महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु.ल. देशपांडे यांनी आपले भाचे दिनेश ठाकूर तथा दिनूवर 'गणगोत' या व्यक्तिचित्रात्मक पुस्तकात एक नितांतसुंदर लेख लिहिला आहे.
१९ मे १९६६ रोजी दिनूला हे पुस्तक भेट देताना त्यांनी लिहीलं होतं...
त्यास स्मरुन अमेरिकास्थित दिनेश ठाकूर यांनी आपल्या भाईकाकांवर हा ह्र्दयस्पर्शी लेख...

भाईकाका जाऊन आता आठ वर्षे होतील. पण त्यांच्या आठवणींची, नावाची नशा काही उतरत नाही. आजही भाईकाकांची पुस्तके वाचताना, टेप्स ऎकताना ते माझ्याशीच बोलताहेत, संवाद साधत आहेत, असे वाटत राहते. आणि कुठच्याही प्रसंगी त्या संदर्भातले भाईकाकांचे प्रसन्न व्हायला होते.... आठवणीत रंगून जायला होते. हिच स्थिती भाईकाकांचा सहवास लाभलेल्या अनेकांची आहे.
नवल म्हणजे भाईकाका गेले तेव्हा आशुतोष आठ-साडेआठ वर्षाचाच होता, पण त्याचीही तीच स्थिती आहे. शाळेतून घरी आल्यावर किंवा शनिवार-रविवारी 'असा मी..', 'बटाट्याची चाळ' , 'वाऱ्यावरची वरात' , 'बोरकर कवितावाचन'ची कायम पारायणे चाललेली असतात.

'गणगोत'च्या मला दिलेल्या प्रतीवर भाईकाकांनी लिहिले आहे... 'चि. दिनेशला - आशीर्वादपूर्वक भेट. या पुस्तकात मी तुझ्यावर एक लेख लिहीला आहे. तू मोठा झालास की माझ्यावर एक लेख लिही . - तुझा भाईकाका.' या गोष्टीची सतत आठवण व्हायची. पण कधी लिहावे म्हटले की, 'आतले न मना गवसे..मनातले न ये मुखी... मुखातुन बोलताना, भाषा त्यालाही पारखी, जाणिवेच्या व्यापाराला अशी उतरती कळा' हेच जाणवत राही. नेमक्या शब्दांत भावना व्यक्त करणे भाईकाकांसारख्या किंवा विंदा करंदीकरांसारख्या फार थोड्यांनाच जमते. म्हणून त्यांच्या पंच्याहत्तरिला गणिताच्या संशोधनाच्या एक पेपर व नंतर मी लिहिलेले गणितावरचे पुस्तक 'वनवेलींनी काय वाहणे याहून कल्पद्रुमा' या भावनेने त्यांना अर्पण करुन थांबलो होतो.
माईआतेने लिहीले आहे. खूप मोठ्या मोठ्या लोंकानी छान आठवणी सांगितल्या आहेत. मंगेश पाडगावकरांनी त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीला अप्रतिम भाषण केले होते. जब्बार पटेल व मुक्ता राजाध्यक्ष यांनी केलेल्या डॉक्युमेंटरीमध्ये व इतर अनेक उपलब्ध भाषणांत तर भाईकाका स्वत:च बोलले आहेत. तेव्हा मी आणखी काय लिहायचे? पण तु लिहिलेस तर माईआतेला बरे वाटेल, असा आग्रह झाला तेव्हा काही आठवणी लिहायला घेतल्या.

वरळीला 'आर्शीवाद'मध्ये भाईकाका, आम्ही व माझी-मामी एकाच मजल्यावर शेजारी-शेजारी राहायचो. (भाईकाका त्या घराला 'नणंदादिप' म्हणत.) नंतरही सांताक्रुझला 'मुक्तांगण', पुण्याला 'रुपाली' , 'मालती-माधव' ही माझीही घरंच होती. लहान-मोठी सुट्टी पडली रे पडली, की मी तिथे निघायचो, घरचे आणि शालूआते चिडवायची 'निघाला माहेराला' म्हणून !
'रुपाली'त खूप वेळ जायचा- भाईकाकांच्या मोठ्या कॉटवर लोळत, गप्पा करीत व टेप्स किंवा रेडिओवर गाणी ऎकत.
रात्री भाईकाका नॅशनल प्रोग्रॅम किंवा पाकिस्तान रेडिओवर कव्वाली, गझल ऎकायचे.
भाईकाका खरे फुलायचे ते गप्पागोष्टी, गाण्यांच्या मैफलीत. पुण्याला अनेक दिवस-रात्री असे जायचे की, वसंतराव देशापांडे यांना गॅलरीतून हात केला की ते यायचे, नारळकारकाका यायचे. मग गप्पा, चेष्टामस्करी, कोट्या, गाणी आणि नकलांमध्ये रात्र सरायची. आनंदाला उधाण यायचे. भाईकाका आणि वसंतराव ऎकमेकांना खुलवत राहत आणि बैठकीत रंग चढत जाई. अशी कितीतरी वर्षे गेली. माझ्यासाठी खरोखरच ते मंतरलेले दिवस होते. ती झिंग पुढे अनेक दिवस टिकायची. अजूनही ती उतरायला तयार नाही.


