पण ते ग्लोबलायझेशनचं ?
राज : ग्लोबलायझेशनची भाषा आधी सर्व प्रांतांना शिकवा मग महाराष्ट्राला शिकवा. हीच गोष्ट तुम्ही करुणानिधी, चंद्राबाबू नायडूंना सांगा. त्या दिवशी त्या शिवाजी पार्कवर चंद्राबाबू नायडूंनी इंग्रजीत भाषण केलं. तिथल्या प्रेक्षकातल्या कुणाला कळत होती ती भाषा? चंद्राबाबूंना तेलगू, इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी शिका, हिंदी बोला असं सांगण्याची हिंमत आहे अमरसिंहाची? कुणाचीच! ग्लोबलायझेशन म्हणजे आपली भाषा, आपली संस्कृती मारून टाकणे असा होत नाही. जे इथलं-महाराष्ट्रातलं आहे, तेच ही माणसं नाकारताहेत. मारायला बघताहेत. या यु.पी.-बिहारच्या भैय्यांना माझी विनंती आहे की, हा प्रयोग त्यांनी गुजरात, तामिळनाडू, प.बंगाल, केरळ,कर्नाटकमध्ये करून दाखवावा. काय होतं ते मला येऊन सांगावं...शिवाय इतर कुणाच्याही बाबतीत असं महाराष्ट्रात होत नाही. कारण बाकी प्रांतीय महाराष्ट्रात येऊन असं करत नाहीत. सर्वत्र गरबे होतात, दांडिया होतात का नाही? आपल्याला असं वाटतं का की हे राजकीय ताकद दाखवताहेत म्हणून? शिवाय मला सांगा, महाराष्ट्रात इतर अनेक प्रांतातले नेते राहतात, गुजराती राहतात,तेलगू राहतात, तामिळी राहतात, मारवाडी राहतात, पंजाबी राहतात. आपण कुणी असं बघितलंय की त्यांनी मोबिलाइझ्‌ड होऊन त्यांच्या प्रांतातल्या नेत्यांना बोलावलंय म्हणून...किंवा त्यांच्या प्रांतातल्या नेत्यांना ते विचारताहेत कुणाला मतदान करू म्हणून...? ह्यांनाच का लागतात हयांचे नेते आणायला उत्तर प्रदेश-बिहारमधून इकडे...चीन आपली भाषा संस्कृती टिकवून आपला विकास करतोय. फ्रांस आपली भाषा-संस्कृती टिकवून आपला विकास करतोय. भारतातल्या प्रत्येक राज्याची स्थितीही तीच आहे. उपदेश फक्त्त महाराष्ट्राला?

पण कायदेविषयक आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात, तेव्हा विकासावर त्याचा परिणाम होतोच?
राज : कायदा-सुव्यवस्था मुळातून कायमची विस्कटू नये ह्या यु.पी-बिहारवाल्यांमुळे म्हणून रस्त्यावर उतरावं लागलं एखादा दिवस. यातून सर्वांनी धडा घ्यावा. शिवाय कायदा पाळण्याला आंदोलन म्हणत नाहीत. भगतसिंगांपासून ते महात्मा गांधींपर्यंत कुणालाही आंदोलन करायचं झालं, तर कायदा तोडावा लागला. आणि आम्ही कोणता कायदा तोडला? सांगा ना मला. कायदे तोडण्याचे त्यांचे प्रकार आणि पद्धती वेगळ्या असतील. पण कायदेभंग झाला, आंदोलनं झाली की कायद्यातली त्रुटी पण कळते आणि राज्यकर्त्यांना जाग पण येते. (एकदम आठवल्यासारखं) मघाशी ते तुम्ही ग्लोबलायझेशन आणि संकुचितपणाचे दाखले दिलेत ना!

ते वेगवेगळे मुद्दे आहेत...
राज : मी ते एकत्रित घेऊन दाखवतो ना चालेल?

हं.
राज : ग्लोबलायझेशन असलं तरी अमेरिका चिनी माल थांबवतेच ना? तुमचे ग्लोबलाईज्ड अर्थमंत्री पी. चिदंबरम तामिळी वेशातच लोकसभेत येतात ना ? तुमचे ते संरक्षणमंत्री ए. के. अँटनी मल्याळी वेशातच सव्वीस जानेवारीची परेड अटेन्ड करतात ना? फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष सरकोझी भारतात आले की, पंतप्रधान मनमोहनसिंग शिखांना फ्रांसमध्ये पगडी वापरू देत नाहीत त्याची रदबदली करतात ना? ते भारताचे पंतप्रधान आहेत ना? मग? मलेशियात तामिळींना त्रास झाला की करुणानिधी इथून मलेशियाला दोष देतात. मग त्यांच्यासाठी म्हणून भारत सरकार मलेशियाच्या अंतर्गत व्यवहारात पडते ना? ते चालतं ना? इंदिराजींच्या हत्येला कारण ठरलेल्या खलिस्तानी आंदोलनाचा नेता खतरनाक अतिरेकी जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचं चित्र पंजाबातल्या दमदमी टाकसाळमध्ये ’संत’ म्हणून लागतं. त्याबद्दल अतिरेकी प्रांतवाद म्हणून कुणी फार आवाज उठवत नाही ना? राजीव गांधींच्या हत्येसारख्या आरोपात गुंतलेल्या जागतिक अतिरेकी संघटनेशी ’एल.टी.टी.ई.’शी - तामिळनाडूतले सर्व राजकीय पक्ष प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध ठेवतात ना? ते केवळ तामिळी संस्कृतीचे घटक आहेत म्हणूनच ना? अशी अनेक उदाहरणं देईन मी. हे सगळे प्रांतवादी नाहीत. यांना राज्यघटनेची दुहाई दिली जात नाही. आवरून घ्यायचं ते फक्त मी. राज ठाकरेने. का? मी महाराष्ट्राचा आहे म्हणून? महाराष्ट्राचे बाकी नेते उत्तरेसमोर ताठ कण्याने उभे न राहता गलितगात्रासारखे उभे राहतात, त्याचं हे फलित आहे. मला उत्तरेची काही पडलेली नाही, मला भैय्यांच्या मतांची काही पडलेली नाही. मला महाराष्ट्राची काळजी आहे. राज्यघटनेच्या आडून वार करू पाहणार्‍या उत्तर प्रदेश-बिहारी भैय्यांची थेरं मी, माझा पक्ष आणि महाराष्ट्रातली सामान्य जनता अजिबात सहन करणारी नाही. यापुढे अजिबात नाही! नाही म्हणजे नाही आणि राज्यघटना एका मराठी माणसाने लिहिलीय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांचं ऋण हे लोक मानतील की नाही?

यावरून एक प्रश्न. तुम्ही मायावतींच्या सभेच्या वेळी काही बोलला नाहीत ते ?
राज : (क्षणभर थांबून) चांगला प्रश्‍्न! तुम्हाला हे माहिताय का? महाराष्ट्रासंदर्भात. छत्रपती/महात्मा शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर-मायावतींनी त्यांच्या नावाची उत्तर प्रदेशात नगरं वसवलीत. शाहू नगर, आंबेडकर नगर वगैरे. आपल्याला इथल्या नेत्यांनी शाहू ,फुले, आंबेडकरांचं नाव सांगत फक्त्त मतं मिळवलीत. महाराष्ट्रातले तीन दिग्गज मराठी समाजसुधारक नेते मायावतींनी उत्तर प्रदेशात नेले. बाकीच्या सर्व भैय्यांनी उत्तर प्रदेशातले सगळे गाळ-टाकाऊ नेते महाराष्ट्रात बोलावून आणले. मायावतींचा आणि महाराष्ट्राचा हा असा ऋणानुबंध आहे. जो महाराष्ट्राचे ऋण मानतो, त्याला मी मानतो. मला व्यक्तिगत काही नको. तुम्ही महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीला माना, ती स्वीकारा. बस. मायावतींनी तिथलं राजकाराण अजून इथे आणलेलं नाही. महाराष्ट्राची सामाजिक संस्कृती काय ते त्यांना कळलं असेल नि त्या ती उत्तर प्रदेशात नेत असतील, तर ती चांगली गोष्ट आहे. त्यांच्यावर कशाला टीका करायची? महाराष्ट्र संस्कृती नष्ट करायच्या मिषाने जे लोक येतात त्यांना आमचा विरोध आहे!

एकेकाळी हेच तर शिवसेना म्हणायची... तुमचं पुढं शिवसेनेसारखंच होणार नाही कशावरून?
राज : शिवसेना पक्षासारखं माझं होणार नाही, कारण माझ्या पक्षाचं नाव पुरेसं स्पष्ट आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना. महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राबाहेर मला जायचंच नाही. या एका राज्याचं तर भलं करू दे.. महाराष्ट्राच्या बारा कोटीमध्ये साडेदहा कोटी अजूनही मराठी आहेत. हे विसरून कसं चालेल?

शिवसेना आता एकीकडे मराठी प्रांतवाद खपवून घेणार नाही म्हणतेय तर त्याच वेळी परप्रान्तीयांना पार्सल करू असा लटका विरोध करत्येय. तुमचं मत?
राज : हा शिवसैनिकांनी ठरवायचा मुद्दा आहे. तेच ठरवतील.

त्यांची घुसमट होत असेल का? उत्तर मुंबई छप्पन उपशाखप्रमुख यु.पी.-बिहारचे आहेत. समाजवादी पार्टीच्या ज्या मुन्ना त्रिपाठीने शिवसेनाप्रमुखांवर केसेस घातलेल्या होत्या, त्याला आता शिवसेनेने सन्मान दिला...
राज : मला शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणावर बोलायचं नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. ते काय ते ठरवतील...!

तुम्हाला या प्रकरणात अटक होईल असं वाटतं?
राज : होऊ दे. गांधीजी, नेहरु दहा-दहा, पंधरा-पंधरा वर्षे जेलमध्ये राहिलेत. बाळासाहेब राह्यलेत तुरुंगात. माझ्या अनेक कार्यकर्त्यांना पकडलंय पोलिसांनी...दिल्ली महाराष्ट्रविरोधी आहे, ते मला अटक करतीलच, महाराष्ट्रातल्या मराठी स्वाभिमानाला ठेचणे हा त्यांचा एकमेव अजेंडा आहे. मला अटक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा. मी माझा निर्णय घेईन.

काय वाटतं?
राज : कशाबद्दल?

