पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका आहे. पुण्याच्या उत्तर भागात असलेल्या खेड तालुक्याचे मुख्य गाव म्हणजे राजगुरूनगर. क्रांतिकारक राजगुरू यांचा जन्म येथे झाल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ खेडचे नाव बदलून राजगुरूनगर असे ठेवण्यात आले.

राजगुरूनगर हे तालुक्याचे गाव असून ते पुणे-नाशिक या महामार्गावार वसलेले आहे. भिमा नदीच्या उत्तर तीरावर वसलेले राजगुरूनगर आजूबाजूच्या महत्वाच्या गावांशी गाडीमार्गाने उत्तमपैकी जोडले गेले आहे.

शिवकालामध्ये मोगलांची सरहद भिमा नदीपर्यंत भिडलेली होती. भिमा नदीचा उगम सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील भिमाशंकर जवळ होतो. तेथून ती वहात राजगुरूनगर येथे येते. या भिमा नदीच्या खोर्‍यामध्ये एक दुर्गरत्न विसावलेले आहे. हे दुर्गरत्न म्हणजे किल्ले भंवरगिरी उर्फ भोरगिरी.

भोरगिरी नावानेच परिचित असलेल्या या किल्ल्याच्या पायथ्याला भोरगिरी नावाचे लहानसे गाव आहे. राजगुरूनगर पासून साधारण ५५ कि.मी. अंतरावर भोरगिरी आहे. भोरगिरीला जाण्यासाठी राजगुरूनगर वरून एस.टी. बसेसची सोय आहे.

राजगुरूनगर-भोरगिरी हे साधारण अंतराला दीड एक तास लागतो. या भिमानदीच्या खोर्‍यात चास-कमानचे धरण आहे. या धरणा जवळूनच भोरगिरीचा मार्ग जातो. या खोर्‍यात आपण जसे जसे आत जातो तसा तसा निसर्ग बदलत जातो. पावसाळ्यानंतरच्या कालावधीत खळाळणारे ओढे आणि धबधबे म्हणजे नेत्रसुखाला पर्वणीच असते.




भोरगिरी गावात पायउतार झाल्यावर प्रथम परतीच्या बसची चौकशी करून घ्यावी. भोरगिरी किल्ला समुद्र सपाटीपासून ६८६ मी. उंच असला तरी पायथ्यापासून जेमतेम दिडशे मी. उंच आहे. गावातून अर्ध्या तासात आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचतो. डोंगर डावीकडे ठेवून वळसा मारून गडाची वाट जाते. या वाटेने गडावर जाता येते.

गडावर गडपणाचे अवशेष तुरळक आहेत. गडाच्या दक्षिण अंगाला लेणी कोरलेली आहेत. गडाच्या माथ्यावर पाण्याची टाकी आहेत. मात्र येथून खाली असलेल्या कोरीव गुहेकडे उतरण्यास वाट नाही. माथ्यावरून थोडे खाली उतरून आडवे चालत आल्यावर या कोरीव गुहेपाशी पोहोचता येते. गडाचा आकार लहान असल्याने गडफेरीला तासाभराचा अवधी पुरेसा आहे.

आल्यावाटेने उतरून भोरगिरी गावाजवळ असलेले भिमेचे पात्र गाठावे. या काठावर कोटीश्वराचे मंदिर आहे. मंदिर प्राचीन असल्याचे तेथील अवशेषांवरून दिसते. हा परिसर अतिशय रम्य आहे. येथून राजगुरूनगरला परतता येईल. अथवा दोन तास चालत गेल्यास भिमाशंकरचे मंदिरही पहाता येईल. भिमाशंकर वरूनही घोडेगाव मंचर मार्गे पुन्हा राजगुरूनगरला येता येते.

हर्णे बंदर प्राचिन काळापासून प्रसिध्द आहे. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासीक महत्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनार्‍यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवागड हे होय.

हर्णे बंदर दापोली तालुक्यामधे असून तो रत्नागिरी जिल्ह्यामधे आहे. कोकणामधील महाड, मंडणगड आणि खेड कडून गाडीमार्गाने दापोलीला पोहोचता येते. दापोलीपासून सोळा कि.मी. अंतरावर हर्णे आहे. हर्णेच्या सागरातील सुवर्णदुर्ग किल्ल्याबरोबर किनार्‍यावरील या तिन्ही किल्ल्यांनाही भेट देता येते.

