गौरी आगमनाचा आजचा दिवस महिलांच्या खास आनंदाचा.

श्री गणेशाचे आगमन झाल्यानंतर गौरींचे आगमन होते. घरात आनंदाचे वातावरण नांदू लागते.
आजकाल कुटुंबे दूरदूर गेली. दुरावा वाढलाय. पण या सण-उत्सवाचा आनंद द्विगुणीत करणारा.
माहेराला जाण्याचे हे पारंपारिक निमित्त.

कोकणात तर हा सण मोठ्या दणक्यात साजरा होता. आपल्या प्राचिन परंपरा जपून तिथ त्या सांभाळल्या ,पाळल्या जातात.

आनेक नाती एकत्र येतात. सुखाचा , मायेचा शिडकवा मिळतो. माहेरवाशिण आपल्या आई-वडीलांच्या घरी माहेरपणाला येते. थोडी चिंता बाजू ठेऊन सारे जण हा आनंदाचा ठेवा साठवत , गाणी म्हणत नाती सांधतात.

विविध ठिकाणच्या प्रथेप्रमाणे गौरींचे आगमन होते. कुठे खड्याच्या. कुणाकडे उभ्या हाताच्या. तर कुणाघरी उभ्याच पण मुखवटच्या गौरींचे आगमन होते. कुणी मुखवटे दरवर्षी नविन आणतात. तर काहीजणांकडे पितळ्याचे कायमचे मुखवटे बसवून गौर सजविली जाते.

घराला उत्साह देणारे हे वातावरण गौरीमुळे अधिक जाणवते. गौर म्हणजे महालक्ष्मी . त्यांची गाणी म्हटली जातात.आठवणींच्या कुपीत साठलेली गाठोडी सोडून मनेही मोकळी होतात.अखेरीस या सा-या सण-उत्साहाचे सार एकत्र येण्यातच आहे. दूरावलेली नाती दृढ होतात. आजकाल विभक्त कुटुंबामुळे दूर गेलेला संवादाचा झरा पुन्हा पाझरतो.

इथे प्रत्येक घर आपापल्या ऐपतीप्रमाणे उत्सव साजरा करतो. संस्कृतीवर घाला घालणा-या संस्कृतीरक्षकांनी तोंडात बोटे घालावीत असा हा उत्साहाचा सोहळा गुण्यागोविंदाने नांदत आहे. कुणाच्याही वक्र दृष्टीला भीक न घालता गणपती बाप्पाचा गजर करीत सारे लोक आनंद घेत आहेत.



तुम्ही कितीही म्हणा. पण पुण्यात येणारा प्रत्येक भक्त दगडूशेठ गणपती आणि मंडईचा गणपती पाहल्याशिवाय जात नाही हे नक्की. खरे म्हणाल तर पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती. आणि देवी म्हणजे जोगेश्र्वरी. कुठल्याही कार्याचा आरंभ या दोन देवळातल्या मूर्तिंना आमंत्रित करूनच होतो.


मात्र गणपती उत्सवात कसबा आणि जोगेश्र्वरीच्या गणपतीला मान आहे. पण सजावट आणि भव्यता यांचे दिपवून टाकणारे वैभव अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाने सातत्याने कायम ठेवले आहे.

म्हणूनच हे दोन्ही गणेशाचे दर्शन घेऊनच भक्त कृतार्थ झाल्याची भावना कायम मनात ठेवतात.



एवढेच काय तुम्ही पुण्याची वृत्तपत्रे पाहिली तर पुण्याच्या मानाच्या गणपतीच्या बातम्यांप्रमाणेच दगडूशेठ आणि मंडईच्या गणपतींच्या प्रतिष्ठापनेची स्वतंत्र बातमी करून छापतात. ही दोन्ही गणपतीमंडळे सामाजिक कार्य वर्षभर करण्यावरही तेवढाच भर देतात.

मिरवणूकीच्या मार्गावरचा दोन्ही मंडळांचा मान आजही राखला जातो. त्यांच्या सजावटी पहाण्यासाठी भक्त गर्दीतून वाट काढून दुतर्फा उभे असतात. श्रींच्या दर्शनाचे भाग्य लाभावे यासाठी अवघा महाराष्ट्र इथे येण्याचा संकल्प करीत असतो.