'रुपाली'त अनेक लोकांचा राबता असे. कधी कुमारकाका येत. मन्सूर अण्णा राहायला आले की के.डी. दिक्षित, वसंतराव, नारळकाका हमखास असत. कालेलकरकाका, अ. भि. शहा, गोविंदराव तळवळकर, महादेव जोशी, तर्कतिर्थ लक्षमणशास्त्री जोशी, जब्बार पटेल, शांताबाई शेळके, राम पुजारी, राम गबाले, आप्पा जाधव अशा नाट्य, साहित्य, संगीत क्षेत्रातल्या व इतर मातब्बर मंडळींच्या सहभागाने मैफली रंगायच्या. कधी कधी नवोदित तरुण कलाकार हजेरी लावून जात.


भाईकाकांचे एकूणच माणसांवर प्रेम होते. कुणात थोडा काही गुण असला, रसिकता असली, की त्यांच्या गप्पा चालू. जणू काही तो त्यांच्या लेखन, मनन, भाषणासाठीचा रियाज असे. त्यांची विलक्षण संदर्भसंपन्नता व हजरजबाबीपणा त्यांच्या भाषणांप्रमाणेच या गप्पांतही जाणवायचा.
भाईकाकांच्या बाबासाहेब पुरंदऱ्यांशी सहज गप्पा चालू असताना माईआतेने भाष्य अगदी समर्पक होते... 'भाई, तुऊ शिवाजी असतास आणि अफझलखानाला भेटायला गेला असतास तर फक्त भरपूर गप्पा रंगवून परत आला असतास.' एकदा आम्ही सासवडला पुरंदऱ्यांकडे राहायला गेलो व मग बाबासाहेबांबरोबर पुरंदर गड पाहायला गेलो. तेव्हा महारजांचा गड पाहायला जाण्याऎवजी पायथ्यालाच डेरे टाकून भाईकाकांनी ज्या काही गप्पा रंगवल्या, की सर्वजण गड विसरले. शेवटी बाबासाहेबांबरोबर गड बघायला मिळणार, या आशेने आलेला माझा चुलतभाऊ उमेश अस्वस्थ होऊन चुळबुळ करु लागला. तेव्हा भाईकाका त्याला म्हणाले, 'अरे, तू गडाला एक असा फेरफटका मारुन ये.' शेवटी बाबासाहेबांनाच दया येऊन त्यांनी उमेशला फिरवून आणले.

भाईकाका व माईआतेबरोबर मला खूप फिरायला मिळाले. ५ वी- ६ वीच्या सुट्टीत आई-वडिलांबरोबर काश्मिरला न जाता मी भाईकाकांबरोबर बेळगाव, धारवाड, बंगलोर फिरलो. त्यावेळी भाईकाका संगीत नाटक ऍकॅडमीत होते. रोज म्युझीक, ड्रामा, डान्स फेस्टीव्हल्स चालत. बाकी वेळ कलाकारांबरोबर गप्पा. अजूनही त्यावेळची रघूरामय्यांची 'बाबुजी' ही हाक, त्यांची भाईकाकांवरची भक्ती व त्यांनी गायलेली बालगंधर्वाची गाणी डोक्यात आहेत. त्याच ट्रिपमध्ये मन्सुर अण्णांचा झालेला सत्कार, वसंतरावांचे गाणे, कविवर्य बेंद्रे यांची झालेली भेट, मन्सुर अण्णांच्या घरी कुठल्यातरी 'कानडा' प्रकावरुन झालेला गवयांचा जोरदार वाद... अशाही अनेक आठवणी ताज्या आहेत.

