गजा काकू म्हणजे ठेवल्या नावाला वजनानिशी जागणारी बाई! काकूंची दृष्टी अलौकिक, गजाआडच्या सृष्टीचा अंदाज घेणारी.
"बाल्कन्यांवर भारी नजर या बाईची, नवीन साडी आणून वाळत घालायची खोटी..यांना कळलंच!" इति नवरत्ने.
"इतनीभी बुरी नहीं है गजाजी।" इति सोनी. (सोनींना सोसायटी आणि सोसायटीला सोनी नवख्या होत्या त्या काळापासूनची त्यांची गजाकाकू ही मैत्रिण. त्यामुळे तसा त्यांचा काकूंबाबतीत सॉफ्ट कॉर्नर होता.)
"मामींचं नाक काय तीक्ष्ण आहे हो..परवा मी हे टूरवर जाणार म्हणून कडबोळ्या करायला घेतल्या, आपसूक बातमी लागल्यासारख्या ह्या आल्या..म्हणे शिल्पे खमंग वास येतोय बाल्कनीतून. आज काय निलेशराव स्पेशल वाटतं..., मग रेसिपी लिहून घेउन, चार टेस्ट करण्यासाठी म्हणून घेउन गेल्या. खूप छान झाल्यायत म्हणाल्या." शिल्पा-निलेश सोसा.तलं नवदाम्पत्य..शिल्पा त्यांना आवर्जून मामी म्हणते.(अजूनही).
"सुनंदे, मेले डोळे आहेत की फुंकणी? जाळ काढशील बघता बघता..." इति बेळगावची म्हातारी. तिला एकटीलाच फक्त काकूंना अशा प्रकारे बोलण्याची सवलत होती. त्यामागचं गुपित-गोटाकडून कळलेलं कारण म्हणजे..बेळगावच्या उत्तरेला का पश्चिमेला पाच कि.मी. अंतरावर गजाकाकूंच्या मावसाआजीचं गाव..,दोन्ही घरात पूजा सांगायला येणारा भटजी एकच. त्यामुळेच हे एरवी विळ्या-भोपळ्याचं वाटणारं सख्य सलगी टिकवून होतं. काकूंना 'सुनंदेssssssss' अशी हाक मारणारीही एकटी म्हातारीच.
गजाकाकूंचं खरं नाव ’सौ.सुनंदा चौगुले.’ गजू काकांची सख्खी बायको...म्हणून ती गजा काकू.
आता ’गजेंद्र’चं आधी गज्या आणि मग गज्जू असं उकारान्ती बारसं केलं ते सोसा.तल्या पोरासोरांनीच. ते बच्चेकंपनीत एकदम फेमस. स्वभावाने इतका प्रेमळ माणूस अख्ख्या आळीत नसावा. कानिटकर आजोबा गमतीने काकांच्या तुळतुळीत टकलाकडे निर्देश करुन डोळे मिचकावत म्हणायचे..
"या सगळ्या उकारान्ती कोंब फुटलेल्या नारळाचं पाणी बाकी गोड असतं कायम." ;)
पण गज्जू काकांच्या या प्रेमळ स्वभावाबाबत कुणी काकूंसमोर भरभरुन बोलायचा अवकाश त्या फणका-याने म्हणत.,
"चौगुलेंचा संसार सांभाळणं काही वाटतं तेवढं सोप्पं काम नाही...हम्म..बाहेरच्या जगासाठी प्रेम उतू जाईल पण घरात साधा कौतुकाचा शब्द नाही."
असं म्हणता काकूंच्या चेह-यावर हिटलरच्या बायकोची अगतिकता फिकी पाडतील असे आविर्भाव दाटून येत. वास्तविक पाहता हिटलर आणि काकांची वंशावळ प्रयत्न करुनही जोडणं अशक्य!
"असतो हो एखादीचा हिटलर वेगळा आणि असतं त्याचं प्रेम जगावेगळं..तुम्ही नका मनाला लावून घेउ एवढं." कानिटकर म्हणजे कानिटकर :) कानिटकरांचे ’वन लाईनर्स’ ज्याम खसखस पिकवायचे. त्यांच्या स्मार्ट लाईनर्स ना बॅकग्राउंड मुजिक द्यायला पाहिजे असं आद्याला राहून राहून वाटे.
तशा भरारी पथकात ऍडमिशन घेतल्यासारखं आद्याचं माईंड भलतंच उडया मारायचं कल्पकतेत, उत्साहात...अगदी सगळीकडे. पण त्याच्या भरारी पथकाचा गाईड नवरत्ने असल्यामुळे त्याला उगीच अधूनमधून पंख छाटलेल्या पाखरासारखं वाटत राही.
तशी एरवी नवरत्ने म्हणजे ’रत्नांची खाणच! पण वेळीच कदर केली नाही तर अशा रत्नांचं तेज फिकं पडतं. हा माणूस सुरक्षा दलातच खरं तर भरती व्हायचा..पण छ्या!!!
नवरत्नेंच्या फेमस डबल लॉक सिस्टीमबद्दल त्यांची दोन महिन्यांनी येणारी बोहारीण सोडली तर सगळ्या गावाला ठाउक.
म्हणजे सोसायटीतल्या मुलांनीही चोर-पोलीस खेळताना नवरत्नेंच्या घरी चोर म्हणून घुसणं बंद केलं होतं.
"ए लत्नेंच्या दालातून कूsssक्क नाही कलायचं..चोल कुठला...दबल लॉत आहे ना त्यांच्याकडे." कानिटकरांची नात..
एवढा बोलबाला केल्यावर चोराची काय बिशाद त्यांचं डबल लॉक तोडून आत यायची.
