"" तुम्ही कितीही वाचा , कितीही लिहा , केवढेही वक्तृत्व करा आणि सार्वजनिक कामात
कितीही स्वार्थत्याग करा ; पण तुम्ही मास्तर असला तर तुमची रया गेली म्हणून समजा . ""
हे उद्गार ` मास्तर ' ही उपाधी ज्या श्री . म . माट्यांच्या नावापुढे कायमची चिकटलेली होती .
त्यांचे आहेत .
अपुऱ्या उत्पन्नात अब्रूला जपत संसाराचा गाडा हाकणे , वर्गांत मुलांच्यापुढे कितीही दरारा
दाखवला तरी समाजात सदेव बापुडवाणेपणाने जगणे , साधेपणाच्या नावाखाली कसलीही
आम्हांसी ' अशा वृत्तीने चित्ती समाधान मानीत जगणे हीच ` मास्तर ' ह्या मनुष्यविशेषाची
काही वर्षांपूर्वी तरी व्यवच्छेदक लक्षणे होती . माटे मास्तरांच्याच आवडत्या शब्दांत सांगायचे
म्हणजे सारे काही एकूण ` डगमगीत ' चाललेय असे पाहताक्षणी प्रत्ययाला येणे हे शेठजींना
रूचणारे नव्हते . मुख्या प्राणिमात्रासारखे ` मास्तरमात्र ' हे गरिबीतच जगले पाहिजे असा
समाजाचा आग्रहच होता . आजही ` मास्तर ' व्हावे अशा महत्वाकांक्षेने कुणी झपाटलेले दिसत
नाही . पण एक काळ मात्र असा होता . ` रया ' असो वा नसो , सारे आयुष्य आर्थिक चणचणीत
होरपळून जाणार हे ठाऊक असो , एकूणच ` आबाळ ' ह्याखेरीज कुंटुबीयांच्या पदरात टाकता
येण्यापलीकडे हाती काही लागणार नाही हेही पक्के ठाऊक असो , तरीही आपण ` मास्तर '
म्हणूनच आयुष्य काढणार असा निर्धार करून देशाची सेवा करण्याच्या ध्येयाने प्रेरित
झालेले तरूण आसपास आढळत असत . ` शाळा काढणे ' आणि आपणे अर्धपोटी राहून ती चालवणे
ही देशाची फार मोठी सेवा समजली जायची .
लोकमान्य टिळक , आगरकर , चिपळूणकर , रँग्लर परांजपे , कर्वे ही सगळी मास्तर -
मंडळीचे . ` विद्यावाचून तुम्हांला गती नाही ' हे निरक्षर समाजाला कळवळून सांगणारे फुले
आणि सनातन्यांची अभ्रद , अर्वाच्य हबोलणी न ऐकल्यासारखी करून मुलींना शाळेकडे
नेणाऱ्या सावित्रिबाई मास्तरपंथीयच . कर्मवीर भाऊराव पाटील तर मास्तरांचे मास्तर . त्या
काळातला निरनिराळ्या सार्वजनित चळवळींचा इतिहास पहिला तर त्यागाची नशा
चढल्यासारखी माणसे धुंद कार्य करताना दिसतात . आपापल्या क्षेत्रात ` देह जावो
पान नं . 87
अथवा जावो ' ह्या भावनेने आपापली आयुष्ये झोकून देताना दिसतात . ` इंग्रजांची सत्ता नाहीशी
करणारा एक समर्थ समाज उभा करणे , ' हा एकच विचार घेऊन नाना प्रकारच्या साधनांनी
हा प्रयत्न चाललेला होती . कुणी सशस्त्र चळवळीत होते , कुणी पत्रकारितेत होते . ( ह्या क्षेत्रातल्या
मंडळीचे आता ` डगडगीतत ' चाललेले दिसत असले तरी स्वातंत्र्यपूर्व काळात इथे उपासमारीच
होती ! ) , कुणी अंधश्रध्दा टाकून देऊन समाजाने बुध्दिनिष्ठ व्हावे म्हणून धडपडत होते .
थोडक्यात , आपला देश जगाच्या नकाशावर बलाढ्य , स्वतंत्र देश म्हणून यावा यासाठी झटत
होते .
कोणे एके काळी म्हणे एक असुर मातला होता . त्याचा वध व्हावा म्हणून देवांनी दुर्गेची
आराधना करण्यासाठी यज्ञ मांडला . त्यात ज्या देवांच्या हाती जे शस्त्र वा साधन होते ते त्या
त्या देवांनी देवीला अर्पण केले . खड्रगधाऱ्यांनी खड्गे दिली , डमरूधाऱ्यांनी डमरू दिले ,
लेखणीधाऱ्यांनी लेखणी दिली आणि अशा नानाविध साधनांनी दुर्गा सहस्त्रभुजा होऊन
अवतरली आणि तिने असुराचा वध केला , अशी एक पुराणकथा आहे . परसत्तेच्या असुराचा
निःपात करायला निरनिराळ्या क्षेत्रांतील माणसे आपापली शस्त्रे आणि साधने घेऊन आपल्या
देशात सज्ज झाली होती . महाराष्ट्रातही रानड्यांच्या कार्याने उत्पन्न झालेल्या धुगधुगीतून
ठिणग्या उसळायला लागल्या होत्या ; क्वचित लहानसा जाळही दिसे . अशा काळात
वऱ्हाडातल्या शिरपूर नावाच्या खेड्यात 31 ऑगस्ट 1886 रोजी माट्यांचा जन्म झाला .
