गणेशोत्सव महाराष्ट्रात प्रामुख्याने साजरा होत असला तरी गणेशाची देशभरातही अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे आहेत. त्या सर्वांची माहिती देणे अशक्य आहे. अनेक जैन, बौद्ध मंदिरात गणपतीची मूर्ती स्थापन केली आहे. त्यापैकी काही महत्त्वाच्या मंदिराची ही माहिती.

लुप्त गणपती क्षेत्रे
मंगळाने कठोर तपस्या करण्याच्या उद्देशाने नर्मदा किनारी एका ठिकाणी गणेशाची स्थापना केली होती. शास्त्रांमध्ये या ठिकाणाचा उल्लेख 'पारीनेर' या नावाने केला आहे परंतु हे ठिकाण कोठे ते नेमके माहित नाही.

'बल्लाळ विनायक' या नावाने एका क्षेत्राचा उल्लेख शास्त्रात आहे. हे क्षेत्र सिंधुदेशात कोठे तरी एका ठिकाणी आहे. परंतु संपूर्ण माहिती हाती नाही.

महर्षी कश्यप यांनी आपल्या आश्रमात वक्रतुंडाची प्रतिमा स्थापन करून तप केले होते. पण हा आश्रम कोणत्या ठिकाणी आहे त्याची माहिती उपलब्ध नाही.

तेलंगणातील अनल असुराचा वध करण्यासाठी गणपतीने अवतार घेतला होता. याचा उल्लेख जरी मिळत असला तरी त्या ठिकाणाची माहिती मिळत नाही.

दक्षिण भारतातील गणेश मंदिरे

मदुराई जिल्ह्यातील तिरूप्परंकुम पर्वताच्या कुशी‍त भव्य गणेश मंदिर आहे. या ठिकाणी स्वामी कार्तिकेय यांचा विवाह झाला असल्याची दंतकथा आहे. अगदी जवळच 'शर श्रवण' नावाचा प्राचीन तलाव आहे.

बारा ज्योर्तिलिंग व चार धामांपैकी रामेश्वरम् द्वादश हे एक धाम असून येथे श्रीरामाने प्रथमत: गणपती आणि नंतर रामेश्वर लिंगाची पूजा केली होती.

तिरूच्चिरापल्ली येथील ‍तीन शिखरांमधील सर्वांत उंच शिखरावर गणपतीचे अतिप्राचीन मंदिर असून हे मंदिर 'उचिपिल्लेयार' या नावाने प्रसिद्ध आहे.

पॉंडेचरीच्या समुद्रकिनारी परदेशी लोकांनी बनविलेले एक मंदिर आहे.

कन्याकुमारी येथे हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र हे ज्या ठिकाणी एकत्र मिळतात तेथे गणपतीचे मंदिर आहे. या मंदिराचे दर्शन केल्यावरच कुमारिकादेवीचे दर्शन घेतले जाते.

गोकर्णात सिद्ध गणपतीची मूर्ती आहे. या मूर्तीच्या डोक्यावर रावणाने आघात केल्याचे चिन्ह आहे.

श्वेत विघ्नेश्वर क्षेत्र
अमृत मंथनाच्यावेळी देवांना अमृत मिळाले नाही. तेव्हा देवांनी भगवान विघ्नेश्वराची आराधना केली. त्याचा वर मिळाल्यावर देवांना अमरत्व मिळाले. दक्षिण भारतातील प्रसिद्ध तिर्थस्थान आहे. ते कावेरी किनारी आहे.

उत्तर भारतातील गणेश मंदिरे
उज्जैनमध्ये प्रसिद्ध ज्योर्तिलिंग महाकालेश्वराचे मंदिर आहे. तसेच सहा प्राचीन विनायक मंदिरे आहेत.
१. प्रमोद विनायक २. मोद विनायक ३. दुर्मख विनायक ४. सुमुख विनायक ५. अविघ्न विनायक ६. विघ्न विनायक.

श्री लक्ष्मणाने स्थापन केलेले गणेश तीर्थही उज्जैनमध्ये आहे. अमरकंटकच्या महर्षी भृगुच्या आश्रमात सिद्धी विनायक गणेशाची मूर्ती आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्ये म्हणजे गणपतीला दोन भुजा आहेत.

जोधपूर येथील मुख्य शहराजवळील घटियाला गावात राजस्थानी शैलीचा स्तंभ आहे. या स्तभांच्या चारही बाजूने गणेशाची प्रतिमा आहे. हा स्तभ इ.स. ८८२ साली बांधलेला असल्याचे लिहिले आहे.

