प्रेषक भानस (शुक्र।, ०१/०५/२००९ - १५:४२)

जिन्नस

एक वाटी मुगाची डाळ

तीन वाट्या मैदा

प्रत्यकी तीन चमचे तीळ व ओवा

प्रत्येकी चार चमचे धणेजिरे पूड, तिखट

दोन चमचे हिंग, एक चमचा हळद व चवीपुरते मीठ


तळण्याकरीता तेल


मार्गदर्शन

कुकरच्या भांड्यात मुगाची डाळ धुऊन घेऊन दोन वाट्या पाणी घालावे। मैदा कापडात घेऊन त्याची सैलसर पुरचुंडी बांधावी. कुकरमध्ये डाळ व मैदा ठेवून नेहमीप्रमाणे तीन शिट्ट्या कराव्या. वाफ कमी झाली की मैदा ताटात काढून घ्यावा. वाफवल्यामुळे मैद्याचे ढेकूळ तयार झालेले असेल ते फोडून पुन्हा पीठ करावे. मैदा गरम असतानाच केले की पटकन होते. संपूर्ण गुठळ्या मोडल्यावर उकडलेली मुगाची डाळ घालावी. (दोन वाट्या पाणी घातल्यामुळे जास्तीचे पाणी उरत नाही. जर पाणी जास्त असेल तर ते वेगळे काढून ठेवावे व लागेल तसे घालावे. ) मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पूड, तिखट, ओवा व तीळ घालून मळावे. साधारण अर्धा तास ठेवावे. तळण्यासाठी पुरेसे तेल घेऊन प्रथम व्यवस्थित गरम करून घ्यावे नंतर मध्यम आच ठेवून नेहमीप्रमाणे चकल्या तळाव्यात. ह्या चकल्या अतिशय कुरकुरीत होतात व जराही तेल राहत नाही. पीठ भिजवताना त्यात मोहन किंवा साधे तेल अजिबात घालावे लागत नाही.


टीपा

जिथे चकलीची भाजणी सहजगत्या मिळत नाही किंवा आयत्या वेळी करायची लहर आल्यास पटकन करता येतात. आठ दिवस जरी राहिल्या तरीही तेल अजिबात गळत नाही. तीळ, ओवा, धणेजिरे पूड व तिखट हे थोडे जास्तच टाकावे म्हणजे भाजणीचा खमंगपणा येतो. हमखास कुरकुरीत होतात.

0 comments

Post a Comment