होता गुलाब हाती
तुजलाच द्यावयाला
पण हात मात्र माझा
रक्तात माखलेला


काटाच ना फुलाचा
मजला दुखवून गेला
तुजलाच पारखा मी
दुनियेत दुर्लक्षिलेला


होती मनात आशा
उरल्या उण्या सुखांची
वारा तुझ्या स्म्रुतींचा
तिजला उधळून गेला


फुलबाग तुझ्या स्मरणांची
मनी माझ्या जपली होती
अश्रूंचा सागर माझ्या
फुलबागही बुडवून गेला


जरी उरलो होतो आता
बघण्या तव सुखयात्रा
तरी वणवा तव दुःखाचा
मजलापण जाळून गेला


झालीच ना कधीही
ईच्छा पुरी मनाची
परी अंतही माझा मजला
निमिषातच फसवून गेला


----------प्राजक्ता कुलकर्णी