चिंतामणराव गुरु आणि पु. ल. शिष्य यांच्या कर्तुत्वात एक मजेदार सारखेपणा आहे. दोघांनाही साहित्य अकादमी आणि संगीत नाटक अकादमी या दोहोंचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. आणि तसे ते भारतात कोणालाही मिळालेले नाहीत !

लहानपणापासून पु.लं. च्या घरची आणि आजोळची वडीलधारी मंडळी त्यांची हौस पुरविण्यात उत्तेजन देत असत. संगीत आणि नाटक हे या मंडळींचे मुख्य छंद. लहानपणापासूनच पु. ल. पेटी वाजवायला शिकले. वयाच्या चौदाव्या वर्षी साक्षात् बालगंधवांसमोर पेटीवादन करुन त्यांनी त्यांची शाबासकी घेतली होती!

- श्री. ज्ञानेश्वर नाडकर्णी ('पु. ल. नावाचे गारुड')

------------------------------------------------------------------------------------------------------

१९६५ साली पु.ल. नांदेडच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. ती बातमी ऐकल्यावर अत्यानंदाच्या भरात श्री. श्रीराम मांडे यांनी 'पुलायन' ही दिर्घ कविता एकटाकी लिहून काढली. त्यात त्यांनी 'पुलकित' शब्द प्रथम वापरला आणि नंतर तो खूपच लोकप्रिय झाला.

पु. लं. ना ८० वर्षे पूर्ण झाली त्यावेळी आकाशवाणीवरच्या प्रसारित कार्यक्रमाचा जो भाग आहे; त्यातली वसंतराव देशपांड्यांच्या मुलाखतीच्या वेळची ती घटना! पु. ल. वसंतरावांची मुलाखत घेत होते. मी रेकॉर्डिंग करत होतो. मुलाखत बेफाम रंगली होती, ती वाढल्यास जादा टेप लावून मी तयार होतो. माणसे तल्लीन झाली होती आणि धाडकन पु. ल. बोलते झाले; 'बरं वसंतराव नमस्कार',नेमक्या अठ्ठाविसाव्या मिनिटाला पुलंनी मुलाखत संपवली होती. त्याबद्दल नंतर विचारणा करताच ते मला म्हणाले, 'राम अरे आपण रेडियोची माणसे. आपल्या रक्तातच टाईमसेन्स भिनलेला आहे.'

- श्री. श्रीराम मांडे, आकाशवाणी सहाय्यक, पुणे ('साहित्य सूची' जून २००१)

------------------------------------------------------------------------------------------------------

पु. ल. गेल्यावर आमचा कलकत्त्याचा समीक्षक मित्र शमिक बॅनर्जी पुण्यात आला होता त्याने ही आठवण सांगितली. पु. ल. दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचे पाच वर्षे मानद उपाध्यक्ष होते. एका बैठकीनंतरच्या भोजनोत्तर मैफलीत एक प्रसिद्ध नाटककार खूप सात्विक संतापले होते. त्यांना न विचारता त्यांच्या नाटकांचे कोणी अन्य भाषेत प्रयोग केले होते. त्यामुळे कॉपीराईटचा भंग होतो असा प्रकार होता. त्यांची अनेकांनी समजूत घातली पण त्यांचा राग धुमसत होताच. वाद वाढल्यावर पु. ल. तेथे असलेली हार्मोनियम काढून म्हणाले, मी आता तुम्हाला माझा प्रयोग करुन दाखवतो. त्याचा मात्र कॉपीराईट कोणाकडे नाही. कोणीही हा प्रयोग गावोगाव कोणत्याही भाषेत करावा, असे म्हणून पु. लं.नी हार्मोनियम वाजवणे सुरु केले. जरा रंग भरल्यावर ते आलाप आणि ताना घेऊ लागले. त्याला अर्थातच अभिनयाची जोड होती. पण एकही शब्द नव्हता. नंतर सर्वांच्या लक्षात येऊ लागले की आलापी आणि तानांमधून एक तरुण आपल्या प्रेयसीकडे प्रेमयाचना करतो आहे, तानांमधून ती तरुणी लाजते आहे. मग ताना मारीत त्यांचे प्रेम चालते. मग दोघांचे ताना आणि आलापीमधून लग्न होते. ताना मारीत बाळंतपण होते. मग भांडण... पुन्हा ताना... पुन्हा प्रेम जमते. ताना मारीत संसार फुलतो असा मामला पु. लं.नी एकही शब्द न उच्चारता केवळ ताना आणि आलापीमधून अर्धा तास जिवंत केला. समोरचे सगळे गडाबडा लोळायचे तेवढे राहिले होते. शमिक म्हणाला, 'कोणतीही तयारी, पूर्वसूचना नसताना हा माणूस इतका चोख परफॉर्मन्स देत असेल तर त्यांचे परफॉर्मन्स विषयीचे चिंतन किती परिपक्व असेल? ह्या माणसाभोवती महाराष्ट्राचे सांस्कृतिक जग केंद्रित का होते, ह्याचे जणू उत्तरच पु. लं.नी आम्हाला त्या अर्ध्या तासात दिले. '

- श्री. सतीश आळेकर ('पु. ल. नावाचे गारुड')

------------------------------------------------------------------------------------------------------

पु. लं. चा शेवटचा चित्रपट म्हणजे 'गुळाचा गणपती'! त्यात सर्व काही पुलंचे होते. कथा, पटकथा, संवाद, गीते, संगीत आणि दिग्दर्शन, एवढेच नव्हे तर नायकाची भूमिकासुद्धा! हा चित्रपट सर्वत्र चांगला गाजला. पण पुलंची कमाई काय? पुण्यात 'गुळाचा गणपती' प्रकाशित झाला तेव्हा तो चित्रपट पाहण्यासाठी पुलंना साधे आमंत्रण सुद्धा नव्हते. पुलं, सुनीताबाई आणि मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांनी तिकिटे काढून चित्रपटाचा पहिला खेळ पाहिला!

हिंदी-चिनी युद्धाच्या वेळी आघाडीवरला एक मराठी सैनिक कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होता. त्याच्या अंगावर पुरेसे लोकरी कपडे नव्हते. म्हणून बरोबर आणलेले काही दिवाळी अंक तो धगीसाठी जाळू लागला. जाळण्याआधी चाळता चाळता त्याला एका अंकात 'पु. ल. देशपांडे' हे नाव दिसले. लेखाचे नाव-'माझे खाद्यजीवन'! तो अंक आगीत टाकण्याआधी त्याने वाचायला घेतला. थंडीत एकूणच जिवाला तो वैतागला होता. पण पुलंचा हा लेख वाचल्यावर 'छे! छे! हे सारे खाण्यासाठी तरी मला जगलेच पाहिजे' असा त्याने आपल्या मनाशी निर्धार केला!

- श्री. जयवंत दळवी ('पु. ल. एक साठवण')

"रंग माझा वेगळा" ह्या सुरेश भटांच्या गाजलेल्या कवितासंग्रहाला पुलंचे प्रास्ताविक लाभले होते.
http://www.sureshbhat.in/node/19
--विश्वस्त

----------------------------------------------------

सुरेश भटांची कविता एके दिवशी मला अचानक भेटली. आणि नवकवितेच्या या जमान्यात नुसत्या निरनिराळया रंगांचेच नव्हे, तर निराळ्या अंतरंगाचे दर्शन घडले. त्या कवितेचा बाज आणि साज हा सर्वस्वी निराळा नव्हता. पण प्रसादगुणाशी फरकत घेतलेल्या आधुनिक कवितेच्या युगात या हृदयीचे त्या हृदयी घातल्यासारखी ही कविता एकदम मनात शिरली. मुंबईच्या जीवघेण्या उकाड्यात राहणाऱ्या माणसाच्या अंगावरून दैवयोगाने किंवा निर्सगाच्या एखाद्या चमत्कारामुळे दक्षिण वायूची शीतल झुळुक जावी, तशी ही कविता अंगावरून गेली. या कवितेतले फुललेपण मोहक होते. कळ उमटवून जाण्याची तिची ताकद ही मोठी होती. आणि त्या कवितेत सुगंधासारखे गाणे दडलेले होते. हे गाणे अंगभूत होते. कुणीतरी गायल्यामुळे त्या कवितेचे गाणे झाले नव्हते. कवितेला गाण्याची सक्ती नसावी. तशी तिला कसलीच सक्ती नसावी. किंबहुना, आजकाल कानावर जी गीते पडतात ती तर बळजबरीने सुरांच्या चरकातून पिळून काढल्यासारखी वाटतात. त्या गीतांना गात गात हिंडण्याची अंतरी ओढ नसते. ते शब्द सुरांसाठी तहानलेले नसतात. त्यांत सूर कोंदलेले नसतात. कोंबलेले असतात. गीतात सुरांतून उमटण्याचा अपरिहार्यपणा असावा लागतो. त्याउलट काही कविता अत्यंत समंजसपणाने गाण्यापासून आपण होऊन दूर राहिलेल्या असतात.त्यांचे व्यक्तिमत्त्वच असे असते की, सुरांचा त्यांना नुसता भार व्हावा. चांगली नवकविता अशी जाणूनबुजून गाण्यापासून दूर राहिली. तिच्या स्वभावातच गाणे नव्हते. तरीही ती कविता असते. गाणे आणि कविता यांचे अतूट नाते नाही. जसे प्रासनुप्रास किंवा यमक यांचे नाही तसेच. पण म्हणून गाणे होऊन प्रकटणार्‍या कवितेचे दिवस संपले असे मानू नये किंवा गाणे होऊन प्रगटल्यामुळे तिचा दर्जा दुय्यम झाला अशाही गैरसमजात राहू नये.

एक काळ असा होता, की कविता कानावाटेच मनात शिरायची, कवी कविता गाऊन दाखवीत. मुद्रणकला आली आणि कवितेचा छापील ठसा डोळ्यापुढे येऊ लागला. ती आता मूकपणाने डोळ्यावाटे मनात शिरू लागली. मनातल्यामनात कविता वाचायची पद्धत तशी अलीकडली. ठशातून कागदावर उमटणार्‍या अक्षरांमुळे तोडांतून उमटणा-या नादातून होणारा संस्कार नाहीसा झाला. एका परिमाणाची वजाबाकी झाली. हे उणेपण घालवण्याचा र. कृ. जोशी यांच्यासारख्या कवीने त्या अक्षरांना चित्ररूप देऊन प्रयत्न केला. गीतांनी सुरांतून उमटावे तसे त्यांच्या कवितांना त्यांनी चित्राक्षरातून उमटवण्याचा प्रयत्न केला. जोशी चित्रकार असल्यामुळे त्यांनी मोठ्या सहजतेने चित्ररूपातून कविता प्रगटवली. भटांची कविता गाता येते. ते काही गायनकलापारंगत गायक नाहीत. पण अंतःकरणात मात्र सुरांचा झरा आहे. एका अर्थी ते भारतीय संगीतकलेचा पध्दतशीर अभ्यास केलेले गायक नाहीत हे चांगले आहे. अजाणतेपणे काही सूर त्यांच्या मनात वसतीला उतरतात. फुलाला चित्रकलेचा डिप्लोमा असावा लागत नाही. ज्या मातीतून ते रूजून फुलते तिथेच ते रंग दडलेले असतात. भटांच्या मनोभूमीत निसर्गतःच सूर दडलेले आहेत. ज्यांची कविता अशीच गात गात फुटते असे माझ्या आवडीचे बा.भ.बोरकर हे कवी आहेत. हा पिंडाचा धर्म आहे. पु.शि.रेग्यांना भेटणारे शब्द जसे फुलपाखरांसारखे त्यांच्या अवतीभवती हिंडत असल्यासारखे वाटतात, तसे सुरेश भटांच्या भोवती सूर हिंडत असावेत. मनात फुलत जाण्या-या कवितेने या सुरांच्या गळ्यात गळा घालून केव्हा गायला सुरवात केली, हे सुरेश भटांनाही कळत नसावे. म्हणूनच त्यांच्या गीतांना चाली देणार्‍या संगीत दिग्दर्शकंच्या गुणवत्तेविषयी मला आदर असूनही सुरेश भट त्या गीताबरोबर जन्माला आलेल्या चालीत जेव्हा आपली कविता गाऊ लागतात त्यावेळी ते गीत आणि गाणे एक होऊन जाते. कुणीही कुणावर मात करण्यासाठी येत नाही. वरपांगी अत्यंत अस्ताव्यस्त दिसणारा हा कवी, त्यातही ती कविता आणि त्याचे ते गाणे हे तिन्ही घटक त्या कवितेच्या संपूर्ण आस्वादाला आवश्यक असावेत असे वाटायला लागते. हे एक विलक्षण अद्वैत आहे.

सुरेश भटांना गझलेचे फार मोठे आकर्षण आहे. कारण 'गझल' हे केवळ वृत्त नसून ती एक वृती आहे. एव्हढेच नव्हे; तर तिच्यात एक सूक्ष्म आणि सुंदर निवृतीही आहे. स्वार्थाच्या बाजारात धडपडण्याला आपण चुकीने प्रवृती मानीत आलो आहोत.क्षणभर निवृत्त मनाने जगाकडे पाहता आल्याशिवाय खरी या प्रवृत्तीची गोडी कळत नाही. जीवनात नुसतेच चार उंदीर उड्या मारीत धावत सुटणे म्हणजे प्रवृत्त जीवन जगणे नव्हे. निव्वळ जगण्यासाठी म्हणून करावी लागणारी धावपळ कुणाला सुटली आहे? पण काही क्षण त्या धावपळीचा अन्वयार्थ लावण्यासाठी काढावे लागतात. असा एखादा क्षण कवितेला जन्म देऊन जातो. त्यातूनच मग आजूबाजूच्या दगडधोंड्यांच्या पलीकडे दिसायला लागते. न कळत ते पहात राहण्याचा, शोधत राहण्याचा छंद जडतो. आणि मग आपले नाते निराळ्याच ठिकाणी जडते. बिलंदरपणाने जगणार्‍या माणसांत असा माणूस कलंदर ठरतो. ही कलंदरी सहजसाध्य नसते किंवा तिचे सोंगही आणून भागत नाही. ती अनुभूती जेव्हा कवितेतून उमटते, त्यावेळी तिचा अस्सलपणा आणि नकलपणा बरोबर ओळखता येतो.

सुरेश भट जेव्हा ' मागता न आले म्हणुनी राहीलो भिकारी' म्हणतात, त्यावेळी त्या न मागण्याच्या वृत्तीमुळे लाभलेली श्रीमंती त्यांना गवसली आहे हे उमजते. लाचारांचा आचारधर्म पाळला नाही म्हणून त्यांना दु:ख नाही, तर अपार आनंद आहे. आणि सुरेश भटांशी ज्यांचा परिचय आहे त्यांना त्यांच्या फाटक्या खिशाचा हेवा वाटावा अशी वस्तुस्थिती आहे. कवीचे काव्य आणि त्याचे खाजगी जीवन यांची सांगड घालायचा कुणी आग्रह धरू नये. माणूस चोवीस तास एकच भाववृत्ती घेऊन जगत नसतो. काव्यातल्या कलंदरीचा, सौंदर्याचा, चांगल्या आनंदाचा ध्यास प्रत्यक्ष जीवनात घेऊन जगणारा कवी भेटला की अधिक आनंद वाटतो एवढेच. निखळ साहित्य समीक्षेत 'सुरेश भटांची कविता' एवढाच चर्चेचा विषय असावा. माझ्या सुदैवाने मला सुरेश भटांचा स्नेह लाभला. त्यामुळे त्यांची कविता ऐकताना आणि वाचताना सुरेश भट नावचा एक मस्त माणूस मला निराळा काढता येत नाही, ही एक वैयक्तिक मर्यादा मानवी.