म्हणजे त्यांच्या जन्माला यंदा शंभर वर्षे . भारताच्या इतिहासातील नव्हे तर जगाच्या
इतिहासातील ही लक्षणीय शंभर वर्षे . परंपरेने स्वीकारलेल्या ज्ञानाचा , देवधर्म इत्यादींविषयक
क्लपनांचा , रूढींचा , आजारविचांराचा , कधी पूर्वकर्माला दोष देत तर कधी आसुरी
राजसत्तेच्या आणि धर्मसत्तेच्या भयाने जे जे लादले जाईल त्याचा निमूटपणाने स्वीकार करीत
जगण्याची पध्दत होती . त्या पध्दतीतून सुटका करून घेऊन निर्भयपणाने "" हे असे का ? "" हा
प्रश्न विचारणारा नवा मनुष्यसमाज घडत होता . प्रामुख्याने युरोप खंडात धर्म असो की
राजकिय सत्ता असो , प्रत्येक माणसाला "" असे का ? "" हा प्रश्न विचारायचा अधिकार
मनुष्यजन्मात आल्यामुळे लाभलेला आहे हे बऱ्याच काळापासून ख्रिस्ती धर्मसुधारकांनी ,
भौतिक शास्त्रज्ञ आणि इहवादी मानव्यशास्त्रवेत्यांनी देहदंडाची सजा भोगूनही सिध्द करीत
आणलेले होते . त्या त्यागी विचारवंतांनी जुन्या जगावर घण घालून अंध धर्मश्रध्दांचे बांध
फोडून नव्या विचांराचे प्रवाह खळाळते केले होते . ` देवी हक्काची ' भाषा जाऊन मानवी हक्काची
सनद मान्य होत होती .
इंग्रजी सत्ता भारतात आल्याबरोबर हे नवविचारांचे प्रवाहही कळत , नकळत इथे वाहू
लागले . मुख्यतः पांढरपोशा समाजात एक वेचारिक खळाळ सुरू झाला . सुरूवातीला जेत्या
इंग्रडजाचे अनुकरण म्हणून , परंतु नंतर विचारपूर्वक . एके काळी परंपरागत आचारविचारांच्या
कौटुंबिक वेटाळ्यात राहणारी माणसे सार्वजनिक सभा , व्याख्याने , वर्तमानपत्रांतील लेख ,
चर्चा , ऐहिक विषयांचा विचार करणारे ग्रंथ ह्या साधनांतून घडणारे नवे संस्कार अनुभवू
लागली . देवभक्तीच्या जोडला देशभक्ती हा नवा विचार आला .
साहेब येण्यापूर्वीच्या देशी राजवटीत नाना प्रकारच्या आनाचारांना आणि चोऱ्या
दरोड्यांना असा काही ऊत आला होता , न्यायसंस्थेचा असा काही बोजवारा उडाला होता
आणि सर्वत्र अशी काही बेबंदशाही माजली होती की इंग्रजाचे थोडेफार कायद्याचे , शिस्तीचे
पान नं . 88
आणि शासकीय जरब बसवणारे राज्य आल्यावर इंग्रजांचे भारतात येणे हे न्यायमूर्ती
रानड्यांसारख्या लोकोत्तर देशभ्कीतलादेखील ` देवा वरदान ' वाटले . उत्तर पेशवाईतली आणि
मोगल बाजशाहीतली गुंड - दरोडेखोरांची झोटिंगशाही साबेहबहादुराने निपटून काढली होती .
काठीच्या टोकाला सोने बांधून काशीयात्रेला निर्धास्त मनाने जावे अशा प्रकारचे सुरक्षिततेची
भावना इंग्रजाने इथल्यारयतेत निर्माण केली होती . कालान्तराने काठीला बांधायला नावापुरते
सोनेही प्रजेच्या गाठीला उरणार नाही आणि ते साम्राज्यशाहीच्या खजिन्याबोरबर
सातासमुद्रांपलीकडल्या इंग्लंड देशात जाईल याची मात्र बहुसंख्य प्रजेला कल्पना आली
नव्हती . ` पारतंत्र्य म्हणजे मुख्यतः आर्थिक शोषण ' हा विचार लोकमान्यांसारख्यांनी
जनसामान्यांच्या मनात रूजवायला सुरूवात केली . पारतंत्र्यातल्या सुखवस्तू जीवनमानाचा
अनुभव थोड्याफार प्रमाणात इंग्रजी शिक्षण घेतलेल्या नोकरदार अशा ब्राम्हण समाजालाच
येत होता . उरलेला समाज उपेक्षेच्या अंधारात ठेचकळत जन्ममृत्यूच्या रहाटगाडग्यात चकरा
खात होता . अशा काळात गावात घर किंवा रानात शेत नसलेल्या ब्राम्हण कुटुंबात माट्यांचा
जन्म झाला . पोराबाळांसाठी चारा आणणारा कुटुंबप्रमुख बाप मागे विधवा पत्नी आणि पाच
मुले ठेवून मेल्यावर त्या कुटुंबाची जी वाताहत होते तिचा माट्यांनी पुरेपुर अनुभव घेतला .
खेड्यातल्या ` साळे ' पासून फर्ग्युसन कॉलेजच्या वर्गापर्यंतचा त्यांचा प्रवास ` खडतर ' ह्या
एकाच विशेषणाने सांगण्यासारखा झाला . ` च्कू ताड्या घोट्या ' ही शालेय शिक्षणपध्दती होती .