इचलकरंजीच्या साहीत्य संमेलनानंतर लवकरच वसंतराव आचरेकरांबरोबर आचऱ्याला रामनवमीला भाईकाकांचे शेपूट म्हणून मला चार दिवस जाता आले. ते दिवसही अविस्मरणीयच. कुमारकाका, चिंचाळकर गुरुजी, राहुल बारपुते, बंडूभैया चौगुले, मुरलीधर आचरेकर, गोंविदराव, अशोक रानडे, रत्नाकर व्यास, कारेकर अशा सगळ्या मातब्बर मंडळींना एक मोठा गोठा साफ करुन उतरवले होते. दिव्सभर गप्पा, गाणी आणि नकला. गोविंदराव आणि भाईकाकांची पेटीची जुगलबंदी. कुमारकाकांचा संध्याकाळचा अप्रतिम पुरिया धनश्री, कल्याणमधली 'मुख तेरो कारो' (त्याच्यावरचे ते गोठ्यातले निरुपण आणि उजळणी), पुन्हा दुसऱ्याच दिवशी सकाळी रंगलेला शुद्ध सारगं, गौड सारंग, वसुंधराकाकींचे 'पतियान भेजो रामा,' अशोक रानडे यांचे रंगलेले गाणे, कुमारकाकांच्या देवळ्यातल्या गाण्याचे मुरलीधर आचरेकरांनी काढलेले अप्रतिम हुबेहुब चित्र आणि चिंचाळकर गुरुजींनी काढलेले दोन-तीन रेघोट्य़ांचे अप्रतिम, पण अमूर्त चित्र. शाकाहारी पंगतीत वसंतराव आचरेकरांनी भाईकाकांना व आम्हा काही मंडळीना गुपचुप पुरवलेले खास मासे... मला त्यावेळेपासून पडलेले- आचरेकरांनी ठेवलेल 'भाचे' हे नाव... एकदा भाईकाकांच्या गैरहजरीत त्यांच्या रसिकतेविषयी आणि गाण्याच्या मर्मज्ञानाविषयी कुमारकाका, गुरुजी आणि राहुलजी यांनी भाईकाकांचे कौतुक... अश्या असंख्य आठवणी मनावर कोरल्या गेल्या आहेत.

गाडितून खूप वेळा प्रवास व्हायचा. माईआते गाडी चालवायची. त्यावेळी कवितांची आवृत्ती होत असे. माईआतेला जास्त कविता पाठ आहेत, हे जाणवायचे. पण भाईकाकांना लागेल त्या वेळी, योग्य संदर्भात पटकन काही आठवायची सिध्दीच होती. सगळ्यांना अडले, तर भाईकाकांना हमखास आठवायचेच.
भाईकाकांच्या साठीच्या वेळी कवी बोरकरांनी पहाटे गोव्याहून फोन केला होता. पण 'फोनवरुन दिलेला कसला रे आशिर्वाद?" म्हणट प्रत्यक्ष डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्यायला मुद्दाम प्रवास करून ते रात्री 'रुपाली' येऊन थडकले. शाल सावरत तरूण कवीच्या उत्साहाने आत्ताच नवीन कविता केल्यासारखे ते त्यांच्या कविता म्हणत, गात होते. त्याचवेळी मन्सुर अण्णा खास भाईकाकांसाठी गायलेली 'भैरव' अजून आठवतो! त्याच मुक्कामात एका संध्याकाळी ८-१० जणांच्या घरगुती मैफलीत ते गायलेही होते. भाईकाकांच्या पेटीच्या अप्रतिम साथीने ते गाणी खुलले होते.मुलतानीच्या 'लागी लागी' आणि भैरवीतल्या 'डारो ना डारो' मध्ये तर अण्णांनी असंख्य प्रकारच्या तानांच्या नुसता पाऊस पाडला होता. सर्व मंडळी घरी गेल्यावर भाईकाका आणि अण्णांची पुन्हा मैफल जमली आणि संपूर्ण वेगळ्या जागांच्या ताना ऎकायला मिळाल्या.

भाईकाकांनी गाण्यावर अपार प्रेम केले. त्यांच्याबरोबर मैफलीत किंवा रेडिओ-टेपवर गाणं ऎकताना अक वेगळाच आनंद मिळे. त्यांच्या नुसत्या उपस्थितीनेच मैफली रंगत. माझ्या वडिलांच्या उत्साहाने आमच्या घरी गाण्याच्या घरगुती बैठकी होत आणि भाईकाकांमुळे त्यांना वेगळीच शान येई. भाईकाकांच्या उपस्थितईमुळे गवई, साथीदार आणि श्रोतेही खुलत. रसिकतेने व जाणाकारीने त्यांनी विविध प्रकारचे गाणे ऎकले होते व त्याबद्दलचे त्यांची यादगारही जबरदस्त होती. अगदी शेवटच्या दिवसांतली गोष्ट आहे. रामभाऊ किंवा सुधिरकाकांनी आणलेले भीमसेनकाकांच्या पुरिया धनाश्रीचे एक जुने रेकॉर्डिंग आम्ही ऎकत होतो. भाईकाकांना ते खूप आवडले. म्हणाले, 'हे वेगळेच - आणि भीमसेनने खूप ईर्ष्येने गायलेले गाणे आहे. अगदी रोशनाअरा बेगमच्या ढंगाचे.' नंतर कव्हर नोटसवर वाचले की, या गाण्याला रोशनारा बेगम हजर होत्या व मैफिलीनंतर त्यांनी भीमसेनकाकांचे खूप कौतुक केले होते.