सुरेश भटांचा हा कलंदरपणा लोभसवाणा आहे. कारण कवितेइतकेच त्यांचे कविता ऐकणार्‍यांवर म्हणजे जीवनातल्या व्यवहारी धडपडीपलीकडे काही पाहू इच्छिणार्‍यांवर, ते जाणून घेण्याची तळमळ असणार्‍यांवर प्रेम आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी काव्य गायनाच्या कार्यक्रमातून ते ज्या तबियतीने विदग्ध समाजापुढे आपली कविता गातात, तितक्याच मस्तपणाने उमरावतीतल्या रिक्षेवाल्यांच्या अड्ड्यांवरही गातात. रसिकांच्या मळ्यांना पडणारी कुंपणेही त्यांच्या मनाला पटत नाहीत. तशी ही उर्दू शायरीची खास परंपरा आहे. गावात मुशायरा असला की, उर्दू शायरीच्या सर्व थरांतल्या शौकिनांची तिकडे झुंबड उडते. हा हा म्हणता गावातला तहसीलदार आणि टांगेवाला मैफिलीतले मानिंद होऊन बसतात.

सुरेश भटांच्या कवितेत पंडित-अपंडित दोघांना हलवण्याचे सामर्थ्य आहे. गझलेमध्ये नाट्याचा मोठा अंश असतो, तसे या गीतप्रकाराचे नाटकातल्या स्वगताशी फार जवळचे नाते आहे.एखादी अकल्पित कलाटणी श्रोत्यांना मजेदार धक्का देऊन जाते. गीतातल्या ओळींच्या डहाळ्यांना अनपेक्षित रीतीने मिळणारे झोके धुंदी आणत असतात. शब्दचमत्कृती असते. कल्पनांचे बेभान उड्डाण असते. सुरेश भटांच्या गझलांमधून उर्दू शायरीशी नाते जुळवणार्‍या अशा गोष्टी आढळतात. पण उर्दू शायरीत जी कित्येकदा शब्दांची आतषबाजी कवितेला गुदमरवून टाकते ते प्रकार त्यांच्या कवितेत होत नाही. उगीचच उर्दू-फारसी शब्दांची पेरणी करून आपल्या कवितेला गझलेच्या बाह्यांगाशी जुळवले नाही. आकर्षण वाढवायला त्यांनी उगाचच उर्दू भाषेचा सुरमा घालून आपली गझल नटवली नाही. अशा प्रकारे उर्दू शेरोशायरीची नक्कल करणारी गीते आणि शेर मराठीत लिहिले गेले आहेत. असल्या फारसी-उर्दू पोशाखाची सुरेश भटांना गरज वाटली नाही. कारण ज्या अनुभूतीतीने त्यांची कविता उमलते त्या अनुभूतीशी इमान ठेवणे त्यांनी महत्त्वाचे मानले. मानले म्हणण्यापेक्षा ती वृत्तीच त्यांच्या मनातून गझल उमटवीत आली. मराठीत माधव ज्युलियनांच्या नंतर लुप्त होत गेलेल्या या काव्यप्रकाराचा जीर्णोध्दार करावा, हा हेतू कधीही नव्हता. एक तर कुठलाही काव्यप्रकार रूढ करावा असा संकल्प सोडून कविता रचणार्‍या कवीविषयी मला चिंताच वाटत असते. मग तो वृत्तात लिहिणारा असो की मुक्तछंदात! कवितेने जन्माला येताना आपला छंद,वृत्त, जाती जे काही असेल ते घेऊन प्रगट व्हावे. इथे प्रश्न असतो तो मनात उत्कटत्वाने काय सलते आहे याचा! आत खळबळ कसली उडाली आहे हे महत्त्वाचे. सहजतेने उमटलेल्या शार्दुलविक्रीडिताला हट्टाने रचलेल्या मुक्तछंदापेक्षा जुनेपणाचा शेरा मारून खाली ढकलण्याचे कारण नाही. वाल्मिकीचा शोक मंदाक्रांतेतून न प्रकटता अनुष्टुभातून का प्रकटला याला कारण नाही. आणि कालिदासाच्या यक्षाचा विरह अनुष्टुभातून न प्रकटता मंदाक्रांतेतून आला म्हणून काही बिघडले नाही! कवीच्या अंतःकरणातून उमटलेल्या वेदनेची प्रत आपल्याला जाणवली कशी हे महत्त्वाचे! दुबळ्या हाती तलवार आली म्हणून त्याला शूर म्हणू नये, तसे समर्थहाती लेखणी आली म्हणून सामर्थ्य उणे मानू नये.

आपल्याला जे जाणवले ते अधिकाधिक लोकांना जाणवावे, ही भटांची ओढ मला मोलाची वाटते. त्यांची कविता दुर्बोधतेकडे झुकत नाही. ती कविता ज्या असंख्य हृदयात ओतावी त्या हृदयांची संख्या ते कुठल्याही अटींनी मर्यादित करीत नाहीत. ' साधीसुधी ही माणसे माझ्या कवित्वाची धनी' असे ते केवळ उपचार म्हणून म्हणत नाहीत. त्या साध्यासुधा माणसाशी साधायच्या संवादाचे मोल मोठे वाटते. एकच तुकारम किंवा एकच गालिब अनपढांपासून ते पंडितांपर्यंत सर्व थरांतल्या आणि सर्व दर्जांच्या बुध्दिमत्तेच्या आस्वादकांना नाना प्रकारांनी भेटत असतो.तो प्रकार कुठला असेना, पण त्यातले काहीतरी जाणवल्याशिवाय त्या कवितेशी संवादच सुरु होत नाही. कवितेतली दुर्बोधता सापेक्ष मानली तरी सुबोधता हा दुर्गुण मानायला नको. वनस्पतिशास्त्रज्ञाला चारचौघांपेक्षा फूल अधिक कळत असेल, पण त्याचे रंग आणि गंध प्रथम सामान्य माणसासारखे त्याला आकर्षित करत नाहीत असे थोडेच आहे?

सुरेश भटांची कविता आजच्या नवकवितेच्या एका निराळ्या वातावरणातही आपले अंगभूत सौंदर्य घेऊन प्रगटली आहे. नाना प्रकारच्या भाववृत्तींचा इथे फुलोरा आहे. 'निराशेचा गाव आंदण आम्हासी' म्हणणा-या संतांची निराशाही त्यांच्या कवितेतून दिसते. अशा एका क्षणी तेही

'भोवताली हिंडती ही माणसे प्रेतांपरी।
काय ह्या गावातसुध्दा एकदा होती घरे?'

असा उदास करणारा प्रश्न विचारीत येतात. असा प्रश्न काय त्यांना एकट्यालाच पडतो? जगताना आपल्या संवेदना बोथट होऊ न देता जगणा-या सगळ्यांनाच आज पडणारा हा प्रश्न आहे. मुंबईसारख्या विराटपुरीत राहणा-या माणसाला भोवतालचे दैन्यदु:ख पाहण्याचे टाळत टाळत जगावे लागते. एखाद्या क्षणी स्वत:चे डोळे असून न पाहता आणि कान असून न ऐकता कंठावे लागणारे जिणे आठवले की, त्या हिंडणा-या प्रेतातले आपणही एक आहोत याची जाणीव होते. त्या प्रश्नाला लाभलेले काव्यरूप त्यालाही अधिक उत्कटतेने अस्वस्थ करून जाते. असले नाना प्रकारच्या भावनांचे तरंग उठवणे हेच कलेचे कार्य असते. ते तरंग आहार-निद्रा-भय-मैथुनाच्या पलीकडच्या जीवनाचे स्मरण देऊन जातात. चांगले साहित्य माणसाला अंतर्मुख करते. ज्या गलबल्यात आपल्याला जावे लागते त्यातून दूर पळून जाणा-या माणसाची सुटका नाही. त्यात पुरुषार्थही नाही. सुरेश भटांची वृत्ती पळून जाणा-यांतली नाही. जगताजगता क्षणभर त्रयस्थ होणा-याची आहे. जीवनाच्या नाटकात भूमिका करताकरता क्षणभर प्रेक्षक होणा-याची आहे. खेळताखेळता तो आपलाच खेळ पाहणा-याची आहे. कलावंताचे 'स्व'-तंत्रपण ते हेच! ही वृत्ती, ' गुंतुनी गुंत्यात सार्‍या, पाय माझा मोकळा' ह्या ओळीत भटांनी व्यक्त केली आहे. जीवनाच्या ह्या खेळाचा कुणी अर्थ काढू नये. तसा त्याला स्वत:चा असा अर्थ नाही. पण खेळाचा आनंद आहे. जिंकण्या-हारण्याचे सुखदु:ख आहे. कधी नाजूक बंधने आहेत. त्या बंधनात गुंतणे आहे. त्यातून सुटणे आहे. तुटणे आहे. हे सारे माणसाने निर्माण केले आहे. पण हा सारा खेळ आहे याची जाणीव ठेऊन जगणे ह्या लेकुरंच्या गोष्टी नव्हेत! सुरेश भटांची कविता वाचताना आनंद वाटतो तो या खेळात आपल्याला पडणारे प्रश्न त्यांच्या कवितेतून नेमके शब्दरूप लेवून प्रकटताना, अर्थात नित्य व्यवहारातल्या प्रश्नांपलीकडले प्रश्नही सगळ्यांनाच पडतात असे नाही. सुरेश भटांनी विचारलेला ' हे खरे ही ते खरे?' हा प्रश्न सनातन आहे. जीवनाच्या या विराट स्वरूपाकडे क्षणभर थबकून पाहण्याची बुध्दी होणा-यांना हा प्रश्न नेहमीच पडतो. सुरेश भटांसारख्या प्रतिभावंत कवीला हा प्रश्न पडलेला पाहून अशा लोकांना त्या कवीशी अधिक जवळीक साधल्याचा आनंद होतो. जीवनात गवसलेल्या आत्मसंतोषापेक्षा न गवसल्याच्या रुखरुखीतूनच काव्य जन्माला येते.
ही अलौकिक रुखरुखच काव्यनिर्मितीमागली मुख्य प्रेरणा असते. कुणी ती शब्दांच्या चिमटीत पकडू पाहतो, कुणी रंगरेषांतून धरू लागतो. हे वेड गतानुगतिकतेतून जाणा-याला कळत नाही. आणि कळत नाही म्हणून रुचत नाही मग :

'हालती पालीपरी ह्या जिभा
सारखी माझ्यावरी थुंकी उडे!'

हा अनुभव कलावंताला भोगावा लागतो. गडकर्‍यांनी जिला दीड वितीची दुनिया म्हटले आहे, तिच्यातच सगळ्यांना जगायचे आहे. पण त्या दुनियेतही कुणाच्या तरी डोळ्यातले चांदणे वेचण्याचे क्षण लाभलेले असतात. त्याच दुनियेत ' अमृतमय मी, अमृतमय तू, तनमन अमृत बनते ग' असा अनुभव लाभतो. सुरेश भटांच्या 'दिवंगताच्या गीता'तली ही ओळ मला फार महत्त्वाची वाटली. तसा तो आला नसता, नव्हे तो येत असतो याची जाणीव सुरेश भटांच्या काव्यातून उमटली नसती, तर त्यांच्या करुण गाण्याची रडगाणी झाली असती. त्यांची कविता ही एक कारुण्य जोपासण्याचा किंवा अश्रूंची आरास मांडण्याचा षौक झाला असता.

ही जाणीव आहे म्हणूनच सुरेश भट हे केवळ वैयक्तिक सुखदु:खाच्या अनुभूतींना फुंकर घालीत बसणारे कवी नाहीत. आजच्या समाजातले रगडणारे आणि रगडले जाणारे ह्या द्वंद्वाची त्यांना जाणीव आहे. 'तसू तसू दु:खे घेऊन जोजवीत बसणा-यांची आत्मवंचना ज्याची त्याला गाडणार आहे', यावर त्यांचा विश्वास आहे. त्यांचे गीत हे त्यांची वैयक्तिक दु:खे गात फुटावे असे त्यांना वाटत नाही. त्या गीतात 'दु:ख संतांचे भिनावे' अशी त्यांना ओढ आहे. असल्या व्यापक दु:खाची जाणीवच कवीला ख-या अर्थाने 'कवी' ही पदवी प्राप्त करून देत असते. समान दु:खांच्या अनुभूतीतून माणूस माणसाच्या अधिक जवळ येतो. त्यांनी
तुकारामाला उद्देशून-

'तुझे दु:ख तुझे नाही
तुझे दु:ख अमचे आहे!'


असे म्हटले आहे. सुरेश भटांची कविता वाचताना त्यातल्या दु:खाच्या अनुभूती आस्वादकालाही आपल्या वाटतात. संवाद सुरू होतो. इथेच भटांचे यश आहे. मराठी कवितेच्या प्रांतात भटांना असली आपुलकी आजही लाभली आहे. यापुढे हा आप्तवर्ग खूप वाढेल अशी प्रसादचिन्हे आहेत.
'हाय तरीही बाजारी माझी तोकडी पुण्याई नाही अजून तेवढी माझ्या शब्दांना कल्हई'
असे जेव्हा सुरेश भट म्हणतात तेव्हा त्यातला उपरोध लक्षात घ्यायला हवा. ही भटांची तक्रार मानू नये! पितळ उघडे पडण्याची भीती असणार्‍यांना कल्हईची गरज पडावी! इथला सुवर्णकण बावनकशी आहे!

'माझीया मस्तीत मी जाई पुढे
मात्र बाजारु कवाडे लावती !'

बाजारू कवाडे लावली तरी आज अनेक अंत:करणांची कवाडे सुरेश भटांच्या कवितांसाठी उघडली गेली आहेत. आणखीही उघडली जाणारच आहेत. दीड वीत छातीच्या माणसांनादेखील आपल्या छातीची रुंदी आणखी खूप वाढावी अशी ओढ नसते असे आपण का मानावे? तसा एखादा क्षण येऊन त्या चातकाने चोच वासली तर त्या चोचीत धार टाकण्याचे काम कवीलाच करावे लागेल, ह्याची जाणीवही भटांना आहे. म्हणूनच ते वैयक्तिक अहंकाराने नव्हे, तर जो 'अमृताचा वसा' त्यांनी हाती धरला आहे त्यामागच्या कर्तव्याच्या जबाबदारीने म्हणतात की, ' आज मी जे गीत गातो ते उद्या गातील सारे!' त्या उद्याची वाट न पाहता त्यांची गीते आजच लोक गाऊ लागले आहेत. काहीतरी मनात शिरल्याखेरीज कोण कशाला गाईल? आणि अशी कानातून किंवा डोळ्यांतून मनात शिरलेली गीते कधी व्यर्थ का असतात?

दुनियेतील बाजारू कवाडे नाहीशी करण्याचे सामर्थ्य आणि दु:खाचे देखणेपण पाहण्याची ताकद असल्या गाण्यातूनच मिळत असते!
- पु.ल.देशपांडे.