"ते तुमच्या डबल लॉकची साली काय भानगड आहे हो रत्ने?"
आरेच्च्या!! खेटेंना सांगायचं राहिलंच की...नरत्नेंना उगीच ओशाळल्यासारखं झालं....ऍडव्हान्स पे केल्यामुळे गडबड झाली बहुतेक, असा विचार त्यांच्या मनात डोकावून गेला.
तीन सोसायटयांमध्ये दुधाच्या पिशव्या टाकणारे ’कृष्ण-सुदामा दूध सप्लायर्स’चे मालक ’अभिराम खेटे’. वास्तविक नवरत्नेंच्या गॅलरीच्या मागच्या अंगाला लागून असणा-या दुसर्या सोसायटीत राहणा-या शहांच्या घरी दूध टाकणा-या पोर्याने खेटेंना नवरत्नेंच्या पॉप्युलर डबल लॉकची बातमी पुरवली. आणि बाल्कनीतल्या दुधाच्या पिशव्यांच्या वाढत्या चोर्यांनी मेटाकुटीला आलेले खेटे एकदा चौकशी करायला आले.
"आधी हे असले सिक्युरिटी वगैरे भानगडींवर विचार करायची गरजच नव्हती हो,..."
यावर नवरत्नेंनी प्रश्नार्थक चेहरा केल्यावर खेटे पुढे म्हणाले,
"हां म्हणजे तेव्हा आपल्या घराच्या पाठीमागे चावकेचं घर होतं ना......"
खालच्या बाजूने मिशीला यू टर्न देत देत खेटे पुढे उद्गारले..,
"आता चावके म्हणजे आपला मुं. पो चा माणूस, ...त्यामुळे चोर, भुरटा सालं कुणाचीही यायची डेअरींग नव्हती. आपल्या घराच्यामागचा ’वालच’ जळला चावकेचा ना, आपण बिनधास्त होतो. आपणच काय सगळी सोसायटीच निर्धास्त झोपायची म्हणा.
हा वाल काय प्रकार आहे असा प्रश्न रत्नेंना पडायच्या आत तिथे बसलेल्या आद्याने शंकानिरसन केलं....
"काका, वॉल म्हणजे भिंत म्हणायचंय त्यांना. "
"पण काय हो, म्हणून काय तुमची ती ’तटबंदी’ काय....." आद्याने खि: खी करुन विचारलं. त्यावर दोन मिनिटं स्तब्धतेत गेली. मग डिशमधला चिवडा उचलत खेटेंनी जोर्रात ज्योक कळल्याच्या आविर्भावात खॉ खॉ केलंन.
खेटेंच्या सोसायटीचं नाव ’तटबंदी’ का आहे या कोडयाची उकल झाल्याने खरं तर आद्याने खुशीत येउन विनोद मारला पण खेटे आणि नवरत्नेंसारखे प्रेक्षक असल्याने त्याचा मूड गेला आणि परत कानाची भोकरं बुजवून त्याने गाण्यांवर कॉन्सन्ट्रेट केलं. खरं तर तो वैतागला होता. त्याची फेव्हरिट आर.जे दोन दिवसापासून गायब होती. त्यात नवरत्नेंनी त्याला सोसायटीच्या कामात गुंतवून ठेवलं होतं.
आद्याच्या एक्स्प्लनेशनवर
"अच्छा!!...." म्हणून नवरत्नेंनी पुढे कंटिन्यू करण्याचा इशारा खेटयांना दिला. नवरत्नेंना सुरक्षा, सिक्युरिटी, कायदे याप्रकरणी खास इंटरेस्ट असे नेहमी. त्यांच्यासारख्या माणसाला निव्वळ उंचीच्या कारणावरुन डिसक्वालिफाय करुन सिक्युरिटी बोर्डाने एक उत्तम वाय, झेड दर्जाची सिक्युरीटी पुरवू शकणारा माणूस गमावला होता.
"तर त्यामुळे..........."खेटयांनी परत सुरुवात केली,
"म्हणजे बघा...या चावकेमुळे काय प्रॉब्लेम नव्हता...पण तो मोजून चार महिने, चार दिवसांपूर्वी रिटायर झाला.(खेटेंचा महिन्याचा हिशेब पक्का असतो..बिलात कधी पंचवीस पैशाचीही गडबड होत नाही.)
तर हा रुम रेन्टवर देउन त्याच्या मढ आयलंडच्या बंगलीत रहायला गेला.,आणि तेव्हापासून सांगतो...चोरांचा हा सुळसुळाट.
जसे चोर खरंच चावकेंच्या वाड्यातून बाहेर पडण्याची वाट बघत होते असं काहीसं वर्णन करुन खेटेंनी गोष्टीला शिवकालीन आभास आणला. त्यांच्या चिरेबंदी वाडयाची तटबंदी धोक्यात असल्याचं जाणवेल इतकं खरं चित्र काही काळ त्यांनी उभं केलं. मध्येच एखादा टर्न इंटरेस्टींग वाटून आद्या आणि प्रामाणिक श्रोत्यासारखे नवरत्ने आलटून पालटून ऐकण्यात दंग झाले.
"खेटेंची गोष्ट संशयाच्या मार्गाने पुढे सरकली आणि चोर दुसरा तिसरा कुणी नसून त्यांच्याशी धंद्यात रायव्हलरी असणा-या ’सुकेतु डेअरी’ वाल्याचा बोकाच असावा,अशा निष्कर्षाप्रत ते पोहोचले.
"च्या मारी बोका...?" आश्चर्य मिश्रित संशयाने आद्याने विचारलं.
