनामुळे लोकांच्या मनात करुणा उत्पन्न होणार आहे. तर त्या महापुरूषाला ते कदापीही रुचलं नसतं. म्हणून मला नेहमी वाटतं की इथे झालेले सगळे हाल त्यांनी लिहीलेच नाहीत. त्यांना हे पुस्तक वाचुन एखाद्या आजीबाईंनी 'आई आई गं काय हो हे हाल' म्हणायला नको होत, त्यांना असल्या हालावर मी मात करीत अशा विश्वासाने ह्या संकटात उडी टाकायला सिद्ध होणारा तरुण वाचक अभिप्रेत होता. स्वत:बद्दलची कणव निर्माण करण्याचा किंवा आपल्या त्यागाचे भांडवल करण्याचा तिटकारा होता. वार्ध्यक्याच्या काळात ते कुणालाही भेटायला उत्सुक नसत. 'त्याच कारण मला तरी असं वाटतं, की आपल्या आयुष्यातल्या थकलेल्या अवस्थेत आपल्याला कुणी पहावे हे त्याना आवडणं शक्य नव्हतं. एखाद्या म्हाताऱ्या सिंहाला वाचा फूटली तर तो जसा म्हणेल. 'मला सर्कशीतला सिंह म्हणून काय पहाता. जंगलात हत्तींची गंडस्थंळ फोडीत होतो तेव्हा पहायचं होतंत-' त्याच वृत्तीने ते एक प्रकारच्या एकांतात राहिले त्या वाधंक्यात एकच व्याधी त्यांना आतून पोखरत होती. ती म्हणजे देश दुभंगल्याची अशा अवस्थेतच त्यांनी मृत्युला आपण सामोरे जाऊन भेटण्याचा निश्चय केला.

विज्ञाननिष्ठ सावरकरांचे त्यांना धर्माभिमानी संकुचित म्हणणाऱ्यांना त्यांच्या मृत्युच्या प्रसंगी एक हादरून टाकणारे दर्शन झाले. आपल्याकडे बहुतेक लोकांची बुद्धिनिष्ठा औद्वदेहीक संस्काराच्या प्रसंगी लुळी पडते. परंपरागत रुढींचे पालन केले नाही. तर मानगुटीला बसेल त्याला नरकवास घडेल अशी नाना प्रकारची भीती मनात असते. मरणाऱ्याचीही आपल्याला मंत्राग्नी मिळावा-भंडांग्नी नको अशी अखेरची इच्छा असते आणि मुख्यत भितीपोटी ह्या इच्छेला त्याचे उत्तराधिकारी मान देत असतात. आणि अशा ह्या परिस्थितीत सावरकर आपल्या अखेरच्या इच्छापत्रात आपलें शव विद्दुत दाहिनीत टाकून द्यावे अशी इच्छा व्यक्त करतात. हे शव आहे त्याला एक काष्ठ या पलिकडे अर्थ राहिलेला नाही असं मानणं हे आद्द शंकराचार्यासारखं झालं. आद्द शंकराचार्याची आई मरण पावली. ब्राह्मणांनी तिच्या अंत्यंसंस्कारावर बहीष्कार टाकला. मृतदेह एकट्या शंकराचार्यांना उचलून स्मशानात नेता येईना. त्यांनी हे काष्ठ आहे. असं म्हणुन त्या मृतदेहांचे तीन तुकडे केले आणि एकेक तुकडा नेऊन दहन केले. विज्ञानिष्ठेची हीच परंपरा सावरकरांनी पाळली. आज आम्ही पाहतो. स्वत:ला सेक्युलर म्हणवणारे लोक आपल्या इच्छापत्रात आपली रक्षा कुठल्या सोर्वात नेऊन टाकावी हे नमुद करतात. मरणानंतर उतरांवर संकुचित धार्मिक्तेचा आरोप करणाऱ्या नेंत्यांच्या रक्षा विसर्जनाचा तमाशा दहा दहा दिवस चाललेला असतो आणि सावरकर मात्र आपले शव विद्दुतदाहिनीत टाका म्हणतात.(विद्दुत दाहिनी हा शब्दही त्यांचाच असावा असे मला वाटते.) मंत्रपठणाची गरज नाही म्हणतात. नंतरच्या क्रियाकर्माची आवश्यकता नाही म्हणून बजावतात. आयुष्यभर सावरकर ह्या बुद्धिनिष्ठेचा पाठपुरावा करीत आले. अंधश्रद्धा माणसाला दुबळं करते हे सांगत आले. इहवादाचा पुरस्कार करीत आले. राष्ट्रहिताविरुद्ध कारवाया करणाऱ्यां अनुयायी मिळवण्यासाठी त्यांनी सत्याशी तडजोड करणे नाकारले. सावरकारांनी गाईला केवळ एक उपयुक्त पशू म्हटल्यावर तिच्या पोटातल्या तेहतीस कोटी देवांच्या भाकड काथांवर आपली तुंबडी भरणारे त्यांच्यावर तुटून पडले होते.

