शैलेशच्या डायरीतले एक पानः पुढच्या वषर्षापासून (म्हणजे १ जानेवारी, २००९ पासून) डेली एक्स्पेन्सेस लिहून ठेवायचं ठरवलं आहे. त्यासाठी नवी डायरी आज आणली-‘व्हीनस’मधून. मग येता-येता दीपकसोबत ‘रुपाली’त बसून इडली-वडा, फिंगर चिप्स आणि कॉफीपान असा कार्यक्रम झाला. गुडलक चौकातून काही नवी पुस्तके आणि मासिके घेतली आणि पेट्रोल भरून सरळ घरी आलो.

शैलेशप्रमाणेच तुम्हीदेखील नव्या वषर्षापासून हिशेब लिहून ठेवायचे ठरवले असेल. अगदी गेल्या वषर्षी ठरवले होते, तसेच. हिशेब लिहून ठेवणे ही खूप चांगली सवय असली तरी ती जमणाऱ्यांनाच जमते. तुमच्या-आमच्यासारखे फार तर आठवडाभर हिशेब लिहून ठेवू शकतात. कंटाळा केला की डायरी पुढे वर्षभर कोरीच राहते. तुमच्यासारख्या नेट सॅव्ही लोकांना तर डायरी वगैरे सांभाळणे अाणखीनच कठीण जाते. कल्पना करा, हिशेब मांडण्यासाठी तुम्ही जी-टॉक किंवा याहू मेसेंजर किंवा ई-मेल वापरू शकलात तर?

एक्स्पेन्सर ही अशीच एक सेवा. मंदीच्या काळात तर एकेका पैशाचा हिशेब लिहून ठेवण गरजेचे होणार आहे. तुम्ही जर इंटरनेटचा भरपूर वापर करीत असाल तर एक्स्पेन्सर ही सेवा वापरून तुम्ही तुमचे डेली एक्स्पेन्सेस अॉनलाईन स्टोअर करून ठेवू शकता. एक्स्पेन्सरवर रजिस्टर झाल्यानंतर तुम्ही याहू, गुगल, एओएल आणि एमएसएन इन्स्टा मेसेंजर वापरून तुमचा दैनंदिन हिशेब नोंदवून ठेवू शकता. Xpenserbot तुमच्या फ्रेंडलिस्ट मध्ये अॅड केल्यानंतर तुम्ही Petrol on 16th Dec. Rs. 100 असा मेसेज पाठवला की याची नोंद थेट एक्स्पेन्स रिपोर्टमध्ये केली जाते. तुम्ही ट्विटरवरूनही हिशेब नोंदवू शकता. d xpn Petrol on 16th Dec. Rs. 100 असे टाईप करून तुमचा हिशेब पाठवू शकाल. d xpn म्हणजे direct message to Xpenser. याखेरीज तुम्ही ई-मेलच्या Subject लाईनमध्ये Petrol on 16th Dec. Rs. 100 असे टाईप करून e@xpenser.com यावर ई-मेलही पाठवू शकता. अमेरिका आणि कॅनडातील रहिवासी EXP टाईप करून 66937 (MOZES) ला एसएमएस पाठवून हिशेब नोंदवू शकतात. त्यांच्यासाठी व्हाईस कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे.

एक्स्पेन्सर वापरायला लागल्यानंतर तुम्हाला अनेक नव्या गोष्टी एक्स्प्लोअर करता येतील. महिन्यांनुसार कीवर्ड करून त्या-त्या महिन्याचे एक्स्पेन्स रिपोर्ट अपडेट करता येतात. उदा. DEC 08 Petrol on 16th Dec. Rs. 100 असा मेसेज पाठवल्यास तो आपोआप डिसेंबरच्या रिपोर्टमध्ये नोंदवला जाईल. तेव्हा नव्या वषर्षापासून नव्हे; तर आजपासूनच हिशेब नोंदवायला लागा.

0 comments

Post a Comment