"काहीतरीच काय खेटे,..पण कुठला ’मिल्क बिझनेसमॅन’ बोका ठेवीलच कशाला?"..नवरत्नेंना ह्या ना त्या कारणाने हुशार पदव्या सुचत.
" हा काय त्याचा स्वत:चा बोका नाय..." खेटे.
"मग??" कधी नव्हे ते आद्या आणि रत्नेंचे सूर एकत्र जुळले.
"हा त्याच्या पणज्याने इंग्लंडहून आणलेला गिफ्टेड बोका आहे...काय साधासुधा नाय. स्वत:च्या घरी चोरी जन्मात करायचा नाय तो."
"ब्रिटिश कुठले....स्वत: गेले पण इथे बोके सोडून गेले." नवरत्ने उद्वेगजनक संतापाने म्हणाले.
"ते काही नाही...असल्या बोक्यांच्या आयातीवरच बंदी घातली पाहिजे सरकारने...आज एक आणलाय उद्या त्याची पिल्लावळ होईल..मग वाढलेल्या संख्येने भारतात पाय रोवून बसतील." संतापात त्यांना आपल्याला बोक्यासारखे पंजे नसल्याचं दु:ख झालं.
बोक्यांच्या जातीबद्दल, संभाव्य धोक्यांबद्दल अजून काही चर्चा झाल्या....आणि मग नवरत्नेंकडून डबल लॉकची माहिती घेउन खेटे गनिमी कावा वगैरे रचल्याच्या आवेशात निघून गेले.
आपल्या डबल कोट सिक्युरिटीचं वाढतं महत्त्व पाहून रत्ने मनातल्या मनात खुश झाले. तिथून सुटका झाल्यावर आद्या थेट बाल्कनीत जाउन बसला. त्याच्या भरारी घेणा-या मनाला उभारी देणारी त्याची एकमेव जिवलग गॅलरी. गॅलरीतून समोर उभ्या राहणा-या टॉवरमधल्या फ्लॅट घेण्याची स्वप्नं रंगवणं हा त्याचा टाईमपास!
’बाल्कनी’ म्हणजे बाल्कनी ! बैठ्या सोसायटयांमधल्या घरकर्यांचा जीव की प्राण, म्हणजे जीव गेला तरी प्राण बाल्कनीत शिल्लक असं काहीसं बाल्कनी उर्फ गॅलरीचं पूर्वीचं ग्लॅमर. त्यातली मानाच्या गणपतीसारखी ’मानाची गॅलरी’ म्हणजे ’डी’च्या रुमची गॅलरी. ऐसपैस, मोकळीढाकळी सेम सोसायटीतल्या बायकांसारखी.
तशी सोसायटीतल्या प्रत्येक घराला बाल्कनी, पण ती पुढे-मागे असण्यातली गोम फक्त सोसायटीकरांनाच ठाउक. हाउसफुल्ल शो चं तिकीट काढताना नाटक आणि सिनेमा यातली गल्लत बराच काळ चुटपुट लावू शकते तशीच जागा घेताना बाल्कनी पुढे-मागे असण्याचं महत्त्व लक्षात घेतलं नाही तर आयुष्यभराची खंत गॅलरीत पुरून जगावं लागतं.
बाल्कनीच्या घराचं प्रेस्टीज फार...म्हणजे ’विवाह नोंदणी कार्यालयाने ’मुलगा स्वतंत्र नाही पण राहत्या घराच्या बेडरुम सेपरेट’ अशी’ आकर्षक’ ऍड द्यावी तसं सोसायटीकरांनी उपवर मुलीच्या पित्याला ’आमची ’डी’ची रुम, विथ अटॅच्ड बाल्कनी/बाल्कनी अटॅच्ड’ असं सांगून उपकृत करावं. गॅलरीवर लोकांचं असं प्रेम!! एवढं की शेलाटेंसारख्या अभिमानी मध्यमवर्गीय माणसाने संपूर्ण आयुष्यच गॅलरीत ’संगणकी शिकवण्या’ घेत वेचलं.
तर सांगायची गोष्ट ही की माणसांमुळे घराला घरपण येतं तसं ’गॅलरी’मुळे त्याला ग्लॅमर येतं. असा ’सोसायटयांमधल्या मध्यमवर्गीयांचा’ एक समज ! पण मध्यमवर्गीय म्हणजे असे तसे ’कॉन्ट्रीब्युशन काढण्याच्या वेळी ’मध्यमवर्गीय आव’ आणणारे उच्च-मध्यमवर्गीय नव्हे बरं!!( मध्यमवर्गीयांमध्ये मध्यम, उच्च, कॉन्ट्रीब्युशनच्या लेव्हलचे असे काही प्रकार आहेत, जसे मिरच्यांमध्ये झोंबण्याच्या श्रेणीनुसार भोपळी मिरची, पोपटी मिरची, हिरवी, ठेंगणी, बेडकी मिरची, इत्यादी.)
तर हाडाचे मध्यमवर्गीय म्हणजे शेलाटे! हा गृहस्थ भारी कमिटेड माणूस! लग्नाआधी न कंटाळता प्रियकराने प्रेयसीची वाट पहावी तसा हा रोज बशीची न चुकता थांब्याच्या थोडं अलीकडे रांग लावून वाट पाहतो. आणि बशीनेच घरी जातो.. तीनचाकीचा त्यांना भयंकर तिटकारा.
आम्ही सोसायटी सोडल्यानंतरही शेलाटे बर्याचदा थांब्यावर दिसतात, एका हातात फळांची पिशवी, दुसर्या खांद्याला बॅग! अशी शेलाटेंची स्वारी रोज घर ते बस अशा वार्या करताना हमखास दिसते. ते पाहून मध्यमवर्गीय माणूस अजून संपलेला नाही याची हमी मिळावी.