घरातल्या दारिद्रयामुळे पंचांगात महिन्यातून दोनदा येणारी एकादशी माट्यांच्या घरात
अनेकदा यायची . त्यात दुष्काळाची भर . आई महिनोन््महिने रात्री फक्त लोटाभर पाणी
पिऊन गोणपाटाच्या अंथरूणावर आडवी व्हायची . दारिद्रयाच्या हातात हात घालून लोटाभर
उपेक्षा चालत असते . माट्यांनी ही दारिद्रय आणि उपेक्षेची अवस्था वर्ष - दीड वर्षांचे
असल्यापासून उपभोगली . त्यांचे उपेक्षितांशी असलेले नाते स्वानुभवातून बालपणापासून
जुळले . आपले दारिद्रय हीसुध्दा तुलनेने सुबत्ता वाटावी अशा भयानक अवस्थेत जगणारी
निरनिराळ्या उपेक्षित जातीजमातींतली माणसे आपल्या अवतीभोवती त्यांनी शाळकरी
वयापासून पाहिली . त्या अभागी जिग्याचे दुःख त्यांच्या मनावर तेव्हापासून घाव घालून गेले .
आणि पुढचा सारा जीवनाचा प्रवास करताना हे अंधारात ठेचकळत चाललेले जगणे आपल्या
वाणीने आणि लेखणीने समाजापुढे आणणे हे व्रत त्यांनी स्वीकारले .
साहित्याची त्यांनी केवळ एक सौंदर्य आणि आनंद ह्यांचा प्रत्यय घडवून आणणारी कला
म्हणून कधीच उपासना केली नाही . अज्ञान , अंधश्रध्दा , अमानुष परंपरांचे भीतीपोटी होणारे
पालन , आर्थिक दारिद्रय आणि त्यातून येणारे मानसिक दारिद्रय , आला भोग निमूटपणाने
स्वीकारली अगतिक वृत्ती , - अशांतून संपूर्ण उपेक्षितावस्थेत जगणारी माणसे त्यांच्या
लहानपणी त्यांना भेटत होती . सुस्थित समाजाकडून मिळायच्या मायेच्या एका शब्दाला आणि
पाण्याच्या एका घोटाला मोताद झालेल्या दलितांची पाल्यापाचोळ्यासारखी चाललेली फरफट
ते पाहत होते . साहित्यातून समाजमानस प्रकट होते असे म्हणतात . पण माटे जे मराठी साहित्य
वाचत होते त्या साहित्यात देश , राष्ट्र , समाज , न्याय , अन्याय हे शब्द उच्चरवाने उच्चारले
जात असताना ज्यांच्या अस्तित्वाचीदेखील दखल घेतली जात नाही अशी माणसे कुठे त्या
साहित्यात आढळत नाहीत ही टोचणी त्यांच्या मानाला होती . त्या टोचणीतूनच उघड्यावर
पडलेल्या बन्सीधरापासून , मुक्याने मेलेल्या सावित्रीपासून , आंधळ्या रूढीचे बळी होऊन
पान नं . 89
पुरंदर किल्ल्याच्या पायाभरणीत गाडल्या गेलेल्या नाथनाक - देवकाईपासून ते तारळखोऱ्यातल्या
पिऱ्या मांगापर्यंत नाना दुःखे भोगणारे उपेक्षित त्यांच्या लेखणीतून प्रकटले .
पण हे सारे लेखन भाबडेपणाने हुंदके काढीत झाले नाही . एखाद्याला उपजत गायनाचा
गळा लाभावा , तसेच माणूस कितीही थोर म्हणून गणला असला तरी त्याचे म्हणणे तर्कावर
घासून नंतरच त्याचा स्वीकार किंवा अव्हेर करायची बुध्दी त्यांना उपजत लाभली असावी .
त्यांनीच एक ठिकाणी म्हटले आहे : तर्क ह्या विचारसंस्थेचा कायमचा निरोप घेणे माझ्याच्याने
ह्या जन्मी होईल असे मला वाटत नाही . "" तर्क तो अर्क जाणावा ! नर्क संपर्क चूकवी ""
उपेक्षितांच्या अवस्थेची , नाना जातीजमातींची त्यांनी माहिती मिळवली . त्यांना प्राप्त झालेल्या
देन्यावस्थेची तर्कसंगती लावण्याचा प्रयत्न केला . त्या अवस्थेचा पूर्वजन्म , देवाची कृपा -
अवकृपा यांच्याशी काहीही संबंध नसून ही माणसाची बुध्दिहीनता आणि स्वार्थासाठी पोसवली
जाणारी अंधश्रध्दा यांची परिणती आहे असा निष्कर्ष त्यांनी काढला .
दरिद्री जीवने पाहून त्यांच्या मनाची कालवाकालव होत होतीच , पण योग्य अशा ग्रंथाच्या
अध्ययनाच्या आधारावर त्या भावना शास्त्रकाट्याच्या कसोटीला उतरण्याचा आग्रह होता .
तिथे त्यांना तडजोड मान्य नव्हती . ते मानत होते बौध्दिक वर्चस्व आम्हांला पटवायला नको
का ? "" असा सवाल त्यांनी केला आहे . बौध्दिक वर्यस्वाला त्यांनी महत्वाचे स्थान दिले ,
पण बौध्दिक वर्चस्व जर माणसाचे देन्य , उपेक्षा इत्यादी दूर करण्याच्या कामाला येत नसेल
तर त्या बुध्दिमंतांचीही त्यांना मातब्बरी वाटतनव्हती . "" शंकराचार्य , रामानुजाचार्य
ह्यांच्यासारखे जे प्रखर बुध्दिमान लोक आहेत ते मला केवळ तालीमबाजासारखे वाटतात . . .