यापुढे धर्मभोळ्या-मंत्रतंत्राच्या युगात आपल्याला राहयचं नसून विज्ञानीने समर्थ झालेल्या जगात जगायचं आहे हा विचार एका विलक्षण द्वष्टेपणाने ते मांडत आले. त्या नव्या जगात जगायला आपण नालायक ठरलो तर आपण आदिम अवस्थेतल्या जमातीतल्या माणसांसारखे ठरणार आहोत, बावळट ठरणार आहोत. अशा प्रकारच्या बावळटपणाला सावरकरांना तिटकरा असे. त्यांना दुबळा, वाकलेला, लाचार असा माणुस सहनच होत नसे. तेज:पुजतेने आकर्षण त्यांच्या साहित्यातून सदैव प्रकट झालेले दिसते. स्वातंत्र्याचं नातं देखील त्यांनी ’आत्मतेजीवाले’ प्रकटणाऱ्या रवीशी जुळवलेलं आहे, त्यांनी शेवटी मृत्युला अलिंगन दिले. ते देखील तेजाच्या एका ज्योतीने दुसऱ्या प्रचंड ज्योतीत मिळून जावे तरी. मृत्युला आपल्यावर झडप घालू न देता त्याच्या दरबारी ते धोरदात्त नायकासारखे चालत गेले. समिधेसारखं जीवन जगणाऱ्या सावरकरांची जीवनयद्वत स्वखुशीने आहुती पडली.



आपण आत्ताच ह्या बंदिगृहातल्या त्यांच्या एका गाभाऱ्यात जाउन आलो. निर्भयतेचा एक उपासक तिथे ठेवला गेला होता. नाना प्रकारचे हाल त्याला सहन करावे लागले. कोणासाठी त्यांनी ते सर्व सोसलं? तुमचा आमचा श्वासोच्छवास स्वतंत्र हिंदुस्थानातल्या हवेत मोकळेपणाने घेता यावा म्हणून. आज आपण इथे येतो. निर्भयपणाने हा भयाण कारागृहात हिंडतो. ती, सावरकरांची आणि राजबंदी म्हणून ज्या क्रांतिकारकांना इथे जन्मठेपेची सजा भोगावी लागली त्यांची पुण्याई आहे. त्या पुण्याईचे आज आपण स्मरण करतो म्हणुन आजच्या दिवसाला आपण सावरकरांची पुण्यतिथी म्हणतो. त्यांनी मिळवलं ते पुण्य जपजाप करुन नव्हे तर आयुष्याचं मौल देऊन निर्भयतेची साधना करुन आणि ती साधना कृतीत उतरवून अशा प्रसंगी त्या निर्भयतेचा थोडा तरी अंश आपल्यात उतरो ही आपली प्रार्थना असायला हवी.
प्रार्थनेचा उल्लेख आल्यावर मला स्त्रोत्राची आठवण आली. मी वाचलेल्या स्त्रोत्र-साहित्यात मला सगळ्यात आवडलेल स्त्रोत्र कुठलं असेल तर ते सावरकरांनी लिहिलेलं स्वतंत्रेच स्त्रोत्र. ’जयोस्तुते श्री महन्मगंले शिवास्पदे शुभदे.’ ह्या जयोस्तुतेच्या संदर्भात माझ्या मनाला स्पर्श करुन गेलेली एक घटना सांगितल्याशिवाय मला राहवत नाही. अस्पृश्यता निवारणाविषयींच्या सावरकरांच्या तळमळीविषयी आणि सहभोजन, मंदिरप्रवेश इत्यादी कार्यक्रमांविषयी मी आपल्याला सांगायला पाहिजे असं नाही. काही वर्षापूर्वी मी सांगलीजवळ म्हैसाळ म्हणून गांव आहे तिथे मधुकरराव देवल यांनी दलितांच्या सहकारी शेती संस्थेचा प्रयोग केला आहे तो पहायला गेलो होतो. भारतातल्या उत्तम ग्रामिण प्रकल्पापैकी हा एक प्रकल्प आहे. एक काळ असा होता की वस्तीतल्या स्त्रियांच्या अंगावर लज्जरक्षणापुरतीही वस्त्रं नसायची म्हणून त्यांना झोपडीबाहेर पडणं मुष्किल होतं. तिथे आम्ही गेलो त्या दलित वस्तीतली सर्व स्त्रीपुरूष मंडळी लग्नंसमारंभाला जावे तसा पोषाख करुन जमली होती. सहकारी शेतीने त्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवून आणलं होतं आणि ते केवळ आर्थिक परिवर्तनच नव्हतं हे लगेच माझ्या लक्षात आलं. त्या स्त्रियां समारंभात गाणं म्हणणारं होत्या. अलीकडे कुठेही सभेला गेल्यावर गाणी ऎकावी लागतात ती बहुदा सिनेमातली किंवा प्रसंगाला साजेशी अशी तितल्याच शाळेतल्या गुरुजीनीं कानामात्रांची यथेच्छ मोडतोड करून जुळवलेली स्वागतपर पद्दं. आणि इथे पेटीवाल्यांनी सुर धरला तबलजीने ठेका सुरू केला आणि अस्खलित वाणीने त्या दलित भगिनींनी गाणे सुरू केले. - जयोस्तुते श्री महन्मगंले शिवास्पदे शुभदे! स्वतंत्रते भगवती त्यामहं यशो युतावंदे! माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. ज्या दलितांचे जीवन सुधारावं, त्यांना समाजात मानाने जगता यांव- मोकळेपणाने गाता यांव वावरता यांव म्हणून सनातनी धर्मबांधवांचे शिव्याशाप सहन करित ज्या सावरकरांनी जींवाचं रान केलं त्यांनी रचनेत हे स्त्रोत्र मुक्तमनाने दलित स्त्रिया बिनचुकपणाने उत्तम सुराचालात गात होत्या. एखाद्याचं पुण्य फळाला येणं म्हणजे काय याचा मला त्या क्षणी अनुभव आला.

