इसापनीती लिहिणारा इसाप हा इसवीसनापूर्वी सहाव्या शतकात होऊन गेला. 'फ्रिजिआ' नावाच्या
देशातील आमोरियम या गावी तो जन्मला, त्याचे आईबाप गुलाम असल्यामुळे तो जन्मतःच
गुलाम होता. तो रूपाने अत्यंत कुरूप असून रंगाने काळा होता. त्यामुळे त्याला बघून बायका-मुले
घाबरत असत. त्या कारणाने त्याच्या मालकाने त्याला आपल्या घरात न ठेवता दूर शेतात
राखणीच्या कामास पाठवले.

एकदा आपल्या शेताची काय परिस्थिती आहे ती बघण्यासाठी मालक शेतावर गेला. तेव्हा त्याच्या
कुळांनी त्याला चांगले अंजीर भेट दिले. त्याने ते आपल्या नोकरांजवळ देऊन तो स्नान करावयास
गेला. ते पिकलेले अंजीर पाहून नोकराच्या तोंडास पाणी सुटले. त्यांनी मागला पुढला विचार न
करता ते सर्व खाऊन टाकले. पण नंतर मालक परत आल्यावर त्याला काय सांगायचे हा त्यांना
प्रश्न पडला. तेव्हा त्यांनी संगनमत करुन इसापने अंजीर खाल्याचे सांगायचे ठरवले. त्याप्रमाणे
मालक परत येताच त्यांनी इसापला पुढे करून त्यानेच अंजीर खाल्ल्याचे सांगायचे. त्याबरोबर
मालक खूप संतापला. त्याने इसापला कडक शिक्षा करावयाचे ठरवले. त्यावर इसाप क्षणभर
शांत उभा राहिला. नंतर मालकाच्या पायावर लोटांगण घालून तो म्हणाला, 'मालक मी जर खरंच
अपराध केला अशी आपली खात्री पटली तर मला जरूर शिक्षा करा. पण त्यापूर्वी आपण जर
मला अर्ध्या तासाची मुदत दिलीत तर मी माझा निरपराधीपणा सिद्ध करून दाखवीन.


मालकाने त्याची विनंती मान्य केली. तेव्हा इसापने गरम पाण्यात मीठ टाकून तो ते प्याला.
नंतर घशात बोटे घालून ओकारी काढली. तेव्हा ओकलेल्या पदार्थात अंजीराचा मागमुसही नव्हता
ते पाहून मालकाला त्याच्या निरपराधीपणाबद्दल खात्री पटली. हे काम आपल्या लबाड नोकरांचेच
असले पाहिजे हे त्याच्या लक्षात आले. त्याने नोकरांना, इतरांनाही इसापचे अनुकरण करायला
सांगितले. तेव्हा आपले कृत्य उघडकीस येऊन आपली फजिती होणार असे दिसताच त्या लबाड
नोकरांनी आपला गुन्हा कबूल केला.


त्याप्रसंगी इसापने दाखवलेली समयसूचकता व चातुर्य पाहून मालक त्याच्यावर खूष झाला. त्याने
इसापला परत नेऊन आपल्या घरी ठेवले. पुढे एकदा मालकाला पैशाची फारच अडचण निर्माण
झाली तेव्हा नाइलाजाने त्याने इसापला एका गुलामांच्या व्यापार्‍याला विकले. तो व्यापारी
गुलामांच्या डोक्यावर मोठमोठे बोजे देऊन त्यांना गावोगाव हिंडवत असे. एक दिवस बोजे
उचलण्याची वेळ आली तेव्हा इतर गुलामांनी पटापट जे बोजे हलके होते ते उचलून घेतले.
पण त्यांच्या आधीच इसापने त्या सर्वांच्या जेवणाच्या साहित्याचा जड बोजा उचलून घेतला.
आधीच अशक्त असतांना त्याने सर्वात जड बोजा डोक्यावर घेतल्याबद्दल इतर गुलाम इसापला
हसू लागले. त्यावेळी इसाप काही बोलला नाही. उचललेला जड बोजा डोक्यावर घेउन तो कसाबसा
चालू लागला. पण दर दिवशी त्याच्या बोजातले खाण्याचे पदार्थ कमी कमी होऊ लागल्याने
मुक्कामावर पोहोचण्यापूर्वी त्याच्या डोक्यावर देण्यास काहीच शिल्लक राहिले नाही. इतरांचे बोजे
कायमच होते. ते पाहून सर्वांनी इसापच्या चातुर्याची फार तारीफ केली. त्यानंतर दरवेळी इसापनेच
जेवणाच्या साहित्याचा बोजा घ्यायचा असे मालकाने ठरवून टाकले.