हिरवा गार श्रावण सरून चैतन्याच्या लाटेवर आरुढ होऊन, उल्हासाचे रंग उधळीत भाद्रपद येतो. त्याच्या मंगल पावलांसाठी सृष्टी जणू अधीर झालेली असते. घरी दारी सजावट सुरु होते; तोरणे सजतात आणि वाजत गाजत मंगलमूर्तीचे आगमन होते.

दर वर्षी भाद्रपद शुध्द चतुर्थीच्या मंगल दिवशी उत्साहाचा, आनंदाचा जल्लोष सुरु होतो. ''मंगलमूर्ती मोरया.. गणपती बाप्पा मोरया.." अशा गजरात शहरातील रस्ते फुलून जातात. मिरवणुकीत तल्लीन झालेले नागरिक आपल्या लाडक्या दैवताची प्रतिष्ठापना करतात.

गणपती हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. १४ विद्या आणि ६४ कलांचा स्वामी विघ्नहर्ता गणेश. मुंबईतील सुमारे साडेपाच हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येते. सुमारे लाख दीड लाख घरगुती गणपती मोठ्या थाटामाटात घरोघरी विराजमान होतात आणि मुंबई - पुण्यासारख्या शहरांमधील लोकांचे अवघे जीवनच गणपती व्यापून टाकतो. पूजा, आरत्या, नैवद्याच्या तयारीत सर्व लोक रंगून जातात.

तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता,
तूच कर्ता आणि करविता

अशी देवाची प्रार्थना करीत आकाशात नवरंग उधळीत आरत्यांचा गजर स्वर्गात पोचतो. पाण्याची टंचाई, दुष्काळाचे सावट स्वाईन फ्लूचा भयानक प्रादुर्भाव, ही संकटे वेढा घालून बसलेली असता त्यांची तमा बाळगता गणपतीच्या दर्शनाला लोक रांगा लावतात. स्वाईन फ्लूपासून बचाव व्हावा म्हणून मास्क घालणार्या पोलिसांचे ठिकठिकाणी दर्शन होते. मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आदल्या रात्रीपासूनच भाविक गर्दी करतात.

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली. .. १८९३ मध्ये केशवजी नाईकांच्या चाळीत लोकमान्यांनी पहिला सार्वजनिक गणपती स्थापन केला आणि ती परंपरा आजही अखंडितपणे चालू आहे हयाचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटतो. गणेशोत्सवामुळे लोकांची श्रध्दा अतूट झालेली दिसते. मुंबईत आज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची संख्या वाढताना दिसते.

प्रभादेवीचा सिध्दीविनायक आणि गिरगावातील फडके मंदिर ही दोन्ही मंदिरे गर्दीने ओसंडून वाहत असतात. मुंबईत गणपतीची किती मंदिरे आहेत, याची यादी केली, तर भली मोठी नोंद होईल. केवळ गणपतीची मंदिरे नव्हे, तर प्रत्येक मंदिरात गणपती हा असतोच! सुवर्णालंकारांनी झगमगणार्या गणपतीच्या दर्शनाला भाविकांच्या लांबचलांब रांगा लागतात.

पुण्याच्या सारसबागेत पेशव्यांनी बाग वसवली. तलाव खोदून त्यात पाणी सोडले, मधोमध एक बेटवजा जागा ठेवून त्यात बाग फुलवली. श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांनी श्री सिध्दिविनायकाची स्थापना केली आणि सारसबागेच्या सौंदर्याला पावित्र्याची किनार लाभली.

पेशवे घराण्यातील नानासाहेब, थोरले माधवराव, आणि अम्रुतराव हे तिघे गणपतीचे उपासक होते. शनिवारवाडयात गणपती पूजनाची, उत्सवाची, सुरुवात नानासाहेब पेशवे यांनी केली. तेव्हाचा गणेशोत्सव मोठया धुमधडाक्यात होत असे. पेशवाई संपुष्टात आल्यानंतर ओघानेच उत्सवाची प्रथा बंद पडली.

