लग्न झाल्यानंतर साधारणपणे १०-१५ दिवसांनी "स्वयंपाक" हा मुद्दा किती महत्वाचा होता हे तरुणांना कळून चुकते. लग्न ठरवताना सुंदरता, शिक्षण, आणि नोकरी हे तीनच मुद्दे विचारात घेतल्याने हा अनर्थ तरुणांवर ओढवतो. मुलीही "लग्नानंतर स्वयंपाकाच बघू..." असाच विचार करत असाव्यात किंबहुना करतात. खरंतर लग्न झालेल्या ह्या मुलींना बाई किंवा काकू म्हणायला हरकत नाही. पण "बाई" म्हटल्यावर ह्या मुलींना प्रचंड राग येतो. विशेषत: सॉफ्टवेअर मधल्या मुलीला. स्वयंपाक आणि घरकामाची जबाबदारी एकटीच्याच अंगावर येईल का काय असं बहुधा त्यांना वाटत असावं.ह्या फील्डमधल्या मुलींशी ज्यांच लग्न झालेले आहे त्यांच्याबद्दल मला मनापासून सहानुभूती व्यक्त करावीशी वाटते. स्वयंपाक आणि जॉब अशी दुहेरी भूमिका आपण उत्तमरीतीने पार पाडत आहोत असा ह्या बायकांचा गोड गैरसमज असतो.

