एका जागी रस्त्याच्या कडेला जोतिषी बसलेला होता. तिथे " आमचा खडा घाला आणि आपलं भविष्य बदला'. अशी पाटी लावलेली होती. माझ्या पत्नीने मला त्याच्याकडे जाण्याचा आग्रह केला. आग्रह कसला, हट्ट केला. खरं म्हणजे ती हट्टाच्या सोनेरी मुलायम कपड्यात गुंडाळलेली गोड धमकी होती.

मी तीला समजविण्याचा प्रयत्न करु लागलो. म्हणजे 'समझा बुझाने लगा'. इथे 'समझाने' पेक्षा 'बुझाने लगा' म्हटले तर जास्त तर्कसंगत होईल. " हे बघ ... तो रस्त्यावर बसणारा ज्योतिषी ... खरं म्हणजे भविष्य बदलण्याची गरज त्याला स्वत:ला आहे. ... जो स्वत:चं भविष्य बदलू शकत नाही तो आपलं भविष्य काय बदलणार? '

" हो ना ... तुम्ही असतांना काय कपाळ भविष्य बदलणार आहे. ' ती चिडून पाय आपटत समोर निघून गेली.

त्यापुढं अजून ती काही बोलली नाही. पण एवढं बोलल्यानंतर अजुन काय बोलायचं राहालं होतं. कदाचित तिने आपला हट्ट सोडून दिला होता किंवा तिला माझं बोलणं आवडलं नसावं. खरं काय अन खोटं काय घरी गेल्यावरच कळणार होतं.

मग आम्ही बस स्टॉप वर गेलो. बेंचवर बसून आम्ही सिटी बसची वाट बघू लागलो. एक लंगडा आणि आंधळा भिकारी गाणे गात पैसे मागत होता. सगळ्यांना त्याच्यावर दया येत होती. बऱ्याच जणांनी त्याला पैसे दिले म्हणून मग मीही दिले. आणि मी दिले म्हणून आमच्या शेजाऱ्यानेसुद्धा दिले. नेबर टेडंसी- शेजाऱ्याने गाडी घेतली का मग मीसुद्धा घेतो... असं.... त्यासाठी मग कर्जात पुरती डूबन्याची वेळ आली तरी चालेल. थोड्या वेळाने अजुन एक भिकारी "माही माय बिमार हाय' म्हणत हात पसरवू लागला. त्याला कुणीच पैसे दिले नाही म्हणून मीही नाही दिले. आणि मी नाही दिले म्हणून आमच्या शेजाऱ्यानेही नाही दिले. तो जात नाही की त्याच्या मागे ते टाळ्या वाजविणारे आले .. तृतीय पंथी. त्यांना पैसे न द्यायची कुणाची हिम्मत. सगळ्यांनी चुपचाप पैसे काढून त्याच्या हातावर ठेवले. जर नाही दिले तर सरळ तुमच्या खिशात हात घालून पैसे काढण्यापर्यंतची त्यांची मजल. तसे ते पैसे उकळण्यासाठी समोरचा माणूस पाहून वेगवेगळे नुस्खे वापरतात.

" ए चिकने ...दे ना' कुणाच्या गालाला हात लावतील. किंवा " ए भिडू ...दे ना' म्हणत कुणाच्या कुठे हात लावतील काही भरोसा नाही.

" इथे जर जास्त वेळ बसलो तर थोड्याच वेळात कदाचित आपल्यालाही अशी भिक मागण्याची वेळ यायची' मी माझ्या पत्नीसमोर हात पसरुन पैसे मागण्याचा अभिनय करीत गमतीने म्हणालो.

अशा गमतीची हवा कशी काढायची हे तर कुणी माझ्या पत्नीकडून शिकावं ... आपल्या गंभीर चेहऱ्याला अजून गंभीर करीत तीने पटकन आपल्या पर्समधून एक नाणे काढले आणि तिथे बसलेल्या सगळ्या लोकांसमोर माझ्या पसरलेल्या हातावर ठेवले.

भिकाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी मी बाजूच्याच एका दुकानात गेलो. तिथे समोर एक कदाचीत काहीतरी खाण्याच्या जिन्नसाचे प्लॅस्टीकचे पाकीट लटकत होते. त्यावर लिहिले होते, '' आता पहिल्यापेक्षा चांगल्या स्वादात '. स्वाद आणि तोही चांगला. माझ्या तोंडाला पाणी सुटले. मी विचारलं, '' काय आहे?''. तो मख्ख चेहऱ्याने म्हणाला, "कुत्र्याचं बिस्कीट' माझ्या तोंडाला सुटलेलं पाणी उलट पावलांनी परत गेलं. कुत्र्याचं बिस्कीट ... आता पहिल्यापेक्षा चांगल्या स्वादात... आता याच्या पहिल्या स्चादात आणि आताच्या स्वादात काही फरक आहेकी नाही हे बघायला... एक तर माणसाला कुत्रा बनावं लागेल... किंवा कुत्र्याला लिहिणं वाचणं शिकावं लागेल...

" अहो ऐकतायका ... गाडी आली ... नाही तर नेहमीसारखं... ' श्रीमतीजीचा आवाज आला. तिने पुढेही बरंच काही कुरकुर करीत म्हटलं होतं... मला ते ऐकू आलं नाही असं नाही ... पण ते मी मुद्दाम ऐकलं नाही... नेहमी प्रमाणे... सवयीनुसार...


क्रमश:...

0 comments

Post a Comment