पेशवाईतील गणेशोत्सवाच्या राजवैभवाला पुढे १९ व्या शतकात लोकमान्य टिळकांनी पुन्हा वैभव प्राप्त करुन दिले. मधल्या कालखंडात गणेशोत्सवाचे सार्वजनिक रुप नाहीसे झाले. तरी जनमानसातील गणेशाचे स्थान अढळच होते.

१९९६ मध्ये जगभरातील गणेशमूर्ती एक प्रदर्शन सोहळा या ठिकाणी झाला आणि एक गणेश संग्रहालय इथे निर्माण झाले. हे गणेश संग्रहालय म्हणजे गोविंदराव मदाने आणि पांडुरंग जोगे यांच्या छंदातून निर्माण झालेले अत्यंत सुंदर आणि आकर्षक असे देऊळ होय. या ठिकाणी साडेतीनशेहून अधिक गणेशमूर्ती आहेत आणि .पां. आपटे यांनी निर्माण केलेली २३ गणेश चित्रांची सृष्टी अत्यंत प्रेक्षणीय आहे.

प्राचीन आणि अर्वाचीन गणेशमूर्ती येथे आहेत. अगदी तळहातावर ठेवता येईल एवढया गणेशापासून ते पुरुषभर उंचीच्या महागणपतीपर्यंत आकाराच्या मूर्ती आहेत. माती, दगड, काष्ठशिल्प, तांबे, पितळ, पंचधातू आणि चंदन, शिंपला, काच, कागद अशा असंख्य वस्तूंपासून साकारलेल्या मूर्तींचे विलोभनीय दर्शन येथे घडते. पुण्याच्या पेशवाईतील लंबोदरापासून ते मुस्लिम बहुल काबुलमधील काळयाभोर गणेशशिल्पाचा हा गणेश दर्शन सोहळा पाहताना अध्यात्माच्या पलीकडे, शास्त्र, मूर्तीविज्ञान, देशोदेशीच्या गणेश संकल्पना असे मोठे विश्व आपल्याला दर्शन देऊ लागते.

जपानमध्ये आजही गणेश हा लोकप्रिय देव आहे. आणि तेथे त्याची पूजा होते. तो सुखाचा, भाग्याचा देव समजला जातो. त्याच्या उजव्या हातात लाडू आणि डाव्या हातात मुळा असतो. "होजांझी", येथे द्विदेही गणेशाचे मंदिर आहे.

भारतापासून तब्बल आठ हजार किलो मिटर अंतरावर अटलांटिक महासागरात वसलेल्या आयर्लेंडनामक बेटावरही विघ्नहर्त्याचे दर्शन घडते हे आश्चर्यकारक नाही काय? येथे तब्बल २२ एकरांचा परिसर व्यापून राहिलेले उद्यान (ईंडियन स्कल्पचर्स पार्क) आहे. तेथील विस्तीर्ण हिरव्यागार मैदानावर अनेक गणेशमूर्ती मोठ्या चित्राकर्षक आहेत. काळ्या ग्रॅनाईण्टमध्ये कोरलेल्या सहा ते नऊ फूट उंचीच्या अशा नऊ मूर्ती या पार्कमध्ये आहेत. ग्रंथवाचक करणारा, वीणावादन, तबलावादन, बासरिइ वादन करणारा गणेश इथे भेटतो. एका मूर्तीमध्ये मूषक लॅपटॉप वापरतो आहे, तर एका मूर्तीमध्ये तो नागापुढे पुंगी वाजवत आहे. देशोदेशीच्या अशा गणेशमूर्ती पाहून आपण गणेशाच्या ॐकार स्वरुपात दंग होऊन जातो आणि सर्वांना सुख लाभावे अशीच प्रार्थना करतो.

मंगलमूर्ती मोरया|
गणपतीबाप्पा मोरया

गणपती संतवाङमय व शास्त्रपुराणांबाहेर पडून लोकसंस्कृतीतही अनेक ठिकाणी आला आहे. तमाशातला प्रारंभीचा गण गणेशस्तवनाचा असतो. यात गणपती ऋद्धीसिद्धींसह नाचत येतो.