काही दिवसांनी त्या मालकाला दोनतीन गुलाम विकण्याची वेळ आली. तेव्हा त्याने दोन चांगले
धट्टेकट्टे गुलाम आणि तिसरा अशक्त इसाप असे तीन गुलाम विकायला काढले. इसाप हा कुरूप
व अशक्त असल्यामुळे त्याला कोणी विकत घेणार नाही असे मालकाला वाटले. म्हणून त्याने
इसापला त्या दोघांच्यामध्ये उभे केले. त्याच्या अशक्तपणामुळे दुसर्‍या दोघांचा सशक्तपणा लोकांच्या
नजरेस येईल आणि ते दोन गुलाम तरी लवकर विकले जातील अशी मालकाची कल्पना होती.


थोड्या वेळाने झांथस नावाचा एक तत्त्ववेत्ता तेथे गुलाम विकत घेण्यासाठी आला. या तीन
गुलामांपैकी दोघे धट्टेकट्टे असलेले पाहून त्यांना झांथसने विचारले, 'अरे तुम्हाला काय काय
कामं येतात?' त्यावर त्या दोघांनी उत्तर दिले, 'आम्हाला सर्वकाही करता येतं !


तेव्हा झांथसने इसापकडे पाहून त्याला विनोदाने विचारले, 'अन्‌ तुला रे? तुला काय काय
करता येत?' त्यावर इसाप म्हणाला, 'माझ्या या सोबत्यांनीच सगळी कामं करून टाकल्यावर
माझ्यासाठी काय शिल्लक राहणार? तरी पण आपण जे काही काम मला द्याल ते मी मनापासून
करीन. निदान मला तुम्ही विकत घेतले तर मुलांना बाऊ दाखवून भीती घालण्यासाठी तुम्हाला
दुसर्‍या कशाची जरूरी पडणार नाही.'इसापचे चतुराईचे उत्तर ऐकून झांथस खूष झाला. तो गुणी
माणसांचा चाहता होता. त्याने ओळखले की, इसाप काही सामान्य नाही. तो फार हुशार आहे.
त्याने इसापला विकत घेऊन आपल्या घरी नेले.


घरी गेल्यावर झांथसला घरातल्या लोकांची थट्टा करण्याची लहर आली. त्याने इसापला बाहेर उभे
राहण्यास सांगितले. स्वतः घरात जाऊन त्याने घरातल्या माणसांना म्हटले, 'आज मी एक फार
सुंदर गुलाम विकत आणला आहे.'ते ऐकून सगळेजण मोठ्या आतुरतेने इसापला बघण्यासाठी
बाहेर आले. पण जेव्हा इसापचा काळा रंग अन्‌ त्याचे वेडेविद्रे रूप त्यांच्या नजरेस पडले तेव्हा
ते सगळेजण घाबरून पळत सुटले.


झांथसच्या घरी असतांना इसाप आपल्या अंगच्या चातुर्यामुळे प्रसिद्धीस आला. त्या काळातल्या
त्याच्या चातुर्याच्या अनेक कथा इसापनीतीमध्ये आल्या आहेत. पण त्यात न आलेल्या दोन गोष्टी
पुढे देत आहे.


एकदा झांथसचे आणि त्याच्या बायकोचे भांडण झाले. झांथसची बायको त्याच्याशी बोलेनाशी
झाली. तेव्हा झांथसने इसापला भांडण मिटवण्याचा उपाय विचारला त्यावर इसापने त्याला एक
युक्ती सांगितली.