स्वयंपाकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्वप्रथम लग्न न झालेल्या तरुण वर्गाला माझा सल्ला आहे की लग्न ठरवताना, "स्वयंपाक येतो का?" हा प्रश्न आवर्जून विचारावा. " थोडा-थोडा स्वयंपाक येतो" असे उत्तर मिळाल्यास " थोडा म्हणजे किती??" हे विचारायला विसरू नका. प्रत्येकीची definition वेगळी असते. माझ्या पत्नीने "सगळं बनवता येतं..." असं म्हटलेलं मला आठवतं. "चांगलं" , "बर्‍यापैकी" हे शब्द ती जाणूनबुजून म्हणाली नसावी हे मला तिचे पाककौशल्य बघितल्यावर कळाले.
आठवड्याचे सातही दिवस स्वयंपाकाचा कंटाळा असणार्‍या ह्या बायका तुम्हाला सॉफ्टवेअर मध्येच सापडतील.सदानकदा आजचा स्वयंपाक करायचं कसं चुकवता येईल ह्याच खटाटोपात त्या असतात. " आज बाहेर खायला जायचे का?" हा प्रश्न नवर्‍याने विचारून होण्याआधी त्या "सही...... कित्ती छान......आलेच हं आवरून...." असे म्हणत क्षणार्धात दिसेनाश्या होतात. एकदा बाहेर जायचं ठरवल्यावर , हुशार आणि शहाण्या नवर्‍याने ते कधीही कॅन्सल करू नये. अन्यथा भांडण होण्याचे ९९% चान्सेस असतात.शेवटी बाहेरून हॉटेलमधले जेवण मागवावे लागते आणि मगच ह्या बायका शांत होतात हे सांगण्याची गरज नसावी. वीक एन्ड ला बाहेर पडण्याची वेळही ह्या बायका अचूक हेरतात.संध्याकाळीच बाहेर पडायचं म्हणजे नवरा "रात्री बाहेरच जेवू" असे म्हणतो हे त्यांना चांगलेच ठाऊक असते. चुकून कधी स्वयंपाक करण्याचा योग आलाच तर, "आपण" आज खिचडी बनवूया का? असे प्रेमाने बोलून नवर्‍यालाही स्वयंपाक घरात ओढून काम करायला लावण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. काही नवरेमंडळी ह्याला बळी पडतात. काहीजण "आपण" ह्या शब्दावरून "तू" ह्या शब्दावर नेण्याचा निष्फळ प्रयत्न करतात.
एकटीने स्वयंपाक करणे हा आपल्यावर अन्याय आहे अस ह्यांना नेहमी वाटतं. "दोघे खातो ना?? मग दोघे मिळून स्वयंपाक करू" असा professionalism त्या घरातही आणतात. ह्या बायका स्वयंपाक करताना नवरा बाहेर आरामात TV बघत असेल तर हे त्यांना अजिबात बघवत नाही. स्वयंपाक करताना ह्या आळशी माणसाला कुठलं काम देता येईल ह्याचा विचारच त्या करत असाव्यात. गरज नसलीतरी थोडं का होईना आपल्या नवर्‍याने काम केलच पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असतो.अश्या बायकांचे नवरे साधारणत: ताट-वाट्या घेणे, कोथिंबीर निवडणे,डायनिंग टेबल पुसणे अशी कामे करतात. IT मधल्या बायकांना उत्तम व चविष्ट भाजी बनवता येते ही संकल्पना निव्वळ अशक्य आहे. बनवलेल्या भाजीचा पहिला प्रयोग त्या आपल्या नवर्‍यावरच करतात. एवढ्यावरच त्या थांबत नाहीत. वर तोंड करून "कशी झालीय भाजी?" हा प्रश्न विचारायला ते अजिबात विसरत नाहीत. "suggestions " म्हणजे त्यांना अपमानकारक वाटते. त्यांना suggestion देणे म्हणजे नवर्‍याने वादाला सुरुवात केल्यासारखी असते. भांडण नको म्हणून हे नवरे " भाजी मस्त झालीय..." म्हणत हळूच फ्रीजमधून थोडा सॉस, लोणचे घेताना दिसतात. त्यातूनही हिम्मत करून कुणी suggestion दिलेच तर त्यांची प्रतिक्रिया ठरलेली असते. "झालं? ठेवलास नावं??"....."थोडं कमी जास्त होणारच की रे"......."तू करायचं होतास मग"......"एवढं केलय त्याचं काही नाही..." असा उपकाराचा टोला लगवायलाही ते मागेपुढे बघत नाहीत.
नुकतचं लग्न झालेल्या मुली कंपनीत बसून google वर रेसिपी शोधताना दिसतात. "आपल्याला काहीही बनवता येत नाही" हे नवर्‍याला इतक्या लवकर कळू नये हा त्यामागचा उद्देश असावा. रेसिपी मिळाली नाही तर आईला,आत्याला,मामीला फोन करून तासभर ह्या बायका रेसिपी विचारण्यात काढतात. "योग्य वयात स्वयंपाक शिकली असतीस तर हि वेळ आली नसती" हे मात्र नवर्‍याने दिसत असूनही म्हणू नये. ह्या बायकांचा "जेवण बनवण्याचा" मूड अशाने केंव्हाही जाऊ शकतो. चौरस आहार सोडून दररोज नवनवीन छोटे छोटे पदार्थ बनविण्यावर ह्यांचा भर असतो. हे भयंकर आणि अयशस्वी प्रयोग करण्यामागचा उद्देश प्रेमापोटी असतो की " उद्यापासून स्वयंपाकाला बाई लावू" हे नवर्‍याने स्वत:हून म्हणण्यासाठी? हे त्या बायकांनाच माहित...!
ह्या बायका मंडईतल्या गर्दीमध्येही सहज ओळखून येतात. ब्रँडेड जीन्स आणि टी-शर्ट , एका हातात महागडा मोबाईल व दुसर्‍या हातात पर्स हि त्यांची ओळख. मल्टीप्लेक्स , शॉपिंग मॉल मध्ये बिनधास्त पैसे वाया घालवणार्‍या ह्या बायका मंडईमध्ये १-२ रुपयासाठी घासाघीस करताना पहावयास मिळतात. "too costly ......ohh.....too much ......" असे उद्गार ऐकल्यास ती शक्यतो सॉफ्टवेअर मधलीच समजावी. इथे bargaining हा त्यांच्यादृष्टीने मूळ मुद्दा नसून " IT मधली असले म्हणून काय झाले? मलाही भाज्यांमधले कळते म्हटलं...." हे जगाला पटवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मजेची गोष्ट म्हणजे अश्या बायकांना मंडईतले विक्रेतेही ४-५ रुपये आधीच वाढवून सांगतात. एज्युकेटेड बायकांना हे अजूनही कळालेले नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

मित्र हो, हा लेख लिहण्याचा उद्देश हाच की, तुम्ही सॉफ्टवेअरमधल्या मुलीशी लग्न करत असाल तर पुन्हा विचार करा. बोटांवर मोजण्याइतक्या बायकांना स्वयंपाक येत असेलही, पण होणारी बायको त्यांपैकीच आहे का नाही ते तुम्हालाच ठरवावे लागेल. तुम्हाला स्वत:ला चांगला स्वयंपाक येत असल्यास उत्तमच. पण ह्याचा फायदा IT मधल्या मुली घेणार नाहीत ना हे तपासून पहा. लग्न झालेल्या मित्रांनो , काळ बदलला आहे. मी स्वयंपाक करायला शिकलो. तुम्ही केंव्हा शिकणार?? अजून वेळ गेलेली नाही. चला , उठा....आतातरी स्वयंपाक करायला शिका.

