जाकोब 'C' लेव्हलच्या खडकाळ गुहेत एका विहिरीशेजारी एका खडकावर बसला होता. त्याच्या बाजुला कागदपत्रांचा एक पुडका पडलेला होता आणि काही कागद पसरलेले होते. जाकोबच्या हातात एक खडकाचा तुकडा होता ज्याच्याकडे तो काळजीपुर्वक न्याहाळून पाहत होता. तो आता त्याच्या हातातल्या खडकाच्या तुकड्याला दुसऱ्या एका खडकाच्या तुकड्याने तोडायला लागला. जेव्हा तो एक खडकाचा तुकडा दुसऱ्या खडकाच्या तुकड्यावर आदळत होता तेव्हा त्यातून ठिणग्या निघत होत्या. बराच वेळ एकाग्रतेने तो ते खडकांचे तुकडे एकमेकांवर आदळत होता. अचानक तो भानावर आला तर कावरा बावरा होवून स्टेलाला आजुबाजुला बघून शोधू लागला. जेव्हा ती त्याला दिसली तेव्हा कुठे त्याच्या जिवात जिव आला.
स्टेला 'C2'विहिरीच्या काठावर उभी होती. ती विहीर जाकोब जिथे आपलं काम करीत होता तिथून जवळच होती पण मधे एक मोठा खडक आडवा होता. ती मधे मधे तिच्या हातातले कागद उकलून त्याचा संदर्भ घेत होती. तेवढ्यात तिला विहीरीच्या काठावर काहीतरी चिटकलेले दिसले. तिने जवळ जावून लक्ष देवून बघितले तर ते कपड्याचे धागे होते.
तेवढ्यात तिला मागून जाकोबचा आवाज आला, '' हे... काय करीत आहेस?''
'' काही नाही '' स्टेला म्हणाली.
' हे बघ... आताच काम करता करता माझी टूलकिट या विहिरीत पडली आहे... प्लीज ती मला आणून देतेस का?'' जाकोबने विचारले.
'' हं आलेच '' ती म्हणाली.
स्टेला जेव्हा त्याच्याजवळ आली तेव्हा जाकोब तिला म्हणाला, '' टूलकीट तर तू बघितलीच आहेना ... तो एक छोटा लाल रंगाचा बॉक्स आहे''
'' हो... मला माहित आहे '' स्टेला म्हणाली आणि 'C3' विहिरीच्या काठावर गेली, ज्यात जाकोबची टूलकीट पडली होती. दोन पावले मागे येवून तिने पटकन त्या विहिरीत उडी मारली. आता तिला ब्लॅकहोलमधे उडी मारण्याची चांगलीच सवय झालेली दिसत होती.
जाकोबला गुहेत दुरवर एका जागी जमिनीवर काहीतरी चमकतांना दिसलं. जाकोब आपल्या हातातला खडक बाजूला ठेवत तिथून उठला. आणि हळू हळू त्या चमकणाऱ्या वस्तूकडे जावू लागला. त्या वस्तूच्या जवळ जाताच त्याने त्या वस्तूवर आपल्या टॉर्चचा झोत टाकला. त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य तरळलं होतं. त्याच्या पुढ्यात जमिनीवर पडलेला तो एक पारदर्शक खडा होता ... अगदी त्याच्या मनगटावर बांधला होता तसाच. त्याने तो खडा उचलून घेतला. त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य अजुन खुललं होतं. त्याने तो खडा आपल्या मनगटावर बांधलेल्या खड्याच्या जवळ नेवून त्यांची एकमेकांशी तुलना केली.
'' माय गॉड! ... काय सुंदर खडा आहे!'' जणू तो स्वत:शीच बोलला.
'' आत्ता पर्यंत तु एकटाच होता ... बघ तुझ्यासाठी एक नवा सोबती आला आहे..'' तो जणू त्याच्या मनगटावर बांधलेल्या खड्याशी बोलत होता.
तेवढ्यात जाकोबच्या पाठीमागुन एक हात येवून जाकोबच्या खांद्यावर विसावला. दचकून जाकोबने दोन्ही खडे पाठीमागे लपवून वळून बघितले.
'' हे घे मी तुझी टूलकीट आणली आहे'' ती स्टेला होती.
स्टेलाला समोर पाहून जाकोबने सुटकेचा सुस्कारा सोडला.
'' ओह ... थॅंक यू... मला वाटलं... तू खरोखरंच मला भिती घातलीस...'' जाकोब म्हणाला.
स्टेलाने त्याची टूलकीट त्याला दिली.
'' हे बघ मला अजुन एक खडा सापडलाय'' जाकोबने आपली खडा असलेली मुठ स्टेलासमोर उघडली.
स्टेलाने तो खडा उचलून आपल्या हातात घेतला आणि ती त्याच्याकडे अगदी जवळून निरखून बघू लागली.
'' खरंच किती गोड खडा आहे हा!'' स्टेला म्हणाली.
स्टेलाने त्या खड्याला आपल्या मुठीत बंद केलं आणि 'C2'विहिरीकडे जात जाकोबला म्हणाली,
'' माझ्याजवळ थोडा वेळ राहू दे ''
'' थोडा वेळ नाही... नेहमीसाठीच असू दे ... तुझ्या मनगटावर बांध बघ त्याला'' जाकोब म्हणाला.
स्टेला जाता जाता थांबली आणि अत्यानंदाने म्हणाली, '' ओह.. थॅंक यू .. थॅंक यू सो मच''
जाकोब तिच्याकडे पाहून गोड हसला.
स्टेलाने त्या खड्याकडे मुठ उघडून पुन्हा एकदा पाहाले आणि ती त्या विहिरीकडे चालू लागली. जाकोब लोभसपणे तिला जातांना पाहत होता.
'' ऐक'' जाकोब म्हणाला.
स्टेला थांबून पुन्हा त्याच्याकडे वळून पाहू लागली.
'' काळजी घे... ज्या ब्लॅकहोलमध्ये तू पुर्वी कधी गेली नाहीस अश्या ब्लॅकहोलमध्ये जावू नकोस...'' जाकोब तिला एखाद्या आपल्या माणसाप्रमाणे सुचना देवू लागला.
'' हो...ठिक आहे '' स्टेलाने प्रतिउत्तर दिले.
क्रमश:...
1 comments
छान आहे गोष्ट. पुढचे भाग नाहीत कां?
Post a Comment