त्याने सांगितल्याप्रमाणे जेवणाच्या वेळी झांथस इसापला म्हणाला, 'माझ्या खर्‍या हितचिंतक
आणि विश्वासू मित्राला घेऊन ये !' त्याबरोबर इसापने झांथसच्या कुत्र्याला समोर आणून
उभे केले. ते पाहून झांथसची बायको संतापली.

'मूर्खा', ती इसापवर ओरडली, 'याचं हित पाहणारा विश्वासू मित्र काय कुत्रा आहे?
अन्‍ मी कोणीच नाही का?'


इसाप शांतपणे म्हणाला, 'बाईसाहेब आपण जर मालकांच्या खर्‍या हितचिंतक स्नेही असता
तर एवढ्या तेवढया गोष्टीवरून त्यांच्याशी भांडून पंधरापंधरा दिवस अबोला धरला नसता !


ते ऐकून बायकोला आपली चूक कळून आली, त्यानंतर पुन्हा कधीच ती नवर्‍याशी भांडली नाही.
एकदा त्यांच्या गावात गावकर्‍यांची सभा भरली होती. तेवढ्यात एका गरुड पक्ष्याने गुलामाच्या
पायातला वाळा ऐन सभेच्या मध्यभागी आणुन टाकला. सर्वांना तो अपशकून वाटला. पण त्याचा
अर्थ काय ते उमगेना. झांथसच्या विद्वत्तेबद्दल सर्वांना आदर असल्याने त्यांनी झांथसला त्याचा
अर्थ विचारला. तेव्हा तोही विचारात पडला. शेवटी, 'उद्याला मी याचा अर्थ सांगतो.' असे म्हणून
तो घरी गेला.

घरी आल्यावर. इसापला त्याने घडलेली हकीगत सांगितली. आणि त्या घटनेचा अर्थ काय
असावा असे विचारले. त्यावर इसाप म्हणाला, 'आपण जर मला गुलामगिरीतून मुक्त कराल
सांगतो.'

झांथसने त्याची अट मान्य केली.तेव्हा इसापने त्याला सांगितले, 'कोणी तरी राजा आपल्या
गावावर चाल करून येत असून गावातील सर्व लोकांना गुलाम करण्याचा त्याचा हेतू आहे असा
त्या गरुडाच्या कृत्याचा अर्थ आहे. तरी सर्व गावकर्‍यांना सावध राहायला सांगा !'

झांथसने त्याप्रमाणे गावकर्‍यांना सांगितले.

थोड्याच दिवसात खरोखरच 'लिडिआ' देशाचा राजा क्रिसस याने झांथसच्या गावकर्‍यास निरोप
पाठवला की, 'तुम्ही मला मुकाट्याने अमुक एक रक्कम खंडणी म्हणून द्या नाहीतर मी स्वारी
करून तुमचा गाव लुटीन !'तेव्हा गावकरी फार काळजीत पडले. त्यांनी सभा भरवली. इसापची
गुलामगिरीतून सुटका झाल्यामुळे तोही सभेत एक नागरिक म्हणून उपस्थित होता.इसापने
गावकर्‍यांना सांगितले, 'मित्रहो ! खंडणी देऊन आपली मानहानी करून घेऊ नका !'यावेळी
जर आपण माघार घेऊन त्याची मागणी मान्य केली तर क्रिसस आपल्याला कायमच त्रास देत
राहील. त्यासाठी वेळ आल्यास त्याच्याशी दोन हात करण्याच्या तयारीत आपण राहून आपलं
स्वातंत्र्य टिकवण्याचा प्रयत्‍न करणं हाच मार्ग योग्य आहे असं मला वाटतं !'

त्या सभेत क्रिससचा वकीलही हजर होता. त्याने ही हकीगत क्रिससला सांगितली.

'इसाप जोपर्यंत तिथे आहे' वकील क्रिससला म्हणाला, 'तोपर्यंत तो गाव आपल्या हाती
लागणं अशक्य आहे !'