'वरात' आणि 'चाळी' चे काही च प्रयोग मला पाहायला मिळाले, ते मी लहान असताना. पण भाईकाकांची दोन नाटके मला अगदी अथपासून इतिपर्यंत अनुभवायला मिळाली. 'वटवट' आणि 'फुलराणी'. माझा मुक्काम त्यांच्याकडे पुण्यालाच असल्यामुळे 'वटवट'च्या धमाल तालमी आणि 'बालगंधर्व'चे पहिले ८-१० प्रयोग मिळाले. 'फुलराणी' लिहून होत असतानाही मी 'रुपाली'तच होतो. भाईकाकांनी 'फुलराणी'चे आतल्या खोलीत घरगुती वाचन केले तेव्हा वसंतरावांना बोलवायलाही गेलो होतो. दगडोबाच्या भूमिकेवर भाईकाकांचे खूप प्रेम होते आणि ती स्वत: करावी, असेही सुरुवातीला त्यांच्या मनात होते. दादरला प्लाझाजवळच्या एक हॉलमध्ये सतीश दुभाषीम भक्ती बर्वे, अरविंद देशपांडे यांना घेऊन तालमी चालत. भाईकाकांचा मुक्काम आमच्या घरीच 'गोकुळ'ला होता. रोज संध्याकाळी मला घेऊन ते तालमीला जात असत. नंतर असाच अवर्णनीय आनंद मिळाला तो एनसिपीएच्या पोग्रॅम्सच्या तालमित.
तालमींच्या वेळी भाईकाकांच्या अंगात प्रचंड उत्साह भरे आणि त्यांच्या उपस्थितीमुळे कलाकारांच्या अंगातही एक वेगळाच उस्ताह निर्माण होई. त्यांच्या आवाजातच ओलावा आणि आर्द्रता होती. चटकन संवाद साधायची एक विलक्षण शक्ती होती. श्रोत्यांची नाडी त्यांना अचूक सापडलेले होती. असे खूप जाणवायचे की, मोठ्यामोठ्या नटांना, गायकांना भाईकाकांकडुन खूप शिकण्यासारखे होते. त्यात परत कधी 'शिकवण्याचा' आव नसे. आपण सर्व मिळुन जो प्रोगॅम करणार आहोत, तो उत्तम व्हावा, हिच केवळ वृत्ती. भाईकाकांची सर्वांबद्दलची स्नेहभावना व सलगी देणे विलक्षण असे. छॊट्या-मोठ्या कलाकारांपासून ते बॅकस्टेज आर्टिस्टपर्यंत सर्वानांच हा आपला कार्यक्रम आहे, या भावनेने तन्मयतेने काम करायचे.

भाईकाकांची भाषणे तशी अनेक ऎकायला मिळाली. ती एक पर्वणीच असे. त्यांच्या हजरबाबीपणा, विनोद, भाषणाचा ओघ, त्यात येणारे असंख्य संदर्भ थक्क करुन टाकीत. एकदा मी आणि उमेश एका भाषणाला गेलो होतो. भाईकाकांच्या अगोदर झालेल्या भाषणातील (काही) मुद्दांवर त्यांची विनोदी टिप्पणी ऎकून, इतर भाषणे चालू असताना ते काहीतरी लिहीत होते तो कागद आम्हा बघायला मागितला. त्यावर फक्त गांधीजींचे व हत्तीचे चित्र काढलेले होते ! आणिबाणीच्या वेळची भाषणे असोत. कोणा कलाकाराचे कौतुक, सत्कार असो, की शोकसभा असो, त्यांच्या प्रत्येक भाषणाने आम्हाला अधिक श्रीमंत केले, अंतर्मुख केले असे जाणवे.

