बाळु सकाळी न चुकता ८.२१ पकडणार
संध्याकाळी कसा बसा ६.५२ला लोंबकळणार
चुकुन विंडोसीट मिळताच बाळु धन्य होणार
तो बिचारा मध्यमवर्गीय तो असाच रहाणार

कधी सरकार कोसळणार
कधी शेअर बाजार वधारणार
बाळु मात्र निर्विकार रहाणार
सकाळी न चुकता ८.२१ पकडणार

माणुस हा मरणारच, कधी बाळुचंही कोणी मरणार
पराकाष्ठेने बाळु डोळ्यातुन दोन थेंब सांडणार
पोचवुन आल्यावर बादलीभर पाण्यात अंघोळ करणार
दुस-या दिवशी सकाळी ८.२१ पकडणार

श्रावणात घन निळा बरसणार
आजुबाजुला मोगराही फ़ुलणार
पिसारा फ़ुलवुन मोरही नाचणार
बाळु मात्र न चुकता ८.२१ पकडणार

दिवसभर ऑफ़िसात बाळु पाटया टाकणार
साहेबाच्या शिव्यादेखील मख्खपणे ऐकणार
घरातल्या कटकटींतही बाळु तटस्थ राहणार
सकाळी मात्र न चुकता ८.२१ पकडणार

कधीतरी बाळु म्हातारा होणार
निवृत हौउन निवांत आयुष्य जगणार
८.२१ च्या वेळेला थोडा अस्वस्थ होणार
८.२१ मात्र न चुकता बाळुशिवाय धावणार

0 comments

Post a Comment