ही घटना आहे लखनौमधील ! त्यावेळी महाकवी निराला अमीनाबाद पार्कच्या पुढील मोहल्यात राहात होते. एक दिवशी ते असेच चालले
होते. समोर एक टांगेवाला प्रवाशांची वाट पाहत उभा होता. निरालाजींनी त्याला नीट न्याहाळले व विचारले, परवा तूच मला हजरतगंजहून
घेऊन आला होतास ना ? तो म्हणाला, होय हुजूर ! माझ्याकडून काही चूक झाली होती का ? निरालाजी सहज म्हणाले, अजिबात नाही.
परवा माझ्याजवळ फक्त दोन आणेच होते. तूला आणखी पैसे द्यायला गेले दोन दिवस मी तुला शोधत आहे. हे पैसे ठेव तुझ्याजवळ !
पांच रुपयांची नोट पाहून तो टांगेवाला चांगलाच उखडला.

निरालाजी म्हणाले, अरे रागावू नको. मी चांगल्या भावनने हे पैसे तुला देत आहे. परवा तुझा मुलगा फाटक्या तुटक्या वस्त्रात धावत
तुझ्याकडे येऊन एक पैसा मागत होता, पण तोही तू देऊ शकत नव्हतास. ती तुझी असहाय्यता मी विसरु शकलो नाही. म्हणून हे पैसे
ठेवून घे व त्या निरागस मुलाचे मन मोडू नकोस. त्या टांगेवाल्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. त्याने निरालाजींची क्षमा मागितली.


0 comments

Post a Comment