तुमच्या कार्यकर्त्यांची धरपकड आणि त्यांच्यावर पोलिसांची दमनयंत्रणा चालली आहे
त्याबद्दल ?
राज : सरकार समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लाड करतं. त्यांना पकडत नाही. अर्थात ज्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत त्यांनाच पकडतात. पण हे दुर्दैवी आहे. माझे कार्यकर्ते शिकले-सवरलेले आहेत. त्यांना उत्तम करियर्स आहेत. शिवाय जनता उत्स्फूर्तपणे आमच्यामागे आहे. कुणाकुणाला पकडतील हे...! हे का खदखदतंय? उत्तर प्रदेश बिहारच्या लोकांबद्दलच का खदखदतंय हे? पारशी, गुजराती, मारवाडी, पंजाबी, सिंधी लोकांबद्दल नाही वाटलं कुणाला हे. ते आक्रमक आहेत असं वाटलं नाही आपल्याला कधी ते? पण माझे कार्यकर्ते महाराष्ट्रासाठी रस्त्यावर उतरले, तर तुम्ही गुंड म्हणताय. गुंड म्हणून दाखवताय...

पुन्हा एकदा मूळ विषयाकडे येतो. मराठी विरुद्ध भैय्ये असा आगडोंब का उसळला ?
राज : हे कालचं आणि आजचं नाहीए. तत्कालिक निमित्त सोडून द्या. माझं भाषण वगैरे. (थांबून) त्यातही मी काही वावगं, बेकायदेशीर बोललोच नव्हतो. या हिंदी न्यूज चॅनलच्या गुंडांना माझं आव्हान आहे. माझी अख्खी भाषणं त्यांनी चालवावीत. त्यातला बेकायदेशीर भाग शोधून दाखवावा. चॅलेंज आहे माझं. पण त्यांना माझ्या मूळ म्हणण्यात रस नव्हताच. त्यांना महाराष्ट्र-मुंबई-मराठी संस्कृती या सर्वांवर उत्तरेतल्या गुंडगिरीचा वरवंटा फिरवायचा आहे. मी मध्ये अडथळा नसतो तर... आपले सर्व नेते एकतर या भैय्यांना दबलेत तरी किंवा भागीदारीत त्यांनी महाराष्ट्र विकायचा करार तरी केलाय... मराठी विरुद्ध भैय्ये या आंदोलनाचं कारण म्हणजे गेल्या काही वर्षांत ज्या पद्धतीने हे बिहारी-उत्तर प्रदेशी पसरताहेत, त्यांचा हेतू शुद्ध नाहीए. सुरुवातीला बिचारा म्हणून येणार, मग फॅमिली येणार, मग गावातली माणसं बोलवत राहणार ... आता तुम्हीच मला सांगा, मुंबई-ठाणे-पुण्यासारख्या शहरात टॅक्सी-रिक्षा ज्या चालतात, तो टॅक्सी-रिक्षवाला कोण आहे ? त्याची आयडेन्टिटी काय आहे ? एका परमिटवर हे लोक चार-चार माणसं घुसवताहेत... ही कशाची लक्षणं आहेत ?

पण अमिताभ बच्चनवरचं-
राज : अमिताभ बच्चनपासून सुरुवात केली कारण मोठ्यांची उदाहरणं दिल्याशिवाय गोष्टी पटत नाहीत. इतक्या मोठया कलावंताला जर आपल्या प्रांताबद्दल प्रेम असेल, तर राज ठाकरे हा छोटा माणूस आहे, त्याला स्वतःच्या प्रांताबद्दल प्रेम वाटलं तर चूक काय ? मध्यंतरी मी त्यांचं एक क्लिपिंग बघितलं एका चॅनलवर... त्यात ते म्हणाले होते, ‘मैं दिल्ली रहा, कलकत्ता रहा, बम्बई रहा (मुंबई नाही!) मगर मेरी पहचान तो ’छोरा गंगाकिनारेवाला’ ही रही है।‘ याचा अर्थ काय होतो ? तुम्हाला या देशाने सुपरस्टार केलंय... उत्तर प्रदेशने नाही केलं... तुमचे चित्रपट पाहायला सर्व देशाने, ज्यात आम्ही पण आलोच... रांगा लावल्या... पण तरीही इतक्या मोठ्या कलावंताला जर आपल्या प्रांताबद्दल प्रेम वाटतं, तर मला नसणार का? का नसणार? एवढाच माझा विषय होता. यापलीकडे काहीच नव्हता...

पण मग बाळासाहेब ठाकरेंनी अमिताभना पाठिंबा देऊन तुमच्यावर अप्रत्यक्ष टीका केलीय ते काय आहे ?
राज : तुम्ही ब्याऐंशी वर्षाचे झालात की कळेल तुम्हाला.

म्हणजे ?
राज : या विषयावर मी नाही बोलणार अजून. पण एक सांगतो की, प्रबोधनकारांचंच मराठी माणसांचं महाराष्ट्राचं प्रेम बाळासाहेबांमध्ये आहे, असं पिढयांमधून आलंय माझ्यात ते. (गप्प बसतात काही क्षण)

जया बच्चन तुम्हाला ओळखत नाहीत म्हणाल्या ?
राज : त्या ’जया अमिताभ बच्चन’ नाही तर अमरसिंहाच्या समाजवादी पक्षाच्या खासदार बोलल्या. ज्यांना माझ्या जमिनी माहीत आहेत; पण मला त्या नाही ओळखणार ! मी जे बोलतोय त्यावर जया बच्चन यांच्याकडे काही उत्तर आहे का? आपल्या मेकअपमनसाठी मराठी पिक्चरमध्ये अमिताभनी तीन मिनिटांचं गाणं केलंय, ते त्यांचे महाराष्ट्रावरचे उपकार मानायचे?

तुमचं उत्तर ?
राज : छे! छे! हा काय कलगीतुरा आहे का? तुम्हा लोकांची ही कामं आहेत... आगी लावण्याची.

पण बर्‍याच मराठी लोकांना जया बच्चनांचं बोलणं संधिसाधुपणाचं वाटलं. आवडलं नाही...
राज : मग त्या लोकांनी जया बच्चन यांच्याशी बोलून घ्यावं ! (हसतात)

पण राज, आजच्या ग्लोबलायझेशनच्या जगात असं तुम्ही संकुचितपणाचं महाराष्ट्रापुरतं कसं बोलू शकता? आणि हिंसक आंदोलन? तलवारींची भाषा?
राज : पहिल्यांदा आपण हिंसकपणाबद्दल बोलू या. या भैय्यांनी इथे येउन मुंबईत, पुण्यात, नाशिकात लाठयाकाठयांची भाषा करायची, आजमगढहून वीस हजार गुंड बोलाविण्याची भाषा करायची आणि मी काय, उत्तर प्रदेश दिन, छटपूजा, लाईचना संमेलन, उत्तरायण साजरं करू? म्हणजे महाराष्ट्राला काय या भैय्यांच्या गोठयात नेऊन बांधायचंय आपण? महाराष्ट्र ही आपली भूमी आहे. इथे येऊन या भैय्यांनी लाठयांची भाषा केली, तर ताबडतोब त्यांना थांबवलं पाहिजे.

पण हे सारं राज्य घटनेच्या विरोधात नाही का? कुणालाही कुठेही देशात जाण्याची...
राज : (तोडत) काय तरी काय बोलताय तुम्ही? अहो, राज्यघटना ही एक व्यवस्था सांगणारी नियमावली आहे. आपण तिचा आदर आणि पालन केलं पाहिजेच. पण तिच्या मूलभूत तत्त्वाचं. राज्यघटनेतले तपशील बदलत असतात. अहो, घटनादुरुस्ती होत नाही का? घटनाकारांनी घटना बनवताना विचारात न घेतलेले नवे प्रश्न आज निर्माण झालेत. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आताची वेगळी आहे. तेव्हा देशाची देशातल्या शहरांची लोकसंख्या काय होती? आता काय आहे? शेवटी राज्यघटना ही देशातल्या जनतेच्या सुख, समाधान, स्वातंत्र्य व विकासासाठी आहे. लोक राज्यघटनेसाठी नाहीत. राज्यघटना लोकांसाठी आहे. आणि हा राग काय माझा एकट्याचा आहे का? शीला दीक्षितही तेच बोलल्या, मध्यंतरी प्रभा राव तेच बोलल्या, आसाममध्ये हेच बोलताहेत, हे जे पत्रकार माझ्या बद्दल गरळ ओकताहेत त्यांनी आसाममध्ये जाऊ न याच गोष्टी कराव्यात...तिथून जिवंत आले तर परत बोलू आपण...शिवाय तुमचा तो कोण अमेरिकन म्हणाला नव्हता का, प्रत्येक पिढीची घटना वेगळी असते म्हणून!

थॉमस र्जेफर्सन.
राज : तेव्हा र्जेफर्सन, आता राज ठाकरे! (हसतात) राज्यघटनेत असं लिहिलंय का की, स्थानिकाचं पोट मारून बाहेरच्या बेकारांना काम द्या म्हणून...आज माझ्याकडे एक असाच पत्रकार आला होता. तो काही वर्षे इथे राहतोय त्याला मराठी सोडाच... हिंदी पण येत नव्हतं... हे इतर प्रांतात चालेल का? इतर प्रांतात सर्व व्यवहार त्यांच्या भाषेत, त्यांच्या पाट्या त्यांच्या भाषेत, इथे मात्र मुंबई महानगरपालिकेत मराठी सोबत हिंदी आणायला बघताहेत. हे सांस्कृतिक आक्रमण आहे. हे मी होऊ देणार नाही. नाही म्हणजे नाही.

मिस्टर राज ठाकरे व्हॉट्‌स रॉंग विथ यू? असा प्रश्न तुम्हाला सगळे चॅनल्स आणि हिंदी-इंग्रजी पत्रकार विचारताहेत. गेले काही दिवस हाच प्रश्न वेगवेगळया प्रकारे तुमच्या पुढयात येऊन पडतो आहे. तुमचं त्यावरचं उत्तर?
राज : नथिंग इज रॉंग (हसतात). काही रॉंग नाही. चाललंय ते बरं चाललंय. ज्यांना वाटतंय की रॉंग चाललंय त्यांनी आपले कान आणि डोळे तपासून घ्यावेत. हे जे हिंदी भाषिक पत्रकार, हिंदी चॅनल्स माझ्याबद्दल-महाराष्ट्राबद्दल बोलताहेत ते मुळात पत्रकार आहेत का?

पण ते ओरडून ओरडून तुम्हाल गुंड म्हणताहेत...
राज : त्यांच्या ओरड्याने मी थोडाच गुंड ठरतो? आणि ह्यांच्या दादागिरीला दाबणं ही गुंडगिरी असेल, तर ही गुंडगिरी मला मान्य आहे.

पण मख्य प्रश्न बाजूलाच राहिलाय?
राज : तो काय?

हिंदी भाषिक पत्रकार -
राज : (तोडत) हे जे, ज्यांना तुम्ही पत्रकार म्हणताय ते पत्रकारितेचे साधे निकषसुद्धा पाळत नाहीएत.