अशा या पुण्यशाली महापुरुषाला जिथे बंदिवास घडला ते हे क्षेत्र आता इहवादी सत्पुरुषाचं जिथे स्मरण करावं असं तिर्थक्षेत्र झालेलं आहे. ज्यामुळे आपल्या मनाला स्नान घडतं ते तिर्थ असं मी मानतो. भयाने, स्वार्थाने, संकुचीत वृत्तीने मालिन झालेली आपली मन धुवायला आपण आता ठिकाणी येतो. बाळारावांनी आणि श्रि. हर्षे यांनी इथे सर्वांना एकत्र आणण्याचा योग आणला. त्यांच्या आयोजनामुळे इथे येण्याचे भाग्य मला लाभले, मी त्यांचा आभारी आहे.
वीर सावरकरांच्या स्मृतीला मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो. ह्या सभेची सांगता एकेकाळी ज्या गीताने आपले सारे राष्ट्र जागृत झाले होते त्या त्या गिताचे पडसाद ह्या बंदिक्षेत्रात उठवून आपण करुया. मुक्त मनाने वंदेमातरम गाऊ या धन्यवाद !
[२६ फेब्रुवारी १९८३ ह्या दिवशी, अंदमानच्या सेल्युलर तुरूंगातील मैदानात केलेल्या पु.ल.देशपांडे यांच्या भाषणावरून.]

..आणि एके दिवशी कधीही कारणाशिवाय न ओरडणारे ते दोन गाढव निष्कारण ओरडू लागले. एकमेकांना भयंकर लाथाळी करु लागले. चहूबाजूचे लोक धावून आले. 'अशी लाथाळी आम्ही जन्मात पाहिली नव्हती' असे जो तो म्हणू लागला. गाढवीण बुचकळयात पडली. जन्मभर सालसपणाने सेवा करणारे हे गाढव असे का वागताहेत? तिला काही सुचेना. येथे या गाढवांची लाथाळी चाललीच होती. त्या विवंचनेत एके दिवशी संध्याकाळी ती खिन्न मनाने गावातल्या भगिनी-समाजापुढला उकिरडा फुंकीत असताना तिला शेजारच्या कुंभाराची गाढवीण भेटली.

'का, गाढवीणबाई? अशा खिन्न का?'

'काय सांगू बाई तुला? आमच्या जोडीदार गाढवांची हकीकत कळली नाही का तुला?

'त्या भयंकर लाथाळीची ना?' शेपूट वेळावीत गाढवीण म्हणाली.

