घोसाळगड उर्फ वीरगड हा किल्ला रायगड जिल्ह्यामधे आहे. दुर्गसंपन्न असलेल्या कोकणातील रायगड जिल्ह्यामधे रोहे तालुका आहे. रोहे तालुक्यात घोसाळगडाचा किल्ला आहे.

मुंबई-पुणे या महानगरांशी रोहे हे गाडीमार्गाने जोडले गेले आहे. शिवकालापासून प्रसिध्द असलेले रोहे गाव कुंडलिका नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले आहे. मुंबई - पणजी महामार्गाच्या पश्चिमेकडे असलेल्या रोहे येथे जाण्यासाठी महामार्गावरील नागोठेणे तसेच कोलाड येथून फाटे आहेत. तसेच रोहे हे कोकण रेल्वेवरील महत्त्वाचे रेल्वे स्थानकही

आहे.

रोहे येथून मुरुड या सागरकिनार्‍यावरील गावाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यापैकी एक चणेरे - बिरवाडी कडून कुंडलिका नदीच्या किनार्‍याने जातो. तसेच दुसरा मार्ग घोसाळगडाकडून भालगाव मार्गे जातो. याच मार्गावर घोसाळगडाचा किल्ला आहे. चारही बाजुंना लहान मोठय़ा डोंगरांच्या मधे घोसाळगड विराजमान झालेला आहे. समुद्र सपाटीपासून २६० मीटर उंच असलेल्या घोसाळगडाचा आकार दूरुन शिवलिंगासारखा भासतो.

रोहे एस.टी. स्थानकावरून घोसाळगडाला जाण्यासाठी एस.टी.बसेसची सोय आहे. साधारण तासाभरात आपण घोसाळगड गावात पोहोचतो. गडाच्या पायथ्याला घोसाळगड गाव आहे.

गावातूनच गडावर जाणारा रस्ता आहे. रस्ता संपल्यावर पायर्‍यांचा मार्ग केलेला आहे. या पायर्‍यांच्या मार्गावर भवानी मातेचे मंदिर असून त्यापुढे गणपतीचे प्रशस्त मंदिर आहे. मंदिरामधील गणेशमुर्ती स्वयंभु आहे. गणेशाला वंदन करुन चढाई सुरु करायची पंधरावीस मिनिटांमधे आपण गडाच्या तटबंदीजवळ येऊन पोहोचतो.

कातळात कोरलेल्या पायर्‍या समोर दिसतात. यातील काही पायर्‍या तोफांच्या मार्‍यामुळे उध्वस्त झालेल्या आहेत. या पायर्‍यांवरुन वर पोहोचल्यावर मधेच काही चांगल्या पायर्‍या लागतात. या पायर्‍या आपल्याला दरवाजापर्यंत घेऊन जातात. मात्र येथील प्रवेशव्दार पूर्णत: नष्ट झालेले आहे. त्याचे अवशेष येथे विखूरलेले आहेत. या अवशेषांमधे वाघांची चित्रे कोरलेले दगडही पहायला मिळतात. येथून थोडे वर दारूगोळ्याचे कोठार म्हणून जागा आहे.

येथून पुढे गेल्यावर गडाचे दोन भाग पडतात. एक माचीकडील तर दुसरा बालेकिल्ल्याकडील अरुंद असलेल्या डोंगर सोंडेवर तटबंदी बांधून ही माची तयार केलेली आहे. तटबंदीवर चढण्यासाठी पायर्‍या आहेत. या तटबंदीमधे त्याकाळातील शौचकूप पहायला मिळतात. माचीच्या टोकावर पुर्वी एक तोफ पडलेली होती. माची पाहून आपण बालेकिल्ल्याकडे प्रस्थान करायचे बालेकिल्ल्याच्या उंचवटय़ावर पाण्याच्या कोरीव टाक्या, घरांचे अवशेष, माथ्यावर किल्लेदाराचा वाडा असल्याच्या खुणा आढळतात.

गडाच्या माथ्यावरुन तळागडाचे दर्शन मनाला सुखवून जाते. कुडे मांदाडच्या खाडीचे दृष्य आपल्याला खिळवून ठेवते. शिवकालामधे स्वराज्यात असलेला घोसाळगड पूर्वी निजामशाही मधे होता. छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडाच्या समर प्रसंगात अडकलेले पाहून जंजिर्‍याच्या सिध्दीने घोसाळगडाला वेढा दिला होता पण अफझलखान मारला गेल्याचे कळल्यावर सिध्दी वेढा उठवून पळून गेला. पुढे पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी घोसाळगड मोगलांना दिला नाही. तो आपल्याकडेच राखला. असा हा महत्त्वाचा किल्ला दुर्लक्षित आहे.

गडदर्शन करुन आल्यावाटेने उतरुन परतीचा मार्ग पकडता येईल. अथवा येथून चालत तीन तासांच्या पायपिटीनंतर बिरवाडीच्या किल्ल्याला जाता येते. बसने तळा किल्ला अथवा जंजिरा किल्ला ही गाठता येईल.