पण -
राज : (तोडत) माझं पूर्ण करू दे मला आधी. तेच नेमकं करतात ते. पूर्ण बोलूच देत नाहीत आमच्या लोकांना. त्यांच्या अडचणीचा मुद्दा आला की माईक बंद. पुन्हा हेच फिर्यादी आणि हेच न्यायाधीश. म्हणे, ’राज के गुंडो ने हमला किया.’ मुळात पहिली गोष्ट म्हणजे ह्या हिंदी भाषिक पत्रकारांनी पत्रकारिता गुंडाळून ठेवलीय आणि हे स्वतः हिंदी भाषिक प्रांतवादी झालेत, विशेष करून यु.पी. -बिहारवाले. या अ‘‘या प्रकरणामध्ये हे असेच वागताहेत, हे मला शिकवणार वरती ! मी उत्तर प्रदेश, बिहारवर बोललो म्हणून !

पण का असं ? त्यांची काही दुश्मनी आहे का तुमच्याशी ?
राज : होय. आहे. मी महाराष्ट्र, मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी माणसाबद्दल बोलतो ना ... त्यामुळे मी त्यांच्या मध्ये येतो.

पण त्याने काय होतं ?
राज : अहो, काय होतं काय? त्यांना उत्तर प्रदेश-बिहारमध्ये नोकर्‍या का नाही मिळाल्या? इतका पुळका आहे नं, यांना उत्तर प्रदेश-बिहारचा...

त्याचा इथे ....
राज : (तोडत) ऐका. महाराष्ट्र जो काही घडलेला आहे, तो महाराष्ट्रीय, मराठी माणसाच्या शिस्तप्रियतेतून, सहिष्णुतेतून, उदारमतवादीपणातून. मुंबईच्या मोठेपणात मराठी माणसाबरोबर कुणाचा हात असेल, तर तो पारशी समाजाचा, गुजराती माणसाचा, मारवाडी समाजाचा, काही प्रमाणात सरदारजी-पंजाब्यांचा. पण या यु.पी.-बिहारवाल्यांना मुंबईतून वरण,भात, तूप, पोळी पाहिजे आणि वर हे मुंबईत मराठी माणसावर दादागिरी करणार... त्यांचा महाराष्ट्रावर राग आहे याचं कारण यांचा छुपा अजेंडा आहे. मुलायमसिंह आल्यावर घोषणा दिल्या गेल्या... ‘उत्तर प्रदेश तो झॉंकी है, अभी महाराष्ट्र बाकी है ! ‘

पण बिचार्‍या टॅक्सीवाल्यांना, भेळपुरीवाल्यांना धोपटून काय होणार ?
राज : एखाद्या भैय्या टॅक्सीवाल्याला एकटे भेटा तुम्ही. काय अनुभव येतो तुम्हाला ? एखाद्या मच्छीवाल्याला एकेकटे भेटता, तेव्हा काय अनुभव येतो तुम्हाला ? भैय्या पत्रकाराला तर आपणच दिल्ली चालवतो असं वाटत असतं. ही दादागिरी त्यांना मुंबईत चालवायचीय. मी ती चालू देणार नाही. छठपूजा करतात, दादर चौपाटीवर जातात, उत्तर प्रदेश दिन साजरे करतात, तेव्हा हा बिचारा पानवाला, बिचारा टॅक्सीवाला, बिचारा मच्छीवालाच जातो ना ? हा बिचारा नंतर राहत नाही. सिनेमात दाखवतात, त्याप्रमाणे हा भैय्या बोरीबंदर स्टेशनवर उतरतो त्या तेवढयाच दिवशी बिचारा असतो. नंतर त्याला महाराष्ट्रात काम मिळालं की तो बिच्चारा राहत नाही. तो उत्तर प्रदेशचा होतो, बिहारचा होतो. आणि मग त्याची दादागिरी सुरू होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांची राजकीय उद्दिष्टे पुरी होऊन देणार नाही.

पण नेमका काय प्रश्न आहे या सगळयांचा ?
राज : असं आहे... चॅनल चालवतात यु.पी.-बिहारमधले भैय्ये पत्रकारच ! त्यांना मी डोळयात सलतोय. पण मी सांगतो की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या उद्दिष्टापासून कणभर दूर हटणार नाही. त्यांनी माझ्या नावाने कितीही ओरड केली तरी हरकत नाही. या महाराष्ट्रातला बारा कोटी मराठी मी एक करून महाराष्ट्र युरोपपेक्षा भव्य-दिव्य करणारच एक दिवस.

पण मराठी माणूस एक कुठाय ? बरेच ’एलिट’ महाराष्ट्रीय तुम्हाला हिंदी भाषिकांच्या आवाजात आवाज मिसळून शिव्याशाप देताहेत. ते म्हणतात, हा स्टंट आहे राज ठाकरेंचा. विजया राजाध्यक्ष पण बोलल्यात तुमच्याविरुद्ध... आता सांगा ?
राज : (क्षणभर विचार करत) अक्खा देश जर (थांबून) केवळ अक्खा देशच नव्हे तर गल्फपासून ते बीबीसीपर्यंत सर्व जण जर या राज ठाकरेच्या स्टंटवर प्रतिक्रिया देत असतील, तर त्या मूळ क्रियेत काहीतरी असणारच ना ? आता विजया राजाध्यक्ष आणि एलिट महाराष्ट्रीयन... हे बघा, मी त्यांच्यासाठी करतच नाहीये. हया लोकांसाठी करतच नाहीए मी हे. ह्यांच्या पोराबाळांसाठी करतोय मी...ह्यांची पोरंबाळंच दुवा देतील मला...ह्यांच्याकडनं मला आशीर्वादाची अपेक्षा पण नाहीए. यांना हा विषयच कळत नाही. आयुष्यभर मराठीत लिहिलंत तुम्ही...पुढे ती पुस्तकं घ्यायला तरी पाहिजे ना कुणीतरी! उद्या ह्यांच्याच मराठी पुस्तकांची पानं फाडून हेच भैय्ये हसत हसत चणे विकतील... तेव्हा काय कराल ?

हे सारं तुमच्यात कशातनं आलं आहे अचानक ?
राज : अचानक नाही...सच्ची तळमळ. मला महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची सच्ची तळमळ आहे. मलाच नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतल्या माझ्या प्रत्येक सहकार्‍याच्या मनात ही आग आहे. आम्ही असू कदाचित मूठभर. पण महाराष्ट्र आम्हीच बदलू ! बदलूच बदलू !! तुम्हाला एक दिवस आमच्यासोबत यावंच लागेल.

तुमचे पंधरा-पन्नास लोक उपद्व्याप करत फिरतात असं खुद्द शरद पवार म्हणालेत ?
राज : (राज फक्त्त हसतात) महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत ते.

राजू परुळेकर : राज ठाकरेंना प्रश्न विचारण्याचा या मुलाखतीमुळे आलेला हा काही माझा पहिलाच प्रसंग नव्हे. या अगोदरही राज ठाकरेंच्या एक-दोन मुलाखती मी घेतलेल्या आहेत. त्यातली एक टेलिव्हिजनसाठीची होती. इतर एक-दोन मुलाखती जाहीर होत्या. अगदी मनातलं लिहायचं झालं तर एक लेखक आणि राजकीय विश्लेषक म्हणून अनेक दिग्गज नेत्यांच्या तिन्ही भाषांत (इंग्रजी,हिंदी,मराठी ) प्रिंट आणि टी.व्ही.साठी मी मुलाखती घेतलेल्या आहेत. परंतु ज्या काही थोडया माणसांच्या मुलाखती घ्यायला मला आवडत नाहीत त्यात राज ठाकरे येतात. याची अनेक कारणं आहेत. त्यामुळेच राज ठाकरेंच्या ज्या काही मुलाखती घेतलेल्या आहेत, त्या माझ्या फार यशस्वी मुलाखतींपैकी मी मानत नाही. राज ठाकरे हे मूलतः अंतर्मुख माणूस आहेत. शिवाय मूडीही. त्यामुळे मुलाखत देताना त्यांच्या मनात, समोरच्या माणसाच्या मनात जे चाललेलं आहे ते जाणून घेऊन त्यावर आपल्या मनात जे काय प्रतिक्रियात्मक चाललेलं आहे, ते पाहण्याकडे कल असतो. असं झाल्यामुळे त्यांची मुलाखत सारखी तुटत राहते. ही पक्रिया सांगणं अतिशय गुंतागुंतीचं आणि अवघड आहे. पण ती तशी असते. दुसरं म्हणजे, स्वतः राज ठाकरेंना मुलाखत द्यायला फार खुशी कधीच नसते. ते चक्क थोडेसे नर्व्हसच असतात. त्यामुळे होतं काय की, त्यांच्यासारख्या माणसाच्या अंतर्मनाचा तळ कधीच उलगडत नाही. ती फक्त्त वरवरची प्रक्रिया होऊन बसते. राज यांची मुलाखत घ्यायला माझ्या नाखुशीची कारणं ही अशी. तरीही ’लोकप्रभा’चे संपादक आणि माझे मित्र प्रवीण टोकेकर यांनी ही मुलाखत घ्यायची मलाच गळ घातली. शिवाय ही मुलाखत घेताना प्रसंग, परिस्थिती आणि राज यांच्या आयुष्यातला क्षण इतका महत्त्वाचा होता की, तो क्षण पकडणं हेच कुठच्याही लेखकासाठी कौशल्याचं आणि आव्हानाचं ठरावं. झालं होतं ते असं की, उत्तर प्रदेश आणि बिहारमधून महाराष्ट्रात येणारे भैय्यांचे लोंढे आणि अशा लोंढयांमुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय जीवनावर होणारा विपरीत परिणाम हा मुद्दा घेऊन राज यांनी संघर्ष उभा केला. सुरुवातीला हा संघर्ष शाब्दिक होता. नंतर या सार्‍या संघर्षाला रस्त्यावर उतरवणं राज यांना भाग पडलं या सार्‍यामध्ये मीडियाची भूमिका आश्चर्यकारक होती. विशेषतः हिंदी व इंग्रजी चॅनल्सची. इतक्या वर्षांच्या माध्यमांच्या आणि माध्यमांसंबंधीच्या कामांच्या अनुभवाच्या जोरावर निश्चितपणे मी असं म्हणू शकतो की, हिंदी आणि इंग्रजी चॅनल्सची भूमिका शंभर टक्के पक्षपातीच होती. हिंदी-इंग्रजी चॅनल्सना आजवर महाराष्ट्र ही आपली प्रभुसत्ता वाटत होती. तिलाच आव्हान मिळाल्यासारखं झालेलं दिसत होतं. ज्यामुळे हिंदी भाषिक मालक व पत्रकार चिडून राज ठाकरेंवर प्रहारावर प्रहार करत होते. अमरसिंहांना ’सर’ तर अबू आझमींना ’मिस्टर’ हे संबोधन देताना राज ठाकरेंना ’गुंड’ हे विशेषण वापरत होते. हा त्यांचा द्वेष राज ठाकरेंपुरता मर्यादित नव्हता. किंबहुना त्यांचा तो उद्देशच नव्हता. त्यांना मराठी भाषा, महाराष्ट्र संस्कृतीचा हा मुद्दाच मुळातून ठेचून काढायचा होता हे स्पष्ट दिसत होतं.