भाईकाका- माईआते माझ्या आवडींना विचारपुर्वक खतपाणी घालत होते. मला सायन्सची आवड म्हटल्यावर मणेरीकरांना विचारून Science ची पुस्तके, How & Why ची पुस्तके, English Classics ची सोपी Versions कायम आणत. परवाच जुनी पत्रे चाळत असताना ७५ साली मला पाठवलेल्या पत्रात Toynbee चा एक छान उतारा माझ्यासाठी मुद्दाम Type करुन पाठवलेला सापडला. मला चौथीची स्कॉलरशिप मिळाली तेव्हा त्यांनी बक्षीस म्हणून बाजाची पेटी आणली व प्रथम पुरुषोत्तम वालावलरांकडून व त्यांना इतक्या लांब जमेना (किंवा माझे ऎकवेना) म्हणून अभिषेकीबुवांच्या सल्ल्याने रामभाऊ फडकेसरांची शिकवणी लावून दिली. त्यानंतर परदेशात शिकायला जाताना मुद्दाम गोविंदरावांना सांगून त्यांनी नवी पेटी बनवून दिली होती. आता भाईकाकांची पेटी माझ्याकडे आहे. ही पेटी त्यांना भीमसेनकाकांनी खास बनवून दिली होती. (भाईकाकांनी 'तुज सम कोण सांग मज गुरुराया' असे कार्ड त्यांना पाठवून पेटी बनवून आणायची विनंती केली होती.) भाईकाका गेल्यावर माईआतेने ती मला घेऊन जायला सांगितली. त्यापुर्वीच पाच-सहा वर्षे भाईकाका 'तुला घेऊन जा, मला पार्किन्सनमुळे आता वाजवायला येत नाही.' असं सांगत होते. पण मी पुण्याला गेल्यावर मुद्दाम पेटी काढायचो. प्रथम वाजवताना त्यांना हात साथ देत नसत, पण थोड्या वेळाने रंगात आले की, पार्कीन्सन विसरून इतके अप्रतीम वाजवायचे! आणि आपल्याला अजुन पेटी जमतेय, हे कळल्यावर लहान मुलासारखे स्वत:वरच खूश व्हायचे. मग आशुतोषला एखादे गाणे शिकवायचे. जुन्या चाली आठवायचे. त्यामुळे ती पेटी तेव्हा न्यायचे मनातही आले नाही.

तुसानला आमच्या घरात शिरल्या शिरल्या दारातच भाईकाकांचा पेटी वाजवतानाचा सुंदर फोटो आहे. त्यात त्यांचे हात व डोळीही विलक्षण बोलके आहेत. भाषण, गाणे, पेटी, लिखाण, गप्पा... काहीही असो. भाईकाका पटकन संवाद साधायचे. फडकेसरांकडून मी पेटीचे तंत्र शिकलो होतो. रेकॉर्डस लावून मी साथ करायचो. भाईकाका 'गोकुळ'ला एकदा राहायला आले असताना त्यांनी मला तोडी वाजवायला सांगितले. नंतर त्यांनी स्वत: पाच-सहा मिनीटे जो काही अप्रतीम तोडी वाजवायला सांगीतले. नंतर त्यांनी स्वत: पाच-सहा मिनीटे जो काही अप्रतीम तोडी वाजवला, की मला पेटीचा मंत्र मिळाला, असे वाटले (बोटात उतरला नाही. तरी.). पुण्याला कधी रेकॉर्डसबरोबर, तर कधी भाईकाका, मन्सूर अण्णा, वंसरराव यांच्या गप्पा-गाण्यांच्या घरगुती बैठकीत ते मला साथ करायला, वाजवायला सांगायचे व चुकतमाकत केलेल्या साथीचे कौतुकही करायचे. स्वत:ही वाजवून दाखवायचे. बालगंधर्वाच्या प्रभावाने आलेली लय-तालावरची सहजसुंदर हुकूमत त्यांच्या पेटीत होती. यांत्रिक सफाईपेक्षा जिवंतपणा, नवनिर्मीतीचा प्रयत्न, उत्स्फुर्तता याला नेहमीच महत्व दिले. त्यांची पेटीची साथ जिंवत आणि गाणं खुलवणारी होती. वसंतराव आणि मन्सुर अण्णा यांचे गाणे भाईकाकांच्या साथीने अधिक खुललेले मी अनेक वेळा अनुभवलेले होते.भाईकाका म्हणायचे, 'काही वादक साथीदाराची भूमिका न घेता 'साक्षीदार' म्हणून साथ करतात.' (एकदा कोणाची तरी फारच वाईट साथ चालू असताना भाईकाकांची कॉमेंट खास होती - 'तुझ्या पेटीचे दु:ख मला सांगू नको रे...')

भाईकाका व माईआते यांचा माझ्यावरचा प्रभाव मी वेगळा काढूच शकत नाही. ही दोन व्यक्तिमत्वे जरी खूप वेगळी असली तरी त्यांचा विचार व त्यानुसार ठरलेली कृती शेवटी एकत्रच व्हायची. आजी-आजोबा किंवा पार्ल्याच्या आजी असतानाही ठाकूर आणि देशपांडे कुटूंबियाचे ते दोघेही (प्रत्यक्षात माईआतेच!) कुटुंबप्रमुख होते. माईआते आपला सल्ला ठामपणे, आग्रहीपणे मांडन तर्काने समजून द्यायला जाई (व भाईकाकांनी दिलेले 'उपदेशपांडे' नाव सार्थ करी.) , तर भाईकाका तीच गोष्ट इतक्या सौ.म्यपणे, सहज किंवा विनोदाने सांगत, की हेच योग्य, याला पर्यायच नाही. असेच सगळ्यांना वाटे. कधी वाद झालाच (जो ठाकूरांत नेहमी व उगाचच होई..), तर भाईकाकांच्या एखाद्याच वाक्याने वातावरण एकदम निर्मळ होऊन जाई. प्रतिपक्षाबरोबर वाद घालण्याऎवजी प्रतिपक्षाला स्वपक्षात सामील करण्याची किमया भाईकाकांच्या नैसर्गिक स्नेहभावनेत व आर्जवी स्वरात होती. गानुकाका तर घरचेच होते व दळवींनी म्हटल्याप्रमाणे 'मधू गानु' हे खरोखरीचे भाईकाकांचे 'हनु मानू' होते. पण त्यांचीही मधूनमधून होणारी चिडचिड भाईकाका मधे पडले की चटकन नाहीशी होई व तापलेले वातावरण निवळे.

