विक्रेत्यांच्या या काटेकोरपणामुळे आणि माझ्या मुखदुर्बळपणामुळे बूट खरेदी करायला गेलेला मी बुटाबरोबर चपलाची जोडी पण खरेदी करून दुकानाबाहेर पडलो आहे असे होण्या ऐवजी विक्रेत्याने दाखवलेल्या कमीतकमी बुटांच्या जोडीमधूनच आपल्याला खरेदी करणे भाग आहे या कल्पनेने एकादी डगळ बुटांची जोडी गळ्यात पडल्याने त्यात कागदाचे पॅकिंग घालून आणि तरीही बूट पायातून निसटतात की काय या भीतीने हळूहळू चालणे किंवा फार घट्ट बूट गळ्यात पडल्यास ते घालून लंगडत चालणे किंवा ते बूट चावल्यामुळे झालेल्या जखमांमुळे अनवाणीच चालावयास लागणे अशाही संकटात सापडलो होतो।



लग्नानंतर अर्थातच खरेदीचे खाते माझ्यावर सोपवण्यात आले नाही कारण त्यामुळे हव्या त्या वस्तु हव्या त्या वेळी घरात येणार नाहीत याविषयी गृहखात्याची खात्रीच असावी।त्यामुळे मी माझी नेहमीचीच दुय्यम सहाय्यकाची भूमिका इमाने इतबारे बजावत असतो। मात्र त्यामुळे एक महत्वाचा तोटा असा होतो की कधी कधी गृहखात्याने एकाद्या वस्तूच्या खरेदीविषयी असमर्थता व्यक्त केल्यास खरेदीसाठी तज्ञ व्यक्तीची नेमणूक करणे भाग पडते.घरगुती तज्ञ माझ्या शत्रुपक्षातले म्हणजे बायकोचे नातेवाईक असतात पण त्यांची नेमणूक करण्याची जबाबदारी मात्र माझ्यावर असते. हा प्रकार कालिदासासारखे आपण झाडाच्या ज्या फांदीवर बसलो ती आपल्याच हाताने कापणे (तेही अगदी समजून उमजून) त्यातलाच प्रकार !



या तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याविषयी माझा अनुभव काही फार उत्साहवर्धक नाही।त्या/तिच्या सल्ल्याने खरेदी करण्यात आलेली वस्तु हमखास खराब निघते किंवा बिघडते. पण तज्ञ व्यक्तीची नेमणूक ती वस्तू का बिघडली किंवा ती बिघडण्यामागे आमचाच कसा हात आहे याचे विश्लेषण करण्यासाठीच असल्यामुळे त्यांच्यावर टीका करणेही शक्य नसल्याने मीरेप्रमाणे हसत हसत हा विषाचा प्याला प्यावा लागतो. त्यामुळे झालेला गोंधळ जरी मला निस्तरावा लागला नाही तरी होणारे नुकसान मात्र घरंदाज घराण्यातील सुनेसारखे ( ही वस्तु दूरदर्शन मालिकात मुबलक प्रमाणात दिसू लागली आहे)निमूटपणे सोसावे

लागते



मात्र ज्या पुण्याने माझ्या खरेदीतील अरुचीला जास्तीत जास्त खतपाणी घातले त्याच पुण्यात आज परिस्थिती बरीच सुधारलेली दिसते। कौंटरवर कापडाचे शेकडो तागे किंवा साड्या पडल्या आहेत तरीही समोरील पुरंध्री स्वत:च्या चेहऱ्याची घडी अजिबात बिघडू देत नाही पण त्यामुळे नाउमेद न होता पहिल्यापेक्षाही अधिक उत्साहाने आणखी तागे अथवा साड्यांचे ढीग हसतमुखाने काढणारा किंवा काढलेल्या ढिगातील खालून दुसरी किंवा तिसरी (हे या स्त्रियांच्या बरोबर कसे लक्षात रहाते हे त्यांचा निर्माताच जाणे ) साडी परत एकदा दाखवा या विनंतीला मान देताना तिची मानच चिरून टाकावी अशी मनातील तीव्र इच्छा लपवून ती आपल्याला एकादा गौरव पुरस्कारच देत असल्यासारखा चेहरा करून त्या ढिगात हात खुपसून बरोबर तीच साडी बाहेर काढणारा विक्रेता आपल्याला स्वप्नातच पहायला मिळेल असे मला वाटायचे पण ते आता प्रत्यक्षात उतरलेले दिसते.



आता तर सगळीकडे अगदी मॉलामॉल झाल्यामुळे स्वत:च दुकानात हिंडून हव्या त्या वस्तु हातगाडीत टाकून बाहेर पडताना त्याची किंमत चुकती करण्याची पद्धत आपल्याकडेही बरीच रुजायला लागली आहे. त्यात हवी ती वस्तु न सापडण्याची एक किरकोळ अडचण असते पण त्यासाठीही त्यांचे सहाय्यक तत्परतेने मदत करायला तयार असतातच.हे लोक तर तुम्हाला खरेदी करायला लावण्याचा चंग बांधूनच बाजारात उतरले आहेत त्यामुळे एकावर एक (किंवा दोनसुद्धा )फुकट हा प्रकार इथेही रूढ झालेला आहे.इतक्या प्रलोभनामुळे तरी मी खरेदीचा आळस सोडेन असे वाटण्याचा काळ मात्र आता केव्हाचाच गेला आहे.मात्र याची पूर्ण कल्पना इतराना असल्याने "धाडू नको मज बाजारी " असे म्हणण्याची पाळी मात्र क्वचितच माझ्यावर येते.

0 comments

Post a Comment