आयबीएन 7 चॅनेलवरचा ’मुद्दा’ सारखा कार्यक्रम असो किंवा ’न्यूज 24’ सारख्या नवख्या चॅनलवरचं या बातमीवरचं विश्लेषण असो. महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना आपण महाराष्ट्रीय आहेत याचा अपराधगंड यावा यासठी या सार्‍यांचे प्रयत्न चालू होते. राज ठाकरे यांचं निमित्त करून सारेच्या सारे हिंदी आणि काही इंग्रजी चॅनल्स महाराष्ट्रद्वेषाचा विखार ओकत होते. पत्रकारितेचे सामान्य संकेतही त्यांनी यासाठी गुंडाळून ठेवलेले आहेत. या सार्‍याचं निमित्तमात्र राज ठाकरे आहेत. याच वेळी मराठी पत्रकार एकतर कुंपणावर होते किंवा त्यांच्या हिंदी-इंग्रजी चॅनलवाल्या बॉसेसशी ’लॉयल दॅन द किंग’ होते. जणू आचार्य अत्रे, सी. डी. देशमुख या महाराष्ट्रात झाले होते यावरचा महाराष्ट्राचा विश्वासच उडावा असं हे वातावरण आहे. मी जेव्हा राज ठाकरेंची मुलाखत घ्यायला गेलो, तेव्हा (ही मुलाखत दोन वेगवेगळया बैठकांमध्ये सिध्द झालेली आहे.) राज ठाकरेंच्या विरोधात जवळजवळ सर्व जण होते. गुरुदास कामतांसारखे कॉंग्रेसी नेते, शरद पवार, बाळासाहेब ठाकरेंसारखे महानेते, सगळे हिंदी-इंग्रजी चॅनल्स, बहुतेक सगळी वृत्तपत्रं, विजया राजाध्यक्षांसारख्या साहित्यिक... जगच राज ठाकरेंच्या विरोधात होतं म्हणा ना ! त्यातच पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी फक्त्त मराठी चॅनल्स व मराठी वृत्तपत्र प्रतिनिधींना बोलावल्यामुळे यु.पी.-बिहारी पत्रकार-संपादकांची राज ठाकरेंबर आणि महाराष्ट्रावर आग ओकण्याची स्पर्धाच सुरू झाली. वास्तविक मराठीतही ’स्टार माझा’ चॅनल सोडला, तर निष्पक्षपणे राज ठाकरेंचं नेमकं म्हणणं लोकांपर्यंत कुणीच पोहोचवताना दिसत नव्हतं. महाराष्ट्रातल्या एका माणसाभोवती उत्तरेचा द्वेषबिंदू कधीच इतका एकवटला नव्हता मागच्या काही दशकांमध्ये. फक्त मराठी माध्यमांना आमंत्रण दिल्यामुळे भडकलेल्या हिंदी भाषिक पत्रकारांनी (हिंदी-इंग्रजी चॅनल्समधल्या) ’मीडिया एकच’ असल्याचा गिल्ला केला. मीडियामधली फुट सहन न करण्याची घोषणासुद्धा. वास्तविक इंग्रजी, हिंदी भाषिक पत्रकारांना ’मीडिया एक’ असल्याची आठवण पे स्केलपासून ते भाषिक वर्चस्ववादापर्यंत कधीच यापूर्वी झालेली नव्हती. इंग्रजी, हिंदी, मराठी माध्यमांमध्ये काम करणार्‍या पत्रकारांना एकच पे स्केल मिळत नाही. एवढंच नव्हे तर काही लाख खप असणार्‍या मराठी वृत्तपत्रांच्या संपादकांवर काही हजार जेमतेम खप असणारे हिंदी-इंग्रजी वृत्तपत्रांचे संपादक भाषिक वर्चस्वाने कशी दादागिरी करतात याचा विसर सोयिस्कररीत्या या हिंदी भाषिक पत्रकारांना पडला! आपल्या ’मीडिया एकच’ मध्ये काम करणार्‍या व अधिक पे स्केल घेणार्‍या हिंदी-इंग्रजी पत्रकारांचे आवाहन मराठी माध्यमातल्या पत्रकारांनी झुगारले. राज ठाकरेंची फक्त निमंत्रितांसाठी’ पत्रकार परिषद यशस्वी झाली. त्या संध्याकाळी त्यांच्याच घरी या मुलाखतीचं दुसरं सीटिंग पार पडलं.
हे सीटिंग चालू असतानाच समोर टी. व्ही. वर उद्धव ठाकरेंचे, ‘परप्रांतीय मजुरांना पार्सलने परत पाठवू’, हे उद्गार झळकले. वास्तविक गेले काही महिने शिवसेना वरवर नीट दिसत असली, तरी आतून पूर्णतः विस्कटलेली आहे. उद्धव ठाकरे काही महिने शिवसेनेचं खेळणं करून आंदोलन-आंदोलन खेळत होते. ’ येता का जाऊ ?’ ’काढू का घालू ?’ किंवा ’घंटा’ या स्वरूपाची नावं या आंदोलनाची असत! राज ठाकरेंमुळे निर्माण झालेल्या वादाने देशभर विक्राळ स्वरूप धारण करण्याअगोदर उद्धव ठाकरेंनी, ‘शिवसेना ही उत्तर भारतीयांसाठी मराठी माणसांनी स्थापन केलेली संघटना आहे.’’ असे शिवसेनेचे स्वरूप केले होते. उत्तर प्रदेश दिन, उत्तरायण, लाईचना संमेलन, अल्हा गीत गायन, बिरहा यांची शिवसेनेने धूम उडवली होती. ‘मराठी प्रांतवाद खपवून घेणार नाही‘, ‘मराठी दूध तर भैय्या साखर‘, ‘सर्वांनी यावे महाराष्ट्रात सुखाने राहावे‘ अशी वचने शिवसेनेतर्फे खुद्द उद्धव ठाकरे, सुभाष देसाई, रामदास कदम करत होते (आजही करतात). पण राज ठाकरेंनी महाराष्ट्रवाद ऐरणीवर आणल्यावर उद्धव ठाकरेंनी कडेवर घेतलेल्या भैय्याला चुचकारत मराठी माणसाला डोळा घालण्याचा हा प्रयत्न केला होता! या सार्‍या हलवून सोडणार्‍या घटनाक्रमाचे इतक्या तपशिलाने संदर्भासहित स्पष्टीकरण देण्याचे कारण हेच की, ज्या माणसाची मुलाखत आपण ’जशीच्या तशी’ वाचत आहोत, त्याची मुलाखत कोणत्या काळात आणि कोणत्या पार्श्वभूमीवर घेतली गेलेली आहे हे वाचकांना नीट स्पष्ट व्हावे. दोन्हीही सीटिंग्जच्या वेळेला राज ठाकरेंच्या घरातलं वातावरण नेहमीप्रमाणे शांत, आग्रंही आणि उत्फुल्ळ होतं. राजच्या आई मात्र चेहर्‍यावरची आणि मनातली मुलाबद्दलची चिंता लपवू शकत नव्हत्या. कुणाचाही पाठिंबा नसलेला आपला कर्ता कुलगा आता काय काय आणि कुणाकुणाला अंगावर ओढवून घेणार, याचा ताण त्यांच्या चेहर्‍यावरनं लपत नव्हता. त्याच वेळेला मुलाच्या जिगरबाजपणाचं कौतुकही. आईच ती. तर राज ठाकरे...!

न विसरण्याजोगा गुण ....

राजने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, तेव्हा त्याच्यासोबत त्याला मानणारे जे आले त्यातले काही परत शिवसेनेत गेले. त्यातल्या काहींनी परत जाण्याची जी कारणं दिली त्यातली कारणं ही, ‘स्टेजवर बसायला मिळालं नाही’ ते ‘मनाजोगतं पद मिळालं नाही’ इथपर्यंत विस्तारलेली होती! खरं तर यांच्यासाठी आणि यांच्यामुळे राजने स्वत:च्या आयुष्यातला सर्वात वादळी निर्णय घेतलेला होता. मी स्वत: याचा साक्षी होतो. त्यातलेच काही जण परत शिवसेनेत गेले. या संबंधातली एक आठवण खूपच मार्मिक आहे. एका समारंभात राजला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलेलं होतं. त्या संयोजकांनी राजचं नाव ‘आणि राज ठाकरे’ असं काही राज्यमंत्री वगैरेनंतर खाली टाकलेलं होतं. खरं तर शेवटी नाव देऊन महत्त्व देण्याचा वेगळा प्रयत्न त्यांच्याकडून होता. पण राजच्या ऑफीस मध्ये यासंबंधीचा फॅक्स आल्यावर त्याच्या अनुयायांत चलबिचल झाली. ते बिथरले. आमच्या पक्ष प्रमुखाचं नाव शेवटी टाकता म्हणजे काय? अशा गोष्टी झाल्या. राजच्या सचिवाने ही गोष्ट माझ्या कानावर घातली. माझ्या कानावर घालण्याचं कारण म्हणजे संयोजक माझ्या ओळखीचे होते. मी म्हटलं, ‘‘मी त्यांना बोलून बघतो.’’ राज समोरच बसलेला होता. नेमकं प्रकरण काय होतं हे त्याला ठाऊक नव्हतं. त्याने चौकशी केली. सचिवाने प्रकरण समजावून सांगितलं. राजने तात्काळ त्याला उडवून लावलं. ‘‘अरे, आपण हा प्रकार सुरू केला, तर तो आपला अमकातमका शिवसेनेत परत गेला त्याच्यात आणि आपल्यात फरक तो काय?’’ स्वत:च्या उद्दिष्टांबाबत आणि मूल्यांबाबत राज फार जागरुक असतो. त्याचं हे उत्तम उदाहरण.

राजकडे शिवसेना आली असती तर...

कधी कधी मी उद्धवच्या बाजूने (म्हणजे त्याच्या बुटात पाय घालून) विचार करतो, तेव्हा मला वाटतं की त्याच्या बाजूने तो एवढ्या स्वयंप्रकाशित भावाचं काय करू शकत होता? त्याच्याकडे पर्यायच कमी होते. त्यात त्याचे सल्लागार अगदीच कमी वकुबाचे होते. उद्धव स्वत: राजकारणात फारच उशिरा आला. म्हणजे माणसाचं घडायचं म्हणून जे वय असतं, ते सरून गेल्यावर. या उलट राज घडायचं वय जायच्या अगोदरच राजकारणात आला. या सार्‍याचा परिणाम म्हणून आपण जे पाहतो ती परिस्थिती आहे. हे सारं सोनिया गांधींच्या बाबतीत कसं चालून गेलं? असा युक्तिवाद यावर केला जातो. पण स्त्रीच्या बाबतीत हे सारे संदर्भ पूर्णत: बदलतात. शिवाय काँग्रेसची रचनाही इतर कुठल्याही साचेबद्ध पक्षाहून पूर्णत: भिन्न आहे. उद्धव वा राजच्या संदर्भात चटकन हे उदाहरण देणं (उद्धवच्या बाजूने) हे पूर्णत: चुकीचं विश्लेषण आहे.