'हो!' कुठल्याशा अध्यक्षीणबाईच्या गळयात पडलेला सुकलेला हार खुराने उडवीत पहिली गाढवीण म्हणाली. 'खरं सांगू का तुला?' 'काय?' 'हा लाथाळीचं कारण मला ठाऊक आहे. पण म्हटलं, उगीच दुसऱ्यांच्या भानगडीत आपण का पडा?' 'काय ते?' कानांना नाजुक हिसडा देत गाढवीण म्हणाली. तिच्या काळयाशार नाकपुडया थरथरत होत्या. 'विचारलंस तर सांगते बापडी! परवा काय झालं, मी आणि नाम्या कुंभाराची गाढवीण चरायला निघालो होतो. मी आपली नेहमी इथे भगिनी-समाजापुढे चरायला येते. इथे पुष्कळ अहवाल, भाषणं, प्रसिद्ध महिलांचे संदेश, वगैरे खायला मिळतात. आणि मागच्या खेपेपासून मला ही वर्तमानपत्रं पचेनाशी झाली आहेत. पण नाम्या कुंभाराच्या गाढवीणीनं आग्रह केला म्हणून वाचनालयापुढचा उकिरडा फुंकायला गेले मी! तिथे तुझे ते दोन गाढव आले होते. आणि कुणाला सांगू नकोस, पण दोघांनीही दोन निरनिराळ्या संपादकांची साप्ताहिकं खाल्ली. तेव्हापासून तिथेच त्यांची लाथाळी सुरु झाली... मागे एकदा त्या एका गाढवाने कसला मजूर पुढाऱ्याच्या भाषणाचा कागद खाल्ला होता, तेव्हा तो त्याच्या कुंभारालाच लाथा मारायला लागला होता.

'पण याला उपाय काय बाई?'

'अगं, सोपा आहे. गावात तो सिनेमा आहे ना तिथे नटींची चित्रं छापलेल्या जाहिराती वाटतात. पाच-पाच जाहिराती सकाळ- संध्याकाळ खायला घाल त्यांना. लगेच गप्प होतात की नाही पाहा.' असे म्हणून दुसरी गाढवीण 'महिला आणि क्रांती'तले उरलेले भाषण खाऊ लागली. पहिली गाढवीण सिनेमाच्या रस्त्याने धावू लागली.

'तिच्या धावण्यात एक मुक्त आनंदाचा अटूट आविष्कार होता' असे वाङमयमंदिरापुढे उभा असलेला एक गाढव नंतर कोणालासे सांगत होता.

..अपुर्ण (-उरलंसुरलं)

अभ्यास : एक छंद


माझ्या विद्यार्थी मित्रांनो,
मला तुमच्याशी बोलायची संधी मिळते आहे याचा खुप आनंद झाला. एकच गोष्ट जराशी खटकली, ती म्हणजे मी इथं बोलत असताना तुम्ही मला दिसत नाही आणि मी तुम्हांला दिसत नाही. मी तुम्हाला दिसलो नाही म्हणून फारसं बिघडत नाही. तुमच्या आवडत्या सिनेनटारारखा मी देखणाही नाही. पोशाखाबिशाखाच्या बाबतीतही ही कानगोष्ट आहे म्हणूनच सांगतो. जरासा गबाळाच आहे. आताच माझ्या लक्षात आलंय, की मी माझ्या बुशकोटाचे चौथे बटण तिसर्‍या काजात खुपसून तिसर्‍या बटनाला वार्‍यावरच सोडलं आहे.

पण ते काही का असेना, तुमच्याशी बोलताना माझं काही चुकलं नाही म्हणजे झालं. शिवाय समर्थांनी म्हटलचं आहे, की वेश असवा बावळा. माझ्या अंगी नाना कळा काही नाहीत. तरीही 'वेश असावा बावळा, परि अंगी असाव्या नाना कळा' हे समर्थाचं वचन मी इमानानं पाळत आलो आहे.

तेव्हा तुमच्याशी बोलताना शेक्सपिअरच्या ज्युलियस सीझर नावाच्या नाटकातला मार्क ऍंटनी म्हणतो तसं मीही थोडासा फरक करून म्हणेन, 'मित्र हो, भारतीय हो आणि बालनागरिक हो, जरा तुमचे कान इकडे करा.' मी शाळेत होतो त्या वेळी जेव्हा माझे गुरुजी 'इकडे कान कान कर' म्हणायचे, त्या वेळी ते काही निराळ्या कारणाने म्हणत असत. त्या अर्थाने नाही म्हणत मी....मी काय सांगणार आहे ते ऎकाल का? अशी विनंती करण्य़ासाठी म्हणतो आहे-- माझ्या बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो जरा इकडे कान द्या.