त्यांच्या त्या वादात शिरून त्यांची बरोबरी करता येणार नाही हे खरे असले तरी आतून माझे
मन मला असे सांगत असते की , गड्या , ही कसरत आहे . हे काही खरे नव्हे . खरे नव्हे म्हणजे
केवळ अनुमानाचे आहे . वास्तवाशी ओळख आहे व ती ओळख दाखवलेली आहे असे
नव्हे ! "" . . . . "" मोठमोठाले प्रेषित , ज्यांनी नव्या धर्माच्या घोषणा केल्या त्यांचीसुध्दा मला
मातब्बरी वाटत नाही . एकाने सांगावे , ` मी त्याचा अवतार आहे , ' दुसऱ्याने सांगावे , ` मी
त्याचा प्रेषित आहे . ' तिसऱ्याने सांगावे , ` मी त्याचा मुलगा आहे . ' . . . आपल्या शक्ती मोठ्या
आहेत तर आपल्या ठिकाणी काही देवी अंश आहे असे त्यास वाटू लागावे हेही खरेच दिसते .
पण तेवढ्यामुळे ते खरेच तसे होते असे मात्र मला म्हणवत नाही . ते आचार्य जसे कसरत
करणारे तसे हे लोक आत्मवंचित होते . ""
ह्या निर्भय बुध्दिनिष्ठेच्या बाबतीत त्यांचे गोत्र वीर सावरकरांशी जुळते . किंबहुना बाबा
वाक्यम्् प्रमाणम्् न मानणाऱ्या आगरकर , फुले , आंबेडकर यांसारख्या विचारवंतांशी जुळते .
एक प्राचीन राष्ट्र नव्या जोमाने परकीय सत्तेविरूध्द उठून उभे राहण्याचा प्रयत्न करीत
असताना , जाती - जमाती , स्पृश्य - अस्पृश्य , जनवासी - विजनवासी , नागरी - ग्रामीण अशा
भेदांमुळे एका राष्ट्रातले नागरिक असूनही एकमेकांना अनोळखी राहणारा समाज एकसंध
व्हावा , उपेक्षेमुळे अपरिचित राहिलेले देशबांधव परिचित व्हावेत , त्यांचे देन्यनष्ट करायला
आपण आपला मदतीचा हात पुढे केला पाहिजे अशी वृत्ती त्यांच्या मानाने सुस्थितीत
वाढणाऱ्या समाजात वाढीला लागावीही माट्यांच्या लिखाणामागची मूळ प्रेरणा त्यांच्या
पान नं . 90
वेचारिक आणि ललित अशा दोन्ही प्रकारच्या विपुल लेखनाच्या मुळाशी असल्याचा प्रत्यय
त्यातला आशय , आणि अभिव्यक्तीची रीत ह्या दोन्हींतून येतो . छडीऐवजी लेखणी हाती
धरणाऱ्या लोकशिक्षकाचीच त्यांची भूमिका होती .
माटे मास्तर वस्तीला आणि चरितार्थासाठी पुण्यात राहिले , पण पुण्यातल्या माट्यांच्या
मनाचा मुक्काम मात्र कृष्णा - कोयना - तारळी खोऱ्यातल्या गावकुसातल्या आणि गावकुसा -
बाहेरच्या वस्तीतच पडलेला होता . देहूच्या वाण्याचे मन पंढरपुरी रेंगाळत होते . त्यातलाच हा
प्रकार होता . त्यांनी मॅट्रिकवाल्यांची मास्तरकी पोटासाठी असली तरी अत्यंत इमानाने केली
हे खरेच आहेच ; पण त्याहूनही अस्पृश्यांसाठी आयुष्याची वीस वर्षे , पावसपाण्याची , चिखल -
मातीची , सापविंचवाची पर्वा न करता , ह्या उपेक्षित माणसांच्या अंतरंगात शिरण्यासाठी
त्यांच्या रोजच्या भेटीगाठींच्या लोभाने जी विनामूल्य मास्तरकी केली ती त्यांना अप्रूप वाटत
होती . तिथल्या त्या गावरान मारठीला गावरान शेंगेसारखी काय नामी चव आहे हे मराठी
वाचकाला माटे मास्तरांनी प्रथम दाखवून दिले .
आज ग्रामीण साहित्याची नवलाई वाटू नये इतक्या प्रमाणात त्या जीवनाची निरनिराळी
दर्शने मराठी कथा - कादंबऱ्यांतून वाचकाला घडताहेत . पण महाराष्ट्राचे खरे भाग्यविधाते
कोण हे जसे ग . बा . सरदारांच्या ` उपेक्षित मानकऱ्यां ' वरच्या ग्रंथातून सामान्य वाचकाला
प्रथम कळले त्याचप्रमाणे महाराष्ट्राला उपेक्षित भाग्यविहीनांच्या जीवनाचे पहिले प्रभावी
दर्शन माटे मास्तरांनी ` उपेक्षितांच्या अंतरंगा ' त घडवले .
मराठी ग्रामीण कथेचे जनक म्हणून कृतज्ञतेने माट्यांचा उल्लेख व्हायला हवा .
