लांबलेला पाऊस
रानाची उजाड कूस
आणि
गुलमोहराचा आटता बहर !
सपासप चाबुक फिरवलाय ' त्याने ' यंदा..
विचार करत करतच
शेवाळलेल्या कंपाउंडच्या भिंतीनं
माझी पावलं तुझ्या दिशेने निघतात
तर
गलबलून माझं स्वागत करायला तू
पुढे झेपावलेला
माझ्या लक्षात येते
तुझी भोळीशी धडपड
विरळसे धगधगते
तुझे निखारे
माझ्या नजरेत आणण्यासाठीची..
माझ्या खांद्यावर झुलणार्या
तुझ्या मऊशार पानांचा हिरवा स्पर्श
जणू माझी समजूत काढतो
बहर येतो अन जातो..हेच अंतिम सत्य..
तुला टेकून मी पहुडते
उन्हं कलत असतात
तू डोलत असतो
कुठूनशी एक चोरटी जलधार बरसून जाते
तुझ्या ओल्या खोडावरुन हात फिरवत फिरवत
मी आजूबाजूस बघते
तर
तुझा शेजारी निलगिरी टक लावून बसलेला
अन शेवगा तर बावराच..शिट्टी मारत बसलेला
अन गुलाब तर..
तुझ्याकडे येतांनाच त्याने मला ओरखडलेले..
रागाने मी मनातल्या मनात xx
तू खदखदून हसतो
मीही हसते
परत कधी रे ?
उत्तर माहित असलेला प्रश्न ओठांवर येतो..
इवल्याशा पानांना सोबत घेऊन
तुझ्या कुशीतून अलगद एक फुल माझ्या ओंजळीत पडतं..
आणि मला उमगतं
झाडावरच्या अग्निपाखरांनी नवीन घर शोधलंय..
माझं मन....
- स्वप्ना
|
0
comments
]
0 comments
Post a Comment