राजचं राजकारणाचं आणि परिस्थितीचं आकलन हे एखाद्या बेरक्या माणसासारखं खोल खोल आहे. त्यामुळे कितीही अडचणीची परिस्थिती असली, तरी राज स्वबळावर तरून वर येऊ शकतो. उद्धवला भोवतालच्या माणसांवर अवलंबून राहायलाच लागणार आहे. एक उदाहरण लिहितो. राजने शिवसेनेशी फारकत घेतल्यावर ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. अनेकांना असं वाटलं होतं की, राज ‘राजसेना’ वगैरेसारखं नाव घेऊन शिवसेनेसारखं काहीतरी सुरू करेल. पण राज शांत राहिला. अज्ञातवासात गेला. त्याने खूप चिंतन केलं. एका परीने तपश्र्चर्याच केली आणि मग त्याने नवा पक्ष, नवा ध्वज, नवं धोरण व नवीच संस्कृती जाहीर करायला सुरुवात केली. ज्याचा शिवसेनेशी काय तर भारतातल्या एकंदरीतच राजकीय संस्कृतीशी कमी संबंध होता. एक नवीनच राजकीय संस्कृती प्रसवण्याचा प्रयोग बघून राजचे अनुयायी हडबडले. त्यातल्या बर्‍याच जणांना शिवसेनेपलीकडे काही सुचतही नव्हतं. राजने या सार्‍याची पर्वा केली नाही. आपल्याला जे करायचं आहे, तेच तो करत सुटलेला आहे. चाळीशीमध्ये राजकारणात असं प्रयोगशील काही प्रचंड आत्मविश्वास असल्याशिवाय कुणी करूच शकत नाही. याउलट उद्धव आपण ‘हिंदू की मराठी माणूस की खड्डे पडलेले रस्ते’ यातल्या कशावर बोलावं यावरच चाचपडतोय. राजचे कार्यकर्ते त्याला कधी कधी सांगतात. या अमक्यातमक्या विषयावर आपण ही भूमिका घेतली तर आपण हरू. राज म्हणतो, ‘‘मग हरू की. आपण जिंकायचंय ते आपल्याला राजकारणाचा व्यापार करायचाय म्हणून नव्हे तर लोकांच्या कल्याणाची भूमिका मांडण्याकरिता. ती मांडताना ती लोकांना न कळल्यामुळे आपण हरलो, तर ती परत मांडू. जिंकेपर्यंत मांडू. मग आपणच जिंकू!’’ हे एका वेगळ्याच राजकीय संस्कृतीचं जनन आहे. ते करणारा ‘राज श्रीकांत ठाकरे’ नावाचा एकोणचाळीस वर्षांचा तरुण आहे.

माझ्या मनाशी अनेकदा एक खेळ चाललेला असतो. जर राजकडे शिवसेनेची सूत्रं गेली असती तर काय झालं असतं? म्हणजे तो जर शिवसेनेचा कार्याध्यक्ष झाला असता, तर काय झालं असतं?

उत्तर : काहीच झालं नसतं. राजच्या नैसर्गिक सर्जनशीलतेला आणि ज्ञानगामी प्रयोगशीलतेला शिवसेनेत वावच नव्हता. म्हणजे याचा उद्धव किंवा राजकारणाशी काहीच संबंध नाही. याचं खरं कारण शिवसेनेची मूस पूर्णपणे घडलेली आहे. शिवसेना एकट्या बाळासाहेबांची आहे. त्यांच्या व्यतिरिक्त ती कुणीही घडवू वा बिघडवू शकत नाही. उद्धव नाही, राज नाही किंवा अजून कुणीही नाही. बाळासाहेब आहेत तरच शिवसेना आहे. त्यांच्या पद्धतीची राजकीय संस्कृती तेच निर्माण करू शकतात, चालवू शकतात. राजचंही नेमकं तसंच आहे. त्यामुळे तो शिवसेनेतून बाहेर पडला ही मला इष्टापत्तीच वाटली. त्याचीही उत्क्रांती सुरू झाली अन्‌ त्याच्या प्रयोगशीलतेचीही!

राज : संघर्षाच्या काळात ...

पक्ष स्थापनेनंतर आता जवळजवळ 2 वर्षे उलटली आहेत. राजने ‘मराठी’ च्या मुद्यावरून हाती घेतलेली आंदालने, त्याचे परिणाम आपण पाहतच आहोत. विक्रोळीतल्या एका भाषणामुळे राजने अंगावर वादळ ओढावून घेतलं. गंमत म्हणजे त्या अगोदर त्याचा पक्ष (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) हा N.G.O. आहे काय, असा प्रश्न अनेक जण विचारत होते. विक्रोळीतल्या सभेनंतर हाच पक्ष देशभर चर्चेचा विषय झाला. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांच्या अविरत संघर्षाचा रस्त्यावरच्या लढायांचा, कोर्टातल्या खटल्यांचा, सत्ताधीशांच्या रोषाचा एक प्रचंड मोठा सिलसिला सुरू झाला. जो आजतागायत सुरू आहे. स्वाभाविकपणे तो पुढेही चालू राहणार हे स्पष्ट आहे. मराठीचा आणि महाराष्ट्र धर्माचा मुद्दा घेऊन राज संघर्षात उतरला. त्यातलं राजकारण हा माझ्या या लेखाचा विषयच नाही. पण लाठीमार्‍या, तडीपार्‍या, कार्यकर्त्यांचे पोलिसांकडून होणारे हाल, स्वत:चं पोलीस संरक्षण (जे 17 वर्षं त्याला होतं) सरकारकडून काढून घेणं या सार्‍याला राज सामोरा जाताना अविचल होता. याच काळात मी त्याच्या एक-दोन मुलाखतीही घेतल्या. त्या घेताना मी त्याचा मित्र नव्हतो. आमच्यात गाय-गवताचं नातं होतं! व्यावसायिक म्हणूनही माझ्या लक्षात हे आलं की, तो जे बोलतो ते त्याचं स्वत:चं आहे. त्याची प्रेरणा (Conviction) त्याच्यामागे उभी आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला झालेली शिक्षा किंवा तडीपारी त्याच्या हृदयात बाणासारखी रुतलेली असते. त्यांना सोडवेपर्यंत तो सतत अस्वस्थ असतो. मला असे अनेक नेते माहीत आहेत, ज्यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी असाधारण त्याग केलेला आहे आणि कार्यकर्त्यावर वेळ आली, तेव्हा त्याला त्या नेत्याची भेट तर सोडाच पण फोनवर बोलणंही करायला मिळालेलं नाही. याला राज हा केवढा अपवाद आहे.

नुकतीच त्याला काही महिन्यांच्या अंतराने दोनदा अटक झाली. त्याच्या नावाने दिवशी एखादं वॉरंट देशभरातून कुठून तरी एखादा भैय्या मिळवतोय. पण स्वत:च्या अटकेअगोदर राजला मी शांतपणे चित्र काढताना किंवा आवडलेला अनिमेशनपट मित्रांना समजावून सांगताना बघितलेलं आहे. तेव्हा सामान्य कार्यकर्त्याच्या अटकेनं हवालदिल होणारा हाच का तो राज ठाकरे, असा प्रश्र्न मला पडतो. मीडिया-विशेषत: हिंदी-इंग्रजी मीडिया - राजचं वर्णन जवळजवळ गुंड, हिंसाचारी, दादागिरी करणारा वगैरे वगैरे करत आपले टी.आर.पी. चोवीस तास वाढवत असताना स्वत: राज मात्र शांतपणे हे चॅनल बघत त्यातल्या निवेदकांचं कौतुक किंवा त्यांच्या चुका काढत असतो. स्वत:वर होणारे आरोप खोटे आहेत याविषयी तो खाजगीत अवाक्षर बोलत नाही. किंबहुना त्याची राजकीय भूमिका एकाकी पडलेली असताना, सर्व जगाविरुद्धच विषम असा संघर्ष करताना आपली बाजू मांडण्याकरता माणूस कसा तळतळेल? राजमध्ये या प्रकारच्या तळतळण्याचा मागमूसही नाही. त्याला उत्तर देण्याची घाईही नसते. स्वत:ची तत्त्वं स्वत: जगत असल्याशिवाय असला शाश्वत शांतपणा किंवा असली शाश्वत स्थितप्रज्ञता खूप कठीण आहे. याचा अर्थ राजला संघर्षाच्या काळात चिंता नसतेच असं नाही. आपल्या कार्यकर्त्यांना, पक्षातल्या इतर नेत्यांना आपली भूमिका नीट खोलवर कळली आहे वा नाही या चिंतेने तो नखं खात असतो. कार्यकर्ते सत्तेच्या मागे लागतील आणि मूळ तत्त्वाचा नाश होईल म्हणून तो धास्तावलेला असतो. त्याचे मित्र आणि त्याचे कुटुंबीय त्याची काळजी करत असताना त्याला स्वत:विषयी फारसं काही वाटत नाही. अगदी स्वत:च्या सुरक्षेविषयीही. देशभर त्याच्याविरुद्ध मोहोळ उठले असतानाही त्याची भूमिका तो कार्यकर्त्यांना समजावताना मी पाह्यलंय, ‘‘आपण लोकांना प्रश्न विचारले पाहिजेत. प्रेरणेने केलेल्या प्रत्येक कृतीबद्दलच्या त्यांच्या प्रश्नाचं आपण उत्तर दिलंच पाहिजे असं नाही!’’ राज हा संघर्षात अधिक कळतो. कारण ज्या काळात माणूस किंवा नेता घाबरून ओल्या कोंबडीसारखा फड्फडेल अशा काळात राज आतून शांत असतो. त्याला हीच एक गोष्ट नेतेपद प्रदान करते. त्याचा करिश्मा त्याने केलेल्या संघर्षामध्ये नाही. तर त्या संघर्षाच्या वेळी राखलेल्या त्याच्या संयमामध्ये आहे. दुर्दैवाने त्याच्या विरोधकांना आणि शत्रूंना हीच त्याच्याबद्दलची गोष्ट नीट कळलेली नाही. त्यामुळे ते त्याच्या चालींमुळे एकतर गोंधळतात किंवा चकीत होतात.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, राज माझा इतका सखा मित्र असूनही संघर्षाच्या या काळात मला त्याची बरीच नवीन ओळख झाली असं मलाच वाटतं. तर इतरांची काय कथा?

त्याचं भविष्य माझ्या नजरेतून ....