त्याबरोबरच मराठी भाषेचे खरपूस मराठीपण कसे आसते याची जाणीवही माट्यांच्या
मराठीनेच मराठी वाचकाला करून दिली . किबंहुना आचार्य अत्र्यांनी माट्यांच्या ` शेलीकार
माटे ' अशा शब्दांत गौरव केल्यावर माट्यांचे ` शेली ' एवढेच बलस्थान आहे असाही समज
पसरला . माट्यांच्या भोषेतला अस्सलपणा , मराठी मुलखात उपेक्षित जीवन जगणाऱ्या ज्या
मराठी माणसाची त्यांनी कथा सांगितली त्यातल्या आशयाचा अस्सलपणात आहे . भाषेचाही
गंमत म्हणून खेळ त्यांनी मांडता येतो . तसला , नागरांना नवलाची वाटावी अशा भाषेचा खेळ मांडून
आपल्या भाषाप्रभुत्वाच्या करामती दाखवाव्या म्हणून त्यांनी लेखन केले नाही . आपल्या
लेखनकलेचे कौतुक त्यांना अभिप्रेतच नव्हते . सामाजिक वास्तवाचे दर्शन घडवून वाचकांचे
मतपरिवर्तन व्हावे हा हेतू मनात पक्का बाळगून त्यांनी लिहिले . खुद्द माट्यांनीच म्हटले आहे ,
"" ललित वाडःमयाने मतप्रचार होत नाही किंवा मतपरिवर्तन होत नाही असे म्हणणाऱ्यांचा
दावा अगदी चुकीचा आहे . प्रचार आमि परिवर्तन त्याने होतातच होतात हे मी अनुभवाने
पाहिले आहे . या यशाला निरगाठ मारली पाहिजे असे वाटून ` उपेक्षितांचे अंतरंग ' हे माझे
पुस्तक मी प्रसिध्द केले . ""
` सामाजिक बांधिलकी ' हा शब्दप्रयोग माट्यांच्या काळी जन्माला आलेला नव्हता . पण
आपल्याला जे जे काही समाजहिताचे वाटते ते ते लिहून प्रकट कारयला आपण बांधील आहो
ह्या भावनेनेच त्यांनी लेखन केले . आपल्याला रूचलेल्या , पटलेल्या शेलींनी लिहिले . ते लिहिणे
` देशी ' होते . मराठी मुलखातल्या उपेक्षित माणसांइतकेच नागर संस्कृतीचे नाते तोडून
टाकलेल्या उपेक्षित शब्दांचे अंगभूत सामर्थ्य दाखवणारे होते . त्या हातसडीच्या भाषेच्या
तुलनेने नागरी लेखकांची रेडिमेड आणि कागदी भाषा कितीही अलंकार लेवून आलेली
पान नं . 91
असली तरी बेगडी वाटायला लागली . माट्यांच्या भाषेचा हा वाण शंभर टक्के मऱ्हाटी आहे .
रानफुलासारखे अंग आणि रंग लेवून सहजतेने प्रकटलेली ही भाषा हा त्यांच्या व्यक्ति -
मत्वाचाच एक भाग होती . त्यांच्या भाषेतले हे देशीपण ऐकायलादेखील गोड वाटायचे . त्यांचा
विद्यार्थी होऊन त्यांच्या वर्गात बसायचे भाग्य मला लाभले नाही . पण फर्ग्युसन कॉलेजात मी
शिकत असताना स . प . कॉलेजात त्यांच्या मराठीच्या तासाला मी जाऊन बसलो होतो .
अधूनमधून इतर कॉलेजांतल्या नामवंत प्राध्यापकांच्या तासांना त्यांच्या परवानगीने जाऊन
बसणे हा कॉलेजमध्ये असताना आम्हा काही मित्रांचा छंद होता .
माट्यांचे शिकवणे हे एखाद्या ज्येष्ठ मित्राने खांद्यावर हात ठेवून आपल्याला चार हिताच्या
गोष्टी सांगाव्या तशा पध्दतीचे मला वाटले होते . आज ह्या गोष्टीला जवळजवळ पंचेचाळीस
वर्षे झाली तरी वर्गात माट्यांनी बोलता बोलता विद्यार्थ्यांना उद्देशून "" . . . त्याचं काय आहे
गड्यांनो . . . "" असा श्बदप्रयोग केलेला मला आठवतोय . आमचे मराठीचे प्राध्यापक
रा . श्री . जोग उत्तम शिकवित , पण सूर कधी असा सलगीचा नसे . ही सलगीची तऱ्हा थेट
शेताच्या बांधावरच्या डेरेदार आब्यांच्या सावलीत चालणाऱ्या बोलण्याची होती . तीच
लिहिण्यात आली . शब्द संस्कृत कुळातून तसाच्या तसा आलेला असो वा जानपदाशी सोयरीक
सांगणारा असो , माट्यांच्या वाक्यात कमालीच्या सहजतेमे आणि अर्धाची पुरी गरज भागवीत
येऊन बसलेला असे . माटे मास्तरांच्या आवडत्या शब्दांत सांगायचे म्हणजे ` चपखल ! '
` उपेक्षितांचे अंतरंग ' वाचल्यावर तात्यासाहेब केळकर म्हणाले होते , "" या पुस्तकाची भाषा
विद्यार्थ्यांनी पाठ करावी . "" माट्यांची भाषा आपल्यया अस्तित्वाकडे वाचकांते लक्ष वेधून घेते
यात शंका नाही . पण भाषेचा डौल वाचकाच्या मनात ठसवावा म्हणून माट्यांनी तिला
जाणूनबुजून निराळे रूपडे बहाल केलेले नाही . त्यांच्या व्यक्तिमत्वाची जी घडण आहे
तिच्याशी इमान राखणारी अशी ती भाषा आहे . माटे जेव्हा मुलीच्या लग्नाच्या वेळी
प्रकाशकडून ध्यानीमनी नसताना पाचएकशे रूपये मिळाले त्याचा उल्लेख त्या ` चळवळीत '
नोटा मिळाल्या असा करतात त्या वेळी शाळामास्तरच्या आयुष्यात नोटांचे बंडल ही डोळे
दिपवून टाकणारी घटना कशी आहे ते ` चळवळीत ' शब्दाने सांगून जातात . गडकऱ्यांच्या
साहित्याला जी . ए . कुळकर्ण्यांनी मराठी भाषेचा ` कॉर्निव्हल ' म्हटले होते . माट्यांची मराठी
भाषा हा ग्रामीण जनतेचा ` उच्छाव ' आहे . इथे जानपद , बामणाघरची आणि संतसाहित्यातली
भाषा ह्यांच्या संगमातून एक विलक्षण लोभसवाणे असे भाषेचे रूप प्रकटले आहे , मग ती
भाषा ललित वाङमयात येवो किंवा विज्ञानबोधाच्या प्रस्तावनेसारख्या वेचारिक निबंधात
येवो . वाचकाला आपल्या प्रवाहात ओढून नेण्याचे फार मोठे सामर्थ्य ह्या भाषेला लाभले आहे .