रणथंबोर येथील राजस्थानच्या सवाई माधोपूर जवळ असलेल्या पर्वत रांगेच्या मध्यभागी अतिप्राचीन गणेश मंदिर आहे. या मंदिरात स्थापित गणेशाला लग्नसमारंभाप्रसंगी आणि शुभ कार्यासाठी प्रथमत: निमंत्रण दिले जाते. दरवर्षी येथे हजारो लग्नपत्रिका प्राप्त होतात.

वृदांवन येथे मोठ्या गणपतीचे प्रसिद्ध मंदिर आहे.

वाराणसी येथे वाराणसीमध्ये गणपतीची अनेक मंदिरे आहेत. ढूंढीराज गणपतीचे प्रसिद्ध मंदिर येथे आहे. याशिवाय काशीतील ५६ गणपती मंदिराचा उल्लेख पुराणात मिळतो.

महाराष्ट्रातील गणेश मंदिरे
कदंबपुर येथे इंद्राने महर्षी गौतमाच्या शापापासून मुक्ती मिळविण्यासाठी येथे चिंतामणी गणेशाची स्थापना करून त्यांची आराधना केली होती. हे ठिकाण यवतमाळ जिल्ह्याजवळ आहे.

भालचंद्र गणेश क्षेत्र हे चंद्राने या ठिकाणी गणपतीची आराधना केली होती. हे ठिकाण परभणीपासून ५० किलोमीटर गोदावरी नदी किनारी आहे.

चिंतामणी गणेश क्षेत्र हे ब्रम्हदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण करण्याचे कार्य सुरू केले तेव्हा त्यामध्ये अनेक विघ्न आले. हे विघ्न दूर करण्यासाठी ब्रम्हाने गणेशाची स्थापना करून त्याचे स्तवन केले. हे मंदिर पुण्यापासून २४ किलोमीटर 'थेऊर' येथे आहे.

मणिपूर क्षेत्र हे त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी शंकराने महागणपतीची आराधना केली होती. हे ठिकाण पुण्यापासून ५० किलोमीटर आहे. या ठिकाणाला 'महोत्कट' गणेशाच्या नावाने ओळखले जाते.

अमलाश्रम क्षेत्र हे यमराजाने आपल्या आईच्या शापातून मुक्ती मिळविण्यासाठी श्रीगणेशाची स्थापना करून कठोर तपस्या केली होती. ही मूर्ती 'आशापूरक-गणेश' या नावाने प्रसिद्ध आहे. हे ठिकाण जालन्यापासून ३५ किलोमीटर आहे.

मराठी साहित्याच्या प्रारंभ काळापासून गणेशाचे उल्लेख आहेत. मराठी भाषेमधील आद्य वाङमयकार असलेल्या महानुभाव पंथातील कवी नरेंद्र यांच्या रुक्मिणी स्वयंवर ग्रंथात गणपतीचा असा उल्लेख येतो -


“तेया गणरायाचे उदार रूपडे
थोरपण जिंकले होडे ।

कवीस शब्दब्रह्मीची राणिव कोडे,
जेणे पाहिले तो सिंदुरे आंडंबरे ।।

गोर मेरू जसा, तयाचे ठायी सिद्धीचे सर्ग,
नानाविध वसती भोग ।

तेण आधारे अग्नेय सुखावले।।”



ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतील खालील नमनाची ओवी सुप्रसिद्ध आहे -

ओम नमोजी आद्या | वेदप्रतिपाद्या |
जयजय स्वसंवेद्या | आत्मरूपा ||
देवा तुचि गणेशु| सकलमतिप्रकाशु|
म्हणे निवृत्तीदासु | अवधारिजोजी ||

नामदेवांनीही गणेशस्तवनाचा अभंग लिहिला आहे. त्यात ते म्हणतात -

लंबोदरा तुझा, शोभे शुंगदंड करितसे खंड दुश्चिन्हांचा ||
चतुर्थ आयुधे शोभतासी हाती भक्ताला रक्षिती निरंतर ||

तुकोबा गणपतीला नाचत येण्याची विनंती करतात -

गणराया लौकरी येई । भेटी सकलांसी देई ।।
अंगी सिंदूराची उटी । केशरकस्तुरी लल्लाटी ।।
पायी घाग-या वाजती । नाचत आला गणपती ।।
तुका म्हणे पाही । विठ्ठल गणपती दुजा नाही ।।