पठ्ठे बापूराव आपल्या कवनात म्हणतात -

तुम्ही गौरीच्या नंदना ।
विघ्न कंदना ।
या नाचत रमणी । जी जी जी ||

कोकणातील गणपतीच्या नाचाची गाणी प्रसिद्ध आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील बाल्यांचा गणपतीचा नाच दमदार व लक्षवेधी असतो. बाल्यांचे गणपतीचे एक गाणे असे -

यावे नाचत गौरीबाळा ।
हाती घेऊनी पुष्पांच्या माळा ।
सर्वे ठायी वंदितो तुला |
यावे नाचत गौरीबाळा।

लोकगीतामध्येही गणपतीचे वर्णन येते. कार्तिकेय-गणपती भावांचा झगडा, शंकरपार्वतीचे बालकौतुक असे अनेक विषय यात आहेत. एका लोकगीतातले वर्णन असे -

हिथं बस तिथं बस, गणू माज्या बाळा ।।
आमी जातो आमी जातो, सोनारू साळा ।।
सोनारीन बाई ग सोनारू दादा ।।
बाळाचं पैजण झालं का न्हाई ?
फिरून येजा फिरून येजा गवराबाई गवराबाई ।।
हिथं बस तिथं बस, गणू माज्या बाळा ।।

गवराबाईने म्हणजे गणपतीच्या आईने (गौरीने) गणेशबाळासाठी सोनाराकडे पैंजण करायला टाकले आहेत आणि सोनाराने ते अजून दिले नाहीत असे वर्णन या गाण्यात आहे.


गणपतीचे रूपभेद

भारतात व बाहेर गणपतीच्या रूपात अनेक फरक दिसतो. रूपभेदानुसार ध्यान व पूजाविधी बदलतो. गुप्तयुगातील गणेशमूर्ती अष्ट ते दशभूज आहेत. तंत्रमार्गी ग्रंथ तंत्रसारात, काश्मीरात, नेपाळमध्ये व अफगाणिस्तानमध्ये आढळणार्‍या मूर्तींमध्ये गणपतीचे वाहन सिंह दाखवले आहे. येथील गणपती नेहमीप्रमाणेच प्रसन्न रूपात आहे. पण प्राणतोषिनी तंत्र - या तांत्रिक ग्रंथात उल्लेखित चौरगणेश साधनाचे फळ चोरतो असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे विघ्नगणेश विघ्न घडवितो व लक्ष्मीगणेश लक्ष्मीस आलिंगन देउन असतो असा उल्लेख आहे.


* महागणपती – महागणपती हे गणपतीचे एक तंत्रमार्गी रूप आहे. यात गणपतीसोबत शक्ती विराजमान असते व एकमेकांस उपस्थ स्पर्श केलेला असतो.

* हेरंब-गणपतीहेरंब-गणपती तंत्रसार ग्रंथात उल्लेखित आहे. हे रूप पंचानन (पाच तोंडी) असते. त्यातील मधले एक मुख ऊर्ध्वदिशी (आकाशाकडे तोंड केलेले) असते. अभयवर, मोदक, निजदन्त, मुण्डमाला, अंकुश व त्रिशूल असतो. हेरम्ब म्हणजे दीन पालक होय. वाहन सिंह. नेपाळमध्ये हेरम्ब-गणपतीचे वाहन उंदिरही असते.

* नृत्यगणेश – नृत्यगणेश आठहाताचा व नृत्यरत असतो. हाती शस्त्र नसते. मुद्रा नाचाची असते.

* विनायक गणेश – विनायक गणेशाचा उल्लेख अग्निपुराण ग्रंथात आहे. याची पाच भिन्न रूपे आहेत - चिंतामणी विनायक, कपर्दी विनायक, आशा विनायक, गजविनायक व सिद्धिविनायक. याज्ञवल्क्य स्मृतीनुसार विनायक एकच असून तो अम्बिकापुत्र आहे.

* बौद्ध गणेश – बौद्ध गणेशाचा उल्लेख बौद्ध साधनमाला-ग्रंथात मिळतो. तो द्बादशभूज (बारहाती) आहे. त्याचे कपाळ रक्तपूर्ण असून हाती मांस असते.