खरं सांगायचं म्हणजे तशी आपली अगदीच ओळख नाही असं नाही. कदाचित माझी संपूर्ण पुस्तकंही तुमच्यापैकी काहीजणांनी आणि काहीजणींनी वाचली असतील. म्हणजे यापूर्वी मी तुमच्याशी पुस्तकांतून बोललो आहे. लेख लिहिणं म्हणजे दुसरं काय? पुस्तकांतून तुमच्याशी बोलणंच की नाही? माझी गोष्ट सोडा. मी फार थोर लेखक नाही, पण तुमच्याशी पुस्तकांतून निरनिराळ्या विषयांवर किती थोर माणसं बोलत असतात. ज्ञानेश्वर बोलतात, तुकाराम महाराज बोलतात, सानेगुरुजी बोलतात, जोतीबा फुले, टिळक, आगरकर, हरी नारायण आपटे, गडकरी, केशवसुत, बालकवी असे संत, विचारवतं कादंबरीकार, नाटककार , कवी तुमच्याशी बोलत असतात. वास्तविक ही माणसं आज आपल्यात नाहीत. तरी त्यांचं बोलणं मृत्युसुद्धा थांबवु शकला नाही. तुम्ही एखाद्या थोर लेखकाचा धडा म्हणून जेव्हा वाचता तेव्हा तुमच्या लक्षात हे आलंय का, की आपण एका थोर माणसाच्या सहवासात आहोत? हे तुमच्या लक्षात केव्हा येईल ठाऊक आहे? तुम्ही ज्या वेळी पुस्तक हे थोरांना भेटण्याची संधी आहे या दृष्टीनं ते हाती घ्याल तेव्हा.

परीक्षेला पुस्तक नेमलंय म्हणून वाचलं पाहिजे अशा भावनेनं जर तुम्ही पुस्तक हातात धरलंत तर त्या लेखकाशी तुमचा संवादच सुरू होणार नाही. कादंबरी असो किंवा अगदी रुक्ष वाटणारं भूगोलाचं पुस्तक असो. कुणीतरी आपल्याशी केलेली ही कानगोष्ट आहे. कुणी आपल्याला खूप आवडलेली माहिती खूप हौसेनं देतो आहे. अशा भावनेनं जर आपण ते हाती धरलं नाही तर तुमचा संवादच सुरू होनार नाही.

एखादी कविता तुम्ही वाचत असताना एकदम म्हणता की नाही 'वा ! वा ! काय छान आहे ही ओळ !' एखादी विनोदी कथा वाचताना खुदकन हसता की नाही? अशा वेळी आई विचारत असते, 'काय रे मधू, एकट्यानंच हसायला काय झालं?' त्या वेळी आपण वरवर पाहणार्‍याला एकटेच आहोत असे वाटत असतं; पण आपण एकटे असतो काय? आपल्याशी चिं.वि.जोश्यांचे चिमणराव बोलत असतात. गडकर्‍यांचे बाळकराम ठकीच्या लग्नाची कथा सांगत असतात. आईला बिचारिला कसं कळणार, की तुम्ही त्या वेळी थोर विनोदी लेखकाशी कानगोष्टी चालवल्या आहेत ते?

नव्या सत्राच्या आरंभी तुम्हांला सांगायची मुख्य गोष्ट ही, की गणिताच्या काय, भूगोलाच्या काय किंवा भाषा विषयाच्या काय, कुठल्याही पुस्तकाच्या सहवासात तुम्ही असताना एखाद्या मित्राच्या सहवासात आणि तेदेखील आपल्यापेक्षा ज्यानं खूप निरनिराळ्या गोष्टींचा अनुभव घेतलाय अशा मित्राच्या सहवासात आता दोन-चार तास काढणार आहोत असे समजावे. म्हणजे जे पुस्तक अगीचच तुम्हांला परिक्षेची भीती घालत येतं, ते तुमच्या मित्रासारखी तुम्हांला वाटेल.