... प्रत्येक मुसलमान हा काही खोमेनीचा अनुयायी नाही. जाति-धर्मनिरपेक्ष अशी एकत्र येऊन करायची सामाजिक कामं कुठली? तिथे साऱ्यांचा सहयोग कसा लाभेल? टागोरांनी म्हटलंय, 'ऐक्य कर्मेरमध्ये- ऐक्य एकत्र येऊन करायच्या कार्यांत साध्य होतं.' ह्मा ऐक्यासाठी विधायक कामं कुठली, याचा विचार व्हायला हवा. 'बोल होतोस की नाही भारतीय!' असं दरडावून विचारलं तर मी देखील'नाही होत जा' म्हणेन! केवळ मतपेटीशी प्रायाराधन करणाऱ्यांना लोक गटागटांनीच जगायला हवे असतात. माणसांचे कळप केले की, हाकायला सोपे पडतात! समता वगैरे ते नेते बोलतात, पण समता ही फक्त बोलायला आणि ममता मात्र निवडणुकीतल्या गठ्ठा मतांवर, हे आता लोकांनाही कळायला लागलं आहे. मी अधूनमधून आपल्या देशाविषयीच्या हायर एज्युकेशन-साठी खेड्यांत जातो. तिथल्या लोकांशी गप्पागोष्टी करतो. ती माणसं ह्मा नेत्यांविषयी काय बोलतात ते जर नेत्यांनी ऐकलं तर ह्मा देशांतल्या वर्तमानपत्रांतल्या टीकेला मानपत्र मानावं, असं त्यांना म्हणावंसं वाटेल! रेडिओ, टी. व्ही. यासारखी समर्थ प्राचारमाध्यमं दुर्दैवानं सरकारच्या ताब्यात आहेत. अंधश्रद्धा, भडक, धर्मवेड्यांना दुखवायला सरकार तयार नाही. त्यामुळे वाटेल त्या भाकडकथांचा आमची आकाशवाणी आणि दूरदर्शन यथेच्छ प्रसार करीत असते! समाजाला पथ्यकर असलेलं अप्रिय सत्य सांगायची आमच्या सरकारी प्रचारमाध्यमांची ताकद नाही. त्यामुळे आमचा रेडिओ सकाळी संपूर्ण अंधश्रद्ध आणि धार्मिक, दुपारी संततिनियमनाचा प्रसार करणारा समाजसुधारक आणि संध्याकाळी खोटे बाजारभाव सांगणारा लुच्चा व्यापारी! मी एकदा टॅमॅटोचा रेडिओवरचा भाव आमच्या भाजीवाल्या बंडोबांना सांगितला तर ते म्हणाले, 'मग साहेब त्या रेडिओवरच जा सस्ते टमाटे घ्यायला!' भारत लवकरच स्वयंपूर्ण होणार हे रेडिओवरुन ऐकतच असताना गॅलरीखाली पाहिलं की, आठ-आठ, नऊ-नऊ वर्षाची मुलं पाठीवर गोणपाट घेऊन कचरा चिवडून त्यातून कागदाचे कपटे गोळा करताना दिसत असतात! आमच्यावर जातिनिविष्ट परंपरांचा तर एवढा पगडा आहे की, लहान शतकरी, शेतमजूर, शाळामास्तर ह्मांनी गरीबच राहावं, अशी धर्माची आज्ञा आहे असंच आम्हांला वाटतं! खेड्यांतली कुटुंबच्या कुटुंबं शहरांत जगायला येऊन फूटपाथवर पसरलेली असतात, एका देशांतच नव्हे तर एका शहरात राहून सुद्धा आम्ही निरनिराळया उपग्रहांवर राहिल्यासारखे आपापले धार्मिक आणि जातीय पूर्वग्रह जोपासत राहतो.

वर्तमानकाळाकडे पाठ िफरवायची आणि स्वत:च्या प्राचीनतेचा दावा करीत देशावर आपला हक्क सांगत गायचा! आपली ही परंपरेची ओढ कुठल्या थराला जाईल हे सांगणं अवघड आहे. दिल्लीत गेल्याच वर्षी सतीच्या चालीचं पुनरुज्जीवन करायला लोक निघाले होते! ऐतिहासिक काळ हा फारच सुबत्तेचा होता आणि त्या काळी सगळयांची चरित्रं धुतल्या तांदळासारखी होती ह्मा भ्रमाची लागण तर भयंकर वाढत चाललेली आहे.


मला तर कित्येकदा भारतीय संस्कृती नेमकं कशाला म्हणावं तेच कळत नाही. एकीकडून रामभक्तीचे सुंदर उमाळे काढणारा तुळसीदास 'ढोरं, गॅंवार, शूद्र, पशु, नारी, ये सब ताडनके अधिकारी' म्हणतो, म्हणजे संत तुळशीदासांच्या मताने गुरं, खेडवळ माणसं, इतर पशू आणि स्त्रिया ह्मा फक्त चोप खाण्याच्याच लायकीच्या आहेत! बायकांना नवऱ्यांनी लाथाबुक्क्यांचा प्रसाद देण्याच्या बाबतीत आपल्या देशातल्या लक्षावधी खेड्यांत सर्वधर्मसमभाव आहे. खुद्द दिल्लीतही आपल्या बायकांना फारशा न्यायबुद्धीनं वागवतातच असं नाही. पुष्कळदा मला वाटतं की ह्मा देशात फक्त पुरुषाला स्वातंत्र्य मिळालं आहे. स्त्रिया पारतंत्रातच आहेत. अशा ह्मा आपल्या देशात भारतीयत्वाचा विचार रुजवायचा आहे. 'उपकार म्हणून तुम्हाला ह्मा देशात राहू देतो' ही वृत्ती जशी हिंदूंनी सोडायला हवी तशीच कालबाह्म झालेल्या आणि देशाला पोषक नसलेल्या रुढींच्या उच्चाटनाचं काम करायला मुसलमान आणि इतर धर्मीयांनीही आपल्यातील भारतीयत्वाला अग्रक्रम द्यायला हवा. हमीद दलवाईंच्या अनुभवांवरुन मुसलमानात हे विचारपरिवर्तनाचं कार्य किती अवघड आहे हे ध्यानात येतं. इतर धर्मांत आणि जातींत ते सोपं आहे असं नाही. वास्तविक माणसांत देवाला पाहणाऱ्या भटजी, मुल्ला, शेख यांच्या संकुचितपपणाविरुद्ध पूर्वीपासून आमच्या भारतीय संतांनी झोड उठवलेली आहे. 'मुल्ला होकर बांग पुकारे वह क्या साहब बहिरा है?' असा सवाल कबीरानं केला आहे.

महाकवी गालिबनं तर देव फक्त मशिदीतच नसतो हे ठसवण्यासाठी शेखजींना म्हटलं आहे की 'शेखजी मला मशिदीत बसून पिऊ दे, वर्ना ऐसी जगह बताव जहॉं खुदा नही!' आमचे तुकोबा विचारतात, 'ऐसे कैसे रे सोवळे, शिवता होतसे ओवळे?' ह्मा सर्व मंडळींची देवावरची श्रद्धा कमी प्रतीची होती असं कोण म्हणेल? त्यांनी ते देवत्व माणसांत पाहिलं. कलेच्या खऱ्या उपासकाला आणि रसिकाला तर राष्ट्रीयतेचं कुंपण देखील संकुचित वाटतं. मग धार्मिक कुंपणांची तर गोष्टच नको. म्हणूनच केशवसुतांनी 'ब्राह्मण नाही हिंदुही नाही, न मी एक पंथाचा तेच पतति की जे आखडती प्रदेश साकल्याचा खादाड असे माझी भूक चतकोराने मला न सुख, कूपातिल मी नच मंडूक मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे कोण मला वठणीवर आणू शकतप ते मी पाहे' असं विचारलं आहे. मुखमें रामनाम बगलमे छुरी, ह्मा तत्वाचं आचरण करणाऱ्यांविरुद्ध प्रत्येक काळांतले साहित्यिक, कवी आणि कलावंत उभे राहिलेले आहेत. मुस्लिम धर्मांधतेविरुद्ध प्रेममार्ग सांगणारे सुफी उभे राहिले, जातिभेदाचं पोषण करणाऱ्यांविरुद्ध रामी धोबिणीबरोबर संसार करणारा ब्राह्मण चंडिदास 'सर्वांहून श्रेष्ठ माणूस त्याहून श्रेष्ठ कोणीही नाही' असं सांगत उभा राहिला. यज्ञामुळे होणारी भरमसाठ पशुहत्या आपल्या देशातली शेती धोक्यात आणीत होती. त्याविरुद्ध गौतमबुद्ध प्रज्ञा आणि करुणेचा संदेश घेऊन उभे राहिले. बुद्धीला सतेज ठेवून प्रज्ञा आणि प्रत्यक्ष वृतीतून जी सिद्ध होते त्या करूणेचा मार्ग प्रमाण मानून ही एकात्मता साधायची आहे. रवीन्द्रनाथांनी त्याला 'मानुषेर धर्म माणसाचा धर्म' म्हटलं आहे ज्या रुढी आपल्यांत दूरत्व निर्माण करतात त्या दूर सारुन ह्मा प्रज्ञा आणि करुणेच्या मार्गानंच भारतीयांची एकात्मता साधली जाईल. 'नान्य: पंथा अथ:नाय विद्यते'- दुसरा कुठलाच मार्ग यासाठी नाही' समाजाच्या ऐहिक अभ्युदयासाठी ज्यांना तन देता येईल त्यांनी तन, धन देता येईल त्यांनी धन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांशी युक्त केल्यामुळे मुक्त झालेलं मन देण्याची ही एक ऐतिहासिक महत्वाची घडी आलेली आहे. 'हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणूनच मरणार नाही' असं म्हणून आंबेडकरांनी धर्माचं प्रवर्तन केलं. कुठल्याही धर्माचा किंवा प्रांताचा माझ्यावर शिक्का असला तरी मी भारतीय म्हणूनच जगेन, अशा विचारचक्र प्रवर्तनाचं हे कार्य आहे आणि ते होणं ही आजच्या काळातली भारताची सर्वांत मोठी गरज आहे....

(- ‘पुण्याच्या राष्ट्रीय एकात्मता परिषदेतील भाषण’)

स्थळ - पुणे शहरातील एक बस-स्टॉप
पात्रे - ‘खडूस’ ह्या शब्दाखेरीज दुसरा कुठला शब्द सुचु नये असे सत्तरीतले एक गृहस्थ.

मी त्यांच्या बाजूस जाऊन रांग लावतो. आश्चर्य म्हणजे रांग नाही. आम्ही दोघेच. काही वेळ ते गॄहस्थ आम्हाला खालपासून वरपर्यंत न्याहाळतात. आम्ही समोरच्या करंडे टेलर्सचे मि. करांडे एका लठ्ठ गॄहस्थाच्या पोटाचे माप घेत असल्याचे सुखद दृष्य पाहण्याचा बहाणा करतो. इतक्यात कानावर आवाज.

मी उपाख्य गाजी गणेश जोशी. दशभुजा गणपतीचे देऊळ कुठे आहे?
मी. काही कल्पना नाही बुवा.
गा.ग.जो. पुण्यातच राहता ना? (त्यावरून ते पुण्यात राहतात हे लक्षात आले.)
मी. हो.
गा.ग.जो. किती वर्षे?
मी. बरीच.
गा.ग.जो. व्यवसाय?
मी. पुस्तकं वगैरे लिहितो.
गा.ग.जो. म्हणजे साहित्यिक! आणि तरी तुम्हाला साधा दशभुजा गणपती ठाऊक नाही.
मी. आपण कुठल्या गावचे?
गा.ग.जो. मी कशाला कुठल्या गावाहून येतोय. इथच जगलो इथंच मरणार.
मी. (कधी? हा प्रश्न गाळून) इथेच मरणार कशावरून.
गा.ग.जो. दशभुजा गणपती ठौक नाही ते सरळ सांगा. माझ्या मरणाची कशाला काळजी करताय? मी मेल्यावर काही तुम्हाला खांद्याला बोलावणार नाही.
मी. खांद्याची आमंत्रणं मृतांच्या सहीनं कधी जाऊ लागली?
गा.ग.जो. हे पहा! तुम्ही साहित्यिक आसल्याने भाषाप्रभुत्त्व हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे असे मानू नका. मीही पुण्याचाच आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. पुण्यात राहून साहित्यिक म्हणवणाऱ्या माणसाला दशभुजा गणपतीचे मंदिर ठाऊक नाही ती तुमची समाजाविषयीची आस्था. उद्या शनवरवाडा कुठे असतो विचाराल. परवा पर्वतीचा पत्ता पुसाल.
मी. तुम्हाल तरी ठाऊक आहे का दशभुजा गणपती?
गा.ग.जो. हो आहे मग.
मी. मग कशाला विचारताय?
गा.ग.जो. तुम्हाला माहित आहे का नाही हे पडताळायला.
मी. पण माझा दशभुजा गणपतीशी काय संबंध?
गा.ग.जो. सांगतो. ‘पुणे शहरातील ढासळती धर्मव्यवस्था’ ह्या विषयावर लेखनमाला लिहितोय मी. इथं सकाळी सात पसून उभा अहे. बेचाळीस लोकांत फक्त एक दशभुजा गणपती ठाऊक असणारा निघाला. ते पण त्याचे दुकान आहे मंदिरासमोर म्हणून. आत कधी दर्शनाला गेला नाही म्हणे.
मी. म्हणजे दशभुजा गणपती पत्त्यापुरता.
गा.ग.जो. अहो हीच तर आपली ट्रॅजेडी. देव फक्त पुत्त्यापुरता. एकदा आम्ही विचारलं ‘डॉ. मंजुळाबाई सपाते प्रसूतिगृह ’ कुठी आहे? तर तो गृहस्थ म्हणाला, ‘सोमण मारुतिच्या देवळापुढे’. अरे काही सारासारविवेकबुद्धी? निदान प्रसूतिसाठी तरी मारुती वापरू नका.
मी. खरं आहे.
गा.ग.जो. साहित्यिक म्हणून देवळात जाणं तुम्ही आपलं कर्तव्य मानत नाही तर!
मी. (देवावर भार घालून) मानतो तर!
गा.ग.जो. मग जाता का?
मी. दशभुजाला नाही जात.
गा.ग.जो. आय एम नाट पर्टिक्युलर अबाऊट धिस गणपती ऍट ऑल. (रिटायर म्हातारा भडकला की पुण्याच्या इंग्रजीत फुटतो). एनी टेम्पल फॉर द्याट म्याटर. रोज जाता?
मी. (देवा क्षमा कर. खोटं बोलू नये ह्या गांधीवचनाला मी शाळेत कंपासपेटीत लपवलेलं. ती कंपासपेटी नववीच्या घटक चाचणीत हरवली.) हो म्हणजे रोज म्हणायला हरकत नाही.
गा.ग.जो. मला होय किंवा नाहीचा रकाना भरायचाय.
मी. हो! (फर्गिव मी ओह लॉर्ड! पण तसं हे खोटं नाही हा. रोज रात्री गुडकुले विठूबाच्या देवळात काणे भटजी, दाजीबा टेलर, सोपानराव न्हावी सॉरी हेयरड्रेसर... म्याट्रिक केलेला न्हावी ना म्हणून... आणि मी वरच्या नगारखान्यात रमी खेळतो. एक पैसा शंभर प्वाईंट. मागल्या आषाढी कार्तिकीला गल्ला जास्त जमला नाही म्हणून जिंकाणारा काणे भटजी प्वाईंट वाढवा म्हणाला. आम्ही ऎकत नाही.)
गा.ग.जो. सरळ हो सांगा ना.
मी. हो. आता धर्मावर श्रद्धा नाही ठेवायची ती काय म्युनिसिपाल्टी, जिल्हाबोर्डवाले अन महाराष्ट्र महामंडळ परिवहनाच्या एस.टीं.वर ठेवायची?
गा.ग.जो. वाक्याशेवटी प्रशन्चिन्ह नको. पूर्णविराम द्या हो.
मी. (मुकाट्याने) हो.
गा.ग.जो. आता सांगा धर्मावर तुमची श्रद्धा आहे?
मी. यथेच्छ आहे. धर्म नसता तर दसरा दिवाळी नारळी पौर्णिमा नसत्या, पुरणपोळी, लाडू नसते. इतकच काय सत्यनारायण नसता तर शेराला सव्वाशेर चाचपत तुपाचा शीरा खायला मिळाला नसता.
गा.ग.जो. तो शीरा नसतो. प्रसाद असतो.
मी. सत्यानारायणाला खारीक वाटता येणारा नाहीत. प्रसाद म्हणूनसुद्धा. माफ करा पण तुम्ही छुपे कम्युनिस्ट दिसता. (माझं आपलं काहितरीच)
गा.ग.जो. मी कम्युनिस्ट! दशभुजा गणपती तुम्हाला ठाऊक नसताना मी कम्युनिस्ट!
मी. असं तर मग सांगा झोपाळू नरसोबाचं देऊळ कुठे आहे सांगाल (२ कोटी देवात आज मी एक जन्मला)
गा.ग.जो. झोपाळू नरसोबा! प्रथमच ऎकतोय!
मी. जाऊ द्या मी नास्तिकांशी बोलत नसतो. सत्यनारायणाला खारका वाटायला निघालेत (माझाच
डाव उलटून). उद्या गोकुळाष्टमीला केक वाटाल.
गा.ग.जो. हे तुम्ही कुणाला सांगाताहात.
मी. तुमच्या शिवाय दुसरं कोण आहे इकडे? सॉरी, दुसरं कुणी नाही. पूर्णविराम.
गा.ग.जो. आपला कहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही कुठे राहता?
मी. (इथे खरी कसोटी आहे. डीटेलवार पत्ते सांगण्यात आपल्यासारखा हातखंडा कुणाचा नाही) तुम्हाल झोपाळू नरसोबा ठाऊक नाही. रेडेकर तालीम टाऊक असेल...
गा.ग.जो. ती कुठेशी आली?
मी. रविवारात. घाणेकरांच्या कोळशाच्या वखारीला लागून.
गा.ग.जो. काढीन शोधून. घाणेकर तालीम.
मी. घाणेकर तालीम नाही. वखार. त्यालालागून रेडेकर तालीम. रस्ते पाड्यावरनं खाली या सरळ (येथे हवा तसा अर्थ घ्यावा). त्यांना विचारा पापडवाले बेंद्रे कुठे राहतात ते. बेंद्रांच्या वाड्यावरनं गल्ली जाते. तिच्या टोकाला माशेलकर खाणावळ. तिथे वडे चांगले मिळतात. एका वड्याचे ६ पैशे. त्यांना विचारा संपतराव लॉंंड्री. ५ पैशे एका विजारीचे. पुणं भरपूर महाग झालंय हो.
गा.ग.जो. जरा सावकाश सांगा हो. मी लिहून घेतोय. आता कुठे कापडवाल्या बेंद्रांकडे आलोय.
मी. कापडवाल्या बेंद्रे नाही. पापडवाले बेंद्रे. तिथे सोवळ्यातले पापड मिळतात. ४ पैशे एक डझन. आमच्या सौ जास्त चांगले पापड बनवतात पण. बेंद्रांना विचारा माशेलकर खाणावळ व पुढे संपतराव लौंड्री. ते भोरफ्यांचा वाडा दाखवतील.
गा.ग.जो. अहो अहो जरा सावकाश सांगा. माझं लिहून झालं नाहीये.
मी. सावकाश कसं सांगू? बस आली म्हणजे.
गा.ग.जो. ती कशी येणार?
मी. म्हणजे?
गा.ग.जो. हा स्टॉप क्यान्सल झालाय.
मी. काय म्हणता.
गा.ग.जो. हो मग. पंधरा दिवासांपासून हा वनवे झालाय. म्हशींना ही ह्या बाजूने प्रवेश बंद मग बस कशी येईल.
मी. मग मघापसून का नाही सांगितलंत.
गा.ग.जो. अरे व्वा! मग तुम्ही थांबला असतात का? आणि काय हो साहित्यिक असून तुम्हाला गावातले वनवे माहित नाहीत? कमाल आहे! नाव काय तुमचं?
मी. (स्वतःचे नवे बारसे साजरे करत) गोविंद गोपाळ दहिभाते.
गा.ग.जो. आजच हे नाव ऎकतोय.
मी. मी पण! (गा.ग.जो. शुद्धीवर आहेत की बेशुद्ध पडले हे मागे ना पहाता मी सटकतो. काही भोग दैवावर टाकून सुटतच नाही हो.)