हर्णेच्या किनार्‍यावर दक्षिणेकडे टेकडीवजा एक भुशिर घुसलेले आहे. या लहानश्या टेकडीवजा भुशिरावर कनकदुर्गचा किल्ला उभा आहे. कनकदुर्गाच्या पुर्व बाजुला मच्छिमारांच्या असंख्य नौका दिसतात. या नौकांमधे जाण्यासाठी कनकदुर्गाला लागुनच धक्का बांधलेला आहे. या धक्क्यावर जाण्यासाठी पुलासारखा रस्ता केलेला आहे. या रस्त्यावर चालत गेल्यावर कनकदुर्गाच्यावर जाण्यासाठी केलेल्या पायर्‍यांचा मार्ग आहे. या पायर्‍यांच्या बाजुलाच भक्कम बांधणीचा बुरुज आहे. काळ्या पाषाणातील हा बुरुज म्हणजे कनकदुर्ग... हा पुर्वी किल्ला होता याचा साक्षीदार आहे. पायर्‍यांच्या मार्गाने आपण पाचच मिनिटांमधे कनकदुर्गावर पोहोचतो. गडाच्य माथ्यावरच्या इमारती आता नष्ट झाल्याअसून त्याभागात दिपगृह उभे असलेले दिसते. कनकदुर्गावरुन मुरुड दाभोळ तसेच गोपाळगडापर्यंतचा सागरकिनारा दिसतो. पश्चिमेकडे अथांग सागराची मधुन मधुन चमचमनारी किनार आणि सागराची गाज आपल्या मनाला धडकी भरवत रहाते. या पार्श्वभूमीवर दिमाखात उभा असलेला फुलपाखराच्या आकाराचा सुवर्णदुर्ग आपले लक्ष वेधून घेतो. उत्तरेकडै फत्तेदुर्गाची टेकडी मच्छिमारांच्या वस्तीने पुर्णपणे घेरलेली दिसते. कनकदुर्गावरील गडपणाचे अवशेष काळाच्या ओघात नष्ट झाल्यामुळे आपली गडफेरी १५ ते २० मिनिटांमधे आवरते.




कनकदुर्गाकडून परत फिरल्यावर डावीकडील टेकडी म्हणजे फत्तेदुर्ग असल्याची मनाची समजूत घालून पुढे निघावे लागते. मच्छिमारांच्या वस्तीने व्यापलेल्या फत्तेदुर्गावरचे अवशेष केव्हाच लुप्त झालेले आहे.

फत्तेदुर्गापासून फर्लांगभर गाडीरस्त्याने चालत आल्यावर समोर दिसतो तो तटबंदीने युक्त असलेला गोवागड. भक्कम तटबंदी आणि भक्कम दरवाजा असलेल्या या किल्ल्याचे नाव जरी गोवागड असले तरी गोव्याशी याचा काही संबंध नाही. रस्त्याच्या कडेलाच याचा दरवाजा दिसतो पण याचा मुख्यदरवाजा मात्र उत्तरेकडे तोंड करुन आहे. हे भव्य प्रवेशव्दार पहाण्यासाठी तटबंदीला वळून समोरुन आपल्याला जावे लागते. सागराच्या बाजुला थोडेसे उतरुन डावीकडे वळाल्यावर आतल्या बाजुला हे प्रवेशव्दार आहे. हे प्रवेशव्दार दगडाने चिणून बंद करण्यात आले आहे. प्रवेशव्दाराजवळ हनुमानाची मुर्ती आहे. तसेच येथे शरभ व महाराष्ट्रामधे किल्यांवर अभावानेच दिसणारे गंडभेरुडाचे शिल्प आहे. हे प्रवेशव्दार पाहून पुन्हा रस्त्यावर येवून नव्याने केलेल्या कमानीवजा दारातून गडामधे प्रवेश करावा लागतो. सध्या कोणा हॉटेल व्यवसायीकाने गडाचा ताबा घेतला आहे. त्याने दारावर चौकीही उभारली आहे. तेथील रखवालदाराची परवानगी घेवून किल्ल्यामधे जाता येते. गोवागड दक्षिणकडील भाग थोडय़ा चढाचा आहे. याचाच उपयोग करुन त्याला तटबंदी घालून बालेकिल्ला केलेला आहे. पश्चिमेकडील तटबंदी काहीशी ढासळलेली आहे. पश्चिमबाजुला सुवर्णदुर्गाचे दृष्य उत्तम दिसते. गडामधे पाण्याची विहीर आहे. तिचा वापर नसल्यामुळे पाणी वापरण्यायोग्य राहीले नाही. किल्ल्यात इंग्रजकालीन दोन इमारती पडलेल्या अवस्थमधे आहेत. त्यामधील एकात पुर्वी कलेक्टर राहात असे. गडामधे महत्त्वाचे असे बांधकाम फारसे शिल्लक नसल्यामुळे गड पहाण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो.

जर आपण संध्याकाळच्या वेळेस येथे असू तर कनकदुर्गच्या किनार्‍यावरील मासळी बाजार अवश्य पहाण्याजोगा आहे. अर्थात खवय्यासाठीतर ही सुवर्णसंधीच होय.