तेव्हा क्रिससने झांथसच्या गावकर्‍यांना निरोप पाठविला की, 'तुमच्या गावात इसाप नावाचा
जो गृहस्थ आहे त्याला माझ्याकडे पाठवून द्या.'तेव्हा खंडणीच्या ऐवजी इसापला पाठविण्याची
अट गावकर्‍यांना पसंत पडली. ते राजाची अट कबूल करण्याच्या विचारात असलेले पाहून इसापने
त्यांना एक गोष्ट सांगितली.

'जोपर्यंत मेंढयाच्या कळपाबरोबर कुत्रे आहेत तोपर्यंत मेंढ्या आपल्या हाती लागणार नाहीत हे
पाहून लांडगा मेंढ्यांकडे तह करायला आला. त्याने त्यांच्याकडे त्यांच्यावर हल्ला न करण्याच्या
बदल्यात कुत्र्याची मागणी केली. मेंढ्यांनी खूष होऊन त्याची मागणी मान्य केली. अन्‍ कुत्र्याचं
संरक्षण नाहीसं होताच लांडग्याने एका पाठोपाठ एक सर्व मेंढ्यांना मारून खाल्लं.'

ही गोष्ट ऐकून लोकांना आपली चूक कळून आली.

तरी इसाप पुढे त्यांना म्हणाला, 'असं असलं तरीही मी क्रिससच्या दरबारात जाणं हेच तुमच्या
हिताच आहे !

त्याप्रमाणे इसाप क्रिससच्या दरबारात गेला. तिथे त्याच्या चातुर्याची फार तारीफ झाली. तिथे
असतानाच त्याने इसापनीतीतल्या बहुतेक गोष्टी रचल्या. पुढे क्रिससच्या आज्ञेवरुन डेल्फी येथील
उपाध्यायांना दक्षिणा देण्यासाठी इसाप गेला असताना त्या उपाध्यायांचे वाईट वर्तन पाहून त्याने
'देणग्या घेण्याची तुमची लायकी नसल्याने मी तुम्हाला एक कवडीही देणार नाही !' असे त्यांना
स्पष्ट सांगितले. त्यावर चिडून जाऊन उपाध्यायांनी इसापवर हल्ला करून त्याला ठार केले.
त्यापूर्वी त्यांची समजूत घालण्यासाठी इसापने त्यांना पुष्कळ नीतिकथा सांगितल्या. पण त्यांचा
काही उपयोग झाला नाही.

मरताना इसापने उपाध्यायांना सांगितले,'तुम्हाला या दुष्कृत्याचं प्रायश्चित्त लवकरच भोगावं लागेल

त्याचे हे भविष्य लवकरच खरे झाले. डेल्फी येथील लोकांवर अनेक मोठमोठी संकटे येऊन; त्यांनी
इसापला मारून त्याच्याकडून घेतलेल्या पैशाच्या हजारपट दंड त्यांना भोगावा लागला.

इसापच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल फारशी माहिती मिळत नाही. त्याने लग्न केले होते. पण
त्यास संतती झाली नाही. पुढे त्याने एक मुलगा दत्तक घेतला. पण तो दुष्ट आणि कृतघ्न निघाला
असा उल्लेख एके ठिकाणी आला आहे.

इसापच्या मृत्युनंतर दोनशे वर्षांनी ग्रीसमधील अथेन्स शहरातील लोकांनी इसापचा एक उत्तम
पुतळा तयार करवून शहरातील प्रमुख चौकात उभारला.

इसापने रचलेल्या नीतीकथांमुळे तो जगभर प्रसिद्ध झाला. त्या गोष्टी त्याने जरी प्राण्यांवर रचल्या
तरी त्यातून त्याने माणसांना नीती शिकवली. जगात कसे वागावे हे शिकवले. पण असे असूनही
त्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक पद्धतीने रचल्या असल्याने त्यांना जागतिक
लोकप्रियता मिळाली. जगातील सर्व प्रमुख भाषांतून' इसापनीती' ची भाषांतरे झाली आहेत.






0 comments

Post a Comment