भाईकाकांच्या सहवासामुळे 'गाड्याबरोबर नाळ्याची यात्रा' या नात्याने मलाही त्याच्या स्नेह्यांचे, चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले. वंसतराव आचरेकरांनी मला 'भाचे' बनवून टाकले होते व ते तशीच हाक मारायचे. गानुकाकांबरोबर बाबुकाका, मंत्रीकाका, लालजी, श्रीकांत मोघे, मधु कदम या 'वरात' कंपुतही माझे लाड होत. मी परदेशी शिकायला गेलो तेव्हा भाईकाकांना काळजी वाटून त्यांनी तिकडच्या मित्रांना माझी काळजी घ्यायला कळवले. त्यांचे परदेशात इतके स्नेही होते, की परदेशातही मला अनेक घरे मिळाली. के.डी. दिक्षितांचे बंधू प्रभाकर दीक्षित, सावूर, म्हात्रे यांच्या कुटूंबातच नव्हे तर त्यांच्या मित्रमंडळींतही मला प्रेमाने शिरकाव मिळाला.


भाईकाकांनी 'गप्प बसा' संस्कृताचा तिटकारा कायम बोलून दाखवला. ते खरेच होते. ते प्रश्नांना, उत्सुकतेला कायम प्रोत्साहन देत. एखाद शब्द, व्युत्पत्ती, कवितेची ओळ किंवा संदर्भ अडला की दोघेही अस्वस्थ होऊन त्याच्या मागे लागत व ती जिज्ञासा पुरी होईपर्यंत स्वस्थ होत नसत. मग Molesworth चा कोश निघे. कालेकरकाका, शांताबाई, श्री. पु. भागवत, लक्ष्मणशास्त्री, पाडगावकर, धोंड, बाबासाहेब, गोंविदराव अशांना फोन होत. संगितातला प्रश्न असल्यास त्याचा उलगडा करायला वसंतराव शेजारीच होते. प्रत्यक्षात विज्ञानशास्त्रात रस फारसा नसला तरी दोघांतही संशोधकांना योग्य अशी ही वृत्ती पुरेपुर होती. शास्त्रांबद्दल आणि संशोधकांबद्दल त्यांना आदर होता. म्हणूनच त्यांनी अशा कार्यांना देणग्याही दिल्या. 'जोडोनिया धन उत्तम व्हेवारे, उदास विचारे वेच करी' हे ट्रस्ट्चे बोधवाक्य निवडणारी व आचरणारी माईआत्तेच होती. (भाईकाकांना 'उत्तम वेव्हारे' किंवा 'जोडोनिया धन' दोन्हीमध्ये गती नसली , तरी 'उदास विचारे वेच करी' ही वृत्ती पुरेपूर होती.) माईआते सर्व माहिती काढून. टॅक्सच्या दृष्टीने जास्तीत जास्त पैसे कसे, केव्हा देता येतील, याचा किस काढून सर्व कामे करी. सगळं झाल्यावर भाईकाकांचा त्याला पूर्ण उत्साहात पाठिंबा असे!
सेवादल, समाजकलाणासाठी झटणऱ्या संस्था आणि व्यक्तींबद्दल त्यांना खूप आत्मियता होती.

