मला तर कित्येकदा भारतीय संस्कृती नेमकं कशाला म्हणावं तेच कळत नाही. एकीकडून रामभक्तीचे सुंदर उमाळे काढणारा तुळसीदास 'ढोरं, गॅंवार, शूद्र, पशु, नारी, ये सब ताडनके अधिकारी' म्हणतो, म्हणजे संत तुळशीदासांच्या मताने गुरं, खेडवळ माणसं, इतर पशू आणि स्त्रिया ह्मा फक्त चोप खाण्याच्याच लायकीच्या आहेत! बायकांना नवऱ्यांनी लाथाबुक्क्यांचा प्रसाद देण्याच्या बाबतीत आपल्या देशातल्या लक्षावधी खेड्यांत सर्वधर्मसमभाव आहे. खुद्द दिल्लीतही आपल्या बायकांना फारशा न्यायबुद्धीनं वागवतातच असं नाही. पुष्कळदा मला वाटतं की ह्मा देशात फक्त पुरुषाला स्वातंत्र्य मिळालं आहे. स्त्रिया पारतंत्रातच आहेत. अशा ह्मा आपल्या देशात भारतीयत्वाचा विचार रुजवायचा आहे. 'उपकार म्हणून तुम्हाला ह्मा देशात राहू देतो' ही वृत्ती जशी हिंदूंनी सोडायला हवी तशीच कालबाह्म झालेल्या आणि देशाला पोषक नसलेल्या रुढींच्या उच्चाटनाचं काम करायला मुसलमान आणि इतर धर्मीयांनीही आपल्यातील भारतीयत्वाला अग्रक्रम द्यायला हवा. हमीद दलवाईंच्या अनुभवांवरुन मुसलमानात हे विचारपरिवर्तनाचं कार्य किती अवघड आहे हे ध्यानात येतं. इतर धर्मांत आणि जातींत ते सोपं आहे असं नाही. वास्तविक माणसांत देवाला पाहणाऱ्या भटजी, मुल्ला, शेख यांच्या संकुचितपपणाविरुद्ध पूर्वीपासून आमच्या भारतीय संतांनी झोड उठवलेली आहे. 'मुल्ला होकर बांग पुकारे वह क्या साहब बहिरा है?' असा सवाल कबीरानं केला आहे.
महाकवी गालिबनं तर देव फक्त मशिदीतच नसतो हे ठसवण्यासाठी शेखजींना म्हटलं आहे की 'शेखजी मला मशिदीत बसून पिऊ दे, वर्ना ऐसी जगह बताव जहॉं खुदा नही!' आमचे तुकोबा विचारतात, 'ऐसे कैसे रे सोवळे, शिवता होतसे ओवळे?' ह्मा सर्व मंडळींची देवावरची श्रद्धा कमी प्रतीची होती असं कोण म्हणेल? त्यांनी ते देवत्व माणसांत पाहिलं. कलेच्या खऱ्या उपासकाला आणि रसिकाला तर राष्ट्रीयतेचं कुंपण देखील संकुचित वाटतं. मग धार्मिक कुंपणांची तर गोष्टच नको. म्हणूनच केशवसुतांनी 'ब्राह्मण नाही हिंदुही नाही, न मी एक पंथाचा तेच पतति की जे आखडती प्रदेश साकल्याचा खादाड असे माझी भूक चतकोराने मला न सुख, कूपातिल मी नच मंडूक मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे कोण मला वठणीवर आणू शकतप ते मी पाहे' असं विचारलं आहे. मुखमें रामनाम बगलमे छुरी, ह्मा तत्वाचं आचरण करणाऱ्यांविरुद्ध प्रत्येक काळांतले साहित्यिक, कवी आणि कलावंत उभे राहिलेले आहेत. मुस्लिम धर्मांधतेविरुद्ध प्रेममार्ग सांगणारे सुफी उभे राहिले, जातिभेदाचं पोषण करणाऱ्यांविरुद्ध रामी धोबिणीबरोबर संसार करणारा ब्राह्मण चंडिदास 'सर्वांहून श्रेष्ठ माणूस त्याहून श्रेष्ठ कोणीही नाही' असं सांगत उभा राहिला. यज्ञामुळे होणारी भरमसाठ पशुहत्या आपल्या देशातली शेती धोक्यात आणीत होती. त्याविरुद्ध गौतमबुद्ध प्रज्ञा आणि करुणेचा संदेश घेऊन उभे राहिले. बुद्धीला सतेज ठेवून प्रज्ञा आणि प्रत्यक्ष वृतीतून जी सिद्ध होते त्या करूणेचा मार्ग प्रमाण मानून ही एकात्मता साधायची आहे. रवीन्द्रनाथांनी त्याला 'मानुषेर धर्म माणसाचा धर्म' म्हटलं आहे ज्या रुढी आपल्यांत दूरत्व निर्माण करतात त्या दूर सारुन ह्मा प्रज्ञा आणि करुणेच्या मार्गानंच भारतीयांची एकात्मता साधली जाईल. 'नान्य: पंथा अथ:नाय विद्यते'- दुसरा कुठलाच मार्ग यासाठी नाही' समाजाच्या ऐहिक अभ्युदयासाठी ज्यांना तन देता येईल त्यांनी तन, धन देता येईल त्यांनी धन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांशी युक्त केल्यामुळे मुक्त झालेलं मन देण्याची ही एक ऐतिहासिक महत्वाची घडी आलेली आहे. 'हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणूनच मरणार नाही' असं म्हणून आंबेडकरांनी धर्माचं प्रवर्तन केलं. कुठल्याही धर्माचा किंवा प्रांताचा माझ्यावर शिक्का असला तरी मी भारतीय म्हणूनच जगेन, अशा विचारचक्र प्रवर्तनाचं हे कार्य आहे आणि ते होणं ही आजच्या काळातली भारताची सर्वांत मोठी गरज आहे....
(- ‘पुण्याच्या राष्ट्रीय एकात्मता परिषदेतील भाषण’)
0 comments
Post a Comment