माझे एक स्वप्न डोळे उघडण्यापुर्वीच मिटल,
डोळे उघडल्यावर ते
माझ्याच कवेत मला दिसल!

गड झाला जड
त्यात उगवला वड
निळा निळा मोती
त्याच्या निळाईची झळ.
परिस परिस,
असे स्पर्श माझे दिस.
सरले सरले,
गेले वर्ष साजे तीस!

आभाळाला घाई
त्याच्या पांगुळगाड्यालाही
गडद गडद ,
त्याच्या डोळ्यांमधे आई!
आधार उधार,
झाला विश्वाचा बाजार
उधळली माती,
तिने झेलता गं वार?
उपाशी तपाशी
माझ्या नजरेत काशी
जिथे रोज गंगा
असे गढूळ प्रवासी.
आकाश कोंडले
आणि कोंडला गं श्वास.
परतीच्या वाटा
आणि वादळता ध्यास.
-भूराम
३१ मे २००९

हाका दिल्या तुला मी,गेलीस तू तरीही
स्वप्नात आज माझ्या ,आलीस तू तरीही...
मी एकटाच गातो गाणे खुळ्या मनाने,
ऐकावया तयाला, यावेच तू तरीही...

माझ्या मनात होतो पाऊस आठवांचा,
चोरून चित्त माझे नेलेस तू तरीही...
शोधू मलाच कोठे,माझा न राहिलो मी
झाली दशा अशी कां,होतीस तू तरीही...
कां दूर दूर जाशी सोडून साथ माझी ?
होता पुरी प्रतीक्षा येतेच तू तरीही...
जाशील या भितीने ,चिंतेत रात गेली
ना एकरूप झालो, होतीस तू तरीही...
अरविंद

हे मला होते समजले , आवर घालायचा मना
व्ह्यायचे ते अश्रु आता , फ़क्त पावसात पुन्हा
पाउस वेडा जीवघेणा , जागवतोय सर्व जुन्या खुणा
मीच मला सावरतो , आठवुनी जुन्या शपथा पुन्हा
एक तीच वेळ होती , समजले कधीच नाही जना
मीच जखमा लपवितो , रिचवुनी पेले पुन्हा
दिसतेस बाजारात आता , ओळख नसते द्यायची
सारतेस बट तशीच , सहन करतो त्रास पुन्हा
मी कसा होतो , ठाउक होते फक्त माझ्या मना
त्यास देखिल गप्प करितो , झाला प्रेमाचा गुन्हा
फिरुनी तसाच सावलीच्या , चालतोच कुणाविना
शीळ तीच घालतो , एकटा पुन्हा पुन्हा
शीळ तीच घालतो , एकटा पुन्हा पुन्हा
प्र...............साद जोशी
पुणे
०८.०६.२००९

कॉलेजचा पहिला दिवस
मुसळधार पाउस
खोडसाळ वारा भन्नाट
छत्री उलट पुलट
नविन चपला सपसप
चिखल उडवी रपारप
शुभ्र सलवार माखलेली
मी पावसात भीजलेली
हॉल मधे जाउ कशी
ऍड्रेसला हजेरी लाउ कशी
सिनीयरर्स..रॅगींग..बाप रे
कोणीतरी मला वाचवा रे
कोणीतरी एवढ्यात पुटपुटल
मागचं दार आहे खुलं
भेट सुरु अधुन मधुन
कधी चुकुन, कधी जाणुन
डिग्री घेउन तो गेला
तरी येउन भेटु लागला
माझेही शिक्षण पुरे झाले
हॉस्टेल मधे रहाणे बंद झाले
आज बगेत मी नातवंडांसोबत
तोही दिसला नातवंडांसोबत
ओळखले आम्ही एकमेकांना
गम्मत वाटली ते दिवस आठवताना
खरी गम्मत तर पुढेच घडली
त्याची 'ती' आणी माझे 'हे'
हातात त्यांच्या भेळ पुडे
’एकाच कॉलेजचे आम्ही दोघे’
ओळख त्यांनी करुन दिली !!
रजनी अरणकल्ले ०७.०६.०९

सांजल्या जगाशी उधळला वारा.
गार गार, मंद मंद अंगाला शहारा.
हळूच चकाके बघ धूळ पावूलात.
तुळशीच्या पायी दिसे जळणारी वात.
चाहुली चाहुली एक निशिगंध येई
त्या सभोवास गंध, आणि कुणी नाही
थकलेली तुडवूनी देश प्रांत प्रांत
घरट्यात परतली पाखरे ही शांत
धरती गं सभोवती दिसे ती एकाकी.
रात किड्या किर किर त्याचा तोच भाकी.
दाटले दाट्ले आता उरात काहूर.
चांदण्या बांधल्या दिसे आकाशात दूर.
सरला मनाशी माझ्या कोंडलेला दिस
कुणी पदरात वेडा सांडला पाउस?
-भुराम
६/७/२००९

'वाईन' असते वायोलिन सारखी...
वेदनेच्या तारा हळुवार छेडणारी...!.
श्वासामध्ये विरघळून काळजाला भिडणारी...
उदास उदास कातरवेळी...
वर वर बिनधास्त...आत आत हळहळणारी...!

'रम' असते तबल्यासारखी....
सगळ्या संवेदना क्षणात जागवणारी..!
एका नादखुळया स्पर्शानेच...
धरेवरुन आभाळात झेपावणारी...!
रात्रभर तालाच्या आवर्तनात घुमून ...पहाटे पहाटे समेवर येणारी !
'बिअर' असते मंदधुंद बासरी...
ओठांनी स्पर्शिली की ओठांपेक्षाही लाजरी..!
नसानसांतून वाहणारी, अलगद आणि लहरी..!
'शँम्पेन' असते मँच जिंकल्यावर निनादनारा उस्फुर्त बिगुल...
कुणी दखल घेतली तर ठीक,..नाहीतर आपल्यातच मश्गुल..!
'स्कॉच' म्हणजे झटका देणारी गिटार ...
कलत्या रात्री, भलत्या क्षेत्री, झुलत्या चंद्राबरोबर...
प्रत्येक ठेक्याला डोक्यात चढणारा थरार..!
मद्य नसेल तर वाद्यांचा नुसता कोलाहल...
वाद्य नसेल तर मद्य जाचक, जहरी हलाहल...
दोन्ही नसतील तर अवघे जगच सुनी सुनी मैफल...!!!
गौरी.

Posted by Picasa