पोहता न येणार्‍या मुलांना पाण्याची भीती वाटते; पण एकदा पाण्याशी मैत्री केली, ते पाणी आपण त्याच्यावर कसे हातपाय मारले असताना हवे तितका वेळ उचलून धरतं हे कळलं, की सुट्टी लागल्याबरोबर आपण तलावाकडे किंवा नदीकडे एखाद्या मित्राच्या घरी जावं तशी धूम ठोकतो की नाही? सुरुवातीला जातं थोडं नाकातोंडात पाणी. पुस्तकांचं तसंच आहे. कधी कधी हा लेखक काय बरं सांगतोय ते कळतच नाही. अशा वेळी नाकातोंडात पाणी जातं म्हणून पाण्याशी वैर करणार्‍या भित्र्या मुलासारखं तुम्ही पुस्तकाशीच वैर केलंत, तर त्या मुलाला जसा मस्त सूरबीर मारून पोहण्याचा आनंद मिळत नाही, तसा तुम्हांलाही ज्ञानाचा आनंद मिळणार नाही.

मी कशाचा अनंद म्हणालो ? ज्ञानाचा आनंद नाही का ? तसा तो जड नाही. 'ज्ञान' म्हणजे काहीतरी कठीण गोष्ट आहे अशी आपली उगीचच समजूत करुन दिलेली असते. साध्या भषेत सांगायचं तर ज्ञानाचा आनंद म्हणजे 'अरेच्चा! आपल्याला कळलं' असे वाटून होणारा आनंद! मग तो एखाद्या यापूर्वी की न ऎकलेल्या शब्दाचा असेल../ न सुटणारं गणित सुटल्यावर होणार असेल किंवा एखाद्या संगितातला राग ओळखता आल्यावर होणारा असेल.

तुम्ही सगळे विद्यार्थी आहात नाही का? विद्यार्थी म्हणजे तरी काय? विद्‌ म्हणजे जाणणे, कळणे; अर्थी म्हणजे इच्छा असलेला. ज्याला काही कळून घेण्याची इच्छा आहे तो विद्यार्थी. आता काही कळून घ्यावं अशी ज्याला इच्छाच नसेल तो मात्र केवळ शाळेत जातो आणि हजेरीपटावर नाव आहे म्हणून त्याला विद्यार्थी म्हणता येईल का? नाही म्हणून तुम्ही माना हालवल्यात ते दिसलं बरं का मला. तेव्हा शाळेत आला आहात ते आपल्याला जे जे काही या जगात दिसतं त्यामागचं रहस्य काय आहे बुवा, ते कळावं म्हणून आला आहात.

या जगात लाखो वर्षापासून माणसांचं येणं आणी जाणं चालूच आहे. जन्मल्यापासून जास्तीत जास्त शंभर वर्षापर्यंत माणसाला देखील ट्यॅं... ट्यॅं... असा आवाज करत काही नवे रहिवासी आले असतील. मी किंवा तुमचे आईवडील, तुमचे गुरूजी, तुमच्या आधी काही वर्षे इथं आलो. त्या आधीही काही माणसं आली. आधी जी माणसं आली त्यांनी या जगात तुमच्यापेक्षा जास्त वर्ष काढल्यामुळे तुमच्यापेक्षा त्यांना अधिक गोष्टी कळलेल्या नाहीत किंवा समजायला अवघड जातात त्या समजावून देण्यासाठी तुमचे शिक्षक असतात.

आता तुम्हांला एखादी नवीन माहिती नेमकी कळली, की कळली नाही हे त्यांना कसं कळायचं? आपल्यापरीनं ते तुम्हांला वर्गात शिकवून सांगतात. मध्येच प्रश्न विचारतात. तुमच्या उत्तरावरुन त्यांना कळतं, की तुम्हांला नीट कळलयं की नाही ते; पण एवढ्या मोठ्या वर्गात सगळ्यांनाच प्रश्न विचारणं शक्य नसतं. अशा वेळी 'गुरुजी मला कळलं नाही' हे सांगण्याचं तुमच्यात धैर्य पाहिजे.

'अज्ञान' असणं यात काहीही चूक नाही; पण 'अज्ञान' लपवण्यासारखी चुकीची गोष्ट दुसरी कुठलीही नाही. विशेषत: कळण्याची इच्छा मनात बाळगुन येणारया तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी 'आपल्याला कळलं नाही' हे न सांगणं हा तर मी म्हणेन एक प्रकारचा अपराध आहे. न्युटनसारखा एवढा थोर वैज्ञानिक म्हणाला होता ना, की वाळवंटातल्या एका वाळूच्या कणाएवढीही मला विज्ञानाची ओळख पटली नाही म्हणून. मग तुम्हा-आम्हांला कसली लाज ! आपल्याला कळलं नाही की सरळ न घाबरता हात वर करावा आणि म्हणावं 'सर, मला इथपर्यंत कळलं. इथून पुढलं नाही लक्षात आलं.' चांगल्या शिक्षकांना असले प्रश्न विचारणारा विद्यार्थी फार आवडतो आणि चांगले शिक्षक एखाद्या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं नेमकं उत्तर ठाऊक नाही; पण मी ग्रंथालयातून या विषयावर लिहिलेली पुस्तकं वाचून तुला उद्या उत्तर सांगेन.' विषयाला धरून प्रश्न विचारल्यावर विद्यार्थ्याला चांगले शिक्षक 'गप्प बस' असं कधीच सांगत नसतात.