'आहे मनोहर तरी' प्रसिद्ध झाले. एनसीपीएच्या गेस्ट हाउसच्या खोलीत श्री. पु., राज्याधक्ष दोघे व आम्ही दोघे अशा घरगुती वातावरणात प्रत मिळाली व रात्री उशीरापर्यंत जागून मी ती पुर्ण वाचून काढली. मी खूप प्रभावित झालो होतो ते वाचून. दुसऱ्या दिवशी एनसिपीएला गेलो तेव्हा भाईकाका म्हणाल, 'अरे कोणी दुखावले तर जाणार नाहीत ना?' अनेकांना भाईकाकांवरची ती तक्रार वाटली होती, टिका वाटली होती. पण माईआतेने भाईकाकांचे कलागुण किती कष्टाने आणि विचाराने जोपासले, हे आम्हाला माहिती असल्याने व भाईकाकांचे माईआतेवर विश्वासाने विसंबणे ठाऊक असल्याने तसे आम्हाला कधीच वाटले नाही.
भाईकाकांची वृत्तीच अस्वादकाची... दाद देण्याचे होती. पण ते उगाचच बेजबाबदार दाद देत नसत. टिका, समीक्षा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा व तोल सांभाळायचा आटापिटा करण्यापेक्षा ते चांगले ते टिपत. Disney, Chaplin, Woodhouse ही वेगवेगळ्या माध्यमांतून आनंद पसरवणारी त्यांची दैवते होती. तसेच टागोर. त्यांचा परिसस्पर्श खुपजणांच्या आयुष्यांना झाला. विवीध क्षेत्रांतील अशी अनेक उदाहरणे ऎकत आलो आहे. भाईकाका गेले तेव्हा भेटायला आलेले जयवंत कुळकर्णी सांगत होते, "मी तबला वाजवायचो. पण एका कार्यक्रमात आयत्या वेळी मला कोरसेमध्ये उभं केलं गेलं. अध्यक्ष पु.ल. होते. त्यांनी सर्वांतून फक्त मलाच बोलवून घेतले व म्हणाले, 'गाणे कर. तुझा आवाज वेगळा, खुप चान आहे.' आणि माझे आयुष्य पार बदलले. भाईकाकांची स्मरणशक्ती अचाट होती. २०-३० वर्षांनीही पूर्वी एखादे वेळीच भेटलेली माणसे ओळखून ते त्यांना चाट करायचे.


भाईकाका पहिल्यांदा खूप खचल्यासारखे झाले ते वंसतराव गेल्यावर. इतक्या वर्षांची त्यांची दोस्ती! म्हणायचे की, अनेक संदर्भ असे आहेत की, मी ते इतर कोणाकडे बोलून कळणार नाहीत. ते खरेच होते. भाईकाकांनी एकदा वसंतरावांच्या हजेरीत 'राजकीय ध्वनिमुद्रिका'चे वाचन केले होते. तेव्हा त्या दोघांच्या बोलण्यातून लेकातले अनेक नवे संदर्भ व खुब्या मला कळाल्या होत्या. 'वसंता' हा त्यांच्या प्रेमाचा आणि कौतुकाचा विषय होता. वसंतरावही होतेच तसे जबरदस्त! कधी ते चारच सुरांत खंडमेर पद्धतीने अफाट विवीधता दाखवून चक्रावून टाकतील, तर कधी 'चंद्रिका ही जणू...' एकामागोमाग एक सहा, सात, सोळाच नव्हे, तर बारा, दहा मात्रांच्या तालात सटकन त्या-त्या तालाचे वजन पकडून असे चपखल म्हणून दाखवतील, तर कधी चटकन ग्राम बदलून रागांचे संबंध दाखवतील. त्यांच्या जादूगाराच्या पोतडीतून केव्हा काय निघेल, याचा नेम नसे. संगीतच नव्हे, तर कुठल्याही विषयावर उत्स्फूर्त निरुपण करुन त्यातील नाविन्य दाखवायचे त्यांचे सामर्थ्य होते. भाईकाका आणि वसंतराव दोघेही जरी Krewards are within youl वृत्तीचे होते. तरी वसंतरावांना गेल्यावर मला लिहिलेल्या पत्रात- भिमसेनकाकांचा मारवा ऎकतानाच कशी वसंतराव गेल्याची बातमी कळायचा योगायोग होता, ते सांगून भाईकाका म्हणतात, 'माझा अणि त्याचा तर गेल्या ४०-४२ वर्षाचा स्नेह. आम्ही दोघेही जोडीनेच वाढलो. त्याचं गाणं तर मोठं होतंच, पण नुसती भेट होनं हादेखील किती आनंददायक अनुभव असे, हे तुला ठाऊकच आहे. त्याने सांगितलेल्या गोष्टी, त्याच्या नकला, नाना विषयातली माहिती... ती सांगण्याची खास पद्धत हे आठवताना हसू कोसळायचं. आता हसू येतं, पण त्यामागून लगेच अश्रूही उभे राहतात. मला तर खचल्यासारखंच वाटतं आहे. आता पुन्हा गाण्याची किंवा गप्पगोष्टींची तशी मैफल जमणार नाही. वसंता यापुढे 'आहेस काSS?' म्हणत त्या त्या दिवशीचा त्याचा जो गंमत करायचा मूड असेल त्यासकट उभा राहिलेला दिसणार नाही, हा विचार सहन होत नाही. आपल्या अंतरंगतलाच एक भाग गळून पडल्यासारखे झाले आहे. त्यामुळे कशातही लक्ष लागत नाही. क्षणोक्ष्णी त्याची आठवण येते. एखादा माणूस आपल्या अंतरंगात किती शिरला आहे, याची जाणीव त्याच्या हयातीत येत नसते...'
वसंतरावांचा नातू राहुल गाऊ लागला तेव्हा त्यांच्या घरी भाईकाकांबरोबर ऎकायला गेलो होतो. भाईकाकांना खूप आनंद झाला होता. तेव्हा तो सर्व कुमारकाकांची गाणी गायचा. तसे त्याच्या आईने बोलून दाखवले तेव्हा भाईकाका म्हणाले, 'तो पुढे आपोआपच वसंताचे गाणे गाऊ लागेल बघ.' आणि तसेच झाले.