` मंगळवेढ्याचे कुसू ' सारख्या चोखामेळ्याच्या कथेत भाषेचे हे प्रवाहीपण तीव्रतेने जाणवते .
विशेषतः जुन्या पोथ्यांसारखी मोठ्यानेही गोष्ट वाचावी . चोखोबांच्या काळातल्या परंपराग्रस्त
समाजपरिस्थितीबद्दल लिहिताना माटे म्हणतात , "" जग आंबून गेले होते . जिणे रूग्ण झाले
होते . मन जरत्कारू बनले होते . सारा गुजारा जुन्यावर चालला होता . मनाला नवी पालवी
फुटतच नव्हती . असलेली पाने चरबट आणि तडतडीत बनलेली होती . . . साऱ्या गोष्टी
श्रुतिस्मृतिपुराणोक्त पध्दतीने चालल्या होत्या . ज्याचे त्याचे तंत्र ठरले होते . तंत्राच्या मागे जो
मंत्र होता तो पूर्वी केव्हातरी काही शतकांपूर्वी कोणीसा कल्पिला होता . पण त्या मंत्राला मनाची
ओळख नव्हती . ""
माटे मास्तर
पान नं . 92
बारा बलुत्यांच्या पूर्वजन्मसिध्द उद्योगांत पिचून निघालेल्या माणसांबद्दल बोलताना त्यांनी
त्या बलुतेदारीचे काय भेदक चित्र काढलेय : "" जीविताचा गाडा तर कायमचाच रूतलेला होता .
त्या गाडयावर बापही बसत असे . आजाही बसला होता , पणजाही बसला होता . त्याचा
खापरपणजाही बसला होता . गाडा म्हणून हालत नसे . आपली पोरंही यात बसणार आणि
पणतवंडंही त्यातच बसणार हे त्यांना कळून चुकलं होतं . तुमच्या घरांवर तुरकाटया हांतरता
हांतरता कोणाच्या शंभर पिढया गेल्या होत्या . तुमची डोकी चोळता चोळता कोणाच्या दीडशे
पिढया गेल्या होत्या . तुमची लाकडं फोडता फोडता , तुमची ढोरं ओढता ओढता , तुमच्या
पाटलापुढे खुळखुळा नाचवता नाचवता कोणाच्या पिढयानुपिढया मातीत गेल्या होत्या .
जीविताचा गाडा कायम लगद्यात गच्च बसला होता . ""
` मंगळवेढयाचं कुसू ' ही माटे मास्तरांची असामान्य साहित्यनिर्मिती आहे असे मला वाटते .
वारकरी संप्रदायातल्या संतांनी आजवर स्पृश्यांनी अस्पृश्य म्हणून कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी
ठेवलेल्या उपेक्षित समाजाला आशेचा किरण दाखवला होता . जुन्या जाखाई - जोखाईसारख्या ,
भक्तांच्या मनात भय निर्माण करणाऱ्या देवतांऐवजी सौम्य , सुंदर , प्रसन्न , कनवाळू असा नवा
देव जीवमात्राच्या कल्याणासाठी सारा भेदभाव विसरायला लावण्याच्या हेतूने अवतरल्याची
वार्ता पंढरपूरच्या दिशने येत होती . पण मुखी , ` विष्णुमय जग वेष्णवांचा धर्म ! भेदाभेद भ्रम
अमंगळ ' चा गजर असूनही खुद्द पंढरीलगतच्या मंगळवेढयालाही पडलेला उच्चनीचतेच्या
कल्पनेचा अमंगळाचा वेढा उठायला तयार नसल्याचा जसा चोखामेळ्याला अनुभव आला
तसाच मंदिरप्रवेशाच्या चळवळीच्या वेळी माटयांनाही आला .
समाजाच्या हितासाठी म्हणून सुरू झालेल्या सर्व चळवळींचा इतिहास हाच आहे . मूळ हेतू
बाजूला राहतो आणि लेबलांचे आणि प्रतीकांचे स्तोम माजवणारे पुढारी आपल्या स्वार्थाला
पोषक असे वळण त्या चळवळीला देतात . थोडक्यात म्हणजे धर्मनिष्ठा , राष्ट्रभक्ती , क्रान्ती ह्या
कल्पनांचे भांडवल वापरून नफेखोर धंदा सुरू होतो . बुध्दिनिष्ठ तत्वज्ञानावर अधिष्ठित
असलेल्या ट्रेड युनियन चळवळीमध्येही युनियन चालवणे हाच एक ट्रेड होऊन गेलेला आपण
पाहतोच आहो . अशा काळात सामाजिक व्यवहाराचे नीट अध्ययन करून त्यावर
स्वार्थनिरपेक्ष , वास्तवाला साक्ष ठेवून परीक्षण करणारा निर्भय विचारवंत समाजात असावा
लागतो . आपल्या विश्लेषणामुळे गतानुगतिकतेलाचधर्म , किंवा वर्षानुवर्षे चालवत आणलेल्या
आंधळ्या कर्मकांडालाच संस्कृती मानणाऱ्या समाजात आपण अप्रिय ठरू ही भीती असल्या
विचारवंताला बाळगून चालत नाही . पुष्कळदा सुधारक आणि सनातनी , जातीयवादी आणि
जातिविचारमुक्त अशा परस्परविरोधी गटांकडून एकदमच दूषणे स्वीकारावी लागतात .