- पु.ल.देशपांडे

मी-एक नापास आजोबा
पु. ल. देशंपाडे

सध्या तुम्ही काय करता? या प्रश्राचं दोन नातवांशी खेळत असतो याच्या इतकं सत्याच्या जवळ जाणारं उत्तर माझ्यापाशी नाही. नातवंडांची तलफ कशी येते हे आजोबा-आजीच जाणतात. नातवंड हे म्हातारपणात लागणारं जबरदस्त व्यसन आहे. गुडघ्यांच्या संधिवातावर अचपळ नातवामागून धावणं हा रामबाण उपाय आहे. आणि एरवी खांदेदुखीमुळे वर न जाणारे हात नातवंडांना उंच उचलतांना जरासुद्दा तक्रार करीत नाहीत.

उत्तम बुध्धिमत्तेचा सगळयात चांगला प्रत्यय चांगल्या बालबुध्धितून कसा येतो हे दुसऱ्या बालपणाची पहिल्या बालपणाशी दोस्ति जमल्या शिवाय कळत नाही. माझ्या बुध्धिमत्तेविषयी बाळगोपाळांना शंका असण्याचा माझा अनुभव जुना आहे. कठिण प्रश्न भाईकाकांना न विचारता माईआत्तेला विचारायला हवेत हा निर्णय वीस-एक वर्षांपूर्वी दिनेश, शुभा वगैरे त्या काळात के. जी. वयात असलेल्या माझ्या बालमित्रांनी घेतला होता. माझ्या व्यक्तिमत्वातच, फक्त बाळगोपाळांना दिसणारा अज्ञानप्रादर्शक गुण असावा, नाही तर इतक्या अडिच वर्षांच्या चिन्मयालाही आमच्या घरातलं सर्वात वरिष्ठ अपील कोर्ट शोधायला माझ्या लिहिण्याच्या खोलीत न येता स्वयंपाक घराच्या दिशेनी जाणं आवश्यक आहे हे कसं उमगतं?

सध्या, म्हणजे काय? या प्रश्नाच्या माऱ्याला तोंड द्यावं लागत आहे. बरं, नुसत्या उत्तरानी भागत नाही, मला दाखव असा हुकूम सुटतो. "आकाश म्हंजे काय?" पासून ते "आंगन म्हंजे काय?" इथपर्यंत हा प्रश्न जमीन अस्मान आणि त्यातल्या अनेक सजीव-निर्जिव वस्तूंना लटकून येत असतो.

"आंगन म्हणजे काय?" या प्रश्नाने तर माझी विकेटच उडवली होती. सहकारी गृहनिर्माण संस्कृतीत 'आंगण' केंव्हाच गायब झालेलं आहे. घरापुढली म्युनिसिपालटीनी सक्तीने रस्त्यापासून बारापंधरा फूट सोडायला लावलेली जमिनीची रिकामी पट्टी म्हणजे आंगण नव्हे. तिथे पारिजात असावा लागतो. जमीन शेणाने सारवलेली असावी लागते, कुंपणाच्या एका कोपऱ्यांत डेरेदार आंब्याचा वृक्ष असावा लागतो, तुळशीवृंदावनही असावे लागते. रात्रीची जेवणे झाल्यावर एखाद्या आरामखुर्चीवर आजोबा आणि सारवलेल्या जमिनीवर किंवा फारतर दोन चटया टाकून त्यावर इतर कुटुंबीय मंडळींनी बसायचं असतं अशा अनेक घटकांची पूर्तता होते तेंव्हा त्या मोकळया जमिनीचं आंगण होतं. कुंपणावरच्या जाईजुईच्या सायंकालीन सुगंधांनी आमोद सुनास जाहल्याचा अमृतानुभव देणारं असं ते स्थान चिनूच्या "आंगन म्हणजे काय?" या प्रश्नाचं उत्तर देतांना तो अडीच वर्षांचा आहे हे विसरुन मी माझ्या बाळपणात शिरलो. माझ्या डोळयांपुढे आमच्या जोगेश्वरीतल्या घरापुढलं आंगण उभं राहिलं. त्याला त्यातलं किती कळत होतं मला ठऊक नाही. पण विलक्षण कुतूहलाने भरलेले दोन कमालीचे उत्सुक डोळे या आजोबाला काय झालं या भावनेने माझ्याकडे पाहाताहेत आणि माझी आंगणाची गोष्ट ऐकताहेत एवढंच मला आठवतं चिनूचं ते ऐकणं पाहण्याच्या लोभाने मी मनाला येतील त्या गोष्टी त्याला सांगत असतो. मात्र त्यात असंख्य भानगडी असतात. एखाद्या हत्तीच्या चित्रावरुन हत्तीची गोष्ट सांगून झाली की "ही आता वाघोबाची गोट्ट कल" अशी फर्माईश होते. एकेकाळी पौराणिक पटकथेत झकास लावणीची "स्युचेशन" टाकण्याची सुचना ऐकण्याचा पूर्वानुभव असल्यामुळे मी त्या हत्तीच्या कथेत वाघाची एन्ट्री घडवून आणतो. हत्तीच्या गोष्टीत वाघ चपलख बसल्याच्या आनंदात असतांना धाकटया बंधूंचा शिट्टी फुंकल्या सारखा आवाज येतो,

साहित्य, संगीत, नाटक इ. कला क्षेत्रांत रमत असताना, पुलंना आपल्या संस्कृतीची, जुन्याची ओढ होती, परंतु सनातनी गोष्टींची चीड होती. समाजाला उपकारक असे शोध, त्यामागची शास्त्रज्ञांची धडपड याचे त्यांना कौतुक वाटे. वैज्ञानिक उपक्रम राबवणाऱ्या संस्था, प्रयोशाळा, पुण्यातील 'आयुका' सारख्या संस्थांना सुद्धा 'पु. ल. देशपांडे फाऊंडेशन' तर्फे देणग्या दिल्या होत्या. पुलंचा एक कमी परिचित पैलू म्हणजे, समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन वाढावा, व विशेषत: मराठीतून विज्ञानाचा प्रसार व्हावा, याबद्दल त्यांना खूप आस्था होती.
'मराठी विज्ञान परिषदेने' १९७१ मध्ये प्रसिद्ध केलेल्या 'अस्मिता महाराष्ट्राची' या ग्रंथाला पुलंची प्रस्तावना होती! त्या प्रस्तावनेतील काही भाग....
... मी जीवनातील कोडी बुद्धीने आणि अभ्यासाने जाणून घेईन, ही जिद्द आणि मला ती जाणता येईल हा आत्मविश्वास म्हणजे वैज्ञानिक दृष्टी. माणसाला अज्ञात अशा असंख्य गोष्टी आहेत. परंतु त्या अज्ञाताचा भेद करुन ते मी ज्ञात करुन घेईन, ह्मा धडाडीने निसर्गाचे विराट स्वरुप जाणून घेणे हे वैज्ञानिकांचे कार्य आहे. आणि ते वैयक्तिक साक्षात्काराच्या समाधानात न राहता, त्या ज्ञानाभोवती कसलीही गूढ वलये किंवा बुवाबाजी न करता, ते ज्ञानसोपान स्वच्छपणे ग्रंथातून दाखवणारे हे जगाचे खरे उपकर्ते आहेत. वैयक्तिक मोक्षाकडून सामाजिक मोक्षाकडे नेणारे विज्ञान हे जपतप-अनुष्ठानापेक्षा अधिक तारक आहे. विठ्ठलाला अठ्ठावीस युगात हटवता न आलेला पंढरपुरातला कॉलरा विज्ञानाने हटवला... नव्या मोटारीपुढे नारळ फोडून तिची गुलाल लावून पूजा करणारे मोटार नावाची एक नवीन देवता निर्माण करतात. ते मनाने वैज्ञानिक झालेले नसतात. खंडाळ्याच्या घाटात एक शिंगरोबाचे देऊळ आहे. त्याला दहा पैसे ठेवून प्रवास निर्विघ्न कर असे म्हणणाऱ्यांना दहा पैशाच्या जकातीवर देव खूष होतो, हा देवाचा अपमान आहे असे वाटत नाही. त्या शिंगरोबाला दहा हजार रुपये दिले तरी पेट्रोलशिवाय मोटार चालणार नाही.. वैज्ञानिकांनी आता विज्ञान परिषद स्थापन केली आहे. खरे सांगायचे तर विज्ञानाच्या बाबतीत आमची पिढी ह्मा पोरांपुढे साक्षात अडाणी आहे... चंद्रावरच्या स्वारीचे माझे शिक्षण माझ्या कुटुंबातील बालगोपालांनी केले आहे. आणि हे सारे ज्ञान त्यांनी मराठी पुस्तकांतून आणि लेखांतून मिळवले आहे. मराठी परिभाषेला हसणारे लोक मराठी भाषेला मिळणाऱ्या ह्मा नव्या शक्तीकडे पाहतच नाहीत...

महाराष्ट्र टाईम्स १२ जुन २००८

शाळेतली मुलं जेव्हा ' आम्ही कुठली पुस्तकं वाचावी ?' असं मला विचारतात , तेव्हा मी त्यांना सांगतो , ' तुम्हांला जी वाचावीशी वाटतील , ती वाचा. ' काही मुलं थोडासा अपराध्यासारखा चेहरा करुन सांगतात , ' आम्हांला रहस्यकथा आवडतात ' मग मी म्हणतो , ' मग रहस्यकथा वाचा. ' माझ्या शाळकरी वयात मी डिटेक्टिव्ह रामाराव , भालेराव यांच्या गुप्त-पोलिशी चातुर्याच्या कादंबऱ्यांचा फडशा पाडत असे.

माझ्या आयुष्यात ' पुस्तक ' ही गरज व्हायला ह्मा करमणूक करणाऱ्या पुस्तकांनी खूप मदत केली. हळूहळू त्याहूनही अधिक चांगलं वाचायची ओढ लागते. ज्या घरात आणि समाजात आपण वाढत असतो , त्याचे आपल्या मनावर संस्कार होत असतात. त्यांतून आवडीनिवडी ठरायला लागतात.

शाळेत शिकताना एखादा विषय आपल्याला विशेष आवडायला लागतो. एखादा खेळ अधिक आवडतो. आपल्या आवडीचा जो विषय असेल , त्यावरचं पुस्तक आपल्याला वाचावंसं वाटतं. त्या विषयावर वाचलेलं अधिक लक्षातही राहतं. क्रिकेट आवडत असलं , तर दहा वर्षांपूर्वीचा एखादा टेस्ट- मॅचचा स्कोअर तपशीलवार आठवत असतो.

कुठल्या खेळाडूचा त्रिफळा उडाला , कोणी कोणाच्या गोलंदाजीला कुठं झेल घेतला , कोण धावचीत झाला- कोण पायचीत झाला , सगळं काही आठवत असतं. पण न आवडणाऱ्या भूमितीतलं प्रमेय पन्नास वेळा वाचूनही आठवत नाही. शेवटी हा आवडीनिवडीचा प्रश्न आहे पण केवळ वैयिक्तक आवडिनिवडीचा प्रश्न आहे , म्हणून सोडून देता येत नाही. वाचनाची आवड जोपासावी कशी , याचाही विचार करायला हवा.

पुस्तकाचं वाचन करायची कारणं अनेक असू शकतात. शाळा-कॉलेजात परीक्षेला नेमलेली पुस्तकं वाचायची सक्ती असते. म्हणून ती वाचावी लागतात. आणि सक्ती आली की तिटकारा आलाच. रोज आइसक्रिम किंवा भेळ खायची जर सक्ती झाली , तर आपल्याला अत्यंत आवडणाऱ्या ह्मा पदार्थांचासुद्धा तिटकारा येईल. त्यामुळं पुष्कळ विद्यार्थांच्या मनात पुस्तका- संबंधी खरा प्रश्न उभा राहतो , तो त्यांना सक्तीनं वाचायला लागणाऱ्या पा‌ठ्यपुस्तकांसंबंधी. कारण इथं पुस्तक आनंदासाठी वाचलं जात नाही ; नाही वाचलं तर नापास होऊ , ह्मा भीतीनं वाचलं जातं.

