चिरंजीव निहारिका औक्षवंत हो !

माझी सोनू निहारिका | जणू छोटीशी बाहुली |
माझ्या बिरार कुळाची | उमलती सदाफुली || १ ||

माझी सोनू निहारिका | तिचे टपोरे हो डोळे |
आहे मिश्किल जराशी | दावी मुखी भाव भोळे || २ ||

माझी सोनू निहारिका | तिचे छान छान झगे |
राघू, मैना, भू भू, मनी | त्याच्यावरी तिचे सगे || ३ ||

माझी, सोनू निहारिका | तिचा साहेबी रुबाब |
जरासुद्धा न चालतो | थोडा रुमाल ख़राब || ४ ||

माझी सोनू निहारिका | तिचे गुब्बे गुब्बे गाल |
थोड़े जरी रागावता | नाकाचा हो शेंडा लाल || ५ ||

माझी सोनू निहारिका | तिचे सखे चिऊ, काऊ |
मला म्हणे, "त्यांच्या सवे | चला उडायला जाऊ" || ६ ||

माझी सोनू निहारिका | कधी होते माझी बाई |
थोड़े जरी मी चुकता | शिक्षा देई घाई घाई || ७ ||

माझी सोनू निहारिका | जणू तारका चांदणी |
मोठी होता चमकेल | विश्वाच्या या नाभांगणी || ८ ||

माझी सोनू निहारिका | ठेवी हात कटेवरी |
आणि म्हणे, " आई, बाबा | विठू आला तुम्हा घरी," || ९ ||

माझी सोनू निहारिका | करी हाताची बासरी |
पू पू ऐसे म्हणताना | मूर्त पहावी हासरी || १० ||

माझी सोनू निहारिका | कधी खेळते भोंडला |
फेर धरुनी ती म्हणे | "कसा हत्तीला कोंडला || ११ ||

माझी सोनू निहारिका | कधी कधी होते राजा |
बसुनिया माझ्या पाठी | वाजविते बँडबाजा || १२ ||

माझी सोनू निहारिका | किती तिच्या सांगू खोड्या ?
नव्या को-या कागदाच्या | करावया लावी होड्या || १३ ||

माझी सोनू निहारिका | कधी खोटं खोटं रडे |
कङेवरी घेता मात्र | खुदकन हसू पड़े || १४ ||

माझी सोनू निहारिका | ए बी सी डी गिरविते |
दटाऊनी मज म्हणे | "तुम्हांलाही शिकविते" || १५ ||

माझी सोनू निहारिका | कधी स्वतःशीच लाजे |
तिचा नखरा असा की | तिचा तिलाच विराजे || १६ ||

माझी सोनू निहारिका | आहे उत्तम गुणाची |
तुम्ही तरी सांगा बरे | सर येईल कुणाची ? || १७ ||

माझी सोनू निहारिका | राती जेव्हां येई खळी |
माऊलीच्या कुशीमध्ये | झोपी जाते सोनकळी || १८ ||

माझी सोनू निहारिका | गायत्रीचे हे वासरू |
गुणगौरव गाताना | कसे स्वतःला आवरू ? || १९ ||

माझी सोनू निहारिका | तिचे विशाल आकाश |
ज्ञानवंत ऐसी होवो | शत् सुर्याचा प्रकाश || २० ||

रचना : उपेंद्र चिंचोरे

Email : chinchoreupendra@yahoo.com

0 comments

Post a Comment