त्यांचं बाल्कनीकडे मनापासून ओढा, म्हणजे त्यांनी फावल्या वेळात शिकवण्या लावल्यापासून अधिकच!
असा बाल्कनीचा दुहेरी ( कदाचित आतापर्यंत तिहेरी*) असा उपयोग करणारे शेलाटे पाहिले की टाकाउपासून टिकाउ ची संकल्पना शेलाटयांइतकीच जुनी असावी असं वाटावं. त्यांच्याविषयी आणि अर्थात त्यांच्या अर्थार्जन करणा-या गॅलरीबद्दल अलीकडेच बोलताना आमचे तिकडून इकडे स्थायिक झालेले तरीही गॅलरीकरच असणारे शेजारी कौतुकाने म्हणाले, ’शेलाटयांना त्यांच्या जिद्दीनेच तारलं हो!!’ तर असे हे शेलाटे .................सॉरी ’गॅलरीप्रेमी शेलाटे’.
त्यांची बायको सौ. शेलाटे वहिनी किंवा सुहासची आई...अशी त्यांची ओळख. एकमेव सौज्ज्वळ काकू. त्यांच्या अंगणातल्या माडाला नारळ लागले तेव्हा हौसेने काही ठराविक घरातच वाटायला आलेल्या. (वास्तविक अशा गोष्टी ठराविक घरांपुरत्याच मर्यादित रहात नाहीत.) ’हे आमच्या गॅलरीसमोरच्या अंगणातले नारळ’ असं दोन-तीनदा म्हणाल्या. म्हणजे खरं तर ही बाई अशी गॅलरीला पुढे करणा-यातली नाही मग सतत आपलं गॅलरीपुढच्या अंगणात’ चा धोशा का.....असा प्रश्न पडावा. मग थोडया वेळाने गजाकाकूंचा प्रेझेन्स लक्षात घ्यावा.
म्हणजे शेलाटेंनी गॅलरीचं नाव घेतलं की गजाकाकूंच्या चेह-यावर ’बिब्बा घालून कुपथ्य झाल्यावर तडकल्यासारखे भाव! त्यांच्या बागेत न उगवलेल्या मिरच्या झोंबून यांचा नाकाचा शेंडा लालेलाल! (जातिवंत बेडगी मिरचीसारखा).
त्याला कारणही बाकी तसंच!.....त्यांच्या गॅलरीच्या ’भिंतीला भिंत’ लावून टेकलेल्या मागच्या आळीतल्या मुणगेंनी त्यांचं घरावर माडी बांधली( विभू म्हणतो ’माडी इझ सो बॅकवर्ड...कॉल इट वन प्लस वन’...मी मान डोलावली.) तेव्हापासून गजाकाकूंच्या बाल्कनीचं स्वातंत्र्य गेलं. हवा, पाणी, बातम्या सगळंच बंद!!
तेव्हापासून त्यांची हवा, पाण्याविना घुसमट अशी शेलाटेंच्या बाल्कनीवर निघते.
तेव्हापासनं त्यांची घारट नजर आपल्या बाल्कनीला लागू नये म्हणून शेलाटे काकूंनी त्यांच्या बाल्कनीसमोरच्या बागेत लिंबू, मिरच्या लावल्या....तरीही ओव्हरप्रोटेक्शन म्हणून निवडुंगही!
---------क्रमश:
एकदा एक तारू मुंबईजवळ एका खडकावर आपटून फुटले.
तेव्हा त्यावर असलेले एक माकड समुद्रात पडून बुडू लागले. तेव्हा एका माशाला वाटले तो मनुष्यच आहे.
म्हणून त्याला आपल्या पाठीवर घेऊन मासा किनार्याकडे निघाला. वाटेत त्याने माकडाला विचारले,
'अरे माणसा, तू कोणत्या गावचा ?
सांगितले, 'मी मुंबईचा?'<
पुन्हा विचारले, 'गिरगावाची माहिती तुला आहे'
आपण मनुष्य आहोत असे त्याच्या मनावर बिंबवावे म्हणून माकडाने उत्तर दिले,
'गिरगाव हे गृहस्थ माझे नातेवाईकच आहेत; माझे वडील आणि ते सख्खे भाऊ.'
मूर्खासारख्या बोलण्याचा माशाला इतका राग आला की, त्याने त्या माकडाला ताबडतोब पाठीवरून फेकून दिले.
त्याबरोबर ते समुद्रात बुडून मरण पावले.
तात्पर्य - खोटे बोलणे कधी न कधी उघडकीस येतेच.
एकदा एका मेंढ्यांच्या कळपातून एक कोकरू मागे राहिले होते. ते पाहून एक लांडगा त्याच्या पाठीमागे लागला.
याच्या हातून आपण सुटत नाही असे लक्षात येताच कोकरू लांडग्याला हसत म्हणाले,
'अरे, तू मला ठार मारणार हे मला माहितच आहे पण निदान आनंदानं तरी मरावं असं मला वाटतं.
तेव्हा तू जर मुरली मला वाजवून दाखवलीस तर मला आनंदाने मरण येईल.' ते ऐकून लांडग्याला फार आनंद झाला.
त्याने आपली मुरली वाजविण्यास प्रारंभ केला. मुरलीच्या सुरावर कोकरू नाचू लागले. मुरलीचा आवाज ऐकताच जवळच
असलेले कुत्रे धावत आले.त्याला पाहताच लांडगा घाबरून पळू लागला. पळता पळता तो मनाशीच म्हणाला,
'आपला धंदा सोडून भलत्याच धंद्यात पडल्याने असं झालं.
