त्या वळणावर

रस्त्याच्या दुतर्फा

तू उभा असतोस



माझी वाट पहात..



अन

तिथे पोहचण्याआधीच

मीही तिथेच पोहचलेली असते



तुझ्या अनावर ओढीने..



वार्‍याच्या झुळका

तुझ्या पाकळ्या माझ्यावर उधळत येतात

अन त्या वळणावर पोहचतांना

माझी हळवी स्पंदनं कोलमडतात



तुझे निखारे माझ्या वाटेवर

पसरवून तू मात्र निवांत उभा असतोस

" मला तुडव वा भिडव " म्हणत..



खाली पडलेलं एकेक फुल

पायदळी तुडण्यापासून वाचवत

मी ते वळण पार करते

टुपकन कुठल्याशा फांदीवरली

एक मोठ्ठी शेंग

माझ्या पुढ्यात दाणकन आदळून

मला घाबरवते..



पण मी मात्र तुझे निखारे चुकवत

त्या वळणाला सहज पार करते..



वळून पाहतांना..



तुला मनात बंदिस्त करते

नि ओढणीत अडकलेल्या तुझ्या पाकळ्या

अलवार पर्समधल्या वहीत निजवते..



- स्वप्ना

1 comments

Asha Joglekar said... @ May 14, 2009 at 4:06 AM

नि ओढणीत अडकलेल्या तुझ्या पाकळ्या

अलवार पर्समधल्या वहीत निजवते..
सुंदर.

Post a Comment