त्या दुकानातून बाहेर निघतांना समोर एक चपलांचं दुकान दिसलं. तीथे एक बोर्ड लावलेला होता 'एकावर एक फ्री' . आता उजव्या चपलीवर डावी चप्पल फ्री ... की डाव्या चपलीवर उजवी चप्पल फ्री... की एका चपलीच्या जोडीबरोबर दुसरी जोडी फ्री... हे त्या दुकानदाराला विचारण्याची माझी प्रबल इच्छा झाली. पण आता आता आलेल्या ताज्या अनुभवामुळे माझी त्या दुकानात जाण्याची हिम्मत झाली नाही.

रस्त्याने जातांना आपल्या भावना लपविण्यासाठी मी त्या छत्रीला कधी खिशात तर कधी मागुन कॉलरला लटकविण्याचा प्रयत्न करीत होतो. त्या छत्रीला गळ्यात लटकवितांना एक विचार माझ्या मनात येवून गेला की ... अरे ही छत्री तर जबरदस्ती आपल्या गळ्यात पडली... आता हीला पुन्हा अजून गळ्यात अटकविण्याची काय गरज!

अनायास माझं लक्ष बाजुच्या एका बोळीत गेलं. तिथं कोपऱ्यात त्या दिवशी भेटलेला आंधळा आणि लंगडा भिकारी दिसला. तो मस्त मजेत उभा राहून सिगारेट ओढत होता. म्हणजे तो लंगडा नव्हता आणि कदाचित आंधळाही नसावा. माझा तर विश्वासच बसत नव्हता. त्याने आम्हा सगळ्यांना उल्लू बनवीलं होतं. विचारांच्या तंद्रीत मी थोडा समोर गेलो तर तिथे रस्त्याच्या कडेला लोकांची गर्दी जमलेली होती. कधी कधी गर्दी अशीच जमते. दोन लोक जमा होतात. ते दोन का जमा झाले हे बघण्यासाठी अजून तिन तिथे जातात. त्या तिघांच्या मागे अजुन सहा ... असाच मीही त्या गर्दीत घुसलो. बघतो तर त्या दिवशी भेटलेला दुसरा भिकारी जो ' माझी माय बिमार हाय' म्हणून भिक मागत होता, तो कुणा एका वृध्द महिलेचं डोकं आपल्या मांडीवर घेवून जोर जोरात रडत होता. ती महिला मेलेली दिसत होती. कदाचित त्याची 'माय' असावी. त्या दिवशी किती विवशतेने पैसे मागत होता बिचारा. त्याला कुणीही समजू शकलं नव्हतं... किंवा तो आपल्या जरुरतीची बरोबर मार्केटिंग करु शकला नव्हता.

एवढ्यात तो दुसरा खोटा लंगडा आणि आंधळा भिकारी लंगडत लंगडत तिथे आला. त्याची चलाखीने परिस्थीतीथीचा फायदा घेण्याची जाण तर बघा. चटकन त्याने एक कॅप उलटी केली आणि लंगडत लंगडत "त्याच्या मायला जाळण्यासाठी पैसे द्या' म्हणून भिक मागु लागला ... ही इज परफेक्ट मार्केटींग मॅन ... इथे मार्केटींग लाईनचे लोक आहत होण्याची शक्यता आहे .. पण तसा माझा बिलकूल इरादा नाही. तरीही कुणी मार्केटींगचे लोक जर आहत झाले असतील तर मी त्या भिकाऱ्याच्या तर्फे सर्वांची जाहिर माफी मागतो.

मी आणि माझी पत्नी शॉपिंग आटोपून घरी परतत होतो. त्या भिकाऱ्याच्या आईला मरुन 7 - 8 दिवस होवून गेले असतील. तरीही तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोरुन हटायला तयार नव्हता. त्या खोट्या लंगड्या आणि आंधळ्या भिकाऱ्याने सर्वांना मुर्ख बनविले होते. ज्याला खरी गरज होती त्याला कुणीही पैसे दिले नव्हते. आज या भडकील्या ऍड्वर्टाइज, भडकिल्या मार्केटिंग च्या युगात खरंच आपली समज बोथट होत चालली होती, की पुर्णपणे संपत चालली होती? मी विचाराच्या तंद्रीत चाललो होतो.

" तो कॉफी सेट खरचं किती सुंदर होता. ... हो नं?' माझ्या पत्नीने माझी विचारांची तंद्री तोडली.

मीही स्वत:ला नॉर्मल भासविण्याच्या प्रयत्नात गोष्ट गमतीवर नेली.

" हो खरच खुप सुंदर होता.. पण एक गोष्ट त्या कॉफी सेटच्या सुंदरतेला नष्ट करत होती... ' मी म्हटलं.

" कोणती ?' माझ्या पत्नीने विचारले.

" त्यावर लावलेला प्राईज टॅग' मी म्हटलं.

थोडा वेळ अंधारात आम्ही काही बोलता चालत राहालो. .

" तिकडे बघा ... तिकडे बोळीत' माझ्या पत्नीने एका बोळीकडे इशारा करीत म्हटले.

मी उत्सुकतेने त्या बोळीत बघीतले. जिथे त्या दिवशी तो भिकारी मजेत सिगारेट ओढत असतांना दिसला होता. तिथे आज दोन जण होते. तो खोटा लंगडा, आंधळा भिकारी आणि दुसरा ज्याची आई वारली होती तो. दोघंही मजेत मस्त होवून सिगारेट ओढत होते. ज्याची आई वारली होती तो एका हाताने सिगारेट ओढत होता आणि दुसऱ्या हाताने एखाद्या राजा सारखे पैसे मोजत होता.

.... कदाचित तो मार्केटिंग शिकला होता...

- The End -

0 comments

Post a Comment