खाटकाचा धंदा सोडून मी वाजंत्र्याचं काम करीत बसलो हा माझा केवढा मूर्खपणा !'
तात्पर्य - नादी मनुष्याला, चतुर लोक सहज फसवू शकतात.
आमचा विभू म्हणजे अगदी छोटं छोटं गोरंपान बाळ होतं तेव्हा...
त्याला मांडीवर घेउन गप्पा चालल्या होत्या आमच्या, म्हणजे त्याला फक्त ही ही हु हु, आणि फारतर फार जोरात रडता येत होतं, आणि मला एखाददुसरी अंगाई म्हणता(ऐकवेल इतपत गोड आणि गायला सुरु करायचा अवकाश फार काळ अंत न बघता त्याला पटकन गुडुप्प झोप येईल अशी) येत होती.
त्याचा बोलण्यासाठी प्रयत्न मात्र सुरु झाला होता. काहीतरी बघून खुद्कन हसण्याचेही खेळ चालले होते. अचानक त्याच्या तोंडून बोबडी हाक ऐकली....आणि दोन सेकंद कानांवर विश्वासच बसेना. तश्शीच टुण्णकन उडी मारुन धावत आईला सांगायला गेले.
"आई, विभूने हाक मारली ती ही माझं नाव घेउन, hehhe ’आई’ म्हटलंच नाही आधी त्याने..टुकटुक..मज्जा."
आईलाही ऐकून गंमत वाटली होती. आम्ही म्हणजे काय आसमंतातच....कुणी अभ्यास बिभ्यास न करता डॉक्टरेट दिल्यासारखा आनंद झाला होता. आपण काय म्हटलं हे त्याला कळण्याची सोयच नव्हती. तो आपला मस्त सतरंजीचं एक टोक तोंडात पकडून माझ्याकडे पाहून हसत होता.
यानंतर एक आठ नउ वर्षांनी.....
.
.
.
.
आमची नेहमीसारखीच उतास जाईल इतकी वादावादी ऐकून आई वैतागली होती.
"काय चाललंय तुमच्या दोघांचं?...घर म्हणजे कुस्तीचा आखाडा आहे का...वगैरे वगैरे.."
"आई, मी त्याला सोडणार नाहीये. त्याने माझ्या नावाची वाट लावलीये. ह्याने आयुष्यात सर्वप्रथम माझंच नाव घेतलं होतं का असा प्रश्न पडलाय मला."
खरंच....त्याने आश्चर्याने विचारलं.
"हो..."मी ऐटीत कॉलर ताठ केली.
"ओह.......मग चल शहाणी पिझ्झा हटचा पिझ्झा लागू" ;)
"ए शहाणा कुठला......"
इयत्ता चौथी : स्कॉलरशीपची परीक्षा देउन आल्यावर
"आई, गणपती कोणत्या महिन्यात येतात?"
"भाद्रपद...का? आपण काय लिहून आलात?"
"श्रावण..."
बाजूला बसलेल्या मला हसू आवरेना.
"ए हसू नको....मी विचार केला गणपती येतात तेव्हा पाउस असतो आनि इलोक्युशनमध्ये परवा श्रावणावरच बोललो,त्यात होतं पाउस पडतो म्हणून, दिलं ठोकून.."
"शाब्बास, मेरे इंग्लिश के पाप्पड...काय पण लॉजिक आहे. चुकून बाहेर सांगू नको आई मराठी शाळेत शिकवते म्हणून." :D
"..........."
तो इंग्लिश मिडीयममध्ये असल्याने त्याचं मराठी सणवार, महिने या आणि एकंदरीतच सगळ्या पार्श्वभूमीवर टोमणे मारण्याची एकही संधी मी सोडत नाही.
इयत्ता आठवी
"ताई, गेस वॉट..."
"काय?"
"मी ज्ञानपीठची एक्झाम दिली होती ना.."
"त्याचं काय?’
"मी महाराष्ट्रातून पहिला आलो."
तो संपूर्ण दिवसभर धम्माल केली..आणि संध्याकाळी त्याला कोपर्यात घेउन विचारलं,
"आर यू शुअर? तो पेपर मराठीचाच होता? कारण मला अजूनही श्रावणातले गणपतीच आठवतायत. ;)"
त्याला वेगवेगळ्या फेजमधून जाताना अनुभवणं ही खरी मजेशीर गोष्ट असते, तो एक माझाही अनुभवच असतो. अलीकडेच त्याने विचारलं,
"तुला देव प्रसन्न झालाच तर काय मागशील?"
"तू काय मागशील?"( प्रश्नावर प्रतिप्रश्न करण्याची मोठ्या माणसांची खोड मलाही लागलीये)
"यू सी, मला फेडररसारखं व्हायचंय...................."
त्याची लांबलचक यादी ऐकून मला माझीच शाळा आठवली. त्यावेळीही अशीच ’व्हॉट विल यू डू इफ..’ च्या उत्तरादाखल एक मोठी लिस्ट केली होती.
"सांग न...काय मागशील?"
"अं.......सोचना पडेगा..बरं झालं आठवण केलीस ते, नवीन यादी करावी लागेल."
मनातल्या मनात प्रत्येक मोठया झालेल्या माणसाला म्हणावंसं वाटतं तसंच ’अशा निरागस स्वप्नं दाखवणा-या वयातून लवकर बाहेर येउ नकोस’ एवढंच मागावंसं वाटतं .