इसवीसनाच्या पहिल्या शतकात बनलेली व श्रीलंकेतील मिहिनटाल येथे मिळालेली मूर्ती आतापर्यंतची प्राचीनतम गणेशमूर्ती आहे. उत्तर प्रदेशच्या फरूखाबाद जिल्ह्यात चौथ्या शतकात निर्मिलेली द्बिभूज दगडी गणेशमूर्ती पाहायला मिळते. इसवीसनाच्या पाचव्या शतकात निर्मिलेली मध्यप्रदेशातील उदयगिरी येथे मोदक खाणा-या गणपतीची मूर्ती मिळालेली आहे. सर्वसाधारणपणे तीन प्रकारच्या गणेशमूर्ती पाहायला मिळतात - आसनस्थ, नृत्यरत व उभ्या. यात बसलेल्या मूर्तींची संख्या सर्वाधिक आहे. जबलपूर येथे हतीमुख असलेल्या देवीची मूर्ती मिळाली आहे. तंत्रमार्गात उल्लेखित गणेशपत्नी - गणेशाणी हीच असावी असा अंदाज आहे.

गणेश चतुर्थी
भाद्रपद व माघ महिन्याची शुक्ल चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणतात. हिंदूश्रद्धेनुसार हा गणपतीचा जन्म दिन होय. गणेश चतुर्थीची प्रचलित कथा येणेप्रमाणे आहे - एकदा गणपती चतुर्थीचे स्वतःचे आवडीचे मोदक खाऊन उंदराच्या पाठीवरून जात होता. वाटेत साप पाहिल्याने उंदिर भयाने कापू लागला. यामुळे गणपती उंदराच्या पाठीवरून खाली पडला व त्याचे पोट फाटून मोदक बाहेर पडले. गणपतीने ते सारे मोदक पुनः पोटात टाकले व पोटावर साप बांधला. हे दृश्य पाहून आकाशातील चंद्र हसू लागला. यावर गणपतीने संतापून चंद्राला शाप दिला की, ''तुझे चतुर्थीस कोणी दर्शन करणार नाही.''

गणपतीचे अवतार
उपपुराण मानल्या जाणा-या व गाणपत्य संप्रदायाचे मुख्य ग्रंथ असलेल्या गणेश पुराण व मुद्गल पुराण- ह्या दोन ग्रंथात गणपतीच्या अनुक्रमे चार व आठ अवतारांचा उल्लेख आहे.

गणेश पुराण – गणेश पुराणात- उल्लेखित गणपतीचे चार अवतार सत्य, त्रेता, द्बापर व कलीयुगात अवतीर्ण झाले. हे होते -

महोत्कट विनायक – हा दशभूजाधारी व रक्तवर्णी अवतार. वाहन सिंह. कश्यप व अदिती यांच्या सन्तान म्हणून जन्मग्रहण केले व त्या कारणाने काश्यपेय नावाने प्रसिद्ध झाला. या अवतारात त्याने नरान्तक आणि देवान्तक नावाच्या दोन असूर भावांचा व धूम्राक्ष नावाच्या दैत्याचा वध केला.
मयूरेश्वर – हा षडभूज व श्वेतवर्णी अवतार आहे. वाहन मोर. त्रेता युगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून जन्मला. या अवतारात सिंधू नामक दैत्याच्या वध केला. अवतारसमाप्तीच्या वेळेस मोर भाऊ कार्तिकेय यास दान केला. मोरगाव येथे मोरेश्वराचे मंदिर आहे.

गजानन – हा चतुर्भुज व रक्तवर्णी अवतार. वाहन उंदिर. द्वापार युगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून जन्मला. या अवतारात सिंदूर नामक दैत्याच्या वध केला. अवतारसमाप्तीच्या वेळेस राजा वरेण्य यास गणेश गीता सांगितली.

धूम्रकेतु
– द्बिभूज अथवा चतुर्भूज व धूम्रवर्णी अवतार. वाहन निळा घोडा. हा अवतार कलीयुगाच्या शेवटी अवतीर्ण होईल व अनेक दैत्यांचा नाश करेल असे सांगितले जाते. विष्णूच्या कल्की अवतारावरून कल्पित.