त्याला माझ्या मतानं एकच उपाय आहे ; तो म्हणजे ते पुस्तक ' पाठ्यपुस्तक आहे ' अशा दृष्टीनं कधी वाचू नये. पाठ्यपुस्तक ही त्या पुस्तकावर सोपवलेली एक निराळी कामगिरी आहे. चांगल्या ग्रंथकारांनी जे ग्रंथ लिहिले , ते मुलांना परिक्षेत मार्क मिळवून द्यायची सोय करावी म्हणून लिहिले नाहीत. समजा , तुमचं इतिहासाचं पुस्तक असलं , तर ते आपले वीरपुरुष कोण होते , परकीयांची आक्रमणं कां झाली ? ती आपण कशी परतवली कमी पडलो तर कां कमी पडलो ?- हे सारं सांगत आलेलं असतं.

ते वाचत असताना तुमच्या मनात प्रश्न उभे राहतील. त्याची उत्तरं शोधायला ते पुस्तक पुरेसं उपयोगी पडलं नाही तर तुम्ही दुसरं इतिहासाचं पुस्तक पहाल , गुरुजींना विचाराल. तुम्हांला इतिहासाचं ते पुस्तक परीक्षेसाठी लावलेलं पाठ्यपुस्तक न वाटता इतिहासाबद्दल तुमच्याशी बोलणाऱ्या मित्रासारखं वाटेल.

पुष्कळ वेळा मला मुलं असंही विचारतात , की आम्ही काही योजनापूर्वक वाचन करावं का ? ही योजना करणंदेखील पुष्कळसं तुमच्या आवडिनिवडीवर राहील. पण साधारणपणानं आपल्या आहारात ज्याप्रमाणं चांगल्या आरोग्यासाठी समतोल आहार घ्यावा असं सांगतात , तसाच पुस्तकांतून मनाला मिळणारा हा आहार समतोल असावा. नुसतीच करमणुकीची पुस्तकं वाचणं हे नुसत्याच शेवचिवड्यावर राहण्यासारखं आहे.

पुस्तकांनासुद्धा खाद्यपदार्थासारखेच गुणधर्म असतात. म्हणूनच म्हटलंय , की काही पुस्तकं चघळायची असतात , काही खूप चावून चावून पचवावी लागतात , काही एकदम गिळता येतात. पण अन्नासारखंच पुस्तकही पचवायचं असतं. पण पचायचं नाही असं समजून वाचायचंच नाही , हे मात्र चूक आहे. प्रत्येक पुस्तक वाचायला सुरुवात करणं , हे नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासारखं आहे.


कधी कल्पनेच्या प्रदेशात , कधी विचारांच्या जगात , कधी विज्ञानाच्या राज्यात , कधी वनस्पतींच्या दुनियेत- कुठल्या पानावर मनाला किल्हाद देणारं , आधार देणारं किंवा अंतर्मुख व्हायला लावणारं काय मिळेल ते सांगता येणं कठीण आहे. एखादाच विचार मिळतो आणि आपलं जीवन उजळून जातो. गांधीजींच्या हातात रिस्कनचं अन्टु द लास्ट- अंत्योदय हे पुस्तक आलं आणि त्यांना त्यांच्या जिवितकार्याला विचारांची बैठक मिळाली. पुस्तकच कशाला , एखादी कवितेची ओळखसुद्धा आयुष्यभर सोबत करत राहील! पुस्तकांचा संग जडलेल्या माणसाला कधी एकटं राहावं लागत नाही.

खूप थोर माणसं त्याच्याशी संवाद साधायला त्याच्या पुस्तकांच्या कपाटात पाठीला पाठ लावून उभी असतात.

आनंदवन मित्रमेळावा- पु.ल. देशपांडे

प्रिय मित्र बाबा आणि आजच्या या मेळाव्याला आलेले मित्रहोमित्र बाबा आणि आजच्या या मेळाव्याला आलेले मित्रहो !

'प्रिय मित्र बाबा' म्हटल्याबरोवर आपल्यापैकी काही लोकांना कदाचित धक्का बसला असेल। काही लोकांना थोडा उध्दटपणाही वाटला असेल. पण काय कोण जाणे मला अलिकडे आदरणीय वगैरे शब्दांची भीती वाटायला लागली आहे. ज्याला ज्याला म्हणून आदरणीय म्हटलं त्यांनी त्यांनी निराशेशिवाय पदरात काही टाकलं नसल्यामुळे बाबांनाही आदरणीय आणि पूज्य करुन टाकण्याची माझी तरी तयारी नाही. याचा अर्थ, माझ्या आधी ज्यांनी ज्यांनी त्यांना आदरणीय म्हटलं ते अंतःकरणापासून म्ह्टलं नाही असं मात्र मी म्हणत नाही.

मित्रहो, आपल्या मेळाव्याचं नावच आहे 'मित्रमेळावा'--- त्यामुळे उपचार, कार्यक्रमाची शिस्त वगैरे गोष्टी, किंवा आलेल्या पाहुण्याचं यथोचित स्वागत या गोष्टी मित्रत्वाच्या भावनेने जेवढ्या साधता येतील तेवढ्याच पाहायच्या आहेत.


आपण अलिकडे बोलताना म्हणतो पीSSस, पीस. शांती ! देअर इज नो पीस विदाऊट प्रोस्पेरिटी - आणि प्रोस्पेरिटीसाठी श्री लागते. म्हणून ते श्रीनिकेतन आणि शांतिनिकेतन एकत्र आलं. आणि हे रवींद्रनाथांनी कशासाठी केलं? जेव्हा ही अशी जमिनीतून येणारी निर्मिती, माणसाच्या हातांनी घडविलेली निर्मिती आणि प्रतिभेतून घडलेली निर्मिती या एकत्र येतात त्याच वेळेला आनंद संभवतो म्हणून इतर वेळेला मजा! तेव्हा मजा आणि आनंद या दोन गोष्टींमधील फ़रक आपण लक्षात घेतला पाहिजे. आपण मजा खूपच करतो, पण त्या मजेला अर्थ नसतो. त्या मजेला आनंद जर तुम्हाला म्हणायचं असेल तर तिथे निर्मितीचा निराळा साक्षात्कार घडावा लागतो. सौंदर्य हा शब्द आपण वाटेल तसा वापरत असतो. जाहिरातीत तर सगळंच सुंदर असतं. पण देखणं काय असतं? काय खरं तर सुंदर असतं? कवी बोरकरांनी म्हटलं आहे-- 'देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे'. ज्या हातांना निर्मितीचे डोहाळे लागलेले आहेत ते देखणे आहेत आणि इथे अशा हातांनी निर्मिती केलेली आहे की जेथे निर्मितीला आवश्यक असणारी वाटच नियतीने त्यांच्याकडून हिरावून घेतलेली आहे. ज्या वेळेला बोटं नसलेला माणूस त्या नसलेल्या बोटांनी बोटं असलेल्या लोकांना आपल्या निर्मितीने खुणावत असतो किंवा हिणवतही असतो त्या वेळी तिथे देखणेपण असं साक्षात प्रकट होतं आणि रुग्णालयाचं आनंदवन होतं.

सामाजिक कार्य आमच्याकडे लोकांनी केली नाहीत असं मी तरी कशाला म्हणू? अतिशय सुंदर अशा प्रकारची कार्य केली. निरनिराळ्या प्रकारची कार्ये केली. त्या सगळ्यांच्याबद्दल आदर ठेवून मी असं म्हणेन की, विधायक कार्याला सौंदर्याची सतत जोड राहिल्याशिवाय त्यातून खरा आनंद निर्माण होत नसतो. हे कार्य बाबांनी केलं. त्या तोडीचं कार्य या भारताच्या भूमीत कुणीही केलेलं नाव्हतं. असलं जर केलेलं तर मी जरुर सांगेन की, चुकल माझं ! आणि ते चुकलं म्हणण्याचीसुध्दा मला धन्यता वाटेल. पण अशा प्रकारचं जे हे कार्य आहे ते कुणी केलं? एका महाकवीने केलं. कारण बाबांनी सांगितलं आहे, "अवर वर्क-" आणि एक लक्षात घ्या, इथे बाबा अवर वर्क म्हणतात, माय वर्क म्हणत नाहीत. "-अवर वर्क इज अ पोएम इन ऍक्शन." इथं जे कार्य प्रकटलेलं आहे ते कृतीतून प्रकटलेलं अनोखं काव्य आहे-इतर वेळी जे शब्दातुन प्रकट होत असतं ते कृतीतून प्रकटलेलं आहे. बाबा नेहमी म्हणत असतात की, 'प्रभूचे हजार हात'. मी वैयक्तिक मंदिरातला देव मानत नाही. माझं त्याचं काही भांडण नाही. त्यामूळे तो माझ्यावर रागवेल अशी मला भीती नाही. त्याला फ़ारसं रागवता येतं यावरही माझा विश्वास नाही. त्यामुळे त्या प्रभूबद्दल मला काही माहिती नाही. परंतु माझ्या दृष्टीने मी प्रभू त्यालाच म्हणेन की ज्याला 'प्रभू' मधला 'भू' जवळचा वाटतो. प्रकर्षाने जो 'भू' जवळ जातो तो प्रभू असंच मला वाटतं. हीच प्रभूची व्याख्या असायला पाहिजे असं मला वाटतं. त्या प्रभूचे हजार हात तुम्हाला-समोर पाहा-दिसतील. प्रत्येक झाडाची फ़ांदी हा असा स्वर्गाकडे निघालेला हात आहे-प्रकाशाकडे धावत सुटलेला हात आहे. त्याच्यापासून आपल्याला मंत्र घ्यायचे आहेत. तपोवनामध्ये ऋषीमुनी जाऊन बसत असत. झाडांच्यापाशी पुन्हा धावत असत. झाडांपाशी धावणाराचं कामच हे होतं की एका क्षणामध्ये जमिनीच्या आत आत जाण्याचं वेड आणि दुसर्‍या क्षणामध्ये आकाशाकडे जाण्याची ओढ. म्हणजे तो एखाद्या शेतकऱ्यासारखा जमीनीचा शोध घेत निघालेला आणि दुसऱ्या बाजुने एखाद्या प्रतिभावान कवीसारखा आकाशाकडे झेप घेत असलेला, असं ज्या वेळेला व्यक्तिमत्व दोन्ही बाजूला फ़ुललेलं असतं त्याच वेळेला त्या व्यक्तिमत्वाला व्यक्तिमत्व असे म्हणतात. अलिकडे व्यक्तिमत्त्व हा शब्द आपण कोणाच्याही बाबतीत वापरतो. शब्दांचा म्हणजे आपण नुसता धुमाकूळ चालवला आहे. एक अगदी चिल्लर माणूस-काही तरी सात आठ मासिकांतून गोष्टी छापून आलेल्या-"आमच्या व्यक्तिमत्वाला इ.इ." म्हणताना ऐकुन मी म्हटलं, अरे, हे उंदराने स्वतःला ऐरावत म्हणण्यासार्खे आहे. पण व्यक्तिमत्व केव्हा येतं? की ज्याच्या आचरणातून, उच्चारातून, कृतीतून आपल्याला पदोपदी जाणवत असतं की, ज्याचे पाय आत आत जमीनीचा शोध घेत घेतही चाललेले आहेत आणि क्षणाक्षणाला हजार रीतीने फ़ुलणाऱ्या झाडासारखे प्रकाशाचा शोधही चालू ठेवीत आहेत! जमीनीतले रस ओढून घेत, वारा, वादळ, पाऊस अंगावर घेत घेत फ़ुलणारं ते व्यक्तिमत्त्व. मला तरी असं वाटतं की, भारतात ज्या व्यक्तिमत्त्वाचा पाच अक्षरात उल्लेख करता येईल ती म्हणजे बाबा आमटे ही अक्षरे!

मी आनंदवनात आल्यावर मला जर सगळ्यात वृक्ष कोणता आवडत असेल तर बाबा नावाचा वृक्ष. हा मला सगळ्यामध्ये जास्त आवडतो. त्या वृक्षाकडून मला फ़लप्राप्ती होते. सुगंध मिळतो. त्या वृक्षाकडून मला सावली मिळते. असा काही मी ऊन्हाने फ़ार तळपत असतो, म्हणून सावलीचा शोध घेतो, असं नाही. परंतु आम्हाला खरी सावली म्हणजे काय हेच कळलेलं नसतं. इथे आल्यानंतर कळतं-अरेच्या, सावली म्हणजे अशी की, जी वरच्यावर प्रकाशाच्या किरणांशी खेळ खेळत बसलेल्या आपल्या पानांच्या रुपाने आणि खाली आपल्याला वर जरा मधून मधून बघत जा म्हणून सुध्दा सांगत बसलेली आहे अशी. नाही तर काय हो, आम्ही पटकन 'सावली' निर्माण करु शकतो. त्याला स्वतःचा बंगला म्हणतो. ही सावली नव्हे. ते बंगल्याचं असतं-'सावली'! तेव्हा ती सावली नव्हे! ही सावली अशी की जी क्षणाक्षणाला वर जात असते आणि क्षणाक्षणाला ती सावली आपल्याला प्रकाशाचा झोत कुठल्यादिशेने चालला आहे ह्याची जाणीव करुन देत असते. चार भिंतीच्या घरामध्ये बसलेल्या सावलीमध्ये ही जाणीवच नष्ट झालेली असते. ती फ़िरती सावली जिथे भेटते तिथे ती खरी सावली! ती इथे लाभते. मी अनेक वर्षे इथे येतो आहे. बाबांचा माझा परिचय झाल्याला आता पंधरा वर्षे होऊन गेलेली आहेत. दरवेळेला वाटतं की आता झालं! संपलं! अहो, कुठलं संपलं! पलिकडल्या डोंगराची शिखरं बाबा दाखवायला लागतात. एक शिखर गेल्यावर वाटतं, आली बरं का कांचनगंगा... कुठली येते? ती आणखी पुढे आहे...त्याच्यावर आणखी एक शिखर असतं. बाबांच्या बरोबर प्रवास करतांना-म्हणजे विचारविनिमयाचा प्रवास करतांना, त्यांचे विचार ऐकतांना-लक्षात येतं की, यांना शेकडो हिमशिखरं आपली सादच देत राहीली आहेत. ती संपायलाच तयार नाहीत.

... अपूर्ण
(आनंदवन मित्रमेळावा, फेब्रुवारी १९७९: पु.लं.नी केलेल्या भाषणातील काही भाग)

काय वाट्टेल ते होईल – पु. ल. देशपांडे
अनुवाद वाटतच नाही इतक्या सहजसुंदर भाषेत पु. लं. नी लिहिलेली ही एका अमेरिकेत पोटापाण्यासाठी आलेल्या जॉर्जियन माणसाची ही आत्मकथा.--

जॉर्जियामधल्या लहानश्या खेड्यातून फक्त पडेल ते काम करण्याची तयारी आणि जगण्याचा उत्साह एवढंच भांडवल घेऊन एका ग्रीक बोटीने जॉर्जी आयव्होनिच अमेरिकेत प्रवेशतो. किनाऱ्यावर पोहचण्याआधीच या माणसाने खाण्यापिण्यात आपल्याजवळ असलेले तुटपुंजे पैसे संपवलेले. बोटीत शिरलेला एक टोप्या विकणारा जॉर्जीची नवीकोरी रशियन फरटोपी घेऊन त्याला बदल्यात एक डॉलर आणि दुसरी ‘अस्सल अमेरिकन’ टोपी देतो. ‘अमेरिकेत गुजराण होण्याइतका पैसा’ असल्याशिवाय अमेरिकेत प्रवेश करण्याची परवानगी नाही. पण नोटांचे एक बंडल भाड्याने देणारा त्यांच्यातलाच एक माणूस जॉर्जी ला भेटतो आणि हे नोटांचे बंडल दाखवून झाल्यावर परतीच्या बोलीवर एक डॉलर भाड्याने घेऊन जॉर्जी अमेरिकेत प्रवेश करतो. अमेरिकेत आल्याआल्या तो आपला पासपोर्ट ‘परदेशी असल्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी’ फाडून टाकतो.

