अत्रिमुनीची पत्‍नी अनुसूया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आश्रमांत पतीच्या सान्निध्यांत राहून पतीची उत्तम प्रकारे सेवां करित असे. तसेंच आश्रमांत येण्यार्‍या प्रत्येक अतिथीचें मोठ्या प्रेमानें व आदरानें स्वागत करी. वेळींअवेळीं आलेला पाहुणा अनुसूयेच्या आश्रमांतून कधी उपाशीं पोटीं गेला नाहीं किंवा रिक्तहस्तानें गेला नाहीं. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यसुद्धां तिला भिऊन वागे; अग्नि तिच्यापुढें शीतल होई; पवन तिच्यापुढें नम्र होई. तिच्या शापाच्या भयानें सारीं पंचमहाभूतें तिचपुढें थरथर कांपत. एवढा तिच्या पतिव्रत्याच्या प्रभाव !
पतीबद्दल तिच्या ठायीं असलेली अनन्य भक्ति व लोकांबद्दल असलेला आत्यंतिक आदर यामुळें तिचें नांव ' साध्वी व पतिव्रता स्त्री ' म्हणून सर्वतोमुखीं झालें. ही वार्ता अर्थात् नारदुमुनींच्या सुद्धां कानांवर गेल्या शिवाय राहिली नाहीं. नारदांचें नांवच मुळीं ' कळीचा नारद ' तेव्हां ही वार्ता त्यांनीं वैकुंठाला जाऊन लक्ष्मीला ( विष्णूची पत्‍नी ) सांगितली, पार्वतीपुढें ( शंकराची पत्‍नी ) अनुसूयेच्या पतिव्रत्याचें गुणगान गाइलें, सावित्रीपुढें ( ब्रह्मदेवाची पत्‍नी ) तिच्या आदरातिथ्याविषयीं धन्योद्गार काढले. तेव्हां साहजिकच त्यांना या अनुसूयेबद्दल मत्सर वाटूं लागला. ही अनुसूया यःकिंचित् मानव व आपण देवी. तेव्हां या अनुसूयेचे वर्चस्व आपणांवर उपयोगी नाहीं. तेव्हां हिचें सत्व हरण करावें असा त्यांच्या मनांत विचार आला आणि हा विचार त्यांनीं आपापल्या पतींजवळ बोलून दाखविला. तेव्हां त्या त्रैमूर्ति (ब्रह्मा-विष्णु-महेश ) क्रोधानें संतप्त झाल्या आणि म्हणाल्या- "ती पतिव्रता कशी आहे तें आम्ही पहातों व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतों." अशी प्रतिज्ञा करून ते तिघे मिळून मृत्युलोकांत यवयास निघाले.
त्या तिघांनीं ब्राह्मणाचीं रूपें घेतलीं. शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणें, यज्ञोपवीत आणि हातांत कमंडलू अशा थाटांत ते तिघे अत्रिमुनींच्या आश्रमांत आले. भर दुपारची वेळ ! ऊन मी म्हणत होतें. अशा वेळीं आपल्या आश्रमांत आलेले ब्राह्मन अतिथी पाहून अनुसूयेनें त्यांना मोठ्या आदरानें बसावयास आसन दिलें. त्यांचे चरण धुतले व भक्तिभावानें त्यांचें पूजन केलें. त्यांना पाटावर बसवून जेवण वाढलें. पण तिला अतिथी म्हणाले- "आम्ही लांबून आलों असून, तुझें सुंदर स्वरूप पाहून आम्हांस इच्छा झाली आहे कीं, तूं नग्न होऊन आम्हांस अन्न वाढावें.''
आसनीं बैसतां सत्वर । म्हणती क्षुधा लागली फार ।
नग्न होऊनि निर्धार । इच्छाभोजन देइंजे ॥
हें वचन ऐकतांच अनुसूया चिंतन करीत मनांत म्हणाली- 'हे कोणी कारणिक पुरुष माझें सत्त्व पाहाण्याकरितां आले असावे. यांस जर विन्मुख पाठविलें तर माझ्या सत्वाची हानि होईल. माझें मन निर्मळ आहे. शिवाय माझ्या पतीचें तपःसामर्थ्य माझ्यामागें आहे.' असें मनांत आणून सती म्हणाली, - "थाबा, तुमच्या इच्छेप्रमाणेंच करितें.''
एवढें बोलून अनुसूया तात्काळ घरांत गेली. त्या वेळीं तिचे पति देवाजवळ ध्यानस्थ बसले होते. त्यांस ही सारी कथा निवेदन केली. तेव्हां मुनींनी अंतर्ज्ञानानें हें सारें ओळखलें व आपल्या पत्‍नीस एका पंचपात्रांत गंगोदक देऊन म्हणाले, - "हें गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छाभोजन दे."
