बेलाग सालोटा किल्ला
नाशिक जिल्ह्यातील सटाणे तालुक्यामध्ये असलेल्या साल्हेर किल्ल्याच्या शेजारीच सालोट्याचा किल्ला आहे. साल्हेर गडाचा सोबती आणि उपदुर्ग असलेला सालोटा किल्ला दुर्गम आणि बेलाग आहे. सालोटा किल्ल्याचा उल्लेख काही ठिकाणी सालुता असाही करतात.
साल्हेर किल्ल्याच्या भटकंती दरम्यान याही किल्ल्याला भेट देणे सोयीचे ठरते. सालोट्याला जाण्यासाठी सटाणे-तिळवण मार्गे महारजर या छोट्याशा वाडीजवळ पायउतार व्हावे लागते. अथवा सटाणे ताहराबाद-मुल्हेरमार्गे वाघांबे गाठून साल्हेर-सालोट्याच्या खिंडीमध्ये यावे लागते.

खिंडीतून पश्चिमेकडे साल्हेर गडावर जाणारा धोपटमार्ग आहे. सरळ उत्तरेकडे जाणारी वाट वाघांबे गावाकडे जाते. सालोटा किल्ल्यावर येणार्या पर्यटकांचे प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे किल्ल्याची वाट फारशी रुळलेली नसते. साल्हेर-सालोटा खिंडीमधून सालोटा किल्ल्याचा माथा डावीकडे ठेवून आपण पूर्वेकडे आडवे चालत निघतो. साधारण अर्धामाथा ओलांडल्यावर थांबून माथ्याचे निरीक्षण केल्यावर डावीकडे कातळामध्ये याचा दरवाजा दिसतो. दरवाजाच्या पुढे काही अंतरावरुन कातळात कोरलेल्या काही पायर्या दिसतात. याच मार्गाने आपल्याला गडावर चढायचे आहे. या पायर्यांच्या खालच्या भागातील पायर्या मातीने बुजतात तसेच तिथपर्यंत जाण्याचा मार्गही घसार्याचा असल्याने काळजीपूर्वक चढाई करावी लागते.
या पायर्यावरुन आपण कसरत करीतच कातळकड्यामध्ये पोहोचतो. आता कातळकडा उजवीकडे तर दरी डावीकडे राहते. समोरच दरवाजा दिसतो. बुलंदपणे उभा असलेला साल्हेर समोरुन खुणावत असतो. दारातून पुढे येवून आपण डावीकडे वळाल्यावर पुन्हा एक दरवाजा लागतो. या दरवाजाच्या आतल्या बाजूला माळा केलेला आहे. आपल्या घरातील माळ्यासारखा हा माळा आहे. दरवाजाला माळा असणे अशी रचना दुर्मिळच आहे. या माळ्यावर दोन चार लोकांना मुक्कामही करता येइल. येथून दहा पंधरा मिनिटांमध्ये गडाचा माथा गाठता येतो. सालोट्यावर पाणी मुबलक आहे. कातळात तसेच कपारीत पाणी आहे.
गडाच्या माथ्यावर घरांची जोती पहायला मिळतात. सालोट्यावरुन आजुबाजूचा मोठा परिसर पहायला मिळतो. गुजराथमधील डांगचा परिसरही दिसतो. डांगमधील पिंडवलचा किल्ला तसेच विलासन हिलवरील छत्रीही स्वच्छ वातावरणामध्ये पहायला मिळते. अर्थात साल्हेरचे रौद्ररुप मात्र मनाचा ठाव गाठते यात शंका नाही.