जॉर्जीचा अमेरिकेतील मार्ग खडतर आहे. त्याची आपल्या देशात वाखाणली गेलेली कौशल्ये, म्हणजे तलवारींना धार लावणे आणि चाबकाच्या चामडी मुठींवर नक्षीकाम करणे, यांना अमेरिकेत स्थान नाही. मित्र झुराबेगच्या मदतीने त्याला एका उपाहारगृहात बश्या-ग्लासे विसळायची नोकरी मिळते. पण पहिल्याच दिवशी धांदरटपणाने सर्व ग्लास फुटल्याने मालकीण त्याला नोकरीवरून जायला सांगते. ती निघताना त्याला देणार असलेले पाच डॉलरही जॉर्जी बाणेदारपणे नाकारतो. ‘मी काम केलंच नाही तर पैसे कशाला घेऊ’ म्हणून तो परत रिकाम्या पोटी आणि रिकाम्या खिशाने बाहेर पडतो. रात्री बाकावर झोपलेला असताना त्याच्यासमोर बंद पडलेली एका अमेरिकनाची गाडी तो चालू करून देतो आणि हा मनुष्य त्याला त्याच्या गॅरेजात नोकरी देतो.

जॉर्जीच्या या आत्मचरित्रात त्याने अनेक नोकऱ्या धरलेल्या आणि सोडलेल्या दाखवलेल्या आहेत. हा माणूस कोणत्याही अडचणीने आणि अपयशाने खचला नाही. जॉर्जीला गॅरेजात नोकरी देणारा माणूस काही कारणाने त्याच्या गावी निघून गेला. मग जॉर्जीने प्लॅस्टरचे साचे बनवणाऱ्या छोट्या कंपनीत नोकरी धरली. ही नोकरी सुटण्याची कथा मोठी मजेशीर. जॉर्जीच्या शब्दातच सांगायचं झालं तर ‘पेंटरसाहेबांनी मला उंटाचा ठसा करायला सांगितला. हा उंट अगदीच गायीसारखा दिसत होता. हे असलं येडंबिद्रं जनावर बनवायची मला अगदीच शरम वाटायला लागली. म्हणून मी इकडेतिकडे अदलाबदल करून त्याला जरा उंटांत आणायला गेलो. पेंटरसाहेबांनी हे पाहिलं. आपण लंडन, प्यारीस, ड्रेसडेन या गावांतल्या शाळांतून चित्रकलेचं शिक्षण कसं घेतलं हे सांगायला सुरुवात केली. आता जाताजाता माझा प्वाइंट इतकाच होता की या गावांत उंट राहत असल्याचं मी कधी ऐकलं नव्हतं. झालं! आम्हाला तिथूनही नारळ मिळाला.’ पुढे जॉर्जीची एका गोंदाच्या कारखान्यात नोकरी, तिथून इंग्रजी येत नसल्याने त्याला मिळालेला डच्चू, नंतर एका लाँड्रीत मिळालेली,विशेष न आवडणारी पण पोटापुरते देणारी नोकरी अशा अनेक नोकऱ्या धरसोड करून जॉर्जी शहरेही बदलत राहतो.

स्वाभिमानी पण प्रेमळ, क्वचितप्रसंगी बिलंदर पण बहुतेकदा शक्यतो सत्याची कास धरणारा जॉर्जी आयव्होनिच मनाला भिडतो. जॉर्जीला पोट भरण्यासाठी नोकरीची गरज आहे. पण त्यासाठी त्याला दुसऱ्याचे पाय ओढायचे नाहीत.संपावर गेलेल्या कामगारांना ‘काम तुमच्याशिवाय चालू आहे’ हे दाखवून जेरीस आणण्यासाठी जॉर्जीला आणि इतर मोजक्या परदेशी माणसांना मिस्टर ब्लॅक नावाचा कारखानदार जवळजवळ दुप्पट रोजावर ठेवतो. इंग्रजी न कळणाऱ्या जॉर्जीला हे आपल्या रशियन सहकाऱ्यांकडून नंतर कळते.’मी स्वखुशीने नोकरी सोडून जात आहे’ असे पत्र साहेबाकडून मागायला तो साहेबाकडे जातो. साहेब त्याला ‘संपवाले बाहेर गेल्यावर तुला मारतील’ अशी भीती दाखवतो. जॉर्जीचे त्यावर उत्तर ‘एखाद्याची मी बायको चोरली..पैसे, पोरं चोरली तर तो मला रस्त्यात थांबवून जाब विचारेल. पण एखाद्याची चाकरीच चोरली तर हे सगळंच चोरल्यासारखं आहे. तो मला बडवेल नाही तर काय करेल? मर्द असला तर असंच करेल.’

फुले तोडत नसतानाही मित्रांनी फुले तोडली आणि हा फुले हातात घेऊन उभा म्हणून जॉर्जीला शिपाई पकडतो आणि कोर्टात बोलावणं येतं. इतर कामगार मित्र एक दिवसाचा पगार बुडेल म्हणून कोर्टात न जाता दंड पाठवून देण्याचा सल्ला देत असतानाही ‘मी गुन्हा केलेला नसताना केला का म्हणू’ म्हणून जॉर्जी कोर्टात जातो.जज्जाने विचारल्यावर पाठ केलेलं एकमेव इंग्रजी वाक्य पण चुकीचं बोलतो. ‘नाकबूल,युवर ऑनेस्टी!’ म्हणतो. जज्जाने ‘जॉर्जियात असताना कोणाचा खून, चोरी वगैरे केली आहे का?’ ‘खून ना, शेकड्याने केलेत. नंतर मोजणं पण सोडून दिलं’ असं बेधडक उत्तर देतो. आणि जज्ज बुचकळ्यांत पडल्यावर ‘कामच होतं आपलं,साहेब. दिसला जर्मन की घाल गोळी. सैन्यात होतो मी.’ असे सांगतो. जॉर्जी प्रामाणिक आहे.लाच देऊन गोष्टी गुंडाळण्याऐवजी तो पैसे गेले तरी बेहत्तर, पण स्वतःचं निरपराधीत्व पटवून देण्याला जास्त महत्त्व देतो.

मूळ इंग्रजी पुस्तक अद्याप वाचायचा योग आला नाही, पण पु. लं. ची भाषा इतकी खुमासदार आहे की हे अनुवादीत पुस्तक पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटतेच. “आनाबाईशी बोलणं म्हणजे भिजल्या स्पंजाशी बोलण्यागत. जरा दाबलं की पाणी!” लग्नाच्या मेजवानीत मुसे(डेझर्ट) आणू म्हटल्यावर “मुसे बिसे ठीक आहे. मी कबाब करीन(मला वाटलं मुसे म्हणजे हरणासारखं काही तरी असेल.)” दोन बुटांना पॉलिशसाठी दोन पोरं बोलावणाऱ्या मिस्टर ब्लॅकला बघून “बरं झालं हा आठ पायाचा कोळी नाही,नाहीतर पायाशी पालिशवाल्या पोरांची पलटणच बसवावी लागली असती” “ल्यूबा तर आपलंच शेपूट आपणच तुडवलेल्या मांजरीसारखी फुसफुसत होती”,जॉनकाकाच्या अंत्यसभेत “लोकांनी त्याच्या गुणाची वर्णनं करणारी भाषणं केली‍. जॉनकाकाला त्याची गरजच नव्हती.त्याने केलेली सत्कृत्यं त्याच्या पेटीभोवती जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर ठळक अक्षरात लिहिलेली होती.त्यांच्या मेणबत्तीच्या प्रकाशात चमकणाऱ्या आसवांच्या हिऱ्यात तोलली जात होती” हे वर्णन, “आम्हाला त्यांच्या विशाल टेबला भोवती बसण्याचा मान मिळाला आहे. हे विशाल टेबल म्हणजे अमेरिका. खूप वर्षं आम्ही त्या विशाल टेबला भोवती गोळा होऊन आमचा जो जो पाहुणचार ते करतायत त्याचा मोठ्या आनंदाने स्वीकार करीत आहो. चांगले पाहुणे म्हणून राहण्याचा आमचा प्रयत्न आहे.” ही चालिकोची आणि इतर परदेशी माणसांची अमेरिकेविषयी कृतज्ञता ही सर्व वाक्ये मनाला भिडून आपल्याच मनातलं काहीतरी आपल्यापुढे आणून जातात.

जॉर्जी अमेरिकन मुलीशी लग्न करायला निघतो तेव्हा त्याच्या इतर मित्रांनी त्याला दिलेले सावधगिरीचे इशारे, “अमेरिकन मुली बोजट(बजेट) बाळगतात. म्हणजे तुला काही खर्च करण्यापूर्वी त्यात मांडून ठेवावं लागतं लग्न झाल्यापासून सहा महिन्यात नुसत्या शरमेनेच खतम होशील! आणि तुझी मर्तिकाची पेटी उचलणाऱ्यांना पण जेवण मिळेल असं समजतोस? छट! फार फार तर एक कप चहा!” आणि यावर जॉनकाकाचे समजूत घालणे “त्यांनी एकमेकांना वचन दिलं आहे. जी काही नुकसानी व्हायची ती झाली आहे.फिकीर करू नकोस, बिजो बेट्या! वीस वर्षं आपली तुपली दोस्ती आहे. इथून तुटणार नाही.” जॉर्जी हा माणसातला आणि माणूसवेडा माणूस आहे. “प्रत्येक कुटुंबात एक आजी हवी.त्याशिवाय घराला शोभा नाही.” हे लग्न ठरल्यानंतर त्याचे आजेसासूबद्दलचे उद्गार अगदी आपल्या संस्कृतीतलेच वाटतात.

पैसे कमावायला जोडधंदा म्हणून कातड्यासाठी सोनेरी कोल्हा कोल्ही पाळणे, ‘खिंकाली’ बनवून विकणे,अधेमधे शोध लावणे, शेती करणे,जॉनकाकाचा सँडविच चा धंदा चालवणे, भंगारवाल्याचं दुकान काढणे असे अनेक उद्योग जॉर्जी करताना दिसतो. हा माणूस हरहुन्नरी आहे. आपल्या धडपड्या आणि स्वतःची पर्वा न करता इतरांना मदत करण्याच्या स्वभावामुळे तो कधीकधी अडचणीत सुद्धा सापडतो. डिट्रॉय शहरात सट्टेबाजारामुळे मंदी आल्यावर स्वतःची नोकरी शाबूत असूनही “इतर पोराबाळांच्या धन्यांच्या नोकऱ्या सुटलेल्या पाहून मला माझी नोकरी टिकवून धरणं पटेना.मीही सोडली.” म्हणून तो भंगाराचे दुकान चालू करतो.त्याची घरमालकीण आनाबाई तिला आणि तिच्या दोन लहान मुलांना सोबत म्हणून जॉर्जीलापण शहर सोडून कॅलिफोर्नियाला यायला विनवते.आनाबाईचे वडील जॉर्जीला विश्रांती देण्यासाठी थोडावेळ ट्रक चालवतात तेही ट्रक गाळात रुतवून जॉर्जीला आणखीच अडचणीत आणतात. रेड इंडियन लोकांकडून ट्रक बाहेर काढून घेण्याच्या प्रयत्नात जॉर्जी असताना ते रेड इंडियन म्हणून त्यांच्याशी आनाबाई आणि कुटुंबीय फटकून वागतात. वाटेत प्रवासखर्चाचे पैसे कमी पडल्यावर सामान विकून सगळे पुढे जाण्याचा सल्ला नाकारून जॉर्जी आणि नादुरुस्त सामानाच्या ट्रकला एकटे सोडून इतर मंडळी पुढे निघतात. इतरांमुळे आलेल्या अडचणींवर मात करत आणि तरीही कोणाविषयी मनात कटुता न ठेवता परत इतरांना मदत करत जॉर्जीची जीवनाची वाटचाल चालू आहे.

‘जॉनकाका’ हेही एक आगळं पात्र. ऐंशी पंचाऐंशी वर्षाच्या आसपास वय असलेला हा रशियन एक कुशल स्वयंपाकी आहे. पण त्याला पैशाची हाव नाही. एक छोटं उपाहारगृह चालवून आणि बऱ्याच गरजू माणसांना फुकटात जेवू घालून आधार देणं ही त्याची हौस.जॉर्जीला ब्लाडिओस्टॉकमध्ये योगायोगानेच भेटलेला हा म्हातारा त्याच्या रुक्ष उमेदवारीत थोडी रंगत आणतो.अमेरिकेतही जॉनकाका आलाय म्हटल्यावर जॉर्जी त्याच्या शहरात जाऊन सर्व हॉटेलं बघून त्याला शोधून काढतो. जॉनकाका जॉर्जीच्या लग्नातही त्याला भरघोस आहेर आणि मदत करतो. चांकोसारखा अर्धवट माणूस जवळ बाळगतो. कारण चांकोला जगानं वेडा ठरवलं, दगडं मारली तरी “जग सर्वांसाठी आहे” या तत्त्वाने जॉनकाका त्याला आपल्या हाताशी घेतो.मरणाच्या काही दिवस आधी जॉनकाका धंदा विकून आलेल्या पैशातून सर्व मित्रांना किंमती भेटवस्तू घेण्याच्या उपद्व्यापात असतो. सँडविचचा धंदा जॉर्जीला सांभाळायला देऊन तो आजारी मित्र बोरीसला पाहायला निघून जातो. धंदा तोट्यात चालत असल्याचं जॉर्जीने कळवल्यावरही “येईल त्या किमतीला विकून टाका. धंदा परत उभा करता येईल पण बोरीससारखा मित्र परत नाही मिळणार” असे कळवून धंद्यावरही पाणी सोडतो.”पेट्रोग्राडला आयुष्य इथल्यासारखं भरभर जात नाही” म्हणून मोठ्या शहरात आचारी बनणं टाळून छोट्याश्या शहरातच आपली खाणावळ चालवतो. जॉर्जीची बायको हेलेना हिला लग्नानंतर निरोप देताना तिच्या कानात “जॉर्जियन माणसाला वाढत असशील तर त्याच्या पानात भरपूर वाढ. तेव्हा कुठे त्याला ते बेताचं वाटेल” असा सल्ला देतो.

हेलेना ,जॉर्जीची बायकोही एका परदेशी माणसाशी लग्न करून संसारात जुळवून घेणारी. त्याच्या मित्रांचा आणि आल्यागेल्यांचा अगत्याने पाहुणचार करणारी. हुशार आणि नवीन चालीरीती शिकण्यासाठी उत्सुक असलेली. आणि विशेष म्हणजे “अमेरिकन मुलीशी लग्न करणं म्हणजे मोठी आफत पत्करणं” हा जॉर्जीच्या मित्रांचा ग्रह आपल्या अगत्यशीलतेने खोटा ठरवणारी. जॉर्जीला तिच्याविषयी वाटणारा अभिमान पुस्तकाच्या पानापानातून जाणवतो.


