बाराव्या शतकातील बिंबिसार राजाची कुलस्वामिनी असलेल्या प्रभावती देवीचे मूळ मंदिर गुजरातमध्ये होते. मुघलांच्या मूतिर्भंजनापासून देवीला सुरक्षित ठेवण्यासाठी कर्नाटकात आणि तेथून माहीमच्या खाडीत आणून ठेवण्यात आले असे मंदिराचे पुजारी जयवंत जोशी सांगतात. शाम नायक या पाठारे प्रभु जातीतील व्यक्तीने १७१४ मध्ये हे मंदिर बांधले. मंदिरासमोरील विहिरीत नायक यांना ही मूतीर् सापडली. प्रभावतीच्या एका बाजूला चंडिका आणि दुसऱ्या बाजूला कालिका देवीची मूर्ती आहे. संवत्सर १७७१ मध्ये देवीची प्राणप्रतिष्ठा करतेवेळी कोरण्यात आलेला मोडी लिपीतील पुरातन शिलालेख मंदिराच्या प्राचीनतेची ग्वाही देतो. पौष पौणिर्मेला सात दिवस चालणारा सप्ताह हा वर्षभरातील सर्वात मोठा उत्सव! मंदिर परिसरातील दीपस्तंभ यावेळी प्रज्वलित केला जातो. येथे भरणारी मोठी जत्रा आणि तेथे मिळणारा मालवणी खाजा हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे.

0 comments

Post a Comment