मुद्गल पुराण – मुद्गल पुराणात - गणपतीच्या आठ अवतारांचे वर्णन सापडते. दुर्गुणांवरील विजय असा त्याचा भावार्थ आहे. हे अवतार खालील प्रमाणे -
वक्रतुण्ड – प्रथम अवतार. वाहन सिंह. मात्सर्यासुराचा (अर्थात मत्सराचा) वध केला.
एकदन्त – आत्मा व परमब्रह्माचे प्रतीक. मूषकवाहन. अवताराचा उद्देश्य मदासुराचा (अर्थात, मद/मी-पण) वध।
महोदर – वक्रतुण्ड व एकदंताचे सम्मिलित रूप. बह्माच्या प्रज्ञेचे प्रतीक। मोहासुर (अर्थ मोह) याचा वध केला. हा अवतारही मूषकवाहन आहे.
गजवक्त्र वा गजानन – महोदर अवताराचे अन्यरूप. लोभासुर (लोभ) याचा वध केला.
लम्बोदर – ब्रह्माच्या शक्तीचे प्रतीक. वाहन मूषक. क्रोधासुराचा वध केला.
विकट – सूर्याचे प्रतीक. कामासुराचा वध केला. वाहन मयूर.
विघ्नराज – विष्णूचे प्रतीक. ममासुराचा (अहंकार) वध हा या अवतारचा उद्देश्य.
धूम्रवर्ण – शिवाचे प्रतीक. ब्रह्माच्या विनाश शक्तीचे प्रतीक. वाहन घोडा. अभिमानासुराचा नाश केला.



दरवर्षीप्रमाणे गौरीशंकर गणपती दहा दिवसासाठी विराजमान असतील. हा पाहुणा सर्वांच्या घरात वेगेवेगळ्या रूपात येतो. एखाद्या मूर्तीच्या हातात लाडू तर दुसरीने पगडी परिधान केलेली असते. काही मूर्ती उंदरावर बसलेल्या तर काही आरामात मांडी घालून बसलेल्या असतात. गणपती बाप्पाच्या येण्याने लहान-थोरांचा उत्साह द्विगुणित झालेला असतो. अनेक नावे धारण केलेल्या गणपतीची पूजा प्रत्येक शुभकार्याच्या अगोदर केली जाते. हे असे आराध्यदैवत आहे की त्याच्याशिवाय कोणत्याही कार्याचा प्रारंभ होऊ शकत नाही.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे गणेशाचे पिता असलेल्या शिवशंकराचे सोळा सोमवारचे व्रत गणपतीची स्थापना झाल्यावरच संपन्न होते. एवढेच नाही तर कलियुगातील श्री सत्यनारायण व्रत कथा महापूजेच्या सुरवातीला विनायकाची पूजा केली जाते. गणपतीचा सर्वांत महत्त्वाचा गुण म्हणजे तो विघ्न विनाशक आहे. आजचे जग सौंदर्याच्या मागे धावणारे आहे. गणपती त्यात कुठेही बसणारा नाही. हत्तीचे तोंड घेऊन उंदरावर जाणारा तुंदीलतनू तरीही आपला वाटतो. त्यात एक नैसर्गिक सौंदर्य आहे. अशी ही मंगलमूर्ती विघ्नविनाशक आहे. त्याचे तोंड वाकडे असल्यामुळे तो वक्रतुंड आहे. पोट मोठे असल्यामुळे लंबोदर आहे. एक दात असल्यामुळे तो एकदंत आहे.

गणेशाचे येणे शुभ मानले जाते. या दिवसातील वातावरण उत्साहाचे असते. सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती केली जाते. सर्व देवता फूलांनी प्रसन्न होतात तेथे गजानन दुर्वा आणि केवड्याने प्रसन्न होतात. त्यांचे आवडते खाद्य म्हणजे मोदक आणि लाडू आहेत. चतुर्थीच्या दिवशी उपवास करणार्‍या भक्तांनी चंद्रदर्शन केल्याशिवाय उपवास सोडणे वर्ज्य मानले जाते.

