त्याकाळात पुण्यातील बाजारपेठेत व्यापार म्हणजे अगदी नाइलाजाने करावयाची गोष्ट असे मानणाऱ्या दुकानदारांचाच जास्त भरणा होता।त्यामुळे पुण्यातल्या बाजारपेठेतील विक्रेते ग्राहकावर आपला कमीतकमी वेळ कसा जाईल याबाबतीत इतकी दक्षता घेताना दिसत की वेळ आणि हालचाल (time and motion)याचा अभ्यासक गिलब्रेथ याने पुण्याच्या बाजारपेठेचा फेरफटका मारला असता तर आपल्या एक डझन मुलांना वेळेचा जास्तीतजास्त कसा सदुपयोग करावा याचे धडॅ देण्यात आपला वेळ आपण उगीचच वाया घालवला त्याऐवजी त्यांना पुण्याच्या बाजारात पाठवून द्यायला हवे होते असे त्याला वाटले असते .



टिळक आगरकरांची तत्वपालनाविषयीची आग्रही वृत्तीही विक्रेत्यांच्या अंगी पूर्णपणे बाणली असल्यामुळे आपल्याला काय हवे याची ग्राहकाला पूर्ण कल्पना असायला हवी असा त्यांचा आग्रह असे। त्यामुळे साडीच्या दुकानात गेल्यावर ग्राहकाने नुसते " साडी दाखवा " म्हटले तर हमखास "कसली हवी ?" हा प्रश्न विक्रेता



विचारणारच। कारण याविषयी ग्राहकाने पूर्ण विचार करूनच आपल्या दुकानात पाऊल टाकायला हवे अशी त्याची इच्छा असे. आपल्याला हव्या असणाऱ्या साडीचा रंग,पोत,काठाची आणि पदराची नक्षी याची किंवा छापील म्हणजे प्रिंटेड साडी हवी असेल तर छपाईत कोणते रंग, किती फुले,किती पाने प्रति चौरस सेंमी मध्ये असावीत याची पूर्ण कल्पना ग्राहकाला असायलाच हवी किंवा शर्ट किंवा पॅंटसाठी कापड हवे असेल त्यावर डिझाइन कशा प्रकारचे व रंगाचे हवे त्याचे साद्यंत वर्णन ग्राहकाने करावे आणि आपला बहुमूल्य वेळ वाचवावा अशी दुकानदाराची अपेक्षा असे. यामागे साड्या किंवा कापडाचे तागे काढण्या आणि परत ठेवण्यात वाया जाणारा बहुमोल वेळ वाचवणे हाच साधा हिशोब असे.



या वाचलेल्या वेळेचा सदुपयोग हे दुकानदार सामाजिक कार्यात म्हणजे भारताचे आर्थिक धोरण आणि त्याचे जगावरील परिणाम किंवा जागतिक मंदी आणि त्याचा भारतीय बाजारपेठेवर परिणाम किंवा सामाजिक क्रांती अशा गहन विषयावर चऱ्चा करण्यासाठी करत आणि या चर्चेमध्ये ते इतके रंगत की कापड मोजतानाही ती चर्चा बंद करणे त्याना मानवत नसे त्यामुळे ते आपल्याला हवे तेच आणि तेवढेच कापड देतात की नाही यावर आपल्यालाच डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागे.कापड फाडताना त्यांचा आवेश आपण प्रतिपक्षाच्या मताच्याच चिंधड्या चिंधड्या करत आहोत असा असे.

0 comments

Post a Comment