पार्किन्सनमुळे लिहिणे, भाषणे, लोकांत येणे-जाणे थांबले तेव्हा संगीत हाच त्यांचा मुख्य विरंगुळा राहिला होता. ते गप्पा एन्जॉय करीत. जोक्स, हजरजबाबीपना तसाच होता. आपण पुर्वीसारखे बोलणे, गाणे, प्रोजेक्ट करू शकत नाही, हे जाणवल्यावर ते जास्तच गप्प राहू लागले. मैफलीचा बादशहा असणारे भाईकाका गप्प गप्प राह्त तेव्हा सर्वांनाच हळहळ वाटे. एकदा असेच सुरेश गजेंद्रगडकर भेटायला आले होते. थोडा वेळ बसले. जाताना माझ्या खांद्यावर हात ठेवून निरोप घेताना ते अगदी रडवेलेच झाले. म्हणाले, 'भाई आणि बोलत नाहीत ! सहन होत नाही रे!'
पण तरीही त्यांची माणसांच्या सहवासाची आवड तसीच राहिली होती. अगदी कोणीही भेटायला आले आहे सांगितले की दुसऱ्य क्षणी 'आलो' म्हणून उठून बसायचे व व्हिलचेअरमधून बाहेर यायचे. कधीच आळस, बेपर्वाई नसायची. 'मुक्तांगण', 'आशिर्वाद'. रुपाली' त असताना भाईकाका जेव्हा खूप लिहायचे तेव्हा त्यांच्या याच वृत्तीमुळे लिखाण कमी होई किंवा त्यात खंड पडे. म्हणून लोंकाना थोपवण्याचे काम माईआतेने स्वत:च्या शिरावर घेऊन वाईटपणा घेतला. 'महाराष्ट्र्भूषण' पुरस्कार स्विकारतान 'विझवून दीप सारे मी चाललो निजाया' असे त्यांनी म्हटले तेव्हा खूप वाईट वाटले. त्यांच्या बाबतीत याच कवितेचे पहिले कडवे मला सारखे जाणवत राही. 'स्वरशब्द वेचलेले शोषून सर्व प्राणी, आजन्म गायिली मी त्यांची अखंड गाणी.' भाईकाकांनी करंदिकराच्या 'घेणाऱ्याने घेत जावे' मत्रांप्रमाणे अनेकांचे गुणविशेष टिपले, आत्मसात केले व लोंकापर्यंत पोहचवले आणि देणाऱ्याचे हात दोन्ही अर्थाने घेतले. कृतज्ञतेने, स्नेहाने दाद देतही घेतले व दात्याचेही हात घेतले. मिळवलेला पैसा उदास विचारे वेच करुन व त्याहीपेक्षा मिळवलेला आनंद शतपट करीत लोकांना.... पुढच्या पिढ्यांना वाटला.


कुमारकाका गेले तेव्हा 'साधने'त वसंत बापट यांनी लिहीले होते की, त्यांचे गाणे आता यंत्रात राहिले, तत्रांत राहिले, पण आमचा मंत्र निघून गेला. त्यावेळी आणि भाईकाका गेले तेव्हा पुन्हा तशीच मन:स्थिती झाली होती. पण हे मांत्रिक इतके जबरदस्त होते की, आता कालांतराने ते नाहीत, याची रुख्रुख जरी सतत राहिली असली तरी त्यांच्या मंत्राचा प्रभाव तसाच जालीम- पुन:पुन्हा जाणवत राहतो.
.

भाईकाकाक गेले तेव्हा एका वर्तमानपत्रात कार्टुन आले होते की, ढ्गांवर देवदूत आहेत व हशा ऎकून म्हणत आहेत, 'पु.ल. आले वाटतं!' देवावर कणभरही विश्वास नसला, तरी स्वप्नरंजन चालू राहते की, पुन्हा कधीतर ते मंतरलेले दिवस मिळतील. भाईकाका, कुमारकाक, वसंतराव, मन्सुर अण्णा हे भुलोकीचे गंधर्व मैफल रंगवून बसलेले असतील व आपणही त्यात कुठेती सामिल असू ! ऎकायला!

चायचित्रे सौजन्य - 'चित्रमय स्वगत' . मौज प्रकाशन गृह.
(लोकसत्ता)

0 comments

Post a Comment