आज लाफ्टर क्लबमधे दोन पाहूणे आले होते. ते सगळ्यांना वेगवेगळ्या व्यायामाचे प्रात्यक्षीक देवू लागले. सुरवातीला तर त्यांनी काही योगाच्या प्रकाराचे प्रात्यक्षीक दिले . मर्कटासन, हलासन... इत्यादी. त्यातले शवासन लोकांना सगळ्यात जास्त आवडलेले दिसले. मग त्यांनी पवनमुक्तासन शिकवलं.... काही लोकांनी पवनमुक्तासनाला त्याच्या नावारुपाप्रमाणे खरं करुन दाखविलं.... मी तर म्हणतो की पवनमुक्तासनाच्या नंतर लागलीच अनुलोम विलोम घ्यायला पाहिजे. म्हणजे पवनमुक्तासनानंतर वेगळं नाक दाबायला नको.
वेगवेगळ्या प्रकारच्या योगासनाच्या प्रात्यक्षीका नंतर त्यातल्या एकाने गळ्यात पाय अडकविण्याचा प्रकार करुन दाखविला. तो प्रकार करतांना तो जोर जोराने ओरडत होता. ते त्याचं ओरडनं त्या योगासनाचा भाग नसुन खरोखरच त्याचे पाय त्याच्या मानेत अडकले होते हे आम्हाला मागावून जेव्हा त्याच्या साथीदाराने त्याचे पाय काढण्यासाठी त्याला मदत केली तेव्हा कळले.
सगळे प्रात्यक्षिकं करतांना ते लोक मधे मधे उत्सुकतेने पार्कच्या गेटकडे कुणाची तरी वाट पाहत आहेत असे बघत होते. ते असे का पहात आहेत हे आम्हाला नंतर कळले. नंतर त्यांनी शाळेत घेतात तसे पी.टी.सारखे वार्मीग एक्सरसाईजेस घेतले. उजवा हात वर करा... त्यांनी निर्देश दिला... आता उजवा हात नक्की कोणता हे बघण्यासाठी मिश्राजींनी बाजुच्याकडे पाहिले. तो त्याच्या बाजुच्याकडे पाहत होता. तिथे पांडेजी उभे होते. त्यांनी जेवण्याची ऍक्शन करुन बघीतली आणि पटकन आपला उजवा हात वर केला. आता जर त्यांनी डावा हात वर करा असा जर निर्देश दिला तर पांडेजी कोणती ऍक्शन करुन बघतील याची कल्पना ना केलेली बरी.
ते डेमोस्ट्रेशन देणारे मधे मधे पार्कच्या दरवाजाकडे का पाहत आहेत हे आम्हाला प्रेसवाले आल्यानंतर कळले. ते प्रेसवाले आल्यानंतर तर आम्ही एका बाजुला राहालो आणि ते डेमोस्ट्रेशन देणारे कॅमेऱ्याकडे बघुन निर्देश देवू लागले. अच्छा म्हणजे ही त्यांची डिप्लोमसी होती. मी पुन्हा डिप्लोमसीबद्दल विचार करु लागलो. आज डिप्लोमसी चा फैलाव एखाद्या रोगासारखा एवढ्या वेगाने कसा काय होत आहे? एखाद्या कॉलेजात डिप्लोमा इन डिप्लोमसी असा एखादा कोर्स तर चालवल्या जात नाही ना?
विचार करता करता एक्सरसाईज केव्हा संपलं काही कळलंच नाही. मी घरी जायला निघालो. पुन्हा माझ्यासोबत तो आधीचा जो मला रस्त्यात भेटला होता तो येवू लागला. अजुनही तो आमच्या मघाच्या प्रगतिविषयीच्या गप्पांवरच अडकलेला होता.
"" आज मानवाने एवढी प्रगती केली तरी तुम्ही त्याला प्रगती मानत नाही असे मघा म्हणाला होतात..?' तो म्हणाला.
"" हो '' मी म्हणालो.
"" पण का?'' त्याने विचारले.
""बघा आज माणसावर अशी वेळ आली आहे की तो कुणाशी मोकळेपणाने हसुसुध्दा शकत नाही.... अणि त्या हसण्याची कमतरता पुर्ण करण्यासाठी त्याला अश्या लाफ्टरक्लबमध्ये जावून वेड्यांसारखं खोटं खोटं हसावं लागतं ... याला काय तुम्ही प्रगती म्हणणार... मी तर म्हणतो की यापेक्षा जास्त कोणती अहोगती नाही ...'' मी आवेशाने म्हणालो.
आम्ही पार्कच्या बाहेर येवून घरी जाण्यासाठी निघालो. तो माझ्यासोबतचा अजुनही शांत आणि विचारात मग्न दिसत होता. तो जरा जास्तच सिरीयस झालेला दिसत होता.
"" अहो जास्त सिरीयसली घेवू नका ... मी आपला असाच बोललो... बाय द वे तुमची कोणती बिल्डींग आहे ...''
मी गोष्ट बदलून त्याला विचारले. त्याने एका बिल्डीगकडे इशारा करीत म्हटले, "" ती बघा ती... फ्लॅट नं. सी202...''
""अच्छा तुम्ही त्या बिल्डींगमध्ये राहाता... मी बऱ्याच वेळा तिथे येत असतो... पुन्हा कधी आलो तर तुमच्याकडे जरुर येईन...'' मी म्हटलं.
"" याना ...जरुर या ...'' त्याने म्हटले आणि तो एका गलीत जाण्यासाठी वळला.
माझं विचारचक्र पुन्हा सुरु झालं. डिप्लोमसीच्या बाबतीत...