तसं पाहायला गेलं तर आपण सगळे विद्यार्थीच आहोत. शाळेतलं शिक्षण संपल्यावर जर सगळ्यांनी नवीन माहिती मिळवायचं सोडून दिलं असतं तर जगात कधी प्रगती झाली असती का? हे जग इतक्या अजब अजब गोष्टींनी भरलं आहे, की त्यांतल्या एखाद्या गोष्टीचा थांगपत्ता लावायचा म्हणजे वयाच्या साठाव्या आणि सत्तराव्या वर्षींसुद्धा विद्यार्थ्यासारखंच त्या गोष्टीचा अर्थ समजून घायच्या मागे लागावं लागतं. मोठे गवई रोज पाच-पाच, सहा-सहा तास गायनाची मेहनत करत असत, हे ठाऊक आहे का तुम्हांला? अहमदजान तिरखवॉंसाहेब नावाचे आपल्या देशातले फार मोठे तबलजी. ते सांगत होते, की दहा-दहा, पंधरा=पंधरा तास त्यांचा सराव चालायचा. मी म्हणालो. "खॉंसाहेब तुम्हांला कंटाळा येतो का?" नव्वदाव्या वर्षीही ते तीस वर्षाच्या तरुणासारखा तबला वाजवत.

सांगायचा मुद्दा काय, एखाद्या गोष्टीचं रहस्य काय आहे हे समजून घेण्यासाठी तुम्ही त्याच्या मागे लागलात, की तो अभ्यास हासुद्धा एक खेळ होतो. मी तुम्हांला अभ्यासाच्या बाबतीत आणखी एक गुपित सांगणार आहे. पुष्कळदा आपल्याला वाटतं. की अमुक एक विषय आपल्याला आवडत नाही. समजा तुम्हांला वाटलं, इंग्लिश आपल्याला आवडत नाही. फार अवघड आहे. मग तोच विषय पकडा. बघू कशी माझ्याशी दोस्ती करत नाही तो, म्हणून त्याच्या मागे लागा. त्या भाषेच्या काय काय खोडी आहेत त्या लक्षात घ्या... त्या शब्दांशी थोडक्यात म्हणजे मैत्री जमवा. यासाठी पहिली गोष्ट म्हणजे गुणांचा हिशेब विसरून जा. शंभरापैकी पस्तीस गुण मिळाले, की पास करतात म्हणून उरलेल्या पासष्ट गुणांचं अज्ञान तुम्ही खपवून घेत असलात, तर मग तुम्ही खरे विद्यार्थीच नव्हे.

तुम्ही एखाद्याशी दोस्ती जमवता म्हणजे काय? त्याच्या फक्त नाकाशीच दोस्ती जमवता? किंवा हाताशीच जमवता? तुमचा दोस्त तुमच्या घरी न येता नुसत्याच आपल्या चपल्या पाठवल्या तर चालेल तुम्हांला? नाही चालणार. तो संपूर्णपणाने तुमच्या घरी यायला हवा. तसंच विषयाचं आहे. तुमच्या पुस्तकाशी तुमचा संपूर्ण परिचय हवा. भूगोलाशी पुस्तकातली पस्तीस गुणांपुरतीच पानं पाठ केली असं म्हणणं म्हणजे भूगोलाशी तुम्ही दोस्तीच केली नाही म्हणण्यासारखं आहे.

हल्ली मुलींना गृहशास्त्र हा विषय असतो. त्यात भात-भाजी-वरण-पोळी-चटणी वगैरे स्वयंपाक करायचं शिक्षण असतं. आता गृहशास्त्रातली एखादी मुलगी म्हणाली, की १०० पैकी ३५ गुणांना पास ना, मग मी आपली नुसतचं वरण आणि चटणी करायचं शिकेन. म्हणजे वरणाचे पंचवीस आणि चटणीचे दहा मिळाले की पास; पण मग ती पुढे तिच्या घरी पाहुणे येतील, त्यांना काय वरण आणि चटणी वाढून 'हं, करा जेवायला सुरुवात; म्हणणार?