माटयांवर असे अनेक हल्ले झाले . वर्षानुवर्षे अस्पृष्टांच्या वस्तीत विनामूल्य मास्तरकी
करणाऱ्या माटयांची ब्राम्हणांनी महारमाटे म्हणून हेटाळणी केली आणि अस्पृश्यांच्या सेवेतून
आपण निवृत्त व्हावे असे वाटण्यासारखी परिस्थिती त्याही समाजातल्या नव्या पुढाऱ्यांनी
स्वीकारलेल्या नव्या धोरणांमुळे निर्माण झाली . अस्पृश्यतेचा कलंक घालवून हिंदुधर्म निर्मळ
आणि सबळ करावा ही माटयांची भावना सनातन्यांना तर पटली नाहीच , पण ह्या धर्मात
राहून आपली परिस्थिती अजिबात सुधारणार नाही या विचाराच्या प्रभावामुळे अस्पृष्टांना
माटे मास्तरांची शिकवणी नकोशी झाली .
अत्रे - माटे वादाचा गदारोळ वर्तमानपत्रांतून आणि सभांतून एवढया जोरात उठत होता .
पान 93
की बुरसटलेल्या विचारांचा एक सनातनी पुणेकर अशीच माटयांची प्रतिमा पुण्याबाहेरच्या
लोकांच्या डोळ्यांपुढे होती . ज्या महाराष्ट्रदेशाची गीते आम्ही गात होतो त्यातल्या चर्मकार ,
ढोर , मातंग यांसारख्या उपेक्षित जातींतल्या लोकांच्या माटे परिषदा भरवीत होते , याचा
आम्हांला पत्ताच नव्हता . ` ही भगवद््गीता अपुरी आहे . ' म्हणणारे माटे आम्हांला ठाऊकच
नव्हते . "" अर्जुनाचे भय किती खरे होते ते परिणामावरून सिध्द झाले . एवढे प्रचंड दल नष्ट
झाले . आणि कुरूक्षेत्रावर तरूण पुरूषांच्या प्रेतांचा खच पडला . थोरामोठयांच्या स्त्रिया
रणांगणावर ऊर बडवीत आल्या . . . या मारामारीच्या परिणामाने अर्जुन दचकला होता .
आत्मिक भीती तर त्याला होतीच . तिचा परिहार कृष्णाने केला . पण सामाजिक नरकाची भीती
कृष्णाने बिलकुल घालवली नाही . असे असता अर्जुनाने युध्दास तयार व्हावे याचे नवल
वाटते . "" गीतेसंबंधी असा परखड अभिप्राय चाळीस - पन्नास वर्षांपूर्वी देणे सोपे नव्हते . पण
` यद्दपि सत्यम्् लोकविरूध्दम् नाचरणीयम् ना करणीयम् ' हे बचावाचे धोरण विचारवंताला
शोभणारे नसते . मतभेद व्यक्त करायला माटे कचरले नाहीत . ` मतभेदाचा उबारा मला
मानवतो . अर्थात त्याचाही किंमत मी अधूनमधून देत आलो आहे . ' असे त्यांनी म्हटले आहे .
विभूतीपूजा हा आपल्या देशातल्या लोकांच्या मनाचा स्थायिभाव . अशा काळात म . गांधी
आणि नेहरू यांच्याशी मतभेद असलेले माटे आम्हांला मुसलमानविरोधी म्हणून धर्मवेडे वाटत
होते . स्वतःचा उल्लेख एखाद्याने हिंदू असा केला की , तो आम्हांला पुराणमतवादी वाटायचा .
आपण ख्रिस्ती आहोत किंवा मुसलमान आहोत म्हणणारा तसा वाटत नसे . माटयांना हे धोरण
` घरच्या म्हातारीचा काळ ' यासारखे वाटत होते . अंधश्रध्दा सगळ्याच धर्मांतून घालवायला
प्रचंड प्रमाणात विचारचक्रपरिवर्तनाच्या चळवळीची त्यांना आवश्यकता वाटत होती . ह्या
बाबतीत महात्माजींना लिहिलेल्या एका जाहीर पत्रात त्यांनी कळवळून म्हटले आहे :
"" महात्माजी , या लोकांना संतवचने पाठ आहेत . परंतु त्यांतील विचारांच्या औदार्यांची सारिका
पंख फडफडून केव्हाच निघून गेली आहे . त्यांना पाठ येत असलेल्या वचनांचा रक्तक्षय
झाला आहे . ""
हा वेचारिक रक्तक्षय घालवायला सारा धार्मिक , राजकीय , सामाजिक व्यवहार बुध्दीच्या
निकषांवर घासून घ्यायला हवा असे त्यांचे ठाम मत होते . त्या बाबतीत इंग्रजांच्या ज्ञानोपासने -
विषयी त्यांना आदर होता . "" इंग्रज हा आपल्या मानेस बसलेला म्हणून आपल्याला नकोसा
वाटावा हे बरोबर होते . पण इंग्रज हा ज्ञानाचा मित्र आहे . तो चौकशी करतो आणि चौकशीचे
हिशेब लिहून ठेवतो . "" माट्यांच्या बुध्दिनिष्ठ आणि अभ्यासाने प्रकटावे ह्या वृत्तीचे उत्तम
उदाहरण म्हणजे ` विज्ञानबोधाची प्रस्तावना ' . विनोबा आपल्या ` गीता - प्रवचनां ' ना
नित्यपठनीय म्हणत . मला आधुनिक जगात जगायला ही ` विज्ञानबोधाची प्रस्तावना ' अधिक
नित्यपठनीय वाटते . "" आपल्या सामाजिक व राजकीय चळवळींच्या दिशा , गती , व भवितव्य
ही या शास्त्रज्ञांत संस्कारांनी जर पूत झालेली नसतील तर आपली फसगत होईल आणि आपण
भलत्याच ठिकाणी धडका देत बसलो होतो असे दिसून येईल . "" हे वाक्य आजच्या परिस्थितीत
सार्वजनिक जीवनात भाषा , प्रांत , पंथ असा भलत्या ठिकाणी धडका देण्याचे जे प्रयत्न चालले
आहेत ते पाहून शंभर टक्के खरे वाटते . बुध्दिनिष्ठेची पुष्कळदा भावनाहीनतेशी सांगड बांधली
जाते . ऊठसूट ` अश्रुनीर वाहे डोळा ' ह्या अवस्थेत जाणाऱ्याची भाबडेपणाने मानवतावादाशी
जोडी जमवली जाणे ही त्याचीच दुसरी बाजू . वज्राची कठोरता आणि कुसुमांची मृदुता हा
पान नं . 94
मेळ दुर्लभ .