डिप्लोमसी ज्याच्यावर बितते त्याला भलेही ती आवडत नसावी पण डिप्लोमसी एक कला आहे. त्यात खुप दुरचा विचार करावा लागतो. आता बघाना जो माझ्या सोबत होता त्याला काय माहीत की मी एक एल. आय. सी. एजंट आहे म्हणून ... आणि आता त्याला मी जाळ्यात ओढणे सुरु केले आहे म्हणून.... तो तर या गोष्टीपासून पुर्णपणे अनभिज्ञ आहे की हळू हळू दोन तिन दिवसात मी त्याच्याकडून कमीत कमी एकतरी एल आय सीची पॉलीसी घेतल्याशिवाय त्याला सोडणार नाही.
कुणी डिप्लोमसीला कला म्हणतो तर कुणाला, विशेषत: ज्यांच्यावर ती बितते त्यांना त्याचा तेवढाच तिटकारा असतो. पण हेही तेवढंच खरं आहे की देवही माणसासोबत मोठ्या चतुराईने डिप्लोमसी करतो. कारण देवाने कुणाला कमी तर कुणाला जास्त दिलं. तरीही त्याचे भक्त तेवढ्याच भक्तीभावाने त्याची पुजा करतात. देवासारखी डिप्लोमसी कदाचित कुणीही करु शकणार नाही. किंवा त्याच्यासारखी डिप्लोमसी केल्यावरच कदाचित काही माणसांनाही देव म्हटल्या जात असावं ...
- समाप्त -
" यार तु फार डिप्लोमॅटीक आहेस.'' यासारखं डिप्लोमॅटीक दुसरं वाक्य नसेल. कारण खरंतर त्याला म्हणायचे असते की ..."" साल्या ... तु फार हरामी आहेस.'' तशी डिप्लोमसीची जर 'डीप्लोमॅटीक' व्याख्या करायची असेल तर त्याचा अर्थ होतो ... टॅक्टीकली वागने की जेणेकरुन त्यात सगळ्यांच हित साधलं जाईल. पण आजच्या काळानुसार डिप्लोमसीचा अर्थ होतो. .... "मुहं मे राम बगल में छुरी'. किंवा मनातली गोष्ट चेहऱ्यावर दिसू न देणे. काही लोक तर त्याच्याही पुढे जावून - ते मनात काही, चेहऱ्यावर काही, बोलण्यात काही, आणि आचरणात अजुनच काही, अशी वागतात. हं ही वेगळी गोष्ट आहे की त्याचे परीणाम मात्र वेगळेच काहीतरी होतात. आणि विश्वास ठेवा की आजचा काळच असा काही आहे की जर तुम्ही डिप्लोमॅटीक नसाल तर तुमचं काही खरं नाही. आता काय सांगायचं, की आपण कुणाशी मोकळेपणाने हसु पण शकत नाही. हसलात तर फसलात. कुणाशी जर चूकुन मोकळेपणाने हसलात तर तो तुम्हाला कुठेतरी नेवून बकऱ्यासारखं कापणार. काही दिवस तर तुम्ही हंसणं सुध्दा विसरुन जाल. कुणी हसलं तर काही जणांना वाटतं की अरे हा काय थील्लर माणूस आहे, मुर्खासारखा हसतो!. ऑफिसमध्ये हसु शकत नाही... कुण्या सुंदरीचं काम आपल्या गळ्यात पडण्याची शक्यता असते.... घरात हसू शकत नाही... खिसा रिकामा होण्याची भिती असते. त्यामुळेच कदाचित आजकाल लाफ्टर क्लबमध्ये लोकांची जरा जास्तच गर्दी जमत आहे.
मी असाच आज सकाळी सकाळी लाफ्टर क्लबकडे निघालो होतो. रस्त्याच्या पलिकडून एक माणूस येतांना दिसला. तसा तो नेहमीच लाफ्टर क्लबमध्ये दिसायचा. नजरानजर होताच मी त्याला एक गोड स्माईल दिलं आणि आश्चर्य म्हणजे त्यानेही माझ्या गोड स्माईलला गोड स्माईलनेच उत्तर दिलं... कारण आजकाल असं फार कमी बघायला मिळतं.
"" तुम्ही काय या कॉलनीत राहाता ? '' मी विचारलं.
"" हो ... तुम्ही कुठे राहाता?'' त्याने विचारले.
"" ते तिकडे तुमच्या शेजारच्याच कॉलनीत'' मी उत्तर दिलं.
एकाच बिल्डींगमध्ये समोरा समोर राहणारे शेजारीही जर अश्या गप्पा करु लागले... तर आजकाल आश्चर्य वाटायला नको.
गप्पा वाढता वाढता ... कुठे काम करता.... घरात कोण कोण काम करतं... पासून किती पॅकेज मिळतो इथपर्यंत जावून पोहोचल्या. मग इन्कम टॅक्सचा सरल फॉर्म भरला का? ... त्यात कोणतं डिडक्शन दाखवलं .. वैगेरे वैगेरे. त्या सरल फॉर्मच्या बाबतीत मला नेहमीच एक प्रश्न पडतो की ... इतक्या किचकट फॉर्मला सरल कोणत्या दृष्टीकोणातून म्हणतात काही कळत नाही.?
मग गप्पांचा विषय बदलून आज माणसाने किती प्रगती केली या विषयावर येवून थांबला. त्या माणसाचं म्हणणं होतं की आज माणूस चंद्राच्याही पुढे मंगळावर जाण्याचा विचार करतो आहे. फोन टीव्ही मोबाईल इन्टरनेट च्या सहाय्याने माणूस कितीही जरी दूर असला तरी क्षणात संपर्क होवू शकतो. वैगेरे वैगेरे....
मी म्हटलं ही कसली प्रगती? याला काय प्रगती म्हणतात? ...
एवढ्यात लाफ्टरक्लब आला आणि आमच्या गप्पा तेवढ्यापुरत्या थांबल्या...