धन्यवाद ,

सुजय कुलकर्णी.
sujayrk@gmail.com

तू निर्मळ ओळख माझी,
तरी तुला मी अनोळखी असे...

तू मंद श्वास माझे ,
तरी मी नसे आयुष्य तुझे ...

तू अबोल भावना माझी ,
तरी मी नसे मनात तुझ्या ...

तू लाघवी हास्य माझे,
तरी मी नसे शब्दात तुझ्या ...

तू गोड गुपित स्वप्न माझे,
तरी मी नसे भास तुझे...

तू कोमल स्पर्श माझा ,
तरी मी नसे आधार तुझा ...

तू आनंदी क्षण माझे ,
तरी मी नसे दुखात तुझ्या ...

तू मोहक आठवण माझी,
तरी मी नसे आठवणीत तुझ्या ...

तू आहेस सर्वस्व माझे,
जरी मी असेन - नसेन तुझी ...


सोनाली.... स्वरचीत...

यमाच्या ऑफिसात
मरणाचा अर्ज केला
"रिसन फॉर डाइंग" म्हणून
त्यांनी फॉर्म भरायला दिला
पहिला टेक्नीकल राउंड झाला
डोळे रोखून तो मला म्हणाला
so Mr. why should we choose YOU for death?
मी पूर्ण कहाणी सांगीतली
त्यालाही ती होती पटली
मग Hr शी डिसकशन झाल
तिने मला expectation विचारल
मी म्हणालो तात्काळ मरण चालल
ती म्हणाली "is it negotiable?"
मग अपघात फायनल ठरला
वेळेवर ठरल्याप्रमाने घडला
पण चार दिवसानंतर माझा
हॉस्पिटल मध्ये डोळा उघडला
मी लगेच यमलोकात फोन केला
म्हणालो मी अपघातात वाचलो
मग आता करणार का माझा खून?
यमलोकातली HR बोलली
"we will get back to you soon...."

- शशांक प्रतापवार

मी कविता करतो कारण...
तेच मला जमते
आणि त्याहून इतर काही जमत नाही
जमत असले तरी रुचत नाही
म्हणून जे काही सुचते ते लिहित जातो

मी कविता करतो कारण...
इतर कशाहीपेक्षा
त्यातच मन रमते
कविता केल्यावर होणारा आनंद
शब्दात मांडता येत नाही
(सगळ्याच गोष्टी कवितेतून व्यक्त करता येत नाहीत)

मी कविता करतो कारण...
जेव्हा जेव्हा लिहायला घेतो
तेव्हा मीच मला गवसत जातो
प्रत्येक कविता नवी उमेद,
नवा जन्म देऊन जाते

मी कविता करतो कारण...
फारसा वेळ लागत नाही
अस्वस्थ मनाला कागदावर उतरवले की झाले
खासा वेळ काढून
लिहिण्याचा कार्यक्रम आखता येत नाही

मी कविता करतो कारण...
फार खर्चही होत नाही
कोरा कागद आणि पेन एवढ्या
फुटकळ साहित्यावर अनेक
कविता रंगवता येतात

मी कविता करतो कारण...
कविता करायला आवडतात
हव्या तशाच कविता लिहिता येतात
सूर लागला नाही अशी
कारणे द्यावी लागत नाहीत

मी कविता करतो कारण...
शब्दच येतात बहरुन
मी फक्त लिहिण्याचे कष्ट घेतो
अन् कित्येकदा तेही घेत नाही!

मी कविता करतो कारण...
गाणे जरी जमत नसले
तरी शब्द तालावर घोंगावत राहतात
अन् अंतरंगीचा सूर लाभला
तरी कवितेचे गाणे होतेच

मी कविता करतो कारण...
एकटेपणाला याहून चांगली
सोबत नाही
अन् कवितेशिवाय एकाकी जीवन
शोभत नाही

मी कविता करतो कारण...
...कारण हा माझा प्रांत आहे
कविता करायला हजार कारणे सापडतील
पण कविता न करण्याची कारणे
कुणाला द्यावी लागत नाही
-काव्य सागर