का सुचत नाही काही
काय करावे ना कळेना
का अवस्था आज मनीची
काय व्यथा ना समजेना
का लिहिण्या येथ बसलो
काय शब्द तो आठवेना
का खरडतो लेखणी उगीच
काय अक्षर ना उमटेना
का ऐकतो एकटवून जीव
काय सूर तो सापडेना
का धरावा ताल येथे
काय स्वर ना फुटेना
का घुटमळतो आणि फिरतो
काय भिंतीत मन रमेना
का विणतो पाश मोहाचे
काय गुंतलो ना सोडवेना
का निघालो एकटाच उगीच
काय सोडले मागे स्मरेना
का उरलो रिता इथे
काय कमावले ना मोजवेना
का दमलो आणि थांबलो
काय अंतर कमी होईना
का चालायचे निरर्थक असेच
काय वाट ना संपेना
का संपल्या इच्छा मनातल्या
काय विरक्ती हि सोसवेना
का न राहिले हेतू जगण्याचे
काय जोडली नाळ तुटेना
..... रुपेश सावंत
|
0
comments
]
0 comments
Post a Comment