आई गेली तेव्हा ताई आणि मी रडलोच नाही
दोघेही अचानक मोठे झालो
आणि पपा अचानक म्हातारे

रात्री उशीरा येऊ लागले
दाढी वाढू लागली
केस गळायला आणि पिकायला लागले
पाठीत पोक
आणि तोंडाला नको नकोसा वास
अडखळत बोलायचे
अडखळत चालायचे
लोक त्यांना टल्ली म्हणायचे जवळच रहाणारी आत्या रोज घरी यायची
सकाळीच दोन वेळचं जेवण करायची
आमचा राग राग करायची
ताईला तर काहीही बोलायची

नरुकाका - आत्याचे यजमान- मात्र
खुप चांगले
खाऊ चॉकलेट आणायचे
आणि ताईला आग्रहाने खाऊ घालायचे'
माझेही लाड करायचे
पण ताईचे मात्र खुप

का कोण जाणे
ताई मात्र त्यांना टाळायची
माझ्या बरोबर-बरोबर रहायची
माझ्याबरोबरच बाहेर निघायची
इतर वेळी दुकानात जायला आळस करायची
पण नरुकाका घरात असले की
आपणहून घराबाहेर रहायची.

एके दिवशी मात्र विचित्रच झालं.
घरात आत्या आणि आम्ही दोघं
अचानक काका आले आणि आत्याला काही सांगितलं
आत्या तशीच तिच्या घरी गेली
जाताना ताईला स्वयंपाक घरातलं काम सांगून गेली
मी मात्र बाहेरच खेळत, टीव्ही बघत बसलेला

अचानक ताई बाहेर आली
हमसाहमशी रडत
आणि काका तिच्यामागून
आम्ही दोघे कितीतरी वेळ तिची समजूत काढत होतो
पण ती थांबेचना

मग आत्या आली
काकांकडे प्रश्नार्थक बघत
काका म्हणाले, "तिला आईची आठवण येतेय"
आणि आत्या नाक मुरडून आत निघून गेली.
जळलेल्या भाजीवर पाणी ओतायला...

मला मात्र एक गोष्ट कधीच नाही कळली
ताई इतक्या दिवसानंतर का रडली ?

------ टल्ली

0 comments

Post a Comment