तुम्हांला नेमलेलं नवीन पुस्तक आलं, की खरं तर कळो ते अधाशासारखं वाचून काडःअलं पाहिजे. एखाद्या कवीची पाठ्यपुस्तकातली कविता तुम्हांला आवडली तर त्या कवीच्या आणखी कविता तुम्ही वाचायला हव्यात. आईने बशीत एकच करंजी दिली, की बाकिच्या करंज्या कुठल्या डब्यात ठेवल्या आहेत, ते हळुच पाहून ठेवता ना तुम्ही? मग एक कविता आवडली, की बाकीच्या कुठल्या पुस्तकात असतील हे शोधुन काढायला काय हरकत आहे?

तुमच्यापैकी कितीतरी मुलांना पोस्टाची तिकीटं गोळा करायचा, काड्याच्या पेट्यांवरची चित्र गोळा करायचा छंद असतो. अभ्यास हासुद्धा छंद झाला पाहिजे, तरच शिकणं हा आनंदाचा भाग होऊन जाईल. अभ्यास करणं हे कोडी सोडवण्यासारखंच आहे. कोडं सुटत नाही तोपर्यंत कठीण. ते सुटणार नाही म्हणून हातपाय गाळून बसणं, हे तर भ्याडपणाचं लक्षण आहे.

हिमालयाचं शिखर चढून जाणाऱ्या एका गिर्यारोहकाला एकानं विचारलं, "का हो, इतकी उंच शिखरं पाहून तुमची छाती दडपून जात नाही का? इतक्या उंच आपण कसं काय चढणार बुवा, या विचारानं तुम्हांला भीती वाटत नाही का?" तो म्हणाला, "पण मी कधी शिखराकडे पाहतच नाही. मी एक पाऊल टाकलं की दुसरं कुठं टाकायचं ते पाहतो. हातातल्या नकाशावर माझं लक्ष असतं. होकायंत्रावर दिशा पाहतो. एक पाऊल चढलो की म्हणतो, शिखर एक पाऊल आलं जवळ आणि असं करता करता माझ्या लक्षात येतं, आलं शिखर!"

पुस्तकातल्या पानांचं तसंच आहे. कसलाही विषय असो. त्या पानांत संपूर्णपणे घुसा... एकेका-एकेका ओळीत काय मजा आहे ते पाहत चला... अडलात एखाद्या ठिकाणी की ठरवा. उद्या हे गुरुजींना विचारायचं. घरात कुणी वडील माणूस अस्लं तर त्यांना विचारा. आपल्यापेक्षा वरच्या वर्गातल्या एखाद्या अभ्यासात आनंद वाटणाऱ्या मुलाशी दोस्ती करा. तुमच्या लक्षातसुद्धा येणार नाही, की पुस्तकाचं शिखर तुम्ही केव्हा गाठलंत. ते तुम्हीच आठवा बरं.--गेल्या वर्षी खालच्या इयत्तेत असताना तुम्हांला कठीण वाटलेलं गणित आता किती सोपं वाटतं ते. असंच पायरी-पायरीनं चढत जायचं असतं.


इंग्रजीसारख्या विषयात पोस्टाच्या तिकीटासारखा एक-एक शब्द गोळा करत गेलात आणि तुमचा आल्बल जसा तुम्ही पुन्हा पाहता तसा पाहत पाहत गेलात, की पाहा तुमची इंग्रजीशी दोस्ती जमते की नाही ते. मग शेक्सपिअर, डिकन्स, बर्नाड शॉ असले जगप्रसिद्ध लेखक, पत्र-मित्र असतात तसे तुमचे ग्रंथ-मित्र होतील. जी गोष्ट इंग्रजीची तीच गणिताची, विज्ञानाची, भुगोलाची आणि इतर विषयांची.

एखाद्याशी मैत्री जमवण्याचा उत्तम उपाय म्हणजे आपण आपल्या मैत्रीचा हात त्याच्यापुढे करणं हा. तुमच्या कानात सांगण्यासारखी हीच कानगोष्ट आहे. खेळापासुन ते गणितापर्यंत सगळ्यांशी मैत्री करा. म्हणजे पहा, परिक्षा हा त्या सगळ्या मित्रांशी आपली जोरदार दोस्ती आहे, असा जगाला दाखवुन देण्याचा आनंदाचा सोहळा होईल. या सोहळ्यात खूप यशस्वी व्हा... ही तुम्हां सर्वांना शुभेच्छा.