हें जाणोनियां मानसीं । तीर्थगंडी देई कांतेसी ।
गंगा प्रोक्षूनि तिघांसी । भोजन देई जाण पां ॥
तेव्हां पतीच्या आज्ञेप्रमाणें ती तीर्थाची पंचपात्री हातीं घेऊन अनुसूया आश्रमाबाहेर आली, हातांतील गंगोदक त्या तिघांवर उडविलें. तो काय ? त्या गंगोदकाचा स्पर्श होतांच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले. लहान बालक ! अगदीं लहान !! तीं तीन गोजिरीं गोजिरीं बालकें पायांजवळ लोळूं लागलीं. तेव्हां अनुसूयेनें तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतलें आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणें-
कंचुकोसहित परिधान । फेडूनि ठेवी न लगतां क्षण ।
नग्न होवोनियां जाण । बाळांजवळी बैसतसे ॥
बाळें घेऊनि मांडोवरी । स्तनीं लावी जेव्हां सुंदरी ।
पान्हा फुटला ते अवसरी । देखोनि सती आनंदे ॥
अशा तर्‍हेनें गंगोदक उडविल्यावर त्या तिघां अतिथींची बालकें झाली तीं बालकें रडू लागलीं. तेव्हां त्यांना भूक लागली असेल असें समजुन अनुसूयेनें त्यांना यथेच्छ स्तनपान करविलें. त्यांची क्षुधा निवारन केली व त्यांना पाळण्यांत घालून थोपटून निजविलें. असें या पतिव्रत्याचें फळ आहे.
अशीं कित्येक युगें लोटलीं. पण हीं तिन्ही बालके. मात्र आहेत त्याच स्वरूपांत राहिलीं. असें होतां होतां एकदां नारदमुनीचीं स्वारी अत्रिमुनींच्या आश्रमांत आली. मुनींनीं त्यांचें आदरानें स्वागत करून बसावयास आसन दिलें तेव्हां त्यांच ठिकाणीं तीं तीन बालकें ( ब्रह्मा-विष्णु-महेश ) रांगत खेळत असतांना नारदांनीं पाहिलीं. नारदांनी त्या बालकांना तात्काळ ओळखलें, पण तेथें ते कांहींच बोलले नाहींत. अत्रिमुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकीं आले व ही गोष्ट त्यांनीं लक्ष्मी, पार्वती व सावित्री यांना सांगितली. तेव्हा त्या फार चिंताग्रस्त झाल्या.
ऐसें सांगताम ब्रह्मपुंत्र । तिघी मिळाल्या एकत्र ।
जोडोनियां पाणिपात्र । नारदासी विचारिती ।
तेव्हां त्या तिघांनी नारदाला हात जोडून अशी विनंती केली कीं, 'हे मुनिवर, आम्हांला त्या अत्रिमुनींच्या आश्रमांत घेऊन चला. म्हणजे आम्ही आपापले भ्रतार ( पति ) परत शोधून घेऊन येऊं. तेव्हा नारदांनी त्यांना तो अत्रिमुनींचा आश्रम दाखविला.
इकडे या तिघी त्या अनुसूयेकडे गेल्या. तिची त्यांनी करुणा भाकुन झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसूयेची क्षमा मागितली. तेव्हा त्या अनुसूयेस दया येऊन तिनें हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला. तेव्हां अत्रिमुनींनीं फिरून गंगोदक देऊन तें त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितलें.
तेव्हा हातांत तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसूया बाहेर आली. त्या बालकांवर गंगोदक शिंपडलें. तेव्हां तीं बालकें पूर्ववत् देवस्वरूप झाली. ब्रह्मा- विष्णु- महेश. इतक्यांत मुनि बाहेर आले. त्यांनीं देवांना साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळीं विष्णु, शंकर, ब्रह्मदेव, प्रसन्न झाले व म्हणाले, "हे अनुसूये आम्ही तुजवर प्रसन्न झालों आहोंत. इच्छित वर माग !" तेव्हां अनुसूयेनें 'तिघे बालक ( ब्रह्मा - विष्णु- महेश ) माझ्या घरीं तीन मूर्ति एकरूप होऊन पुत्राप्रमाने राहूं देत' असा वर मागितला. तेव्हा 'तथास्तु' असें म्हणून देव अंतर्धान पावले. आणि-
मासांमाजीं मार्गेश्वर । उत्तम महिना प्रियकर ।
तिर्थीमाजीं तिथी थोर । चतुर्दशी शुद्ध पैं ॥
वार बुधवार कृत्तिका नक्षत्र । ते दिनीं ब्रह्मा विष्णु त्रिनेत्र ।
तिघे मिळोनि एकत्र । शुद्ध सत्त्व निवडिलें ॥
त्रैमुर्तींचें सत्त्व मिळोन । मूर्ति केली असे निर्माण ।
ठेविते झाले नामभिघान । दत्तात्रेय अवधूत ॥
अशा तर्‍हेनें मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला. तीन शिरें, सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचें ते बालक पाहून सती अनुसूयेला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय !
तेव्हांपासून आजतागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकालीं दत्ताच्या देवालयांत दत्तजयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो. तसेंच घरोघरीं दर गुरुवारीं दत्ताच्या तसबिरीला हार घालून दत्तभक्त त्याचें पूजन व प्रार्थना करतात.
ज्या ज्या ठिकाणीं मन जाय माझें
त्या त्या ठिकाणीं निजरूप तूझें ।
मी ठेवितों मस्तक ज्या ठिकाणीं
तेथें तुझे सदगुरु पाय दोन्ही ॥
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात्परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥

0 comments

Post a Comment