पुस्तकातले काही प्रसंग मजेशीर आहेत. भटारखान्यातून फुगणाऱ्या पावाच्या कणकेला बसमधल्या बाईने घाबरून रशियन माणसाने बाळगलेला बाँबगोळा समजणे, जॉर्जीने जुन्या बॅटरीतले शीसे वितळवून ते चाकाच्या सांध्यात ओतून दुसऱ्या मोठ्या गाडीचे चाक आपल्या ट्रकाला बसवणे, जमिनीच्या व्यवहारात जॉर्जीला फसवणाऱ्या दलालाला झापून पैसे परत घेण्यासाठी गेलेल्या मित्रांनी दलालाच्या भाषणाने प्रभावित होऊन स्वतःही जमिनीसाठी नाव नोंदवणे,उकाड्यात फक्त अर्ध्या चड्डीवर घड्याळ दुरुस्त करत असलेल्या जॉर्जीने शेजारीणबाई आलेली पाहून मोठ्या घड्याळात लपणे आणि घरातल्या वस्तू तिला कौतुकाने दाखवताना हेलेनने त्याच घड्याळाचे दार उघडून दाखवणे,चांकोने पाव डॉलरच्या सँडविचच्या काही खोक्यात एक एक डॉलर लपवून ठेवून विक्री वाढवणे,’बेथलेम’ चा उच्चार फोनवर नीट न सांगितल्याने हेलेनच्या मैत्रिणीने जवळपासच्या सर्व गावांत जाऊन पाहणे, इलारियनचा नर्व्हस ब्रेक डाउन मारामारी केल्यावर बरा होणे इ.इ.

पुस्तकाविषयी आणखी एक विशेष म्हणजे मूळ पुस्तकातील कोट्यांचे शब्दशः भाषांतर न करता समांतर मराठी शब्दप्रयोगांतून विनोदनिर्मिती. जॉर्जी लहानपणी पाण्यात पाहिलेल्या राक्षसांच्या(?) कवट्यांविषयी सांगत असताना मिस्टर मॉकेट त्याला विचारतात: “मग तुम्ही यावर एखादा प्रबंध नाही लिहिला?” जॉर्जीला “प्रबंध” शब्द न कळून “मी कशाला त्यांना प्रतिबंध करू” असे विचारतो. पुस्तकातली खाद्यपदार्थाची नावे आणि वर्णनेही रुचकर आहेत. ‘(खिमा भरलेल्या करंजीसारखी)खिंकाली’,'अंड्याची कचोरी उर्फ पिरोष्की’,'नऊ थराचा बकरीच्या लोण्याचा स्कापोर्सेला केक’,'लसणाच्या चटणीबरोबर कबाब’,'चाचोबिली(टॉमेटोत शिजवलेले मटन)’,'मर्तिकाचा मसालेदार शिलापुलाव’,'संत्र्याचा रस आणि व्हिस्कीची बनवलेली ‘बायलो”,’अंड्याचं लोणचं’,'अनेस्पेंदाल’,'लिंबाच्या फोडी तोंडात ठेवून भाजलेला कलमाकी मासा’,'गाभोळीचं लोणचं’,'बेशे(उकडलेल्या मुळ्या घालून बनवलेली सागुती)’,'चुचकेला म्हणजेच पाकात घोळवून ओवलेली द्राक्षांची माळ’ या पदार्थांबद्दल कुतूहल चाळवतं. तसेच “नमस्कार! युद्धात शत्रूपुढे तुमचा सदैव विजय असो!” हा एका जॉर्जियनाने दुसऱ्या जॉर्जियनाला केलेला रामरामही मजेशीर वाटतो.

शेती न जमल्याची जॉर्जीची कबुली पण प्रांजळ आहे.”धरती ओळखते” म्हणून मेहनतीला मागेपुढे न पाहता भरपूर खपून स्वतः केलेली टॉमेटोची शेती वादळ आणि दलालांच्या व्यवहारांमुळे तोट्यात जाते तेव्हा असं का याचा विचार करताना जॉर्जी म्हणतो, “स्वतःच्या जमिनीवर आपल्या दोन हातांनी राबणाऱ्याला शेतीवर भाकरी मिळवता येऊ नये?शक्य नाही.तसं असेल तर या जगाची सुरुवातच कशी झाली? दुसरं एखादं कारण असेल.पण कोणतं कारण??” “फक्त हौस आणि दुय्यम धंदा म्हणून सुकलेली फळफळावळ आणि मोरांचं संगोपन एवढंच केलं नव्हतं” या शब्दात त्याचं शेतीच्या प्रयोगांबद्दलचं वर्णनच पुरेसं बोलकं आहे.

या साऱ्या अनुभवांतूनच जॉर्जीला अमेरिकेत पाऊल ठेवल्यावर आलेला आणि अनेक वर्षे अमेरिकेत राहून कायम असलेला अनुभव पक्का होत जातो. “अमेरिका हा असा देश आहे जिथे काहीही घडू शकतं.काहीही होईल.काय वाट्टेल ते होईल.”

जॉर्जीचं आत्मचरित्र अमेरिकेत पोटापाण्यासाठी आलेल्या आणि स्थायिक झालेल्या एका माणसाचा जीवनप्रवास रंगतदारपणे रेखाटतं. पु. लं. च्याच प्रस्तावनेतील शब्दात सांगायचं तर-
“सर्वांनी एकत्र बसून जेवावे, खावे,प्यावे,क्षुद्र भेदाभेद विसरावे,आनंदात राहावे या प्रार्थनेवरच हे पुस्तक संपते. हसतखेळत, खातपीत, माणुसकीचे साधेसुधे नियम पाळीत अवघ्यांचा संसार सुखाचा व्हावा अशी इच्छा बाळगणारा जॉर्जी आपणा सर्वच सामान्य माणसांचे विचार बोलतो.दुर्दैवाने आजच्या जगातील असामान्यांना हे सामान्यांचे माणुसकीचे बोल कळत नाहीत. हा जॉर्जी मला आपला वाटला. म्हणून त्याच्या पुस्तकाचे हे मराठी रुपांतर मी केवळ मराठी जाणणाऱ्यांसाठी केले आहे.”

`हसवणुक' मध्ये पुलंनी माणसाच्या कुंडलीतील काही अनिष्ट ग्रहयोग दिले आहेत. त्यातील एक...

प्रकृती ठिक नसल्याचे कारण देऊन बुट्टी मारावी, कचेरीत बेडरिडन अशी चिठ्ठी पाठवावी. घराहून नित्याप्रमाणे कचेरीला जातो असे सांगुन निघावे, आणि तास दोनतास फोर्टमधल्या अपोलो बंदर वगैरे `सेफ एरिया'त काढून दुपारच्या शॊला सिनेमाला जाऊन बसावे. नेमका आपल्या समोर साहेब बसलेला असतो. त्याला चुकवून नुसती डॉक्युमेंटरी पाहून बाहेर सटकावे, तर काळोखात कुणाच्यातरी पायावर पाय पडतो, आणि `मेल्याचे डोळे फुटले' असा अतिपरिचित स्त्रीवर येतो. तो आपल्या नकळत मंडळातल्या मैत्रिणींना घेऊन आलेल्या स्वपत्नीचा असतो. काळोखात तिला दिसले नसले, तरी साहेबाने पाहिलेले असते. पण तोही बोलत नाही. कारण इन्स्पेक्शनला म्हणून बाहेर पडून तोही हळूच सेक्रेटरी पोरीला घेऊन आलेला असतो. पण बुट्टी अधिकारी योगामुळे मधल्या मध्ये आपला सिनेमा बुडतो. पण दारी नोकरी आणि घरी जीव वाचतो. घरी गेल्यावर पत्नी `मंडळात व्याख्यान छान झालं' म्हणून सांगते. दुसऱ्या दिवशी साहेब हापिसात ट्रेमधला चहा `शेअर' करूया म्हणून पुढे करतो, आणि सेक्रेटरी पोरगी आपल्या डब्यातील सॅंडविच देते. हा योग माणसाला दरीपर्यंत नेतो, पण खाली ढकलीत नाही. ह्या योगावर जन्मलेला हवालदार हातभट्टीवाल्याकडॆ सब-इनिस्पेकटरसायबाला चुकवून नियमीत हप्त्यावरचे चायपानी मागायला गेला, तर त्याल तिथे हटकून तो `साहेब' पहिल्या धारेची घेताना दिसलाच पाहिजे. साहेबाला वाटते, हवालादराने पाहिले; हवालदाराला वाटते, त्याने. मग भट्टीवाला दादा दोघांनाही पाजतो, आणि चौकीत आणुन सोडतो. तिथे द्या दिवशी नेमका ऍंटीकरप्शनवाला आलेला असतो. पण तोही बोलत नाही. कारण आपल्या तोंडाचा वास मारतो की काय याची त्याला भीती वाटत असते. मग दादाच्या अध्यक्षतेखाली चौकीत `साली सगळी पब्लिक हल्ली हरामी कशी होत चाललीय.' ह्यावर चर्चा होते.

बुट्टी-अधिकारीयोगामुळे संकट असे हुतूतू करीत येते, आणि भिडूला न शिवता परत जाते.

-- पु.ल. देशपांडे

तसा मी काही फारसा महत्वाकांक्षी माणूस नाही. नेपोलियन हा जगातला सर्वात महत्वाकांक्षी पुरूष मानला जातो. त्याच्याशीच तुलना करायची म्हणजे नेपोलियनचं एक तीनशे पानांचं चरित्र माझ्या कपाटात आहे, ते वाचून काढायची माझी एक महत्वाकांक्षा आहे. वास्तविक मी होऊन नेपोलियनच्या वाटेल्या कधीच जाणार नव्हतो. एकदा मित्रांच्या बैठकीत मी माझी एक माफक महत्वाकांक्षा बोलून दाखवली होती. तेव्हा माझ्या एका विद्वान मित्रानं चिडून माझ्यावर हे नेपोलियनचं तीनशे पानी चरित्र मानलं होतं. तेव्हापासून तो नेपोलियन माझ्या कपाटात बंदिस्त होता. वास्तविक माझ्या मित्राला चिडण्यांच कारण नव्हतं. त्याची महत्वाकांक्षा आमच्या गावातल्या मुन्सिपाल्टीचा अध्यक्ष व्हायची होती आणि माझी महत्वाकांक्षा ज्या नोकरीत दुपारी तीन तास झोप घेता येईल अशी नोकरी मिळवणं एवढीच होती. असली क्षुद्र महत्वाकांक्षा ठेवल्याबद्दल त्यानं माझ्यावर अख्खा नेपोलियन मारला होता.

अप्लसंतोष हा सुखी जीवनाचा पाया आहे, असं माझं माझ्यापुरतं मत आहे. आणि अनुभवानं माझं हे मत पक्कं झालं आहे. लहानपणी वडील माणसं "बाळ, तु मोठा झाल्यावर कोण होणार रे?" असा प्रश्र्न मला विचारून मग आपणच पस्तावत असत. माझी पहिली महत्वाकांक्षा हॉटेलात भजी तळणारा होणं ही होती. आमच्या घरासमोरच एक 'धि न्यू बलभीम सुग्रास हॉटेल' होतं. संध्याकाळी पाच वाजले की हॉटेलच्या दारात एक दणदणीत उघडाबंब गृहस्थ भजी तळायला बसायचा. त्या सुगंधानं वातावरण भरून जायचं. त्याची ती झारा फिरवण्याची ऎट! तेल उकळलं की नाही पाहायला तो त्या तापल्या कढईत पाण्याने चार थेंब टाकून चर्रर्र असा आवाज करायचा. मग सराईत हातांनी पिठाचे गोळे वळायचा. कांदा तर असा सुंदर चिरायचा की देखते रहना. मग झपाझप भजी तळायला लागायचा. तळता तळता कपाळावरचा घाम मोठ्या ऎटीत पुसायचा. एवढं सर्व चालू असताना त्याच्या तोंडात विडीदेखील असायची. आणि त्याचे लांब केस झाऱ्याचा हालचालीबरोबर पुढंमागं झटकले जायचे ते मनोहर दृश्य आजदेखील माझ्या डोळ्यांपुढं उभं आहे. त्यामुळं लहानपणी कोणीही विचारलं की,

"बाळ, मोठा झाल्यावर कोण होणार?" की माझं ठरलेलं उत्तर होतं, "भजीवाला!!" पाहुण्यांना जरा धक्काच बसायचा, "काय?" मग माझे वडील वगैरे काही तरी सांगून मला तिथून हुसकावत. तात्पर्य, पहिला आदर्श भजीवाला, तिथून मग कल्हईवाला, मग पाणी नारिएलवाला-अशा माझ्या महत्वाकांक्षा बदलत होत्या.

असल्या ह्या माझ्यासारख्या अत्यंत माफक महत्वाकांक्षी माणसाच्या मनात मी `गवय्या' व्हावं हे नक्की कधी आलं हे सांगण कठीण आहे. आलं, हे मला नक्की आठवतं. पण महत्वाकांक्षेचा उगम सापडत नाही. बाकी आयुष्यात अनेक गोष्टी अशा आहेत ज्यांचा उगम सापडणं अवघड आहे. आपल्याला सर्दी नेमकी कुठल्या वेळेपासून झाली हे कुठं सांगता येतं? मला पहिली शिंक काल तीन वाजून दोन मिनिटांनी आली आणि तिथून सर्दी सुरू झाली, असं सांगणारा महाभाग मला तरी भेटला नाही. माझ्यासमोर पडलेल्या नेपोलियनला तरी फ्रान्सचा बादशहा होण्याचं पहिलं स्वप्न कधी पडलं हे सांगता आलं असतं, असं मला नाही वाटत.

पण माझा गवई संकल्प आणि तो भजीवाला याचा काही तरी संबंध असावा. हल्लीचे दिवस हे अंतर्मनाच्या भानगडीतून नाती जुळवण्याचे आहेत. वास्तविक गायन आणि भजी यांचा अजिबात संबंध नाही असं नाही. अनेकांच्या आवाजाचं `भजं' झालेलं आपण ऎकलं असेल किंवा मैफलीत भिकार गवयाला भज्यांचा अहेर केल्याचं ठाऊक असेल आपल्याला! परदेशात अशा वेळी म्हणे नासक्या अंड्यांच्या किंमती वाढतात. भारत अहिंसक असल्यामुळं अंड्यांची हिंसा न मारता अहिंसक शाकाहारी भज्यांचा वापर करतो, हे आपल्या अहिंसक प्रवृत्तीला साजेसंच आहे. दारापुढला तो भजीवाल्याचा आणि माझ्या गवई होण्याचा संबधं आहे म्हणतो तो तसा नव्हे. दारापुढला तो भजीवाला हा माझा आदर्श होता. मोठेपणी मी त्याच्याइतके लांब केस वाढवणार होतो. ओठाच्या एका कोपऱ्यात विडी ठेवणार होतो. आणि भजी तळता तळता त्याच्यासारख्या ताना मारणार होतो. हो, ताना मारणार होतो. कारण तो भजीवाला भज्यांचं पीठ उकळणाऱ्या तेलात मुठीतून फिरवून फिरवून टाकता टाकता जोराजोरात ताना मारायचा. झाऱ्यानं भजी उचलून टोपलीत टाकता `पिया बिन नही आवत चैन...' म्हणायचा. मला वाटतं, गवई होण्याची कल्पना माझ्या डोक्यात प्रथम रुजली ती त्या प्रसंगातुन! पुढं अनेक पाव्हण्यांच्या प्रश्र्नांना `मी भजीवाला होणार' हे माझं उत्तर ऎकून माझ्या तीर्थरुपांनाही काळजी वाटायला लागली असावी आणि त्यांनी घर बदललं!