तर्कनिष्ठ माटे मास्तर परमेश्वाराच्या अस्तित्वाबद्दल शंका घेत असताना ` विठो तुझे माझें
राज्य ! नाही आणिकांचे काज ' म्हणणाऱ्या तुकोबांच्या वृत्तीतल्या संपूर्ण समर्पणाच्या भावनेने
व्याकूळ होताना दिसतात . संतांच्या साहित्याविषयी त्यांना मर्यादित प्रमाणात प्रेम आहे .
त्यांच्यातल्या समाजशास्त्रज्ञाला , वारकरी संप्रदायामुळे महाराष्ट्रातील बाराही बलुती ओव्या ,
अभंग रचून मराठी सारस्वत समृध्द करीत होती याचे अतोनात कौतुक आहे . पण ` तुकोबा '
हा माटे मास्तरांचा ` वीक पॉइंट . ' "" मला खरी भीती त्या देहूच्या वाण्याची वाटते "" असे
विलक्षण जिव्हाळ्याने ते म्हणून जातात . इकडे तर परमेश्वरदर्शन वगेरे अद्भुताच्या तडाख्यात
सापडलो तर आपण कोठच्या कोठे जाऊन पडू अशी त्यांना भीती वाटते , तारतम्य आणि तर्क
कसे सोडावे असा प्रश्न पडतो ; पण ` माझे माथा तुझा हात ! तुझे पार्यी माझे चित्त ! ऐसी
पडयेली गाठी ! शरीर संबंधाची मिठी ' म्हणणारा हा देहूचा वाणी त्यांना सोडवत नाही . त्या
वाण्याचा विठू आणि त्याचा हा जगावेगळा भक्त यांची अलौकिक एकरूपता , माटे
मास्तरांच्याच भाषेत सांगायचे म्हणजे त्यांच्या "" मनाचे कुसु मोडून टाकते "" , ` आम्ही जातों
आमच्या गावा ! आमुचा रामराम घ्यावा ' म्हणत कुडीसहित गुप्त होणाऱ्या तुक्याची आठवण
त्यांना सद््गदित करते . इथे मात्र तर्काच्या तापल्या भूमीवर पावसाचा शिडकावा पडतो ,
मानवी जीवनात विश्लेषणापलीकडे असलेला आपुलकीचा मृद््गंध सुटल्यासारखा वाटतो
आणि माटे मास्तरांचा सकृद्दर्शनी उग्र वाटणारा चेहरा पित्याचे वात्सल्य लेवून डोळ्यांपुढे उभा
राहतो .
माटयांशी माझा मी पुण्याच्या आकाशवाणी - क्रेंद्रावर नोकरीला असताना परिचय झाला .
प्रकृतीच्या दृष्टीने त्या काळात ते , त्यांच्यात शब्दांत सांगायचे म्हणजे , रकमेला आले "" होते
रेडिओवर कधीतरी "" टॉक "" द्यायला येत . त्यांची शेवटची गाठ त्यांच्या मृत्यूच्या थोडे दिवस
आधी डॉ . घारपुऱ्यांच्या इस्पितळात पडली . एके काळचा त्यांचा थोराडपणा पार आक्रसून
गेला होता . कॅन्सरने त्यांचा घास घेतला . "" माझ्या पश्चात्् जगाने मला बरे किंवा वाईट म्हटले
तर जगदाकारात विलीन झालेल्या मला त्याचे काय सुखदुःख असणार ? "" असे त्यांनी
` चित्रपट ' ह्या आत्मचरित्राचा शेवट करताना म्हटले आहे . त्यांना वाईट म्हणण्याचा किंवा
त्यांचाविसर पडण्याचा प्रश्नच उरलेला नाही . जोवर मराठी भाषा जिवंत आहे तोवर त्यांनी
साहित्यात जी सुंदर शिल्पे कोरून ठेवली आहेत त्या शिल्पांनी त्यांना चिरंजीवित्व दिले आहे ,
एवढेच नव्हे तर ` मास्तर ' ही पदवी त्यांच्या कर्तृत्वाने खूप श्रेष्ठ ठरली आहे .
* * * *
0 comments
Post a Comment