दुकानदार "तेलाचं भांडं कुठाय?" म्हणून खेकसला.
ती म्हणाली, "येवढं पणतीभर द्या."
"अग, दिवाळीला अवकाश आहे! पणत्या कसल्या लावतेस?" पोरगी गांगरली.
पण दारिद्रय धिटाई शिकवते. लगेच सावरुन म्हणाली,
"दिवाळी कसली? खायला त्याल द्या..."
"ह्मा पणतीत?" दुकानदार म्हणाला.मुलीने हातातले दहा पैशाचे नाणे टेबलावर ठेवले."यवड्या पैशात किती बसतं ते द्या"
"अग, दहा पैशाचं तेल द्यायला माप कुठलं आणू?"
"पण आमच्याकडे धाच पैशे हाइत."पोरीने स्वत:चा 'आमच्याकडे' असा बहुवचनी उल्लेख केलेला पाहून त्या परिस्थितितही मला मजा वाटली.
"अहो, कमीत कमी किती पैशाचं तेल देऊ शकाल तुम्ही?"
"अँटलीस्ट फिफ्टीन!" दुकानदार.
त्याला ते सांगताना लाज वाटली असावी. नाहीतर तो इंग्लिश बोलला नसता. आपल्याकडे युटेरस, पाइल्स, सेक्शुअल इंटरकोर्स वगैरे शब्द आपण असेच लाज लपवायला इंग्लिशमधून वापरतो. त्याची आणखी पाच पैशांची सोय केली. पोरीची पणती तरीही पुरती भरली नव्हती. तिच्या घरी पणतीहून अधिक मापाचे 'खायाचे तेल' परवडत नाही. आता पणतीचे आणि माझे नाते दिवाळीच्या रोषणाईशी होते ते तुटून गेले आहे. पणत्यांची आरास पाहिली, की 'आमच्याकडं धाच पैसे हाइत्' म्हणणारी ती मुलगी- नव्हे, एक प्रचंड आक्रोश मला ऐकू येतो. दिवाळीसारख्याच अनेक गोष्टींची नाती तुटत तुटत मी शून्य होत जातो. तरीही जगतो. ह्मा शून्याच्या मागे नकळत एखादा आकडा येऊन उभा राहतो. मला मी कधी दहा झालो आहे, कधी वीस, कधी तीस, असेही वाटायला लागते. कुणीतरी सांगत येतो, की अमक्या अमक्याच्या बायकोने रुग्णशय्येच्या उशाखाली एक चिठ्ठी ठेवली होती. तिच्यावर लिहिले होते, की माझ्या मृत्यूनंतर माझे प्रेत ससून हॉस्पिटलमधल्या विद्यार्थ्यांना शवविच्छेदनाला द्या. त्यांना उपयोग होइल. ह्मा बातमीने मग माझ्या शून्यामागे एक फार मोठा आकडा उभा राहून मला शून्याची किंमत दाखवून जातो. त्या बाईची आणि आपली ओळख असायला हवी होती असे वाटते. आता जगणे म्हणजे नुसता श्वासोच्छ्वास राहत नाही. त्या किराणा-भुसार दुकानदाराच्या दारातल्या पोरीने माझे मातीच्या पणतीचे दिवाळीशी जडवलेले नाते तोडले एवढेच मला वाटले होते : पण त्या पोरीशी माझे नाते कां जडावे ते कळत नाही. ती कुठे राहते? तिच्या हक्काची झोपडी तरी असेल का?
झाले ! म्हणजे प्रश्नातून सुटका नाही. माझीच नव्हे, कुणाचीच नाही! मग जगणे म्हणजे नुसते श्वासोच्छ्वास घेणे की लक्ष लक्ष प्रश्नांच्या उत्तरांमागून धावणे? शेवटी प्रश्न म्हणजे तरी काय आणि उत्तर म्हणजे तरी काय? हादेखील एक प्रश्नच. मी त्या प्रश्नचिन्हाकडेच निरखून पाहतो. आणि युरेका! त्या प्रश्नचिन्हातच माझे उत्तर कसल्याशा सांकेतिक भाषेत दडवले आहे हे मला ठाऊक नव्हते. प्रश्नचिन्हाच्या त्या आकड्याखालीच शून्य हे त्याचे उत्तरही असते. विरामिचन्हे इतकी विचारपूर्वक बनवली असतील याची मला कल्पना नव्हती!
0 comments
Post a Comment