चतुर्थीचे एकवीस निरंकार व्रत ठेवल्यास एकवीस मोदक तयार केले जातात. त्यापैकी वीस गोड आणि एक खारट असतो. दिवसभर उपावास केल्यावर संध्याकाळी हे मोदक खाऊन उपवास सोडला जातो. मोदक खाता खाता जेव्हा मिठाचा मोदक खाल्ला जाईल तेव्हाच पाणी पिऊन उरलेले मोदक तसेच सोडून द्यावे लागतात. कधी कधी पहिलाच मोदक मिठाचा लागू शकतो. अशा प्रकारे या ओंकार स्वरूपाचे कठीण व्रत आहे.

खरोखरच अशा विलोभनीय विनायकाचे दहा दिवसानंतर विसर्जन होताना मन उदास होते. आजही गणपती काही कुटूंबात गणपती विसर्जनाच्या वेळी गणपतीबरोबर गुळ-तांदूळ आणि दुध-पोह्यांची शिदोरी देण्याची परंपरा आहे. कारण ते आपल्यापासून कितीही दिवस दूर राहीले तरी उपाशी राहू नयेत हा उद्देश असतो. विसर्जनानंतर वाटल्या डाळीचा प्रसाद वाटण्याची प्रथा सुद्धा आहे. 'गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या' या वचनाप्रमाणे ते पुन्हा एकदा आपल्यात वाजत गाजत आले आहेत. आपण त्यांची मनोभावाने पू्जा करा आणि त्याला अधिकाधिक समजून घेण्याचा प्रयत्न करा.


श्री कसबा गणपती
कसबा हे पुण्याचे ग्रामदैवत. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळाएवढी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली आहे, असे मानतात. शहाजी राजे यांनी १६३६ मध्ये लालमहाल बांधला. त्यावेळी जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचे दर्शन घेऊन जात असत. गणेशोत्सवात श्रींची चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढली जाते. या गणपतीपासून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो.

श्री तांबडी जोगेश्वरी गणपती
श्री तांबडी जागेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता आहे. हा मानाचा दुसरा गणपती आहे. येथील गणेशोत्सवाला १८९३ पासून प्रारंभ झाला. या गणपतीच्या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन केले जाते. त्यानंतर नवीन मूतीर्ची स्थापना करण्यात येते. विसर्जन मिरवणुकीत श्रींची मूर्ती चांदीच्या पालखीमध्ये असते.


गुरुजी तालीम मंडळाचा गणपती

गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा मानाचा तिसरा गणपती आहे. प्रारंभी हा गणपती तालमीमध्ये बसवला जात असे. सध्या तालीम अस्तित्वात नाही. लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा हा गणपती आहे. विसर्जन मिरवणुकीत पहिल्यांदा या मंडळाकडून गुलालाची उधळण केली जाते.


श्री तुळशीबाग गणपती

श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती हा उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. या मंडळाच्या श्रींची मूर्ती फायबरची आहे. ज्येष्ठ मूर्तीकार डी. एस. खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करतात.


केसरी गणपती
केसरी संस्थेचा गणपती १८९४ पासून बसू लागला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. लोकमान्य टिळकांची व्याख्याने तेथे होत असत. या गणपतीची पालखीतून मिरवणूक निघते. १९९८ मध्ये श्रींची मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली आहे.


पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक पुणे शहरात अनंतचतुर्दशीच्या दिवशी काढण्यात येते. यात पुणे शहर व आसपासच्या भागातील सार्वजनिक गणपती मंडळे भाग घेतात. प्रत्येक मंडळाचे सदस्य आपआपल्या गणपतीची पूजनमूर्ती व उत्सवमूर्ती घेऊन विवक्षित ठिकाणापासून ठरवलेल्या मार्गाने चालत (किंवा हळू चालणार्‍या वाहनातून) मुठा नदीच्या तीरावर येतात व पूजनमूर्तीचे विसर्जन करुन उत्सवमूर्ती घेऊन परत जातात.

अनंतचतुर्दशीच्या दिवशी सकाळी सुरू होणारी ही मिरवणूक जवळपास ३० तास चालू असते व दुसर्‍या दिवशी मध्याह्नापर्यंत चालते. ही मिरवणूक पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचा परमोच्च बिंदू समजली जाते.