प्रेषक कुशाग्र (रवि।, १७/०५/२००९ - १२:१७)
खरेदीचा तिटकारा हा गुण माझ्या आईकडून माझ्या रक्तात उतरला असावा।दारावर येणाऱ्या मोळीविक्याकडून बरीच घासाघीस करून मोळी किंवा बोहारणीकडून आमचे जुने कपडे देऊन एकादेदुसरे भांडे घेण्यापलिकडे काही बिचारीच्या खरेदीची मजल गेली नाही.त्यातही पैसे मोजून घेण्याचे किंवा देण्याचे काम आम्हा भावंडांनाच करावे लागे.त्यालाही एक कारण होते.त्या काळी मुलींच्या हातावर पैसा पडणे ही गोष्ट अशक्य कोटीतीलच ! एकदा जन्माच्या कर्मी बिचारीला तिच्या आजीने बक्षीस म्हणून दिलेली पावली म्हणजे आजचे पंचवीस पैश्यांचे नाणे घेऊन ती सगळा बाजार फिरली आणि काय घ्यावे याचा निर्णय करता न करता आल्यामुळे तिन ती आपल्या नऊवारी लुगड्याच्या कडोसरीला लपवून ठेवली आणि ती अगदी अचूकपणे माझ्या विधवा आत्याच्या नजरेस पडली.ही आत्या म्हणजे वडिलांची मोठी बहीण,तिच्यासमोर बोलण्याची त्यांचीही प्राज्ञा नसे मग आईला तर तो विचारही करणे अशक्य,अशात तिचा हा अपराध , मग काय विचारता,"आता काय अनुसया (माझी आई)स्वत:कारभार करू लागली ती आता आम्हाला काय विचारणार " असा इतका त्रागा आत्याने केला की त्यापुढे शाहूमहाराजानी स्वतंत्र कारभार सुरू केल्याबद्दल ताराबाई राणीसाहेबांनी केलेला त्रागाही फिका पडाबा.त्यामुळे संत तुकारामानीसुद्धा निदान दुकान चालवण्यासाठी तरी पैशाला हात लावला असेल ( हा उल्लेख समस्त वारकरी परिवाराची क्षमा मागून) पण त्या माउलीन मात्र त्यानंतर पैशाला कधी हात लावण्याचा आणि कसल्याही खरेदीचा व्यवहार करण्याचा अपराध केला नाही.
माझ्या बाबतीत मात्र असे काहीही न घडताच खरेदीविषयी असलेले माझे वैराग्य हा कदाचित माझ्या आळशी स्वभावाचाच भाग असावा।आमच्या गावात जो आठवडी बाजार भरायचा त्यातसुद्धा बाजारात मोकळ्या पिशव्या घेऊन जाणे आणि आमच्या व्यवहारचतुर भगिनींनी त्या भरून दिल्या की "फोडिले भांडार धन्याचाच माल मी तो हमाल भारवाही"अशा नि:संग वृत्तीने त्या खांद्यावरून घरी आणून देणे आणि आईच्या ताब्यात देणे एवढीच आमची म्हणजे माझी आणि माझ्या धाकट्या भावाची-( त्यानेही अगदी लक्ष्मणासारखा वडील भावाचाच आदर्श समोर ठेवला होता) भूमिका असे.आपण काय आणि कोणत्या भावाने आणतो याविषयी आम्ही इतके अनभिज्ञ असायचो की.त्यामानाने कापूस आणि मीठ पाठीवरून वहाणारी इसापाची गाढवही जरा जास्त जाणीवपूर्वक माल वहात असतील.पण त्यामुळे आम्हाला काहीही वस्तु खरेदी करून आणायला सांगण्याचे धाडस कोणी करत नसे. नाही म्हणायला वडिलांना दिवसातून एकवेळा लागणारे भिकुसा यमासा क्षत्रिय यांच्या उंटछाप विडीचे एक बंडल आणि त्याच्याकडे अधून मधून येणाऱ्या मित्रासाठी पिवळा हत्ती सिगारेट पाकीट या दोन वस्तूंची खरेदी मात्र करायला वडिलांना आमच्यापैकी कोणीही चालत असे.सुदैवाने त्या खरेदीचा चोरून उपभोग घेण्याचा मोह आम्हाला कधीच झाला नाही त्याचेही कारण खरेदी केलेली वस्तू ज्याच्यासाठी असेल त्याला एकदाची देऊन मोकळे होण्याची आमची वृत्तीच !
मध्यंतरीच्या काळात महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात एकटा राहू लागल्यावर खरेदीतील हा माझा अनुशेष भरून काढण्याची संधी जरी मला प्राप्त झाली होती.तरी त्यासाठी लागणाऱ्या दामाजीपंतांची मेहेरनजर आमच्यावर नसल्यामुळे आणि तशाही अवस्थेत जी काही आवश्यक खरेदी असे तीही पुण्यासारख्या शहरात करायची पाळी आल्यामुळे "आधीच उल्हास तशात फाल्गुनमास" अशीच परिस्थिती होती.आज पुण्याच्या बाजारपेठेत फिरणाऱ्यांना मी ज्याकाळचे वर्णन करत आहे त्यावेळच्या अतिउच्चसंस्कारित विक्रय तज्ञांची कल्पना करता येणेही जरा कठीणच आहे.आताही त्याचे काही सन्माननीय अवशेष पहायला मिळतात पण ते बरेच दुर्मीळ झाले आहेत असे म्हणायला हरकत नाही.
|
0
comments
]
0 comments
Post a Comment