आता आम्ही निराळ्या गल्लीत राहायला गेलो; पण आपण भज्यांच्या आगीतून निघून संगीताच्या फुफाट्यात पडलो याची माझ्या तीर्थरुपांना कल्पनाही नव्हती. आमच्या नव्या घरासमोरच गाण्याचा क्लास होता. बाहेर बोर्ड होता: `तुंबरू संगीत यूनिवर्सिटी! इथं शास्त्रोक्त गायन, सुगम संगीत, सतार, दिलरुबा, व्हायोलिन, हार्मोनियम, सारंगी, फ्लूट, सरोद, विचित्रबीन, गोटुवाद्दम, क्लॅरेओनेट, मृदुंगम आणि घटम शास्त्रीय पद्ध्तीनं शिकवण्यात येईल. संध्याकाळी सहा ते सात शॉर्टहॅंड व टायपिंगही शिकवण्यात येईल.' मला लहानपणी तो बोर्ड पाठ झला होता. एका दहा बाय आठच्या जागेत ही तुंबरू संगीत युनिव्हर्सिटी होती. आणी युनिव्हर्सिटीचे एकमेव प्रोफेसर माष्टर भगवानकुमार सकाळच्या वेळी ती खोली झाडताना मला माझ्या गॅलरीतून दिसायचे. दिसायला तेही माझ्या आदर्श भजीवाल्यासारखेच होते. त्यांचेही केस लांब होते आणि दातांत विडी धरून बोलायची त्यांनाही सवय होती. मग आठ वाजता क्लास सुरू व्हायचा, मी इकडे गणितं सोडवत बसत असे, आणि तिकडून `तुम जागो मोहन प्या~~~रे' सुरू व्हायचं! त्या संगीताशी मी इतका तन्मय होत असे की अनेक वेळा मी गणिताची उत्तरं गमपधनीसा वगैरे लिहून शाळेतल्या माझ्या मास्तर नावाच्या साता जन्मीच्या वैराच्या मार खाल्ला होता. पण ध्येयासाठी हाल सोसावे लागतात हे माझ्या धड्यातलं वाक्य मी पाठ केलेलं होतं. गॅलरीत गणितं सोडवता सोडवता मला `तुम जागो मोहन प्यारे...' `धिट लंगरवा कैसे घर...' . `येरी आली पिया बिन...' वगैरे चिजा पाठ झाल्या होत्या आणि वडील कचेरीला गेले की एकलव्याच्या निष्ठेनं कंठगत केलेल्या त्या चिजा गाऊन मी घर डोक्यावर घेत असे. कुणालाही कल्पना नव्हती की त्या घरात उद्दाचा तानसेन मोठा होतो आहे.

पण एकदा तो दुर्दिन उजाडला. असेच कोणी तरी पाव्हणे आले होते, आणि कुठल्याही पाव्हण्याप्रमाणं त्यांनी प्रश्र्न केला, "बाळ, मोठा झाल्यावर कोण होणार तू?" वडिलांचा खर्रकन उतरलेला चेहरा मला अजूनही आठवतो. माझ्या "भजीवाला होणार" या उत्तराची ते वाट पाहत होते. पण माझी महत्वाकांक्षी बदलल्याची त्यांना दाद नव्हती. मी चटकन सांगितलं, " प्रोफेसर माष्टर भगवानकुमार." पाहुण्यांना काही कळलं नाही. "अच्छा प्रोफेसर होणार!" ते म्हणाले. "कसला प्रोफेसर?" मी चटकन तो बोर्ड म्हणून दाखवला: "येथे शास्त्रोक्त गायन, सुगम संगीत, फिल्मी संगीत, सतार, दिलरुबा, व्हायलिन, हार्मोनियम, सांरगी, फ्लूट, सरोद, विचित्रबीन, गोटुवाद्दम, क्लॅरिअओनेट, मृदुंगम आणि घटम शास्त्रीय पद्धतीनं शिकवण्यात येईल. संध्याकाळी सहा ते सात शॉर्टहॅंड व टाइपरायटिंगही शिकवण्यात येईल."स त्यानंतर वडिलांनी पुन्हा ते घर बदललं. नवीन घर घेताना समोर हॉटेल, गायनशाळा वगैरे काही नाही याची खात्री करून घेतली आणि एका गुरांच्या दवाखान्यापुढं आम्ही राहायला गेलो. गवई होण्याची संधी हुकली, परंतु मनातून ती इच्छा गेली नव्हती.

मी मोठा झाल्यावर गाण्याच्या बैठकींना जाऊ लागलो. मागं दोन तंबोरे, पुढे खॉंसाहेब, डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला त्यांचे साथीदार, ती वाहवा, ते `क्या कहने' हे मैफिलीतल्या रसिकांचे उदगार! मी रात्री घरी परत अस्वस्थ होऊन येत असे. येता येता गवई झाल्याची स्वप्नंदेखील पाहत असे. दारात म्युझिक सर्कल्सच्या सेक्रेटरींची रांग लागली आहे, भगिनी-समाजाच्या कार्यकर्त्या महिला " ते काही नाही. तुमचं गाणं झालंच पाहिजे हं आमच्या क्लबात!" म्हणून लडिवाळपणं माझ्याशी बोलताहेत आणि मी "नाही हो परवा पहा मला जालंधरला प्रोग्राम आहे. मग कलकत्त्याला कॉन्फरन्स आहे. तिथून आफ्रिकेत आमचं कल्चरल डेलिगेशन जाणार, त्यात मी आहे..." अशी मखमली उत्तरं देतो आहे... मग त्या बायका "हे हो काय!" असं म्हणताहेत.... असली स्वप्नं पाहत रात्रीच्या रात्री जागून काढत असे. तशी माझी संगीताची इतर तयारी झाली होती. मी चांगला भक्कम तंबाकू खात होतो. डझनभर `कुडते' शिवून घेतले होते. वाढत्या वयाबरोबर टक्कल पडत गेल्यामुळं लांब केसांचं जमलं नाही म्हणून लांब मिशा वाढवल्या होत्या. बागेश्री, भैरव, भीमपलास ही नावं मी वांगी, बटाटे, कांदे म्हटल्याच्या सहजतेनं घेत असे. मला रागबीग ओळखता येत नव्हते. अशा वेळी कोणी रागाचं नाव विचारलं, की तोंडात तंबाकू असल्याचा बहाणा करून मी हाताच्या खूणेनं रागाचं नाव सांगण्याचा प्रयत्न करत असे. त्याखेरीज आग्रा घराणं, रामपूर घराणं, पतियाळा घराणं, गांधर्व महाविद्दालय, भातखंडे वगैरे नावं पेरत असे. शिवाय फत्तेअलिखांचा मुलगा गुलाम अली, त्याचा भाचा बर्कतुल्ला, त्याचा पुतण्या अब्बासमिया, अब्बासमियांचा नातू फलाणखां, त्याचा भाऊ ठिकाणेखां असल्या वंशावळीही पाठ होत्या. बाकी होतं फक्त `आ' करून गायला सुरवात करणं. पण अशी जय्यत तयारी करून एक दिवस मी एका वस्तादजींच्या घरी गेलो. "वा~या~" वस्तादजींनी माझं स्वागत केलं. मी गाणं शिकण्याची माझी इच्छा व्यक्त केली. "छान छान! आपण यापूर्वी गाणं शिकला आहांत का कुठं?"

"हो! लहानपणी शिकलो आहे." मी एक ठेवून दिली.

"किती वर्ष?"

"चांगला चार-पाच वर्ष शिकलो आहे!"

"म्हणता का काही?"

"हो! काय म्हणू?" जणू काय पाच-पन्नास राग माझ्या गळ्यात उड्या मारताहेत, अशा थाटात मी विचारलं.

"काहीही म्हणा. अरे बेटा उस्मान, तंबोरा काढ."
मग आतून एक पन्नास एक वर्षांचा बेटा उस्मान आला. त्यानं तंबोरे काढलं.

"काय स्वर?"

इथं पंचाईत आली. पण मी काळी चार, काळी पाच वगैरे शब्द ऎकले होते. मी मनात म्हटलं, उगीच चार-पाच नको. ते पुढं लावता येतील. एक-दोनोपासुन सुरूवात होऊ द्दा.

"माझा स्वर काळी दोन!"

"बहोत अच्छा!" उस्माननं तंबोऱ्याच्या खुंट्या पिळल्या. आणि मी प्रोफेसर माष्टर भगवानकुमारांचं नाव घेऊन सुरुवात केली : "लट उलझी सुलझा..."

पुढं काय झालं मला निटसं आठवत नाही. डोक्यात एक हातोडी बसली असावी; कारण माझ्या कपाळावर ती खूण अजून आहे. आणि दुसरी गोष्ट आठवते म्हणजे माझ्या चपलांचा जोड त्या उस्तादजींच्या घरी आहे. त्याखेरीज एकच आठवतं म्हणजे माझा स्वर ऎकल्याबरोबर म्हातारे उस्तादजी ओरडले होते, "बेवकूफ! गाणं म्हणजे काय भजी तळणं वाटलं काय तुला?"

माझ्या गाण्यात भजीवाला, माष्टर प्रो० भगवानकुमार आणि गुरांच्या दवाखान्यातले पेशंट ह्या तिघांचाही समन्वय झाला असावा.

पुन्हा त्या दिशेला गेलो नाही. आता मला तबले, तंबोरे दिसले की घेरी येते. माझ्या त्या `लट उलझी सुलझा' मध्ये अशी काय शक्ती होती, की ज्यामुळं त्या ऎंशी वर्षाच्या उस्तादाचं ऎंशी वर्ष पोटात साठलेलं पित्त खवळून बाहेर आलं, देव जाणे! पण चांगलं हातातोंडाशी आलेलं गाणं गेलं एवढंच! भारतीय संगीताचं संगीताचं दुर्दैव! नाही तर काय, एक तानसेन जन्माला येण्यापूर्वीच मेला!

भाईकाकाज लेटर टू मीरा ...

चाळीसएक वर्षांपूर्वी पु.ल. देशपांडे मुंबईत वरळीला राहात होते. त्याच परिसरात असलेल्या आदर्शनगर वसाहतीत वेगवेगळी मातृभाषा असणारी मुलं तिथल्या मैदानावर खेळताना आपापसात ज्या `इंग्लिश' (खरं तर त्या भाषेला `मिंग्लिश'च म्हणावं लागेल!) भाषेत बोलत, त्याच भाषेत पु.ल. देशपांडे यांनी त्याच कॉलनीत राहणारी श्रीमती सुनीताबाई यांची भाची मीरा ठाकूर- आत्ताची डॉ. मीरा नगरकर- हिला ती शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पाठविलेलं हे पत्र! प्रथमच घेतलेल्या टाइपरायटरवर `बिब्लिकल मेथड' नं- म्हणजे `सर्च ऍंड दाऊ शॅल फाईंड- शोधा म्हणजे सापडेल' अशा पध्द्तीनं अक्षरपट्टीवरील मूळाक्षरं शोधत शोधत स्वत:च एका बोटानं टाईप केलेलं हे पत्र... पु.ल. देशपांडे यांच्या आजवरच्या प्रकाशित वाड:मयात नसलेलं!

1, Roopali,
777, Shivajinagar, Pune-4
22/6/1977


Dearest Mira,
Got Your Letter to your dear Mai-atte in Marathi and in English to me. What lovely English you write man! I and your dear Mai-atte simply `chat ho gaya yaar!' Well, i shall also make `thoda thoda' attempt to write in my desi English- like desi ghee you know. In the fust place our haartiest congrats to you on your getting 79% marks in the S.S.C Exam. The highest number of marks this your Bhai-kaka ever got in his `Zindagi' was 60% in `drill'. How you know? i tell you how. Our Ponga Pandit Dreel Mashter (May his soul rest in peace!) said, `Right turn' and i righted my turn. So 25 marks. He said `left turn' and i lefted my turn. 25 marks. So here it became 50% Then he says `lef righ, lef and righ; like that fastam fast. i fastly and fastly do lef and righ. lef and righ. 10 marks more. 60% O.K.? Then he shouted `Staaaaand at ease' and I standed and `eased'. (If you do'nt know ask your Shivaji-Park Bhaikaka what is the meaning of ease. But don't ask him to ease." When i eased befor that Ponga Pandit Dreel Mashter he Shouted `you fool get out'. I getted out. a little wetted of course with in all 60%. But Your Mai Atte was a `bada scholar you know what. She get 198 out 200 in Maths. Really. Not bundle. And not in Dreel but in Maths. in S.S.C All you Thakur-lok Mathswala you see. Dadarwala Bhaikaka get 90% Mohan kaka 91%, your father 92% Chandukaka lost his 93% by only 60% but now he is the hightest because always in the airplane. What good joke no? Dinesh, Umesh, Sumitra, Shubha, Satish also. Of course sometime examtaker giving marks sleeping sleeping also. How much % you get in maths? Our time sala exam'ner never sleeping yaar. Always wake an exam and give small small marks. But once i made 90% marks in Math in fust standard Marathi Munisipaltywalla School, Gamdevi Bombay-6. Tell you how. Really i was getting 9%. I did some more Maths on my result card and draw one small circle before 9 and make 9% into 90%. Grandfather says - my grandfather not the teacher's grandfather - `Arey shubash - you get 90% marks in Maths, good good good. But you get 90 marks in Maths and total marks in all subject is how 89 only? How's that?' He shouted how's that so bigly that like cricket humpire I say `Out' and lift my hand with by mistake and little finger up. I was you know the bestest fass bowler in Marathi fuss Standard but was soon made Humpire by public demand. Then my Grandfather take Card to my that teacher (May his soul simply rust in peace.) Then dialogue. My Grandfather: Mr. Purshottam's Grandfather: Do total - do total. This boy (I was a boy that time)- gets 90 marks in Maths; and there is histry, there is Marathi there is jogrupy etc. etc. and you total 89? What are you doing in the school Mr. Teacher? Teaching or shaving?' Teacher Both. (G.F. Red with more more angriness.) But the teacher was right. He actually was doing both. Teaching and shaving. Part time in school and more part time in Saloon, opp. School. Then teacher looks at the Card. Starts laughing and laughing and laughing like villain in Hindi film when he pakdaos the she - hero only one in the room with her father gone to Darjiling to eat cold weather. jus like that yaar the teacher laughs. G.F. saying: What happened for laughing? Who is dancing here naked before you?' Hearing my G.F. say naked in the open class everybody laughs. Teacher shouted `Shut up' and the class shutted up. Then teacher to my G.F. Look here Mr. Purushottam's Gra fa, this is his original mark-shit. He turn 9% in 90%. Chor-ka baccha. If Purshya gets why 90 even 19 out of 100 I shall put Satyanarayana to the whole Bombay from Kulaba to Virar and give dinners to all on both the sides of the railway line. How's that?' This time i did not say out but actually ran out and never went to that school again. And here you actually make 79% and Sumitra 80% in S.S.C. yaa Allah Great. You must thank your mother and father for not teaching you and spending their time to teach other people's children and other people spending their money asking your F and M to teach them, that is not your F teaching your M or your M teaching your F, but their other people's children.

So now you go to college kya? Good good. We were happy to know that all your uncles and aunties giving you cash and kind prizes. I tell your Mai-atte to give you prizes but she says Mitra has written that you know why? Because she does not need any more prizes . What Your Mai-atte 98% 420. 2% good for Dinesh only, who pleases her by taking bath every day when in Poona and once in 15 days in Bombay. But do'nt worry your this Bhaikaka loves you so much that you tell what you want I give you. Promise. Like you i also get a letter from Sailor Sunil from Vancouver. in vancouver it seems every sailor hasto write letters. may be Post Office is free. He Writes in English to Practise his English on us. Thank God. But if he learns boxing or karate who will he practice it on? Think.

How is Girish? Our love to him. umesh as you know has joined the indian Air Force. When Sardarji join Air Force it is Hair Force and when Umesh joines Air Force it is Air Farce Do'nt, tell him this joke because when he becomes squander-leader or something like air-filled marshall he may throw a bomb on Roopali and break our earthen Kundi limbu tree. So congrats again and wish you many more 79% to 99% not like me but real, till one day some Prince-charming will pick you up as the 100% best wife for himself like i picked up your Mai-Atte.
Yours very very very Affectionately.