दुपार सरून गेल्यानंतर,
संध्याकाळ होण्याआधी,
हवेत दाटतो हलकासा गारवा
निर्माण होते काहीशी पोकळी,
वाहू लागते अचानक वादळ,
क्षणार्धात होते अनोळखी स्तब्धता,
मनात होते अकारण घालमेल ,
कारण येऊ घालते कातरवेळ

दुपार संपते कापरासारखी
पण संध्याकाळ होत नाही
खोल खोल दरी सारखी
कातरवेळ सरत नाही

कातरवेळी उभे ठाकतात
असंख्य विचार मनासमोर
पण सर त्यांची जुळत नाही
गुंता सुटता सुटत नाही
घनदाट वनात गेल्यासारखे
विचार नुसते भटकू लागतात
अधिक आत शिरताना
अंधारात रुतत जातात

जणू काही काळही
या वेळी स्तब्ध होतो
घद्याळाचा कटा मात्र
उगाचच पुढे सरकतो

0 comments

Post a Comment