राज माझा मित्र आहे याचं कारण राजकारण नसून आत्मिक आहे. कित्येकदा आम्ही न बोलता समोरासमोर बसून असतो. प्रत्यक्ष बोलत नसलो तरी बरंच बोलतो. कित्येकदा आम्हाला बोलावंच वाटत नाही इतकं एकमेकांचं मत कळतं. असे आपल्याला आयुष्यात दोन-तीनच मित्र असतात. ते आपलं आयुष्य समृद्ध करतात. आपल्याला समृद्ध करतात. राजच्या राजकारणाशी माझा संबंध आहे की नाही? असा प्रश्न बरेचजण मला करतात. तर तो आहेही अन्‌ नाहीही. राज माणूस म्हणून माझा मित्र आहे. आम्ही एकंदरीत जे बोलतो, शेअर करतो त्यात राजकारण फार तर सात-आठ टक्के असतं. त्यामुळे मित्र म्हणून जर राजने सिनेमा काढला असता, शेती केली असती, दुधाचा व्यवसाय केला असता तरी मी त्यात गुंतून माझी मतं मुक्तपणे मांडलीच असती. घ्यायचं न घ्यायचं त्याच्याकडे. तो राजकारण करतो. त्यामुळे त्याबाबतही माझा दृष्टिकोन आणि सहभाग हाच असतो. असतो आणि नसतोही...

राजकीय विश्लेषक आणि लेखक म्हणून माझी राजच्या पक्षाबाबतची हीच भूमिका आहे. त्याचा पक्ष नवीन आहे. काही क्रांतिकारक चांगलं करावं असं त्याला वाटतं. ते करण्यासाठी त्याला राज्यात अनेक पातळींवर सत्ता हस्तगत करावी लागेल. ती सत्ता मिळाल्यावर माझंही एक काम होईल. आज राजच्या पक्षाला अजून संधी नाही म्हणून टीका करता येत नाही. जर त्याला सत्ता मिळाली, तर मला त्याच्या प्रत्येक चुकीवर टीका करता येईल.

राजवर टीका करण्याची संधी मिळण्याची मी वाट पाहतोय. मी त्याला इतका ओळखतो की, त्याने महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवलेली स्वप्नं खरी करताना छोटी चूक केली, तर माझ्याइतकी टीका त्याच्यावर इतर कुणीही करू शकणार नाही. शर्मिलावहिनी, राजच्या आईंना तेव्हा खूप वाईट वाटेल. पण राजच म्हणालाय,

‘‘आपल्या महाराष्ट्रापेक्षा कुणीही व्यक्ती मोठी नाही!!’’

राजशी सुरुवातीच्या दोन-तीन भेटींत माझं त्याच्याविषयीचं मत फारसं बदललं नाही. त्या दोन्ही-तिन्ही भेटी या व्यावसायिक स्वरूपाच्याच होत्या. त्याची (मी वर उल्लेखलेली) मुलाखत हीसुद्धा मी घेतलेल्या आणि फार न गाजलेल्या मुलाखतीतील एक होती. या माणसावर नजर ठेवून राहिलं पाहिजे, मग आपल्याला तो आवडो वा न आवडो या व्यवसायातील चतुरपणाने मी राजला लक्षात ठेवलेलं होतं. त्यात एकदा एका समारंभात माझी आणि राजची गाठ पडली. ज्या समारंभात राजने श्रोता असण्याची भूमिका घेतलेली होती. आम्ही काही जण बोलणार होतो. माझी जेव्हा वेळ आली, तेव्हा मी राजच्या तेव्हाच्या पक्षाची (शिवसेना) भूमिका आणि त्यातला भंपकपणा यावर खूप चिरफाड करून बोललो. मला वाटलं राज त्याच्या (माझ्या कल्पनेतल्या) स्वभावाप्रमाणे माझ्यावर भडकेल. त्याचे काहीही करण्याला तयार असणारे अनुयायी कदाचित हॉलमधून उतरल्यावर माझ्यावर तुटूनही पडतील अशी काहीशी चिन्हं मी माझ्या मनाशी रंगवली होती. हौतात्म्यास मी तयार होतो! कार्यक्रम संपल्यावर राज आला आणि म्हणाला, ‘‘कधी भेटूया?’’ त्यानंतर आम्ही बर्‍याचदा भेटलो. राजचा एकच मुद्दा असायचा. काय चुका झाल्या ते तुम्ही विश्लेषक सांगता. त्या सुधारणार कशा ते तुम्हाला सांगता येत नाही. त्यावर माझं उत्तर हेच की, ‘‘ते जर माहीत असतं, तर आम्हीच राजकीय नेते झालो असतो.’’ पण सुरुवातीच्या काळात हे उत्तर मी देत नसे. कारण खाली उभ्या असणार्‍या राजच्या अनुयायांची संख्या लक्षणीय होती. शिवाय प्रत्येक वेळी हौतात्म्याची मनाची तयारी नसायचीच! या संबंधातल्या राजच्या प्रतिमेचा समाजात किती खोल परिणाम झाला होता त्याचं एक उदाहरण देण्याचा मोह इथे मला आवरत नाही. एकदा ‘राष्ट्रवादी’ या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुखपत्राचा एक अंक त्याच्या संपादकांना राजला पोहोचवायचा होता. तो अंक पोहोचवणारे दूत विलास म्हणून मध्यमवयीन गृहस्थ तो अंक पोहोचवायला मी राजच्या घरचा पत्ता देऊनही टाळाटाळ करू लागले. कारण विचारलं तर तेही सांगेनात. शेवटी अगदीच खोदून विचारलं तेव्हा म्हणाले, ‘‘मी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आलो असं कळल्यावर राज ठाकरेंचे अनुयायी माझी चटणीच करून टाकतील!’’

राज : मित्र म्हणून...

राजने एखाद्याला मित्र मानलं की तो स्वत:चं सुख त्याच्याबरोबर वाटून घेतो आणि त्या मित्राची दु:खं आपलीशी करतो. खरं तर त्याच्याबाबतीत मला राहून राहून हेच आश्चर्य वाटतं की, सर्वच राजकीय पक्षांबाबत आणि त्यांच्या नेत्यांबाबत तटस्थता पाळणारा मित्र म्हणून त्याच्यात इतका गुंतत कसा गेलो? वास्तविक अनेक राजकीय नेते खूप चांगले मित्र असतात. परंतु तरीही लेखक आणि राजकीय विश्लेषकांबाबत हे नातं बरंचसं हितसंबंधांवर उभं असतं. मला त्यात प्रचंड अवघडलेपणा येतो. माणूस म्हणून इंटरेस्टिंग असूनही राजकीय नेत्यांशी मैत्री करायला मला त्यामुळे बर्‍याचदा संकोच वाटतो. पण राजच्या बाबतीत मला हा संकोच वाटत नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे राजने एकदा तुम्हाला मित्र मानलं की, तुमच्याकडून त्याची एवढीच अपेक्षा असते की, तुम्ही या नात्याचं पावित्र्य जपावं. बस्स, आणखी काही नाही. किणी प्रकरणी राज ठाकरेंना जवळजवळ फाशी द्यावे असा निकाल देणारे अनेक समाजवादी पत्रकार ‘बांधव’ राजकडे त्याचे जन्मजन्मांतरीचे आणि कल्पांतापर्यंतचे साथी असल्यासारखे कामं घेऊन आल्याचं मी डोळ्यांनी पाह्यलंय. यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजच्या मनाच्या तळाशीसुद्धा त्यांच्याबद्दल अजिबात निखार नाही. त्यांचं काम त्यांनी केलं, त्यांना जे वाटलं ते त्यांनी केलं ही त्याची भूमिका. विखाराने विखार वाढतो. तो आपल्या बाजूने कमी केला नाही, तर एकंदरीत जगातला विखार कमी कसा होणार? ही त्याची भूमिका. या बाबतीत तो गांधीजींचा भक्तच आहे. गांधीजींची असंख्य चरित्रं त्याच्याकडे आहेत. त्यांची त्याने पारायणं केलीत. गांधीजींची एक अप्रतिम फोटोबायोग्राफी त्याने मला भेट दिली त्यावर, ‘हे पुस्तक वाचून माणसाने कोणत्या मूल्यांसाठी जगावं ते कळतं’, हे वाक्य लिहून!

राज दिसतो त्यापेक्षा प्रचंड खोल आहे. तो समोरच्याच्या तळाचा वेध घेतो. त्याला जर कुणी गंभीरपणे घेत नसेल, तर तो आपल्या आयुष्यातली मोठीच राजकीय चूक करत आहे. राजने जेव्हा शिवसेना सोडायची असं ठरवलं, तेव्हा तो एका मानसिक द्वंद्वातून जात होता. त्याची सर्वात मोठी समस्या हीच होती की, त्याच्यावर आणि महाराष्ट्रासंबंधीच्या त्याच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणार्‍या त्याच्या असंख्य अनुयायांच्या आयुष्याची जी गळचेपी चाललेली होती त्यावर त्याच्याकडे उत्तर नव्हतं. ‘‘आपला महाराष्ट्र हा कुणाहीपेक्षा मोठा आहे.’’ असं तो एकदा म्हणाला. पुढे म्हणाला, ‘‘अगदी बाळासाहेबांपेक्षाही’’. तेव्हाच मी राजचा निर्णय झालेला आहे, याची खूणगाठ बांधली. रात्रीच्या वेळेला सभा असली की, आपला प्रत्येक कार्यकर्ता कशा पद्धतीने जाणार आहे याची खात्री करून घेतल्याशिवाय राज गाडीत बसत नाही. बाहेरगावी जर सभा असेल, तर तो सर्वांना रात्रीच्या वेळी रस्त्यांवरून शक्यतोवर प्रवास न करण्याची तंबी देऊनच गाडीत बसतो! त्याचा सूर्यकांत पवार नावाचा कार्यकर्ता असाच व्यक्तिगत कामासाठी रात्री मुंबईहून सातार्‍याला निघाला असताना रस्त्यावर अपघातात गेला. त्याच्या आठवणीने राजच्या डोळ्यांत आजही पाणी येतं. शिवसेनेच्या प्रथम वर्तुळाने राजच्या सर्व कार्यकर्त्यांची केवळ ते राजचे प्रेमी आहेत म्हणून नाकेबंदी केली, तेव्हा राज कळवळतच राहिला. पण बराच काळपर्यंत त्याला बाळासाहेबांपर्यंत या समस्येचा तर्क नेता येत नसे. आजही बाळासाहेबांना कुणी दोष दिला, तर त्याचा कधीही तोल जातो. एकदा मी स्वत:, ‘‘हे सारं बाळासाहेबांना नीट आकलन होत नाही की काय?’’ असं काहीसं उपरोधाने म्हणालो. तेव्हा राजची प्रतिक्रिया थक्क करणारी होती. तो म्हणाला, ‘‘तुझं बोलणं सोपं आहे. कारण तुझ्यासाठी हा विषय हे बोलल्यावर संपतो. पण जर तू बाळासाहेबांच्या जागी असतास, तर तूच काय तर या जगातला कुणीही माणूस वेगळं काहीच करू शकत नव्हता. चूक बाळासाहेबांची नाही. त्यांचं वय आणि त्यांच्या भोवतीची परिस्थितीच अशी आहे की ते विवश आहेत. आपण, निदान मी तरी त्यांना दोष देता कामा नये.’’ शिवसेना सोडण्याअगोदरच्या अनेक रात्री राजने बाळासाहेबांसाठी जागून काढलेल्या आहेत. अशाच एका वेदनामयी रात्री त्याने त्याच्या लहानपणीची एक गोष्ट मला सांगितली. लहान असताना एकदा गरम गरम मटणाचा रस्सा कुणाच्या तरी हातून सांडला. त्यातलं गरम मटण राजच्या अंगावर सांडलं. राज पुरा भाजला होता. नंतर त्याच्या जखमांना तेल लावण्यापासून ते पट्टया रोज बदलत राहण्यापर्यंत सर्व काही बाळासाहेब करत असत. राज पूर्ण बरा होईस्तोवर बाळासाहेबांकडेच झोपत असे. अशा एक नव्हे अनेक आठवणींचे कढ राजला आवरत नसत.