क्रमश:...
एकदा एका कावळ्याने सटवाईला काही वस्तू अर्पण करण्याचे ठरविले. त्यासाठी कुत्र्याला त्याने आपल्याबरोबर
येण्याची विनंती केली.
कुत्रा म्हणाला,'देवीला तुझा इतका कंटाळा आहे की, तू दिलेल्या वस्तूंचा ती मुळीच स्वीकार करणार नाही.
कावळा म्हणाला, 'अरे, यासाठीच तर मी तिला वस्तू भेट देण्याचं ठरविलं आहे.
तिचा माझ्यावरचा रोष दूर व्हावा आणि तिनं माझं कल्याण करावं या हेतूनेच मी तिला या वस्तू अर्पण करणार आहे.
तात्पर्य - देव आपल्याला प्रसन्न होईल म्हणून देवीची पूजा करणारे खूप असतात. खर्या भक्तिभावाने देवाला पूजणारे थोडेच.
समुद्रातील एक खेकडा एकदा सहज समुद्रकिनार्यावर आला. तेवढ्यात एका कोल्हाने त्याला पकडले आणि
तो खेकड्याला मारून खाऊ लागला.तेव्हा मरता मरता तो खेकडा स्वतःशीच म्हणाला,
'मीच मूर्ख ! आरामात समुद्रात राहायचं सोडून जमिनीवर यायची उठाउठेव कोणी सांगितली होती ?
नको ती गोष्ट केल्याने मला जीव गमावण्याची वेळ आली आहे !
तात्पर्य - ज्या गोष्टीशी आपला संबंध नाही, त्यात पडले म्हणजे मनुष्य संकटात सापडतो.
एका माणसाची बायको फार भांडखोर होती. कर्कश आवाजात आरडाओरडा करून ती सतत नवर्याशी भांडत असे.
एकदा ती माहेरी गेली होती.तेथून परत आल्यावर नवर्याने तिला विचारले. 'तू तिथे मजेत होतीस ना ?
बायको म्हणाली, 'माझ्या माहेरी मी आल्याने कुणालाच आनंद झाला नाही.
तिथली गडीमाणसं सुद्धा मला कंटाळली होती, असं त्याच्या चेहेर्यावरून वाटत होतं
तिचा नवरा म्हणाला, 'आता तूच पहा, की, सगळा दिवस बाहेर कामात घालवणार्या
गडीमाणसांनासुद्धा तुझा कंटाळा आला तर सगळा काळ तुझ्याच सहवासात काढणारा
मी तुझ्या स्वभावाला किती बरं कंटाळत असेन ?
तात्पर्य - आपण जेव्हा सगळ्यांना अप्रिय होतो तेव्हा तो आपल्या स्वभावाचाच दोष असला
पाहिजे असे समजून आपला स्वभाव बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
एका अतिशय भुकेलेल्या डोमकावळ्याने, एका सापाला झडप घालून पकडले आणि आता त्याला मारून खाणार,
तोच त्या सापाने त्याच्या अंगाभोवती वेटोळे घातले आणि त्याच्या मानेला दंश करून त्याचा प्राण घेतला.
तेव्हा तो डोमकावळा म्हणाला, 'दुसर्यांना मारून स्वतःची भूक शांत करणार्याला हीच शिक्षा योग्य आहे.
तात्पर्य - जो पदार्थ आपणास मिळणे शक्य नाही तो मिळविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्वतःचा नाश ओढवून घेणे होय.
एका धनगरास एक लांडग्याचे पिल्लू सापडले. तेव्हा त्याने ते आपल्या कुत्र्यांच्या बरोबर ठेवले.
धनगराची मेंढरं चोरण्यासाठी लांडगे येत त्यांचा पाठलाग करताना हे पिलू कुत्र्यांपेक्षाही हुशारी दाखवीत होते.
परंतु, ते काम झाल्यावर मात्र ते स्वतःच एखाद्या चुकार मेंढराला बाजूला नेऊन, मारून खात असे.
बर्याच दिवसांनी ही गोष्ट एकदा धनगराच्या लक्षात आली व त्याने त्यास झाडाला टांगून मारून टाकले.
तात्पर्य - प्राण्यांचा मूळ स्वभाव सहसा बदलत नाही.
एकदा वनराज सिंह खूप आजारी पडला. त्याची प्रकृती विचारण्यासाठी सगळे पशू रोज येत असत,
पण कोल्हा मात्र येत नसे. कोल्ह्याचे आणि लांडग्याचे शत्रुत्व होते.
या गोष्टीचा फायदा घेऊन लांडग्याने सिंहास सांगितले की, 'महाराज, कोल्हा हल्ली आपल्या दरबारात नसतो.
त्यावरून तो आपल्या विरुद्ध काही कपट-कारस्थान करत असावा असं मला वाटतं.
हे ऐकून सिंहाने ताबडतोब कोल्ह्याला बोलावणे पाठवले व त्याला विचारले,
'काय रे, मी इतका आजारी असूनही तू मला भेटायला आला नाहीस, याचा अर्थ काय ?'<
कोल्ह्याने उत्तर दिले. 'महाराज, मी आपल्याच करता एखादा चांगलासा वैद्य पहात होतो.
कालच मला एका मोठ्या वैद्याने सांगितलं की नुकतंच काढलेलं लांडग्याचं कातडं पांघरलं असता, हा रोग बरा होईल.
ते खरे वाटले व त्याने कातड्यासाठी ताबडतोब लांडग्याला ठार मारले.
तात्पर्य< - दुसर्याच्या विनाशाची इच्छा करणारे लोक बहुधा स्वतःच नाश पावतात.