तू जिवनात आहेस म्हणूनचं
तू जिवनात आहेस म्हणूनचं
तुझ्या प्रेमाने ओंजळ भरतो मी
तू रोज ओवाळतेस मला
कर्तव्यास रोज वरतो मी


तू जिवनात आहेस म्हणूनचं
माझ्या असण्याला एक कारण आहे
जगाच्या नजरेत किंमत नसली, तरी
तुझ्या डोळ्यात तेज असाधारण आहे


तू जिवनात आहेस म्हणूनचं
फुलपाखरा सारखं बागडणं होतं
अलगद तुझ्या मिठीत निसंकोच
तारुण्याच्या पापणीचं उघडणं होतं


तू जिवनात आहेस म्हणूनचं
एक आधार आहे बिलगून
वादळातही पहील्या पावसाच्या
सरी समजून जातो भिजून


तू जिवनात आहेस म्हणूनचं
अवचित हास्याला भेटतो
हास्याचे ते मुखवटे मग
दु:खाच्या चेहऱ्यावर लाटतो


तू जिवनात आहेस म्हणूनचं
वास्तवाचे निखारेही उब वाटतात
त्या उबाच्या छत्रछाये खाली
मला स्वप्नांचे शहारे भेटतात


तू जिवनात आहेस म्हणूनचं
माझा प्रत्येक क्षण मोहरतो
माझ्या अवती भवतीचा निवडूंग
प्राजक्ता सारखा बहरतो


तू जिवनात आहेस म्हणूनचं
जगण्याला एक दिशा आहे
बराचसा काळोख असला तरी
एक छोटीशी तिरीपच निशा आहे


तू जिवनात आहेस म्हणूनचं
ही झोपडी ही महाल आहे
ह्या महालात तुला माझ्या
हृदयाचा स्वर्ग बहाल आहे

0 comments

Post a Comment