शिवसेना राजने सोडली तेव्हा...

त्याच काळात मी एकदा पुण्याला होतो. कुठच्या तरी समारंभातून बाहेर पडत होतो. राजचा फोन आला. कोणताही संदर्भ न देता राज म्हणाला, ‘‘मला या लोकांनी हे असं करायला लावू नये. मी शक्य तितके प्रयत्न केलेत. माझ्यावर प्रेम करणार्‍यांचा काय दोष? आता त्यांना पराकोटीचा त्रास देताहेत. ठरवलं तर सगळे साफ होतील. पण मला हे करायला न लागलं तर बरं.’’ पण पुढे त्याला ते करायला लागलंच. या संदर्भातली एक आठवण लिहिण्याचा मोह मला आवरत नाही. राजने शिवाजी पार्कवर जी पहिली महासभा घेतली, ती घेण्याआधी खूप दिवस अगोदर एका मध्यरात्री मी आणि तो त्याच्या घराच्या गॅलरीत उभे होतो. राजने मला विचारले, ‘‘सभेच्या वेळी मैदान किती भरेल?’’ मी उत्तर न देता उलट त्यालाच उत्तर विचारलं. तो म्हणाला, ‘‘पूर्णपेक्षाही खूप जास्त.’’ प्रत्यक्ष सभेच्या दुपारी मी त्याच्या घराच्या गॅलरीत पोहोचलो. तोपर्यंत गर्दी जमायला सुरुवात झाली नव्हती. राज येऊन मागे उभा राहिला. हसला आणि म्हणाला, ‘‘काळजी करू नकोस. पूर्ण भरेल.’’ पुढचं वेगळं लिहायला नकोच.

अलीकडेच त्याच्या एका पदाधिकार्‍याने त्याला येत्या निवडणुकीसंबंधात काही काळजीच्या सुरात चार गोष्टी सांगितल्या. तेव्हा राज त्याला म्हणाला, ‘‘काळजी करून नकोस. मी आहे ना!’’ या त्याच्या आत्मविश्वासामागे नेमकं रहस्य काय? असं मी त्याला एकदा विचारलं तर म्हणाला, ‘‘मी समोरच्याला आधी पूर्ण खेळू देतो.’’ हे एक मात्र तो इतर कोणाकडूनही शिकलेला नाही. हे त्याचं स्वत:चंच अस्त्र आहे. त्याचे काही अनुयायी त्याला सोडून शिवसेनेत जातात, तेव्हा तो इतक्या शांतपणे घेतो की मला कधी कधी त्याचीच इच्छा असावी असा दाट संशय येतो. या प्रत्येक प्रसंगात ‘मी ठरवलं तर सगळे साफ होतील’. हा त्याचा निर्वाणीचा आवाज मला पुन्हा पुन्हा ऐकू येतो. भविष्यात काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. पण हा स्वत:वरचा विश्वास आणि निर्वाणीच्या परिस्थितीतही शांत राहण्याचा वकूब राजकडे अव्वल दर्जाचा आहे. तो भावनिक नात्यामध्ये लगेच मेणासारखा मऊ होतो. मित्रांसाठी, सहकार्‍यांसाठी त्याच्या डोळ्यांत चटकन पाणी येतं. शिवाय इतर अनेकांसारखा तो त्या पाण्यावर भागवत नाही. तर सर्व शक्यतांमधून तो त्यांना मदत पोहोचवतो. पण हाच राज संकटाच्या वेळी, कसोटीच्या क्षणांच्या वेळी अविचल आणि दगडासारखा कडक असतो. याला अपवाद एकच. अगदी भावनिक गुंत्यातल्या माणसाने त्याच्यावर वार केला किंवा त्याच्यावर संकट आणलं, तर त्याला नेमकं काय करावं हे कळत नाही. तो विचलीत होतो. दुर्दैवाने हे प्रसंग त्याच्या आयुष्यात अनेकांकडून त्याच्यावर पुन्हा पुन्हा आलेत.

राज सौंदर्याचा आणि संगीत ते चित्रकलेपर्यंतच्या सर्व कलांचा कमालीचा भोक्ता आहे. आम्हाला जोडणारा हा अजून एक धागा. त्याला संगीतातलं, चित्रपटातलं आणि चित्रकलेतलं खूप कळतं. इतकं की, यातल्या कुठल्याही क्षेत्रात तो व्यावसायिक म्हणून सहज स्थिरावू शकला असता. (उद्धवची राजकडून तीच अपेक्षा होती!) गोष्ट कशा रीतीने रचली की, ती सुंदर दिसेल याची राजला अचूक कल्पना असते. मग ते सभास्थान असो की, जेवणाची थाळी. राज ते अधिकाधिक सुंदर करण्याच्या प्रयत्नात असतो. इतर अनेक जण स्वत:च्या शरीरापासून ते अनेक बाबतीत सौंदर्यविरोधी असल्यासारखे वागतात. राज त्याबाबतीतही राजा आहे. एखादी व्यवस्था त्याने ताब्यात घेतली की तो सुंदर करणारच याची खात्री बाळगावी.फोटोबायोग्राफीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम ‘गेट वे ऑफ इंडिया’ वर होणार होता, तेव्हा राजने त्याच्या बारीकसारीक तपशिलांची इतक्या बारकाईने तयारी केली होती की, पाहणार्‍यांनी तोंडात बोटं घातली. त्याच्यासोबत सिनेमा पाहताना त्याच्या प्रत्येक तपशिलांची इतक्या बारकाईने चर्चा त्याच्यासोबत करता येते की, त्यात अपार बौद्धिक आनंद मिळतो. तेच संगीताबाबत, पाश्चिमात्य, शास्त्रीय संगीतापासून ते ऑपेराजपर्यंत आणि हिंदी चित्रपटगीतांपासून ते लोकगीतांपर्यंत सर्व प्रकारच्या संगीताचा मोठा संग्रह त्याच्याकडे आहे. मुख्य म्हणजे, उत्तम प्रतीच्या संगीताबद्दल त्याचं ज्ञान परिपूर्ण आहे. तो संगीतच्या अरेंजिंगपासून ते संगीत रचनेपर्यंत सारं अगदी खुबीने करू शकतो. हे फार थोड्या लोकांना ठाऊक आहे. जे संगीत, चित्रपटांबाबत खरं, तेच खाद्यजीवनाबाबतीतही. जगभरचे विविध खाद्यप्रकार कसे उत्क्रांति झाले यापासून ते, ते खाण्याची पक्रिया कशी आहे याचं राजला टेरिफीक ज्ञान आहे. खाण्याच्या प्रक्रियेची संस्कृती मोडून पदार्थ खाल्लेला राजला जाम आवडत नाही. चित्रकार तर तो आहेच. काकांकडून त्याला मिळालेला हा अजून एक वारसा. संगीताचा वारसा राजला आपल्या वडिलांकडून मिळालेला आहे. श्रीकांतजींबद्दल राज अनेक आठवणी सांगतो. त्यातली एक आठवण राजकीय आहे. श्रीकांतजींनी आयुष्यभर बाळासाहेबांना साध्या पदांच्या नेमणुकांबाबतही साधी सूचना केली नाही. शिवसेनेतला कुणीही ‘राज जे काही आहे ते ठाकरे असल्यामुळेच आहे’ असं जेव्हा म्हणू लागला, तेव्हा राजला मोठं आश्चर्य वाटलं. उपरोधाने तो म्हणाला, ‘‘च्यायला, शिवसेना एवढ्या लवकर श्रीकांत ठाकरेंचं योगदान विसरेल असं वाटलं नव्हतं!’’

समज आणि गैरसमज...

राजची आणि माझी ओळख नव्हती त्या काळात मला राज हा अतिशय उद्धट आणि अतिआक्रमक वाटायचा. त्याची माझी मूळ ओळख उदय तानपाठक नावाच्या आमच्या एका मित्राने करून दिली. तो एका सकाळी मला राजकडे घेऊन गेला. ती भेट सकाळी फार लवकर ठरल्याने माझ्या डोळ्यांवर फार झोप होती. मी एकाच गोष्टीमुळे राजच्या भेटीबाबात प्रतिकूल होतो. त्या भेटीत राजने हिंदुत्वाबाबत आपली मतं मांडल्याचं मला आता स्मरतं. राज तेव्हा मला म्हणाला होता, ‘‘हिंदुत्व वगैरे सगळं ठीक आहे. पण खरं तर महाराष्ट्रात मराठी माणूस, गुजराती आणि मारवाडी-जैन माणूस मिळून महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करायला हवा. शिवाय मराठी माणूस म्हटलं की, खेड-मालेगावचा मुसलमान नाही तर वसईचा ख्रिश्चन तुम्ही कसा वगळणार?’’ मी ते ऐकून चाट पडलो. राजची प्रतिमा तेव्हा प्रतिबाळासाहेब अशी होती. मला वाटलं होतं तो त्या पद्धतीने बोलेल पण ऐकलं ते हे. नंतर अलीकडे एकदा बोलतानासुद्धा तो म्हणाला, ‘‘आपली ज्या प्रकारची तपश्चर्या असते, त्याच प्रकारचं आपण बोलावं. म्हणजे त्यावर आपला विश्वास बसतो आणि लोकांचाही. आमच्या आजोबांची ज्या प्रकारची तपश्चर्या होती, ते त्या प्रकारचं बोलत. बाळासाहेबांची ज्या प्रकारची तपश्चर्या होती, ते त्या प्रकारचं बोलले. मी तेच बोलतो ज्यावर माझा विश्वास आहे. उगाच बाळासाहेबांच्या भाषणाच्या कॅसेट्‌स ऐकून हिंदुत्वावर बोलण्याने माणसाचा विदूषक होईल. तपश्चर्येशिवायचे इशारे म्हणजे साबणाचे फुगे! मला ते उडवायचे नाहीत.’’ राज विचार करतो तो असा.

पहिल्या भल्या सकाळच्या भेटीनंतर त्याची अन्‌ माझी मैत्री झाली असं नाही. गंमत म्हणजे राजच्या अगोदरपासून माझी आणि उद्धवची ओळख होती. राजच्या संदर्भात जो उद्धव येतो तेवढंच या ठिकाणी लिहिणं अपरिहार्य. उद्धवच्या बाजूने राज आणि राजच्या बाजूने उद्धव जेवढा मला कळला, त्यातून मला जे आकलन झाले ते तसं क्लेशदायक होतं. इथे उद्धव किंवा राजच्या राजकारणाचं मूल्यमापन मी करत नाहीए. दोघांनाही त्यांचं राजकारण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यासाठी जे जे करावं लागतं, ते करण्याचा व ते करताना डावं-उजवं न पाहण्याची दोघांनाही मुभा आहे. परंतु राजच्या बाबतीत जे झालं ते नि:संदिग्धपणे अन्यायकारक होतं. कारण शिवसेनेमध्ये राजची राजकारणाची समज त्यांच्या पिढीतली सर्वात अव्वल समज होती. त्याच्यामध्ये सर्व काही मंगल करण्याची स्वप्नं होती. त्याच्याकडे त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारे तरुण होते. त्याची मागणी ही कामाच्या, जबाबदार्‍यांच्या वाटपाची होती. याचं उत्तर ‘तुझ्यासाठी सर्व महाराष्ट्र खुला आहे’ हे असू शकत नव्हतं. (अर्थात या उत्तराच्या शेवटी त्याने योग्य तो बोध घेतलाच!) वास्तवात जे होत होतं, त्याची सामान्य जनतेला योग्य ती कल्पना नाहीए. मी स्वत: डोळ्यांनी पाहिलेलं एक उदाहरण लिहितो. राज शिवसेनेत प्रचंड लोकप्रिय होता. तो जिथे जात असे, तिथे त्याला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी चोरून-चोरून भेटायला येत असत. मी ‘चोरून चोरून’ असं लिहिलं आहे त्याचं उदाहरण एकदा मला पाहायलाच मिळालं. त्या अगोदर या सार्‍यांना राजला भेटायचं असेल, तर चोरून भेटावं लागतं असं मी ऐकलेलं होतं. पण माझा त्या कथांवर विश्वास नव्हता. पण एकदा पुण्यात राज असताना असेच शिवसेनेचे काही पदाधिकारी त्याला (चोरून) भेटायला येत होते. इतक्यात पुण्याचे संपर्कप्रमुख असलेले रवींद्र मिर्लेकर राजला भेटायला ‘अधिकृत’ पणे येत आहेत अशी बातमी आली. तेव्हा आपापल्या भेटी गुंडाळून तत्कालीन शिवसेना पदाधिकारी मिटिंग आवरून अक्षरश: राजच्या घरातून पळून गेले! त्यांना म्हणे, त्यांच्या नावाची यादी ‘मातोश्री’वर सादर होईल अशी भीती होती! त्या वेळीही त्यांच्यावर राजचं म्हणणं गमतीशीर होतं, तो म्हणायचा, ‘‘पदांवर बेतलं तर उड्या टाकून पळून जाणार्‍यांच्या जीवावर महाराष्ट्राचं राजकारण कसं करणार? उद्या महाराष्ट्रावर संकट आलं, तरीही हे उड्या टाकूनच पळणार. वेळ कोणतीही असली, तरी पाय रोवून उभे राहतील असे पाच लोकसुद्धा महाराष्ट्राचं भलं करतील!’’ गंमत म्हणजे, त्या उड्या टाकण्याच्या प्रसंगात शिवसेनेच्या एकाच पदाधिकार्‍याने उडी टाकली नव्हती. ते म्हणजे शिवसेनेचे तत्कालीन आमदार दीपक पायगुडे! मला वाटतं, आपलं आपलं राजकारण करण्याचा आणि सत्ता हस्तगत करण्यासाठी वाट्टेल ते करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आपण मान्य केला, तरीही क्षुद्र आणि स्वार्थी माणसांच्या सल्ल्यावरून राजची जी मानखंडना होत होती ती खचितच समर्थनीय नव्हती. या काळात सुभाष देसाई हे शिवसेनेच्या पहिल्या वर्तुळाचे नाना फडणवीस होते. या काळात राजची जी मानसिक घालमेल होत होती, ती पराकोटीची त्रासदायक होती. आपण काही निर्णायक पाऊल उचललं तर बाळासाहेबांना जो त्रास होईल तो एकीकडे आणि एका कर्तृत्ववान पुरुषाला संघटनेतल्या पाच हजारो मनसबदारांकडून जी मानखंडना करून घ्यावी लागत होती ती दुसरीकडे. या कात्रीत राज सापडला होता. पिंजर्‍यात सापडलेल्या वाघासारखा राज तडफडत असे. मी स्वत: त्याच्यासोबत अशा अनेक संध्याकाळी बोलत काढलेल्या आहेत. ‘पिंजर्‍यामध्ये वाघ सापडे, बायका-पोरे मारिती खडे’ म्हणजे काय, याचे प्रात्यक्षिकच तेव्हा शिवसेनेने उभे केले होते. फरक एवढाच होता की, इथे पिंजरा बाळासाहेबांच्या प्रेमाचा होता. तो नंतर राजने तोडला. पण ते खूप नंतर. अगदी भिंतीला पाठ टेकल्यावर. त्या अगोदर खूप रामायण घडलं. त्यातल्या प्रत्येक नाही, तरी बर्‍याच घटनांचा मी साक्षीदार आहे. एवढं मात्र खरं की, राज त्या काळात खूप प्रतिष्ठेने आणि संयमाने वागला

राज : कल्पनेतला आणि खरा...

हे सगळं घडायच्या आधी मी राजची एक मुलाखत घेतली होती. ती घेत असताना मी राजसोबत कम्फर्टेबल नव्हतो. बहुदा तोही नसावा. मला सतत असं वाटत होतं की, मी जाणीवपूर्वक समोरच्याला अडचणीत आणण्याकडे कल असणारा मुलाखतकार आहे असा त्याचा कुणीतरी समज करून दिला होता. तो सतत प्रश्न कापून उत्तर देण्यावर भर देत बोलत होता. त्याअगोदर किणी प्रकरणामध्ये त्याच्यावर ज्या प्रकारे आरोप करण्यात आले होते, संपूर्ण समाजवादी कंपू कुणाला तरी नष्ट करण्यात नेहमीच आनंद व उत्सव मानतो, तशाच प्रकारे सर्व तयारीनिशी त्या प्रकरणात उतरला होता. त्या समाजवादी आरोपांवर व्यक्तिश: माझा अजिबात विश्वास नव्हता. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणींवर जादू करणार्‍या या तापट आणि आक्रमक नेत्यावर त्या प्रकरणाचा एवढा धुरळा का उडाला याचा शोध घ्यावा असे मला सातत्याने वाटत होते. खूप मागोवा घेतल्यावर हाती जे लागलं ते हेच होतं की, अशा प्रकारच्या षड्‌यंत्रात गोवण्यासाठी व राजची प्रतिमा मलीन करण्याचा कट खूप अगोदरपासून चालू होता. फक्त जोडण्याकरता योग्य ते प्रकरण हाताशी लागत नव्हतं. वास्तविक या प्रकरणाचं जे काही होतं, ते आणि राजच्या वर्तुळाचा अर्थाअर्थी काहीही संबंध नव्हता. तरीही त्या काळात समाजवादी पत्रकारांनी राजला त्याच्या प्रत्यक्ष शत्रूंपेक्षाही मानखंडित केलं. प्रत्यक्ष पुराव्यांपासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वांनी हे संपूर्ण प्रकरण आधारहीन असल्याचे निष्कर्ष प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रकारे देऊनही, त्या काळात राजला, त्याच्या कुटुंबीयांना अपरिमित त्रास सोसावा लागला. मला असं वाटतं की, या षड्‌यंत्रात अशा रीतीने फसावं असे काही दोष राजमध्ये आहेत. हे अर्थात मला नंतर कळलं. तो माणसांवर चटकन विश्वास टाकतो. नको इतका विश्वास टाकतो. कुणी आपलं वाईट करेल यावर त्याचा विश्वासच नसतो. त्याचं इतक्या जणांनी, इतक्या वेळेला, इतकं वाईट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की कल्पना म्हणून आपण त्या जागी असण्याची मला प्रचंड भीतीच वाटते. तरी हे पचवून राज माणूसवेडा राहिला आहे. एखाद्या किंवा कुणाही माणसावर दुसर्‍या भेटीतच संपूर्ण विश्वास टाकणारा राज हा भारतातला एकमेव राजकीय नेता असावा! याचा अर्थ तो चतुर नाही असं नव्हे, तो प्रसंगी अतिचतुरतेने वागतो. मुख्य म्हणजे तो कोणतीच गोष्ट कधीच विसरत नाही. तुमची एखादी बारीकशी हालचाल, उद्‌गार किंवा युक्तिवाद त्याच्या वर्षानुवर्षे लक्षात राहतात. जेव्हा वेळ येते, तेव्हा तो ते आपल्या पोतडीतून बाहेर काढून त्याचा वापर करतो. अगदी जवळून पाह्यलेलं असल्याने मी हे सांगू शकतो की, याबाबतीत त्याची तुलना शरद पवारांशीच करावी लागेल. फक्त्त फरक एकच. पवारसाहेबांनी छोट्या माणसांची नावं आणि मोठ्या माणसांची कामं लक्षात ठेवली असं इतिहास सांगतो. राज नेमकं उलटं करतो. अनेक छोट्या माणसांच्या कसल्या कसल्या कामांसाठी राजने कुणाकुणाला फोन केल्याचं मी पाह्यलंय. शाळांमध्ये आणि कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी राजकडे माणसं उभी असतात आणि राज स्वत: फोन करून नंतर काम झाल्याची खात्री करून घेतोय हे दृश्य मी दरवर्षी पाहत आलोय. गंमत म्हणजे इतर सर्व राजकीय पक्षाचे नेते आणि नेत्यांची मुलं त्यांच्याच पक्षाची सत्ता राज्यात आणि देशात असताना यंत्रणेकडून काम करून घेण्यासाठी राजकडे येतात आणि ती कामं करून घेतात. इथे नावं लिहिणं किंवा त्यांची कामं संयुक्तिक नसल्याने मी ती लिहीत नाही. नाहीतर ती यादी आणि कामं वाचून बर्‍याच जणांना चक्कर आली असती.